ठंडा करके खाएंगे!
.
.
नीलकांतच्या पल्सरवर तो आणि शिंदे दीपक आणि मुनीरच्या पाळतीवर होते. योग्य अंतर राखून ते दोघे गेला अर्धा तास दीपक जाईल तिथे फिरत होते. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास दीपक आणि मुनीर एका हॉटेलात जेवायला थांबले. बाहेर थांबलेल्या नीलकांतने शिंदेंना विचारलं,
"शिंदे, तुम्ही स्प्लेंडरच्या मड फ्लॅपवर काय आहे ते वाचलंत?"
"हो, राज ग्रीनव्हिलची जाहिरात होती, मीही विचार करतोय, हे नाव कुठं पाहिलंय आधी? मुरबाड भागात पाहिल्याचं आठवतंय… जरा थांबा, एक फोन करून बघतो."
त्यांचा कुणालातरी फोन झाल्यावर शिंदे म्हणाले, "सर, माझा अंदाज बरोबर निघाला. राज ग्रीनव्हिल नावाची एक नवी हौसिंग डेव्हलपमेंट होऊ घातलीये मुरबाडच्या पूर्वेला. एम.आय.डी.सी.नंतर मुरबाड-कर्जत हायवेवर ४-५ किलोमीटरवर त्या ग्रीन ड्रीम, ग्रीन पॅराडाईज वगैरे सुरू आहेत नं, त्याच्या थोडं आणखी पुढे या स्कीमचे बोर्ड पहिले होते. अजून बांधकाम काही नाही."
नीलकांतने हॉटेलच्या दाराकडे पाहिलं, आत गेलेले दोघेही अजून आतच होते.
"शिंदे, असं करा, तुम्ही चटकन एक अनमार्क्ड गाडी मागवा, आणि या दोघांना फॉलो करत राहा. मी मुरबाडकडे चक्कर मारून येतो."
शिंदेंचा ऑफिसला फोन झाल्यावर दहाच मिनिटांत हाँडा सीडी ११० ड्रीम दुचाकी घेऊन एक साध्या कपड्यांतील हवालदार आले, तिघांचं बोलणं होतंय ना होतंय इतक्यात हॉटेलातून दीपक आणि मुनीर बाहेर पडून त्यांच्या स्प्लेंडरकडे निघालेले नीलकांतला रिअर व्ह्यू मिररमध्ये दिसले. ते निघताच शिंदे ११० ड्रीम घेऊन त्यांच्या मागे निघाले, आणि त्यानंतर दोनच मिनिटांत नीलकांतही निघाला.
*******************
नीलकांतची पल्सर मुरबाड-कर्जत हायवेवर एम.आय.डी.सी. ओलांडल्यानंतर ४-५ किलोमीटरवर उजवीकडे संभाजीनगरकडे जाणारा रस्ता गेल्यावर डावीकडे एका गावाकडे जाणार्या रस्त्यावर राज ग्रीनव्हिल हौसिंग डेव्हलपमेंटची फ्लेक्स जाहिरात होती. ती फॉलो करत नीलकांत वळला. थोड्याच वेळात एक गाव लागलं. गावातल्या दर ३-४ दुकानांवर वा बैठ्या घरांवर तसेच फ्लेक्स लागले होते. पन्नास-एक तरी फ्लेक्स दिसले असतील नीलकांतला. प्रत्येक फ्लेक्सवर शुभेच्छुक म्हणून एकच नाव होतं - राजेंद्र काबरे. आणि तळाशी तिशीतल्या एका दाढीधारी व्यक्तीचा फोटो. ही व्यक्ती कोण आहे हे एखाद्या दुकानात विचारायचा मोह नीलकांतने टाळला, आणि तो गावाच्या अखेरीस असलेल्या प्रकल्पाच्या साईटकडे गेला.
