स्वयंसिद्धा

अनाहिता's picture
अनाहिता in विशेष
8 Mar 2015 - 1:52 am
महिला दिन

खडतर परिस्थितीशी सामना खरंतर अनेकींना करावा लागतो. पण या सगळ्याला झुगारून त्यातून मार्ग काढणाऱ्या स्त्रिया या कुठल्याही स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य अशा कुठल्याही शब्दांशिवाय त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात. आपल्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया दिसतात ज्यांनी अशी अनेक आव्हानं समर्थपणे पेलली, आणि नुसती पेलली नाही, त्याची झळ आजूबाजूच्यांना किंवा पुढच्या पिढीला बसू दिली नाही. अशा परिस्थिती मधून अगदी सहज पणे येऊ शकणारा कडवटपणा त्यांनी शिताफीने चुकवला आणि पुढच्या पिढीकडे तो जाता जाता राहिला ! स्त्रिया कमजोर असतात असे म्हणणाऱ्या तमाम लोकांसमोर अशा कहाण्या या कुठल्याही उपदेशाविना त्यांची कणखरता सिद्ध करतात. पणजी, आजी, आई अशा घरातील ज्येष्ठ व्यक्तींपासून तर आपल्याच वयाच्या मैत्रिणी, बहिणी अशा अनेक रूपात या स्वयंसिद्धा आपल्यासमोर येतात आणि नकळत आपल्याला प्रभावित करतात. आपले आयुष्य किती सुखी आहे, किती छोट्या छोट्या अडचणींना आपण मोठे रूप देतोय, त्याचा किती त्रागा करतोय याची जाणीव होते. आपल्या तथाकथित यशाची हवा जर डोक्यात जायला लागली असेल तर या कथा आपल्याला जमिनीवर ठेवतात. तुम्हां आम्हां सामान्य व्यक्तींच्या जगात अशा असामान्य स्त्रिया पुन्हा एकदा जगण्याचं बळ घेऊन स्वतः तर उभ्या राहतातच, आणि आपल्यालाही बळ देतात. अनाहिता लिहिताहेत अशाच काही धडपड्या, प्रेरणादायी स्त्रियांविषयी...
*****************************************************************************
भावना कल्लोळ
लहानपणापासून परिस्थितीशी झुंज देतच आले. अनेक प्रसंग डोळ्यासमोर आजही तसेच आहेत. आठवीत असताना आई गंभीररीत्या भाजलेली. त्यामुळे ती दवाखान्यात आणि बाबा तिच्यापाशी. हातावरचे पोट. घरातील उत्पन्नाचे एकमेव स्रोत आईच. घरात ३ लहान भावंडे. त्यात एक मंदबुद्धी. चाळीत राहत होतो तरी पण अशावेळी मदतही पहिले २-४ दिवसच येते. एकदा लहान भावाला वडापावच्या गाडीजवळ कोणी टाकलेला वडापाव घेताना पहिले आणि जोरात त्याच्या कानशिलात लगावली. घरात मीच मोठी. म्हणाला ताई, भूक लागली आहे. टचकन पाणी आले डोळ्यात. तेव्हा एका मैत्रिणी कडून २ रुपये उद्या देते या बोली वर घेऊन त्याला वडापाव खाऊ घातला. लगेच आमच्या इथल्या लोकल टिकली कंपनी मध्ये गेले आणि काम हवे म्हणून सांगितले. उद्या पासून ये असे सांगितले त्या ताईने. शाळा सुटल्यावर भात आणि मुगाची डाळ फक्त मीठ टाकून असे जेवायचे आणि कामाला जायचे. संध्याकाळी येऊन अभ्यास. रविवारी सुट्टीच्या दिवशी एक भाजीवाली मावशी राहायची तिची उरलेली भाजी दारोदारी जाऊन विकायची. एका मोळी मागे ५० पैसे, १ रुपया असा दाम द्यायची. आई दवाखान्यात असे पर्यंत गरिबी आणि भूक काय असते ते जवळून पहिले आणि तेव्हाच ठरविले की ही वेळ परत आपल्या घरातल्या कुणावरच येऊ द्यायची नाही. या जिद्दीने पुढची लढाई सुरू ठेवली. अपमान आणि भूक हे माणसाचे खरेच गुरु असतात. नाती आणि माणसे जोखायला शिकवतात. जेव्हा भूक पोटात असते तेव्हा अपमान डोळ्यातल्या आसवात निघून जातो आणि निगरगट्ट होतो माणूस. माझा एक गुरु तर सध्या लांब आहे दुसऱ्या गुरुची साथ आहे अजून. स्वाभिमान उचंबळून आला की हा गुरु लगेच खाली बसवतो त्याला. अजून तुझे दिवस नाही आले आहेत म्हणून. चलता है इसी का नाम जिंदगी है. मी जेव्हा लग्न होऊन सासरी आले तेव्हा चार भांडी, एक पंखा आणि स्टोव व चार पक्क्या भिंती याशिवाय काही नव्हते. आज दोन संसार उभे केले आहेत. शून्यातून सर्व निर्माण केले आहे, पण अजून खूप जबाबदाऱ्या बाकी आहेत. कधीतरी अगतिक वाटू लागते. मग अशा काही ओळी सहज सुचतात.
खूप थकवा आला आहे, थोडी विश्रांती घेईन म्हणते,
जबाबदारीच्या ओझ्याला थोडे बाजूला ठेवीन म्हणते,
जे घुमतेय मनात विचारचक्र जमाखर्चाचे,
त्याला सध्या अल्पविराम देईन म्हणतेय.
प्रयत्न केला, निजले जरा, झोप यावी म्हणून,
मनाचा एक कप्पा बंद ही केला,
अंतर्मनात पूर्णं काळोख हि केला.
दोन क्षण एक शांतता ……
पण जीव घुसमटला ….
काहीतरी होतेय चूक,
असे वाटत होते काहीतरी गुन्हा करतोय,
विश्रांती घेऊन कोणाचा तरी जीव घेतोय,
अविरत चाल, फिरत राहा,
कोलूचा बैल तू घाणा ओढत राहा…
तुझी अडखळती वाट त्यांच्यासाठी पक्का रस्ता असेल,
तुझे घामात भिजणे त्यांच्यासाठी श्रावण असेल,
झटकून टाक विचार थांबण्याचे, तू चालत राहा,
चिंतेची आढी नको, हास्याचा गडगडाट कर,
काय मिळाले, काय मिळेल, काय मिळणार …
याचा हिशोब नको …
चालणे काम तुझे, चालत राहा,
थांबशील तेव्हा तयार तुझ्यासाठी सजवलेली मृत्युशय्या असेल.
आणि नवीन आशा मनात बाळगून, पुन्हा सारे एकवटून नवीन जोमाने आल्या परिस्थितीला सामोरे जायला मी तयार असते.
*****************************************************************************
स्वप्नांची राणी
माझे वडील खूप हुशार होते. त्यांच्याकडूनच पुस्तक वाचनाचा छंद लागला. पण काही कारणाने परिस्थिती बदलली आणि घराची वाताहत झाली. मी सगळ्यात मोठी. काम करण्याचं वय नव्हत तेव्हा पैसे मिळवण्याचा माझा मार्ग काय असेल? रोख पारितोषिक देणाऱ्या झाडून सगळ्या शालेय-आंतरशालेय स्पर्धांत भाग घेणे आणि जिंकणे. एकदा तर वडील आजारी, २-३ महिने पगार नाही झालेला आणि मला एका स्पर्धेत बक्षीस मिळालं. मग त्यातूनच औषधपाणी आणि डाळ-तांदूळ. नंतर पेपरबॅग्ज बनविणे आणि विकणे, साड्यांना फॉल, परकरांना फ्रिल्स लावणे, बटाटेवडे विकणे, फ्रिलान्स पत्रकारिता अशी काय काय कामं केली.
पण शिकले, जिद्दीने शिक्षण पूर्णं केलं. त्याशिवाय तरणोपायच नव्हता ना. या प्रवासात ठेचाच ठेचा खाल्ल्या. सरड्यांसारखे रंग बदलणारी पण नातेवाईक म्हणवणारी माणसे भेटली. घरच्या पुरुषाचा आधार नसलेल्या मुलींना समाज कसा आपलीच संपत्ती मानतो याचे संतापजनक विदारक अनुभव घेतले. पण त्यातूनच मी माणसं ओळखायला पण शिकले. आत्मसन्मानासाठी जास्तच काटेकोर झाले. फुटकळ अपमान आणि बोचरी बोलणी फाट्यावर मारायला जमू लागले. आला क्षण आपला म्हणत भरभरून जगायला शिकले.
