Skip to main content

पॉर्नची गरज आहे का?

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 25/01/2016 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
पॉर्नची गरज आहे का? या धाग्याचे मुळ अर्थात अदिती ताइंच्या धाग्यात आहे. पॉर्न म्हणजे अश्लील साहित्य असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. यात साहित्य म्हणजेच पुस्तके, चित्रे , चित्रफिती आणी चित्रपट असे सर्व साहित्य अध्याहृत आहे. संस्कृती रक्षक लोकांच्या दृष्टीने "हा" अब्रम्हण्यम असा शब्द आहे. याची गरजच काय पासून यावर संपूर्ण बंदी असावी असे मानणारे लोक आहेत आणी पॉर्न हे सर्व वय, भाषा आणी धर्मियांना सदा सर्वकाळ खुले आणी फुकट असावे असे मानणारा गट हि आहे. काहींच्या मते हे अब्रम्हण्यम नसले तरीही निरर्थक आहे आणी याची गरज नाही. सत्य कदाचित या सर्वांच्या मध्ये आहे. बासनात गुंडाळून माळ्यावर ठेवण्याच्या विषयाचा वैद्यकीय दृष्टीने आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. अश्लील साहित्याची गरज पडते(च) का? आणि पडत असल्यास का पडते? पहिली गोष्ट म्हणजे सेक्स हा विषय मध्य युगापासून गुपचूप अंधारात करण्याचा (किंवा उरकण्याचा) झाला आहे. यामुळे पौगंडावस्थेत आपल्या लैंगिकतेचा खरा शोध तरुण किंवा तरुणींना कसा आणि कुठे घ्यायचा हे समजेनासे होते. याची सुरुवात चावट विनोदातून होते. त्यातून बायकांची परिस्थिती "कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली" अशी असते. करावेसे/ पाहावेसे/ ऐकावेसे तर वाटते पण चार चौघात बोलायला लाज वाटते आणि ते पाहताना पकडले गेलो तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील अशी भीती. थोड्या फार प्रमाणात हीच स्थिती पुरुषांची असते. अश्लील साहित्य म्हणजे काय? हे काही त्रिकालाबाधित सत्य नव्हे. म्हणजे जी गोष्ट आज बोलली जाऊ शकते तीच एके काळी अशक्य होती. म्हणजे एके काळी एखाद्या मुलीचा हात सुद्धा हातात घेणे "अब्रम्हण्यम' आणि अश्लील होते. त्यानंतर जोडप्याने मिठी मारणे किंवा चुंबन घेणे हे अब्रम्हण्यम होते. तेंव्हा कमी कपडे घालणे हे फक्त खलनायिका किंवा नायकीण करत असे. आता सिनेमात नायिका जे तोकडे कपडे घालतात ते काही काळापूर्वी सिनेमात वेश्यासुद्धा घालणे अशक्य होते. थोडक्यात काल जे अश्लील होते ते आज राजरोस/ समाजमान्य असू शकते. मग या अश्लील साहित्याची गरज आताच जास्त का वाटते किंवा आताच जास्त का दिसू शकते? (हा संदर्भ मुख्यत्वेकरून भारताबद्दल आहे.) काही दशकांपूर्वी मुलगे आणि मुलींची वयात होण्यापूर्वीच आणि स्त्रीपुरुष संबंध काय हे समजण्यापूर्वीच लग्ने होत. त्यामुळे या "विषया"विषयी नाविन्य राहत नसे. शिवाय तेवढे साहित्य सहजपणे उपलब्ध नव्हते आणि असले तरी ते समाजमान्य नव्हते. समाजात दांभिकपणा पण बराच होता.आज नाही असे म्हणवत नाही. अश्लील साहित्य सहज उपलब्ध नव्हते पण बहु भार्या अंगवस्त्र, देवदासी सारख्या प्रथा असल्याने श्रीमंत लोकांना हे सर्व उपलब्ध होते. मात्र स्त्रियांची कुचंबणाच होती. आता बदलत्या काळानुसार लग्ने उशिरा होत आहेत. मुलगे कमवायला लागेपर्यंत आणि मुली वयात येउन काही वर्षे जाईपर्यंत लग्न होत नाही. परंतु आजही विवाहपूर्व संबंध हे भारतीय समाजाला अमान्य आहेत. विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण तर जबरदस्त असते. या लैंगिकतेला वाट देण्याचे काम अश्लील साहित्य करते.पण एक तर हि गोष्ट चोरून करावी लागते किंवा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागते. या साहित्याचा अविवाहित स्त्री किंवा पुरुषांना आपल्या भावना मोकळ्या करण्याच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकतो. पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत असे ठाकूर साहेब त्या धाग्यात म्हणतात पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते. दोघांच्या तारा जुळून येण्यास फार कष्ट लागतात. लग्न झाल्यावर चार गुलाबी दिवस संपले कि व्यवहार सुरु होतो. अर्धवट रावांना आवडाबाईचे आणि आवडाबाईना रावांचे "गुण" दिसायला लागतात. मग घरातील कामातून वेळ काढून प्रणय फुलवायचा तर दोघांच्या तर एकत्र जुळल्या पाहिजेत. अभियांत्रिकी भाषेत सांगायचे झाले तर पुरुष पेट्रोल इंजिन सारखे असतात चावी दिली कि चालू. तर स्त्रिया म्हणजे टर्बो चार्जड डीझेल इंजीनासारख्या असतात. पहिल्यांदा ग्लो प्लग लावून इंजिन गरम करायला लागते आणि मग इंजिन सुरु झाले तरीही टर्बो चार्जर १८०० आर पी एम येईपर्यंत चालू होत नाही. पण एकदा टर्बो चार्जर चालू झाला कि मग इंजिन पूर्ण ताकदीने वेग घेते.म्हणजेच स्त्रियांचा आणि पुरुषांचा उद्दीपित होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. वंध्यत्व या विषयात काम करीत असल्याने बर्याच वेळेस या प्रश्नाशी संबंध येतच असतो. मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते. तेंव्हा रुग्ण पुरुष बर्याच वेळेस अशी तक्रार करताना आढळतात कि डॉक्टर मला तिच्याबद्दल आकर्षण वाटत नाही.( लिंग उत्थान होत नाही ERECTILE DYSFUNCTION--ED). काही लोकांनी हे पण सांगितले कि "सर बायकोच्या जवळ गेलो तर ती थंड गोळ्यासारखी पडलेली असते. तिच्या घामट गार अंगाला हात पण लावावासा वाटत नाही". हे जरी आपल्याला विचित्र वाटत असेल तरीही जर तो माणूस तुम्हाला त्याच्या भावना सांगत असेल तर ते सत्य मानायलाच लागते.अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात. नवरा बायको मध्ये बर्यापैकी समन्वय असेल तरीही विशाल किंवा विराट महिला असेल तर पुरुषाला आकर्षण कमी होते हि वस्तुस्थिती आहे. बर्याचशा या स्थूल महिला PCOS या आजाराच्या बळी असतात ज्यामुळे त्यांना मुल होत नसते. त्यांना वजन कमी करायला सांगूनहि बर्याच वेळेस ते कमी होत नाही. मग तो नवरा काय करणार? त्याला तर सांगितल्या दिवशी संबंध ठेवणे आवश्यक असते. आणी हे फार यांत्रिक होत जाते. ( एखाद्या कवीस सांगणे कि आत्ता तू उगवत्या सूर्यावर कविता कर). बायका सुद्धा आपल्या गैर/ विचित्र समजुती आणी पूर्वग्रह घेऊन आलेल्या असतात. बायकांनी संबंधात सुख शोधणे चूक आहे किंवा जे काय करायचे ते पुरुषांनीच करायचे असते आणी बायकांनी थंड पडून राहायचे. अशी जर स्त्री एखाद्याला बायको मिळाली( दुर्दैवाने याचे प्रमाण खूप जास्त आहे)तर त्या माणसाने कुठे जायचे? स्त्री थंड पडून असेल तर पुरुष तणावाखाली असतो आणि मग त्यातून शीघ्र पतन( premature ejaculation) होते. अशा स्त्रिया नंतर तक्रार करताना आढळतात कि यांना माझ्यात रसच नाही.किंवा अशा बायका नवर्याला टोचून बोलताना दिसतात कि तुम्ही मर्दच नाही. अशा माणसांनी काय करायचे? बायकोच्या जवळ गेले तर थंड गोळ्याशी शृंगार करणे कठीण. शिवाय मानसिक तणावामुळे शीघ्रपतन होईल हि भीती. अशा दुहेरी तणावात असलेला माणूस जेंव्हा पॉर्न पाहतो तेंव्हा त्याला आपल्याला (ERECTILE DYSFUNCTION--ED) नाही हे तर कळून येते. अर्थात याला PARTNER SPECIFIC ERECTILE DYSFUNCTION म्हणतात. बर्याच वेळेस बरेच दिवस संबंध न ठेवण्याने नवरा बायकोतील संबंध ताणले जातात. त्यात बायको संशयी असली तर तिला सारखे वाटत असते कि पुरुष असून संबंध ठेवायला नाकारतो म्हणजे दुसरीकडे कुठे तरी जाऊन "हलका" होऊन येत असेल. असे होऊ नये म्हणून मग माणसे पॉर्न बघून उत्तेजित होऊन येतात. त्यामुळे संबंध ठेवणे सोपे जाते. उलट एखाद्याची बायको जास्त सुंदर असेल किंवा वय झाले तरी आपला "फॉर्म" टिकवून असेल तर नवर्याला स्वतःला कठीण जात असेल तरी बायको "हातातून जाऊ नये "म्हणून तिला "सुखात" ठेवणे आवश्यक असते. नवरा आणी बायको यांच्या वयात फार जास्त अंतर असेल किंवा नवर्याला मधुमेह असेल तर त्यामुळेहि ERECTILE DYSFUNCTION होते अशा वेळेस पॉर्न पाहून उत्तेजित होता येते. एक उदाहरण म्हणून-- मी मुंबईत मोठ्या रुग्णालयात पुरुष वंध्यत्व वर काम करीत असताना झैरे या आफ्रिकी देशातील एका टोळीचा ६० वर्षाचा प्रमुख ERECTILE DYSFUNCTION च्या इलाजासाठी आला होता. मी त्याला विचारले कि आता ६० वयाला तुम्हाला काय हवे आहे त्यावर त्याचे म्हणणे होते कि माझी चौथी बायको १८ वर्षांची आहे मी जर तिला "सुखात" ठेवू शकलो नाही तर ती मला सोडून जाईल. हे अर्थात टोकाचे उदाहरण आहे. परंतु फार मोठ्या प्रमाणावर पुरुष लिंग उत्थान होत नाही हि तक्रार घेऊन येतात.यात हे कारण मानसिक आहे कि शारीरिक आहे हे जाणण्यासाठी त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो कि अश्लील साहित्य पाहिल्यावर लिंग उत्थान होते का? हे जर होत असेल तर तो प्रश्न बहुतांशी मानसिक असतो. ठाकूर साहेब म्हणतात "पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका" असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.बायकोची फिगर ३४- २६-३६ हवी असते. पण असते मात्र ३२ -३६- ४० मग आपल्या बायको बरोबर शृंगार करताना लोक कल्पना विलासाचा आधार घेतात. आपण कोणत्याही नटीशी शृंगार करीत आहोत हि कल्पना करून त्यांना आणी त्यांची बायकोला जर आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? अर्थात याला पोर्नच पाहिजे असे नाही. दोन पेग दारू प्यायली कि लोकांचे विमान आकाशात तरंगायला लागते आणी कल्पनाविलास होऊ शकतो. प्रत्यक्षात स्त्रिया कल्पना विलासात पुरुषांपेक्षा जास्त रमतात. त्यामुळे त्यांना पॉर्नची संबंध ठेवताना "आवश्यकता" भासत नाही. कारण एक तर प्रत्यक्ष संबंधात त्यांचा सहभाग हा सक्रीय नव्हे तर निष्क्रिय असला तरी चालू शकतो. शिवाय पूर्वग्रह आणी गैर समजुतींमुळे पॉर्न हे स्त्रीने पहायचेच नाही अशा पगड्याखाली असत्तात. परंतु प्रत्यक्ष शृंगार करताना डोळे मिटून आपण ह्रितिक रोषन किंवा जॉन अब्राहम बरोबर शृंगार करीत आहोत या कल्पना विलासात रमू शकतात. पण त्यांना विचारले तर ९० % स्त्रिया GUILT ( दोषित्व)मुळे आम्ही कल्पना विलासात रमतो हे अमान्य करतील. १००% पुरुष पॉर्न बघतात आणी बहुसंख्य( कदाचित १००%)कल्पनाविलासात( FANTASY) रमतात तर बहुसंख्य( कदाचित १००% स्त्रिया कल्पनाविलासात रमतात हि वस्तुस्थिती आहे. परंतु पॉर्नचे DECRIMINALISATION करणे आवश्यक आहे असे मात्र जरूर वाटते. हा विषय फार गहन आहे आणी बरेच मुद्दे यात राहून गेले असतील. पण जशी चर्चा पुढे जाईल तेंव्हा आठवेल तसे मी त्यात भर घालेन.

