दोन वर्षांपूर्वी डिसेंबर मध्ये मोठ्या सुट्टीत 'ग्वाटेमालाला जाऊया का?' असं नवऱ्याने विचारलं तेव्हा मी या देशाचं नाव पहिल्यांदाच ऐकत होते. त्याने दाखवलेले सेमक चांपे (semuck champey) या जागेचे फोटो बघितले आणि बघता क्षणी ती जागा फार आवडली. ग्वाटेमालाबद्दल अजून थोडी माहिती वाचून मग आम्ही तिथे भटकायला जायचा आमचा बेत पक्का केला. सोबत १० महिन्यांची मुलगी असणार आणि तिच्यासाठी जरा नेहमीपेक्षा वेगळी तयारी या प्रवासासाठी करावी लागणार याचं थोडं टेन्शन आलं. पण मग तिला प्रवासाचा ताण नाही येणार अश्या बेताने आपण प्रवासाची आखणी करू असं ठरवून आम्ही ह्या अनुभवासाठी सिद्ध झालो.
आमची १८ दिवसांची सहल सुरू झाली ग्वाटेमालासिटी मधुन. ही ग्वाटेमालाची राजधानी आहे. या शहरात फक्त आम्ही येता - जाता एक एक दिवस थांबलो. ग्वाटेमाला सिटीला पोहोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही एका १६ सीटर बसने सेमक चांपेकडे जायला निघालो. बसमध्ये बसायला तशी अडचणच होती. मागच्या बाजूला दाटीवाटीने सर्वजण बसले होते. जवळजवळ सगळेचं परदेशी नागरीक होते. आमच्याकडे बाळ होते म्हणुन आम्हाला ड्रायव्हर शेजारची स्पेशल जागा मिळाली होती. ड्रायव्हरची सीट आणि त्याशेजारची सीट यामधल्या जागेत एक कामचलाऊ बसायची जागा केली होती, त्यावर माझा नवरा बसला. मी त्याच्याशेजारी जरा बऱ्यापैकी सीटवर मुलीला मांडीवर घेऊन बसले होते. ती खूश होती आणि कारसीट शिवाय प्रवास करत असल्यामुळे ह्या स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद लुटत होती.
साधारण ८ तास असा प्रवास करुन आम्ही संध्याकाळी लंकीन या सेमक चांपेजवळच्या गावात पोहोचलो. तिथे आम्हाला आमच्या 'युटोपिया' (Utopia) होस्टेलला घेऊन जाणारा पिक अप ट्रक येणार होता. तिथून पुढचा रस्ता म्हणजे गाडी जात होती म्हणुन रस्ता म्हणायचा असा भयानक होता. मांडीवरच्या बाळाला घट्ट धरून मी पुन्हा एकदा ड्रायव्हरच्या बाजूच्या जागेत बसले होते. यावेळी माझ्या शेजारी मात्र एक अनोळखी मुलगी बसली होती. बसली म्हणजे बिचारी कशीतरी एका छोट्या फ़ळकुटावर टेकली होती. नवरा आणी इतर युटोपियाला जाणारे आमच्या सोबतचे प्रवासी मागे पिक-अपच्या हौद्यात तोल सावरून आणि आपापल्या बॅग्ज संभाळत उभे होते. प्रत्येक वळणावर आणि खड्ड्यातून गाडी गेली की कोणीतरी खाली पडेल असे वाटत होते. कसाबसा अर्ध्या पाऊण तासाने तो प्रवास संपला आणि आम्ही आमच्या हॉस्टेलला पोहोचलो. तो पर्यंत सगळीकडे अंधार आणि सामसुम झाली होती. दिवसभर प्रवासाने थकलो होतो त्यामुळे मिळेल ते खाउन आमच्या रूम मध्ये जाऊन पडलो. पिल्लू दुध पिऊन मस्त झोपून गेलं. आपण कुठे आहोत आणि कुठे जाणार याची तिला काहीच काळजी नव्हती. सगळया प्रवासात ती मस्त एंजॉय करत होती आणि तिला मजेत बघून आम्हालाही छान वाटतं होतं. सकाळी उठलो आणि समोरचा नजारा बघून आदल्या दिवशीच्या प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळुन गेला.
