"तुम्हाला कसा प्रवास आवडतो? स्वप्नातल्या गाडीतून घाटातल्या अवघड रस्त्याने किंवा सहा-आठ पदरी मोठ्या महामार्गाने? ऐन पावसाळ्यात दुचाकीने घाटातले धबधबे बघत थांबत की रखरखत्या उन्हात डोंगर दर्यात भटकायला? बाहेर बर्फ पडत असताना रेल्वेत उबदार वातावरणात बसून ते क्षण टिपायला की तंत्रज्ञानाची निसर्गाशी सांगड घालत उंचावर नेऊ शकणार्या रोपवेने?" असे कितीही पर्याय दिले तरी त्यातून हमखास एक असा निवडणे कोणाच भटक्याला जमण्यासारखे नाही. कारण यातल्या प्रत्येक प्रकाराची वेगळी गंमत आहे. स्वतःच्या गाडीने प्रवास करताना अनपेक्षित स्थळांना भेट देणे हा सुखद अनुभव, पण त्यातला एकसूरीपणा नको असेल तर बस, ट्रेन अशा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास हवा ज्यात लोक भेटतात, कधी त्यांच्या वागण्याचा वैताग तर कधी त्यातून उमगलेली माणसं! विमानाचे सततचे प्रवास कंटाळवाणे होतात तरीही पहिला विमानप्रवास हे आकर्षण असतंच. याच फिरण्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे पायी भटकंती! मग ते जंगलात ट्रेक साठी असो, गावाबाहेरच्या लहानशा डोंगरातला ट्रेल असो की एखाद्या महानगराच्या उंचच उंच इमारती बघत गल्लीबोळा शोधत तुडवलेले रस्ते असोत. हिरवीगार वनराई, त्यात पक्ष्यांसाठी लोकांनी बांधून ठेवलेली घरं, त्यापलीकडे दूरवर डोंगरावर लपाछपी खेळणारा सूर्य, कधी अचानक ढग येऊन बरसलेल्या सरी आणि मग आडोसा शोधताना दिसलेल्या लाकडी झोपड्या, पक्ष्यांची किलबिल, पानगळीच्या ऋतूत आपल्याच पायांमुळे होणारा जमिनीवरच्या पानांचा आवाज आणि शरद ऋतूतले विविधरंगी झाडं, कधी 'साद घालती हिमशिखरे'ची आठवण करून देणारी पर्वतरांग, मधूनच उगवलेली रानफुलं, युरोपातील महानगरात तिथल्या इमारतींमधून डोकावणारा इतिहास, कडाक्याच्या थंडीत नाताळसाठी सजलेले शहर, नदीकाठच्या रस्त्याने प्रिय व्यक्तीसोबत केलेला वॉक असे अनेक क्षण या पायी फिरतीने आजवर अनुभवायला मिळाले ज्यांनी भटकंतीत पायी फिरती हवीच असं प्रत्येक वेळी मनावर ठसवलं. कूठल्याही नवीन ठिकाणी जाताना तिथल्या फिरतीच्या नियोजनात या पदभ्रमंतीसाठी काही वेळ/दिवस जमेल तसे राखून ठेवायला हवेत हे अशा प्रत्येक भटकंतीनंतर नव्याने वाटतंच आणि तसं केलंही जातं. अशाच काही क्षणांना उजाळा देताना पोतडीतून बाहेर पडलेल्या या आठवणी.