वाचने 120493
प्रतिक्रिया 292

प्रतिक्रिया

In reply to by मारवा

मारवाजी, आपला बहुतेक गैरसमज झाला किंवा डॉक्टरांचा लेख आपण नीट वाचला नसावा. असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात. वरील वाक्य डॉक्टरांच्या लेखात आहे, त्यांनी ते ज्या संदर्भाने-अनुषंगाने वापरले त्याच अनुषंगाने सनी लियोनचा मी इथे उल्लेख केलाय. तो मूळ लेखात चुकला असे तर कुणी म्हटले नाही पण मी इथे वापरला तर त्याचे संदर्भ कसे बदलले? इथे व्यक्तिगर सनी लियोनला मी वेश्या म्हटले आहे असा अर्थ कुठल्या आधारे काढला? डॉक्टरांनी सनी लियोन म्हणजे तिच्यासारखी मादक फिगर असणारी स्त्री असा जर अर्थ धरला आहे आणि तोच मीही माझ्या प्रतिसादात वापरला आहे. मी इथे सरळ म्हटले आहे की "तिथे सनी लियोन नसतात" व पुढे म्हटले की "सनी लियोनसाठी किंमत चुकवणे सामान्यांना शक्य नसते." म्हणजे तशी फिगर असणार्‍या, संभोगाची उत्कृष्ट दर्जाची सेवा देणार्‍या वेश्या सामान्य कुंटणखाण्यांमधे नसतात व ज्या आहेत त्या सामान्यांना परवडत नाहीत. एवढा सरळ अर्थ न समजून घेता "पॉर्न कलाकार आहे म्हणजे वेश्याही आहे असे नाही" हे दिव्य ज्ञानामृत मला पाजण्याची वृथा घाई का बरे झाली असावी असा प्रश्न पडलाय. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

लठ्ठ लोकांना व्यायाम, योगासने, आहारनियंत्रण वैगेरे कष्ट पडणार्‍या गोष्टी नको असतात. त्यांना एखादी गोळी, औषध, शस्त्रक्रिया हवी असते. परंतु आता ह्या लेखात आपण उलटी बाजू मांडली आहे असे वाटले. संभोगाचा आनंद लुटायलाही थोडे कष्ट आवश्यक आहेतच, पण सामान्य जनतेस इन्स्टंट रेमेडी हवी असते. त्यांना ते हवे म्हणून तेच द्यावे अशी मानसिकता वैद्यकिय क्षेत्रात आहे याबद्दल आश्चर्य वाटले. डांगे साहेब यात आपली गल्लत झाली आहे. मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते …… .अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात. या विशिष्ट वेळेत(२४ तासात ) स्त्रीबीज आणि पुरुष बीज यात संबंध होणे आवश्यक आहे. अशा वेळेस रुग्णांना स्त्री पुरुष संबंध आणि त्यासाठी लागणारी एकरूपता किंवा अनुरूपता कशी आणायची याचे प्रवचन देऊन उपयोग नसतो . मुळात तो रुग्ण लैंगिक समस्या घेऊन आलेलाच नसतो तो वंध्यत्व हि समस्या घेऊन आलेला असतो. आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढण्यात आपण पटाईत आहात हे वेगळे परंतु अर्थाचा अनर्थ करणे फारच झाले. मी फक्त काही विविक्षित परिस्थितीत पॉर्नचा आधार घ्यावा लागतो असे सांगितले तर तुम्ही इन्स्टंट रेमेडी देतो असा अर्थ काढलात ? डॉक्टरसाहेब, या विशिष्ट विषयाबाबत आपल्या दोघांच्या विचारपद्धतीत मूलभूत फरक आहे. संभोगापासून चिरंतन सुख मिळवण्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान भारतीय समाजात फारच दुर्मिळ असल्याने प्रस्तुत समस्या उद्भवतात. तुम्ही सुचवताय ते उपाय वरवरचे, तात्पुरते, लगेच परिणाम देणारे आहेत. माझे वा ठाकूरांचे उपाय चिरंतन सुख देणारे आहेत. मान्य आहे.मग आपण संभोग आणि चिरंतन सुख यावर लेखमाला लिहा. मी जे लिहिले आहे ते माझ्या मर्यादित अनुभवावर आधारित लिहित आहे आणि जे काही लिहिले आहे ते स्वयंभू ज्ञान नसून पुस्तकात दिलेले आहे आणि त्याला आधुनिक वैद्यकशास्त्राचा आधार आहे. १९९१ते १९९७ या काळात मी रोज वंध्यत्वाचे सरासरी ३० रुग्ण पाहत असे वर्षात ३०० दिवस काम केले गृहीत धरले ( रविवारी पण काम होत असे )तर एका वर्षात ९००० म्हणजे ७ वर्षात ६३००० आणि त्यानंतरच्या १८ वर्षात दर वर्षी सरासरी ३००० रुग्ण ओहिले हे गृहीत धरले तर मी साधारण १,२५,००० इतके रुग्ण पहिले आहेत . माझ्या एवढ्या मर्यादित अनुभव आणि वाचनावर आधारित माझी मते आहेत. ती एकांगी हि असतील आणि चूकही असतील. परंतु ती चूक मला पुरावा किंवा दुवा दाखवा म्हणजे मी चुका सुधारून घेईन. आपण आपले पॉर्न अ‍ॅडिक्शन चे अनुभव जरूर लिहा त्यातून कुणाचा फायदा होईल तर चांगलेच. आमच्याही अनुभवात भर पडेल. बाकी आपले काथ्याकुट चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, परत गैरसमज होतोय बरं का. तुम्ही रुग्णांबद्दल व विशिष्ट परिस्थितीबद्दल बोलत आहात तर मी सामान्य लोकांबद्दल बोलत आहे. तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्यच आहात, त्याबद्दल मी काही विरोधी बोललो असे वाटत नाही. माझे म्हणणे एवढेच की गल्लत तुमच्याकडून झाली आहे. 'सामान्य परिस्थितीत पोर्नची आवश्यकता नाही' ह्या विधानाचा प्रतिवाद करतांना आपण असामान्य परिस्थितीची उदाहरणे पॉर्नची वैद्यकिय बाजू धरुन दिली आहेत. दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे आपणांस मान्य आहे की नाही एवढाच प्रश्न आहे. तुम्ही 'असामान्य परिस्थितीत पॉर्नचे महत्त्व व उपयोग' ह्यावर लेख लिहिला आहे ते सर्व बिनशर्त मान्य आहे, त्यास खोडायचे नसल्याने पुरावे वा विदाचा प्रश्नच येत नाही. 'सामान्य परिस्थितीत पॉर्नचे महत्त्व' या ह्या खर्‍या विषयावर (जे ह्या लेखाचे खरे प्रयोजन होते) आपला लेख काही सांगत नाही एवढाच माझा मुद्दा होता. (ह्या विषयावर मागे एका धाग्यावर प्रगो, तुम्ही, मी यांची प्रदिर्घ चर्चा झालेली. तो संदर्भ डोक्यात आहे म्हणून मागचे सगळे परत लिहिले नाही. आशा आहे की आपणांस ते आठवत असेल.) धन्यवाद! कुठल्याही बाबतीत गैरसमज नसावे.