महिंद्राचा पिक अप ट्रक
यूटोपिया हॉस्टेल
यूटोपिया हॉस्टेल इथली आमची रहाण्याची जागा
यूटोपियाला आम्ही ४ दिवस थांबणार होतो त्यामुळे आम्हाला कसली घाई नव्हती. इथून सेमक चांपेला जायची - यायची व्यवस्था हॉस्टेल मालकच करत होता. शिवाय तिकडे केव्ह टुर्स, नदीमध्ये ट्युबिंग अश्या गोष्टी होत्या त्यासाठीही होस्टेल मधून मुलं गाईड म्हणुन लोकांच्या सोबत जात होती. आम्ही केव्ह टुर करणार नसल्यामुळे जरा उशीराने निघायचे ठरवले. आम्ही यूटोपियाला पोहोचण्याआधी दोन दिवस भरपूर पाऊस पडल्यामुळे निळीशार असलेली नदी थोडी गढूळ झाली होती, पण पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे एक तजेला आला होता. वातावरण खूपच प्रसन्न झाले होते. आम्ही हॉस्टेल मालकाच्या पिक-अप ट्रक मधून सेमक चांपेला पोहोचलो. ही जागा ग्वाटेमालाच्या राष्ट्रीय राखीव जागांपैकी एक आहे. निळ्याश्यार पाण्याच्या टप्प्यांमध्ये विभागलेल्या 'काहाबान' नदीच्या प्रवाहात पोहण्यासाठी लोक खास करून इथे येतात. शिवाय नदीच्या पोटात गुहेसारखा नैसर्गिक बोगदाही आहे. पाणी कमी असताना तिथे आरामात जाता येते. या नदीच्याच बाजूने एक छोटा ट्रेक करून एका 'मिराडोर' म्हणजे व्हयु पॉईंटला जाता येते. आम्ही तो ट्रेक करून वर गेलो आणि तिथून दिसणारा नजारा असा होता.
आमचा पुढचा प्रवासही मोठा होता. युटोपियाहुन निघून आम्हाला फ्लोरेसला (Flores) जायचे होते. जवळच्या लंकिन या गावपर्यंत आम्हाला सोडण्याची व्यवस्था आमच्या हॉस्टेल मालकाने केली होती. तिथून सकाळी ८ ला आम्ही मिनी बस घेतली आणि संध्याकाळी ५ ला फ्लोरेस ला पोहोचलो. अमेरीकेत सहजा सहजी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असलेले डायपर चेंजिंग स्टेशन्स या प्रवासात कुठेही उपलब्ध नव्हते. मी सोबत एक चेंजिंग मॅट घेतले होते त्यावरच मग जिथे जिथे बसचे विश्रांती थांबे होते तिथे बाळाचे डायपर चेंज केले. याबाबतीत टाळाटाळ न केल्यामुळे तिलाही पुर्ण प्रवासात कधीही डायपर रॅश किंवा इतर इन्फ़ेक्शनचा काही त्रास झाला नाही.
फ्लोरेसला आम्ही 'लॉस अमिगोज' नावाच्या हॉस्टेलमध्ये रहाणार होतो. हे हॉस्टेल गावाच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे इथे युटोपियाच्या मानाने बराच गजबजाट होता. आमची प्रायव्हेट रूम होती त्यामुळे बाहेरच्या कोलाहलापासून आम्हाला जरा निवांतपणा मिळाला. हॉस्टेलमधूनच तिकाल (Tikal) या उत्खननात सापडलेल्या प्राचीन मायन राजधानीला भेट देण्यासाठी सफरीचे बुकिंग करण्याची सोय होती. आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळची सूर्यास्त- सफर बुक केली.
तिकाल बघण्याची खूप उत्सुकता होती. तिकाल नॅशनल पार्क हि जागा रेन फॉरेस्ट मध्ये गुडूप झालेल्या अतिप्राचीन मायान बांधकामांनी भरलेली आहे. यातल्या अगदी मोजक्याच जागांचे आत्तापर्यंत उत्खनन झाले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाने इथे सर्व प्रथम उत्खनन सुरु केले आणि त्या उत्खननातून अमेरिकेतले (उत्तर, दक्षिण आणि मध्य) आतापर्यंतचे सगळ्यात उंच टेंपल पुन्हा दिसू लागले. ते तिकाल नॅशनल पार्कमध्ये टेम्पल ४ म्हणून प्रसिद्ध आहे. टेंपलच्या वरच्या भागापर्यंत जाण्यासाठी लाकडी पायऱ्यांचा जीना करण्यात आला आहे. इथून नजर जाईल तिकडे फक्त जंगलच दिसते आणि मध्ये मध्ये दिसतात तिकाल टेंपल्स. इथल्या जंगलाची वाढ इतक्या झपाट्याने होते की जर व्यवस्थित निगा राखली गेली नाही तर पुन्हा काही वर्षात हि टेंपल्स झाडावेलींनी पूर्णपणे झाकून जातील.
दुसरा दिवस फ्लोरेस जवळच छोट्या पार्क मध्ये घालवला. तिसऱ्या दिवशी तिकाल सारख्याच असलेल्या पण जरा लांबच्या याक्षा (Yaxha) या ठिकाणी उत्खनानात सापडलेली पुरातन टेंपल बघायला गेलो. इथली टेंपल्स तिकालच्या मानाने कमी उंचीची आहेत. शिवाय इथे जायचा रस्ताही खडतर आहे त्यामुळेच की काय, इथे गर्दी कमी होती आणि आम्हाला निवांत फिरता आलं. इथूनही अप्रतिम सूर्यास्त पहायला मिळला.
याक्षा टेंपल्स
सूर्यास्त
हॉटेलच्या आसपास खाण्याचेही बरेच पर्याय उपलब्ध होते. त्यापैकी एका ब्रिटिश तरुण चालवत असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये खूपच चविष्ट व्हेज बिर्याणी खायला मिळाली. अश्या अनपेक्षित ठिकाणी आपल्या ओळखीचा पदार्थ खायला मिळालं की त्याची चव अगदी अप्रतिम लागते. खूप दिवस भारतीय पद्धतीच जेवण न खाल्यामुळेही असेल पण ती बिर्याणी आम्हाला फारच छान लागली.
आम्ही सकाळ संध्याकाळ पोटपुजेच्या निमित्ताने बाहेर पडून गावात आजूबाजूला हिंडून येत होतो. एकदा असेच भटकत असताना एक स्थानिक आमच्याजवळ आला आणि त्याने माझ्या नवऱ्याला विचारले "तू ग्वाटेमालन आहेस का?" त्याने नाही म्हंटल्यावर तो म्हणे "मग तुझी बायको ग्वाटेमालन आहे का?" त्याने मीही ग्वाटेमालन नाही हे सांगितल्यावर तो आश्चर्यचकित झाला आणि मग आम्ही भारतीय आहोत हे सांगितल्यावर तो म्हणाला, की तुमच्याकडे बघुन तर तुम्ही ग्वाटेमालानच असाल असे वाटाले. पण आमच्या ह्या ग्वाटेमालन दिसण्याचा कोणत्याही दुकानात आम्हाला वस्तुंची किंमत कमी करून घेण्यात काहीही फायदा झाला नाही. आमच्या अगदीच कामचलाऊ स्पॅनिश बोलण्यामुळे लगेचच समोरच्याला आमचा खरा रंग कळून यायचा आणि मग वस्तूंच्या किमती पण वर जायच्या. रस्त्यात फिरताना बरेचदा लोक आम्हाला मुलीचं वय विचारायचे आणि मी गडबडीत 'दोसे मेसेस'(दहा महिने) च्या ऐवजी 'दोस मेसेस' (दोन महिने) असं सांगायचे आणि विचारणारा हे उत्तर ऐकून चक्रावून जायचा.
इथून एक दिवस 'लांचा' म्हणजे छोट्या बोट मधून जवळ असलेल्या 'सॅण्टिआगो' गावात जाऊन आलो. आम्ही राहत होतो त्या गावापेक्षा हे गाव खूपच बकाल होते. इथे 'सेंट मक्षिमॉन' चर्च बघण्यासारखे आहे असे वाचलेले होते म्हणुन ते बघायला गेलो तर तिथेही फारच उदासीन वातावरण होते चर्चची बाहेरून काही ठिकाणी पडझड झाली होती आणि एकंदरीतच सगळीकडे मरगळ पसरलेली होती. पण लांचा मधून येता जाता आजूबाजूच्या पर्वत्राजीचे आणि सुप्त ज्वालामुखी असलेल्या 'सॅन पेद्रो', 'व्होल्केन अतितलान' यांचे दर्शन फारच मनमोहक होते हीच काय ती जमेची बाजू.
फ्लोरेसमधले लंच
सॅन पेद्रो मधे डिनर
भाषा: स्पॅनिश
आमचा अनुभव - इथे छोट्या गावांमध्ये फिरताना तुम्हाला किमान थोडेफार प्राथमिक स्वरूपाचे स्पॅनिश येणे गरजेचे आहे असे मला तरी वाटले, त्यामुळे तुम्ही लोकांशी थोडंफार बोलू शकता. मला अगदी थोडेच शब्द माहित होते पण माझ्या नवऱ्याने ग्वाटेमालाला जाण्याआधी काही दिवसच बेसिक स्पॅनिशचा कोर्स केला होता त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला. दुकानांमध्ये घासाघीस करण्यासाठी ,जेवणात काय हवे नको सांगायला आणि मुख्य म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांमध्ये थोडंफार मिसळुन संवाद सुरु करायला आम्हाला या गोष्टीचा चांगला उपयोग झाला. आम्ही तोडके-मोडके बोललो तरी लोकांनी आम्हाला समजून घेतले आणि त्यामुळे भाषेचा अडसर फारसा जाणवला नाही.
समाप्त...!
(चित्र- किलमाऊस्की)

विशेष
वाचने
49152
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख सफर ग्वाटेमालाची
फोटो अप्रतिम. मी PMO असतानाची
वाह
धन्यवाद बाबा योगिराज
In reply to वाह by बाबा योगिराज
वेगळ्या देशाची माहिती
ते दोन्ही वेगळे आहेत
In reply to वेगळ्या देशाची माहिती by सामान्य वाचक
वाह. हिरवागार दिसतोय परिसर.
हो गवि. गुन्हेगारी वातावरण मोठ्या शहरात आहे अजुनही..
In reply to वाह. हिरवागार दिसतोय परिसर. by गवि
ही अनोखी सफ़र खूप छान वाटली.
अगदी अनकॉमन प्लेस ! छानच आहे
अप्रतिम फोटो!
असे आहे तर गौतमालय!!!! सफर
१० महिन्याचा बाळाला घेउन
या दोन्ही जागा वेग वेगळ्या आहेत.
In reply to १० महिन्याचा बाळाला घेउन by मृत्युन्जय
आगळीवेगळी सफर.
मॅन!
अनवट ठिकाणची ओळख करून
छान झालीये सफर. मलाही देशाचे
सुंदर!!!
मस्त सफर !
अप्रतिम
मस्तच झालाय लेख...
अनवट जागेची मस्त सफर आवडली.
अनवट जागेची मस्त सफर आवडली.
मस्त
एका अनवट देशाची सफर आवडली...
ग्वाटेमाला
सुंदर फोटो. तुमचे सविस्तर
In reply to ग्वाटेमाला by समर्पक
+१
In reply to सुंदर फोटो. तुमचे सविस्तर by डॉ सुहास म्हात्रे
झकास पूरक छायाचित्रं आहेत...
In reply to ग्वाटेमाला by समर्पक
धन्यवाद समर्पक!
In reply to ग्वाटेमाला by समर्पक
छानच.
अप्रतिम लेख. दहा महिन्यांच्या
ग्वाटेमालाबद्दल लिहीन असं तू
अनोखी सफर!
ग्वाटेमाला हे पूर्वी (खूप
मला तरी काही पुरावे दिसले नाही
In reply to ग्वाटेमाला हे पूर्वी (खूप by अनुप ढेरे
फोटो अप्रतिम !!! ग्वाटेमाला
प्रतिक्रिया
प्रतिक्रिया
१० महिन्याचं बाळ घेऊन फिरलात!
खूपच छान अनुभव. सुंदर लेख आणि
वेगळ्या वाटेवरची भटकंती आवडली!
अप्रतीम निसर्गसौंदर्य! फोटू
छान..
धन्यवाद!
सुंदर !! अतिशय मस्त लेख ..
सफर
छान ........
सुरेख लेख आणि फोटो. मिराडोर
लेख आणि फोटो फार सुंदर.
Bhari pics....anwat....
छानच