बरेच दिवस जायचं जायचं म्हणत ह्या महिन्यात अंबेजोगाईला जायचा योग आला. पुणे अंबेजोगाई प्रवासात नेहमीची वाट सोडून आडवाटेवरच ठिकाण म्हणून करमाळा बघायच ठरवल. पुण्याहून सोलापूर हायवेवर साधारण १०० किलोमीटर गेल्यावर भिगवणला फाटा लागतो तिथून ६० किलोमीटर वर करमाळा आहे. सोलापूर जिल्हातील एक तालुक्याचं ठिकाण असलेल करमाळा एक छोटस गाव आहे. सुरवातीच्या काळात बहामनी साम्राज्याचा भाग असलेले करमाळा नंतर नगरची निजामशाहिच्या अमलाखाली होते. निजामशाही सरदार रावरंभा निंबाळकरांची जहागीर असलेले करमाळा प्रसिद्ध आहे ते इथल्या कमला भवानी किंवा कमळजाइ मंदिरासाठी.
कमला भवानीच मंदिर गावाच्या बाहेरील ओसाड अश्या माळावर आहे. मंदिरच वैशिष्ट्य म्हणजे इथे चक्क दाक्षिणात्य शैलीशी मिळतीजुळती गोपुरे आपले मंदिर प्रांगणात स्वागत करतात. महाराष्ट्रातील खूप कमी मंदिरात अशी गोपुरे बघायला मिळतात. शैलीतील हा बदल खरतर पिढीतील बदलामुळे झालाय. मुख्य मंदिर बांधल (कदाचित जीर्णोद्धार केला) सरदार राजे रावरंभा ह्यांनी तर बाजूची तटबंदी आणि हि गोपुरे बांधली त्याच्या मुलानी म्हणजे राजे जनकोजीनि. जनकोजी दक्षिणेच्या स्वारीवर असताना तिकडची मंदिरे आणि भव्य गोपुरे पाहून प्रभावित झाला आणि त्यांनी तिकडचे कारागीर करमाळ्यात आणून सुंदर गोपूर बांधून घेतली.
मूळ मंदिर चारही बाजूनी भक्कम दगडी तटबंदीनी वेढलेले आहे. तटबंदीच्या आतील बाजूस सुंदर दगडी ओवऱ्या आहेत आणि पूर्ण अंगणाला दगडी फरसबंदी केली आहे. मंदिरा समोर होमकुंड आणि तीन गगनचुंबी दीपमाळा आहेत. मंदिराची शैली हेमाडपंथी आहे असा उल्लेख सगळीकडे असला तरी त्या शैलीची वैशिष्ट्ये ठळकपणे इथे पाहायला मिळत नाहीत जसे उंच जोते, मंदिराचा बाह्य आकार आणि त्यावरील नक्षीकाम इत्यादी ह्या मंदिरावर दिसत नाहीत. कदाचित हेमाडपंथी आणि इस्लामिक शैलीची सरमिसळ झाली असावी असे वाटते. दिपामालांचा प्रकार हि पारंपारिक मराठी नसून बराचसा इस्लामिक प्रभाव असलेला वाटतो. एक शक्यता अशी वाटते कि मुळ मंदिर हेमाडपंथी शैलीतील असावे आणि जीर्णोद्धार निजामशाही काळात झाला असल्याने हि शैलीतील सरमिसळ झाली असावी. अलीकडच्या काळातच सुंदर अशा दगडी मंदिराला ऑइल पेंट फासून त्याच्या सुंदरतेला दृष्ट लागणार नाही ह्याची काळजी देवस्थान trust नि घेतलेली दिसतीय.
मंदिराबद्दल आख्यायिका अशी सांगतात कि सरदार रावरंभा हा तुळजापूरच्या भवानी मातेचा निस्सीम भक्त होता वृद्धापकाळात त्याला तुळजापूरला दर्शनाला जाणे शक्य होईना म्हणून भवानीने त्याला दृष्टांत दिला कि मी तुझ्या मागे तुळजापुराहून करमाळ्याला येईन पण तू मागे वळून बघायचे नाही. रावरंभा गावाबाहेरील माळापर्यंत आला आणि त्याच्या मनात शंका आली. देवी खरच मागे येत आहे कि नाही हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले आणि देवी अंतर्धान पावली. त्याचठिकाणी हे मंदिर बांधले आहे. आता अशीच कथा मी मिरजेच्या अंबाबाई बद्दलहि ऐकली आहे, खरे खोटे ती भवानीच जाणे. कमला भवानी मातेची मूर्ती मात्र अतिसुंदर आहे.. काळ्याशार पाषाणातील हातात त्रिशूल आणि तलवार धारण केलेली अष्टभुजा मूर्ती डोळ्याचे पारणे फेडते. देवीच्या उजव्या डाव्या बाजूस शंकर व गणपतीची छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या अगदी समोरच एक शंकराचे अगदी छोटेसे पण सुंदर दगडी घुमटी सारखे देऊळ आहे आणि त्याच्या शेजारी कुणाची तरी समाधी. समाधीचा वापर सध्या गावकरी पत्त्यांचा फड लावण्यासाठी करतात. मंदिर परिसराच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ९६ पायऱ्यांची विहीर.