In reply to by संदीप डांगे

तुम्ही 'असामान्य परिस्थितीत पॉर्नचे महत्त्व व उपयोग' ह्यावर लेख लिहिला आहे मूळ गृहीतच चुकीचे आहे. धाग्याचा विषय "पॉर्नची गरज आहे का?" हा आहे सामान्य किंवा असामान्य स्थिती हा प्रश्न मी उपस्थित केलेला नाहीच. 'सामान्य परिस्थितीत पोर्नची आवश्यकता नाही' ह्याच काय कोणत्याच विधानाचा प्रतिवाद मी करीत नाही. तो वाचकांनी आपआपल्या मनोवृत्ती प्रमाणे ठरवायचा आहे. तेंव्हा "सामान्य परिस्थितीत पॉर्नचे महत्त्व' या ह्या खर्‍या विषयावर" आपल्याला पाहिजे असेल तर आपण धागा काढावा. माझ्या मनात गैर समज/ गोंधळ नाहीच.

In reply to by सुबोध खरे

ओके. गॉट इट. मला वाटले होते विवेक ठाकूरांच्या भूमिकेबद्दल आपले मत मांडण्यासाठी धागा काढला आहे. असो. जास्त गोंधळ घालण्यात काय पॉइण्ट नाही. इथेच थांबूया.

खूप माहितीपूर्ण लेख

पाेर्न विना प्रणय उत्कृट होऊ शकतो. पाेर्न मध्ये दाखविले जाणारे मुखमैथून बघून किळस वाटते. पाॅर्न जास्त पाहिल्याने तेही पाहणे नकोसे वाटते.

बघा काकांनि कंटाळा येइस्तोवर पॉर्न पाहिलेत तरि आता त्यांना पाहणे नकोसे झालेय. वरते कोण बोलत होत कि ह्याचा अ‍ॅडिक्शन लागत म्हणुन? नाहि लागत हे काकांच्या प्रतिसादातुन कळतय.

पाॅर्न जास्त पाहिल्याने तेही पाहणे नकोसे वाटते. माय फॉल्ट :( राँग इंटरप्रिटेसन हुइ गवा. माफि देइल बा !

डॉक, या विषयावर आलेले आपले लेखन आवडले. आजच्या पिढी मधे "ताण" हा सर्वसाधारण त्रास सहन करावा लागतो... यामुळे येणार्‍या समस्यांचे प्रमाणही अर्थातच अधिक असावे. मग अशा पिढीतल्या लोकांसाठी काय मार्गदर्शन होउ शकते ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र

दोघांसाठीही संभोग आणि संभोगापासून मिळणार्‍या आनंदाची सुरुवात मनांतील भावभावनांमध्ये असते. एकमेकांच्या भावना एकमेकांप्रती प्रेमाच्या, सौहार्दाच्या नसतील (किंवा दोघांमधील एकाला जरी अशी कांही संवेदनाच नसेल) तर तो संभोग फक्त शारीरिक होतो. त्यातून कदाचित मुले होऊ शकतील पण वाढत्या वयाबरोबर गहन समस्या निर्माण होऊ शकतात. पोर्न पाहून शरीरसंबंध ठेवणे हा तात्पुरता उपाय होऊ शकतो. पण आपल्या संवेदना जागवणं हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकतो. रोजच्या जीवनातील रटाळपणा, रुटीन निरस दिनक्रमातून बाहेर पडून एखाद्या पर्यटनस्थळी मनमोकळे वातावरण, प्रसन्नता अनुभवत आणि तिथे कोणी 'आपले' नसल्याने आपला पती किंवा पत्नी प्रती जास्त जवळीक निर्माण होऊन संभोगाप्रती योग्य ती वातावरण निर्मिती होऊ शकते.

कुठलीही लेटेस्ट व्हिडीयो / फोटोग्राफी यांचा आणि पॉर्नोग्राफीचा घनिष्ट संबंध आपल्याला लगेच लक्षात येइल... पॉर्न इंडस्ट्री ही इनोव्हेशन्सना जन्म देखील देते तसेच पॉर्न इंडस्त्रीकडुन मोठ्या प्रमाणात वापरली गेलेली टेक्नॉलॉजी / डिजीटल फॉरमॅट हे देखील लवकरच मान्यताप्राप्त आणि प्रसिद्ध होतात... अगदी गुगलच्याही हे लक्षात आले जेव्हा गुगल गॉगलने पॉर्नशूटचा {जाहिरात करणारा}व्हिडीयो रिलीज झाला. गुगलने गुगलग्लासवर पॉर्न बॅन केले आहे... व्हिएचएस टेप्स पासुन एचडी अल्ट्राएचडी असा प्रवास पॉर्न इंड्र्स्ट्रीचा प्रवास झालेला दिसेल.यात ३डी पॉर्न आणि व्हरच्युअल रिअ‍ॅलिटी पॉर्न देखील आहे. मी Demolition Man या माझ्या आवडत्या सायन्स फिक्शन्स चित्रपटात मी पहिल्यांदाच व्हरच्युअल सेक्सचा कॉन्सेप्ट पाहिला. पॉर्न इंडस्ट्री नेहमी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन राहिली आहे...आणि राहील.आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे... अनेक मेसेजिंगचे अ‍ॅप्लीकेशन्स देखील आहे... असेच एक स्नॅप चॅट. हे सेक्सटेक्स्टींग आणि पाठवलेली इमेज / फोटो काही क्षणातच सेल्फ डिस्ट्रक्टीव होणे...ज्याचा आधावर या अ‍ॅपचे निर्माण झाले आहे. एकमेकांना सेक्सी फोटो पाठवण्याच्या मानसिकतेवर हा पर्याय {अ‍ॅप} निर्माण झाला. पॉर्न इंडस्ट्रीच्या या बाजुवर फार कमी लोकांचे लक्ष जाते... बहुधा या इंडस्ट्रीच्या दुसर्‍या बाजुला कटु सत्य सुद्धा असल्यामुळे.. जाता जाता :- मागच्या वेळी झालेल्या इकॉनॉमिक क्रायसिस नंतर अमेरिकेच्या पॉर्न इंडस्ट्रीने देखील बेल आउट पॅकेज मागितले होते हे तुम्हाला माहिती आहे का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र

In reply to by मदनबाण

मदन बाण चर्चेला एक चांगला पैलु दिला. माहीतीपुर्ण प्रतिसाद आवडला आय डी नाव सार्थ केलतं प्रत्यक्ष मदनाने बाण मारल्यावर मग काय विचारता ? छान प्रतिसाद !

आमचे जालमित्र संक्षिसेठ यांच्या 'पॉर्न आणि फँटसीज कसे निरर्थक आहेत' या मुद्याच्या विवेचनासाठी डॉक्टर साहेब आपण केलेले माहितीपूर्ण लेखन आवडले. चर्चेतून पट्णा-या, न पटणा-या मतातून मिपावर असेच सर्व समावेशक लेखन येत राहावे, माहितीचे आदान प्रदान होत राहावे. आपले सर्वांचे मन:पूर्वक आभार. -दिलीप बिरुटे

'विषय' महत्त्वाचा असूनही अजूनही बर्‍याच प्रमाणावर भारतात दुर्लक्षिला जातो आणि त्याचे परिणाम बरीच जनता आयुष्यभर भोगत राहते याचे वाईट वाटते! :( प्रतिसादांमधूनही विषय न भरकटता चर्चा होत राहील अशी आशा आहे.

