Skip to main content

WhatsApp आणि फालतू ढकलसंदेश

लेखक लंबूटांग यांनी मंगळवार, 03/11/2015 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या WhatsApp मुळे कैक जुन्या मित्र नातेवाईकांशी संपर्कात राहणे अतिशय सोपे झालेले आहे. पण ह्याचबरोबर तेथे प्रचंड ढकलनिरोप येत असतात जे बरेचदा मला अस्वस्थ करतात. बरं ते कोणाकडून येतात तर रूढार्थाने सुशिक्षीत लोकांकडून. जरा सारासार विचार केला तर या संदेशाताला फोलपणा उघड होतो पण जराही सारासार न विचार करता दे दणादण संदेश forward केले जातात. अशाच काही संदेशांचा पर्दाफार्श करण्यासाठी हा धागा. सुरुवात मीच करतो. काही दिवसांपूर्वी मला आलेला हा संदेश.
लेख मोठा आहे.पण सर्वांनी वाचावेच असे काही..... अवश्य वाचाच !!! गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली? (ले० श्री. मिलिंद शेटे, पूर्वप्रसिद्धी : सांस्कृतिक वार्तापत्र) गोहत्या बंदी हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. 'स्वदेशी आंदोलन' हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे. (एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या विरुद्ध डॉ. राजीव दीक्षित ह्यांनी गोहत्येच्या विरोधात सर्वौच्च न्यायालयातील जिंकलेल्या दाव्याची ही माहिती तुम्हाला उद्बोधक वाटेल. – प्रा० मनोहर राईलकर) आपल्या देशाच्या शेतीच्या दृष्टीनं, जमिनीचा कस सुधारण्याकरता, राष्ट्रीय इंधनाची बचत करण्याकरता, प्रदूषण कमी करण्याकरता, स्वस्त औषधांकरता, अशा विविध कामाकरता गोवधबंदी आवश्यक आहे. त्या मागणीचा हिंदु किंवा मुसलमान धर्मांशी काडीचाही संबंध नाही. पण, हिंदूंच्या गटाकडून आलेली मागणी म्हणजे ती जातीय तरी असणार, नाही तर अंधश्रद्धेवर आधारित असणार, नाही तर तिच्या मागं काही तरी छुपा राजकीय कार्यक्रम असणार, अशी आवई उठवायची. आणि उलटसुलट वेडीवाकडी चर्चा घडवून गोंधळ उत्पन्न करायचा अशी प्रथा गेली काही वर्षं आपल्या राजकारण्यांनी पाडली आहे. कोणाचं वाक्य आहे, मला आठवत नाही. पण, बहुधा नेपोलियनचं असावं. If you can’t convince, confuse. लोकांना पटवून देता येत नसेल तर त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ उडवून द्या. मला त्यातल्या राजकारणाशी काडीचंही कर्तव्य नाही. पण, डॉ. राजीव दीक्षित यांच्यासारख्या एका अभियंत्यांनी तो कसा आणि कोणत्या आधारांवर लढवून अंती जिंकला, हे आपल्याला माहीत झालं तर बरीच अज्ञात किंवा दडवून ठेवलेली वस्तुस्थिती तुम्हालाही कळेल असं मात्र, निश्चितपणं वाटलं. हा लेख प्रथम गाय और गाँवच्या नोव्हेंबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. कै.