हायडेलबर्ग हे असंच एक जर्मनीतलं असंच एक अतीव सुंदर शहर, कुणीही प्रेमात पडेल असं. शनि-रवि कंटाळा आला तर सहज जाऊ शकू इतकं आम्हाला जवळ. तिथे अनेक वेळा नेकर नदीच्या काठाने चालत जायचं, तिथला प्रसिद्ध किल्ला बघण्यासाठी चढत जायचं, उन्हाळ्यात आईसक्रीम खायचं, तिथल्या जुन्या शहरात फेरफटका मारायचा, व्हायोलिन किंवा कुठलंही वाद्य वाजवत तिथे हमखास कुणीतरी असतं ते सूर ऐकतच सूर्यास्त बघून परत यायचं हा तसा नेहमीचा उद्योग झाला होता. तसं हे काही फार मोठं शहर नाही. पण इथे प्रत्येक वेळी फिरताना काहीतरी नवीन सापडायचं आणि त्यामुळे कितीही वेळा पाहिलं तरी तिथे जाण्याचा कधी कंटाळा आला नाही, अजूनही येत नाही. वर्षभर कुठल्याही ऋतूत हे पर्यटकांनी गजबजलेलं असतं. या शहराबद्दल खूप काही लिहिता येईल पण तो या लेखाचा विषय नाही. या शहरात असे पायी भटकताना टिपलेले हे काही क्षण - (यात शहरातली मुख्य प्रेक्षणीय स्थळं नाहीत)
पण हे सगळं म्हणजे काही कुठले ट्रेल-ट्रेक नव्हते. इल्लुसे डोंगर चढायचे इतपतच माझी मजल होती. असंच एकदा र्हाईन (Rhein) नदीच्या काठावरच्या र्युडेसहाईम (Ruedesheim) या गावात गेलो होतो. टुमदार कौलारू घरं, नदीकाठाने जाणारा रस्ता आणि डोंगरावर द्राक्षांची शेती. या डोंगरावर जाताना केबल कार मधून खाली डोंगरात फिरणारे हे लोक असे चित्र दिसले आणि एकदम वॉव, सही, हे असं काही आपण केलं नाहीये असं वाटलं.
बरेचदा तिथल्याच मोठ्या दगडांचा उपयोग दिशादर्शक म्हणून केलेला असतो.
हिवाळ्याच्या सुरुवातीला झाडांवर दवबिंदू असतात, तर पानगळीच्या ऋतूत जागोजागी पानांचा खच पडलेला असतो. प्रत्येक ऋतूप्रमाणे दिसणारे हे बदल आपल्याला निसर्गाच्या अजून जवळ घेऊन जातात.
कधी या अशा चित्रातल्या जागा आपली वाट बघत असतात.
काही लोकांच्या प्रेम प्रदर्शनातून कुठलीच जागा, कुठलाच देश सुटत नाही याचं हे उदाहरण.
एकाच प्रकारच्या ट्रेलमध्ये विविध रुपांचा आस्वाद कसा घेता येईल याचा विचार करून, तसे मार्ग आखून त्याची काळजी घेणे, तिथे सगळीकडे दिशादर्शक लावणे, या सगळ्याची अद्ययावत माहिती आंतरजालावर उपलब्ध करून देणे ज्यात कुठला ट्रेल किती कठिण आहे, किती चढ उतार आहेत, जवळ बस, ट्रेन इत्यादीची काय सोय आहे हे सगळं, शिवाय या निसर्गाच्या सोबतीने अधून मधून बसायला केलेली जागा, त्यातही दाखवलेली सुबकता आणि तरीही शक्य तेवढा नैसर्गिक रुपांकडे दिलेला भर, वेळोवेळी दिसणार्या कचरापेट्या या सोयींमुळे हा प्रवास क्वचित काही अपवाद वगळता कुठेही वैतागवाणा होत नाही. जे बघायला आपण आलेलो आहोत, त्याचा पुरेपुर अनुभव घेता येतो. अगदी लहान लहान मुलांना घेऊन सुद्धा अनेक जण फिरत असतात. लहान बाळांना स्ट्रोलर मध्ये ठेवून नेण्यासारख्या पायवाटा सगळीकडे असतात. ज्यांची मुलं चालू-पळू शकतात, त्यांना तर अशा ठिकाणी मनसोक्त खेळायला वाव असतो. याच अनुभवांमुळे स्वित्झर्लंडमधल्या भटकंतीत प्रवासी स्थळं बाजूला ठेवून त्याऐवजी असे दिवसभराचे ट्रेल केले आणि ते मनसोक्तपणे अनुभवले.