अर्थशास्त्रातला महत्वाचा - मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत पोर्नोग्राफीलाही लागू पडतो. मुळात पोर्नची निर्मिती ही मागणी-पुरवठा तत्वाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. जर माणसाला गरज नसती तर पोर्नची निर्मिती झालीच नसती. जेव्हा तंत्रज्ञान नव्हतं तेव्हा लोक मस्तराम किंवा हैदोस सारखी पुस्तकं आणि मासिकं बघत असत, आत्ताही बघतात. माझ्या काॅलेजच्या दिवसांत ब्लू फिल्म्सच्या व्हिडिओ कॅसेट्स बघणं हा एक पर्याय होता. त्याला भक्त प्रल्हाद असा शब्दपण होता. नंतर त्याची जागा सीडीने घेतली. आता इंटरनेटमुळे अजून पर्याय आहेत. Animated Porn आणि Porn Cartoons उदाहरणार्थ सविता भाभी, वेलम्मा वगैरे पाहणारा वर्ग आहे. या सगळ्याचा एकच अर्थ आहे - मागणी आहे म्हणून पुरवठा आहे. मी स्वतः पोर्न पाहतो आणि मला त्यात काही वावगं वाटत नाही. पाहून फार मोठी मर्दुमकी केली असंही वाटत नाही आणि न पाहणारे धर्मपरायण वगैरे असंही वाटत नाही. एका धार्मिक वगैरे मित्राने वेगळाच मुद्दा मांडला होता. या चित्रपटांत काम करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाला आपण हातभार लावतोय असं तुला वाटत नाही का? माझं उत्तर म्हणजे प्रतिप्रश्न होते - शोषण फक्त स्त्रियांचंच होतं हे कशावरून? अशा चित्रपटांत काम करणाऱ्या पुरुषांचंही शोषण होत असेलच की. अजून एक प्रश्न म्हणजे शोषण नाही कुठे? आपण आपल्या घरी मरमर काम करणाऱ्या स्त्रियांना किती पगार देतो? रजा देतो? आपण स्वतः जेवढं काम करतो तेवढा पगार आपल्याला हक्क म्हणून हवा असतो पण या अशा स्त्रियांना आपण तसा पगार देतो का? ते सोडा. घरात काम करणाऱ्या आणि खस्ता काढणाऱ्या गृहिणीला काय मिळतं? शोषण तिथेही आहेच. लैंगिक संदर्भ आले की शोषण होतं असं थोडंच आहे? आणि जर हे एवढं सगळं शोषण आपण चालवून घेतो, तर मग पोर्नोग्राफिक फिल्म्समधलं सो काॅल्ड शोषणही आपल्याला चाललं पाहिजे. अत्यंत उदात्त ' वहिनीच्या बांगड्या ' टाईप चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्रीचं काय शोषण होत नसेल? पण ते आपण चालवून घेतो की नाही? असा selective आणि दांभिक दृष्टीकोन हा आपल्या विचारसरणीचा स्थायीभाव आहे. पोर्नच्या बाबतीत असा दांभिकपणा खूप आहे. त्यामुळे हा सर्व्हे आणि हा धागा एकदम आवडले मला. जे काही आहे ते सरळ आहे. फक्त अदितीताईंनी भाग घेणाऱ्यांची नावं जाहीर होणार नाहीत, गुप्त ठेवली जातील असं म्हटलंय, ते मला आवडलं नाही. अर्थात त्यांच्या या निर्णयामागे कारण आहे आणि त्याचा आदरही आहे पण नाव जाहीर न केल्यामुळे मुख्य मुद्द्याचाच पराभव होतो असं मला वैयक्तिकरीत्या वाटतं. जर लोक पोर्न पाहतात तर ते इतरांना का कळू नये? त्याने काय होणार आहे? ते काही पाप वगैरे तर नाहीये. असो. डाॅक्टर खरे तर अशा मुद्द्यांच्या सगळ्या बाजू जवळून पाहणारे. त्यामुळे त्यांच्याकडून असा लेख येणं हे संयुक्तिक आहेच. ते स्वतःचं आडनाव seriously घेतात हे माझं त्यांच्याविषयीचं मत या लेखानंतर कायम झालेलं आहे.

In reply to by बोका-ए-आझम

माझ्या मते, पॉर्न हा दुर्भिक्ष्यजनित प्रकार आहे. समजा जर मानवी समाज अन्य प्राण्यांसारखा विवस्त्र रहात असता आणि संभोग ही केवळ एक नैसर्गिक गरज समजली जात असती तर पॉर्नचा जन्मच झाला नसता. लिंगभावनेवर समाजाने जी बंधने घातली आहेत (काही योग्य, काही अयोग्य) आणि ज्याप्रकारे संभोगाची नाळ शोषणाशी जोडून टाकली आहे, त्यातून एका बाजूला पॉर्न जन्मते तर दुसऱ्या बाजूला बलात्कार होतात. कुतूहल म्हणून विचारतो: कुत्रे-मांजरे यांना पॉर्न दाखवल्यास त्यांची काय प्रतिक्रिया होते, याचा अभ्यास झालेला आहे काय?

In reply to by चलत मुसाफिर

चलत मुसाफिर साहेब मानवापेक्षा कमी उत्क्रांत अशा बहुसंख्य प्राण्यांमध्ये संभोग हा केवळ पुनरुत्पादनासाठी केला जातो. आणि त्यातील मार्जार कुळातील काही प्राण्यांमध्ये तो अतिशय वेदनादायक असतो उदा . मांजर चित्ता बिबळ्या आणि वाघ . यापैकी मांजर आणि चित्ता या मध्ये तर नर मादीला संभोगासाठी स्थानबद्ध केल्यासारखे करतात आणि जोवर मादी संभोगासाठी तयार होत नाही तोवर तिची पाठ सोडत नाहीत. या प्राण्यांचे लिंग काटेरी असते आणि त्यातून मादीला वेदना होतात पण या वेदनेतूनच स्त्रीबीज पक्व होते (ovulation) यास्तव मांजर आणि बोका आपल्याला "मोठ्या आवाजात भांडताना" दिसतात. जोवर मांजरी संभोगास तयार होत नाही तोवर बोका तिची पाठ सोडत नाही. कुत्रा लांडगा किंवा श्वान कुळातील प्राण्यांमध्ये स्त्रीच्या योनीतून होणार्या स्त्रावाच्या "वासा"ने नर मादीकडे आकर्षित होतो. यासाठी कुत्रे कायम "वास" काढत फिरत असतात. या बहुतांश प्राण्यांमध्ये नराचे काम फक्त शुक्राणू दान करणे एवढेच असते. पिल्लांच्या संगोपनात नराचा काहीही वाट नसतो. या सर्व प्राण्यात पिल्लांना उपजत बुद्धी असते ज्याने ते आईचे दुध पिणे थांबवल्यावर स्वतः चे अन्न वासाने शोधू आणि खाऊ शकतात. मानव प्राण्यात बालकाचे बालपण जवळ जवळ १६ वर्षे असते आणि या काळात बालक स्वतःचे पोषण करू शकत नाही. एवढा लांब कालावधीत मुलाची काळजी आईने घेणे हे फार कठीण आहे. यास्तव निसर्गाने संभोग हा अतिशय सुखकारक अनुभव केला आहे. मानवात जर स्त्रीसुख हे इतके सुखदायी नसते तर बहुसंख्य पुरुषांनी लग्नच केले नसते. god has linked procreation with recreation otherwise most men would not have married. मानवात संभोग हा केवळ पुनरुत्पादनासाठी च नव्हे तर बहुतांशी सुखासाठी केला जातो. समाजाने लग्न संस्था निर्माण केली आहे कारण पुरुषाला सम्भोगसुख हे सहज आणि सुलभतेने उपलब्ध होते आणि स्त्रीला आणि बालकांना एक सुरक्षित घर आणि आसरा उपलब्ध होतो. जर संततीच्या औरस पणा बद्दल शंका असेल तर पुरुष मुलाच्या वाढीत सहभागी होणार नाही. यास्तव पातिव्रत्य या सारख्या कल्पना आल्या. आपण जर एक गोष्टीचा विचार केला कि जगात एकमेकांशी 'काहीही" संबंध नसलेया मानवी गटात सर्वत्र(UNIVERSAL) लग्नसंस्था उपलब्ध आहे. असो कुत्र्याला दुसर्या कुत्र्यांचा संभोग दाखवला तर त्याला काहीच फरक पडणार नाही कारण कुत्र्याचे उद्दीपन वर म्हटल्याप्रमाणे "वासा"वर असते. दृष्टीवर नसते. म्हणूनच रस्त्यावर कुत्र्यांचा संभोग होत असताना इतर नर त्या "वासा"मुळे आशाळभूत पणे घुटमळताना दिसतात पण माद्या दिसत नाहीत. हीच परिस्थिती इतर प्राण्यांची आहे