बांधकाम जवळजवळ शून्यच, पण साईट ऑफिसवर मात्र थोडी वर्दळ होती, सुटीचा दिवस नसतांनाही ४-५ संभाव्य ग्राहक माहिती घेण्यासाठी आलेले दिसले त्याला. आणखी थोडा वेळ गावातून फेरफटका मारून तो परत वळला. वाटेत मुख्य रस्त्याजवळच्या फ्लेक्सपाशी कुणी नाही हे पाहून त्याने मोबाईलमध्ये एक फोटो घेतला. ठाण्याच्या दिशेने परतताना नीलकांतच्या लक्षात आलं की तसेच फ्लेक्स वाटेत आणखी काही ठिकाणी लागलेले होते.
ठाण्यात नीलकांतची पल्सर नौपाडा रोडवरच्या 'अभिजित ग्राफिक आर्ट अँड फ्लेक्स प्रिंटिंग'समोर थांबली. अभिजितने हातातलं काम थांबवून नीलकांतला केबिनमध्ये नेलं. पुण्याला अभिनवमध्ये ग्राफिक आर्ट्समध्ये डिप्लोमा आणि मग जे.जे.मधून प्रथम वर्गात डिग्री केलेला अप्रतिम कलाकार, पण कित्येक वर्षांनी अगतिक होऊन त्याचा बहुतांश वेळ फ्लेक्स प्रिंटिंगमध्ये जायचा. "या साल्या गुंठा मंत्र्यांनी इझी मनी वापरून फ्लेक्स छापण्यात प्रिंटिंग हा व्यवसाय इतका अभिरुचीहीन केलाय की दुर्दैवाने ग्राफिक आर्ट्सपेक्षा जास्त पैसा फ्लेक्स प्रिंटिंगमध्ये आहे.." अभिजित नीलकांतला म्हणायचा.
नीलकांतने त्याला मोबाईलमधला फ़ोटो दाखवला.
"हे तुझं काम नाहीये हे छपाईतल्या चुका पाहून लक्षात आलंच माझ्या, पण कुणाचं आहे, आणि पैसा कुणी पुरवलाय याची माहिती काढशील संध्याकाळपर्यंत?" अभिजित हो म्हणाल्यावर नीलकांत निघाला.
****************
संध्याकाळी अभिजितचा फोन आला, "नीलकांत, तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याआधी तुझं थोडं प्रबोधन करतो. हे जे फ्लेक्स लागतात ना, ते क्वचित कधी राजकीय पार्टीला, पण बहुतेक वेळा स्वत:ला promote करण्यासाठी लावले जातात. तू ते वाढदिवसाच्या शुभेच्छांचे वगैरे फ्लेक्स पहिले असतीलच. आमदार ताईचे किंवा दादांचे वाढदिवस आले की वॉर्डा-वॉर्डांमध्ये असे फ्लेक्स लागतात. यांत त्या ताई किंवा दादांचे चेहेरे डावीकडे मोठ्या आकारात, तर 'शुभेच्छुकां'चे चेहेरे उजवीकडे खाली निम्म्या आकारात असतात. हे शुभेच्छुक म्हणजे ज्यांना त्या वॉर्डांमध्ये नगरसेवक म्हणून तिकिट हवं असतं, ती मंडळी. हे शुभेच्छुकच अशा फ्लेक्सचा खर्च उचलतात. अर्थात, तो दाम ते त्या वॉर्डांमधल्या व्यावसायिकांकडून साम-दंड-भेद वापरून वसूल करतात, हे आपल्या लोकशाहीचं दुर्दैव!
असो. तर हा राजेंद्र काबरे म्हणजे त्या गावातला गुंठा मंत्री, पिढीजात मिळालेली २०-१ एकर जमीन एन.ए. करून घेऊन आता तो प्लॉट बिल्डिंग कॉम्प्लेक्स करायला वापरणार आहे, आणि मला प्रिंटरकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने पैसे cash न देता पेमेंट in-kind केलंय, ज्यात प्रिंटरची बर्यापैकी चांदी झालीय. Let me explain, फ्लेक्सचं कापड, निरनिराळ्या inks वगैरे आम्हाला लागणारी सामग्री मुख्यत: उत्तर प्रदेशातून किंवा आंध्रातून येते. Obviously, मुळात या गोष्टी हल्ली चीनहून येतात. या काबरेने म्हणे डायरेक्ट इंपोर्ट करून त्या प्रिंटरला वर्षभराचा साठा पुरवलाय. आता बाकीची माहिती तू काढशीलच."
******************
मंगळवारी सकाळी साध्या वेषातले सब-इन्स्पेक्टर शिंदे काबरेच्या गावात होते. थोड्या वेळात एक चक्कर मारून त्यांनी एका फ्लेक्सच्या मागे नाव जवळजवळ लपलेलं कटिंग सलून शोधलं आणि ते आत गेले. आत फक्त एक टिळा लावलेला म्हातारा न्हावी खुर्चीवर बसलेला, बाकी दुकान रिकामं.
"काका, दाढी करायचीय, चालूये ना? गर्दी नाहीये म्हणून विचारलं बरं का!"
"उघडलंय ना? मग करतो की, या बसा." म्हणत म्हातार्याने सामान जमा करायला घेतलं.
गप्पा मारताना शिंद्यांनी फ्लेक्सचा विषय काढला. एकदा दुकानाच्या बाहेर चक्कर टाकून म्हातारा म्हणाला, "मी माळकरी हाय, खोटं कशापायी बोलू? जे काही चाललंय ते बरं न्हाई इतकंच कळतं."
शिंद्यांना कळलं ते असं : काबरे म्हणे सिव्हिल इंजीनिअरिंगमधला कुठलातरी कोर्स करून नोकरीसाठी कलकत्त्याला ५-६ वर्षं राहिला, आणि मग गावात ६ महिन्यांपूर्वी आला तो एकदम बिल्डर म्हणूनच. दोन महिन्यांपूर्वी त्याने गावातल्या पन्नास-एक दुकानदारांना महिन्याला पाच हजार या हिशोबाने पूर्ण वर्षासाठी साठ हजार रुपये एकरकमी cash देऊ केले. ज्यांनी गाडीवर, रिक्षावर किंवा मोटरसायकलवर जाहिरात लावली, त्यांनाही अशाच हजार-हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या होत्या.
"इचार करा, महिन्याला ५-१० हजार मिळवणार्या दुकानदारान्ला यकदम साठ गुलाबी गांधी मिळाले, कोण नेकीनं काम करील? समद्या गावाची नासाडी व्हनार हाय!"
"एवढे पैसे मिळालेत तर दुकानांमध्ये काही श्रीमंती बदल दिसत नाहीत?" शिंद्यांनी विचारलं.
"आनखी महिनाभर खरचायचे न्हाई आन ब्यांकेत टाकायचे न्हाई म्हने, आनि नंतर खरचायचे तर पुन्या-मुंबईत जाऊन. मला तर काही काळंबेरं वाटतंय यामागे. आन मी पडलो माळकरी, तो वंगाळ पैसा असंल तर मी खरचनारच न्हाई, बाजूला ठिऊन दिलाय!"
एव्हाना दाढी संपलेली होती.
शिंद्यांनी म्हातार्याला आपलं आय.डी. दाखवलं आणि विश्वासात घेऊन एक नोट पाहायला मागितली. म्हातार्याने आतून एक आणून दिल्यावर त्यांनी त्याला पाचशेच्या दोन नोटा दिल्या, दाढीचे पैसे दिले आणि मग त्याला आपल्या भेटीविषयी गुप्तता बाळगण्याची विनंती केली आणि ते गावातून निघाले. हायवेला लागण्याआधी त्यांनी नीलकांतला फोन लावला.
******************
मध्यंतरीच्या वेळात शिर्के आणि मुनीर नेहाच्या क्लिनिकसमोर जाऊन थांबले. ती क्लिनिकमध्ये कामात आहे याची खात्री करून घेतल्यावर शिर्केने मुनीरला समोर कोपर्यावर उभं केलं आणि गाडीवर टांग मारून तो दहा मिनिटांवरच्या अर्बन बँकेकडे गेला. नीलकांत दुचाकीवर त्याच्या मागोमाग गेला. गाडी बँकेबाहेर लावून शिर्के आत गेला, तसा नीलकांत समोरच्या फ़ुटपाथपाशी थांबला. शिर्के आत जाता-जाता त्याच्या फ़ोनची रिंग वाजली. शिंदे त्याच्याशी मिनिटभर बोलले. नीलकांतचा चेहर्यावरचा उत्साह पाहण्यासारखा होता. दोघांनी दुपारी जेवणाच्या वेळेत भेट ठरवली. पाचच मिनिटांनी शिर्के बाहेर आला, तेव्हा त्याचा चेहेरा संतापाने फ़ुललेला होता, त्याने तरातरा मोटरसायकलकडे जाऊन मागे लावलेलं स्टिकर ओरबाडून काढलं आणि चुरगाळून फ़ेकून दिलं. आतून बँकेचा रखवालदार बाहेर येतो आहे असं दिसताच शिर्के घाईघाईने किक मारून निघाला. नीलकांत क्षणभरच त्याच्या मागे जावं, की बँकेत जाऊन काय घडलं ते विचारावं, अशा द्विधा मन:स्थितीत होता, पण थबकून, गाडी लॉक करून तो बँकेत शिरला. आय.डी. दाखवून त्याने कॅशियरची भेट घेतली. तिथे मिळालेली माहिती ऐकून त्याच्या चेहर्यावर हसू उमटलं.
****************
जेवणानंतर तासाभरात नीलकांत आणि शिंदे, नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधील निवृत्तीनंतर ठाण्यात स्थायिक झालेल्या विजय हिंगे या प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्टना जाऊन भेटले. त्यांनी ती नोट दाखवून त्यांचं मत घेतलं. दुपारी दोन वाजताची अपॉइंटमेंट घेऊन ते दोघे आणि बावधनकर, नानांना भेटायला त्यांच्या घरी गेले. सगळे बसल्यावर शिंदेंनी गावात कळलेली माहिती दिली आणि नीलकांतने बँकेतील घटना वर्णन केली, आणि अखेरीस खोट्या नोटेची शहानिशा सांगितली.
"Great policing! Very nice!", नाना म्हणाले, "निदान तीस लाखांच्या खोट्या नोटा बांगला देश-कलकत्ता-मार्गे आल्यात, आणि त्यात या काबरेचा महत्त्वाचा सहभाग स्पष्ट आहे. एक उघड आहे की गाडीवर जाहिरात केल्याच्या बदल्यात खोटी नोट देऊन काबरेने शिर्केलाही फ़सवलं आहे, ते त्याला कळलं म्हणून तो चिडला. आता तो आणि काबरे पुढे काय करतात ते पाहा."
********************
उरलेला मंगळवार शिंदे काबरेच्या पाळतीवर, तर नीलकांत शिर्केच्या मागावर राहिले. काबरे कोण आहे याचा मागोवा घेतल्यावर शिंद्यांना तो त्याच्या क्यू ४ ऑडी गाडीने आधी साईट ऑफिसकडून ठाण्याकडे गेलेला दिसला. तिथून संध्याकाळी तो पुण्याकडे निघालेला कळल्यावर त्यांनी आणखी एका सहकार्याला त्याच्या मागे पाठवलं. नीलकांतने शिर्केला नेहाच्या क्लिनिकला फॉलो केलं. तिथे तो मुनीरशी बोलत असताना नीलकांत मोटरसायकल कोपर्यावर थांबवून उभा होता. त्याचं लक्ष शिर्केकडे असताना अनपेक्षितपणे एक पोलीस व्हॅन त्याच्या मागे थांबली आणि आतल्या एका सब-इन्स्पेक्टर आणि हवालदाराने उतरून नीलकांतला सॅल्यूट केला. शिर्के आणि मुनीरने ते पाहिलं, आणि क्षणार्धात् दोघेही त्यांच्या दुचाकीवर स्वार होऊन पसार झाले. आपलं कव्हर उघडकीला आल्याचं नीलकांतच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
पुढचे दोन दिवस कायम पाळतीवर राहूनही शिर्के आणि मुनीर नेहाच्या वाटेला जाताना दिसले नाही. गुरुवारी दुपारी नेहा ठरल्या वेळी नागपूरला निघाली, पण तोवर शिर्के-मुनीर दुकलीने तिचा नाद सोडल्याचं आणि त्यांच्याकडून तिला धोका नसल्याचं स्पष्ट झालं होतं.
******************
शुक्रवारी दुपारी दोन वाजता नीलकांत बावधनकरांच्या केबिनमध्ये होता,
"सर, काबरेला फॉलो केलं होतं. तो खारघरला एका घरी जाऊन ज्या बाईला भेटला, तिचा नवरा फिरदोस दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात फरासखाना हद्दीत एका धाडीत सापडला होता. आता कलकत्ता पोलिसांच्या ताब्यात आहे. रात्री उशिरा फिरदोस आणि एक साथीदार रिक्षावाल्याला सुटे पैसे न देता पाचशेची नोट देऊन वादावादी करताना बीट पोलिसांनी पाहिलं, तर फिरदोस पळू लागला. पकडल्यावर त्याच्याकडे १८ हजारांवर काउंटरफिट नोटा सापडल्या. बांगला देश आणि बंगालमधून होणार्या ट्रॅफ़िकचा भाग वाटला, म्हणून NIA ती केस फॉलो करते आहे."
National investigation agencyने इंटरेस्ट घेतलाय म्हणजे प्रकरण साधं नसावं, हे बावधनकरांच्या चटकन लक्षात आलं. त्यांनी NIAच्या बारिया साहेबांना फ़ोन केला. त्यांनी NIAचा तपास पुण्यातल्या अटकेनंतर कलकत्त्याला जाऊन थबकला असल्याचं आणि पुढे लीड्स नसल्याचं सांगितलं. तेव्हा बावधनकरांनी त्यांना ठाण्यात आणि मुरबाडमध्ये मिळालेली माहिती दिली. पुढच्या तासाभरातच NIA, एस.आय.डी. आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत काबरे, शिर्के आणि त्यांचे इतर साथीदार जाळ्यात सापडले. संध्याकाळी खास विमानाने मुंबईत आलेल्या कमिशनर बारियांनी नानांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि ही केस सोडवण्यात महत्त्वाचा वाटा घेतल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
"And I loved what you told Mr. Bawdhankar! No point in biting it hot, ठंडा करके खाना ही सही था!" बारिया म्हणाले.
(चित्रे: आंतरजालावरून साभार)

वाचने
21476
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
आवडली
छान पण..
मस्तच!
In reply to मस्तच! by बोका-ए-आझम
Bokeravanshi sahamat
In reply to Bokeravanshi sahamat by प्रीत-मोहर
preemotaainshi sahamat
मस्त.
आवडेश
जबरदस्त!
भारी ! उत्कंठावर्धक !! आवडली!
एकदम खत्तरनाक जमलीय कथा.
बहुगुणी-स्टाईल रहस्यकथा...
मस्त
कथा आवडली.
In reply to कथा आवडली. by प्रभाकर पेठकर
माझ्यामते त्यांना नेहाला
कथा रोचक आहे...
कथा चांगली आहे पण मागील
मस्त मस्त मस्त
पोलीस कथा नेहमीच आवडतात.हि
In reply to पोलीस कथा नेहमीच आवडतात.हि by नूतन सावंत
+११
मस्त..
रोचक रहस्यकथा
मस्त कथा! अजून येउद्यात.
प्लॉट आवडला !
मस्त!
भारीच
कडक !