अशा या प्रवासात अनेकदा फिरायला आलेले बरेचसे आजी आजोबा दिसतात. नवीन चेहरे बघून कधी कौतुकाने हसतात, कधी चुकून कुणी इंग्रजीतून देखील बोलतात. या लोकांचा ७०-८० व्या वर्षी हा उत्साह बघून त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावेसे वाटते. या सगळ्यात थोडी खंत जाणवते की या शेतात, गावात माणसं क्वचित दिसतात. शेतातली बहुतेक कामे यंत्राने होत असली तरीही शेत म्हंटले की भारतातले शेतकरी आठवतात. या देशाच्या निसर्गाचं संवर्धन करणारी, जपणूक करणारी ही लोकं, त्याचं जीवनमान समजून घेणं हा देखील अशा प्रवासातला आनंदच भाग असतो जो इथे तेवढ्या सहज जमत नाही. पण या सगळ्या मागचे त्यांचे कष्ट मात्र नक्कीच दिसतात. गायी, शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या यांच्याशिवाय आपली भारतातली शेती अपूर्ण आहे आणि ते आहे म्हणूनच कदाचित ते जास्त जीवंत वाटतं. माझ्या गावातून बाहेर पडताना दिसणारी तुरीची, कपाशीची शेतं आणि त्यात अजूनही दिसणारी बुजगावणी, भर पावसात कोकणातल्या लाल मातीत भातपेरणी करणारी माणसं, कुठे झाडाला झोळी बांधून एकीकडे काटक्या उचलणारी बाई आणि धोतर टोपी घालून बैलांना हाकणारे शेतकरी अशी अनेक दृष्य जी लहानपणापासून डोळ्यासमोर आहेत ती पुन्हा बघण्यासाठी मन हळवं होतं हेही खरं.
मार्च महिना आला की सगळीकडे वसंताची चाहूल लागते आणि कधी एकदा बाहेर भटकंतीचे दिवस सुरु होतील यावर बेत ठरू लागतात. सलग ५-६ महिन्यांच्या ब्रेक नंतर सूर्य आपली उपस्थिती ठळक पणे दाखवू लागतो. फुलांचा बहर जागोजागी लक्ष वेधून घेऊ लागतो. त्यात युरोपीयन लोकांचे फुलांवरचे आणि एकूणच निसर्गाबद्दलचे प्रेम जगप्रसिद्ध आहेच. गावातल्या प्रत्येक चौकात, प्रत्येक रस्त्यावर, घरात, खिडकीत जागोजागी फुले दिसू लागतात. आणि त्या फुलांप्रमाणेच लोकांचा उत्साह देखील ओसंडून वाहू लागतो. यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे चेरी ब्लॉसम. साधारण ३ ते ४ आठवडे फक्त ही फुलं बहरतात. अनेकांच्या घरासमोर, बागांमध्ये दुरूनही या फुलांचा गोड गुलाबी रंग लक्ष वेधून घेतो. या चेरी ब्लॉसम बद्दल जपानमधील साकुराच्या रूपाने वाचले होते, फोटो बघून 'अहाहा' असे उद्गार काढले होते. पण तेव्हा याची व्याप्ती जगभर पसरली आहे हे माहिती नव्हते. पण ही झाडे इतरत्रही पसरली आहेत. वसंत ऋतूच्या सुरुवातीला ही फिकट गुलाबी रंगाची नाजूक आणि सुरेख फुले चेरी च्या झाडांना दिसू लागतात. यातील काही झाडे ही बरेचदा केवळ सुशोभीकरणाच्या उद्देशाने लावलेली असतात, त्यांना चेरीचे फळ येईलच असे नाही. देशांप्रमाणे आणि दरवर्षीच्या हवामाना प्रमाणे बहर कधी येणार हे बदलते. अजून माहिती शोधली असता असे कळले की हा अशा प्रकारचा ब्लॉसम चेरी सोबतच बदाम, पीच, प्लम अशा इतरही झाडांना येतो. यातली चेरीची झाडं ही डेरेदार असतात आणि फुलं सारखीच दिसत असली तरीही तुर्यांमध्ये किंचित फरक असतो. याउलट बदामाची ही झाडं अगदीच लहान असतात. इथे साधारण मार्च महिन्यानंतर २ आठवडे हा गुलाबी रंग सर्वत्र पसरलेला असतो. बहुतेक ठिकाणी जवळच्या कुठल्यातरी बागेत ही अशी अनेक झाडं एकत्र बघायचा योग येतो. पण त्याशिवाय काही भागात असे काही 'गुलाबी रस्ते' आहेत जे जिथे दुतर्फा ही गुलाबी रंगात बहरणारी झाडं लावलेली आहेत. मधून चारचाकीसाठी रस्ता आणि त्यापालीकडून खास पायी चालणार्यांना म्हणून रस्ता आहे. बाजूला दूरवर दिसणारी छोटी छोटी गावं, त्यात उठून दिसणारे चर्च आणि पुढ्यात असलेली द्राक्षांची शेती हे विलोभनीय दृष्य. 'शाम गुलाबी, सेहेर गुलाबी' अशी गाणी इथे बसूनच सुचली असावीत का असा प्रश्न पडतो. हा प्रदेश वाईन साठी प्रसिद्ध असल्याने अधून मधून वाईनची दुकानं थाटलेली असतात आणि नितांत सुंदर वातावरणात एका हातात वाईन ग्लास घेऊन शेतात लोक बसलेले असतात. विशेष कौतुकास्पद हे की कुणीही ही फुलं तोडत नाहीत, मग ती अगदी लहान मुलं असोत की वयस्कर लोक.
