Skip to main content

शाकाहार का मांसाहार

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/12/2015 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आपण काय खावं हे कोणीतरी तिसरी व्यक्‍ती ठरवणार असेल तर जगणं मुश्कील आहे. अमूक एका समूहाच्या लोकांनी आमच्या वस्तीत स्वत:चं घर बांधूनच नव्हे तर भाड्याच्या खोलीतही राहू नये असं कोणी ठरवणार असेल तर भयावह आहे. अमूक खाणार्‍यांनी आमच्या वस्तीत येऊ नये असा फतवा निघणार असेल तर ते त्याहूनही भयंकर आहे. आपल्या कळपाला मान्य नसल्यामुळे अमूक एकाकडून अमूक एक गोष्ट घडली म्हणून मार देणे वा जीवंत मारून टाकणे हे रानटी मानवी टोळ्यांचे काम होते. आजच्या सभ्य माणसांच्या समूहांचे नाही. आपण नेमके आज मानवी समाजात राहतो का आपापल्या जाती- धर्माच्या कळपात राहतो. मानवी समाजात निधर्मी सहजीवन जगता जगता आपण अंतर्गत पातळीवर आपल्या माणसांच्या हिंसक टोळ्या जमवायला लागलोत की काय? शाकाहार म्हणजे काय? मांसाहार म्हणजे नेमकं काय? अजून कुठूनतरी शुध्द शाकाहार अशीही व्याख्या ऐकू येते. शुध्द शाकाहारी असल्याचा दावा करणार्‍या जागोजागी हॉटेल्सही दिसतात. हा काय प्रकार आहे? भारतातल्या सर्व जनतेने मांसाहार (मासे, चिकन, मटण आदी) खाणे बंद केले तर भाजीपाला कोणालाच खायला मिळणार नाही. भाजीपाला उपलब्‍ध झाला तरी गरीबालाच काय मध्यमवर्गीय माणसालाही विकत घ्यायला परवडणार नाही. एकविसाव्या शतकाच्या आणि जगात महासत्ता होण्याच्या गमजा मारणार्‍या देशात मांसाहार करणार्‍यांचा व्देष करणे हा रानटीपणा आहे. मांसाहार करणार्‍यांकडे तुच्‍छतेने पाहणे हा सुसंस्कृतपणा असू शकतो का? मनुष्यप्राणी हा मिस्त्र आहारी प्राणी आहे. म्हणजे जो शाकाहार करू शकतो आणि मांसाहारही. माणसांच्या दातांची रचनाही मिश्रआहारी आहे. खरं तर कोणी कितीही दावा करत असलं तरी ते शुध्द शाकाहारी आहेत असं म्हणणं आज धारिष्ट्याचं ठरेल. शाकाहार करण्यामागे कोणत्याही जीवाची हत्त्या करू नये हा विचार असेल तर शाकाहारी लोक भ्रमात आहेत. आपण ज्या हिरव्या भाज्या (वनस्पती) खातो त्याही जीवंत असतात. त्यांच्या जीवाचा बळी देऊन आपण भाज्या खात असतो. प्राण्यांमध्ये जसं लाल रंगाचं रक्‍त असतं तसं वनस्पतींमध्ये हिरव्या रंगाचं हरितद्रव्य असतं. म्हणून रक्‍त आणि हरितद्रव्य यांच्याकडे एकाच दृष्टीने पहावं लागेल. रक्‍ताला पाहून आपण हळहळतो तसे हिरव्या हरितद्रव्याला पाहूनही आपण हळहळायला हवं. सृष्टीत भाज्या वा फळे आपल्यासाठी उगवत नाहीत. आपण त्यांचा खाण्यासाठी वापर करतो. गहू, बाजरी, तांदूळ आदींसह सर्व प्रकारच्या डाळी देणारे धान्यही बीज स्वरूपात असते. या सर्व प्रकारच्या धान्यांपासून जमिनीत रूजून नवीन जीव तयार