✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कट्यार आणि चाबकाचा वार

प
पिशी अबोली यांनी
Sat, 11/21/2015 - 12:20  ·  लेख
लेख
कट्यार बद्दल खूप काही वाचून, जुनं-नावं नाटक आणि त्यातील सगळे आदळलेले संदर्भ झेलून सिनेमा बघायला गेले. गेले, ती एकाच ओढीने, की हे सुवर्णयुग बघता आलं नाही, त्याचं नवं रूप तरी पाहू. पाहिला, आवडला, पण सगळ्या चर्चा, टीका या डोक्यात पिंगा घालत होत्या. पण त्याहीपलीकडे कुठेतरी हे वाटत होतं की फक्त जुनं नाटक, नवं नाटक आणि नवीन चित्रपट यापलीकडे जाऊन कुणी याचा फार विचार करत नाहीये. माध्यम कसंही आणि काहीही असलं, तरी ही कथा अगदी क्लासिक आहे आणि त्यातूनही कलावंताला स्पर्शून जाणारा अहंकार, आणि त्या अहंकाराचा त्याच्यातील कलाकाराशी होणारा लढा ही तर अगदी भौगोलिक मर्यादा ओलांडणारी आणि कालातीत अशी गोष्ट. त्यामुळे कट्यारच्या अनुभवाला माझ्या अन्य एखाद्या चित्रपटाच्या अनुभवाशी जोडायचा प्रयत्न आपसूक मनातल्या मनात झाला, आणि आठवला तो हल्लीच पाहिलेला व्हिपलॅश. आता या दोघांचा संबंध म्हणाल तर काहीच नाही. मुळात माझ्यासारख्या सामान्य, सांगीतिक ज्ञान नसलेल्या प्रेक्षकाला असे चित्रपट बघून त्यातल्या संगीताचा आनंद पूर्णतया लुटण्याइतकं काही कळत नाही. त्यात या दोघांचे संदर्भ वेगळे, कथेत काही साधर्म्य नाही, संगीत वेगळ्या प्रकारचं इ. इ. पण तरीही, कुठेतरी आपल्यातल्या मानवीपणाला कोणतीही कला हाक देतेच की.. समोर बसून ऐकणं, आणि नंतर आपल्या कामात बुडून जाणं हे या मानवीपणाचं लक्षण. पण कुठलाही कलाकार हा एक वेगळेपण घेऊन आलेला असतो. त्याला मी ‘दैवीपण’ म्हणणार नाही. कारण कलेला सर्व छटा आहेत, आणि त्यात काळ्या छटाही येतात हे मला या दोन्ही चित्रपटांमध्ये दिसलं. फार फार तर कलेला अमानवी म्हणेन मी. आणि त्या आपल्याला न झेपणाऱ्या अमानवीपणाचं अप्रूप, म्हणूनच आपल्याला कलेपेक्षाही कलावंताबद्दल कुतूहल जास्त असतं. आणि त्यातूनच तर कट्यारसारख्या अजरामर गोष्टी जन्म घेतात. आता आधीच काही डिस्क्लेमर्स. कट्यारला अजरामर म्हणतेय कारण त्याची टिकून असलेली जादू मला दिसतेय. व्हिपलॅशला म्हणत नाहीये, कारण मला अजरामरतेचे निकष स्वत:हून लावता येत नाहीत. या दोघांची थीम हा एकच मला दिसणारा आणि तोही अशक्त दुवा. पण म्हणून त्यांची सर्व बाबतीत तुलना करायचा मला मोह नाही, इच्छा नाही, आणि ते योग्यही नाही. दुसरं, मी नाटकाबद्दल खूप ऐकलेलं असलं तरी पाहिलाय फक्त चित्रपट. त्यातील सूडभावना मूळ नाटकात नाही असं सगळेच सांगतात, पण चित्रपटात