Skip to main content

मोल्टन चॉकलेट केक

लेखक असंका यांनी सोमवार, 25/01/2016 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
. मी आणि माझ्या मुलीनं मिळून यू ट्युब वर बघून बघून हे केलं. अनेक प्रयोग करून जमलेलं असल्याने, साहित्य जरा अंदाजानेच घेतलंय. त्यामुळे "हे सोपं आहे" हे समजून देण्यापलिकडे किंवा मार्गदर्शक म्हणून या पाककृतीचा उपयोग जरा लिमिटेड आहे. आवश्यक उपकरणं: कंवेक्शन मायक्रोवेव्ह ओवन उपकरणं जी असतील तर उत्तम पण नसतील तर दुसरं काही वापरता येइल: १. काचेचे मिक्सिंग बोल- दोन. अ. एक बोल मिक्सिंग साठी. नसल्यासः काचेचा नसल्यास स्टील/अॅल्युमिनम जो असेल तो वापरायचा. ब. पण दुसरा बोल मात्र मायक्रोवेव्ह मध्ये वापरायचाय तेव्हा काचेचाच असलेला बरा. (- खाली चॉकलेट वितळवायच्या दोन पद्धती आहेत. त्यातल्या एकात मायक्रोवेव्ह वापरलाय. त्यामुळे एकही ग्लास बोल वापरायचा नसेल तर चॉकलेट वितळवायची दुसरी पद्धत वापरावी लागेल- वेळखाऊ.) २. रॅमेकिन्स- केक बनवायचे चिनी मातीचे साचे. माझ्याकडे नव्हते. कोल्हापुरात मिळालेपण नाहीत. मग अॅलुमिनीअमचे साचे घेतले. साहित्यः सहा केक साठी- १. डार्क चॉकलेट बार - चौकोनी क्युब करून- एक कप भर (किंवा थोडे कमी) २. लोणी- पाउण कप ३. अंडी- तीन ४. वॅनिला इसेन्स - पाव छोटा चमचा. ५. मैदा- अर्धा कप ६. पिठीसाखर- अर्धा कप ७. चमचाभर दूध ८. डस्टिंग/भुरभुरवण्यासाठी कोको पावडर कृती: १. मायक्रोवेव्ह न वापरता चॉकलेट वितळवणे- "बेन्मरी पद्धत" (का असलंच काहीतरी नाव आहे.) म्हणजे काय की चॉकलेटला इन्डायरेक्ट हीट देणे किंवा वाफेच्या उष्णतेने चॉकलेट वितळवणे. कसं ? तर गॅसवर दोन भांडी एकावर एक ठेवायची. खालच्यात पाणी असेल. वरच्यात चॉकलेट क्युब आणि लोणी. वाफेच्या उष्णतेने चॉकलेट आणि लोणी वितळायला लागल्यावर, ते ढवळून घेऊन एकसारखं मिश्रण करायचं! मायक्रोवेव्ह वापरून- (मी वापरलेली पद्धत) चॉकलेटचे क्युब आणि लोणी एका मायक्रोवेव्ह सेफ बोलमध्ये ठेवून एकत्रच मायक्रोवेव्ह केलं. एका वेळी जास्तीत जास्त वीस सेकंदच. त्यापेक्षा जास्त वेळ ठेवलं तर चॉकलेट जळू शकतं म्हणे. मग बाहेर काढून एकसारखं केलं आणि परत वीस सेकंद मायक्रोवेव्ह केलं. तेवढं पुरलं. मायक्रोवेव्ह करायच्या आधी- . पहिल्यांदा मायक्रोवेव्ह केल्यानंतर- . दुसर्यांदा मायक्रोवेव्ह करून मग एकसारखं केल्यानंतर- . २. दुसर्या एका भांड्यात सगळी अंडी फेटून घेतली. ३. त्यात मग पिठीसाखर घालून परत ढवळून घेतलं. ४. त्यात मग वेनिला इसेन्स, चॉकलेट लोण्याचं मिश्रण आणि चमचाभर दूध ओतून पुन्हा एकसारखं करून घेतलं. ५. मैदा घालून परत एकदा ढवळल्यावर केक करायचे मिश्रण तयार झाले. . यावेळी माझ्या कन्येचा उत्साह हाताबाहेर जाउ लागल्याने तिच्या अस्तित्वाच्या खुणा टेबल तसेच फोटो यावर दिसायला लागतील- ६. साच्यांना आतून लोण्याचा हात लावून घेतला. त्यावर कोको पावडर भुरभुरवून घेतली. . (मध्ये जे दिसतंय तो आमच्या लेकिचा उत्साह. फोटो काढू देत नव्हती. तिला केक करायची घाई झालेली आणि फोटो काढण्यात मी वेळ वाया घालवतोय असं तिचं मत होतं. जसे जमेल तसे काढले.) ७. या साच्यात तयार मिश्रण ओतून घेतले. ८. २३० डिग्रीला ओवन प्रिहीट केला. ९. बेकिंग- आता सगळ्यात ट्रिकी भाग- किती वेळ बेक करायचं की आतलं चॉकलेट लिक्विड राहिल? हा जरा प्रयोगाचा भाग आहे. मी सहा मिनिटांवर कन्वेक्शन सेट करतो आणि केककडे लक्ष ठेवत वेळ हळू हळू वाढवतो. सात मिनीटांच्या थोडं आधी समजा सहा मिनिटं आणि पन्नास सेकंद ही वेळ मला योग्य वाटली आहे. तेव्हा - मोड- कन्वेक्शन, तापमान- २३० डिग्री सेल्सिअस, लोअर रॅक, आणि वेळ सहा मिनिटं पन्नास सेकंद भरून ठेवलेले साचे या सेटिंगवर ओवनमध्ये ठेवले आणि बेकिंग सुरु केलं. बीप झाल्यावर केक तयार आहे की नाही ते एक केक साच्यातून बाहेर काढून तपासून बघायला हवं. म्हणजे तो वरून तर केकसारखा दिसायला पाहिजे आणि कट केल्यावर आत लिक्विड असायला पाहिजे. तयार केक जरा लगेचच काढून घ्यावे लागतात किंवा खरं तर खावे लागतात. नंतर आतनं लिक्विड राहत नाहीत असं दिसतंय. १०. आधी साच्याच्या कडेने सुरी फिरवून केक साच्यापासून मोकळा करून घेतला. . ११. एक बशी एका साच्यावर उलटी ठेवून मग ते दोन्ही उलट करून साचा अलगद उचलला. अस्पष्ट आणि आउट ऑफ फोकस फोटोंसाठी क्षमस्व.. . १२. मोल्टन चॉकलेट केक - .