होणार असतो. त्या बीजाला दळून- भरडून आपण पोळ्या आणि भाकर्‍यांसाठी पीठ तयार करतो. ही सुध्दा क्रूर हिंसाच आहे. आता कोणी म्हणेल की सृष्टीने वा देवाने भाजीपाला आणि धान्य आपल्याला खाण्यासाठीच उगवले आहे, तर मग इतर प्राण्यांकडेही त्याच दृष्टीने पहावे लागेल. शेवटी फिरून निसर्गाच्या अन्नसाखळीकडेच आपण येतो. दूधाला तरी आज शुध्द शाकाहार म्हणता येईल का? विज्ञान सांगतं, आजचं दूध शाकाहारी नाही. (भाकड वनस्पती आणि भाकड प्राणी यांचं काय करायचं याचा प्रश्न सृष्टीला कधीच पडला नाही. पण भाकड माणसांनी आज जो उच्‍छाद मांडला आहे तो मात्र नक्कीच चिंताजनक आहे.) आता प्रश्न उरतो तो अध्यात्मिक आणि धार्मिकतेचा. खरं तर हा आज धार्मिक प्रश्न उरलाच नाही, हा सरळ सरळ राजकीय प्रश्न आहे. माणसं मारायची आणि त्यांच्यावर राजकारण खेळायचं ही मध्ययुगीन पाताळयंत्री व्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे, असं नाईलाजाने म्हणावं लागतं. मध्ययुगीन हुकुमशहा राजे- राजवाड्यांनीही इतक्या टोकाचा धर्माचा गैरवापर कधीही केलेला नाही, तितका आज लोकशाही राज्य व्यवस्थेत सत्तेत येण्यासाठी धर्माचा अधर्म केला जातोय. सात आठ वर्षांपूर्वी ‘बोंबीलचा वास’ नावाची कथा मी लिहून ठेवली आहे. ह्या कथेत बोंबीलच्या वासावरून मैत्री तुटते, हे वाचकांना पटणार नाही असं वाटल्यामुळे ती कथा मी बाजूला ठेऊन दिली होती. (आता रोखठोक 2015 च्या दिवाळी अंकात प्रकाशित.) पण आज मुंबईपासून संपूर्ण देशभर जे काही चाललंय, ते पाहून ही कथा वास्तवापेक्षा फारच गुळमुळीत आहे असं लक्षात आलं. ‘बोंबीलचा वास’ ही कथा आणि ‘देव हातात हात घालून’ ही कविता हे दोन्हीही माझे कलाविष्कार तसे जुनेच. पण जुन्या कथा कवितांना असे नवे दिवस या हिंस्त्र पार्श्वभूमीवर यावेत हे दु:खदायकच. पैकी ‘देव हातात हात घालून’ या कवितेने या लेखाचा शेवट करतो: आधी डुक्कर मरतं मग माणसं अथवा आधी गाय मरते मग माणसं. आधी भगवा जळतो मग माणसं अथवा आधी हिरवा जळतो मग माणसं. केव्हा हा ईश्वर हसतो केव्हा तो देव टाळ्या वाजवतो. दंगलीची मॅच संपताच दोन्ही देव खिलाडू वृत्तीने चेंडूंसारखी माणसं लाथाडून हातात हात घालून निघून जातात आपापल्या पोथ्या पुराणात... - माणसं अशा देवांना कवटाळत कडेकोट घरात लपून बसतात, की एका अफवेच्या काडीने घरांतल्या जीवंत माणसांसह आख्खं गाव जसं होतं की नव्हतंच बेचिराख... (दिनांक 15-10-2015 च्या महाराष्ट्र टाइम्स – नाशिक विभाग- मध्ये प्रकाशित झालेला लेख सर्वांसाठी पुन्हा देतोय. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) - डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22495
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