श्री. राजीव दीक्षित इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार (Telecommunication), आणि उपग्रहसंचार (Satellite communication), अशा तीन विषयांतील अभियंता होते. यू-ट्यूबवर त्यांची विविध भाषणं ऐकता येतील. त्यांनी प्रस्तुत दावा कसा जिंकला हे समजून घेणं बोधप्रद ठरेल. काही प्राथमिक माहिती: ज्यांना गाय कापण्याचा परवाना आहे, असे भारतात ३,६०० कत्तलखाने आहेत. त्यापलीकडे आणखी ३६,००० कत्तलखाने अवैधरीत्या चालवले जात असतात. (हे आकडे जुने आहे. यांत आता बरीच वाढ झाली आहे.) ह्या सर्वांतून प्रतिवर्षी सरासरीने अडीच कोटी गाईंची कत्तल केली जाते. ते सहन न झाल्याने दीक्षित व त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी १९९८मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. वर्धा येथील अखिल भारतीय गोसेवक संघ व अहिंसा आर्मी ट्रस्ट ह्या संस्थांनी हा दावा दाखल केला होता. नंतर त्यात गुजरात सरकारही सहभागी झाले. १-२ न्यायाधीशांसमोर चालवण्याइतका प्रस्तुत प्रश्न किरकोळ अथवा सामान्य नसल्यामुळे तो खंडपीठासमोर चालवावा असा दीक्षितांचा आग्रह होता. त्याला तीनचार वर्षे न्यायालयाने मान्यता दिली नव्हती. आणि नंतर मान्यता दिली. आणि सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांचे घटनापीठ(कॉन्स्टिट्यूशनल) बनवण्यात आले. कसायांच्या बाजूने दावा लढवण्याकरता लक्षावधींचं शुल्क घेणारे नामवंत अधिवक्ते उभे होते., सोली सोराबजी २० लक्ष, कपिल सिब्बल २२ लक्ष, महेश जेठमलानी (राम जेठमलानींचे पुत्र) ३२ ते ३४ लक्ष. हे कसायांच्या बाजूने उभे होते. राजीव दीक्षितांच्या बाजूने दावा लढवण्याकरता एकही मोठा अधिवक्ता नव्हता. कारण त्यांचे शुल्क देण्याइतका पैसा त्यांच्याकडे नव्हता. दीक्षितांनी न्यायाधीशांना विचारले, “आमच्याकडे कोणीही अधिवक्ता नाही, आम्ही काय करावे ते सांगावे.” न्यायाधीशांनी विचारले, “आम्ही आपल्याला अधिवक्ता पुरवला तर?” दीक्षित म्हणाले, “मोठेच उपकार होतील.” त्याप्रमाणे न्यायालयाने मान्यता दिली आणि दाव्याला सुरुवात झाली. गाय कापण्याबद्दल कसायांनी जे प्रतिपादन केले ते सर्व विचार पूर्वी शरद पवारांनीही मांडले होते. ते काही विद्याविभूषितांद्वारे आणि पं. नेहरूंद्वारेही सांगण्यात आले होते. कसायांचे दावे (१) गाय जेव्हा म्हातारी होते, तेव्हा तिला जिवंत ठेवण्यात काही लाभ नसतो. तिला कापून विकणे हे सर्वांत उत्तम. त्यातून आम्ही भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याला सहकार्यच करतो. कारण. आम्ही गोमांस निर्यात करतो. (२) भारतात चाऱ्याची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना मारून विकणे हेच सर्वांत लाभदायक होय. (३) भारतात लोकांना राहायला जागा नाही. तर गायींना कुठे ठेवणार? (४) गायींमुळं परकीय चलनही मिळते. (५) कसायांनी केलेला सर्वांत भयानक दावा असा होता, “गायीची हत्या करावी, असे आमच्या इस्लाम धर्मात सांगितले आहे.” दीक्षितांनी शांतपणे, धैर्याने व अत्यंत तर्कशुद्ध रीतीने त्यांचे दावे कसे खोडून काढले, ते जाणून घ्यावे. आपण आर्थिक दृष्टीनं विचार करीत आहोत. तेव्हा शक्य असल्यास मधून मधून काही टिपणं केली तर तुम्हाला नेमकी कल्पना येईल. त्यांचा पहिला दावा होता गायीचे मांस विकल्यावर पैसे मिळतात. दीक्षितांनी सर्व आकडेवारी 7न्यायालयापुढं ठेवली. एका सुदृढ गायीचे वजन तीनसाडेतीन क्विंटल असते. पण, ती कापल्यावर केवळ ७० किलोच मांस मिळते. एक किलो गोमांस जेव्हा निर्यात होते, तेव्हा रु. ५० मिळतात. म्हणजे रु. ३,५००. रक्त २५ लीटर, त्याचे १,५०० ते २,००० आणि हाडांचे १,००० ते १,२०० रुपये मिळतात.