Skip to main content

रिकोटा लेमन केक

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 27/10/2015 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरती पाकृ विभागाचे उद्घाटन मी गुलखंडाच्या रेसिपीने केले आणि आता ही माझी शतकी पाकृही डेझर्टची च देते. चीज केकच्या अनेकानेक रेसिप्या आहेत त्यातील ही एक तुम्हाला माहिती आहेच. चीजकेक म्हणजे कॅलरीबाँब! पण सणासुदीच्या उत्सवी दिवसात एखादेवेळी चालतात असे पदार्थ.. तर हा केक करण्यासाठी- साहित्य- ५०० ग्राम रिकोटा चीज १ मध्यम लिंबू (ऑरगॅनिक) लिंबू आदल्या दिवशी फ्रिजरमध्ये ठवून द्या कारण आपल्याला त्याची किसलेली साल हवी आहे. म्हणून ऑरगॅनिक लिंबू घ्यावे. १५० ग्राम साखर २ टीस्पून वॅनिला इसेन्स ३ अंडी ४ ते ५ चमचे कॉर्न स्टार्च + १/२ चमचा बेकिंग पावडर+ चिमूटभर मीठ कृती- फ्रिजरमध्ये ठेवलेल्या लिंबाची साल चांगली किसली जाते म्हणून ते डीप फ्रिज मध्ये ठेवा. केक करायच्या वेळी बाहेर काढून किसा व त्यातील अर्ध्या लिंबाचा रस काढा. रिकोटा चीज एका बाउल मध्ये काढून घ्या व चमच्याने फेटा किवा हँडमिक्सीने ब्लेंड करा. त्यात साखर मिसळा. वॅनिला अर्क, लिंबाची साल व अर्ध्या लिंबाचा रस मिसळा आणि बिट करा. एक एक अंडे त्यात फोडून घाला आणि फेटत रहा. कॉर्नस्टार्च मध्ये चिमूटभर मीठ व बेकिंग पावडर घालून मिक्स करा व हा स्टार्च चीजच्या मिश्रणात घालून बिट करा. १७० अंश से वर अवन प्रिहिट करा. २५ ते ३० मिनिटे केक बेक करा. नंतर केकच्या पोटात सुरी किवा विणायची सुई खुपसून पहा. सुरीला मिश्रण न चिकटता बाहेर आली म्हणजे केक झाला. मिश्रण चिकटल्यास अजून एखाद दोन मिनिटे ठेवा. केक झाल्यावर लगेचच अवन बाहेर काढू नका. ५ मि. अवन मध्येच राहू द्या. नंतर केक बाहेर काढून जाळीवर टाका. . एअर फ्रायर वापरल्यास- १६० अंश से वर प्रिहिट करा. २५ मिनिटे ए एफ मध्ये ठेवा. बेल झाली की एक मि. नंतर उघडा. बाहेर काढून जाळीवर टाका. (मी हा केक ए एफ मध्ये केला आहे.) . .. जर्मन मंडळींना केक बरोबर कॉफी हवीच! ह्या केकचाही कॉफीबरोबर आस्वाद घ्या.

वाचने 10806
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

वाह ! सुरेख अगदी.. सिट्रस फ्लेवर ची सगळी डीझर्ट्स मला फार आवडतात.. हा नक्की करुन बघेन :)

In reply to by स्रुजा

सिट्रस फ्लेवर ची सगळी डीझर्ट्स मला फार आवडतात.
अगदी सेम हेच म्हणतेय. अभिनंदन ताई :) रिकोटा लेमन केक बघून तोंपासू.

वावा. आली का शंभरावी पाकृ. अभिनंदन स्वातीताई. हा फोटोतला केक स्वतः खाल्ला असल्याने जळजळ अजिबात झाली नाही. फार फार भारी झाला होता केक :)

मस्त आहे! आणि शतकासाठी अभिनंदन!

100 वी 'स्वादि'ष्ट पाककृती सादर केल्याबद्दल अभिनन्दन! आणि आपला नेहमीचा आवडीचा प्रश्न..... ओळखा पाहू?

शतकी पाककृतीबद्दल हार्दिक अभिनंदन! आंतरजालीय 'काफे उंड कुकन' आणि गप्पांचा हा सिलसिला असाच चालू राहो.

____/\____

____/\____

१०० ??????? अबब ताई दंडवत स्वीकारा __/\__ ही रेसिपी पण मस्त

फारच टेम्टींग दिसतोय. दे ईकडे पाठवून

मी आधी रिकामटेकडा केक असे वाचले चुकून. =)) पाकृ जबर्‍यादस्तच.
मिपा वरती पाकृ विभागाचे उद्घाटन मी गुलखंडाच्या रेसिपीने केले आणि आता ही माझी शतकी पाकृही डेझर्टची च देते.
ही जाहिरात मात्र आवडली नाही. मिपाच्या व्यासपीठाचा असा गैरवापर णिषेधार्ह्य आहे! :P :P