आदी शंकराचार्य म्हणजे भारतीय आध्यात्मिक विचारसृष्टीतला तळपता सूर्यच. त्याच्यासमोर डोळे दिपून अंधेरी यायला लागली, म्हणून आता थोडे काजवे चमकवतो.
शंकराचार्यांनी वेद, उपनिषदे वगैरेंवरती बरेचसे किचकट लेखन केले आहे, पण आज त्यांच्या शब्दांची ओळख "भज गोविन्दम्" या अत्यंत मधुर गीतामुळे लोकांत आहे.
त्याचे धृवपद असे :
भज गोविन्दं भज गोविन्दं
गोविन्दं भज मूढमते |
संप्राप्ते सन्निहिते काले*
नहि नहि रक्षति डुकृ़ञ् करणे ॥
भज गोविंदा भज गोविंदा
गोविंदा भज मूर्ख जणा
येतां विधिलिखिताच्या काळें
नाही रक्षित "डुकृ़ञ् करणे" ॥
इथे "डुकृ़ञ् करणे" हा काय प्रकार आहे? हा कुठल्यातरी तांत्रिक शब्दकोशातला असंबद्ध उतारा आहे. म्हणजे आज एखाद्या पाद्र्याने येऊन गणितकाराला सांगणे "तुझ्या dy/dx ने मरणाच्या काळी रक्षण होणार नाही, ते सोड, येशूचा पंथ धर," किंवा एखाद्या सी-प्रोग्रॅमरला सांगणे झाले "तुझ्या '# include stdio.h' ने मरणाच्या काळी रक्षण होणार नाही, ते सोड, येशूचा पंथ धर".
अरे बाबा, गणितज्ञ "dy/dx" आणि प्रोग्रॅमर "# include stdio.h" मरणाच्या काळी वापरतो आहे का? किंवा शब्दकोशातल्या तळटिपा लिहिणारा "डुकृ़ञ् करणे" मरणाच्या काळी वापरतो आहे का? पण तंत्रशिक्षण नसलेल्या पण विचारी माणसास शंकराचार्यांचे (किंवा माझ्या पाद्रीचे) गाणे ऐकून तसे वाटल्यास काय नवल! आपल्या मधाळ जिभेचा पाचर बनवून या प्रतिभावंत आचार्यांनी तंत्रज्ञ -वैज्ञानिकांना सामान्य माणसापासून तोडले.
अहो, इ.स.५व्या शतकात भारतात ज्योतिषशास्त्रात पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा विचार सुरू झाला होता. पण तेवढ्यावर विज्ञान थांबून चालत नाही - ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी शेकडो वर्षे कोणालातरी किचकट गणिते आणि निरीक्षणे करावी लागतात. ती कोणी केली नाहीत, मग अजूनही कुंडल्या "पृथ्वी विश्वाचा मध्य" असे मानून मांडतात - (घाटपांडे सर, चुकले असेल तर सुधारा). इ.स.पूर्व ७०० ते इ.स.७०० पर्यंत आयुर्वेदातले महारथी सुश्रुत, चरक आणि वाग्भट होऊन गेले. त्यानंतर सूक्ष्म निरीक्षण करून वैद्यकात संशोधन करणारे भारतात निपजणे बंद का झाले? साधारण त्या काळात स्वतंत्र विचार करणार्यांना लोकात भाव मिळेनासा का झाला?
यात शंकराचार्य एकटेच नाहीत, पण त्या काळात अवघ्या हिंदू/हिंदी विचारधारेने एका टोकाचे तंत्र-विज्ञान-द्वेष्टे रूप घेतले. म्हणून या रसाळ गोड गाण्याचे धृवपद ऐकतो तेव्हा मी भारतीय विज्ञानाच्या हजार वर्षांच्या निद्रेची, आणि अफगाण-ते-इंग्रज या सर्वांकडून येणार्या हिंददेशाच्या पारतंत्र्याची नांदी ऐकतो.
झाले. टाकली पिंक. चर्चेचा विषय हा : भारतीय विज्ञानाच्या दीर्घ योगनिद्रेचे कारण त्या काळात झालेला हिंदूधर्मातील बदल आहे, हे तुम्हाला पटते का? नसल्यास तुम्हाला कुठली कारणमीमांसा पटते?
---
*या ओळीत "प्राप्ते सन्निहिते मरणे" वगैरे पाठभेद आहेत. या चर्चेत ते न काढले तर चर्चा सुसूत्र राहील.
(संपादन : याच्याआधी ती टाकलेली पिंक माझ्यावर परत पडणार होती वगैरे जरा कसेसे वाटायला लावणारे शब्द होते. ते आता संपादून काढून टाकले.)
वाचने
93272
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
बघा बरं, एवढं झालं तरीही
In reply to अगदी १९४७ पर्यंत भारत by साहना
साहना जी
In reply to अगदी १९४७ पर्यंत भारत by साहना
सहमत
In reply to साहना जी by मारवा
प्रतिसाद आवडला. यावरून माझ्या
In reply to साहना जी by मारवा