म्हणजे गाय मारून तिचे मांस, रक्त आणि हाडे विकून हत्या करणाऱ्या कसायाला अधिकतम केवळ ७,००० रुपयेच मिळतील. (आणि हे आकडे सुदृढ गायींच्या संबंधातले आहेत. म्हाताऱ्या गायींपासून इतकं उत्पन्न मिळत नाही.) पण, तिला जिवंत ठेवलं तर किती रुपये मिळतील? आता त्याची आकडेवारी पाहा…. एक गाय दिवसाला १० किलो शेण व ३ लीटर गोमूत्र देते. १ किलो शेणापासून ३३ किलो खत होते. त्याला सेंद्रिय खत म्हणतात. न्यायाधीशांना आश्चर्याने विचारले, “हे कसे शक्य आहे?” त्यावर दीक्षित म्हणाले, “आम्हाला वेळ द्या आणि जागा द्या. आम्ही हे सिद्ध करून दाखवतो.” न्यायालयाने अनुमती दिल्यावर दीक्षितांनी आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवलं. ते न्यायाधीशांना म्हणाले, “आता आय.आर.सी. च्या संशोधकांना पाचारण करून शेणाचं परीक्षण करून घ्या.” जेव्हा शेण संशोधनाकरता पाठवले, तेव्हा संशोधकांनी सांगितले, “ह्यात १८ प्रकारची पोषक सूक्ष्मतत्त्वे (micronutrients) आहेत. त्या सर्वांचीच सर्व शेतजमिनींना अत्यंत आवश्यकता असते. उदा. मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, कोबाल्ट, सिलिकॉन, इत्यादी.” ह्याउलट रासायनिक खतांत केवळ तीनच पोषक तत्त्वे असू शकतात. याचा अर्थ शेणखत रासायनिक खताच्या सहापट शक्तिशाली आहे. न्यायालयाने ते मान्य केले. दीक्षित म्हणाले, “माझे वडील आणि दोघे भाऊ शेतकरी आहेत. १५ वर्षांपासून आम्ही गायीच्या शेणापासून खत करून शेती करतो. १ किलो शेणापासून ३३ किलो खत बनते. रोजच्या १० किलो शेणापासून ३३० किलो. (म्हणजे महिन्याचे १ टन) आणि ६ रुपये किलोप्रमाणे १८०० ते १९०० रुपयांचे खत प्रतिदिन मिळेल. म्हणजे वर्षाचे रु. ७०,०००च्या वर झाले. गायीचे आयुष्य २० वर्षांचे मानले तर एक गाय आयुष्यात एक कोटी ४० लक्षांच्यावर उत्पन्न देते. विशेष म्हणजे ती मृत्यूपर्यंत, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शेण देत राहते.” सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रांत लिहून ठेवले आहे की गायीच्या शेणात लक्ष्मी आहे. आधुनिक शिक्षण घेतलेल्या मेकॉलेच्या मानसपुत्रांनी ह्या गोष्टीची टवाळी केली. त्यांना धर्म, संस्कृती, सभ्यता सर्व थोतांड वाटते. पण गायीच्या शेणात लक्ष्मी असते, हे तर वरच्या आकडेमोडीनं सिद्धच झाले आहे. त्याच्या उपयोगानं धान्य निर्माण होते. संपूर्ण भारताचे पोट त्यातून भरते. आता गोमूत्राचा विचार करू. दिवसाला दोन ते तीन लीटर गोमूत्र मिळते. गोमूत्रापासून ४८ प्रकारच्या रोगांवर औषध बनते. एक लीटर गोमूत्र औषध रूपात विकले तर त्याची किंमत रु. ५०० होते. भारतीय बाजारपेठेत, आंतरराष्ट्रीय बाजारात ह्यापेक्षा अधिक भाव मिळतो. अमेरिका भारतातून गोमूत्र आयात करते आणि त्यापासून मधुमेहावर औषध बनवते. अमेरिकेत गोमूत्राची तीन पेटंटे आहेत. अमेरिकन बाजारपेठेच्या हिशेबाने आकडेमोड केली तर त्याचा दर लीटरला डॉ. १२००, ते १३०० आहे. याचा अर्थ एका गायीपासून प्रतिवर्षी ११,००.