श्री गुरू एक कोडे भाग-२
आज दुसर्या भागाला सुरवात करण्याआधी श्री.गावडे आणि श्री. मारवा यांचे आभार मानतो. एका विषयाकडे निरनिराळ्या दृष्टीने पहातांना पूर्वासूरींनी काय सांगितले आहे हे पहाणे उपयुक्त असते. ( श्री.गावडे यांच्यासाठी " महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर " असे जनाबाई म्हणते व नामदेवांना " ज्ञानदेव मीच आहे " असे श्री. विठ्ठलच सांगतात. तेव्हा हरीदासांची कथा असे म्हणून ते सोडून देऊ नका) श्री. आनंदा यांच्या प्रश्नाला उत्तर देणे अवघड आहे कारण मी नास्तिक आहे असे म्हटले तर ते विचारणार की तुमचा देवावर विश्वास नाही की वेदांवर ? मी विज्ञानवादी आहे की नाही यावर काहीही म्हटले की ते विचारणार विज्ञान याची व्याख्या काय? पूर्वी ज्याला विज्ञान म्हणता ते की हल्ली आपण ज्याला विज्ञान म्हणतो ते ? तेव्हा काही न बोलता त्यांना काय विचारावयाचे आहे ते प्रथम ऐकणेच योग्य. असो.
आजच्या भागात आपल्याला गुरूभक्ती कशी रुजली असावी याचा विचार करावयाचा आहे. प्रथम एक सोपे उदाहरण घेऊ. एकलव्याला द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या शिकावयाची होती. पण गुरूने त्याला शिष्य करून घेण्यास नकार दिला. आता काय करावयाचे ? दुसरा गुरू शोधणे हा एक मार्ग. पण तो एकलव्याला मान्य नव्हता. त्याने द्रोणाचार्यांचा एक पुतळा केला आता हेच आपले गुरूजी व हेच आपल्याला विद्या देणार या धृढभावनेने अभ्यासास सुरवात केली. याची परिणती अशी झाली की द्रोणाचार्यांचा पट्टशिष्य अर्जुन याला प्रश्न पडला की हा म्हणतो की "द्रोणाचार्य माझे गुरू " व हा तर धनुर्विद्येत आपल्यापेक्षा सरस; म्हणजे आचार्यांनी याला आपल्या नकळत विद्या दिली काय ? त्याने एकांत्तात द्रोणांना तसे विचारलेही. बुचकळ्यात पडलेले द्रोण त्याला घेऊन एकलव्याकडे गेले. तेथे त्याने द्रोणांचा पुतळा दाखवून हे माझे गुरू असे सांगितले आणि विनातक्रार गुरूदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा तोडूनही दिला. आपल्याला प्राणप्रिय असलेली विद्या गुरूने सांगितले म्हणून स्वत: नष्ट केली ! इथे आपण कोडे सोडवण्याकडे पहिले पाऊल टाकतो. गुरूवर तुमची इतकी धृढ भक्ती असेल तरच तुम्हाला विद्या मिळेल. आत्मविद्येच्या बाबतीत तर याला पर्यायच नाही. म्हणूनच कबीर नि:संदेह गुरू आणि गोविंद यांच्यात गुरू निवडतो. निळोबारायांना स्वप्नात भेटलेले तुकाराम गुरू म्हणून पुरतात.
म्हणजे गुरूचा शोध या धृढभावनेतच शोधला पाहिजे. इतिहासात जाण्याचे आधी मला दिसलेला पहिला फरक हा पौर्वात्य व पाश्चिमात्य जनमानसातच आहे. भारत, चीन वा जपान घ्या. या मातीतच ही भावना निसर्गत:च रुजलेली दिसते. मग ते मुलाचे आईवडील, कुटुंबीय यांवरील , पत्नीची पतीवरील प्रेम असो वा कराटे शिकवणार्या गुरूवरील निष्ठा. इथे "स्व" हा नेहमीच दुय्यम आहे. तुलनेकरिता एक उदाहरण म्हणून ग्रीसमधील नावाजलेली साक्रेटीस-प्लेटो ही जोडी घ्या. फरक लगेच जाणवतो. ही पार्श्वभूमी ध्यानात घेऊन आता वेदकाळात चला.
त्यावेळी लेखनकला ज्ञात नव्हती. यज्ञात करावयाचे विधी व म्हणावयाचे मंत्र जो यांत जाणकार आहे त्याच्याकडूनच शिकले पाहिजेत. तुमचा यज्ञावर विश्वास असेल तर तेव्हढाच हे शिकवणार्यावर पाहिजे. लेखनकला ज्ञात झाल्यावरही फरक पडला नाही. अजूनही उच्चार गुरूमुखातूनच शिकावे लागणार. तेव्हा गुरूचरणाशी बसणे आलेच. असा गुरू तुमच्याकडून काहीही अपेक्षा न ठेवता हे ज्ञान देत असेल तर तुमची निष्टा वाढणारच. त्यातही तुम्ही २४ तास त्याच्या सान्निध्यात रहाता म्हटल्यावर गुरूची महती खोलवर रुजणारच. शिष्य दक्षिणा देत पण ते बहुतांशी शिष्यावरच सोडलेले असे. ( गुरूने दक्षिणा मागितलेली ३-४ उदाहरणे आहेत, मजेशीर आहेत, पाहिजे असेल तर शरदबुवांना विचारा, सांगतीलही) तेव्हा शिष्य गुरूचे हे ऋण जन्मभर विसरत नसत.
जरा पुढे उपनिषदकालात आलात तरी ही परंपरा चालू राहिलेली दिसते. खरे म्हणजे वेदांवर परमभक्ती वगैरे या ऋषींनी भिरकावून दिली होती. वेदांना "फुटक्या नौका" म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. पण आता " मृत्यूनंतर स्वर्गातील सुखे " सारखी फुटकळ उद्दिष्टे समोर नव्हती आता गाठ होती "ब्रह्म" सारख्या तरल,धुसर कल्पनेशी. प्रखर विद्वानालाही प्रथम आपल्यापेक्षाही श्रेष्ठ ज्ञात्याकडे जाऊन आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उकल करून गरजेचे होते. म्हणून कबंधिन-कात्यायनादि पाच आचार्य पिप्पलादांकडे हातात समिधा घेऊन शिष्यभावाने आपापले प्रश्न विचारावयास गेले व त्यांनी संगितले म्हणून त्यांच्या आश्रमात एक वर्ष शिष्यासारखे राहून मग आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवली. या सगळ्यात काही हजार वर्षे गेली. आता ही गुरुभक्ती रुजावयास सुरवात झाली म्हणावयास हरकत नाही.
मग आला बुद्ध काल. स्वत: बुद्ध मला कोणी गुरू नव्हता; मी स्वत: सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवली असे म्हणतो. पण त्याच्या निर्वाणानंतर ही परिस्थिती बदलली. बौद्धांत गुरूभक्ती रुजली, इतकी रुजली की पुढे त्यांनी प्रत्येक तथागताला एकेक वज्राचार्य गुरू म्हणून दिला. बौद्ध सिद्धांनी गुरूमहिमा वाढवला. तिलोपा हा सिद्ध म्हणतो "परमतत्व हे महापंडितांनाही अगम्य, अगोचर असून गुरूकृपेवाचून ते प्राप्त होणारच नाही."
आता नाथसंप्रदायाकडे जाऊ. इथे गुरूभक्तीची परमसीमा दिसून येते. गुरूला ईश्वराहूनही श्रेष्ठ स्थान आहे. पंथाची सुरवात झाली शिवापासून. पण प्रत्येक शिष्य आपला गुरू प्रथम वंदितो. ग्रंथाच्या सुरवातीला गणेशवंदना करतात पण ज्ञानेश्वर प्रथम "ब्रह्म"ची सर्व विशेषणे गुरू निवृतीनाथांना लावून त्यांना वंदन करतात व दुसर्या ओवीत शिवशंभूला ! गुरूभक्ती इतकी टोकाची की "निगुरा" गुरू नसलेला, त्याला मोक्ष मिळणे शक्यच नाही ही ठाम समजूत. मुक्ताबाईसारखी चिमुरडीसुद्धा नामदेवांसारख्या भक्तश्रेष्ठाची " हा निगुरा, याला कुठला मोक्ष ? " अशी छि:थू करण्यास डरत नाही ! नाथ संप्रदायाची ही निष्ठा कबीरानेही उचलली आहे महाराष्ट्रातील संतांनी हे लोण ज्ञानेश्वरांकडून घेतले.
काही हजार वर्षांचा हा आढावा. सर्व भारतभर सर्व पंथांनी याला मान्यता दिली. पौर्वात्य मनोरचनेने गुरूमहात्म्य स्विकारले विसाव्या शतकापासून यात मोठे बदल झाले. कलाक्षेत्र सोडले तर गुरूभक्ती जवळजवळ नाहीशीच झालेली दिसते. एक मह्त्वाचे कारण समाजाने पैसे टाकून शिक्षण मिळवणे हा व्यवहार मान्य केला.. गुरू-शिष्यात "व्यवहार" महत्वाचा झाला, एकदा हे मान्य केले की मग भक्ती नाहिशी होणार हे ओळीनेच आले. असो. कालाय तस्मै नम:
आता माझे मत. गतकालात सर्वांनी गुरूभक्ती कां स्विकारली असावी ? जगातील सर्वात पुरातन दर्शन "तंत्र". तंत्रावरील लेखात आपण पाहिले आहे की जगातील सर्व ,हो, सर्व लोकांनी एक अज्ञात शएक्ती असते व काही लोक विशिष्ट पद्धतीने ती वश करू शकतात हे मान्य केले होते. अशी माणसे सर्वसामान्यांपेक्षा श्रेष्ठ व त्यांना योग्य तो मोठेपणा दिला पाहिजे, त्यांची भक्ती केली पाहिजे हे स्विकारले होते. आपल्याला येत नाही, कळत नाही, असे काही या लोकांकडे आहे म्हटल्यावर त्यांच्यावर भीतीतून उत्पन्न झालेली भक्ती निर्माण होणारच. गुरू म्हणजे ज्ञानी, सात्विक, निर्लोभी मांत्रिकच. आपण मनापासून गुरूभक्ती स्विकारली. विसाव्या शतकापासून "तंत्रा"तील फोलपणा ध्यानात आल्यावर हे "गुरूत्व" नाहिसे होणे स्वाभाविकच आहे. आजही थोडीथोडी गुरूभक्ती आढळून येते पण ती जास्त डोळस असते. आजही मी डॉ. रा. चिं. ढेरे यांना गुरूस्थानी मानतो. त्यांना एकदाही न भेटता .त्यांची विद्वत्ता, त्यांनी आपल्या क्षेत्रात मिळवलेले स्थान, त्याकरिता त्यांनी केलेले कष्ट इ.गोष्टीचा विचार करून मला ते गुरूच वाटतात.
शरद
.
.
Book traversal links for श्री गुरू एक कोडे भाग-२
वर्गीकरण
प्रतिक्रिया
फार सुरेख विवेचन. धन्यवाद.
खरंच खूपच जबरदस्त पद्धतीने
छान
छान
श्री.गावडे यांच्यासाठी "
अत्यंत सुरेख विवेचन.
मला यासंदर्भात काही प्रश्न
रिकाम्या जागा भरल्यावरच मोजता
रिकाम्या जागा हे बरोबरच. आणि
एखाद्या व्यक्तीला, किवा