In reply to by सुबोध खरे

बाकी सर्व ठिक आहे. पण.. समाजाने लग्न संस्था निर्माण केली आहे कारण पुरुषाला सम्भोगसुख हे सहज आणि सुलभतेने उपलब्ध होते आणि स्त्रीला आणि बालकांना एक सुरक्षित घर आणि आसरा उपलब्ध होतो. जर संततीच्या औरस पणा बद्दल शंका असेल तर पुरुष मुलाच्या वाढीत सहभागी होणार नाही. यास्तव पातिव्रत्य या सारख्या कल्पना आल्या. आपण जर एक गोष्टीचा विचार केला कि जगात एकमेकांशी 'काहीही" संबंध नसलेया मानवी गटात सर्वत्र(UNIVERSAL) लग्नसंस्था उपलब्ध आहे. ह्याबद्दल आपण दिलेली कारणमिमांसा योग्य नाही. लग्नसंस्था व पातिव्रत्य ह्याचा आपण संभोगसुखाशी लावलेला संबंध पुरेसा वाटत नाही. निसर्गाने दिलेल्या देणग्या आणि समाजाने लग्नसंस्था निर्माण करून त्याची लावलेली वाट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लग्नसंस्था आणि संभोगसुख ह्याचा संबंध नाही. तर संपत्तीचा वारस व लग्नसंस्था याचा सरळ संबंध आहे. मादी मिळवण्याच्या इतर प्राण्यांमधे व मनुष्यामधे असलेल्या पद्धतीतला फरक बघता एक गोष्ट लक्षात येते ती ही की इतर प्राण्यांमधे सक्षम नरालाच मादी मिळते, मनुष्यात 'सक्षम नर' ही संज्ञाच स्पष्ट नाही. मादी मिळवण्यासाठी इतर नरांशी युद्ध, स्वतःचे शरिर अधिक सुंदर करणे, उत्कृष्ट घर बांधणे इत्यादी प्रकार नाहीत. (मादीच्या मागे मागे फिरणे हे असले तरी ते खात्रीलायकरित्या मादी मिळण्यातच यशस्वी होईल असे नाही. एखादेवेळा मादी फसून संभोग होईलही पण लग्नास लायक असा तो नर नसेल तर कायम सुख अशक्य असते.) लायक नर नैसर्गिकरित्या निवडल्या जाणे व मादिने त्यास पसंती देऊन संग करणे हे होत नाही. हे का होत असावे बरे...? माझ्या मते मनुष्य समाज दुर्बलांनाही संधी मिळावी ह्या विचारावर चालतो. कळपात एखाद्या नराचीच चलती असते. त्याला सर्व माद्या उपलब्ध असतात. त्याची मोनोपोली तोडायची असेल तर इतर नरांस त्याच्याशी द्वंद्व करावे लागते अथवा आपला वेगळा कळप तयार करावा लागतो. मनुष्याच्या कळपातही आधी असेच असावे, पण जास्त अक्कल व कमी बळ असल्याने त्यावर त्याने सर्वांना संधीची समान उपलब्धता या नावाखाली लग्नप्रकार शोधून् काढला असावा. मादींसाठीच्या भांडणात आपल्याच कळपाची शक्ती कमी होते हेही लक्षात आले असेल. कारण इतर प्राण्यांसारखी मनुष्याची लैंगिक वासना विशिष्ट काळाशी संबंधित नाही. ती २४बाय७ तयारच असते. (ह्यालाही नैसर्गिक कारण आहेच) पुढे स्थिरस्थावर झाल्यावर स्थावर मालमत्ता जमवण्यास सुरुवात झाली. मालमत्तेत सर्वाधिक जीव गुंतलेल्या मनुष्याने आपल्याच वारसाकडे ही मालमत्ता जावी म्हणून आपल्या स्त्रियांना इतर पुरुषांशी समागमास मज्जाव केला, त्यातून पातिव्रत्य जन्मास आले. एकाच पतीशी एकनिष्ठ राहणार्‍या स्त्रीस प्रतिष्ठा मिळू लागली. अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणार्‍या पुरुषास प्रतिष्ठा होती. काही आदिवासी जमातींमधे, 'गोटूल' प्रथेत लग्न हा प्रकार होण्याआधी अनेक पुरुषांशी संग करण्यास स्त्रीला मोकळीक असते. काही आदिवासींमधे स्त्रीची गर्भधारणा करण्यास जो यशस्वी होईल त्यास पती होण्याची संधी मिळते. काहींमधे लग्न तर मुलांना मुले होईपर्यंतही टाळली जातात. ज्या समाजाचा स्थावर संपत्ती जमवण्यावर भर आहे अशाच समाजात लग्नसंस्था घट्ट व पातिव्रत्य परमपवित्र मानले जाते असं निरिक्षण आहे. आदिवासींमधे अशी स्थावर स्वामित्वाची भावना नसल्याने व कबिला म्हणजेच एक कुटूंब असे मानत असल्याने त्यांच्या पद्धती आधुनिक म्हण्वल्या जाणार्‍या समाजापेक्षा वेगळ्या आहेत. तसेच लग्न झाले म्हणजे स्त्री वा पुरुष एकाच जोडीदाराशी कायम लॉयल राहिलच याची कोणतीही खात्री लग्नसंस्था देत नाही. लग्नसंस्था ही फक्त खोटी स्वप्ने दाखवून समाजातल्या मुक्त नैसर्गिकपणाला आवर घालून समाजनियंत्रणात ठेवण्यास जन्माला आली आहे. लग्नसंस्था ही समाजातल्या बहुसंख्य असलेल्या दुर्बळांनी संख्येने कमी असलेल्या बलाढ्यांना सामाजिक नियम रुढींच्या नावाखाली निष्प्रभ करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. उत्तरोत्तर दुर्बळांची संख्या वाढत गेल्याने दुर्बळांची ही व्यवस्थाच नैसर्गिक आहे असे बलाढ्यांनाही वाटायला लागले. असो. या विषयावरही वेगळा धागा काढून लिहिणे गरजेचे आहे. म्हणून म्हटले की आपण घेतलेला विषय समाजाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारा आहे.

In reply to by बोका-ए-आझम

सनी लियोनी ची एक मुलाखत वाचलेली होती त्यात तिने तेथील पॉर्न इंडस्ट्री कीती व्यावसायिकतेने मॉडेल्स ना वागणुक पेमेंट इ. देते त्या संदर्भात तिने सांगितलेल होत. ते सर्व अगदी व्यावसायिक प्रोफेशनल म्हणता येईल या रीतीने होत. आता त्यातही तिथेही असेल काही शोषण माहीत नाही मात्र तुम्ही म्हणता तसा आर्थिक भाग असेल. मात्र याला त्या स्त्रीच शोषणच होत असेल अस समजुन शिक्का मारण जरा अतिरेकी विधानच वाटत. ओपन सर्व्हे च्या मताला दणकुन पाठींबा अस लपुन छपुन मी नाही त्यातला कोंडा लावा आतला प्रकार योग्य नाही. अजुन एक जाता जाता तुम्ही तुमच आयडी आडनाव खरें सारख कृपया सीरीयसली घेउ नका नाहीतर तुमची म्हस शोधता शोधता मिपाकरांना खस्ता खाव्या लागतील

In reply to by बोका-ए-आझम

बोकोबा आम्ही उपरोक्त मांडणीतील एका परिच्छेदा बाबत साशंकता शोषण नाही कोठें ? (इथे अवांतर टाळण्याच्या दृष्टीने) स्वतंत्र धागा लेखातून व्यक्त केली आहे.

पॉर्न चे आपले दुष्परिणामही आहेत. एक म्हणजे त्यात पुरुषाचे शिश्न हे फार मोठे आणि सरळ दाखवलेले असते. बहुसंख्य वेळेस त्यात इम्प्लांट वापरलेला असतो. त्यामुळे चार पाच वेळेस संभोग करूनही ते ताठर च असते. प्रत्यक्षात लिंग हे सरळ नसतेच तर थोडे पाठीमागे आणि डावीकडे वाकलेले असते.यामुळे ते पाहणारे बरेच तरुण स्वतःच्या लिंगाच्या आकारा आणि मापाकडे पाहून निराश होतात.मग हे तरुण हिमालयातील जडीबुटी इ द्नार्या वैदूंच्या जाळ्यात सापडतात किंवा हि गोष्ट मनातच ठेवून देतात. आणि आपल्या लिंगाच्या लहान मापामुळे न्यूनगंड बाळगून असतात. लैंगिक विकार तज्ञाकडे अशा शेकड्यांनी केसेस येतात. लग्न झालेले तरुण सुद्धा आपण एका रात्रीत तीन चार वेळेस संभोग करू शकत नाही म्हणून न्युनगन्डाचे शिकार झालेले आढळतात. पॉर्न पाहून स्त्रीयानासुद्धा आपले शरीर कमनीय नाही किंवा स्तन सुडौल आणि भरदार नाही हा "साक्षात्कार", होतो. त्यामुळे त्या कामक्रीडेसाठी आवश्यक असे उद्दीपन करण्यात कांकू करतात आणि अत्युच्च अशा सुखाला मुकतात. शिवाय न्यूनगंड येतो तो वेगळाच. बहुसंख्य पुरुष आणि स्त्रिया हे विसरतात कि पॉर्न मध्ये काम करणारे स्त्रीपुरुष यांना भरपूर पैसा मिळतो तेन्व्हा तो उद्योग भरदार आणि देखणे असेच तरुण आणि सुंदर आणि भरगच्च अशाच तरुणी निवडतात शिवाय याची वये पण कमी असतात त्यामुळे तारुण्याने मुसमुसलेली शरीरेच तुम्ही पाहत असता. आपण त्या शेर्नितले नसतो हा विचार न केल्याने हा न्यून गंड येतो. बाकी सवडीने.