००० (११ लक्ष) रुपये मिळतात. म्हणजे २० वर्षांच्या आयुष्यात २,२०,००,००० (दोन कोटी वीस लक्ष रुपये) झाले. पुन्हा गायीच्या शेणापासून मिथेन गॅस बनतो. आपल्या घरगुती सिलिंडरांत तोच असतो. आणि जशी एलपीजीवर चारचाकी गाडी चालू शकते, तशी ह्या गॅसवरही चालू शकते. न्यायाधीशांचा त्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दीक्षित म्हणाले, “आपल्या गाडीला आम्ही शेणापासून बनवलेल्या मिथेनचा सिलिंडर बसवून देतो. आपण गाडी चालवूनच पाहा ना.” त्यांनी मान्यता दिली. आणि तीन महिने गाडी चालवली. आणि म्हणाले, एक्सलंट. कारण, त्यांना प्रतिकिलोमीटर केवळ ५० ते ६० पैसे इतकाच खर्च पडला. आणि डिझेलला प्रति किलोमीटर ४ रुपये खर्च (म्हणजे सातपट) येतो. आणखी, मिथेनवर चालणाऱ्या गाडीचा धूर नाही, वातावरणात शिसे पसरत नाही, आवाजही कमी होतो. ह्या सगळ्याच बाबी न्यायाधीशमहाराजांच्या लक्षात आल्या. मग दीक्षित म्हणाले, “प्रतिदिन १० किलो शेणापासून २० वर्षांत किती गॅस मिळेल?” भारतात १७ कोटी गाई आहेत. त्यांचे शेण एकत्र केले तर देशाची १लाख ३२ सहस्र कोटींची बचत होईल. आणि थेंबभरसुद्धा, डिझेल किंवा पेट्रोल आयात केल्याविना देशाची संपूर्ण वाहतूक होऊ शकेल. तीही सातव्या हिश्श्यानं स्वस्त. अरब देशांसमोर हात पसरायची आवश्यकताच राहणार नाही, की अमेरिकी डॉलर देऊन पेट्रोल विकत घ्यावं लागणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य वाढेल.
धर्म आणि श्रद्धा बाबतचा मुद्दा बाजूला ठेवू. सर्वात पहिले ही कोर्टकेस खरी होती की नाही. कोणाच्याही नावावर काहीही खपवायचे. पण खरी होती असे मानून चालू.
  • ह्या म्हाताऱ्या गायींना खायला देणे व इतर देखभालीच्या खर्चाचे काय?
  • हाच पैसा तरण्या गायीना पोसण्यासाठी वापरला तर त्याही शेण आणि गोमुत्र पैदा करतीलच की. शेणाबरोबरच बाकीचेही फायदे देत असतील (दूध वगैरे) तर त्यांना पोसणे जास्ती फायद्याचे नाही का?
  • जर एवढा पैसा फक्त शेणखतातून मिळत असेल तर मग शेतकरी इतके गरीब लोक कसे? शेतकरी नुसते शेण विकूनच आरामात बसून खातील की. आत्महत्या कशाला करतील?
  • कोणतीही पेट्रोल वर चालणारी गाडी मिथेन वर चालवणे सहज शक्य नाही. त्यासाठी जे conversion kit लागेल त्याचा खर्च ह्यात धरलेला नाही. तसेच मिथेन refilling stations कुठे आहेत? तेथपर्यंत हा मिथेन gas नेणार कसा. त्याला लागणारे infrastructure उभारण्यासाठीच्या खर्चाचे काय? त्यामुळे देशाची पेट्रोल डिझेल ची गरज संपेल वगैरे हास्यास्पद दावे आहेत.
Disclaimer : मी गोहत्याबंदीचा समर्थक अथवा विरोधक आहे म्हणून वरील उहापोह केला नसून एक फोल Hypothesis चे उदाहरण म्हणून वरील संदेश उद्धृत केला आहे.

