✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जपान, जपानी आणि मी !....भाग ३

प
पद्मावति यांनी
Mon, 11/23/2015 - 19:28  ·  लेख
लेख
भाग १ भाग २ पुर्वी कधीतरी एक म्हण ऐकली होती की ज्या पुरुषाचे घर अमेरिकन आणि ज्याची बायको जपानी तो माणूस जगातला सर्वात सुखी माणूस आहे....अशा काहीशा अर्थाची... अशाच काही सुखी पुरुषांची घरं आमच्या आसपास होती. या जपानी पुरूष मंडळींचा थंडीतला सकाळी कामावर जाण्याचा सोहळा थोडाफार असा होता. ओहायोच्या उणे १२ डिग्री सेल्शीयस तापमान आणि बर्फाच्या चार फुटी ढीग जमलेला ड्राइववे साफ करण्यासाठी बायको भल्या पहाटे बाहेर पडणार. त्या हाडे गोठून जातील अशा थंडीत अर्धा पाऊण तास खपून साफसफाई केली की मग ही बाई गराज मधून रेफ्रिजिरेटर झालेली गाडी बाहेर काढणार. पंधरा वीस मिनिटे इग्निशन ऑन करून हीटर लावून ती गाडी छानपैकी गरम करणार. त्यानंतर तिचा नवरा थाटात बाहेर येणार आणि गाडीमधे बसून मठ्ठपणे निघून जाणार. असे हे सर्व सुखी नवरे....त्यांना बघून माझा नवरा फार फार दु:खी व्हायचा कारण त्याची बायको वरीलपैकी एकही गोष्ट करत नसे. सर्वसाधारण जपानी पुरूष हा अबोल असतो, गंभीर असतो. जरासा तुसडा आणि अतिशय अंतर्मुखी असतो. त्यांच्या या अंतर्मुखी आणि लाजाळू स्वभावामुळे हे लोक पटकन कोणाशी बोलायला, ओळख वाढवायला पाहत नाहीत. शिष्ठ वगैरे अजिबात नाही पण स्वत:च्या कोषात राहण्याच्या सवयीमुळे त्यांची प्रतिमा मात्र शिष्ठ, अकडू अशी होते. पुरूष पटकन कोणाशी आपण होऊन संभाषण करत नाहीत. एखाद्या स्त्रीशी तर नाहीच नाही. आपण ज्याला स्मॉल टॉक म्हणतो ते त्यांना अजिबात जमत नाही. त्यातून समोरची स्त्री परदेशी आणि इंग्रजी बोलणारी असेल तर अजुनच अवघडल्यासारखे वागतात. अजुन एक गोष्ट म्हणजे जपानी स्त्री असो वा पुरूष आय कॉंटॅक्ट कधीच करणार नाही. त्यांच्याशी बोलतांना किंवा सहज जरी यांच्याकडे आपण बघितलं कीं पटकन नजर झुकवतात. जपानमधे आम्ही राहात होतो तेव्हा आमच्या सोसायटीमधील पुरूष मंडळी मला पाहून फारच बीचकुन जायची.. मी समोरून येतांना दिसले रे दिसले की हे लोक अगदी अचानक एखादं प्रचंड महत्वाचं काम आठवल्यासारखा चेहरा करायचे, जेमतेम 'कोन्नीचिवा' असे पुटपुटायचे आणि मग अत्यंत घाई गडबडीत असल्याचा अभिनय करीत माझ्यासमोरून सुसाट वेगाने नाहीसे व्हायचे. पुढे अमेरिकेत आल्यावर मात्र या सर्वांशी छान ओळख झाली, त्यांनाही इंग्रजी बोलण्याचा बर्यापैकी सराव झाला आणि जपान मधे बुलेट ट्रेनच्या गतीने माझ्यासमोरून गायब होणार्या या लोकांची मग " पमिचान, प्रीज मेक स्पिनिच पाकोरा फोर मी...." असे मला सांगण्याइतपत प्रगती झाली. जपान मधले जपानी लोक आणि अमेरीकेत आलेले जपानी लोक या दोन भिन्न प्रवृत्ती आहेत. मूळ स्वभाव, विचारधारा तीच असली तरीही देशांतरामुळे त्यांच्या विचारांना, वागण्याला इथे नवीन पैलू पडायला लागायचे. अतीकाम, जागेची टंचाई, महागाई, ट्रॅफिक या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून की काय पण जपान मधे सर्व लोकांच्या चेहृयावर एक प्रकारचा ताण मला सतत जाणवायचा. अमेरिकेत आल्यावर चांगले आर्थिक स्थैर्य, मोकळी ऐसपैस जागा, अघळपगळ गप्पा मारणारे आमच्या गावातले स्थानिक लोक आणि घरापासून मोजून पाच मिनिटावर असलेला कारखाना या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून या लोकांमधे काही सुखद बदल व्हायला लागायचे. तोंडावर तणावाच्या ऐवजी हास्य, बोलण्यवागण्यात आलेला एक प्रकारचा मोकळेपणा पण त्याचबरोबर शरीराचं वाढलेलं वजनही..... कामात असतांना हे लोक जेवणाच्या सुट्टीत आपलं जेवण तीन ते चार मिनिटात आटपु शकतात. त्यांच्या जेवणाचा असा चपटा, चार पाच खण असलेला बेन्तो बॉक्स असतो. एका खणात भात, दुसर्यात फिश, तीसर्यात सलाड, मग एखादा अजुन मीटचा तुकडा, भाताचे गोळे, मुळा, काकडी यांचे वेनिगार मधे मुरलेले लोणचे..