अर्थात काही काही जखमा मात्र खोल आहेत आणि कधीतरी अवचित भळभळू लागतात. 'बालपणीचा काळ सुखाचा', मामाचा गाव, आजीचं घर, आमचा जुना वाडा, कॉलेजचे फूलपंखी दिवस ई.ई. काही वाचनात आलं की मी ते सरळ ओलांडून पुढे जाते. त्या दिवसांची आठवणही नकोशी होते असल्या नरकसदृश्य जागी राहिलोत आम्ही. पण आता मी खूप सुखात आहे आणि बिनधास्त म्हणते हे आता. काही दृष्ट बिष्ट लागत नाही मला..सगळं आधीच लागून झालंय!!! पण त्यामुळेच मी आता त्या परिस्थितीत असणार्यांाशी रिलेट करू शकते. अश्या ठिकाणी माझा हात जास्तच सढळ होतो, विशेषतः शिकून काही करू ईछीणार्यां्साठी. आणि मग आपल्या डोळ्यांदेखत एक कुटुंब सावरताना पाहतानाच सुख अवर्णनीय असतं.
या सगळ्यात माझ्या आईनेही खूप सोसलंय. ती पण खाऊन-पिऊन सुखी घरातून आलेली होती. नंतर अंगावर फुटका मणी कधी तिला लाभला नाही. पण आमच्या शिक्षणाबद्दल मात्र ती भयंकर आग्रही होती. एका बालवाडी मध्ये ती २-३ वर्षे शिकवायला जात होती. तेव्हा तर तिच्यात आणि माझ्यात मिळून एकच चप्पल होती. सकाळी ती जाताना घालून जायची आणि मग १० वाजता मी तिकडे जायचे आणि तिची चप्पल घालून कॉलेजमध्ये.
पण बाई जिद्दीची!! आत्मविश्वास ठासून भरलाय तिच्यात. परिस्थितीने कणखर बनवलंय तिला. आता एकटीच राहते. स्वतःला खूप एक्टिविटीज मध्ये गुंतवून घेतलंय. वेगवेगळ्या प्रवासी कंपन्यांबरोबर भरपूर फिरते. जे तिला मिळाल नव्हत ते आता ती पुरेपूर जगून घेतेय. परिस्थितीच्या कडव्या आठवणी विसरून जे आहे ते भरभरून जगताना जेव्हा मी तिच्याकडे बघते ते सुख आणि समाधान शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.
*****************************************************************************
मधुरा देशपांडे - माझी आई
एका अगदी गरीब कुटुंबातली आई सहावी आणि सगळ्यात लहान मुलगी. कमावते फक्त वडील. शिवाय एखादी आत्या, अजून कुणाची मुले, कुणाचा नवरा हे शिक्षण, नोकरी या निमित्ताने घरी. तीन खोल्यांचे भाड्याचे घर. यात ही एवढी सगळी मंडळी. शाळेत असताना फी चे पैसे नाही म्हणून काही वेळा परत पाठवले होते तिला घरी. एक दोनदा तर साफ खोटे बोलून बसली ती शाळेत, वडील नाहीत मला, म्हणून पैसे नाही भरू शकत असेही सांगितले. शिक्षण घ्यायचेच ही जिद्द. ते नेटाने सुरू ठेवले. गरिबीचे चटके होतेच त्यात स्त्रीत्वाचे अजूनच भयावह होते. लहान मुली जे गंध लावतात ते इतरांचं बघून तिला हवं होतं. घराबाहेर असणाऱ्या विटा घेऊन, त्यातली एक फोडून, त्यात पाणी मिसळून ते दिलं तिला मावशीने गंध म्हणून. मामाच्या शाळेची वेळ सकाळी आणि आईची दुपारी अशी होती. कंपॉस बॉक्स घ्यायला कधीच पैसे नव्हते, त्यातले साहित्य पण नाही. सकाळी मामा जे घेऊन जायचा ते तिला रस्त्यात द्यायचा आणि आई तो घेऊन जायची. मोठ्या बहिणीला बघायला पाहुणे येणार असतील तर शेजारच्या घरातून कप बश्या आणल्या जायच्या. मग अशा वेळी बाकीच्यांना चहा मिळेलच असे नाही. बहिणीचा कार्यक्रम म्हणजे बरेचदा इतरांवर संकट. हलव्याचे दागिने, रुखवताच्या ऑर्डर, कपडे शिवणे, कुणाचे पडेल ते काम करून देणे असे अनेक कामं करतच ती अकरावी झाली. लिरील साबणाची जाहिरात करायची आणि घरोघरी ते जाऊन विकायचे असे करून तिने बी एस सी ला प्रवेशाची फी गोळा केली. अशीच छोटी मोठी अनेक कामं करत गेली आणि बी एस सी झाली. आता तिच्या डोक्यात बसले होते एम एस सी करायचे. शिक्षणासाठी नागपूरला जावे लागणार होते आणि त्यासाठी आजीचा विरोध होता. प्रचंड सोवळे ओवळे आणि बक्कळ पैसा असल्यामुळे त्यातून येणारी मग्रुरी अशा तऱ्हेच्या नातेवाइकांकडे राहून, अपमान सहन करत, पडेल ती सगळी कामे करून तिथे राहिली. नंतर प्रयत्न करून मातृसेवा संघाच्या वसतिगृहात प्रवेश मिळवला. अशक्य वाईट अवस्थेतले हॉस्टेल. अन्नाची क्वालिटी वगैरे विसराच. तिथे जेवणाचे खाडे कापले जायचे. मग शुक्रवारी तेवढ्यासाठी धावत पळत ट्रेन ने लटकत घरी परत यायचे. कारण ट्रेनचा पास मिळायचा आणि इकडचे पैसे वाचायचे. सकाळी पेपर असेल आणि हॉस्टेलचे जेवण मिळणार नसेल तर फक्त एक पुडी खारे दाणे खाऊन पेपरला जायची ते संध्याकाळपर्यंत. एम एस सी झाली आणि जवळच्याच एका छोट्या गावात तिला नोकरी मिळाली. या नोकरीसाठी आजीने पुन्हा खूप विरोध केला, मुलीने असे कुठे गावाबाहेर राहून कमावणे तिला पटत नव्हते. पण आई ठाम होती. या गावात आली आणि इथे तिनी पाच वर्ष नोकरी केली. या गावात तिला उधारीवर किराणा मिळायचा म्हणून ती घरचे सगळे इथून न्यायची.आणि पगार झाला की चुकते करायची. सगळी दगदग केवळ घरच्यांना खायला मिळावा म्हणून. मावशीच्या लग्नाचा खर्च पूर्णपणे आईने केला. तेव्हाच्या या कष्टांचे फळ हळूहळू दिसू लागले. परिस्थिती बदलत गेली. अर्थात अविरत मेहनत होतीच पण आता मागे वळून पाहताना त्याचा त्रास कमी होतो आणि समाधान जास्त. आज या सगळ्यातून ती बाहेर आली असली, तरीही या दिवसांनी तिच्यातली आताची समाजासाठी सतत काहीतरी करणारी धडपड अजूनही जागृत ठेवली. आजही कुणाची आजारपणं, कुणाची शिक्षणं यासाठी मदत सुरूच असते. आता ती ज्या कॉलेज मध्ये शिकवते, तिथे तर तिच्या प्रेमाच्या अनेक विद्यार्थिनी आहेत. तिने किती जणांना शिक्षणासाठी मदत केली हे अगणित आहे. घरात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या बायका या आमच्या घरातल्याच झाल्या आहेत. कुणाला दुःख सांगायला, मन मोकळे करायला, आधार द्यायला आई ही हक्काची व्यक्ती आहे. रुखवत किंवा हलव्याचे दागिने जे आधी परिस्थितीमुळे केले, ते आता सहज हौस म्हणून करता येतात एवढी परिस्थिती बदलली. माझ्या लग्नात तिने काय काय केलं नाही, फक्त पैसा होता म्हणून नाही तर हौस आणि कलात्मकता होती म्हणून. अर्थात या प्रवासात जेवढ्या खस्ता खाल्ल्या त्यापेक्षा कित्येक चांगले लोक भेटले. वेळोवेळी मदत करणारे. कित्येकांनी पाठ फिरवली पण रक्ताचे नाते नसणाऱ्या भावाने ही आजारी असताना हिची खोली पुसण्या पासून तर स्वयंपाक करून देण्यापर्यंत सगळं केलं. जीवाभावाच्या अनेक मैत्रिणी मिळाल्या. समाधानाचे आणि अभिमानाचे प्रसंग पण खूप आहेत. लिहिण्यासारखे खूप काही आहे. पण या लेखापुरते इतकेच. मी तिची मुलगी आहे याचा अभिमान आहेच पण त्याहीपेक्षा आयुष्यातल्या कठीण प्रसंगात लढणारी स्त्री म्हणूनही आहे आणि सदैव असेन.