ती अगदी ठळकपणे दिसते. त्यामुळे एका चित्रपट पाहिलेल्या व्यक्तीच्या नजरेतून हे पहा. मला संगीतातलं काही कळत नाही. माणूस असल्यामुळे माणूसपण कळतं आणि वाचलेलं आणि अशा चित्रपटांमध्ये बघितलेलं कलाकारांचं कलाकारपण. त्यावर लिहायचा प्रयत्न आहे. निरर्थक वाटल्यास तसं समजा. तर कट्यारबद्दल असंख्य चर्चा झालेल्या असल्याने त्याची कथा सगळ्यांना माहीत आहेच. व्हिपलॅश मागच्या ऑस्करला नामांकन मिळालेला एक लो बजेट चित्रपट. त्याच्या कथेबद्दल थोडंसं सांगणं मला अगत्याचं वाटतं. एन्ड्र्यू नीमन हा १९ वर्षीय ड्रमर आणि त्याचा अमानुष ट्रेनर फ्लेचर यांची ही कथा. शेफर कॉन्झर्वेटोरी या म्यूझिक स्कूलमधील फ्लेचरचा प्रतिष्ठित स्टुडियो बॅंड. या बॅंड मधे दाखल व्हायला धडपडणारे न्यूयॉर्कमधले सर्वोत्कृष्ट नवोदित वादक. नीमनचं ड्रम वाजवणं ऐकून फ्लेचर त्याला यात स्थान देतो आणि त्याचा कोर ड्रमर होण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेत कधी कोण वरचढ ठरेल सांगता येत नाही. आणि तुम्ही सर्वोत्कृष्ट असण्याच्या कणभर कमी असणं म्हणजे एकतर शिव्यांची लाखोली(जी तशीही अखंड चालू असतेच), मानसिक आणि शारीरिक छळ सहन करणं किंवा बाहेरचा रस्ता बघावा लागणं. यात गुरू-शिष्य दोघेही एकाच पात्रतेचे-चांगल्या आणि वाईट दोन्ही. लयीमधला, तालामधला किंचितसा फरकपण फ्लेचरच्या तुळतुळीत डोक्यावरच्या शिरा ताणतो आणि त्या फरकाचा अपमान वाटून नीमन हात रक्ताळेपर्यंत सराव करतो. या परफेक्शनच्या आग्रहाला कशामुळेच सूट नाही. मग त्यांच्यात येणारी फूट, सूडाचा प्रवास वगैरे होत शेवटच्या अविस्मरणीय सादरीकरणाकडे गाडी पोहोचते. पण या सरधोपट वाटणाऱ्या कथेनंतरही आपण समाधानी होत नाही, हे या चित्रपटाचं यश. सुखासमाधानाने म्हटलं तर संपणारी, म्हटलं तर न संपणारी ही कथा कलेचं कलाकाराशी होणारं अद्वैत आपल्यापर्यंत पोहोचवते. आणि ते न झेपणारं आहे. कट्यार पाहून ती कट्यार काळजात घुसवून आपण निघतो, तसंच या चाबकाचा वारही आपण झेलतो. म्हणून या दोन्हीबद्दल एकत्र काही लिहावंसं वाटलं. मुळात यांच्यातालं सारखेपण एवढंच, की या दोन्हीमध्ये सगळ्या मानवी मर्यादांवर मात करत शेवटी कला जिंकते. अपयशामुळे, अपराधीपणामुळे आलेली हताशाही दोन्ही ठिकाणी दिसते, आणि ती लपवण्यासाठी अजून आढ्यता, अजून सूडभावना हीसुद्धा दिसते. उगाच स्वप्नाळू कथेसारखं कुणी आपोआप सुधारत नाही. कट्यार चित्रपटाच्या क्लायमॅक्समधे अनेक संवादांमधून जे सांगितलंय त्यातलं बरंचसं व्हिपलॅशच्या क्लायमॅक्समधे ड्रम्स वाजतानाच्या