Skip to main content

ताकाचा मसाला

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 31/10/2015 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या उन्हाचा पारा चांगलाच वर चढू लागलाय. अशावेळी थंडपेये हवीशी वाटतात. पण त्यापेक्षा ज्युस, सरबते, आणि ताक हे सगळ्यात उत्तम पेय आहे. ताक नुसते पिण्यापेक्षा त्यात हा घरगुती मसाला घातला तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतील. साहित्यः दोन वाट्या धने, दोन वाट्या जीरे, पाव वाटी ओवा, एक चमचा हिंग पावडर, एक चमचा सुंठ पावडर, एक चमचा शेंदेलोण, एक चमचा पादेलोण. masala कृती: धने, जीरे, ओवा वेगवेगळे खमंग भाजून घ्या. गार करायला ठेवा. गार झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्या. तीनही गोष्टी एकत्र करा, त्यात हिंग, सुंठ्पावडर, शेंदेलोण, पादेलोण मिक्स करा. परत एकदा सगळे मिश्रण मिक्सरला फिरवून नीट मिक्स करा. मसाला थोडा खारट लागला पाहिजे म्हणजे ताकात घातल्यावर चव बरोबर लागते. चवीनुसार दोन्ही मीठांचे प्रमाण वाढवण्यास हरकत नाही. पाचक म्हणूनही ताकात घालून घेता येईल. masala

वाचने 21224
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

हा छान दिसतोय मसाला. मी समाधानचा घेऊन येते भारतातून येताना. आता असा करून पाहिन. स्वाती

झकास पाकृ. यातलं पादेलोण म्हणजे काळं मीठ पण शेंदेलोण म्हणजे नेमकं काय? मला आधी दोन्ही एकच वाटायचं. कारण शेंदेलोण हा शब्द सैंधव वरुन आलाय.

हे उत्तम प्रतीच औषधी मीठ असत. ते पाचक, त्रिदोषनाशक व आरोग्यकारक असत. जर इतर मीठ वर्ज्य केले असेल तर सैंधव खायला हरकत नाही. ( आंतरजालावरून साभार.)

लगेच करून बघते आता...

बेस्ट! आमचे बुवा कुठे गेले? ताकाचं भांडं द्या ओ बुवा.

मला खरे तर प्लेन ताकच आवडते. ते सुद्धा घरी मी स्वता बनवलेले. पण घरच्यांना मसाला ताक आवडते, बाहेरचे घेण्यापेक्षा त्यांना हा घरच्याघरी बनवायला हा फॉर्मुला सांगायला हवा.

एवढेच मसाले असतात काय त्यात! कृती छान सुटसुटीत!

लगेच करून पाहिल्याबद्दल!

मी स्वतः हा मसाला करून पाहीला,अप्रतिम झालाय,ओवा कमी वेळात परतावा लागतो हे नंतर लक्षात आले. सौ. कुठलाही मदत घेतली नाही . बाजारातील किंमती पेक्षा 1/5 किंमत पडते .

हे छान झाले, सौ.खूश आणि स्वत: केल्याचा आनंद काही औरच!

मसाल्याची पाकृ. दिल्याचं सार्थक झालं, मुलांचे फार नखरे असतात. पण एकदा चव आवडली की मग प्रश्न नाही. सर्वांचे आभार. यावेळी लगेच करून पाहणारेही असल्याने खरच खूप आनंद झालाय!

काल केला ताकाचा मसाला १-१ वाटीचाच केला खूप छान झालाय आणि अगदी १०-१५ मिनिटात बनवला

उनाळा लई व्हाडलाय !! म्हणूनशान हा धागा वर काडला बघा. आता बिगी बिगी ताक करा बघू.