*****************************************************************************
सानिका स्वप्नील - माझी आई आणि आजी
माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई ही माझ्या आजोबांची दुसरी पत्नी. माईआजी. हिचे लग्न आजोबांशी झाले त्या वेळेस त्यांच्या वयात २४-२५ वर्षांचे अंतर होते. आजीला ६ अपत्ये झाली. १ मुलगा आणि ५ मुली. आजोबा भावंडात मोठे. माईआजीने सगळ्यांचे शिक्षण, लग्न, जावांची बाळंतपणही केली. आजीचे माहेर पुण्याचे , माहेरीही भावंडांना शिकवले तिने. आजोबा तसे त्या काळी ही खूप ब्रॉड माईंडेड होते त्यामुळे बायकोच्या माहेरी तिच्या भावंडांना शिकवायला त्यांनी कधीच का कू केली नाही. माझी आजी स्वतः सातवी शिकली होती. आजोबा नोकरीनिमित्त बाहेर असायचे त्यामुळे फुलांची वाडी, शेती सगळं आजीच बघायची. कालांतराने माझे चुलत आजोबा त्याच गावात वेगळे राहू लागले तरी त्यांची मुले माझ्या आजीच्याच घरी राहिली, वाढली, शिकली.
माझा मोठा मामा अगदी हुशार, राजबिंडा होता. अठराव्या वर्षी प्रवासात ट्रेनमधून पडला, १५ दिवस कोमात होता आणि दुर्दैवाने त्याची प्राणज्योत मालवली. तरुण मुलगा गेल्याचे दु:ख आजीने कसंबसं पचवलं पर्याय नव्हता तिच्यासमोर. ती आपल्या दु:खाला कवटाळून बसली नाही, उभी राहिली, सावरली त्यातून. आजोबा मामा जाण्याचे दु:ख फार सहन करू शकले नव्हते. ते आजारीच असायचे, वय ही वाढत होतं . १९६५ साली आजोबा वारले त्या वेळी माझी आई शाळेत शिकत होती. आजोबा गेल्यानंतर आजी एकदम खचली, एकाच मुलीचे लग्न झाले होते, बाळंतपण झालं होतं पण बाकीच्या शिकत होत्या, कुणी शाळेत, कुणी कॉलेजला. आजी पार खचून गेली होती, आधी मुलगा, मग नवरा , वाढत्या मुली, कसं काय करायचं. नातेवाईकही आताशी आपापल्या जगात रमले होते. मोठी मावशी समाजसेवेत मग्न त्यामुळे वाडीची , शेतीची जबाबदारी कोण घेणार? शेवटी फुलांची वाडी व शेती विकून ते पैसे मुलींच्या शिक्षणाला आणि लग्नासाठी जमवून ठेवले. सधन कुटुंबात असली तरी मेहनत खूप करायची. सुगरण होती, गावात सगळे तिच्या जेवणाचे कौतुक करत, "माईंनी पाण्याला फोडणी दिली तरी ते चविष्टच लागेल" असे लोक म्हणत. नाव ही तिचे अन्नपूर्णाच होते. तिने खानावळ सुरू केली, हॉस्टेलला शिकायला येणार्याल विद्यार्थ्यांना ती जेवण देत असे आणि येणार्याम मिळकतीतून आणि आजोबांच्या पेन्शनवर ती घरखर्च सांभाळत होती. पण स्वतःची दुःख बाजूला ठेवून तिने सगळ्या जबाबदार्या चोख पार पाडल्या. स्वाभिमानाने जगली. लवकर गेली पण समाधानाने गेली. सगळ्या मुली चांगल्या घरी पडल्या ह्याचे समाधान होते, मुलींना शिकवून आपल्या पायांवर उभं केलं ह्याचा अभिमान होता. तिच्या बद्दल मी किती ही बोलू शकते. आमचे नातींचे खूप लाड केले, मी तर खूप लहान होते पण तिच्या आठवणी अजूनही ताज्याच आहेत.
माझ्या आईने सतराव्या वर्षी ती ज्या शाळेत शिकली तेथे व्हेकेशन जॉब करायला सुरुवात केली होती. मोठ्या मावशीने तेव्हापासून स्वावलंबनाचे धडे द्यायला सुरुवात केली होती. मोठ्या मावशीकडे काही वर्ष राहून डी.एड व पिटी ट्रेनिंग पूर्णं केलं. शाळेत नोकरी करून थोडे पैसे साठवले व पुण्यात हॉस्टेलला राहिली, एस.पी कॉलेजला ग्रॅज्युएशन पूर्ण केले. ह्या बहिणी नोकरी करून एक-मेकिंना शिकवत असत. मोठ्या मावशीच्या शेजारीच माझे बाबा राहायचे. काही वर्षांनी बाबांनी मागणी घातली लग्नाची. आजीने होकार दिला व लग्न झाले. आईचे लग्न झाले तेव्हा आजोबा मुंबईत राहत होते. आई एवढ्या मोठ्या वाड्यातून मुंबईच्या फ्लॅटमध्ये राहायला आली. त्यात आमच्या आजोबांना दहा मुलं. घरात आजी-आजोबा, आत्या, आई-बाबा, मोठे काका-काकी आणि एक घरकाम करणार्याज काकूंचा मुलगा शिकायला होता. इतकी सारी मंडळी वन रूम किचनमध्ये राहत. आई त्यावेळी नोकरी करत नसे. तशी गरज ही नव्हती. मग हळू-हळू जागा कमी पडू लागली. बाबांना क्वार्टर्स मिळाली आणि आई ५ महिन्याची गरोदर असताना ते तिथे राहायला गेले.
माझ्या बहिणीच्या जन्मानंतर आईने तिला केयरमध्ये ठेवून बी.एड केलं, भांडूपला शाळेत शिक्षिकेची नोकरी सुरू केली. बाबांचा तिला खूप पाठिंबा होता. तिचे तिच्या विद्यार्थ्यांशी वेगळे मैत्रीचे नाते आहे. घर-नोकरी, मुलं सांभाळून तिने तिच्या क्षेत्रात खूप छान काम केलं. कष्टमय जीवन ते ही जगले, एक काळ असा कठिण आला होता जेव्हा काही कारणामुळे बाबांना घरात पगार देता येईना, आजीच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे, तिच्या उपचारांसाठी बराच खर्च होत होता. त्यात नवीन घर घेतले होते, आम्ही शिकत होतो, त्या वेळेस आई ठामपणे उभी राहिली. नोकरी करून, आम्हाला सांभाळून, ती शिकवण्या घ्यायची. अनेक वेळा बेस्ट टीचरचे तिला अवॉर्डस ही मिळालेत पण तिची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट जेव्हा तिला २००१ साली गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र पी. सी. अॅबलेक्स्झँडर च्या हस्ते Excellence in Teaching अवॉर्ड मिळाले. तिच्या मेहनतीचे चीज झाले होते. ती निवृत्त झाली तेव्हा शाळेने खास कार्यक्रम आयोजित केला होता व आम्हाला आमंत्रण दिले होते. आजही तिचे विद्यार्थी तिला परदेशातून फोन, ई-मेल करतात. निवृत्तीनंतरही तिच्यातली शिक्षिका अजून काम करते, कामवाल्या मावशीच्या नातवाला ती शिकवते, शिवाय आमच्याच नात्यात एका मुलीची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी तिने उचललीय . हे सगळं ती विनामूल्य करते आणि हे बघून आम्ही खूप लकी असल्याचे जाणवतं.
स्वतःच्या नातीबरोबरच शेजारच्या वहिनीच्या मुलीचे ही तितकेच लाड करते. उत्साह दांडगा आहे, स्वस्थ बसत नाही, आजीप्रमाणे सुगरण आहे त्यामुळे बिल्डिंग मध्ये कार्यक्रम असो, घरात असो ही मस्तं खाऊ घालणार सगळ्यांना. मायक्रोव्हेव कुकिंगचा क्लास ही करून आलीय. वाचनाची आवड आहेच , तिच्यामुळेच मला ही आवड लागली. ती कंप्युटर शिकली, हळू हळू फेबू व स्काईपही शिकली. आता टच स्क्रीन मोबाईल कसा वापरतात हे शिकायचे आहे तिला Smile
आपल्या आईबद्दल प्रत्येकीला खास वाटणारच, त्यांच्या कष्टांमुळेच आपले आयुष्य सुखद आहे. आपण ह्या माउलीच्या पोटी जन्म घेतला ह्याचा अभिमान वाटतो.
*****************************************************************************