नीमन आणि फ्लेचरच्या हावभावांमधून दिसतं. या सूडाचा प्रवास टिपेला पोहोचल्यावर अत्युत्कृष्ट कलेचा जन्म होतो. आणि ती कला खऱ्या कलाकाराला जागं करते. ती माणुसकीला जागवते हे काही मला पटत नाही. ती फक्त कलाकार जिवंत ठेवते आणि त्याच्या बाकी सगळ्या रूपांना तिलांजली दिली जाते. फ्लेचर आणि खांसाहेब याबाबतीत सारखे आहेत. फ्लेचर काही त्यांच्यासारखा ग्रेट कलाकार नाही, पण तो उत्कृष्ट कलाकार घडवतो, आणि त्याच्या तालमीत आलेल्या प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने आणि त्याच्याच पद्धतीनेच कला साकारायची मुभा आहे. खांसाहेबांचा सदाशिवने गाऊन त्यांच्या घराण्यापलीकडे जाऊ नये यासाठीचा थयथयाट आणि फ्लेचरची वैयक्तिक कारणासाठी का होईना, पण थंड डोक्याच्या सूडाची योजना मला एका जातकुळीची वाटली-कारण दोन्हीमध्ये एका कलाकाराला संपवण्याचा घाट घातलेला होता. या दोघांना कलेची कदर आहे, पण ती कदर करायचं दोघेही त्यांच्या सूडाच्या आंधळेपणात विसरून गेलेत. शेवटी त्यांच्यातला कलेची कदर असलेला कलाकार या सगळ्यावर मात करतो. पण ते त्यांना करायला भाग पाडणाऱ्याचं काय? नीमन आणि सदाशिव या सादरीकरणानंतरही तसेच राहतात? कदाचित नाही. जगण्या-मरण्याच्या सीमारेषेवरील या सादरीकरणानंतर सदाशिव सदाशिव म्हणून जगेल का त्याची कला म्हणून जगेल? त्या शेवटच्या प्रसंगातील खेचलेल्या संवादांनंतर मला याचं उत्तर मिळालं नाही, ते दाखवणं चित्रपटाचा उद्देशही नव्हता. पण नीमनकडे बघून त्याचा विचार करावासा वाटला. त्या सादरीकरणाच्या सुरूवातीला फ्लेचरला बघून त्याला त्वेषाने शिवी देणारा नीमन खांसाहेबांचा खून करायला निघालेल्या सदाशिवसारखाच. पण तो शेवटी फ्लेचरच्या इशाऱ्यावर वाजवतो आणि सदाशिव खांसाहेबांना गुरू मानू लागतो. आपापल्या भावनांवर मात करत हे दोघं त्या अवस्थेला पोहोचतात पण त्यानंतर काय? ही पातळी गाठल्यावर कदाचित त्याच धुंदीत राहणं हाच पर्याय त्यांच्यासमोर असेल. पुन्हा एक कलाकाराचं चिरंतन वेदनेचं आयुष्य. कलेपेक्षा कशालाही अधिक मोल न देणारं, जिवालाही. कट्यारच्या कथेचा उद्देश पूर्ण वेगळा आहे, अगदी मान्य. संगीत जाणणाऱ्यांना, नाटक पाहिलेल्यांना त्या कथेला अनेक पदर दिसत असतील. पण कुठेही असलेल्या कलाकारांचा आसमंतही सारखा आणि त्यात येणारे ढगही सारखे हे मात्र या दोघांच्या तुलनेतून मला जाणवलेलं आणि तरीही निसटलेलंसं वाटणारं काहीतरी..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
13302 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

फार छान लिहिलेय.

एस
Sat, 11/21/2015 - 12:25 नवीन
फार छान लिहिलेय.
  • Log in or register to post comments

अबोली जी अत्यंत सुंदर

मारवा
Sat, 11/21/2015 - 12:34 नवीन
अबोली जी एक तक्रार तुम्ही फारच कमी लिहीता. अजुन लिहीत जा प्लीज
  • Log in or register to post comments

विचारांत पाडणारं लेखन आहे.

आतिवास
Sat, 11/21/2015 - 12:45 नवीन
विचारांत पाडणारं लेखन आहे.
  • Log in or register to post comments

आधी व्हिपलॅश बघते!

अजया
Sat, 11/21/2015 - 13:01 नवीन
आधी व्हिपलॅश बघते! दोन कलाकृतींची अशी तुलना तूच करु जाणे! तुझ्या कमी लिहिण्याबाबत मारवाजींशी सहमत आहे!
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख!

पैसा
Sat, 11/21/2015 - 13:03 नवीन
खूप दिवसांनी असं काहीतरी दमदार वाचायला मिळालं. कलाकार अनेकदा काही धुंदीत जगत असतात. सामान्यांच्या जगापासून तुटल्यासारखे. कलेचा परीसस्पर्श त्यांची आयुष्य बदलून टाकतो. त्या कलेमुळेच अशा हेवादावा, सूड वगैरे सामान्यांच्या भावनांपलिकडे जाणे त्यांना सहज जमत असावे. जे यातून पार पडतात, ते अलौकिकाचे वारकरी होतात. ज्यांना जमत नाही ते मग सामान्याच्या पातळीवर रहातात किंवा कृत्रिम धुंदी शोधायला लागतात. राजकपूरबद्दल असां ऐकलं आहे की त्याचा सिनेमा निर्मितीला सुरुवात झाली की सिनेमा रिलीज होईपर्यंत तो दारूच्या थेंबाला स्पर्श करत नसे. पण सिनेमा रिलीज झाला, की नव्या सिनेमाची निर्मिती सुरू होईपर्यंत तो दारूत बुडून जायचा. एकदा कला सादर करण्यातली सर्वोच्च धुंदी अनुभवली की त्यावेगळे आयुष्य असह्य होत असावे का?
  • Log in or register to post comments

पैसा जी तुम्ही म्हणताय ते खरय

मारवा
Sat, 11/21/2015 - 13:39 नवीन
अस होत कारण कदाचित कलाकार त्याच्याजवळ जे बेस्ट असत ते "सत्व" तो कलेत पुर्णपणे ओतुन देत असतो. खरा कलावंत ते "सत्व" कलेत ओतुन टाकल्यानंतर मग निर्माण झालेल्या भयाण अर्थहीन पोकळीला भरण्यासाठी वरील प्रमाणे मार्ग अवलंबत असतो. निर्मीती ची ही दुसरी बाजु भयावहच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अप्रतिम...

विशाल कुलकर्णी
Sat, 11/21/2015 - 13:18 नवीन
अप्रतिम... अतिशय सुंदर लिहीलय ...
  • Log in or register to post comments

सुरेख. शेवटचे दोन चिंतनपर

यशोधरा
Sat, 11/21/2015 - 13:21 नवीन
सुरेख. शेवटचे दोन चिंतनपर परिच्छेद अतिशय आवडले. लिहित रहा.
  • Log in or register to post comments

वाह!

आदूबाळ
Sat, 11/21/2015 - 13:23 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलायस

कविता१९७८
Sat, 11/21/2015 - 13:34 नवीन
मस्त लिहीलायस
  • Log in or register to post comments

आताच सिनेमा पाहुन आले, अतिशय

कविता१९७८
Sat, 11/21/2015 - 20:59 नवीन
आताच सिनेमा पाहुन आले, अतिशय छान सिनेमा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

_/\_

रातराणी
Sat, 11/21/2015 - 13:37 नवीन
_/\_ शब्द न शब्द पोचला आत! अत्यंत सुरेख लेख!
  • Log in or register to post comments

सखोल

राही
Sat, 11/21/2015 - 13:53 नवीन
मानवी भावभावनांचा तळ गाठणे कठिण. त्यातून तो कलावंत, लेखक, असा कोणी निर्मितीक्षम माणूस असेल तर त्याची आंतरिक ऊर्जा वेगळ्या पातळीवर कार्य करीत असते. एकाच वेळी ती त्याला (जगण्याचे) बळही देत असते आणि त्याच वेळेला त्याला या निर्मितीप्रक्रियेत पार श्रान्त-क्लान्त करून टाकीत असते. असे हे एका बाजूने चैतन्यशील तर दुसर्‍या बाजूने दुबळे अस्तित्व यातले काही लोक जगत असतात. लेखातले चिंतन सखोल आणि विचारात करायला लावणारे आहे. या चित्रपटाविषयीच्या स्तुतीनिंदेच्या गदारोळात खूप वेगळे असे काही या लेखाच्या निमित्ताने वाचायला मिळाले. अभिनंदन आणि धन्यवाद. आपल्याकदून अधिक काही वचायला मिळण्याच्या अपेक्षेत.
  • Log in or register to post comments

हेच , अगदी हेच म्हणायचे होते.

शिव कन्या
Sat, 11/21/2015 - 14:19 नवीन
हेच , अगदी हेच म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

वा..

स्वाती दिनेश
Sat, 11/21/2015 - 14:07 नवीन
खूप छान लिहिलं आहेस. स्वाती
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिलं आहे !!! लिहित

पलाश
Sat, 11/21/2015 - 14:10 नवीन
सुंदर लिहिलं आहे !!! लिहित रहा. आम्हा मिपाकरांना असे नवीन आणि निखळ विचार वाचायला वरचेवर मिळत राहोत.
  • Log in or register to post comments

वा ! सुंदर लेख... तोही

उगा काहितरीच
Sat, 11/21/2015 - 14:12 नवीन
वा ! सुंदर लेख... तोही चित्रपट बघायला आवडेल .
  • Log in or register to post comments

पिशे मस्त लिहितेस , लिहित रहा

पियुशा
Sat, 11/21/2015 - 14:44 नवीन
पिशे मस्त लिहितेस , लिहित रहा:)
  • Log in or register to post comments

कलाकार कलेपेक्षा नेहमी श्रेष्ठ आहे

विवेक ठाकूर
Sat, 11/21/2015 - 14:50 नवीन
ही साधी गोष्ट लक्षात न आल्यानं लेखात मांडलेला गोंधळ नेहेमी होत राहाणार. जर कलाकारच नसेल तर कलानिर्मिती असंभव आहे. तद्वत, कलेचं सौंदर्य भावणं किंवा, फॉर दॅट मॅटर सौंदर्य, हाच व्यक्तिनिहाय बदलणारा दृष्टीकोन आहे. त्यामुळे कलाकार तल्लीन होणं हा कलेचा मुख्य उद्देश आहे. कलाकृती किती लोकप्रिय झाली हा नशिबाचा भाग आहे. आणि कलेला कलाकारापेक्षा मोठं समजणं म्हणजे कलाकारानं, स्वतःसाठी नाहक अस्वास्थ्य ओढवून घेणं आहे.
  • Log in or register to post comments

लेखन आवडले.

सस्नेह
Sat, 11/21/2015 - 15:01 नवीन
लेखन आवडले. बाकी दोन्ही संदर्भ पाहिले नसल्याने मत देत नाही.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख!

बोका-ए-आझम
Sat, 11/21/2015 - 15:42 नवीन
अहंकार हा कलाकाराला कलेच्या प्रांतातलं अत्युच्च शिखर गाठायला उद्युक्त करतो पण जो खरा कलाकार असतो त्याचा अहंकार त्या शिखरावर पोचल्यावर कलेच्या अथांगतेची जाणीव होऊन नष्ट होतो. अहंकार कला का मित्र है मगर कलाकार का दुष्मन है असं उस्ताद अमीरखांसाहेबांचं एक फार छान वाक्य आहे, त्याची आठवण झाली. बाकी लेख सुंदर. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

वाह, खरंच फार सुरेख लिहिलंय.

पद्मावति
Sat, 11/21/2015 - 15:51 नवीन
वाह, खरंच फार सुरेख लिहिलंय. लेख खूप आवडला.
  • Log in or register to post comments

खुप मस्त लिहिले आहेस

विशाखा राऊत
Sat, 11/21/2015 - 16:43 नवीन
खुप मस्त लिहिले आहेस
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार! प्रतिसादांमधून

पिशी अबोली
Sat, 11/21/2015 - 19:01 नवीन
सर्वांचे आभार! प्रतिसादांमधून हा विषय समृद्ध झाला. :)
  • Log in or register to post comments

सुरेख! शेवटचा भाग खासच! आता

विशाखा पाटील
Sat, 11/21/2015 - 20:27 नवीन
सुरेख! शेवटचा भाग खासच! आता दोन्ही चित्रपट बघावे लागतील. :)
  • Log in or register to post comments

फार सुरेख लिहिलयं!

स्वाती२
Sat, 11/21/2015 - 21:03 नवीन
फार सुरेख लिहिलयं! व्हिपलॅश नेटफ्लिक्स क्यू त टाकला. कट्यार चित्रपट कधी बघायला मिळेल माहित नाही, नाटक बघितले तेव्हा लहान होते.
  • Log in or register to post comments

मस्तच अप्रतिम

एक एकटा एकटाच
Sun, 11/22/2015 - 22:39 नवीन
मस्तच अप्रतिम
  • Log in or register to post comments

अप्रतिम

मित्रहो
Sun, 11/22/2015 - 23:31 नवीन
विचार करण्यासारखे मुद्दे आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन आवडलं. शेवटचा परिच्छेद

रेवती
Sun, 11/22/2015 - 23:52 नवीन
लेखन आवडलं. शेवटचा परिच्छेद जास्त आवडला.
  • Log in or register to post comments

एकदम दमदार लेखन! अता व्हिपलॅश

बॅटमॅन
Mon, 11/23/2015 - 12:24 नवीन
एकदम दमदार लेखन! अता व्हिपलॅश बघणे आले.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिहले आहेस पिशे.

इशा१२३
Mon, 11/23/2015 - 19:21 नवीन
अप्रतिम लिहले आहेस पिशे.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांना मन:पूर्वक

पिशी अबोली
Mon, 11/23/2015 - 19:21 नवीन
सर्व प्रतिसादकांना मन:पूर्वक धन्यवाद! मुद्दाम दोन्ही चित्रपट पहावेत असं वाटलेल्यानी नक्की पाहून आपले मत द्यावे. :)
  • Log in or register to post comments

लेखन आवडले. चित्रपट पाहण्याचा

विवेकपटाईत
Mon, 11/23/2015 - 19:50 नवीन
लेखन आवडले. चित्रपट पाहण्याचा विचार करतो आहे.
  • Log in or register to post comments

पिशे, काल मिपाकर विकासदादांनी

रेवती
Mon, 11/23/2015 - 19:51 नवीन
पिशे, काल मिपाकर विकासदादांनी कळवल्यामुळे आम्हीही इथे होणार्‍या कट्यारीची तिकिटे काढलीत. अजून २ अठवडे वाट पहायची आहे.
  • Log in or register to post comments

कुठे?

लंबूटांग
Tue, 11/24/2015 - 01:12 नवीन
कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरे देवा! तुला कळवायचे राहिले

रेवती
Tue, 11/24/2015 - 02:39 नवीन
अरे देवा! तुला कळवायचे राहिले की! स्वारी. अ‍ॅपल सिनेमा, दुपारी १ चा शो सोल्ड औट. सकाळी अकराचा शिल्लक असेल तर कृपया बघ, नाहीतर माझ्या नवर्‍याला फोन कर हापिसात. विकासदादांनी आम्हाला कळवले होते. दुसराही विकला गेला असेल तर तिसरा जाहीर करतायत का याची वाट बघ. आम्हालाही १ वा. ची मिळाली नाहीत. तुला कळवायचे विसरले. त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

अ‍ॅपल सिनेमा, केंब्रिज.

रेवती
Tue, 11/24/2015 - 02:41 नवीन
अ‍ॅपल सिनेमा, केंब्रिज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

खूप छान!!

पर्ण
Mon, 11/23/2015 - 20:24 नवीन
सुरेख लेख
  • Log in or register to post comments

मस्त लिहोलंय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/23/2015 - 20:30 नवीन
आवडलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कट्यार बघताना मी ही व्हिपलॅश

वगिश
Mon, 11/23/2015 - 21:12 नवीन
कट्यार बघताना मी ही व्हिपलॅश शी अजाणता तुलना केली. दोन्हीही कलाकृती अप्रतिम. आपले लिखाण आवडले.
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिलं आहेस पिशी.

मधुरा देशपांडे
Mon, 11/23/2015 - 21:32 नवीन
सुंदर लिहिलं आहेस पिशी.
  • Log in or register to post comments

धन्यवाद! :)

पिशी अबोली
Tue, 11/24/2015 - 12:20 नवीन
धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments

सुंदरच .

अद्द्या
Tue, 11/24/2015 - 12:26 नवीन
सुंदरच . मी कट्यार (सिनेमा ) आणि whiplash दोन्ही बघितलं नाहीये . पण तरीही लेख खूप आवडला
  • Log in or register to post comments

+१...

मुक्त विहारि
Tue, 11/24/2015 - 17:48 नवीन
सेम टू सेम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

सुंदरच लिहिलय्स. तोबताबड

प्रीत-मोहर
Tue, 11/24/2015 - 17:08 नवीन
सुंदरच लिहिलय्स. तोबताबड व्हिपलॅश डाउन्लोडायला घेते
  • Log in or register to post comments

सुरेख लेखन

दत्ता काळे
Tue, 11/24/2015 - 18:27 नवीन
मी कट्यार बघितला आहे, त्यामुळे लेख वाचताना कट्यार मधले प्रसंग आठवंत राहीले. फार सुन्दर लिहीलाय लेख.
  • Log in or register to post comments

व्हिपलॅश फार फार आवडला होता,

सानिकास्वप्निल
Wed, 11/25/2015 - 00:06 नवीन
व्हिपलॅश फार फार आवडला होता, कट्यार बघण्याचा मुहूर्त कधी लागेल माहित नाही. फार सुरेख लिहिले आहेस पिशी :)
  • Log in or register to post comments

मी हे कसं काय मिसलं????

स्रुजा
Tue, 12/15/2015 - 02:30 नवीन
मी हे कसं काय मिसलं???? आता व्हिपलॅश बघणे आले. पण खरंच या सगळ्या गदारोळात तुझा एक वेगळाच आणि फ्रेश दृष्टीकोण प्रचंड आवडला.. __/\__
  • Log in or register to post comments

+१ खुप छान..

Maharani
Tue, 12/15/2015 - 09:52 नवीन
+१ खुप छान..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

वेगळाच दृष्टिकोन आणि तुलना.

चतुरंग
Wed, 12/16/2015 - 07:45 नवीन
आवडली. व्हिपलॅश बघितला नाहीये परंतु आता नक्कीच आवडेल आणि हे लिहिलेले मनात येईल.. कट्यारबद्दल - मी वसंतरावांचे नाटक बघितले आहे. फारसा मोठा नव्हतो परंतु अजूनही त्यांचे खांसाहेब आठवतात. नाटकाची कथा सगळी आठवत नाहीये आता. घरी रेकॉर्डप्लेअर होता आणि बाबांना गाण्यांची आवड त्यामुळे बर्‍याच रेकॉर्ड्स होत्या. त्यात कट्यारचीही रेकॉर्ड होती त्यामुळे ही गाणी घरी वाजत असत. सिनेमाच्या कथानकात बरेच बदल केलेले आहेत हे जाणवते. मूळ नाटकातली काही गाणी काढून टाकली आहेत. उदा. या भवनातिल गीत पुराणे त्याजागी एक हिंदी गाणे घातले आहे. कव्वाली घातली आहे. सूडाचा प्रवासही जास्त टोकदार दाखवलाय. परंतु मलातरी ते आवडले. नवीन पिढीला फक्त आधीचीच गाणीच दाखवत राहिले कथेत थोडे नाट्य आणले नाही तर लोक तितकेसे आकर्षित होणार नाहीत. नव्याचा हात पकडून जुन्याचा धागा पुढे सोपवणे हे जास्त भावले. शंकर महादेवन, राहुल देशपांडे, महेश काळे, अरिजित सिंग, अर्शद मुहम्मद या सर्वांनी गाणी सुरेखच म्हटली आहेत. त्यात कुठे तडजोड नाहीये. फक्त गाणी अजून मोठी हवी होती असे वाटत राहिले...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा