मोबाईल वापरणं हे आधुनिकपणाचं लक्षण आहेच, पण अनेकदा आधुनिक म्हणवणारेही त्याचा योग्य उपयोग करून घेत नाहीत, असं दिसतं. ऑफिसात, घरी, बाहेर, थिएटरमध्ये, सार्वजनिक ठिकाणी...इत्यादी इत्यादी.
मोबाईलचं आगमन झाल्यानंतर अनेक वर्षं तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच होता. अगदी आमच्या ऑफिसातही ऑफिसच्या खर्चाने काहींना मोबाईल मिळाले, तेव्हा आम्हाला त्याचं कोण अप्रूप होतं! मीटिंग रूमवर एक नोटीस लिहिलेली असायची..."मीटिंग चालू असताना मोबाईल बंद ठेवा, अथवा "सायलेंट'वर ठेवा.' ही "सायलेंट'ची काय भानगड, ते कळायचं नाही. विचारण्याची गरजही वाटली नाही. नंतर कधीतरी स्वतः मोबाईल घेतला, तेव्हाच त्याविषयी कळलं.
सांगण्याचा उद्देश काय, की मोबाईल घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कुठेही, कधीही मोबाईल अवेळी वाजू दिला नाही. मीटिंगमध्ये गंभीर चर्चा चाललेली असताना अचानक कुणाच्या तरी मोबाईलवर "ऐका दाजीबा' नाहीतर "ऐरणीच्या देवा तुला', "गणनायकाय गणदैवताय' असली काहीतरी ट्यून वाजते किंवा एकदम कोंबडाच आरवतो! किंवा ढोलबिल वाजायला लागतो. मग पॅंटच्या खिशात, चोरखिशात, जाकिटाच्या कप्प्यात, शर्टाच्या खिशात, जिथे कुठे मोबाईल आहे, तो शोधून काढण्यासाठी या नरपुंगवाची धावपळ सुरू होते. बरं, मोबाईल वाजला म्हणून अपराधी वाटून घेऊन हा सद्गृहस्थ मोबाईल कुणाचाही असो, तातडीने बंद करेल, असं नाही! तो आधी "हॅलो' म्हणतो. मग कोण बोलतंय, ते विचारतो. अनोळखी नंबर असेल, तर हा संवाद वाढतो. मग चार-पाच वाक्यानंतर "मी मीटिंगमध्ये आहे, थोड्या वेळाने करा' असा सल्ला देतो. मला असं वाटतं, बहुधा या मंडळींना पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींसारख्यांचेच फोन येत असावेत. त्याहून कुणाचे महत्त्वाचे फोन असूच शकत नाहीत!
थिएटरमध्ये तेच. चित्रपटातल्या ऐन रहस्याचा, सर्वाधिक उत्कंठेचा, परमोच्च तणावाचा, किंवा गेला बाजार हिरो-हिरॉइनच्या प्रणयाचा सीन चालू असताना कोणीतरी बाबा किंवा काकूचा कर्णकर्कश आवाजातला मोबाईल वाजतो. "हॅलो...हॅलो...हॅलो'ची जपमाळ धरल्यावर थोड्या वेळानं त्याला किंवा तिला पलीकडून कोण बोलतंय याचा साक्षात्कार होतो. मग "हां...अगं बेबी काय म्हणते? बारशाला येणारेय ना ती? जपून ये म्हणाव. हल्ली गाड्यांना गर्दी पण असते ना!' असलं, नाहीतर "गण्या कुठाय रे? मला काल येतो बोललावता! मग कदी येनारे? हां...पिच्चर बगतोय....गजनी गजनी!! ...बरा आहे. संध्याकाळी भेटतोस ना मग?' असले काहीतरी मंजुळ, नाजुक आवाजातले संवाद ऐकू येतात. थिएटरातल्या डॉल्बी डिजिटल साऊंड सिस्टिमचा आवाजही भेदून ते आपल्या कानात थयथयाट करतात.
सिनेमाचं एकवेळ जाऊ द्या. तिथे बराच ढणढणाट तरी असतो. मोबाईलवरचा एखाद-दुसरा संवाद खपून जातो. लोग नाटक चालू असतानाही मोबाईलवर बोलतात. विक्रम गोखले, मिलिंद इंगळे यांनी नाटक मध्येच थांबवून स्टेजवरून सर्वांना सूचना दिल्याचं मी पाहिलंय. अक्षरशः खजील होण्याशिवाय आपण काही करू शकत नाही अशा वेळी. काही म्हाताऱ्या-कोताऱ्यांचा तर वेगळाच त्रास असतो. त्यांना घरची कडी लावलेय का, उद्या कमलला कडूलिंब आणायला सांगितलंय का वगैरे गोष्टी आठवतात आणि मग ते स्टेजवरच्या कलाकारांनाही ऐकू जाईल अशा आवाजात त्याविषयी कुजबुजत राहतात.
या मोबाईल निरक्षरांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा तरी किती सांगाव्यात! आपण बिझी असताना, कुणाचा मोबाईल आला, तर ते डायरेक्ट कट करत नाहीत. फोन घेऊन, "नंतर करतो' किंवा "कर' किंवा तत्सम काही सांगून त्याच्या एका कॉलचे पैसे वाया घालवतात. आपण एखाद्याला फोन केल्यावर, तो "कट' करतोय, म्हटल्यावर एसएमएस पाठवत नाहीत. त्याऐवजी पुनःपुन्हा, थोड्या थोड्या अंतराने कॉलच करत राहतात.
जेवताना मोबाईल घेतला नाही, तर जणू यांना फाशीचीच शिक्षा होणार असते! काही जणांना तर जेवतानाच दुसऱ्याला फोन करण्याची हुक्की येते. मग रवंथ करत करत, घास तोंडात घोळवतानाच ते वाक्य थुंकत राहतात. पलीकडून ऐकणाऱ्याला तरी पेशन्स कसा असतो कुणास ठाऊक!
एसएमएस निरक्षरता, हा एक वेगळाच आजार आहे! मला तर भलेमोठे, लांबलचक आणि भरपूर विरामचिन्हं वगैरे वापरून एसएमएस पाठवायला भयंकर आवडतात! लिखाणाची भरपूर खुमखुमी त्यातून जिरवता येते. फोन शक्यतो टाळून मी एसएमएसच पाठवतो. त्यासाठी जादा बिल पडलं तरी बेहत्तर! पण आपण प्रेमानं, मेहनतीनं पाठवलेल्या लांबलचक एसएमएसला "हो' किंवा "नाही' असं अल्पाक्षरी उत्तर आलं, की टाळकंच फिरतं. आमच्या (इथे आमच्या म्हणजे "माझ्या'. नसत्या शंका घेऊ नका!) सहधर्मचारिणीला एसएमएस टाइप करण्यात फारसं स्वारस्य नाही. नाइलाज म्हणून ती करते. मग त्यात कुठे कुठे विरामचिन्हं आवश्यक होती, कुठे भाषा कशी बदलता आली असती, वगैरे सुधारणा करून मी तोच मेसेज तिला परत पाठवून देतो. त्याला ती कचऱ्याची टोपली दाखवते, हे सांगणे न लगे!
एक खासगी किस्सा सांगण्याचा मोह इथे आवरता येत नाही. मी काहीतरी कामानिमित्त मुंबईला गेलो होतो आणि रेल्वेने पुण्याला परतत होतो. वाटेत मैत्रिणीच्या मोबाईलवरून मला बायकोचा एसएमएस आला. "कॉंग्रॅट्स! तू काका होणार आहेस.- हर्ष.' मेसेज मराठी भाषेत, पण रोमन लिपीत होता. मला काही कळेचना. "काका'च्या ऐवजी मी "बाबा' वाचलं. कसं, कुणास ठाऊक! च्यायला! म्हटलं, आपल्याला काहीच माहिती नाही आणि हे सत्पात्री दान अचानक कसं काय पदरात पडणार आहे देव जाणे! मी अस्वस्थ झालो. उत्तर पाठवून विचारणा केली, तेव्हा कळलं, की आमच्या मेव्हणी आणि साडूच्या संसारवेलीवर त्यांच्या परिश्रमांचं फूल उगवणार होतं! माझा जीव पिंपात पडला!!
तर असे हे मोबाईल मॅनियाचे किस्से! तुम्हाला आहेत असे काही अनुभव?
वाचने
6104
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरच..
हो अगदी खरं..
खुशखुशीत
धन्यवाद!
In reply to खुशखुशीत by सुनील
माझा हि
एक नंबर
जबरदस्त!
In reply to एक नंबर by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to एक नंबर by परिकथेतील राजकुमार
१+
In reply to हा हा हा by कोलबेर
माझा पण
आम्ही
In reply to माझा पण by भिडू
मला पण
In reply to माझा पण by भिडू
विप्र
In reply to मला पण by विनायक प्रभू
मोबाइल निरकक्षरांच्या दुनियेत
मस्त लेख..
प्राजु,
In reply to मस्त लेख.. by प्राजु
अरे वा..!
In reply to प्राजु, by आपला अभिजित
एकदम
एनॉक्स...
भारी
वरच्या सगळ्यांशी सहमत
अदितीबाई,
In reply to वरच्या सगळ्यांशी सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही
In reply to अदितीबाई, by आपला अभिजित
डोक्याला शॉट
In reply to अदितीबाई, by आपला अभिजित
मोबाईल
हो
मोबाईलचा
लेख छान