वाचने 11789
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

अरे वा.. माझ्या या केक चं रुपांतर दर वेळी ब्राऊनी मध्ये होतं. लाव्हा तत्परतेने केक मध्ये हार्ड होतोच :) आता या पद्धतीने करुन बघते. छान तपशीलवार पाकृ.

अरे वा.. माझ्या या केक चं रुपांतर दर वेळी ब्राऊनी मध्ये होतं. लाव्हा तत्परतेने केक मध्ये हार्ड होतोच :) आता या पद्धतीने करुन बघते. छान तपशीलवार पाकृ.

सकाळी-सकाळी पहिल्यांदाच चॉकलेट केक! चॉकलेट हा माझा विक पॉईंट आहे, त्यात असा हा केक?!! स्स्.... एकदम मस्त दिसतोय. एकदा प्रयत्न करायला हरकत नाही. ;) अवांतर- (पुर्वीच्या अंडाकरीसारखे याचे हालहाल होऊन, याचाही पोस्टमॉर्टम न होवो हिच इच्छा!)

बोर्डावरची माझी ही पहिलीच एन्ट्री गोड करून घेतल्याबद्दल सर्व वाचकांना आणि प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद. पैसातैंनी लेख तपासून दिला म्हणूनच इथे देण्याचं धाडस करू शकलो. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!! @ स्रुजा आणि अन्नु - नक्कीच ट्राय करा. याला काहीच वेळ लागत नाही! अर्धा तास जास्तीत जास्त! माझे सुरुवातीचे सगळेच केक आतुन घट्टच झाले होते. वेळ कमी करणे हीच ट्रीक आहे. एकदा चुकून तीन्च्या जागी चार अंडी घेतलेली, बाकी सगळं मात्र तेवढंच! तर त्याने तयार केकच्या आतल्या लिक्विडचं प्रमाण आणखी वाढलेलं. यू ट्युबवर अनेक विडीओ सुद्धा आहेत मदतीला :)

अप्रतिम पाकृ! अतिशय छान डिटेल लिहिले आहे. ते अगदी सेकंदात वगैरे टाइमिंग लिहिले आहे, त्यामुळे इतरांचे प्रयोग परफेक्ट होतील असे वाटते आहे. तुमच्या चिमणीने सॉलिडच मदत केलेली दिसतेय!!

लेख आवडला त्याहुन जास्त तुमच्यातला लेकीचा बाप जास्त भावला. मुलीबरोबर मज्जा करण्याची मज्जा वेगळीच नाही का ?

कृती छान आहे.. आवडली. स्वाती

मस्तच हिशेबनीस साहेब. अकाउंटबरोबर पाककृती पण इतक्या काटेकोर मोजता हे मजेशीर आहे. अजून येऊ द्यात अनोळखी पाकृ.