वाचने 17009
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

अहो व्हॉट्सअ‍ॅपवरील विद्वानांच्या मते भारताला इंडिया म्हणतात याचे कारणे INDIA म्हणजे "Independent Nation Declared In August" . म्हणजे भारताला १५ ऑगस्ट ऐवजी जुलैमध्ये स्वातंत्र्य मिळाले असते तर इंडिया ऐवजी इंडिज म्हटले असते तर!! आणि इस्ट इंडिया कंपनी भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी फक्त ३४७ वर्षे जन्माला आली आणि ८९ वर्षे आधी लयालाही गेली त्यात इंडिया हा शब्द कसा आला असले फालतू प्रश्न या विद्वानांना कधीच पडत नाहीत.

In reply to by प्यारे१

डोक्याला शॉट ! म्हणे Independent Nation Declared In August . काहीच्या काही मेसेजेस प्रचंड आत्मविश्वासाने टाकतात. या डॉक्टरने असे सांगितले , मंगळावरून कॉस्मिक किरणे येणार आहेत, लिंबू फ्रिजर मधे ठेऊन खा, आईची शप्पत , वडिलांसाठी शेअर करा, पेशव्यांना १०० लोकांनी युद्धात हरवले, छत्रपती संभाजी महाराज ७.५ फूट उंच होते, अमक्या ढमक्याचा वाढदिवस , आजचा दिवस कसा खास आहे, चंद्र वेगळा दिसणार आहे आणि gm gn ! अरे काय चाल्लय काय ?

एकंदरीत ढकलण्याच्या अतिरेकामुळे whatsapp वर आलेल्या पोस्टची credibility लयाला गेली आहे हे नक्की .. अगदी थोडे लोक ढकलण्यापूर्वी याचा विचार करतात ..

मी दिवसात दोन वेळा व्हॉट्सअ‍ॅप पाहतो. दोन्ही वेळा दवाखान्यातून परत आल्यावर दहा मिनिटांसाठी करमणूक म्हणून. यापेक्षा त्याची जास्त लायकी नाही. त्यातील विनोद वाचून हसता येते. शिवाय मूर्ख लोकांनी टाकलेले संदेश वाचूनही. लिंबू मिरची गाडीला का लावायची तर साप चावला तर ताबडतोब उपचार करता येतो इ इ. आता असे वाचून हसायलाच येते काय करायचे. म्हणतात ना--तसे पाहिले तर आपण सर्व जण मुळात मूर्खच आहोत पण काही लोक ते परत परत सिद्ध करत राहतात. हसा आणि आरोग्य मिळवा.

In reply to by खटपट्या

म्हणतात ना--तसे पाहिले तर आपण सर्व जण मुळात मूर्खच आहोत पण काही लोक ते परत परत सिद्ध करत राहतात.
त्यांचा practice makes man perfect असाही विचार असेल.

In reply to by सुबोध खरे

विवाहोत्सुक लोकांना 'पोहे' दिसले की चिर मिरच्या आणि नंतर पिळ लिम्बु असं काही करता यावं म्हणून लींबूमिरच्या बांधतात असं एक स्पष्टीकरण whatsapp वर फिरवावं म्हणतो. ;)

In reply to by सुबोध खरे

मी दिवसात दोन वेळा व्हॉट्सअ‍ॅप पाहतो. डॉक्टरांनी म्हणलेले असल्याने, दिवसातून दोन वेळेस गोळ्या घ्या, असे म्हणल्यासारखे वाटले. ;) (ह.घ्या.) लिंबू मिरची गाडीला का लावायची तर साप चावला तर ताबडतोब उपचार करता येतो इ इ. नशिबाने असले मेसेजेस अजून आलेले नाहीत. फक्त एखादा जोक हा नवीन असला तर तो एका पेक्षा अधिक गृपमधे माझ्या सकाळच्या वेळेस दिसतो.