लेख चांगला आहे पण काश..एक मिपाकट्टा झणझणीत थाळीस्थानावर भरला असावा आणि हे धाग्याचं शीर्षक कोणीतरी ओरडून म्हणावं.. नेमकी किती ताटं कोणती मागवायची ते वेटरला सांगण्यासाठी.. वा...

पचतं ते खावं या मताचा मी आहे, बाकी चालु द्या. लेख चांगला आहे. -दिलीप बिरुटे (नॉनव्हेज कडून भाजीपाल्याकडे वळलेला)

अज्जुन कसा नै आला या धाग्यावर पांडू जो मारेल सगळ्यान्च्या डोक्यात दांडू http://freesmileyface.net/smiley/happy/happy-wink-001.gif

In reply to by बॅटमॅन

आर्त हाकांनतरही येईना.... दया कुछ तो गडबड है तोड दो दरवाजा नही मिला तो खिडकी भी चलेगी.. खापीही प्रद्युम्न

काहीही असावे पण मिताहारी असावे. दुसर्याचे अन्न कोणत्याही प्रकारचे असले तरी त्याला नाके मुरडू नयेत. अन्न माणसांना जोडते, तसे तोडतेही प्रसंगी मने दुखावतात.... तेव्हा जपून असावे.

लेखक, कशाचे डॉक्टर आहात कळेल का ? आपली पात्रता / योग्यता काढायचा प्रयत्न नाहीये . तर प्रतिवाद कोणत्या भाषेत करणे सोपे जाईल हा उद्देश आहे . समजा आपण माणसांचे डॉक्टर असाल तर जीव शात्रीय भाषेत बोलता येईल - सुबोध खरेंनी आधीच बिनतोड उत्तर दिलेच आहे. पी एच डी असाल तर साहित्यिक भाषेत देता येईल. आता, वनस्पती शास्त्राचे पी एच डी असाल तर वादच मिटला !

लेखक, कशाचे डॉक्टर आहात कळेल का
हाच प्रश्न मी पण विचारला होता, पण लेखक तेव्ह्डे सोडुन दुसरे च बोलतात.

संक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. हा त्यांच्या ब्लॉग वरील परिचय आहे.

स्वजाती भक्षणाचे प्रकार इतर काही प्राण्यांप्रमाणे मानव प्राण्यामधे ही काही आदीवाश्यांकडे चालायचेच ना?/अगदी पुरातन भारत देशात सुद्धा हे चालायचे ना?

In reply to by स्वामी संकेतानंद

अंडी उबवल्यावर (गावठी अंडी घ्या हं, पोल्ट्रीतली उबवूनही काय उपयोग नाही!) त्यातनं पिले बाहेर पडली तर ती चालतील कदाचित! थोडीफार उडतील पण! :)

आपल्या प्रतिसादांतुन फार महत्वपुर्ण व रोचक माहीती एकुण आहाराविषयी मिळाली. एक जुनाच प्रश्न विचारावासा वाटतो प्रोटीन्स संदर्भात शाकाहारातुन प्रोटीन्स मिळतात मात्र ज्या मुबलक प्रमाणात ते मांसाहारापासुन मिळतात तितके मिळत नाहीत. हे मी खेळाडु, व्यायामपटु यांच्या शरीराच्या प्रोटीन च्या अतिरीक्त गरजांसंदर्भातुन विचारत आहे. यावर शाकाहारी शरीरसौष्ठवपटु वा व्यायामपटु वा खेळाडु कडे पर्याय मर्यादीत असतात हे खरे नव्हे का ? प्रोटीन पावडर सप्लीमेंट सजेस्ट करतांना असे सांगितले जाते की शरीराला वजनाच्या प्रपोर्शनमध्ये म्हणजे पर किलो ला काही ग्रॅम आठवत नाही बहुधा दोन ग्रॅम पर केजी अशी गरज असते.इ.इ. प्रोटीनच्या खेळांडुना असलेल्या अतिरीक्त गरजेविषयी व तिच्या शाकाहारातुन होत असलेल्या पुर्ततेविषयी आपले विवेचन वाचायला आवडेल

परवाच डॉ. सुधीर रा. देवरे यांना नॅसेओचा (नॅशनल सोसायटी फॉर इक्वल ऑपॉरच्युनिटीज फॉर दी हायेस्ट इंडिया) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी एका उच्च ध्येयवादी विशेष व्यक्तीला हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

In reply to by मार्मिक गोडसे

नॅशनल सोसायटी फॉर इक्वल ऑपॉरच्युनिटीज फॉर दी हायेस्ट इंडिया असा सर्च केला तर गुगल्या काही रिझल्ट देत नाहीये. दुसरी कुठली संस्था आहे का?

In reply to by ट्रेड मार्क

संस्था तीच आहे. NASEOH गूगलून बघा. कदाचीत संस्थेचे दीर्घरुप देण्यात गडबड झाली असेल तर दुर्लक्ष करा.