Skip to main content

उपासाचे कबाब!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 20/10/2015 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्रीचे नऊ दिवस उपास माझा नवरा गेली कित्येक वर्षे करतो.. पहिल्या २-३ माळा झाल्या की मग दूध, फळांवरून हळूहळू गाडी सा. खि., बटाट्याचा,रताळ्याचा किस, उपासाच्या भाजणीची थालिपिठ यावर येऊन ठेपते. काहीतरी वेगळे हवे आणि जास्त स्टार्ची,ऑयली नको अशी 'आखूडशिंगी बहुदुधी' डिश हवी असते. ह्यावर्षी ह्या मोडवर आल्यावर त्याने माझं डोकं न खाता चल जरा इंडियन स्टोअर मध्ये जाऊ असा विचार मांडला. तेथे गेल्यावर हा सुरण शोधू लागला. आता आम्ही काही राणीच्या देशात राहत नाही, ना उसगावात.. त्यामुळे आपल्याला हव्या त्या भारतीय गोष्टी हव्या तेव्हा मिळतीलच अशी खात्री अजिब्बात नसते आणि त्या परंपरेला अनुसरून सुरण काही मिळाला नाही.मग ह्या बाबाने लहानशी कच्ची पपई उचलली. "अरे ती पिकेपर्यंत दसराही होऊन जाईल, त्यापेक्षा पिकलेलीच घे ना.." ह्या माझ्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून केळावेफर्स करतो ती कच्ची केळी घेतली. "अरे,अरे.. ही तयार केळी घे ना.. " हे माझे म्हणणे बहुदा आजूबाजूच्या लोकांनीच ऐकले फक्त.. आता ह्याचे काय करायचे? ते कळू शकेल का मला? ह्या माझ्या प्रश्नाचे मात्र लगेच उत्तर आले.. कबाब! "क्काय?" मी दुकानात आहे हे विसरून किंचाळलेच. "कबाब? अरे उपास आहेत ना तुझे? कबाब कसले करतोस?" "अग बाई, उपासाचे कबाब! " "हॅ.. काहीतरी फेकू नकोस. मला फक्त शिगकबाब, रेशमी कबाब गेला बाजार हराभरा कबाब माहित आहेत आणि दसर्‍याच्या आधी मी ह्यातलं काहीही करणार नाहीये.." इति मी.. आमचे 'प्रेमळ संवाद' सुरू झालेत हे लक्षात आल्यावर पैसे चुकते करून तिथून बाहेरच पडलो. घरी येताना म्हटले हे असं काही नसतं, उपासाचे कबाब बिबाब मी पहिल्यांदाच ऐकतेय. तर त्यावर दिनेश म्हणाला, "इंजिनिअरिंगला असताना आम्ही हे उपासाचे कबाब खायचो नेहमी, एका उडप्याच्या हाटेलात. त्यालाच एकदा ते मेसमध्ये बनवायला सांगितले आणि मेसच्या आचार्‍याला रेसिपी शिकायला लावली. मग आमच्या मेसमध्येही बरेचदा होत असत." दिनेश मनाने कॉलेजच्या दिवसात पोहोचला होता. त्यामुळे मेसच्या आचार्‍याकडून ह्याने कधी ती रेसिपी शिकली हा प्रश्न मनातच ठेवून कसे आणि काय करायचे ते सांग? म्हणत मी एकीकडे त्याच्या नकळत दुसरा ऑप्शन म्हणून बटाटे उकडून ठेवले आणि फळे आहेत ना ते पाहून ठेवले. हा प्रयोग फसला तर .. अशी शंका मनात होतीच पण बोलून दाखवता येत नव्हती. एका मोठ्या केळ्याचे सालासकटच मोठे दोन तीन तुकडे करून ती सालं काळी होईपर्यंत मायक्रोवेव केली.(८०० वॅटला साधारण ३ते ४ मिनिटे) पपई अर्धी चिरली.मग साल काढून किसली आणि तीही मायक्रोतून वाफवून काढली.(८०० वॅटला आधी ३ मिनिटे ,मग बाहेर काढून एकदा वरखाली करून परत २ मिनिटे) आणि उरलेली अर्धी पपई फ्रिजमध्ये 'आ' वासून पडली. लागले तर असू देत म्हणून उकडून ठेवलेल्या बटाट्यातले २ मध्यम बटाटेही घेतले.(सुरण नव्हता ना, नाहीतर तो सुध्दा साधारण २ बटाट्यांच्या एवढा घेतला असता.) ४-५ हिरव्या मिरच्या, बचकभर कोथिंबिर आणि चमचाभर जिरं वाटले. त्यातलं चमचाभर वाटण बाजूला काढले. केळ्याची सालं काढून ती किसली. त्यावर उकडलेले बटाटे किसले त्यात वाफवलेला पपईचा किस असे तिन्ही किस एकत्र केले. त्यात जिरं मिरचीचे वाटण आणि मीठ घातले आणि हलके मळले. चक्क गोळा तयार झाला. आता ह्याचे हराभरा कबाब सारखे कबाब कर.. असा हुकूम आला. मग त्याचे कबाब तयार केले. . हे कबाब शॅलो फ्राय केले. वाडगाभर दह्यात एक मोठा चमचाभर दाण्याचं कूट, मीठ आणि मिरची+कोथिंबिर+ जिर्‍याच्या वाटणातलं चमचाभर वाटण घातलं. (समजलं आता चमचाभर वाटण बाजूला का काढून ठेवलं ते..) गरम गरम कबाब त्या दह्यातल्या इन्स्टंट चटणी बरोबर चक्क चांगले लागत होते. म्हणून हा रेसिपी प्रपंच! (आता ह्या सगळ्या गोष्टीतून रेसिपी शोधून काढायला सोपे जावे म्हणून ती ठळक केली आहे.) .

वाचने 14815
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

अतिशय टेम्प्टींग आणि नाविन्यपुर्ण पदार्थ. नक्की करणार

आत्मुभटा कडून अत्यंत धन्यवाद सदर पाक कृतिचि 1 प्रत आम्ही आमचे (गुरूजी लोकांना साबुदाणे) खिचड़ी खायला लावणायर्ा काही दू दू यजमानांस देणार आहोत.. करा अता हे उपवास कबाब म्हणाव!

In reply to by अत्रुप्त आत्मा

विधी आहे म्हणून सांगा. नैवेद्यास लागतात. सगळ्यांनी उपवास करायचा असतो नि हे 'स्वा(ती)दि(नेश)'ष्ट कबाब खायचे असतात.

'उपासाचे कबाब' हे शिर्षक वाचल्यावर माझ्या डोळ्यांसमोर तुर्की टोपी घातलेला एखादा मुसलमान सोवळं नेसून सत्यनारायणाच्या पुजेला बसल्याचा भास झाला. पाककृती सुरण घालून बनविली जाईल.

रेशिपी उत्तमच. अवांतरः अलीकडे उपवासाच्या नावाखाली अक्षरशः काहीही बनवले जाते. अता उपवासाचे चिकन पाहिले की डोळे मिटायला मोकळा =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

खाल्लंय की. साजूक तुपात बनवलेली बिर्यानी खाल्लेली आहे. पण ते कै उपवासाचं चिकन नाय होत. उपवासाच्या चिकनमध्ये तुमचे ते मसाले, तूप , कांदाटोम्याटो वगैरे चालत नाय. =))

मलाही वाटलं लेख उघडू का नको. ईटिव्ही ( कलर्स ) गुजराती चानेलवर असेच शाकाहारी पदार्थ फक्त नावं मोमो, कबाब ,हॅाट डॅाग्ज वगैरेनी असतात.कच्ची केळी ,सूरण,भरपूर हिरव्या मिरचा मिर्चा आणि चीज ( हे मात्र शाकाहारी आहे असा बय्राच जणांचा समज आहे)) घालून केलेले 'डिशेस' असतात. दुसरी एक शंका आली - दादरी घटनेचा निशेध म्हणून एका संस्थळावर बीफचे पदार्थ दिले जात आहेत तसं तर नाही? ठीक आहे. ही सळईवरची चमचमीत भजी चांगली दिसताहेत आणि चांगली का नाही लागणार?सादरीकरण छान आहे.

ही सळईवरची चमचमीत भजी चांगली दिसताहेतही सळईवरची चमचमीत भजी चांगली दिसताहेत
जरा मला अडाण्याला एक सांगा हो. सळई म्हणजे घुपसून फिरवून फिरवून भाजलेले की सळया असतेत त्यावर ठेवून भाजलेले? ग्रील म्हणतेत तेच ना? चकण्याला चालल काय? ;) रामकृष्ण हारी. येतेय इमान आमच्यासाठी आता लवकर. ;)

ते बघा अभ्या संपादकांनी वाखू साठवली आहे.उगाच हिकडं धाग्याचं भजं झालं तर आपण दसरा पाहणार नाही.तू आपली छानशी सरस्वती काढ बघू सळईची चुकलं आकड्यांची दसय्रासाठी.

In reply to by कंजूस

ते बघा अभ्या संपादकांनी वाखू साठवली आहे
मनमे लड्डू फुटा. एक सेकंदभर वाटले मगाशी मिपा १० मिनिटे बंद झालते तेव्हाच मालकानी मला संपादक केले की काय? ;) असो. सरस्वती येणार कंजूसकाका. पारंपारिकच येणार. :)

स्वातीताई, बर्‍याच रेशिप्या येऊन गेल्या तुझ्या! आता बोलवच मला. नवरात्रात बोलावल्यास पुण्य मिळेल. पाकृ व फोटू आवडले. गप्प बसल्या गेले आहे.

#अभ्या..,दहा मिनीटे मिपा बंद झाले अन मला वाटले मला संपादक केले की काय?"-- मिपा काय दौंड जंक्शन आहे दहा मिनिटात इंजेन बदलायला? इकडे कर्जतला इंजेनं साइडिंगला पडलेली आहेत तीनतीन-नंबराची वाट पहात.मेड-इन-जेपी तर म्हणे केव्हापासून शिट्या मारतंय असं ऐकून आहे.सगळी खटपट वाया जातेय. आता आम्ही जातो कारशेडला.

कबाब आवडलेच पण आधीच प्रास्तावीक अधीक आवडलं. फक्त तू दूकानात किंचाळताना कशी दिसशील हे ईमॅजीन करतोय.

एकदम सही. करुन बघेन.