वरील उपयुक्त चर्चा वाचून वाटले की आता येत्या वर्षी दहावीच्या परी़क्षेस मराठीत निबंधाला विषय असणारः "व्हॉट्सअ‍ॅप शाप की वरदान?" ;)

व्हॉट्स अ‍ॅप चा वापर खुप मर्यादित आहे. मिपाकरांच्या गृपावर पण फार कमी गप्पा हाणल्या जातात. दिवसभरात १/२ तासापेक्षा जास्तं वापरत नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर हे अशक्य नाही.

(ज्या-त्या स्टाइलन वाचावं) बातमी दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला. ही बातमी विस्ताराने लिहा... ***************************** नवकथा मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला. ************************************ नवकविता स्टेशनसमोरची रंगहीन टपरी पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी अंग चोरून पडलेली वडे तळणाऱ्या माणसाच्या कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब ठिबकतायत पुढ्यातल्या कढईत टप टप टप येतोय आवाज चुरर्र चुर्र ही खरी घामाची कमाई पुढ्यातल्या टवका गेलेल्या बशीतला वडा-पाव खाताना त्याच्या मनात येउन गेलं उगाचच ***************************************** ललित दुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं चालत होती. प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, गती वेगळी पण एकत्र पाहिलं तर सगळ्यांची लय एकच भासत होती. मुंबईच्या गर्दीची अंगभूत लय. माझं लक्ष सहज पुलाखाली असलेल्या वडा-पावच्या टपरीकडे गेलं. कधीकाळी पिवळा रंग दिलेली लाकडी टपरी. आता त्या रंगाचे टवके उडाले होते. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी उठून दिसत होती, मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड, रंगसंगती खूपच उठून दिसत होती. व्हान गॉगच्या एखाद्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे गेलो. 'वडा-पाव द्या हो एक' मी म्हटलं. 'एक का, चार घ्या की', मालक हसून बोलला, आणि त्याने माझ्या पुढ्यात बशी सरकवली. पांढऱ्या बशीत मधोमध ठेवलेला सोनेरी रंगाचा वाटोळा गरगरीत वडा, बाजूला आडवी ठेवलेली एखाद्या सिनेतारकेच्या डाव्या भुवईइतकी बाकदार हिरवी मिरची आणि भोवताली पेरलेला लालभडक चटणीचा चुरा. नुसती ती बशी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वडा-पाव खाता खाता माझ्या मनाला विचार स्पर्शून गेला, देव तरी कुणाच्या हातात कसली कला ठेवतो बघा! ****************************************** शामची आई व्हर्जन 'शाम, बाळ खा हो तो वडा-पाव', पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, 'अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते? तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा!' ****************************************** जी ए कुलकर्णी व्हर्जन रामप्पाच्या हाटेलातला कढईखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभा वरपर्यंत गेलेल्या. काळ्याकुट्ट कढईत उकळणारा तेलाचा समुद्र आणि एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. वातीसारखे किडकिडीत, डोक्यावर केसांचे शिप्तर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. तो दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली. मुंबईत आल्याला आपल्याला पाच वर्षे झाली नव्हे, हे पोरही अजून तिथेच आहे आणि आपणही इथेच आहोत, त्याच्या मनाला तो विचार नकळत सुई टोचल्यासारखा टोचून गेला. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने बका-बका वडा-पाव खायला सुरवात केली. ********************************************* गो. नि. दांडेकर व्हर्जन हिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, 'आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो'. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल? ******************************************* ग्रेस व्हर्जन विषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला आणि एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर आणि तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा आणि तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा!

हे कळणारे लोक्स कंपुत असावेत. झालंच तर कंपुचा संपू व्हावं आणि लोकसंख्येला आळा घालावा. १०-१५ च्या वर एकही नको. कटाक्षान.