सानिकाची शाळेची तयारी चालू होती. सानिकाच्या आईला, म्हणजेच नेत्रालाही बॅंकेत वेळेवर पोहोचायचं होतं. आज बॅंकेत पूजा होती. "हेअर बॅंड लावलास का सानिका?" नेत्रा पर्समधला छोटा आरसा काढत ओरडली. एकीकडे नेत्रा आपले केस विंचरत होती. "हो आई, तूच तर लावलास." सानिका खोलीत येत म्हणाली. "एवढी वेणी घातलीय आज, पण फूल नाहीये माळायला. जाऊ दे, आता कोण बघतंय! आम्हाला तसंही कोण फुलं आणून देतं?" नेत्रा स्वत:शीच पुटपुटत होती. "सानिका, चल बूट घाल. स्टॉपवर वेळेत पोहोचलो नाही, तर बसही जाईल" म्हणत नेत्राने आरसा पर्समध्ये टाकला आणि पर्स उचलली.
स्कूलबसच्या स्टॉपवर नेत्राने सानिकाला उतरवलं. सोबत तिच्या दोन मैत्रिणीही होत्या. "मी जाऊ मग सानू? जाशील नं नीट?" नेत्राने विचारलं. "हो!" मैत्रिणीशी गप्पा मारता मारताच सानिका म्हणाली. नेत्रा निघून गेली. स्टॉपपासून काही पावलांच्या अंतरावर एक लहान मुलगी टोपलीत भरून गुलाबाची फुलं विकत होती. तिथे एक स्कूटर येऊन थांबली. "कितनेका दिया?" "दस का एक साब" "पाच का एक देती है तो दे" हो-नाही करत त्या स्कूटरवरून आलेल्या माणसाने दोन गुलाब विकत घेतले. "साब, वो दिखाओ ना" स्कूटरच्या आरशाकडे बोट करत ती मुलगी म्हणाली. "तुम्हे क्या करना है?" असं तुसडेपणाने म्हणत तो माणूस चालता झाला. सानिका हे सगळं बघत होती. इतक्यात स्कूलबस आली आणि स्टॉपवरची बच्चे कंपनी शाळेकडे रवाना झाली.
अगदी नेहमीसारखाच तो दिवस गेला. दुसरा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे बाबा लवकर ऑफिसला निघून गेलेले. सानिकाची शाळेत जायची तयारी, नेत्राची बॅंकेत जायची लगबग चालू होती. "तुझं दूध गरम करतेय मी. अवरून झालं की नीट प्यायचंय सगळं हं" नेत्राने सानिकाला बजावलं. नेत्रा स्वयंपाकघरात गेली. सानिकाने हेअर बॅंड लावला आणि काही गोष्टींचं तिच्या डोक्यात चालू असलेलं कसलंतरी चक्र वेगात फिरलं. नेत्रा खोलीत येताच सानिका म्हणाली "आई, तुझा हा आरसा मी घेऊ?" "कशाला??" नेत्राने जरा त्रासतच विचारलं. सानिकाने उत्तर दिलं, "अगं खेळून झालं मधल्या सुट्टीत की केस विस्कटतात ना.. मग बघायला." "हो का?" नेत्राने प्रश्न केला, "पण बाई ओरडल्या तर?" "नाही गं ओरडणार" सानिका म्हणाली. "बरं, चल घे. आटप आता." नेत्राची नेहमीप्रमाणेच घाईगडबड चालू होती.
सानिकाने तो आरसा फ्रॉकच्या खिशात घातला. तिला स्टॉपवर सोडून नेत्रा गेल्यावर सानिका त्या मुलीजवळ गेली. तिने खिशातून तो आरसा काढला. तिला म्हणाली, "हे घे". त्या मुलीला काही कळेना. ते कळून घ्यायची इच्छाही तिला नव्हती. तिने तो आरसा सानिकाच्या हातातून घेतला आणि आपला चेहरा त्यात बघू लागली. तिच्या चेहर्यावर आनंद, आश्चर्य, तेज सगळं एकवटून आलं होतं. तिची तंद्री मोडत सानिका म्हणाली "मला एक गुलाब देशील?" दोन मिनिटं टोपली आणि सानिकाकडे आलटून पालटून बघितल्यावर ती मुलगी "घे हवी तेवढी" असं म्हणून पुन्हा आरशात बघायला लागली. सानिकाने एक फूल उचललं आणि दप्तरात टाकलं.
संध्याकाळी घरी नेत्रा खोलीत काहीतरी आवरत होती. ती नुकतीच ऑफिसातून आली होती. सानिका खोलीत आली आणि तिने नेत्राला हात लावून हाक मारली. "आई, आई..." "ओ!..." नेत्रा न बघताच म्हणाली. "इकडे बघ ना" "काय सानू... नंतर बोलू ना, आत्ताच आलेय गं मी.." सानिका म्हणाली. "हे बघ मी तुला फूल आणलंय. तुला हवं होतं ना...." सानिकाने गुलाबाचं फूल पुढे केलं. नेत्राला काही क्षण काय बोलावं कळलं नाही, तिने ते फूल केसात माळलं आणि सानिकाला जवळ घेतलं. नेत्राचा चेहरा उजळला होता.
कुणाच्या हातात आरसा होता आणि चेहर्यावर हसू; कुणाच्या केसात फूल होतं आणि चेहर्यावर हसू; आणि कुणाच्या डोळ्यात आपण एका कृतीतून या दोन चेहर्यांवर हसू आणलं याचं समाधान होतं आणि चेहर्यावर हसू!
-----------------------------
(चित्रः नीलमोहर)
आटोपशीर पण एक महत्त्वाचा संदेश देणारी कथा. समाजातील दोन वर्ग एकमेकांपासून एव्हढे दूर दूर का असतात? कधी जवळकीचा विचार डोक्यात आला तरी हातून पटकन कृती होत नाही. संकोच का वाटतो? शहरात राहून मोठे होता होता आपण आपल्यातली 'मुलांची निरागसता' हरवून बसलो आहोत ही अत्यंत दु:खाची गोष्ट आहे.
मस्त कथा
निरागस कथा!
निरागसता....
In reply to निरागसता.... by प्रभाकर पेठकर
+१
फारच गोड कथा. खूप आवडली.
गोड निरागस कथा. आवडली.
साधीसरळ कथा आवडली!
कथा आणि चित्र दोन्ही छान.
सुरेखच
गोड कथा. चित्रही आवडले.
छान कथा.
गोड गोष्ट!
कथा आणि त्याला साजेसं चित्र
कथा आणि चित्र
छान
मस्त
सर्व वाचक व प्रतिसादकांचे
सुरेख कथा
वा,
मस्त. आवडली :)
सुंदर!!
मस्त ....
छान,निरागस कथा!
धन्यवाद
आवडली
:)
आवडली.
साधी सोबर कथा पण किती मोलाचा