Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रचेतस on Mon, 11/21/2011 - 22:02
लेखनविषय (Tags)
संस्कृती
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
शेलारवाडीची लेणी-बौद्धधर्मातील हिनयान पंथीयांनी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात खोदल्या गेलेल्या ९/१० लेण्यांचा हा छोटासा समुच्चय. भाऊबीजेनंतर लगेचच दुसर्‍या दिवशी इथे सकाळी ७ वाजताच पोहोचलो ते भावंडांसह. शेलारवाडी तशी घरापासून-चिंचवडपासून अगदीच जवळ, जेमतेम १० किमी. इथे बरेचवेळा येणे झालेलेच होते. लेण्यांमध्ये असलेल्या शिवमंदिरामुळे तसेच येथून जवळच असलेल्या घोरावाडीमुळे या लेण्यांना घोरावडेश्वर असेच म्हणतात पण वास्तविक ही लेणी आहेत पायथ्याच्या शेलारवाडीला खेटून. समुद्रसपाटीपासून ४५० ते ५०० मी उंच असलेल्या या डोंगरात ही लेणी खोदलेली आहेत. वर जायला उत्तम पायर्‍या बांधलेल्या आहेत पण खडी चढण असल्याने उंची फारशी नसूनही काहिशी दमछाकच होते. २० मिनिटातच लेण्यांपाशी पोहोचलो. एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी इतर लेण्यांसारखीच इथलीही रचना. पण अत्यंत साधीसुधी. इथे नक्षीकाम वगैरे अत्यंत थोडकेच. कदाचित निधीच्या अभावामुळे इथे जास्त संस्करण होवू शकले नसावे. डावीकडच्या पहिल्या विहारामध्ये आता विठ्ठ्ल रखुमाईच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. पाठीमागेच त्या कोरलेल्याही दिसतात. कदाचित शिवकालानंतर हा बदल झालेला असावा. १. पायथ्यापासून दिसणारी लेणी २. विहारातील आजच्या मूर्ती. ३. नंतर काही विहार थोडेसे उंचावर खोदलेले दिसून येतात. आतमध्ये छोटेखानी कक्ष, त्यात झोपण्यासाठी खोदलेले ओटे अशीच यांची रचना. ४. विहार ५. विहार ६. विहार उजवीकडच्या बाजूला एका विहारावर एक ब्राह्मी प्राकृतात एक शिलालेख कोरलेला आहे,. आजमितीला तो बराचसा जीर्ण झालेला आहे. जवळचा पाण्याची टाकी पण आहेत. या विहाराशेजारीच येथील एकमेव चैत्यगृह आहे. आज त्याचे रूपांतर शिवमंदिरात झालेले आहे. हाच येथील सुप्रसिद्ध घोरावडेश्वर महादेव. हे चैत्यगृह पण अगदी साधे. सभामंडप, त्यात असलेले ओटे आणि आत गर्भगृह अशी याची रचना. सभामंडपातही एक शिलालेख कोरलेला आहे. गर्भगृहात आज शिवलिंगाची स्थापना झालेली दिसत असली तरी तिथल्या मूळच्या स्तूपाची हर्मिकेची चौकट आजही तिथे स्पष्ट दिसते. घोरावडेश्वर देवस्थान पंचक्रोशीतल्या भाविकांचे श्रद्धास्थानच, दर श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला तेथे मोठी यात्रा असते. ७. चैत्यगृहाशेजारील शिलालेख कोरलेला विहार ८. पूर्वीचे चैत्यगृह, आजचे शिवमंदिर ९. चैत्यगृहातील सभामंडपातील कक्ष १०. तिथल्या कक्षावर असलेला कोरीव लेख ११. घोरावडेश्वर महादेव १२. शिवलिंगाच्या वर दिसत असलेली हर्मिकेची चौकट बाहेरील शिलालेखात कोरलेला मजकूर याप्रमाणे. सिधं धेनुकाकडे वायवस हालकियस कुडुबिकस उसभ णकस कुडुबिणिय सिअगुत णिकाय देयधमं लेणं सह पुते- ण णं(द)गहपतिणा सहो धेनुकाकट येथे वास्तव्यास असलेल्या शेतकरी असलेल्या ऋषभनकाची पत्नी श्रीयगुप्ती हिने हे लेणे गृहपती असलेल्या आपल्या नंद नावाच्या पुत्रासह धर्मार्थ दान केले आहे. धेनुकाकट ही तत्कालीन बौद्ध संघाची वस्तू. कदाचित आजचे डहाणू. आंध्रप्रदेशातही सातवाहनांचे धेनुकाकाट्क(धन्यकाकाटक) नावाचे एक शहर होते. प्रस्तुत शिलालेखातील धेनुकाकट नेमके कुठले याचा उलगडा होत नाही. हालिक म्हणजे हल-नांगर धरणारा अर्थात शेतकरी. म्हणजे सामान्य जनतेचाही लेणीनिर्मितीस हातभार लागलेला होता हे येथे स्पष्ट होते. चैत्यगृहाच्या पुढे एक विहार व एक पाण्याचे टाके असून त्यापुढे कड्याला लगटून चालत गेल्यास वरच्या बाजूला एक बर्‍यापैकी प्रशस्त विहार खोदलेला आहे. पण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी छोटेसे प्रस्तरारोहण करून वर जावे लागते. इथली गुहा बर्‍यापैकी मोठी असून विहारातील खोल्यांमध्ये गणपती, शिवलिंग, देवी इत्यादींची स्थापना झालेली दिसते. इथल्या लेणीमध्ये जे थोडेफार अलंकरण दिसते ते इथेच. ओसरीवरील स्तंभांवर हत्ती कोरलेले दिसतात व सबंध विहारावर चौकटीचे नक्षीकाम केलेले दिसते. अर्थात नक्षीकाम तसे ओबडधोबडच आहे. १३. कातळारोहण करून गेल्यावर वरच्या टप्प्यात असलेला प्रशस्त विहार १४. विहारात असलेले ऩक्षीकामाने सजलेले कक्ष. १५. स्तंभांवर कोरलेली गजशिल्पे. तिथून परत उतरून पहिल्या टप्प्यापाशी आलो. लेण्यांच्या एका बाजूला पुणे मुंबई दृतगती महामार्ग आणि दुसरीकडे जुना पुणे मुंबई महामार्ग आणि त्यापुढे इंद्रायणी, बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आणि समोर गजाननाची प्रचंड मूर्ती असा सुरेख नजारा दिसतो. जेमतेम अर्ध्या तासात ही सर्व लेणी पाहून होतात पण ती जुन्या नव्याचा संगम दाखवून मनाला नक्कीच तृप्त करतात. १६. वरून दिसणारा निसर्गरम्य देखावा १७. सोमाटणेफाटा येथे असलेली गजाननाची मूर्ती. १८ परतीच्या वाटेवर कॅमेर्‍यात बंद केलेले फुल
  • Log in or register to post comments
  • 17278 views