वेगळा धागा काढलात हे उत्तमच. नवीन मुद्दे लिहिणार असलात तर नवा भाग काढा ही विनंती. विशेषतः प्रतिसादांमध्ये काही मुद्दे आलेले असतात तेही एकत्र करून लिहा. (काही प्रतिसादी-कुस्तीमध्ये चांगल्या प्रतिसादांमधल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होतं.)

धाग्यातले विचार आणि प्रतिसादांतली चर्चा, विशेषतः संक्षींचे प्रतिवादातले विचार आवडले. धन्यवाद.

In reply to by गवि

त्यातून `अ‍ॅवरेज' म्हणजे सर्वांना निरुपयोगी निष्कर्ष काढण्यापेक्षा, इथे समोरासमोर झालेला फैसला सगळ्यांना उपयोगी होईल.

In reply to by नया है वह

सर्वक्षणांमधून फक्त सरासरी काढतात इतपत ज्यांचं सांख्यिकी ज्ञान आहे त्यांच्या बोलण्याकडे किती गांभीर्याने लक्ष देणार?

माझ्या आवडत्या लेखिका इरावती कर्वे बाई त्यांच्या काळातील पिवळ्या कव्हर च्या पुस्तकांबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या कि वाचून किंवा चित्रे बघून माणसाला मिळणारे सुख जास्त हवे हवे वाटते …कारण त्यात शारीरिक मेहनत नसते …. मनात विचार आले कि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी बऱ्याच गोष्टींची जुळवाजुळव करायला लागते … जोडीदार,त्याचा मूड, जागा, वेळ आणि स्वतःची इच्छा सगळ्यांची जुळवाजुळव करताना बऱ्याचदा इच्छेची तीव्रता कमी होते आणि त्यानंतरदेखील प्रत्यक्षात अनुभव घेताना; जागेची योग्यता, त्या वेळेची आल्हादकारकता, संपूर्ण वातावरणाचा परिणाम, जोडीदाराचा मुखश्वासगंध, आणि होणारे शारीरिक श्रम यामुळे अनुभव कल्पनेच्या तोडीस तोड असेल याची खात्री नसते… याउलट जेंव्हा शरीरभोगांची वर्णने पुस्तकात येतात, चित्रात दिसतात किंवा चित्रपटात पाहायला मिळतात तेंव्हा हे जागेचे, वेळेचे, वातावरणाचे, घामाचे, गंधाचे आणि श्रमाचे परिणाम भोगावे लागत नाही आणि मेंदूला मात्र सर्व समाधान मिळते …. संपूर्ण शरीरा ऐवजी केवळ डोळे आणि मेंदू हे दोनच अवयव बाकी सर्व अवयवांचे काम करतात …. गंध आणि स्पर्श देखील केवळ कल्पनेने अनुभवला जातो …. म्हणून पिवळी पुस्तके आणि कामुक चित्रपट बहुतेकांना खासगीत तरी आवडतातच …. ज्या गोष्टींमुळे मेंदूला श्रमाशिवाय मिळणारी गम्मत हवी हवीशी वाटते त्याच गोष्टींच्या अभावाने मग मेंदूला मिळणारे दृष्टीसुख कमी वाटू लागते …. मिळणाऱ्या झिणझिण्या कमी होऊ लागतात, अनुभवांची तीव्रता जाणवेनाशी होते … मग सुरु होते केवळ शब्दातून किंवा चित्रातून किंवा कलाकारांकडून मेंदूला पटकन उद्दीपित करू शकेल बोथटलेल्या जाणीवांना धक्का देऊ शकेल, अश्या कलाकृतीची अपेक्षा …मग कला कुठे संपते आणि क्रौर्य कुठे सुरु होते हे कळण्याचा मार्ग नसतो … सभ्य समाजात समाजघटकांना होणाऱ्या सर्वच नाही तरी शक्य तितक्या भावनांचे विरेचन होणे आवश्यक असते. यात एक विरोधाभासी गम्मत अशी कि विरेचनाची साधने नसल्यामुळे किंवा मुबलक प्रमाणात असल्यामुळे दोन्ही वेळेस समाजात बुभूक्षितपणाच वाढीला लागतो … म्हणून सरकारचे आणि नागरिकांचे काम केवळ साधनांच्या नियंत्रणाचे नसून समाजाला जाणवणाऱ्या भावना आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीशी सांधून घ्यायला शिकवणे हे देखील असते … त्यामुळेच आपल्या भावनांबद्दल अपराधी वाटण्या ऐवजी किंवा त्यासाठी नैतिक-अनैतिक किंवा कायदेशीर - बेकायदेशीर मार्ग चोखाळण्याऐवजी समाज अधिक जबाबदार होऊ शकेल … नाहीतर खजुराहो आणि वात्स्यायनांची भूमी, राधा कृष्णाच्या बिन लग्नाच्या प्रेमाची मंदिर बांधणारी भूमी खोट्या नैतिकतेखाली कुंभ मेळ्यात आणि नवरात्रोत्सवात कंडोमच्या होणाऱ्या वाढत्या खपाबद्दल आश्चर्य व्यक्त करत बसेल …

In reply to by Anand More

आपण यात जे मुद्दे पर्यायी सम्भोग सुखाच्या लालसे संबंधी तपशीलवार मांडले आहेत ते खरेच इरावती बाईनी मांडलेले असतील तर माझा त्याना सलाम.वासना व परस्पर प्रेम या गोष्टी अगदी भिन्न आहेत असे माझे अगदी स्पष्ट मत आहे.उत्तम समागमासाठी प्रेम हे बोनस सारखे आहे ते आवश्यक मात्र नाही.मुळात प्रेम ही मानसिक अवस्था द्वेष भाव ने सारखीच आहे.

In reply to by चौकटराजा

काही मुद्दे त्यांचे तर बरेच माझे आहेत. त्यांनी १९६९ मध्ये एक आठ पानी लेख लिहिला होता "व्यक्तिस्वातंत्र्य आणि बंधमुक्तता या नावाने. देशमुख कंपनी ने त्यांच्या गंगाजल या पुस्तकात प्रकाशित केला आहे. सध्या इरावती बाईंची पुस्तके बाजारात पुन्हा मिळू लागली आहेत. शक्य झाल्यास नक्की वाचा. मला विचार करताना त्यांचा खूप फायदा होतो अजूनही. …. आणि तुम्ही म्हणता ते मला पटते. प्रेम हे क्षणिक आणि मानसिक भावना आहे तर वासना ही शारीरिक गरज आहे. त्यांची अशी अविभाज्य सांगड घातल्यानेच आपण बऱ्याच ठिकाणी गोंधळात पडलेले आणि स्वतःलाच दोषी मानणारे झालो आहोत.

In reply to by टवाळ कार्टा

लेख उत्तम असल्याची पावती कायप्पावर आधीच पोचवली आहे* *हा प्रतिसाद माझा वरचा प्रतिसाद वाचल्यावर ज्यांना झिणझिण्या येतील त्यांच्यासाठी

In reply to by टवाळ कार्टा

no point … समर्थ रामदास आज असते तर काय म्हणाले असते तेव्हढंच मी म्हटलं … आणि हो, खऱ्या नावाने इथे आणि सगळीकडे असल्याने माझी आवड साधी असूनही सगळ्यांसमोर मांडायला मी थोडा लाजतो…

काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे कोणती गोष्ट शृंगारीक आहे आणी कोणती पॉर्न आहे यातील रेषा धूसर आहे. पूर्ण कपडे घालून एखादी नटी बीभत्स हालचाल करीत असेल किंवा तिची भाषा अशी तर ते एखाद्या सुंदर पण कमी कपडे असलेल्या स्त्रीपेक्षा जास्त भडक / उत्तेजक असू शकते. हा मादक आणी मोहक यातील फरक आहे. तसेच शान्त्तपणे पॉर्न पाहणारा माणूस आणी एखाद्या पूर्ण वस्त्रे नेसलेल्या स्त्रीकडे अतिशय हीन पातळीवर वासनायुक्त वखवखलेल्या नजरेने पाहणारा माणूस यात असाच फरक आहे. बहुतांश स्त्रियांनी अशा नतद्रष्ट माणसांचा अनुभव घेतलेला असतो. ( स्त्रियांना अशा माणसासमोरआपण कपडे घातलेलेच नाहीत असे वाटू लागते.)

उदात्त सात्विक अगरबत्ती प्रणय वाले एक बाब लक्षात घेत नाहीत ती अशी की पॉर्न एक साधन आहे व लैंगिक जीवनाची प्रत त्याच्या कुशल वापराने सुधारता येऊ शकते. जरी प्रणयासाठी एक नर व एक मादी व दोन नर वा दोन मादी इतकेच पुरेसे असले हे सत्य असले तरी अर्धसत्य आहे. त्यानंतर पलंग बंद खोली सुंगंध फुले मंद संगीत इ.इ. साधनांची आवश्यकताच नाही का ? प्रत्येक वस्तु साधन हे त्या प्रणयाला उत्कट बनवण्यासाठी मदत करते. त्या यादीत पॉर्न एक आहे. त्याचा मर्यादीत वापर ( अ‍ॅडिक्शन चे टोक टाळुन ) जर केला तर प्रणयाची प्रत निश्चीतच सुधारायला मदत होते. त्यातील एखादी नाविन्यपुर्ण कल्पना ( अ‍ॅन आयडीया कॅन चेंज युवर लाइफ ) होऊ शकते. एखादी रेसीपी असते नेहमीचा पदार्थ निराळ्या शैलीत बनवण्याची, एखादी रीत असते कपडे नविन पद्धतीने घालण्याची अस नाविन्य बदल वेगळेपणा नविन रंग ही माणसाची सहज प्रकृती गरज आहे. आयुष्य एकसुरी एकरंगी व्यतीत करण्यापेक्षा यात एक आनंद असतो. रटाळपणा तोचतो पणा टाळण्यासाठी एक अत्यंत सकारात्मक संयमी दृष्टीकोण ठेऊन पॉर्न चा वापर एक साधन म्हणुन करण्यात गैर आणि इतका आक्षेप घेण्यासारख काय आहे. आमच्या बालपणी एक खडुस नातलग होता तो नेहमी नविन काही रीतीने जेवण बनवल तर करवादायचा की काय हे काय हे शेवटी काय अन्नच आहे पोटातच जाणार ना काय फरक पडतो. त्याला काय उत्तर द्य्वाव तेव्हा सुचत नसे आज सुचल अरे बाबा पोटातच जायचय तर मग नुसत गहु च खाउन का घेत नाहीस डायरेक्ट का तो सगळा उपद्व्याप आटा करो रोटी बनाओ फिर खाओ. शेवटी पोटातच जायचय मग का इतक्या ढीगाने रेसीपीज हव्यात का इतके कपड्यांना रंग हवे का इतके संस्थळ हवेत. अहो शॅलो पीपल डिमांड व्हरायटी या ठीकाणी लागु नाही होत. अगरबत्ती प्रणय वाले म्हणतात जणु साधनांचा काही रोलच नाही. आता ही एक जीवनदृष्टी आहे तुम्ही तुमच घर सजवता आनंद कसा घ्यावा एक कला आहे आर्ट ऑफ लीव्हींग आहे. त्यात रसिकतेने तुमच्या लैंगिक जीवनाला फुलवायला निरनिराळ्या साधनांची मदत होत असेल तर त्यातले धोके टाळुन मर्यादा सांभाळुन त्या साधनांचा वापर करण्यात काय हरकत आहे. हनिमुन ला का जातात मग ? कारण एक वातावरण निर्मीती हवी असते. शेवटी प्रश्न कीती समरसुन रसिकतेने तुम्ही तुमच्या जीवनाकडे लैंगिकतेकडे बघतात किती प्रयोगशील उत्साही तुम्ही आहात ?

In reply to by मारवा

चांगला मुद्दा दिलात मारवाजी, धन्यवाद! पोट भरण्यासाठी अन्नपदार्थांची गरज आहे, नुसते फोटो बघून पोट भरते का? इथे मिसळपाववर वेगवेगळ्या पाककृती दिग्गज आचारी लोक टाकत असतात की तोंडाला पाणी सुटते. पण समजा माझी बायको सुगरण नसेल तर तीने करपवून टाकलेली भेंडीची भाजी मी इथल्या भरल्या भेंडीच्या फोटो व रेसीपीच्या इमॅजिनेशनमध्ये खाऊ शकतो का? काहीही झाले तरी मला ती रेसिपी तशीच खायची असेल तर बायकोला तशीच सुगरण बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बायकोला ते पटत नसेल तर भांडण होणे आणि उपाशी राहणेच नशिबी येईल.

In reply to by मारवा

उत्तम प्रतिसाद ! "उदात्त सात्विक अगरबत्ती प्रणय वाले" हे वर्गिकरण भन्नाट आहे ! :) हनिमुन ला का जातात मग ? कारण एक वातावरण निर्मीती हवी असते. हा कळीचा प्रश्न आहे ! "मला अमुक आवडते, तमुक नाही" हे ठीक आहे. पण जेव्हा "मला अमुक अमुक आवडते आणि तेच सर्वोत्तम आहे. ते सोडून इतर काही आवडणारे सगळे तद्दन बिचारे व अज्ञानी आहेत" असा विचार ठाम होतो तेव्हा स्वमतांध अतिरेकाकडे वाटचाल सुरू होते. "जगातली सगळी माणसे एकाच साच्यातून बनवली जात नाहीत आणि एकाच साच्यात बसवताही येत नाहीत." हे पायभूत सत्य नीट न समजल्यानेच या जगातले बहुतेक गैरसमज जन्माला येतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आडून प्रतिसाद देऊन उपयोग नाही. तरी देखिल `उदात्त सात्विक अगरबत्ती प्रणयवाले' या आपल्याला आवडलेल्या आणि `स्वमतांध' या स्वघोषित, पण लोकप्रिय गैरसमजांकडे लक्ष वेधू इच्छितो. प्रश्न साधारण परिस्थितीत, आपापसात अनुबंध असणार्‍या जोडप्याला, उत्तेजनासाठी पॉर्न किंवा फँटसीची गरज आहे का? असा आहे. याचा अर्थ, ज्याला मारवा `सात्विक प्रणयवाले' म्हणतात ते शृंगार खुलवण्यासाठी काहीही करत नाहीत इतका टोकाचा काढणं, ही स्वमतांधता आहे. सामान्य प्रणयी युगुलाला एकमेकांचा सहवास प्रिय असतो त्यामुळे त्यांना फँटसीची गरज नसते कारण प्रिय व्यक्ती सन्निध असते. काल्पनिक व्यक्तीशी प्रणय करत असल्याचा फँटसी हा स्वतःलाच फसवणारा उपाय त्यांना करावा लागत नाही. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी प्रियकर गजरा आणेल, प्रेयसी स्वतः सजेल, त्याच्या प्रत्येक सादेला प्रतिसाद देऊन प्रणय रंग खुलवेल, त्याच्या आग्रहाखातर, तिच्या आवडीचं, तिला जमेल तसं एखादं गाणं म्हणेल, त्याच्यासाठी मदिरेचा चषक भरेल, दिवसा त्याच्यासाठी आवडीचं भोजन बनवेल, तो तिच्या कामात तिला मदत करेल.... अर्थात माझ्या दृष्टीनं हे स्वाभाविक आहे पण ज्यांना असा अनुभवच नाही त्यांना ते सात्विक, स्वमतांध किंवा त्या ही पुढे जाऊन `व्यक्तिगत आणि सीमित' वाटणं गैर नाही. असो, आपण ही सूज्ञ आहात, तस्मात `आउटलायर्स' ही स्वमतांधता सोडली तर मुद्दा आपल्यालाही कळू शकेल की सामान्य प्रणयीजन पॉर्न पाहाणारच नाहीत असं नाही पण पॉर्न हा केवळ स्टार्ट-अप आहे, एकमेकांप्रती प्रेम नसेल तर प्रणयाराधन दीर्घकाल होऊ शकणारच नाही, तो केवळ उत्सर्जनाचा उपाय असेल.

हा हा हा! मस्त धागा! अहंकाराचे फटाके, मीपणाची जुगलबंदी, हो ला हो करणारे नंदीबैल, बंदूक हातात म्हणून अम्दाधुंद गोळीबार. चलुद्या!

हा श्री. अरविंद कोल्हटकर यांचा वरील विषयाशी संबंधित लैंगिकतेकडे एकुण् जीवनाकडे रसिकतेने बघण्याचा प्राचीन भारतीयांचा दृष्टीकोण दाखवणारा सुंदर लेख अवश्य वाचावा मज सारख्या इतर सामान्य जनांना हा लेख आवडेल असे वाटते. पुर्ण लेख इथे आहे. http://www.aisiakshare.com/node/4507 यशोधर असे सांगतो की ज्या शय्येवर नागरक आपल्या पत्नीबरोबर शृंगार करतो त्या वापरलेल्या शय्येवर न झोपणे हा शिष्टाचार. ह्यासाठी दोन शय्यांची ही सोय. गणिकेबरोबरचा शृंगार झोपण्याच्याच शय्येवेर केलेला चालत असे. शय्येच्या मागे नागरकाच्या देवांच्या मूर्ति आणि रात्री वापरून उरलेला चंदनलेप, फुलांच्या माळा, मेण ठेवण्याचा करंडा, घामाचा वास येऊ नये म्हणून वापरायची सुगन्धी द्रव्ये, तमालपत्रे, तोंडाला वास येऊ नये ह्यासाठी मातुलुंग ह्या लिंबाच्या जातीच्या फळाची साले आणि खाण्यासाठी ताम्बूल - पानांचे विडे - ठेवण्यासाठी जडावाचे लहान मेज असावे. जमिनीवर मुखरस सोडण्यासाठी तस्त - पतत्ग्रह - असावे. भिंतीवर हत्तीच्या दाताच्या खुंटीवर - नागदन्त - गवसणीमध्ये घातलेली वीणा, चित्र काढण्याचा फलक, रंगांच्या कांडयांची गुंडाळी, एखादे पुस्तक आणि कुरण्टकाच्या फुलांच्या (Amaranth) माळा असाव्यात. कुरण्टकाची फुले शय्येवर वापरण्याचे कारण यशोधर देतो ते असे की ही फुले लवकर कोमेजत नाहीत. शय्येपासून फार दूर नाही असे अस्तरण जमिनीवर असावे आणि तेथे डोके टेकायला तक्के असावेत. फाशांनी खेळायचे आणि सोंगट्यांनी खेळायचे फलक असावेत. एका बाजूस विणण्याची आणि लाकडावर कोरीव काम करण्याची उपकरणे असावीत. बाहेरच्या बाजूस पोपट-मैना-सारिका अशा क्रीडापक्ष्यांचे पिंजरे असावेत. वृक्षवाटिकेमध्ये दाट सावलीच्या जागी अस्तरण घातलेला झोपाळा असावा. तेथून परतल्यावर ताम्बूलसेवन करावे, चन्दनाची उटी एकमेकांस लावावी आणि काही अल्पोपहार करावा. त्यामध्ये फळांचा रस, तळलेले पदार्थ, आंबवलेली तांदुळाची कांजी, मांसाच्या तुकडयांसह सूप, सुके मांस, साखरेसह संत्र्यासारखी फळे, इत्यादींचा समावेश असावा. नायकाने सहचरीसह सौधावर बसून चन्द्रप्रकाशाचा आनंद घ्यावा आणि ध्रुव, अरुन्धती, सप्तर्षि इत्यादि तारे ओळखावेत.