असे प्रकार आलटून पालटून असतात. मग चॉप्स्टीक्स वापरुन हे सगळे प्रकार पटापट उचलून तोंडात गडप होतात. बाकी सगळे प्रकार चॉप्स्टिक ने खाणे ठीक आहे पण भात सुद्धा त्या काड्यांनी हे लोक इतके मस्तं टपाटप खातात की पाहात राहावे. तो भात सुद्धा अगदी चिकट असतो. त्याचा पार गच्च गोळा होतो. आपले भारतीय पदार्थ त्यांना फार आवडायचे. खासकरून भजी, पकोडे, वडे असे तळलेले पदार्थ. माझ्याकडे हे लोक जेवायला येणार असतील तर स्वयपाकात तिखट मात्र अजिबात मी टाकत नसे. तिखट वगैरे त्यांना झेपतच नाही तसेच गोड पदार्थांचीसुद्धा आवड कमीच. दुधाचे पदार्थ, खीरी वगैरे नाही. बाकी पोळी, भाजी, राजमा, पनीर ग्रेवी, वेजी पुलाव असे पदार्थ मात्र फार आवडायचे.. पोळी तर काही मित्रांना इतकी आवडायची की जेवण झाल्यावर सुद्धा गप्पा मारता मारता अधून मधून एखादी पोळी गुंडाळून खात बसायचे. मी वरती म्हटल्याप्रमाणे हे लोक आपले जेवण चार मिनिटात संपवतात पण हेच लोक आरामशीर मूड मधे असले किंवा कुठे एकत्र डिनरला भेटले की मग पाच सहा तासांची निश्चिंती! सहाला या मंडळींना तुम्ही घरी बोलावलंत आणि दारावरची बेल वाजली की खुशाल समजावं की सहा वाजले. एक मिनिट लवकर नाही की उशीर नाही. लवकर आलेत तर घराबाहेर कारमधे बसून राहतील पण दारात उभे राहाणार सहाच्या ठोक्यालाच. मग मात्र निवांत. आधी आपेटाइज़र्स, हळूहळू जेवण, डिज़र्ट, मग परत एकदा भजींचा राउंड आणि या सगळ्याच्या साथीला सतत बियर किंवा वाइन. मद्य पीण्याची आत्यंतिक आवड असते या लोकांना. या लोकांची पिण्याची एक पध्ध्त सांगते. कुठे बाहेर गेलं की हे लोक स्वत:च्या हातांनी स्वत:चं ड्रिंक ओतून घेणार नाहीत. त्याच्या ग्लासमधे त्याचा एखादा मित्र ड्रिंक भरून देईल आणि हा त्या मित्राचा ग्लास भरून देईल. ग्लास थोडासा रिकामा झाला की समोरचा माणूस लगेच टॉप अप करणार की हा लगेच रेसिप्रोकेट करणार. पण एक गोष्ट आवर्जून सांगते. इतक्या वर्षांच्या सहवासात माझ्या आठवणीत एकदाही, एखाद्याने मद्य पीउन कोणाशी दु:वर्तन केलेय, वेडेवाकडे बोललेय इतकंच काय पण कोणाचा आवाजही चढलेला मी कधी ऐकला नाही. एक स्त्री म्हणून मला किंवा आमच्या ग्रूपमधल्या कुठल्याही स्त्रीला त्यांच्याबरोबर अवघडल्यासारखं होईल असे कोणी कधीही वागलं नाही. जपान या देशात श्रेणी पद्धती ज्याला आपण भाषेत hierarchy म्हणतो त्यावर लोकांची प्रचंड श्रद्धा. इतका पगडा की तिथे कार्यालयीन कामकाजासाठी टॅक्सीने कुठे बाहेर जावं लागलं तर कोण कुठे बसणार याचाही नियम असतो. तो असा की रॅंकनी सगळ्यात जो कमी तो पुढे ड्रायवरच्या शेजारच्या सीट वर. नंतर त्याच्या वरती ज्याची श्रेणी असेल तो बसणार ड्रायवरच्या मागच्या सीट वर आणि तिसरा जो यांचा बॉस असेल तो मागच्या सीटवर ड्रायवरच्या diagonally opposite.. तसेच स्टाफपैकी कोणाच्या लग्नकार्यात जायचे असल्यास आहेर करायलाही कंपनीतील पदानुसार नुसार चढती भाजणी. जरा सीनियर लेवलच्या माणसाला कमीतकमी चारशे/ पाचशे डॉलर्सचा फटका बसलाच म्हणून समजा. त्यामुळे तिकडे लग्नाचं आमंत्रण स्वीकारावं का नाही याच्यावर फार विचार करावा लागतो. श्रेणीमहात्म्य कसोशीने पाळणारे हे लोक कधी कधी मात्र अतिशय सुखद धक्का देतात. जपानमधे माझ्या मिस्टरांच्या कंपनीत एक फार छान पद्धत होती. ती अशी की कारखान्यात कोणीही मग तो साधा शॉप फ्लोरवर काम करणारा मशीन ऑपरेटर का असेना, तो सेवानिवृत्त होण्याच्या दिवशी. त्या प्लान्टचा मॅनेजिंग डिरेक्टर त्या माणसाला गाडीत बसवून स्वत: ड्राइव करीत पूर्ण प्लँट ची चक्कर मारायचा. ज्या कंपनीत उभं आयुष्य घालवलं त्या कंपनीची एक संपूर्ण फेरी मारायला, तिथल्या लोकांशी भेटायला, बोलायला या माणसाला कंपनीचा बिग बॉस स्वत: मोठ्या सन्मानाने घेऊन जायचा. मग एक छानशी भेटवस्तू देऊन त्या माणसाला निरोप देण्यात यायचा. ऑफिस मधे बॉस हा आपल्या पेक्षा वरच्या श्रेणीचा तर घरी बायको ही आपल्यापेक्षा कनिष्ठ श्रेणीची असा या लोकांचा अगदी प्रामाणिक विश्वास असतो. स्त्री पुरूष समानता वर निदान पोलिटिकली करेक्ट बोलावं की नाही? पण तेही नाही. मुळात त्यांना आपण काही चुकीचे करतोय असे वाटतच नाही. पण याचा अर्थ हे लोक दुष्ट असतात, बायकोचा छळ करतात असा अजिबात नाही. फक्त पुरुषप्रधान संस्कृतीच्या पगड्यानुसार आपल्या संसारात जबाबदारींची विभागणी कशी असावी याचा त्यांचा साधा स्वच्छ हिशोब असतो...' आय ब्रिंग दा मनी, शी टेक्स केआर ऑफ दा हाउस!' पण कधी कधी या पारंपरिक समीकरणांना जबरदस्त धक्का देणारेही लोक मला भेटले. अशा लोकांपैकी एक म्हणजे माझी खूप जिवाभावाची मैत्रीण हानोका मात्सुदा. ही मुलगी म्हणजे टिपिकल जपानी गृहिणिंचं आरशातलं प्रतिबिंब....त्यांच्या अगदी उलट स्वभाव!! खळखळून मोकळं हास्य, चेहृयावर असलेली रसरशीत तकाकी, लहान मुलाची उत्सुकता भरलेले लुकलुकते मिस्कील डोळे. तिचे डार्क, चटकदार इत्यादी जपानी मंडळींना घाबरेघुबरे करणारे रंगांचे कपडे याचबरोबर सुगरणपणा आणि ग्रुहक्रुत्यदक्षपणा अशा गोष्टींपासून तीने ठेवलेले सुरक्षित अंतर...अशी मस्तं मजेदार हानोका! जपानमधे आपली आर्थिक मालमत्ता, जमीनजुमला फक्त आपल्या फक्त पुरूष वारसदारांच्याच नावे करता येतो कारण त्यांचे आडनाव एकच. मुलींचे आडनाव अर्थातच लग्नानंतर बदलते. त्यामुळे ते एकदा बदलले की मुलीचा हक्क संपला. हानोका ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक लेक. मात्सुदा हे खरंतर त्यांचं आडनाव. आपल्या लग्नानंतर सर्व मालमत्ता सरकारच्या हाती जाण्यापेक्षा या बहाद्दर पोरीने आपल्या नवर्यालाच तिच्या माहेरचं आडनाव घ्यायला लावलं. तिचा नवरा फुमिओ हाशीराचा फुमिओ मात्सुदा झाला. जपानी लोकांना चारचौघांमधे उठून दिसायला किंवा काहीतरी हटके करायला मुळीच आवडत नाही. बरेच लोकं तर सनग्लासेस लावणं सुद्धा टाळतात ते यांच कारणामुळे. इतकंच काय पण हे लोक इतरांपेक्षा वेगळा विचार मांडायला, काहीतरी वेगळं बोलायलाही काचकूच करतात. पण 'आय दोन्त लिसन टू माय हाजबंद, ही लिसन्स टू मी, बीकोझ ही ईज़ अनडर माय फॅमिरी नेम '....अशी सनसनाटी विधानं करून उपस्थीत लोकांना दचकवून टाकणे हा हानोका मॅडमचा आवडीचा टाइमपास होता :) मग बाकी जपानी काकू लोकांचे तिच्या पाठीमागे "बघा..बघा..कसल्या मेल्या या टोकियोच्या मुली..न रितभात, न बोलण्याचं वळण. फॅशनेबल बाहुल्या नुसत्या. आमच्या क्युशुकडच्या मुली बघा. किती बाई सोज्वळ,सुगरण, कामाला वाघ"... वगैरे वगैरे असले टोमणे सुरू व्हायचे =)) क्रमश:

Book traversal links for जपान, जपानी आणि मी !....भाग ३

  • ‹ जपान, जपानी आणि मी !....भाग २
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज

प्रतिक्रिया द्या
13755 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

अगदी

मयुरMK
Mon, 11/23/2015 - 19:40 नवीन
अगदी जापान पाहून आल्यागत वाटल हो . :)
  • Log in or register to post comments

+१११११११११११११११११

बॅटमॅन
Mon, 11/23/2015 - 19:49 नवीन
अगदी असेच म्हणतो. एक नंबर रेख रिहिरा आहे तुम्ही पमिचान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरMK

काय सुंदर क्लास अनुभव आहेत.

मांत्रिक
Mon, 11/23/2015 - 19:45 नवीन
काय सुंदर क्लास अनुभव आहेत. अगदी झक्कास व्यक्तीचित्रण केलंयत जपानी माणसाचं. उत्तम निरीक्षण...
  • Log in or register to post comments

मस्त.

बिपिन कार्यकर्ते
Mon, 11/23/2015 - 19:47 नवीन
मस्त. हानिकावर होणार्‍या टिप्पण्या वाचून मला माझा एक इटालियन-अमेरिकन मित्र आठवला. त्याची ९४ वर्षांची आई एकटीच राहायची. म्हातारी होती पण एकदम ठणठणीत. ती तुझ्याबरोबर का राहात नाही म्हणल्यावर, 'तिचं आणि माझ्या बायकोचं फारसं पटत नाही. सासू-सुनांचं कसं वाजत राहातं ते तुला माहीतच असेल. तुमच्याकडेही असेलच तसं.' असं उत्तर दिलं त्याने. काही गोष्टी वैश्विक असतात असा साक्षात्कार झाला होता मला.
  • Log in or register to post comments