प्रतिक्रिया

Submitted by अन्या दातार on Mon, 11/21/2011 - 22:23

Permalink

चौकट

>>१२. शिवलिंगाच्या वर दिसत असलेली हर्मिकेची चौकट हर्मिकेची चौकट हा काय प्रकार आहे बरे?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 11/21/2011 - 22:36

In reply to चौकट by अन्या दातार

Permalink

हर्मिका म्हणजे स्तूपाच्या वर

हर्मिका म्हणजे स्तूपाच्या वर असलेली चौकट. स्तूपाचे जोते(मेघी), अण्ड, हर्मिका आणि वर क्षत्र असे घटक असतात. जोते म्हणजे मृत्युलोक, अण्ड म्हणजे आकाश आणि हर्मिका म्हणजे स्वर्ग. हर्मिकेवरील क्षत्र म्हणजे स्वर्गमार्गाचे प्रतिक. इथल्या चैत्यगृहाची उंची कमी असल्याने इथे गजपृष्ठाकृती छत, लाकडी फासळ्या इ. दिसून येत नाहीत. हर्मिका छताला अगदी भिडलेली आहे. हा बेडसे लेण्यातील आदर्श स्तूप, छत्र, त्याखालील हर्मिका, अण्ड, वेदिकापट्टी, जोते इ. रचनांनी परिपूर्ण. Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 11/21/2011 - 22:26

Permalink

जबरा हो वल्लीशेठ.

(इंडीयाना जोन्स व्हायच्या मार्गावर असलेला - आत्मशून्य)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Mon, 11/21/2011 - 22:27

Permalink

वल्ली,

झकास फोटो आणि अभ्यासपूर्ण लिखाण. ती गणपतीची मोठी मूर्ती पुण्याला येता येता दिसल्याचं स्मरतंय. बाकी, वल्लीशेठ, ते टिमविचं मनावर घ्याचं बर्का...... तुझ्याइतकी लायक व्यक्ती त्यासाठी असेल असं वाटत नाही. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Mon, 11/21/2011 - 22:49

Permalink

वल्लीशेठ अहो बोलवत चला अशा

वल्लीशेठ अहो बोलवत चला अशा गोष्टी पाहायला. एकट्याने जात जाऊ नक्का हो.. - पिंगू
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 11/21/2011 - 22:50

Permalink

बुकमार्क केले आहे.

बुकमार्क केले आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Mon, 11/21/2011 - 23:07

Permalink

वल्ली मस्त! छान फोटो आणि

वल्ली मस्त! छान फोटो आणि माहितीही! इथे कसे जायचे ते जरा इस्कटून सांगाल का? - (लेणी पहाण्यात रमणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 11/21/2011 - 23:13

In reply to वल्ली मस्त! छान फोटो आणि by सोत्रि

Permalink

येकदम सोपे आहे मालक. निगडी

येकदम सोपे आहे मालक. निगडी -पुणे गेटवरून सरळ पुढे जायचे. देहूरोडच्या पुढे चार लेनचा रस्ता सुरु होतो. तिथेच शेलारवाडीला लागूनच डोंगर आहे. हायवेला लागूनच पायर्‍या आणि कमान पण दिसते. गाडी पार्क करून अर्ध्या तासात वर. टोलनाक्याच्या अलीकडेच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 11/22/2011 - 11:02

In reply to वल्ली मस्त! छान फोटो आणि by सोत्रि

Permalink

कधी पण या ..

सोकाजीराव , कधी यायचा झाल्यास मला सांगा आणि सेवेची संधी द्या :) आवडत असल्यास "चुलीवरच्या झण्झणीत मटणाची " बैठक घेउ... छान मिळते मावळात .. घोरवडेश्वर - मोठा गणपती- प्रति शिर्डी-शिरगाव असा १ दिवसाचा प्लान करता येतो ..
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 11/21/2011 - 23:33

Permalink

अतिशय अभ्यासपूर्ण लिखाण !!

अतिशय अभ्यासपूर्ण लिखाण !! अर्थातच आवडल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 11/22/2011 - 07:51

Permalink

लेख आवडला आहे

गावामधला म्हणून जास्त जवळचा वाटला..
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 11/22/2011 - 09:16

Permalink

मस्त रे वल्ली. खूप छान

मस्त रे वल्ली. खूप छान माहिती. -वल्ली ट्रेकर्स संघटनेचा सदस्य होण्याच्या तयारीत प्यारे
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 11/23/2011 - 11:04

In reply to मस्त रे वल्ली. खूप छान by प्यारे१

Permalink

+१

वल्ली ट्रेकर्स संघटनेचा सदस्य होण्याच्या तयारीत +१ वल्ली सेठ झकास फोटू.. शेवटचा तर अप्रतिम आहे अनवट वाटांवर भटकण्याचा तुमचा नाद असाच बहरत जावो , हीच प्रार्थना :)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 11/23/2011 - 12:51

In reply to +१ by स्पा

Permalink

वल्ली ट्रेकर्स संघटनेचा सदस्य

वल्ली ट्रेकर्स संघटनेचा सदस्य होण्याच्या तयारीत
कट्ट्याला हजर राहता न येणारी मंडळी म्हणे ट्रेकला हजर राहणार..... पाहा जरा आरशात....
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 11/22/2011 - 09:42

Permalink

नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण

नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण लेखन अन् फोटु. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 11/22/2011 - 10:15

Permalink

हा माणूस कुठेकुठे फिरत असतो

हा माणूस कुठेकुठे फिरत असतो देव जाणे. पण असाच फिरत रहा रे देवा आणि आम्हाला अश्याचब नवनव्या ठिकाणांची माहिती करुन दे :). सुंदर लेख आणि रोचक माहिती.
  • Log in or register to post comments

Submitted by दीप्स on Tue, 11/22/2011 - 10:18

Permalink

छान छान !!

छान छान फोटो, छान छान माहिती. परतीच्या वाटेवर कॅमेर्‍यात बंद केलेले फुल तर अतीशय सुरेख !!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/22/2011 - 21:54

Permalink

मस्त माहिती

आणि फोटोदेखील नेहमीप्रमाणे वल्ली पेश्शल. मस्त. पण तिथे विठोबा रखुमाईच्या मूर्ती कधी कोरल्या असाव्यात?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 11/22/2011 - 22:04

In reply to मस्त माहिती by पैसा

Permalink

पण तिथे विठोबा रखुमाईच्या

पण तिथे विठोबा रखुमाईच्या मूर्ती कधी कोरल्या असाव्यात?
हा बदल शिवकालानंतरच झाला असणार. तुकारामांनतरच हे निश्चित. इथले शिवलिंग कदाचित शिवकालाच्याही आधीचे असावे पण विठोबा-रखुमाई अगदी अलीकडच्या, कदाचित १८ व्या १९ व्या शतकातही कोरलेल्या असाव्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/22/2011 - 22:36

In reply to पण तिथे विठोबा रखुमाईच्या by प्रचेतस

Permalink

असं वाटतंय

त्या मूर्ती अगदी ओबडधोबड आहेत खर्‍या.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 11/23/2011 - 00:28

In reply to पण तिथे विठोबा रखुमाईच्या by प्रचेतस

Permalink

शिवकालाआधी आणि नंतर

हे काळ ठरवण्याचे काही विशेष आधार असतात का? १८ व्या आणि १९ व्या शतकातल्या मूर्ती आणि त्याआधीच्या म्हणजे १५ व्या किंवा १६ व्या शतकातील मूर्ती यात काही फरक आहेत का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 11/23/2011 - 08:36

In reply to शिवकालाआधी आणि नंतर by चित्रा

Permalink

नाही.हा केवळ अंदाज. इथला

नाही. हा केवळ अंदाज. इथला प्रदेश हा देहूला अत्यंत जवळचा, तुकारामांच्या वास्तव्याने पुनित झालेला. त्यामुळे सरळ आहे की विठ्ठ्ल रखुमाईंच्या मूर्ती शिवकालानंतरच्याच. २ र्‍या फोटोतल्या कोरलेल्या मूर्ती त्यांच्या कोरीव कामावरून तरी फारश्या जुन्या वाटत नाहीत. साहजिकच आहे की तुकारामांना संतपद मिळाल्यानंतरच्याचकाळातील त्या आहेत. शिवाय विठ्ठलाच्या घडीव मूर्ती तर अगदी अलीकडच्याच म्हणजे जेमतेम ३०/४० वर्षांपूर्वीच्याच वाटतात. घोरावडेश्वर महादेवाच्या शिवलिंगाची स्थापना मात्र कधी झाली असावी ते सांगता येत नाही. खुद्द देहूनजीकच्या तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावर पलीकडच्या बाजूने खालच्या पातळीत अशीच कोरीव लेणी आहेत. तिथे फारसे कुणी जातही नाही. तिथे एक स्तूपही आहे. तिथल्याही एका विहारात विठ्ठ्ल रखुमाईच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. पाण्याची टाकी पण आहेत. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 11/23/2011 - 19:04

In reply to नाही.हा केवळ अंदाज. इथला by प्रचेतस

Permalink

भंडारा डोंगर

भंडारा डोंगरावर तुकोबा नेहमी जाऊन बसत असत ते याच विहारात तर नव्हे?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 11/23/2011 - 19:10

In reply to भंडारा डोंगर by पैसा

Permalink

जातही असतील तिथे. गाथेसारखा

जातही असतील तिथे. गाथेसारखा अजोड ग्रंथ रचायला अशी एकांत जागा खूपच चांगली. भंडारा डोंगरावरील एका झाडाखाली तुकाराम महाराज ध्यान करत बसायचे असे वाचले होते. बाकी यावर अधिक प्रकाश आपल्याकडील संतसाहित्याचे गाढे अभ्यासक धनाजीराव वाकडे किंवा किसन शिंदे हे टाकू शकतील असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 11/23/2011 - 00:06

Permalink

इथलं काही लेखक्,काही भटके आणि

इथलं काही लेखक्,काही भटके आणि काही खाउ घालणारे यांच्या धाग्यावर कौतुकाचे शब्द लिहिणं बंद करायचं ठरवलं होतं पण ते शक्य होत नाही. वल्ली त्यातलाच एक,
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Wed, 11/23/2011 - 14:10

Permalink

मस्त रे....