कातीव दगडात बांधलेल्या ह्या अष्टकोनी विहिरीत पाणी जवळपास ५० ते ६० फुट खोलवर असेल. पण पाण्यासाठी त्या खोलीपर्यंत बांधलेल्या एकसारख्या सुरेख ९६ पायऱ्या आहेत. पुरातन काळापासून पाणी पुरवठ्यासाठी बांधलेल्या अशा विहिरी (step wells) भारतभर पाहायला मिळतात. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे हि अगदी दक्षिण उत्तर अक्ष ठेऊन बांधली आहे. उत्तरेकडून पायर्या आणि दक्षिणेला विहीर. ह्या अक्षाचा फायदा म्हणजे सुर्यभ्रमण पूर्वेकडून पश्चिमेकडे होत असल्यामुळे, पाणी आणि पायऱ्या दिवसभर जास्तीजास्त वेळ सावलीत राहतात फक्त भरदुपारी १२ वाजण्याच्या आसपास पाण्यावर सूर्यकिरण पोहोचतात. त्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते आणि सावलीतील पायऱ्या वापरणेही सोयीचे होऊन जाते. भारतभर जवळपास सगळ्याच अशा विहिरी (step Wells) ह्याच संकल्पनेवर बनलेल्या दिसतात हे विशेष. आपल्या पूर्वजांचे वातावरणाला अनुकूल करून घेणारे design बघून थक्क व्हायला होते. अर्थातच आपण जशी अनेक पुरातन पाणवठा ची जशी वाट लावली आहे तशीच ह्या विहारीची देखील लावली आहे. पाणी उपसा नसल्यामुळे आणि कचरा टाकल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. जवळपास सगळीकडे गवत पसरले आहे आणि ह्या ऐतिहासिक ठेव्याशेजारीच ग्रामपंचायतीने महिलांसाठी असलेले पण बंद असणारे स्वच्छतागृह बांधले आहे.
इतक्या सुंदर मंदिर आणि परिसरात फिरल्यानंतर आम्ही निघालो अंबेजोगाई च्या दिशेने. रस्त्यातच आम्हाला मिळाला आणखी एक ऐतिहासिक ठेवा ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. किल्ले परांडा...
पण तो आता पुढच्या भागात....
क्रमशः
वाचने
11122
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
इस्लामिक शैलीचा प्रभाव स्पष्ट
मंदिराचे स्तंभ मला यादवकालीन
In reply to इस्लामिक शैलीचा प्रभाव स्पष्ट by एस
मुख्य मंदिराच्या बांधकामाची
In reply to मंदिराचे स्तंभ मला यादवकालीन by प्रचेतस
सुरेख छायाचित्रे
अमृत जी सोबत सहमत..
In reply to सुरेख छायाचित्रे by अमृत
वा! लेख आवडला. फोटो पण झकासच!
हे अगदी कधी न ऐकलेले ठिकाण.
हेच म्हणतो. लेख आवडला.
In reply to हे अगदी कधी न ऐकलेले ठिकाण. by बॅटमॅन
न ऐकलेले ठिकाण.
न ऐकलेले ठिकाण.
यकदम सही... किल्ला येऊदे लवकर
इ हमरा गांव बा!
वा
सुंदर लेख आणि फोटो. विहीर खास
वाचिंग
आणखी सांगायच राहिल म्हणजे
छान लेख.नवेच ठिकाण समजले.
सुंदर लेख!
छान माहितीपूर्ण लेख!
परांडा
लेख आवडला
In reply to परांडा by राही
आमच्या गावाकडं जावून आलात तर
९६ कुळी मंदिर
अप्रतिम माहिति आणी छायाचित्रे
+१
झिंगाट
अगदी हेच म्हणायला आले होते.
In reply to झिंगाट by राघवेंद्र
डायरेक्टर नागराज मंजुळे मुळचा
In reply to अगदी हेच म्हणायला आले होते. by रेवती
मस्त आहे करमाळा. मी जावून
वा मस्त
(No subject)
यमाई
यमाई/येडाई देवीचे मंदीर
In reply to यमाई by नमकिन