या ठिकाणी जाताना आम्हाला जवळचा असा जो रस्ता होता तिथे जाताना मध्ये लागलेलं हे गाव -
सोबत नकाशे होतेच, शिवाय गुलाबी रंगाच्या फुलाचे चित्र असलेले स्टिकर्स अनेक झाडांवर लावले होते की जे दिशादर्शक म्हणून काम करत होते. साधीशीच गोष्ट, पण ज्या कलात्मकतेने, मूळ निसर्गाला कमीत कमी धक्का लावून ती केली की ती अजून आवडते हे नक्की.
ही काही चेरीची झाडं -
आणि ही बदामाची -
अशा आजवरच्या अनेक ठिकाणांनी कायमस्वरुपी मनात घर केलंय. या गावाबाहेरच्या डोंगरात, शेतात आणि निसर्गाच्या जवळ जाणार्या रस्त्यांसोबतच विविध शहरात फिरतानाही असे अनेक अनुभव या पायी फिरण्यातून मिळाले. नाताळच्या उत्सवी वातावरणात, कडाक्याच्या थंडीत बर्लिन मध्ये फिरताना अशी पायी भटकंती केली तेव्हा इतिहासाच्या खुणा सतत भेटत होत्या. व्हेनिस सारख्या शहरात तर तसेही फक्त लहान सहान गल्ल्याच सगळीकडे, अधून मधून पाण्याचे कालवे आणि त्यावरचे पुल, हातात नकाशा घेऊन पाय तुटेपर्यंत फिरून अनुभवलेलं ते शहर आजही तसंच आठवतंय. पॅरिसमध्ये फिरताना आलेली मुंबईची आठवण, लंडनमधला एकटीने केलेला प्रवास, अॅमस्टरडॅमला चुकलेले रस्ते, व्हिएन्नात फिरताना दिसलेले स्थापत्यशास्त्राचे उत्तमोत्तम नमुने आणि बुडापेस्टला नदीकाठाने चालताना ज्या ठिकाणी ज्युंना मारण्यात आले त्या जागेवर थबकलेले पाय, अशाच कुठल्याशा इमारतीच्या खिडकीतून डोकावणारी सुरकुत्या पडलेली आजी, तिथल्या खिडक्यांमधून डोकावणार्या फुलांमधून दिसलेली लोकांची आवड अशी न संपणारी आठवणींची यादी...
या प्रत्येक ठिकाणांच्या आठवणी अधिक प्रिय झाल्या त्या या पायवाटांनी. जुन्या घराचा रस्ता कसा आपुलकीचा वाटतो, तसं काहीसं नातं तयार होत असावं या रस्त्यांशी, डोंगरांशी. पुन्हा कधीही त्याच रस्त्याने जाण्याचा योग आला तर त्या मातीशी बहुदा जास्त जवळीक वाटत असावी, जणू काही आपलेच ठसे तिथे कायमस्वरूपी उमटलेत. अशाच क्षणांना आठवत त्यातल्या मोजक्या आठवणी या निमित्ताने कागदावर उतरल्या...अजून अनेक अशाच पायवाटांच्या प्रतीक्षेत...
(चित्र- किलमाऊस्की)

वाचने
7261
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह..!
खूप आवडल्या पायवाटा !
या पायवाटा पाहून चालण्याचा
छान..!
सुंदर लिहले आहेस.. तो castle
सुपर्ब!
कसलं भारी लिहिलंय!
या पायवाटा पाहून चालण्याचा
खूप आवडली पायवाट.
छान लिहिलयस
छान लिहिलयस
पायवाटांशी नातंही असतं.
एकच वाक्य जबरदस्त
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे
मस्त मस्त !!
अप्रतिम फोटो.
मस्त मस्त..
एकदम भारी!
वॉव मधुरा..आता मार्च चालू आहे
पायी भटकंती आवडली!
पायवाटा भारीच..फोटो सुरेख.