पुण्यापास्नं जवळच आहे म्हणायचं कार्ले-भाज्या सारखं.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Wed, 11/23/2011 - 15:20

In reply to मस्त रे.... by मन१

Permalink

कार्ले-भाजेच्याही अलिकडे आहे

कार्ले-भाजेच्याही अलिकडे आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 01/11/2012 - 18:42

Permalink

मी बी ग्येलो हुतो !

अलीकडेच मी सुमारे ३५ वर्षानी घोरवाडी डोंगरावर गेलो होतो. पण वल्ली , गड्या पायर् याचा रायझर टेरर आहे . पाच वेळा थांबावे लागले. मला जुंगफ्राउ ला पुढच्या वर्षी जायचे आहे . कसं जमायचं ? तिथे पार वरपर्यन्त लिफ्ट आहे महणे. तुझा आशीर्वाद दे म्हणजे सगळं जमेल .
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Wed, 01/11/2012 - 18:53

Permalink

वल्लीशेठ और खजानेकी खोज !

वल्लीशेठ और खजानेकी खोज ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by योगेश आलेकरी on Wed, 12/09/2015 - 12:22

Permalink

मस्तंम्

पुन्हा एकदा जाव लागणार हा लेख वाचून.. मागे एकदा मुंबई पुणे मार्गावरील लेण्या पाहत फिरत असता ईथे आलेलो पण माहीती कमी होती.. आता पुर्ण मिळतेय :-) धन्वाद
  • Log in or register to post comments

Submitted by लई भारी on Wed, 12/09/2015 - 15:57

Permalink

मस्त!

वल्ली राव, इथे आधी जाउन आलोय पण तुम्ही दिलेली माहिती वाचून परत जायची इच्छा झालीय(आधी नुसतीच भटकंती झालीय). बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. अलीकडे २-४ वेळा ट्रेकला जातोय, पायऱ्यांच्या अलीकडून पायवाट आहे तिथून वरच्या पठारापर्यंत. तुमच्याबरोबर जायला आवडेल एकदा :)
भंडारा डोंगर
संत तुकारामांच्या उल्लेखामुळे इथे जायची उत्सुकता आहे. आवर्जून जाण्यासारखी जागा आहे का ही? कसे जावे लागेल? बेगडेवाडी स्टेशन च्या मागे, इंद्रायणी नदीच्या पात्रात रांजण-खळगे आहेत. ते बघितले असेलच तुम्ही. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 12/09/2015 - 16:30

In reply to मस्त! by लई भारी

Permalink

भंडारा डोंगर तशी आवर्जून

भंडारा डोंगर तशी आवर्जून बघण्यासारखी जागा नाही. वर विठ्ठलाचं आणि तुकारामबुवांचं मंदिर आहे. मात्र संध्याकाळी तिकडच्या कठड्यावर बसावं, मस्त थंडगार आणि जोरदार वारं असतं. लवकर आलात तर पलीकडच्या बाजूला पायवाटेने अर्धा डोंगर उतरून हीनपंथीय गुहा आणि स्तूप पहावा. जायचे दोन मार्ग. - मुंबई पुणे महामार्गाने देहूरोड- देहू गाव - तिथून इंद्रायणीवरचा पूल करुन भंडारा डोंगर दुसरा मार्ग म्हणजे - निगडी- तळवडे - देहू गाव - भंडारा डोंगर.
  • Log in or register to post comments

Submitted by राजो on Wed, 12/09/2015 - 16:11

Permalink

वल्ली --> प्रचेतस ??

वल्ली --> प्रचेतस ??
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 12/09/2015 - 16:30

In reply to वल्ली --> प्रचेतस ?? by राजो

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by सत्याचे प्रयोग on Wed, 12/09/2015 - 19:48

Permalink

छान माहिती

घोरवाडेश्वर परीसरात जन्म झाला पण अशी अभ्यासपूर्ण माहिती कोणी दिली नव्हती अत्यंत धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 12/10/2015 - 12:06

Permalink

हा लेख नजरेतून सुटला खरा.

हा लेख नजरेतून सुटला खरा. मस्तच!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 12/10/2015 - 13:54

Permalink

छान माहिती

धेनुकाकट ही तत्कालीन बौद्ध संघाची वस्तू. कदाचित आजचे डहाणू. आंध्रप्रदेशातही सातवाहनांचे धेनुकाकाट्क(धन्यकाकाटक) नावाचे एक शहर होते. प्रस्तुत शिलालेखातील धेनुकाकट नेमके कुठले याचा उलगडा होत नाही
http://aisiakshare.com/node/2885
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com