खुर्ची
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. असाच एक घनचक्कर कामाचा दिवस.
दुपारी तीनचा सुमार. कागदांच्या ढिगाऱ्यात मी हरवून गेलेली. अचानक केबिनचे दार उघडले आणि बॉस नं. १ हे बॉस नं. २ आणि इतर प्रभावळीसह दत्त म्हणून समोर उभे. सॉरी, दत्त नाही, गणपती म्हणून असावेत कारण बॉस नं. १ हे थोर गणेशभक्त.
कामाच्या अवधानात मी इतकी गुंगले होते की गडबडले नाही, पण थोडीशी हडबडले. एक मिनिट मला खुर्चीतून उठायला सुचलं नाही. हातातले कागद सावरत शुंभासारखे एकदा कागदांकडे, एकदा बॉसकडे बघितले. बॉसचा चेहेरा लोण्याचा गोळा गमावलेल्या बोक्याप्रमाणे दिसत होता. प्रभावळीपैकी एकाने चेहेरा वेडावाकडा करून डोळे फिरवून खूण केली. त्यापैकी ‘उठा’ ही खूण समजली पण त्यानंतरची काही समजेना.
मी तटकन उठले. मग लक्षात आलं, खुर्ची !
झटक्यात मी खुर्ची रिकामी केली, आणि बॉस नं. १ विजयी चेहेऱ्याने तिच्यावर स्थानापन्न झाले.
बापरे ! इतका बावळटपणा आयुष्यात कधी केला नव्हता. खुर्ची हा वरिष्ठांचा पदसिद्ध हक्क ! मी विसरले तरी कशी ? हर हर, कुठे फेडू हे पाप ?
‘सॉरी, सर !’ मी काकुळतीने.
‘हां, ठीक आहे..’
मग करंट फायली मागवल्या गेल्या. कागदी घोडे खेळू लागले. छुपे डाव प्रतिडाव रंगू लागले.
आणि सरप्राईज व्हिजिटची दैनंदिनी सुरु झाली....!
दोन तासांनी सर्व मंडळी रीतसर थंड पेय वगैरे घेऊन रवाना झाली. त्यांना सहास्य वदनाने कारच्या दरवाज्यापर्यंत जाऊन निरोप दिल्यावर मी केबिनीत परत आले. खुर्ची सरळ केली आणि तिच्यात बसले.
मघाच्या जराशा गमतीदार प्रसंगावरून सहजच माझ्या उमेदीच्या दिवसातील एका उमद्या बॉसची आठवण आली. हे बॉस रिटायरमेंटला आलेले. चकचकीत टक्कल. काळेभोर लुकलुकते मिस्कील डोळे. हसरा चेहेरा. एकूणच प्रसन्न व्यक्तिमत्व ! खरं सांगायचं, तर त्यांच्या हाताखाली उमेदवारी करत शिकताना आम्हाला ते कधी वरिष्ठ आहेत असे वाटायचेच नाही. माणूस ब्रिटीशकाळात नोकरी केलेला. कडक शिस्त, वक्तशीरपणा, गुणग्राहकता हे अलीकडे दुर्मिळ झालेले गुण त्यांच्याकडे मायंदाळ. तरीही माणूस दिलखुलास, कुटुंबवत्सल आणि हौशी. असे असूनही व्यवहारी.
दौऱ्यावर गेले की कुटुंबियांसाठी तिथली एखादी हटके चीज घेतल्याशिवाय दौरा पूर्ण होत नसे त्यांचा. खानपानातील दर्दी. पण खाण्याचे ‘बिल’ कधी कनिष्ठांना चुकते करावे लागले नाही. कंत्राटदार जर आपणहून देत असेल तर मात्र इग्नोर करत. मुद्दाम कधी काही मागत नसत. खानपानातले दर्दी असले, तरी ‘खाबुगिरी’ पासून मात्र कटाक्षाने दूर. पैसे कधी घेत नसत. पण कंत्राटदारांनी आपणहून काही सुविधा दिल्या तर त्यांची ना नसे.
प्रोजेक्ट डिव्हिजन असल्यामुळे आम्हा लोकांचा काँट्रॅक्टरांशी नेहमीचा राबता. बॉस काँट्रॅक्टरांशी सलोख्याचे संबंध ठेवून असत, पण जवळिकीचे नाही.
नोकरगिरीतल्या बऱ्याच खाचाखोचा, केव्हा नमते घ्यावे, केव्हा स्वातंत्र्य घ्यावे, हे मी त्यांच्याकडून शिकले. जरा चांगली ओळख व जवळीक झाल्यानंतर एकदा मी विचारले,
‘सर, तुम्ही या काँट्रॅक्टर लोकांना दूर ठेवता, पण त्यांनी टूरसाठी गाडी, जेवण दिले तर कसे काय स्वीकारता ?’
‘त्याचे काय आहे बेटी,’ ऑफिसपासून दूर असताना आणि सहकारी नसताना ते मला बेटी म्हणत.
‘.. यांना जर आपण फार सवलती दिल्या आणि काहीच देणेघेणे नसल्यासारखे राहिलो, तर ते संशय खाऊन राहतील, हा आपल्याला कुठे पकडतो की काय ? आणि एक दिवशी संधी साधून पिटाळून लावतील. त्यांना ‘ऑड’ वाटू नये म्हणून थोडं सांभाळावं लागतं !’
असं त्यांचं व्यवहारी तत्वज्ञान. कामानिमित्ताने मी आणि माझे सहकारी कित्येकदा त्यांच्या घरी जात असू. आणि त्यांच्या पत्नीचा प्रेमळ पाहुणचार घेऊन गप्पा मारत विसावत असू.
तर असे हे बॉस एकदा ऑफिस परिवार म्हणजे आमच्यासह एका नवीन ऑफिसरला भेट द्यायला फिल्ड ऑफिसवर गेले. ऑफिसर तरुण आणि सिन्सिअर होता. नोकरीला लागून त्याला वर्ष झाले असेल. पण इथले सगळे ‘रिवाज’ त्याने व्यवस्थित आत्मसात केले होते. त्याचे रिपोर्ट्सही चांगले होते. त्याचे काम आम्ही आधी पाहून आलो होतो. सुबक आणि शिस्तशीर काम.
आम्ही त्याच्या छोट्याशा ऑफिसात गेल्यावर तो धडपडून खुर्चीतून उठला आणि बॉसना नम्रपणे म्हणाला,
‘प्लीज टेक चेअर सर.’
‘नो यंग मॅन, ती तुझी खुर्ची आहे. इथे तू इन-चार्ज आहेस. प्लीज सिट’
आणि बॉस त्याच्या टेबलसमोरच्या मोडक्या खुर्चीत आपला अघळपघळ देह सावरत बसले.
तो थक्कच झाला. हे प्रथेच्या विरुद्ध होते. आतापर्यंत यांच्यापेक्षाही छोटे साहेब लोक येऊन गेले त्यांनी याची खुर्ची हक्काने घेतली होती. आणि हे तर त्यांचेही साहेब. तो बावचळून काही सेकंद उभा राहिला. मग घाबरत घाबरत सावकाश खुर्चीत टेकला.
आम्हीपण आ करून बघत राहिलो. पण बॉसचा सनकी पणा माहिती असल्याने फारसे नवल वाटले नाही.
‘त्याचे काय आहे पानसरे, मी तुमच्या ऑफिसात आलो आहे आणि तुम्ही इथले अधिकारी आहात. ही तुमची कर्मभूमी आहे. आणि तुमची खुर्ची हे तिचे केंद्र. मी इथे बसलो, तर त्या कर्माला न्याय देऊ शकणार नाही.’
‘ते कसे काय सर ? तुम्ही तर आमच्यापेक्षा अनुभवी.’
‘ते बरोबर आहे. पण तुमच्या कामावर सर्वस्वी तुमचाच अधिकार आहे, आणि ही खुर्ची त्याच अधिकाराची निदर्शक आहे. असं बघा, मी या खुर्चीत बसलो, आणि एखादा ग्राहक मला खुर्चीत पाहून त्याच्या कामासंबंधी काही माहिती विचारू लागला, तर मला उत्तर देता येईल काय ?’
‘...नाही सर.’
‘करेक्ट ! म्हणूनच तुम्हीच या खुर्चीत बसायचं. मी पाहुणा. काम बघणार आणि जाणार. कसं ?’
आणि बॉस त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमधे गडगडाट करून हसले !
..आजही या हटके स्टाईलच्या अनोख्या बॉसची आठवण आली की माझ्या मनात ‘बेटी’ ही हाक घुमते आणि हातातला पेन ठप्प होतो ...!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१ लेखाला
स्वतःच्या अधिकाराला योग्य
+१
त्यालेच मुकादम
मी जिथे काम करतो तिथले सीएमडी
आवडलं
किस्सा आवडला.
माझा म्यानेजर
माझ्या पहिल्या नोकरीत जे
किती छान दास'बोध!
किस्सा आवडला.
किस्सा आवडला.
आपली हयात तर येस सर येस सर
मस्त किस्सा ! आमचा खाक्या :
पदाचा/ खुर्चीचा मान
आम्हाला कधी बाॅस असायची वेळ
तुमच्या खुर्चीत बसण्याचा कसूर
आवडला किस्सा. नेहमीप्रमाणे
परफेक्ट!
सध्या आम्ही उभ्या उभ्या
लेखन आवडले.
छान जमलेय व्यक्तीचित्रण ...
चांगल रंगवलंय
छान..
खुर्चीचा किस्सा आवडला.
दुसर्याला मान दिला तर तो
किस्सा आवडला.
खुर्चीचा किस्सा आवडला.
किस्सा आणि सांगायची पद्धत