*****************************************************************************
प्रीत मोहर
त्याकाळच्या पद्धतीनुसार माझ्या पणजीचे ६ व्या वर्षी लग्न झाले. तेव्हा ती त्या घरची ३ नंबरची सून झाली. थोरले दोघे आपल्या परिवारासकट गोव्याबाहेर राहत. त्यामुळे सगळी जबाबदारी हिच्यावरच. नवरा स्वातंत्र्यसैनिक. पोर्तुगीजांविरुद्ध कारवायांमध्ये सर्वात पुढे. त्यामुळे महिनोनमहिने घरीही परतत नसत. धाकटे २ दीर, १ वेडसर नणंद आणि म्हातारे सासू.सासरे, चुलत सासू सासरे आणि चुलत दीर/ नणंदा आणि शेती बागायती. अशात ती दोन पोर्तुगीज पुस्तके शिकली. तिने एवढा मोठा डोलारा स्वतःच्या खांद्यावर पेलला एकटीने. धाकट्या दिरांची शिक्षणे स्वतः केली. नणंदेला सांभाळले. शेती बागायतीत स्वतः राबली. दरम्यान ३ मुलं जन्मतः गेली. स्वतःच बाळंतपण स्वतः तेही शेतात केल्यावर अजून काय व्हायचं दुसरं? असो तो वेगळा विषय. नंतर २ मुली झाल्या. धाकटी लेक म्हणजे माझी आज्जी दीड वर्षाची असताना पणजोबा शहीद झाले.(तिच्या इच्छेविरुद्ध तिचं केशवपन ही झालं.) ह्याचा फायदा घेत ज्यांच्यासाठी ही राबली त्यांनी तिला दोन लहान लेकींसकट घराबाहेर काढली. तीही खमकी पण स्वाभिमानी होती. पुन्हा तिथे पाय टाकणार नाही असा निश्चय करून ती आपल्या मानलेल्या भावाकडे गेली काही दिवस. परक्याकडे किती दिवस राहणार याची तिला जाणीव होती. म्हणून स्वतःच्या सुगरणपणाचा वापर करून रांधपिण म्हणून लोकांकडे कामाला जाऊ लागली कुणाची लग्न , मुंज, बारसं, पूजा अश्या सगळ्या कार्यांसाठी खपू लागली. आपल्या दोन लेकींसाठी. असं करता करता तिनी लांबच्या ठिकाणची कंत्राट घेणं सुरू केलं. त्यात ती एकदा मंगेशीच्या भाव्यांकडे गेली. ही काकू त्यांना इतकी आवडली की भाव्यांच्या मुलांनी तिला जाऊ दिलं नाही इतर कुठे. मग ती भाव्यांच्या घरी राबू लागली. तिथे खूप राबता असायचा माणसांचा. कामाला गडी माणसं, घरातली मूल बाळ, लेकी सुना ह्यांना तिचा फार लळा. त्यांचं करत ती वाती वस्त्र वगैरेही करून विकायची. मग कधी तरी तिने तिथून परत आपल्या माहेरी जायचा निर्णय घेतला. दोन्ही लेकींची लग्न केली. धाकट्या लेकीने आणि जावयाने तिला पुढे आयुष्यभर सांभाळले. हे माझे आज्जी आजोबा. म्हणजे आईचे आई-बाबा. लेकीच्या घरी राहूनही कधी स्वतःच ओझं जावयावर पडू द्यायचं नाही हे तिच तत्त्व. ती वेगवेगळ्या पानांच्या पत्रावळी करायची. छान आणि सुबक. तऱ्हेतऱ्हेचे द्रोण करायची. अर्थात फार पूर्वीपासून. वाती आणि हे द्रोण बनवणं ती जाण्या आधी १ महिना थांबलं.
तिने माझ्या आज्जीला आणि मावशी आज्जीला शिकवलं. अर्थात जास्ती नाही पण ४ पोर्तुगीज आणि मोडी पुस्तके शिकली माझी आज्जी.
१६ व्या वर्षी माझ्या आजीचं लग्न झालं. एकट्या आईने वाढवलेल्या मुलीला कुणी चांगली स्थळही सांगेना. शेवटी माझ्या आजोबांशी तिचे लग्न झाले. आजोबा लहानपणापासून थोडे सणकी/तापट होते पण खूप भोळे होते. आणि मुख्य म्हणजे दुष्ट नव्हते. आज्जीला घरात काही दिवस घालवल्यावर लक्षात आलं हे. तिने घरात चार्ज घेतला. सासरे आणि नवर्या.च्या कमाईचा हिशोब आता तिच्याकडे येऊ लागला. सासर्यां ची लाडकी लेक झाली ती. दीर, नणंद, घरात येणारे जाणारे अनेक जण, प्रत्येकासाठी तिने खूप केले. पण जे माझ्या पणजीबाबत झालं तेच तिच्याहीसोबत घडलं. तिचे सासरे गेल्यावर धाकट्या दिराने घरातून हाकलले थोरल्या भावाला. एव्हाना तिच्या पदरी दोन लेकी होत्या. आता काय करणार? आले चौघही दिशा मिळेल तसे चालत. चालत चालत वाळपईहुन कलंगुट ला. तिथे एका भल्या माणसाच्या खोपटीत भाड्याला राहिले ते. आजोबा पौरोहित्य करत. जी काही मिळकत असे ती आजीच्या स्वाधीन करत ही एक चांगली बाब होती. पण परक्या गावी तेही काम मिळणे कठिण होते. आजीने स्वतःची जात लपवली. आणि लोकांकडे घरकामाला जाऊ लागली.(जात अशासाठी संपवली, की आजही ब्राह्मणांकडून सेवा घेणे गोव्यात पाप समजतात). माझी मोठी मावशी वय वर्षे ६ आणि आई वय वर्षे ४ लोकांचे माड पाडायचे असले की तिथे मदतीला जायच्या. मग ती माणसं जे काही २ -४ नारळ द्यायचे ते घेऊन घरी आले की त्या दिवशी व्यवस्थित खोबरं घालून स्वयंपाक असायचा. इतक्या सधन घरातून असूनही आपल्या मुलींवर ही परिस्थिती आली या विचाराने आज्जी आजोबांना फार त्रास होत असे. मग त्या दोघांनीही मुलींना घरीच शिक्षण द्यायला सुरवात केली. थोरली मावशी पणजी आणि आजीसारखीच सुगरण आहे. तिने स्वयंपाकघर सांभाळायचे, आईने घराबाहेरची कामे सांभाळायची आणि आजी आजोबा कामाला जायचे अशी कामांची वाटणी झाली. थोडेसे पैसे जमल्यावर आपण परत आपल्या गावी जायचं अस तिने ठरवलं. कारण तेव्हा काजूला, सुपारीला खूप दर होता. तेव्हा जागा विकत घेऊन आपण काजू/ सुपारीची बागायत करू असा विचार केला. गावातल्या जमीनदाराकडे शब्द टाकून, जमेल तसे पैसे परत करू या बोलीने जमीन विकत घेतली. चौघांनी मेहनत करून सगळं कर्ज फेडलं. पुढे अजून दोन अपत्य आज्जीला झाली. मोठ्या लेकींना आज्जी जास्ती शिकवू शकली नाही कारण परिस्थितीच अशी होती. पण संस्कार आणि आत्मविश्वास खूप दिला. वेळोवेळी आपल्या लेकींसाठी खंबीरपणे उभी राहिली. माझी आई तर असली खमकी होती, की मोठमोठे लोक आईला चळाचळा कापत.
आईला दहावीनंतर नोकरी करावी लागली. ती अंगणवाडी शिक्षिका झाली. ह्या सगळ्या काळात आजोबा पोफळीच्या माडीवरुन दुसर्याा माडीवर चढताना, उंच झाडावरून पडले व त्यांच्या कमरेच्या मणक्याला दुखापत झाली. आजीची तब्येतही बरी नव्हती. ह्या काळात माझी आई घरातली कर्ती झाली.
आईने अंगणवाडी ट्रेनिंग घेऊन गावात अंगणवाडी उघडली. रेशन आणणे, धान्य नीट निवडून घेणे, चांगलं व सकस खाणं मुलांच्या पोटात पडत की नाही ह्याची काळजी घेताना एकीकडे तिने घरच्या शेती बागायतीही कसल्या. ४० - ४० किमी चालत माडे घेऊन यायची ती आजोबांसोबत जाऊन. आमच्या गावात तेव्हा रस्ताही नव्हता. शाळेत जायचं तर शॉर्टकट वाटच ६ कि.मी ची. त्यात मध्ये नदी. पावसाळ्यात तर कहरच. कारण आमचा गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलाय आणि भरपूर पाऊस पडणार्याट गावांपैकी एक आहे.
एकटी मुलगी सगळी बाहेरची कामे( वाणसामान आणण्यापासुन ते कोर्टकचेर्या संभाळण्यापर्यंत) करते तर तिला विरोध करायचा ही खूप प्रयत्न झाला. तिला त्रास द्यायचा ही प्रयत्न झाला. पण आई आजीच्या सपोर्टमुळे सगळ्याला पुरुन उरली.
पुढे आजोबा आणि आजी बरे झाले आणि एकेक करून माझ्या मावशीचे आणि आईचे लग्न झाले. आज आई आणि बाबांनी मला जे बनवल आहे. त्यानंतर सगळ्यांना माझ्या आईचा खूप अभिमान वाटतो.
अश्या या पणजीची पणती, आजीची नात, आणि आईची मुलगी असल्याचा मला खूप अभिमान आहे.
*****************************************************************************
अनन्या
माझी आजी आणि पाच बहिणी असे कुटुंब! तसे माहेर खाऊनपिऊन सुखी, दिसायलाही गोरी घारी सुंदर! पण मोठ्या कुटुंबामुळे आजी दुसरी पर्यंत शिकली. माझे आजोबा तसे व्यवस्थित कमावून होते. आजीचे त्यांच्याशी तिसरेपणावर लग्न झाले, तेव्हा ती १३ वर्षांची तर आजोबा ३९ वर्षांचे! आजी कोकणातल्या घरी राहायची. तिला दोन मुलगे आणि चार मुली. आजोबा इथे नसल्याने असलेली शेती शेजारी कसत होता. धाकटी आत्या दोन वर्षाची असताना अचानक आजोबा गेले, त्यावेळी आजी चाळीशीच्या आतलीच होती.
त्यानंतर आजीची परवड सुरू झाली. एका आत्याचा एक पाय आणि एक हात पोलिओग्रस्त! बाकी आत्या आणि काका, बाबा शिकत होते. हळूहळू शेजाय्राने आपले रंग दाखवायला सुरूवात केली. शेतीतला वाटा देईनासा झाला, आजीने जमिन स्वतः कसायला मागितली, पण त्याने कूळ्कायद्यात ती हडप करायचा प्लॅन केला. त्यातच वयाच्या आठव्या वर्षी माझ्या बाबांचा हात उसाच्या रगड्यात सापडला, आमच्या गावाहून रत्नागिरीत येईपर्यंत कोपरापर्यंत कुजला आणि ते उजवा हात कोपरापर्यंत गमावून बसले.
शेतीची केस चालू झाली. आजीला आपले सगळे दागिने गहाण टाकावे लागले. दुसरा शेजारी नको त्या गोष्टीची मागणी करू लागला, आजीने विरोध करताच तोही आजीच्या विरूध्द उभा राहिला. हाती कपडे शिवून, वाती विकून थोडे पैसे आजीला मिळत. पण सहा मुलांना रोजचे जेवणही देता येईना, तेव्हा मोठ्याकाकांना तिने मुंबईला पाठवले, गावातल्या माणसाबरोबर, काहीतरी काम शोधायला!
एकदिवस हिय्या करून, माझ्या अपंग बाबाना बरोबर घेऊन ती शेतात उतरली. हातात पिकाव घेऊन... तेवढ्यात शेजारी आडवे आले..तू शेती करू शकत नाहीस! आजी हट्टाला पेटली. सरळ म्हणाली..मी खणायला सुरूवात करतेय..तू मध्ये आलास आधी पिकाव तुझ्या डोक्यात घालीन! शेजारी निमुट बाजूला झाला. सोळाव्या वर्षी बाबांनी कोर्टात उभं राहून..स्वतः केस लढली आणि आपली जमिन परत मिळवली.
यथावकाश मोठ्या आत्याचे लग्न झाले. पोलिओ झालेल्या आत्याचे लग्न न करायचे ठरवले आजीने! बाकी मुलांची शिक्षण, लग्न सगळे काही आजीने एकटीने हिमतीने केले. त्या एका प्रसंगानंतर आजीमुळे आमची निदान जेवणाची भ्रांत मिटली एवढे नक्की! तिच्या हिमतीला सलाम!
*****************************************************************************
अनाहिता
मी पाचवीत असताना एका आजाराचे निमित्त होऊन आई देवाघरी गेली. लहान बहिण तेव्हा तिसरीला होती आणि भाऊ ४ वर्षाचा. बहिणीला मग मामा आणि आजी घेऊन गेले .मी आणि भाऊ तेथेच वडिलांजवळ राहिलो .आजी सरकारी दवाखान्यात कामाला असल्याने आम्ही तेथेच मागच्या भागातील क़्वार्टर मध्ये राहायचो. पण आजीला नोकरी करून आम्हाला सांभाळणे कठीण जाऊ लागले आणि मग मलाही माझ्या मावशीकडे पाठवण्यात आले .तिघा भावंडाची ताटातूट झाली.
तसे पाहायला गेले तर वडिलांच्या घरी बेताची परिस्थिती होती. मात्र त्या मानाने येथे या लोकांचे राहणीमान चांगले आणि परिस्थिती जास्त चांगली होती .पण मी बुजऱ्या स्वभावाची असल्याने मला जुळवून घेणे फारच कठीण जात होते .सारखी आईची आठवण यायची .पण सांगणार कोणाला ??कारण यांच्या भरल्या घरात रडलेले चालत नवते .मनात दाबून ठेवत असे .त्यांनी आम्हाला आईविना पोरांना कसे का होईना वेळप्रसंगी सांभाळले याचेच उपकार म्हणून त्यांच्या कितीतरी चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या आहेत .सततचे टोमणे, चुकीची वागणूक सगळं सहन केलं कारण दुसरा काही पर्यायच नव्हता. मावशीकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता होता. त्यामुळे अशा वेळी अनेक लोकांच्या नको त्या नजरा चुकवणे हे या सगळ्याहून त्रासदायक होते. शेवटी मावशीलाही हे लक्षात आले आणि तिने मला मामाकडे पुढील शिक्षणासाठी पाठवून दिले. येथे येऊन मी आणि बहिण जवळ आलो होतो याचाच काय तो आनंद होता. बाकी जिणे म्हणावे तेवढे समाधानकारक नव्हते पण शिकायचे आहे याच एका ध्येयाने सगळे सहन करत गेलो. अर्थात आम्हाला येथे खाण्यापिण्याचे आणि कपड्याचे भरपूर सुख होते पण फक्त नव्हता तो प्रेमाचा ओलावा. त्यातच एक स्थळ सांगून आले आणि घरच्यांनी लग्न ठरवून टाकले. दहावी झाल्यावरच करून देणार होते पण कसे काय माहित मी तेव्हा विरोध केला आणि नकार दिला. नंतर मी गावी आजी बाबांकडे जाऊन अकरावीला प्रवेश घेतला व शिक्षण सुरू केले. बारावी पूर्ण झाले आणि नंतर लग्न झाले.
नवऱ्याने लग्नानंतर मला एफ .वाय.बी.ए ला प्रवेश घेऊन दिला आणि माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान नोकरीचाही प्रयत्न केला पण माझ्यात तसा आत्मविश्वास नव्हता, तिथे कुणी काही बोलले की मी खूप मनाला लावून घ्यायचे. पण मला नवऱ्याने एका गोष्टीची जाणीव करून दिली की मी अजून शिक्षण घेतले पाहिजे .स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले, आत्मसन्मान कसा सांभाळायचा हे ही त्यानेच शिकवले. मी एक कणखर व्यक्ती बनावी यासाठी मला खूप प्रोत्साहित केले. मग अजून काहीतरी वेगळे शिकावे म्हणून ज्वेल्लरी मेकिंगचा छोटासा कोर्स केला .एव्हाना लग्नाला ५ वर्षे झाली होती आणि दरम्यान मुलगा झाला. मग संपूर्ण दिवसच त्याच्यामध्ये जायला लागला .तरीही वेळात वेळ काढून पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमाला प्रवेश घेतला. मुलगा तेव्हा 9 महिन्यांचा होता. त्याला कधी नवऱ्याजवळ तर कधी शेजारी बेबी सिटींगला ठेवून लेक्चरला जायचे. एकीकडे लहान बाळ घरी ठेवून काळजी लागून राहिलेली आणि तरीही कोर्स पूर्ण करायचा हे ध्येय असे होत होत तो डिप्लोमा पूर्ण झाला. अजूनही मुलगा लहान म्हणून नोकरी नको वाटत होती. मग मी पुढील शिक्षण घ्यायचे ठरवले आणि एम,बी,ए ला प्रवेश घेतला. आता एम ,बी चा अभ्यास तसा सोपा नव्हता .कारण मी मुळातच फार हुशार अशा प्रकारातील नाहीये पण शिकायची आवड होती आणि आहे. गणिताशी माझे कधीच फार जमले नाही आणि इथे पुन्हा गणित आले. प्रचंड अवघड वाटत होते पण जास्त मेहनतीने तेही जमले. मग असेच लहान मुलगा आणि घराचे सगळे सांभाळून परीक्षा आणि अभ्यास अशी कसरत करत होते .आता जेव्हा एमबीएचा निकाल लागला तेव्हा हे यश मिळाल्यानंतर खूपच छान वाटतेय. आमच्या नातेवाईकांमध्ये कॉलेजला जाऊन शिक्षण घेणारी मी पहिलीच मुलगी होते. खरेच सांगतेय आमच्या जवळच्या नात्यात कुठल्याही मुलीने अजून उच्च शिक्षण घेतलेले नाहीये. माझे बघून नंतर अनेक जणींनी लग्नानंतर शिक्षण घेतले..त्यामुळे माझे सासरे आणि नवरा खूप अभिमानाने सांगायचे की मी अजून शिकतेय. आज एमबीएचा हा महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्यावर तर त्यांना खूपच आनंद आणि अभिमान वाटतोय माझा.
आता कधीकधी विचार केला तर वाटते, जर मी तेव्हा सगळ्यांचे ऐकून लग्न करून बसले असते तर आज माझे जीवन फक्त चूल आणि मूल एवढेच झाले असते. माझा तेव्हाचा एक खंबीर निर्णय हा माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी देईल असे वाटले नव्हते. त्यावेळी विरोध करणारे लोकच आज खूप स्तुती करत आहेत. माझ्यापेक्षा खडतर परिस्थिती असणाऱ्या अनेक जणी असतील. कदाचित त्यांच्यासाठी माझी ही कहाणी छोटीशी प्रेरणा ठरली तर माझा आनंद द्विगुणीत होईल. अजून खूप काही करायचे आहे. नवनवीन शिकत राहायचे आहे. आणि यशाची नवीन शिखरे नवीन पादाक्रांत करायला आता मी तयार आहे...
*****************************************************************************

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

8 Mar 2015 - 1:45 pm | पिलीयन रायडर

Sundar!!!

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 1:51 pm | सविता००१

सगळ्यांच्याच कहाण्या प्रेरक आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2015 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व सबलांना सलाम !

जुइ's picture

9 Mar 2015 - 4:25 am | जुइ

अप्रतिम!!

रेवती's picture

9 Mar 2015 - 5:43 am | रेवती

हे वाचून गहिवरून होते.. दोन्ही आज्ज्यांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. सतत कष्ट, जिद्द या जोरावर तुटपुंज्या पैशात कसदार संसार करून दाखवले. अर्थात हे आम्ही फक्त ऐकले होते व दोघींना उतरत्या वयातही तसेच पाहून पटलेही होते. माझ्या सुदैवाने अशी उदाहरणे घरातच असल्याने ज्यावेळी मनाची शक्ती पुरते की नाही अशी शंका येण्याच्या दिवसात त्यांना आठवते. पैसा पुढच्या पिढीला कितीदिवस पुरेल न पुरेल, पण आपल्या उदाहरणाने जे त्यांना दिसेल ते अनेक पिढ्यात उतरत जाते हे नक्की!

अजया's picture

9 Mar 2015 - 7:55 am | अजया

___/\___

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2015 - 8:03 am | प्राची अश्विनी

सलाम!

अतिशय प्रेरणा देणारा धागा.....

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2015 - 2:31 pm | प्रीत-मोहर

असेच म्हणते. अनाहितातला हा धागा जेव्हा जेव्हा वाचते तेव्हा तेव्हा positive energy मिळते

स्रुजा's picture

10 Mar 2015 - 9:10 am | स्रुजा

+१११११

अगदी खरं

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 3:44 pm | स्पंदना

किती जीद्द ती!! किती मानसिक सामर्थ्य!!

सामान्य वाचक's picture

9 Mar 2015 - 5:18 pm | सामान्य वाचक

डोळ्यात पाणी आले वाचताना . अक्षरे दिसेनाशी झाली
तुम्हा सगळ्यांना सलाम

स्वाती२'s picture

9 Mar 2015 - 11:33 pm | स्वाती२

अतिशय प्रेरणादायी! _/\_

इशा१२३'s picture

10 Mar 2015 - 9:01 am | इशा१२३

किती कष्ट आणि जिद्द!अवघड आयुष्य सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या या अनाहितांना मनापासुन सलाम आणि शुभेच्छा!

स्वाती दिनेश's picture

10 Mar 2015 - 2:53 pm | स्वाती दिनेश

स्त्री शक्तीची कल्पना ह्या सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वांमुळे येते.
स्वाती

भाग्यश्री's picture

11 Mar 2015 - 4:52 am | भाग्यश्री

वॉव!! किती कर्तृत्ववान स्त्रिया एक एक! डोळ्यात पाणी आले व स्वतःची लाजही वाटली! किती खमक्या स्त्रिया आहेत ह्य सगळ्या!? हॅट्स ऑफ!!

विशाखा पाटील's picture

11 Mar 2015 - 11:31 am | विशाखा पाटील

खरंच काय लिहावे हे सूचत नाहीये...सलाम! या प्रेरणादायी लेखनाची प्रिंट काढून जास्तीत जास्त लोकांपर्यंत, विशेषत: तरुण वर्गापर्यंत पोहोचवावी, असा विचार आला.

माझ्या आजूबाजूला वावरणार्‍या इथल्या आणि भोवतालच्या स्वयंसिद्धा आठवल्या.
हे लेखन निश्चितच प्रेरणादायी..

पद्मश्री चित्रे's picture

13 Mar 2015 - 6:01 pm | पद्मश्री चित्रे

सलाम सर्व स्वयंसिध्द मातांना आणि माझ्या सख्यांना...

मधुरा देशपांडे's picture

13 Mar 2015 - 9:34 pm | मधुरा देशपांडे

अंक प्रकाशित झाल्यापासुन अनेक वेळा हा धागा वाचला आणि प्रत्येक वेळी गहिवरुन आले. सर्व स्वयंसिद्धांना सलाम.

भिंगरी's picture

14 Mar 2015 - 3:07 pm | भिंगरी

कणखर,स्वभिमानी,कर्तबगार,धडाडीच्या महिलांनो तुमचा जयजयकार.

या अशा स्वयंसिद्धांविषयी वाचून वाईट तर वाटतंच. पण मग अस जाणवत की स्त्रीजातीला चांगले दिवस पहायला मिळत आहेत ते यांच्यामुळेच. एक वरवर साधी दिसणारी स्त्री. पण कशाकशातून जाऊन तिने तिचे आयुष्य उभे केलेले असते ते इथे कळते. प्रेरणा देणारे हे लेखन अनेक कठीण प्रसंगांवेळी बळ देईल. यांच्या लढ्याला सलाम!!!

उमा @ मिपा's picture

15 Mar 2015 - 3:38 am | उमा @ मिपा

मनाला उभारी देणाऱ्या स्वयंसिद्धा! __/\__

मनुराणी's picture

15 Mar 2015 - 11:37 pm | मनुराणी

___/\___

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:58 pm | कविता१९७८

खरच डोळ्यात पाणी आले वाचताना

पैसा's picture

19 Mar 2015 - 8:27 pm | पैसा

अतिशय प्रेरणादायक कहाण्या. जितक्या वेळा वाचते तितक्या वेळा जगण्याचं नवं बळ मिळतं.

अनन्न्या's picture

20 Mar 2015 - 5:27 pm | अनन्न्या

जेव्हा कधी आपलं दु:खच मोठं आहे असं वाटेल तेव्हा या कहाण्या त्यातला फोलपणा दाखवतील, आणि पुढे जाण्यासाठी नवी उमेद मिळेल.

श्रीरंग_जोशी's picture

1 Apr 2015 - 2:18 am | श्रीरंग_जोशी

वरचे लेखन वाचताना मनाला वेदना होत होत्या. अत्यंत खडतर परिस्थितीला हिमतीने सामोरे जाऊन भोवतालच्या लोकांसाठी आदर्श बनणार्‍या सर्व स्वयंसिद्धांना दंडवत.

या निमित्ताने लोकांच्या साड्यांना फॉल लावताना सुई टोचून टोचून चाळणीसारखी दिसणारी माझ्या आईच्या हातांची बोटे आठवली.

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2015 - 1:41 pm | बोका-ए-आझम

_/\_

प्यारे१'s picture

23 Oct 2015 - 2:32 pm | प्यारे१

लेख उशिरा वाचला.
सगळ्या आई आणि आजी ना सलाम!

जिद्द म्हणजे काय ते आपापल्या आईकडून शिकावं.
72 ला सतराव्या वर्षी लग्न झाल्यावर 8 भावंडात लहान आईनं जवळपास चार सहा महिन्यात घराची स्वैपाक धुणी भांडी अमुक तमुक करत घराची कमान सांभाळली. शिक्षण एकत्र कुटुंब असल्यानं थांबलं. वडलांच्या लहान भाऊ बहिणींसाठी राबणे वगैरे नित्याचे. आजोबा नि काका कापड धंदा करणार पण बरीचशी उधारी. काकाचं लग्न झाल्यावर काका धंद्यात् आलेले पैसे त्याच्या सासरी पाठवणार आणि कापड खरेदी वडलांच्या पगारातून. आजोबा घरखर्च चालवणार. आत्याच्या लग्नात आईचे दागिने मोडून आत्या साठी दागिने. कापडाची देणी बांगड्या गहाण ठेवून. असला प्रकार. वैतागून शेवटी 80 च्या आसपास वेगळे झाले. तरी काका धंदा नाही होत म्हणून घरी पाचगणीला यायचा त्याला मदत सुरूच. कमी भाड्यात अतिशय मोडकळीला आलेल्या घरात आम्ही राहिलो होतो. संडास सरकारी, पाणी असंच इकडून तिकडून सरकारी नळावरून भरुन आणायचं.
84 साली SNDT मधून एक्सटर्नल बी ए साठी फॉर्म भरला आईनं. वडील शिक्षक. शाळेतून आल्यावर आईला ती स्वैपाक करताना वाचून दाखवणार. तोच अभ्यास. परीक्षेपुरतं हॉस्टेल ला जाऊन राहणं. तेव्हा आमची जबाबदारी बहिनींवर. या काळामध्ये शिवणकाम, ब्लाउज शिवणं, पाचगनीतल्या शाळांच्या यूनिफॉर्म शिवणं, पिको फॉल, ब्लैंकेट,चहा पावडर, सीजनल राख्या विकणं असे उद्योग.
या सगळ्या प्रकारात 87 ला आई बी ए झाली. लग्नानंतर 15 वर्षांनी. नंतर 89 ला वाई अर्बन बँक चं पिग्मी कलेक्शन चं काम सुरु झालं. 100 रूपयाला 3 रुपये कमीशन. त्याबरोबर ही ब्लाउज पीस विकणं वगैरे कामं सुरूच. बहिणींची शिक्षणं, त्यांचे राहण्याचे प्रॉब्लेम इत्यादि सगलं अईछ बघायची.
2003 ला आमची नोकरी सुरु झाल्यावर शेवटी डेली कलेक्शन चं काम बंद करुन थोड़ा आराम मिळाला पण नंतरही 2 3 दुःखद प्रसंग आलेच.
काहीही झालं तरी पहिल्यांदा आठवते ती आईच.

प्यारे१'s picture

23 Oct 2015 - 10:56 pm | प्यारे१

यात आणखी एक मुद्दा सांगण्यासारखा म्हणजे आईचे वडील वारकरी आणि घरात ज्ञानेश्वरी वाचन होतं त्याचा वारसा घेत आईनं जवळपास 50 60 आध्यात्मिक प्रवचनं मोठ्या व्यासपीठावर सुद्धा केली आहेत आणि रा से समितीचं काम आई अणि बहिणी सुद्धा करत असतात.

नाखु's picture

23 Oct 2015 - 2:46 pm | नाखु

धागा वर आणला त्याला कडक सलाम (त्या मुळे मी हा वाचू शकलो)

आणि आज नवरात्रीची आरती सफल झाली. सर्वाना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन...

कन्येसमान शिकविलेल्या बाहिणाचा भाऊ,जीवापाड प्रेम देण्यार्या सहचरीला स्वयंसिद्ध होतानाचा पाठीराखा

आणि आता छोट्या कन्येचा( वय वर्ष ७) हात धरून जगणं शिकणारा बाप नाखुस !!!!!

अनिता ठाकूर's picture

23 Oct 2015 - 2:56 pm | अनिता ठाकूर

वर उल्लेखलेल्या सर्व अनाहितांचे कौतुक वाटते. असे अनुभव लोकांपुढे आले पाहिजेत. कारण ते अस्सल आहेत.

एक एकटा एकटाच's picture

23 Oct 2015 - 7:51 pm | एक एकटा एकटाच

सलाम

आणि फ़क्त सलाम

चतुरंग's picture

23 Oct 2015 - 8:04 pm | चतुरंग

खरोखर स्वयंसिद्धा हे नाव समर्पक आहे.
या सगळ्या कहाण्या वाचताना एक गोष्ट राहून राहून जाणवली की अरे अबला म्हणून उल्लेख केला जाणे खरंच किती चुकीचे होते/आहे. या सगळ्या कुटुंबांवरती आलेल्या दुर्धर प्रसंगातून बहुतांश बायकाच खंबीरपणाने पुढे सरसावल्या आहेत. घरातलं 'कर्तं' माणूस गेल्यावर हाय न खाता पोटची पोरं घेऊन कुठेही जाण्याची आणि कसल्याही परिस्थितीतून त्यांना वर काढण्याची जिद्द बाळगणार्‍या या महिलांना साष्टांग दंडवत! _/\_

दुर्दैवाने माझी एक आज्जी मी ४ वर्षांचा असतानाच गेली आणि दुसरीला मी बघूही शकलो नाही. परंतु माझ्या आईचे उदाहरण समोर आहे.
माझ्या आईने इतके कष्टात बालपण काढले नसले तरी तिचे लग्न मॅट्रिक झाल्यावरच झाले. बीए, बीएड, ३ विषयात एमे, संगीतविषारद हे सगळं लग्नानंतर सासू-सासरे, दोन मुलं आणि आमचं घर सांभाळून तिनं केलं.
सातत्याने नवीन शिकण्याची तिची जिद्द अपार आहे. आमचा जुना वाडा आणि ४ भाडेकरु असल्याने आणि वडिलांना फार कशात पडून कामे करण्यात फारसा रस नसल्याने सगळी कामे खमकेपणाने तिला निभावून न्यावी लागत. तिने मला सगळी कामे शिकवली. गेलेला फ्यूज बदलण्यापासून ते, गच्चीला सिमेंट चुन्याचा गिलावा देण्यापर्यंत आणि डाळतांदूळ भिजवून कुकर कसा लावायचा, इथपासून चांगल्या भाज्या-फळं बघून कशी आणायची इथपर्यंत सगळं.
ती स्वतः इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल शिकलेली नसली तरी तिचा कॉमनसेन्स, गणिती दृष्टीने विचार करणे, उत्तम निरीक्षणशक्ती, कोडी सोडवण्याची आवड यातून माझ्यातली तांत्रिक विषयांची आवड उत्पन्न झाली. टेक्निकल माईंडसेट डेवलप झाला. लोकसंपर्क कसा करावा, कधी गोड बोलून, कधी नमतं घेऊन, कधी जरबेनं कामं कशी करुन घ्यावीत हे तिच्याकडून घेण्यासारखे.
आधी तिने महिलांचा लघुउद्योग पंधरा वर्षे चालवला आणि गेली तीस वर्षे ती एक उत्कृष्ठ बालवाडी चालवते आहे. सततोद्योग, जीवनाकडे आशावादी दॄष्टिकोनातून कसे बघावे आणि स्त्रियांना योग्य सन्मान देत त्यांच्याबरोबर सहजीवन कसे जगावे यांचा वस्तुपाठ मला तिने दिला याबद्दल मी तिचा कायम ऋणी आहे.

-रंगा

चाणक्य's picture

23 Oct 2015 - 8:09 pm | चाणक्य

हा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद. तेव्हा वाचायचा राहून गेला होता. फार प्रेरणादायी आहे हा धागा. कडक सलाम सगळ्या अनाहितांना

पद्मावति's picture

23 Oct 2015 - 8:27 pm | पद्मावति

हा अप्रतिम धागा वरती आणल्याबद्दल बोका ए आज़म यांचे अनेक आभार. पुन्हा पुन्हा वाचावे असे अनुभव.सगळ्यांच्याच कहाण्या किती प्रेरणादायक. एकेकीचे कष्ट वाचतांना अनेकवेळा रडूच येत होते. पण सर्व जणींनी ज्या जिद्दीने स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला कठीण परीस्थीतीमधून बाहेर काढले त्या जिद्दीला, परिश्रमाला तोड नाही.

आतिवास's picture

23 Oct 2015 - 8:59 pm | आतिवास

प्रेरणादायी.
वाचनखूणमध्ये जोडते आहे.

हे लेखन पुढे आणल्याबद्दल आभार.
वारंवार वाचावं असंच आहे हे :)

तर्राट जोकर's picture

23 Oct 2015 - 10:48 pm | तर्राट जोकर

इथे उल्लेख झालेल्या, न झालेल्या, जगातल्या सर्व रणरागिण्यांना पुन्हा पुन्हा सलाम! एक एक अनुभव तापल्या तव्यावर मारलेल्या पाण्याच्या सपकार्‍यासारखा....

मयुरा गुप्ते's picture

23 Oct 2015 - 11:34 pm | मयुरा गुप्ते

आज खर्‍या अर्थाने नवरात्रीची सांगता झाल्या सारखी वाटली.
ह्या अश्या असंख्य व्यक्तिमत्वांमुळे बुद्धिरूपेण,क्षुधारूपेण,शान्तिरूपेण,शक्तिरूपेण,दयारूपेण ह्या शब्दांचे अर्थ पडताळुन बघता आले.

-मयुरा.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

24 Oct 2015 - 1:36 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सगळ्यांना मनापासून वंदन.अतिशय प्रेरणादायी धागा.

नूतन सावंत's picture

25 Oct 2015 - 9:01 am | नूतन सावंत

जेव्हा हा धागा वाचला त्यवेळी सदस्यत्व नव्हते त्यामुळे प्रतिसाद देता आला नव्हता.आपल्या सर्वांच्याच आई,आजीनी कष्ट करून आपल्याला संस्कारांचा वारसा दिला आहे.सर्व अनाहिता कणखरपणे आणि जिद्दीने पुढे गेल्यायत आणि जाताहेत.जाताच राहतील.रुची अंकाच्या प्रकाशनावेळी याचा अनुभव मी घेतला आहे.काही अडचणी आल्या तेव्हा त्या दूर करायला सगळ्या वाघिणी लढाईला एका हाकेसरशी उभ्या राहिल्या आणि रुची विशेषांक देखणेपणाने प्रसिद्ध झाला.
सर्व अनाहिताना_/\_

दत्ता जोशी's picture

25 Oct 2015 - 9:45 am | दत्ता जोशी

सर्वांच्या कष्ट आणि संघर्षाला सलाम.__/\__
गरिबी आणि अडचणी खूप बघितल्यात पण यातले काही काही प्रसंग वाचून फार वाईट वाटले. 'दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है' याची परत एकदा प्रचीती आली. पुढील वाटचालीसाठी अनेक उत्तम शुभेच्छा.

माधुरी विनायक's picture

26 Oct 2015 - 12:08 pm | माधुरी विनायक

संघर्षाची अनेक रूपं आणि त्यांना सामोरे जाणारे आपण सगळे. मागे वळून पाहताना, त्याबद्दल लिहिताना पुन्हा एकदा दुखावले जातो. पण या दिवसांची जाण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे असं मनापासून वाटतं.
सर्व स्वयंसिद्धांना दंडवत आणि पुढच्या वाटचालीसाठी सप्रेम शुभेच्छा.

खूप चांगले आणि प्रेरणादायक अनुभव

खूप चांगले आणि प्रेरणादायक अनुभव