पॉर्न सारख्या इतक्या "सोवळ्या" विषयावर वर पण इतक्या प्रौढपणे , समंजसपणे, पायरी न सोडता चर्चा केल्याबद्दल सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. धागाकर्त्याचेही आभार. एक सामान्य मिपाकर म्हणून मिपाचा अभिमान वाटतो ते अशाच गोष्टींमुळे .

@संपादक मंडळ, आपण माझे जे विधान संपादित केले आहे त्याचा संदर्भ मी दुसर्‍या प्रतिसादात दिला आहे. तो लक्षात न घेता आपण जे संपादन केले आहे त्यामुळे वाचकांचा माझ्या विधानाबाबत गैरसमज होण्याची शक्यता वाढत आहे. ह्याबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती. विधानाचा संदर्भ देऊनही आक्षेप घेणार्‍यांनी काही प्रतिसाद दिलेला दिसत नाही. हा प्रकार विधानात अभिप्रेत नसलेला अर्थ प्रचलित करण्याचा प्रयत्न आहे असे वाटते. धन्यवाद.

In reply to by संदीप डांगे

माझ्या मते तरी वेश्या म्हणजे prostitute. prostitute या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला असता खालील संदर्भ मिळाले noun 1. a person, typically a woman, who engages in sexual activity for payment. verb 1. offer (someone, typically a woman) for sexual activity in exchange for payment. सनी लियोन "वेश्या" आहे की नाही ते वरील व्याख्येवरुनच ठरवावे लागेल. याबद्दल मला जास्त माहिती नसल्याने मी याबाबत फार भाष्य करु शकत नाही. परंतु एकुणात आक्षेप विधानाच्या सत्यतेबद्दल नसून औचित्याबद्दल आहे असे मला वाटते. मला तरी वाटते ते वाक्य उडाले ते बरे झाले. यावर याहुन जास्त उहापोह करण्यात काही हशील नाही,

In reply to by मृत्युन्जय

परत तेच होतंय हो. सनी लियोन म्हणजे सनी लियोनसारखी 'मादक फिगर असणारी स्त्री' हा जो अर्थ डॉक्टरांनी वापरला आहे तोच मी माझ्या विधानात वापरला. जर डॉक्टरांनी वापरलेला अर्थ चुकीचा नाही तर मी वापरलेला कसा हाच प्रश्न पडला आहे. इथे 'सनी लियोन' ह्या व्यक्तिबद्दल वैयक्तिक कुठलीही टिप्पणी नाही हे स्पष्ट असतांनाही असे वाद घालण्यात काय हशील आहे तेही मला कळत नाही. ह्या ठिकाणी मेनका, रंभा, उर्वशी असा कुठला संदर्भ डॉक्टरांनी वापरला असता तर तो मीही माझ्या विधानात वापरला असता. आशा आहे, वाचकांना मुद्दा कळत असेल. एखादा शब्द धरून पिंगा घालणे आता तरी सोडून द्यावे असे कळकळीने वाटते. असो. धन्यवाद!

सुबोधजींनी लेखात म्हटलंय : ठाकूर साहेब म्हणतात "पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका" असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.बायकोची फिगर ३४- २६-३६ हवी असते. पण असते मात्र ३२ -३६- ४० मग आपल्या बायको बरोबर शृंगार करताना लोक कल्पना विलासाचा आधार घेतात. आपण कोणत्याही नटीशी शृंगार करीत आहोत हि कल्पना करून त्यांना आणी त्यांची बायकोला जर आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? अर्थात याला पोर्नच पाहिजे असे नाही. दोन पेग दारू प्यायली कि लोकांचे विमान आकाशात तरंगायला लागते आणी कल्पनाविलास होऊ शकतो. आणि पुढे प्रतिसादात लिहीलंय : अतिपरिचयात अवज्ञा या नात्याने आपली सुंदर बायको सुद्धा साधारण वाटू लागते. यासाठी थोड्या थोड्या काळाने आपापल्या रुटीन मधून वेगळे काही तरी करावे. यातून काही जोडपी पॉर्न बघतात आणि त्यातील विविधता आपल्या नात्यात आणण्याचा प्रयत्न करतात. अर्थात काही काळाने त्याचा हि कंटाळा येतो. असेही बर्याच जोडप्यांकडून ऐकले आहे. बरेच लोक पर्यटन करतात याचे कारणही हेच आहे कि रोजच्या कटकटीतून मुक्तता मिळाली कि आपणहून संबंधाला एक वेगळा आयाम येतो. थोडक्यात, त्यांच्या अनुभवातून नॉर्मल कपल्सही, अतीपरिचयामुळे येणारा बोअरडम दूर करण्यासाठी, पॉर्न आणि फँटसी हा पर्याय वापरतात. संदीप डांग्यांनी म्हटलंय : सतत एकच जोडीदाराशी संग करून कंटाळा येत असेल तर ही परिस्थितीही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखी आहे या प्रश्नाला मी उत्तर दिलंय पण संदीपश्रींच्या मते तो `व्यक्तीगत आणि सीमित अनुभव' आणि `अहंकारी ज्ञान प्रदर्शन' आहे. सुहासजींनी माझ्या एकूण अप्रोचवर `आउटलायर्स ' म्हणून प्रश्न निकालात काढला आहे. संदीपजींकडे या सार्वजनिक (किंवा वैश्विक) प्रश्नाचं उत्तर आहे जे त्यांनी गेल्या दोन दशकात केलेल्या वाचन आणि सामुपदेशनातून सापडल्याचा त्यांचा दावा आहे. तस्मात, जगाला ज्ञानसंपन्न न करता पण जेवढे आवश्यक, जनहितार्थ व चर्चेस आवश्यक तेवढेच सांगून त्यांनी प्रश्न सोडवावा.

In reply to by विवेक ठाकूर

सरजी, ह्याचे उत्तर तुम्हीच दिले आहे, अजून काय पाहिजे? तुमच्या उत्तराला आमचे अनुमोदन होते, आहे व राहणारच.

In reply to by संदीप डांगे

तुम्हाला आयुष्यभर पुरेल अशी `मेख' वगैरे काहीही सापडलेली नाही आणि कहर म्हणजे तुम्ही स्वतःचे प्रतिसाद सुद्धा वाचत नाही. कारण माझ्या उत्तरावर तुम्ही लिहीलंय : खास तुमच्यासाठी सांगतो, आम्हाला आमची मेख सापडली आहे, ती आयुष्यभर पुरणारी आहेच हे कदाचित माझ्या प्रतिसादांमधून आपणास कळले नसावे. अन्यथा न मागता या पद्धतीने सल्ला आपण दिला नसता. मला तुमचे विचार आवडतात, पटतात, एकच खटकते ते हे की दुसर्‍याला अज्ञानी समजून, स्वत:ला सर्वज्ञानी समजून 'अंधकार दूर करण्याच्या' थाटात अहंकारी सल्ले, उपदेश देणे. तेवढे आपल्याजवळच ठेवावे अशी विनंती. जालावर आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणे आमच्या स्वभावात नाही, म्हणजे आम्ही ज्ञानी नाही असा कुणाचा समज असेल तर त्याच्याबद्दल किव वाटेल. बाकी आपण सुज्ञ आहात. स्पष्टपणे बोललो, राग मानू नये. आणि आता म्हणतायं : सरजी, ह्याचे उत्तर तुम्हीच दिले आहे, अजून काय पाहिजे? तुमच्या उत्तराला आमचे अनुमोदन होते, आहे व राहणारच पश्चात का होईना दिलेल्या अनुमोदनाबद्दल धन्यवाद. तरीही तुमच्या या शेरेबाजीचचं आश्चर्य आहेच : प्रत्येक बाबतीत स्वतःच्या मर्यादित व्यक्तिगत अनुभवानुसार जगाला ज्ञानसंपन्न करत सुटणे माझा पिंड नाही. जेवढे आवश्यक, जनहितार्थ व चर्चेस आवश्यक तेवढेच मी चर्चेत मांडतो. म्हणून मलाच काही समस्या आहेत असे कुणी समजत असेल तर धन्य आहे. थोडक्यात, तुम्हाला समस्या आहेत किंवा नाहीत हा तुमचा प्रश्न आहे पण एक नक्की की तुम्हाला प्रश्नच कळलेला नाही आणि दुसरा व्यक्तीगत अनुभवावर आणि सीमित ज्ञानावर लिहीतो अशी पोकळ शेरेबाजी करण्यापलिकडे तुमच्या प्रतिसादाला काहीही अर्थ नाही .