आश्चर्याचा धक्का बसला हे

रेवती
Mon, 11/23/2015 - 19:48 नवीन
आश्चर्याचा धक्का बसला हे वाचून! लेखन आवडले. मुलगा नसला की आपली मालमत्ता सरकारात द्यायची म्हणजे अजब कारभार वाटला. हे म्हणजे अगदी "काहीही हं जपान" असं म्हणावसं वाटतय.
  • Log in or register to post comments

क्या बात है! शेवटचा परिच्छेद

एस
Mon, 11/23/2015 - 19:48 नवीन
क्या बात है! शेवटचा परिच्छेद वाचून इथूनतिथून माणसं सारखीच असं वाटलं. आपल्या भारतीय सोप सीरिअल्स जपानमध्ये लोकप्रिय असणार बघा नक्की! ;-)
  • Log in or register to post comments

मस्त चाल्लिय लेखमाला. आवडतेय.

शलभ
Mon, 11/23/2015 - 19:49 नवीन
मस्त चाल्लिय लेखमाला. आवडतेय. पुलेशु. :)
  • Log in or register to post comments

वाह

बाबा योगिराज
Mon, 11/23/2015 - 19:49 नवीन
पम्मी चान हां भाग पण चान झाला हां.... पुलेशु. मस्त आवड्यास.
  • Log in or register to post comments

मस्तं चाललीय लेखमाला ! पुढचे

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/23/2015 - 20:10 नवीन
मस्तं चाललीय लेखमाला ! पुढचे भाग जरा लवकर लवकर टाका, पमीचान.
  • Log in or register to post comments

मस्त लेख

मित्रहो
Mon, 11/23/2015 - 20:29 नवीन
आपले भारतीय पदार्थ त्यांना फार आवडायचे. खासकरून भजी, पकोडे, वडे असे तळलेले पदार्थ
मला वाटत जपानी लोकांचा टेंपुरा हा पदार्थ सुद्धा आपल्या भज्यांच्या जवळपास जानारा आहे. कदाचित त्यामुळे त्यांना आवडत असावे.
  • Log in or register to post comments

मस्त

स्वाती दिनेश
Mon, 11/23/2015 - 20:46 नवीन
माझ्या जपानमधल्या दिवसांची तू पुनःपुन्हा आठवण करून देते आहेस, :) स्वाती
  • Log in or register to post comments

फारच आवडलं

श्रीरंग_जोशी
Mon, 11/23/2015 - 21:16 नवीन
जपानी मंडळींशी आजवर जवळून संबंध आला नाही. पण ही लेखमालिका त्याची कसर पुरेपूर भरून काढत आहे. हा भागही खूप आवडला. आता परदेशी माणसांच्या नजरेतून आपण भारतीय असं कुणी लिहिलं तर उत्तम.
  • Log in or register to post comments

बहुगुणींचा एक धागा अशा

रेवती
Tue, 11/24/2015 - 02:29 नवीन
बहुगुणींचा एक धागा अशा प्रकारचा आला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अत्यंत ओघवती लेखनशैली.

मधुरा देशपांडे
Mon, 11/23/2015 - 21:32 नवीन
अत्यंत ओघवती लेखनशैली. नेहमीप्रमाणेच छान जमलाय लेख.
  • Log in or register to post comments

पमिचान, तुझी मैत्रीण खूप

अजया
Mon, 11/23/2015 - 21:44 नवीन
पमिचान, तुझी मैत्रीण खूप आवडली.लेख नेहमीच आवडतो !
  • Log in or register to post comments

जपानी लोकांच्या जीवनाचे

Sanjay Uwach
Mon, 11/23/2015 - 23:01 नवीन
जपानी लोकांच्या जीवनाचे यथार्थ दर्शन, लेख फारच सुंदर, जपानी माणसाच्या स्वभाव ,सवयी,नियम यांचे थोडक्या शब्दात पुरेपुर वर्णन,
  • Log in or register to post comments

पमीचान मस्तच पण हानोका ही

प्रीत-मोहर
Mon, 11/23/2015 - 23:07 नवीन
पमीचान मस्तच पण हानोका ही आवडली
  • Log in or register to post comments

मस्त लेखमाला.छान चाललिये सफर.

इशा१२३
Mon, 11/23/2015 - 23:40 नवीन
मस्त लेखमाला.छान चाललिये सफर...हानोका भारिच.
  • Log in or register to post comments

हानोका मात्सुदा

ट्रेड मार्क
Tue, 11/24/2015 - 02:21 नवीन
हानोका मात्सुदा भारीच आहे. एवढ्या चालीरीती धरून वागणाऱ्या बाकी लोकांची मस्त फजिती करून मजा घेत असेल. खरंच जपान मध्ये जाउन आल्यासारखं वाटतंय. कधी जपानला जायला मिळालं किंवा जपानी लोकांबरोबर काम करायला लागलं तर ही लेखमाला खूपच उपयोगी आहे.
  • Log in or register to post comments

खूप आवडतंय लेखन ! तुझी माणसे

मितान
Tue, 11/24/2015 - 07:03 नवीन
खूप आवडतंय लेखन ! तुझी माणसे वाचण्याची पद्धत कमाल आहे !! :)
  • Log in or register to post comments

पमिचान चा लेख छान!

इडली डोसा
Tue, 11/24/2015 - 07:20 नवीन
जपानी लोकांच्या स्वभाव वैशिष्ठ्यांचं छान वर्णन आलं आहे.
  • Log in or register to post comments

वा!!! छान लिहिलेय!

दमामि
Tue, 11/24/2015 - 07:44 नवीन
वा!!! छान लिहिलेय!
  • Log in or register to post comments

किती छान लिहीता हो तुम्ही.

अर्धवटराव
Tue, 11/24/2015 - 08:36 नवीन
चित्रदर्शी का काय ते वाटतं तुमचं लेखन. जपान्यांनी एव्हढी प्रगती केवळ पुरुषी मेहनतीच्या बळावर केली कि काय ? शिवाय औट ऑफ बॉक्स विचारांना थारा न देणार्‍या जपानी मेंदुने इतकी प्रचंड व्यावसायीक प्रगती कशी केली असावी???
  • Log in or register to post comments

ओघवत्या लेखनशैलीमु़ळे वाचनीय.

प्रचेतस
Tue, 11/24/2015 - 09:02 नवीन
ओघवत्या लेखनशैलीमु़ळे वाचनीय.
  • Log in or register to post comments

मस्त..

पगला गजोधर
Tue, 11/24/2015 - 09:04 नवीन
मस्त आणि सुंदर लेखन ! आणखी लिहा…
  • Log in or register to post comments

छान लेख

हेमंत लाटकर
Tue, 11/24/2015 - 10:19 नवीन
छान लेख
  • Log in or register to post comments

छान लेख

हेमंत लाटकर
Tue, 11/24/2015 - 10:19 नवीन
छान लेख
  • Log in or register to post comments

जपान मधला वारसा हक्काचा नियम

प्रसाद१९७१
Tue, 11/24/2015 - 10:50 नवीन
जपान मधला वारसा हक्काचा नियम बघुन शॉक बसला. लिखाण सुंदरच.
  • Log in or register to post comments

@ पद्मावति,

अनिंद्य
Tue, 01/02/2018 - 16:09 नवीन
@ पद्मावति, सान-सान सोजी अहो-अहो ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम बियरचा महापूर आणि धूम्रपानाची अतिरेकी आवड 'र' चा 'ल' आणि 'ल' चा 'र' करीत इंग्रजी भाषेचा खून जपानी मुलींची 'को'कारांत नावं शिस्त, काटेकोरपणा, उपजत सौंदर्यदृष्टी आणि अफाट कष्ट उपसण्याची तयारी असलेल्या झापानीझ फॅमीरिस... फारच छान लिहिलेत तुम्ही पमीचान. जपानी मंडळींशी चांगलाच परिचय आहे, जपानला भेटी दिल्या आहेत त्यामुळे फार म्हणजे फार एन्जॉय केलं हे वाचतांना. ही मालिका पुढे लिहाच अशी आग्रही विनंती अनिंद्य
  • Log in or register to post comments

कसे काय मिसले हे लिखाण मी?

यशोधरा
Fri, 01/12/2018 - 22:52 नवीन
तीनही भाग वाचून काढले! मस्त! झक्कास! अजून लिही. पुढचे भाग कुठायत?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा