आहारतज्ञाशी गाठ

अजया's picture
अजया in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:30 pm

जगण्यासाठी अन्न महत्वाचे आहे. आपल्या आहारात योग्य ती पोषकतत्वे असली तर शरीर निरोगी राहतं, शरीराची वाढ, विकास, शक्ती ह्यावर नियंत्रण ठेवता येतं. मानसिक आरोग्य संतुलित राहतं. आपण आपली जीवनशैली सुधारून, योग्य आहार घेऊन, व्यायाम करुन आरोग्यपूर्ण ठेवले तर आपले स्वास्थ्य निरोगी व शरीर सुदृढ बनेल. आणि यासाठीच रुची विशेषांक करायला सुरूवात करतानाच आहाराची योग्य माहिती आपण आहारतज्ञाकडूनच मिळवू असं ठरवलं होतं आणि तृप्ती ताम्हाणे या आहारतज्ञ मैत्रिणीची ओळखीतून गाठ पडली. तिनेही दिलखुलासपणे आम्हाला मुलाखत देण्याचे मान्य केले. या मुलाखतीदरम्यान आहाराचे अनेक पैलू नव्याने उमजले. अनेक गैरसमजांवर प्रकाश पडला. आहाराचे घटक, त्यांचे गुणधर्म, डाएट्स, लहान मुलांचा आहार इ. अनेक गोष्टींवर तृप्तीने तिचा तज्ञ सल्ला मनमोकळेपणाने दिलाय.

नक्की काय करते तृप्ती! त्यासाठी मुलाखत वाचण्याआधी थोडी तृप्तीची माहिती घेऊ.

तृप्तीने फूड सायन्स अ‍ॅण्ड न्युट्रिशनमध्ये B.Hsc केलंय आणि P.G.Diploma in Dietetics & Applied Nutrition केलाय. गेली बारा वर्ष ती आहारतज्ञ म्हणून काम करते आहे.

.

१. तृप्ती, डायटिशियनची आठवण फक्त वजन कमी करतानाच लोकांना येते! तुझ्या कामाचे स्वरुप ह्यापेक्षा मोठे आहे. त्याबद्दल काही सांगशील का?

खरे आहे, डायटिशियन म्हटली की लोकांना ती वजन कमी व वजन वाढवणे इतकेच काम करते असे वाटते. मग डायटिशियनकडे जाऊन पैसे का वाया घालवायचे, ती फार तर आहारात बदल करावयास सांगेल तो आपल्यालाही कसा करायचा ते माहित आहे आणि मग आपणच स्वतः इंटरनेटच्या मदतीने डाएट वाचून त्यांचा स्वतःवर प्रयोग करुया असे त्यांस वाटू लागते, त्यांचा परिणाम व दुष्परिणामांचा विचार केला जात नाही.

आहारात बदल हा बर्‍याच विकारांवर मात करण्यास मदत करतो, जसे की डायबिटिस, हृदयरोग, किडनीचे विकार, गाऊट, ब्लड प्रेशर (रक्तदाब), कॅन्सर, गरोदरपणातले आजार,शस्त्रक्रियेनंतरचा पथ्याचा आहार. इ.

आज भरपूर डायटिशियन्स ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत व त्यांची कामाची स्वरुपे ही निराळी आहेत, जसे फार्मास्युटिकल्स, Nutraceutical, हेल्थ-क्लब्स, डायबिटिस एड्युकेटर्स.

२. आहारात अत्यावश्यक असे घटक कोणते? ते वेग-वेगळ्या पदार्थात कसे वापरता येतील?

आहारतले आवश्यक घटक कार्बोदके, प्रथिने, फॅट्स, खनिजे असे आहेत.

* कर्बोदके:- हे आपल्याला अन्न, धान्यातून (एकदल धान्य) मिळतात. हे शक्ती प्रदान करणारे पोषक तत्त्व आहे. जसे की तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, तर कंदमूळ जसे बटाटा, रताळे, सुरण इत्यादी. आपल्या शरीराला हलतं ठेवण्यासाठी, कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते ती आपल्याला कर्बोदकातून मिळते. पिष्टमय पदार्थांचे सेवन आपल्या आहारात जास्त असते. हे पदार्थ रक्तात हळू-हळू शोषले जातात त्यामुळे शरीरात बराच वेळ ऊर्जेचा पुरवठा केला जातो. ह्याचे सेवन केल्यामुळे आपली भूक भागवली जाते.

* प्रथिने:- प्रथिने आपल्या शरीराच्या वाढीसाठी गरजेचे असते. आपल्याला डाळी, दूध, कडधान्य, मासे, चिकन, अंडी व मटणातून मिळतं. हे हाय प्रोटीन फूड आहे ज्यात अमायनो अ‍ॅसिड्सचे प्रमाण अधिक आहे. प्रथिने शरीराची वाढ करतात, प्रतिकारशक्ती चांगली ठेवतात, लाल व पांढर्‍या पेशींची योग्य वाढ करतात, केसांची, नखांची निगा राखतात, शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात, स्नायू बळकट करतात.

* फॅट्सः- स्निग्ध पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात. शरीराला शक्ती देतात. चरबीचे प्रकार हे विविध तेल, तूप, लोणी, बटर, असे आहेत. ३ टीस्पून / एक व्यक्ति / एक दिवस असे प्रमाण आहे. हे सर्व आपल्याला समतोल आहार घेतल्यास मिळतं. आपल्या शरीराच्या गरजेनुसार वरील घटकांचे प्रमाण कमी वा जास्तं असे होऊ शक्ते. अतिसेवनाने शरीर स्थूल बनते, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, मधुमेह, ब्लाड प्रेशरचा धोका वाढतो.

आपल्या आहार घेण्याच्या सवयीनुसार त्यामध्ये कमी-अधिक फरक करु शकता अन्यथा डाएटिशियनचा सल्ला घ्यावा.

* खनिज पदार्थः- खनिजे आपल्या शरीरात कमी प्रमाणात गरजेचे असतात. आपल्या ती आहारातून मिळतात जसे कॅल्शियम, हे हाडांच्या, दातांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. दूध, नाचणी, पालेभाज्या ह्यातून आपल्याला कॅल्शियम मिळतं. व्हिटॅमिन बी१२ च्या शोषणासाठी कॅल्शियम गरजेचे आहे.

लोह आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे, लोहाच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया होऊ शकतो. लोहाच्या सेवनाने अशक्तपणा व थकवा दूर होतो. सुकामेवा, डाळिंब, चिकन कलेजी, कडधान्यातून, पालेभाज्यातून लोह भरपूर प्रमाणात मिळतं. हिमोग्लोबिनसाठी लोह महत्वाचा घटक असतो.

पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, आयोडिनसारखे खनिजे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.

ह्यासोबतच शरीरपेशींची कार्यक्षमता वाढवण्याचे काम जीवनसत्वे करतात. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात, त्वचेच्या आरोग्यसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

३. समतोल आहार म्हणजे काय?

साध्या सोप्या भाषेत 'चौरस आहार'. तर फूड पिरॅमिडमधल्या या बेसिक फूड ग्रुप्सचा वापर आपल्या रोजच्या जेवणात करावा.

* मेद, तेल आणि विविध मिठायांचा वापर कमीत कमी करावा.
* दूध, दही आणि चीझ गट - २-८ सर्व्हिंग्स.
* ब्रेड, सिरिअल, भात आणि पास्ता गट - ६-११ सर्व्हिंग्स.
* भाज्या - ३-५ सर्व्हिंग्स.
* फळं - २-४ सर्व्हिंग्स.
* मीट, पोल्ट्री, अंडी, मासे, सुकामेवा आणि ड्राय बीन्स - २-३ सर्व्हिंग्स.

.

* छायाचित्र आंतरजालावरुन साभार

हे सर्व आपण आपल्या आजच्या व्यस्त व जंक फूडच्या जमान्यात सेवन करणे विसरलो आहोत.

४. वजन कमी जास्तं करण्याचा आहार सुचवताना तुम्ही काय काय गोष्टी विचारात घेता?

१. पेशंटचे वय, उंची, ती व्यक्ति स्त्री की पुरुष, त्यांचे सध्याचे वजन.

२. मग त्यांचे बीएमआय ( बॉडी मास इंडेक्स) काढले जाते. जिथे आपल्याला लक्षात येईल की ती व्यक्ती अंडरवेट, नॉर्मल, ओव्हर-व्हेट, ओबेस आहे का.

३. ह्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतर डाएट हिस्ट्री घेतली जाते ज्याला २४ तासांचा डाएट रीकॉल असे म्हटले जाते. मग ह्या सगळ्या माहितीच्या आधाराने आम्ही त्या व्यक्तीस आहार सुचवतो. असे करण्याचे अजून एक कारण असे की आमच्याकडे आलेली प्रत्येक व्यक्ति ही वेगळी असते व तिच्या असणार्‍या सवयीसुद्धा म्हणून कस्टमाईज्ड डाएट प्लान द्यावा लागतो.

४. बीएमआयप्रमाणे आहाराचे परिमाण बदलावे का? कसे?

बीएमआय हे आपल्या शरिराच्या जाडीचे मोज-माप आहे. जे आपणास हे सांगावयास मदत करते की आपण किती जाड व बारीक आहोत. जर आपण जाड असलो तर अन्नात काय व कसा बदल केला पाहिजे आणि बारीक असलो तर काय.

जसा आपण अन्नात बदल करु तसेच शारीरिक व्यायाम पण त्याच्या जोडीला तितकाच महत्वाचा आहे व तो नियमितरीत्या केला पाहिजे.

५. स्त्रीच्या आयुष्यात वेगवेगळ्या वयाप्रमाणे स्थित्यंतर सुरु असतात. त्या प्रत्येक फेजमध्ये आहारात काय बदल असणे आवश्यक आहे? उदा:- टीनएज, पाळी सुरु होणे, प्रेग्नंसी, मेनोपॉज.

ह्या प्रत्येक काळात त्या त्या काळाच्या गरजेनुसार स्वतःची काळजी घेणे हे खूप महत्वाचे असते.

* टीनएज:- रोज नियमित घरातल्या सर्व सदस्यांबरोबर जेवणे (रात्रीचे जेवण) तसेच सकाळचा नाश्ता एकत्र बसून करणे. जी मुले नियमितरित्या घरातून नाश्ता करुन शाळेत जातात ती अभ्यासात एकाग्र असतात. शक्य तितक्या वेळेला अन्न घरी शिजवणे (मोटीव्हेट टु इट मोर मील्स अ‍ॅट होम). असे केल्याने मुलांना घरच्या अन्नाचे महत्व पटवून देता येते. बाहेर, हॉटेलच्या जेवणात तेल, बटर, साखर, मीठ, इत्यादीचा वापर जास्त केला जातो तो टाळता येतो.

ह्या वयोगटातल्या मुलांनी पौष्टिक आहार घेतला पाहिजे. खूप फळे, पालेभाज्या खाणे किंवा अशा पदार्थांचे सेवन करणे ज्यात लोह व कॅल्शियम जास्तं असतील. शरीरामध्ये रक्तवाढीसाठी लोहाचा भरपूर पुरवठा असणे गरचे आहेत. आहारात कमतरता राहत गेली तर मुलांचे वजन कमी होते, उंची वाढत नाही, अशक्तपणा वाढतो. कमी पोषण मूल्ये असणारे अन्नाचे सेवन कमी करणे.

वाढत्या वयात पौष्टिक आहार घेणे हे निरोगी जीवनाचा पाया मजबूत करते.

* पाळी सुरु होणे:- ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड जे आपल्याला मासे किंवा तेलबियांपासून मिळते ते हृदयासाठीच नाही तर मेन्स्ट्रुअल पेनपासूनसुद्धा आराम देते. हाय फायबर फूड म्हणजेच फळं आणि भाज्यांचा आहारात वापर जास्तं करणे, ते पीएमएसमध्ये आराम मिळण्यास मदत करतात.

भोपळ्याच्या बिया - ह्यात मॅग्नेशिअम खूप असतं. या बिया शरीरात धरून ठेवले जाणारे पाणी कमी करण्यासाठी मदत करतात. तसंच त्यांच्यातल्या मॅग्नेशियममुळे आणि सेरिटोनिनच्या लेव्हल्स नियंत्रित करण्याच्या गुणधर्मामुळे या काळातले मूड स्विन्ग्ज कमी करण्यास मदत होते.

केळ्यातही पोटॅशियम व मॅग्नेशिअमचे प्रमाण भरपूर असते. रात्री सुखाने झोप येण्यासाठी केळे जरूर खावे! कारण यातले melatorim शांत झोप यायला मदत करते.

* प्रेग्नंसी:- गरोदरपण ३ टप्प्यात विभागलेले असते. पहिली, दुसरी आणि तिसरी तिमाही .

पहिल्या तीन महिन्यात (फर्स्ट ट्रीमेस्टर) आहारात फार बदल होत नाही. आपला रोजचा समतोल, चौरस आहार आहे तोच सुरु ठेवणे. आम्ही हेल्दी इटिंग प्रॅक्टिसेसना प्रोत्साहन देतो. चवथ्या महिन्यापासून (सेकंड ट्रीमेस्टर) ते नवव्या महिन्यापर्यंत (थर्ड ट्रीमेस्टर) आहारात फक्त ३००Kcals ची वाढ होते. उदा:- १ फळ, १ ग्लास दूध, १ चपाती / १ ब्रेड स्लाईस. ह्या व्यतिरिक्त भरपूर पाणी पिणे, स्टे हायड्रेटेड असा सल्ला दिला जातो कारण ह्या काळात ब्लड व्हॉल्युम पण वाढतो. गर्भवती महिलेने आहारात लोह, प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असलेले अन्नाचे सेवन केले पाहिजे. बध्द्कोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी, पाणी, सूप प्यावे, भाज्या खाव्यात, पुरेशी झोप घ्यावी, तंतूमय पदार्थ खावे.

ह्या अवस्थेत लोहयुक्त, कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा, जेवणाच्या नियमित वेळा असाव्यात, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम करावा.

Gestational diabetes आणि Eclampsia टाळण्यासाठी साखर व मिठाचे प्रमाण कमी करणे. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा, १०-१४ किलोपेक्षा जास्तं वजन वाढू देऊ नये.

* मेनोपॉजः- जर आहार संतुलित असेल , मेंटेन केले असले तर ऑस्टिओपोरॉसीस म्हणजेच हाडांची झीज,हृदयविकार होणे टाळता येईल. ह्या स्थितीत मनःस्वास्थ्य असंतुलित राहतं, चिडचिडेपणा वाढतो, ते टाळण्यासाठी पोषक आहारावर भर द्यावा. प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रथिनांची गरज असते.

पाणी:- रोज आठ ग्लास पाण्याचे सेवन करणे. मेनोपॉजमधे इस्ट्रोजन लेव्हल कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी होते, भरपूर पाणी प्यायल्यामुळे त्वचेतला ओलावा टिकून राहतो.

कॅल्शियम:-व्हिटॅमिन D:- दात आणि हाडांच्या बळकटीसाठी हे अत्यावश्यक आहे. याची दिवसाची आवश्यकता 600 IU आहे. उन्हात वावरल्याने हे व्हिटॅमिन आपण मिळवू शकतो. तसच याच्याही सप्लिमेन्ट्स डॉक्टरच्या सल्ल्याने घेता येतात.

फळं आणि भाजीपाला:- वयाबरोबर शरीराचे चयापचय क्रिया मंदावत जाते. योग्य प्रमाणात फळं तसच भाज्यांचे सेवन केल्यास वजन आटोक्यात तर राहातेच पण अनेक पोषकद्रव्य मिळतात.

टाळा:- मद्यपान, साखर, Caffeine युक्त द्रव्यांचं अतिरिक्त सेवन, अती मसालेदार अन्न या सर्व गोष्टींमुळे मेनोपॉजमधील हॉट फ्लॅशेसचा त्रास तसच युरिन इन्फेक्शनचा त्रास वाढू शकतात.

६. तुला नेहमी जाणवणार्‍या आहारातल्या चुका कोणत्या?

१. दिवसभरात रोज २-३ चमचे साखर आहारात चालू शकते. ही आपणास फक्त ६०Kcals देते. ह्या कॅलरीज आपण ३० मिनिटे व्यायाम करुन कमी करु शकतो. पण बरेच लोक पटकन सोपा मार्ग शोधून आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करु लागतात, हे सर्व करण्याची काहीही आवश्यकता नाही.

२. प्रेग्नंसीमध्ये ब्लड व्हॉल्युम वाढतो म्हणून आम्ही स्टे हायड्रेटेड असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ खूप सारे लिक्विड्सचे सेवन करा असे असते. उदा:- पाणी, भाज्या/फळांचे रस, व्हेज सूप्स, ताक, लस्सी इत्यादी. पण बरेच पेशंट्स त्याच्या विरुद्ध अर्थ लावून फक्त फ्रूट-ज्यूस प्यायला सुरुवात करतात. शक्यतो पूर्ण फळाचे चावून खावे, त्यात असणारे तंतू, चोथा हे शरीरास फायदा करतात. फळांमध्ये अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते.

रेडीमेड फ्रूट-ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्या कारणाने Gestational Diabetes (Preganancy related) होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

३. काही लोकं फक्त भाज्या / फळं असा डाएट करतात आणि त्याने तात्पुरते वजन कमी होते . हे सर्व फॅड डाएटचे प्रकार आहेत आणि त्याने फक्त वॉटरलॉस होतो. शरीरातले फॅट / चरबी कधी कमी होत नाही. नेहमी समतोल आहार घ्यावा व तो आहारतज्ञांच्या सहयोगाने करावा.

४. प्रथिने ही शरीराला आवश्यक आहेत पण अति प्रमाणात सेवन केल्याने त्याचे रुपांतर चरबीत होते व ते शरीरात साठून राहते.

स्त्री वा पुरुष:- प्रोटिन इंटेक ०.८ - १.० gm/kg of body weight

५. आठ ग्लासेस पाणी रोज पिणे. लोक दिवसभरात ३-४ ग्लासेस पाणी पितात. आठ ग्लासेस पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत जसे की:-

* वजन कमी करण्यास / होण्यास मदत होते.
* सुदृड व सुंदर त्वचा.
* पाणी शरीरांतर्गत अन्नरस वाहून नेण्यास मदत करतं.
* शरीरातील तापमान नियंत्रित ठेवतं
* युरीक अ‍ॅसिड, विष्ठा, मलमूत्र पाण्यामुळे शरीराबाहेर टाकले जातात.
* इन्फेक्शन होण्याची भीती कमी होते.
* तोंडाला चव राहाते.
* एकाग्रता वाढते.

६. नियमीत व्यायाम करणे आवश्यक आहे. निदान आठवड्यातून ४-५ दिवस तरी. पण बरेच लोकं आठवड्याचे सातही दिवस व्यायाम करतात. शरीराला १-२ दिवस आरामाची ही गरज असते. So it can give better output the next week when you exercise. तर आठवड्याला एक - दोन दिवस शरीराला आराम दिल्याने वजन पण कमी करण्यास खूप मदत होते.

७. ॠतुमानाप्रमाणे आहारात काय बदल करावेत?

१. सर्व ॠतुंमध्ये पौष्टीक आहार घेणे जे आपणास निरोगी ठेवण्यास मदत करतात व बर्‍याच संसर्गदोषांपासून बचाव करतात.

२. बदलत्या ॠतुंचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आपला आहार हा त्या-त्या हवामानानुसार असला पाहिजे. मुख्यत्वे बाहेरच्या पदार्थांच्या सेवनाने शरीराचे पोषण होत नाही, रस्त्यावरचे पदार्थ सगळ्याच ॠतुंमध्ये वर्ज्य करणे. तेलकट, तळलेले पदार्थ खाऊ नये. बाहेर, अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले पदार्थ हे शरिरासाठी घातक ठरु शकतं, ह्यात पोट बिघडू शकतं, फुड पॉयझनिंग होऊ शकतं त्यापेक्षा घरी बनवलेले ताजे अन्न खावे.

३. उन्हाळ्यात तेलकट, जळजळीत पदार्थ टाळावे. बाहेरचे वातावरण उष्मं असते अशावेळी चहा, कॉफी ह्यामध्ये कॅफेन असते. ह्याचे जास्त सेवन केल्याने डीहायड्रेशन होऊ शकतं, भूक कमी लागते. पाणी उकळून प्यावे, पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करावे. बाहेरची शीतपेये टाळावी त्यापेक्षा घरी बनवलेले ताजे लिंबू सरबत, कोकम सरबत, शहाळ्याचे पाणी, ताक प्यावे. ताज्या फळांचा रस शीतपेयांऐवजी पिऊ शकता पण शक्यतो फळं चावून खावीत, ती जास्त पौष्टिक. विविध धान्ये, सॅलॅड्स, कोशिंबीरांचा आहारात समावेष असावा. थंड पदार्थ बेताने घ्यावे.

४. पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी, आहार हलका व पाचक असावा. सौम्य मसाल्यांचा वापर करावा / खावे जे पचण्यास हलके व औषधी आहेत. उदा:- जिरेपूड, हिंग, हळद, आले, लसूण , कोथिंबीर, काळी मिरी. या गोष्टींच्या वापराने प्रतिकारशक्तीही वाढते. पाणी उकळून प्यावे. पालेभाज्या खाव्यात, कारली, कर्टोली अशा कडू रसाच्या भाज्या खाव्यात. सर्व फळं, भाज्या वाहत्या नळा खाली धरुन स्वछ धुवावे. पालेभाज्या चांगल्या निवडून, स्वच्छ धुवाव्यात. पालेभाज्या दहा मिनिटे व्हिनेगरच्या मिश्रणात भिजवून ठेवाव्या. ३० मिली व्हिनेगर अर्धा लिटर पाण्यात मिसळून मिश्रण तयार करावे. त्यात पालेभाज्या दहा मिनिटे भिजवाव्यात. व्हिनेगर ९९% बॅक्टेरिया मारतं. अन्न शिजवताना स्वच्छता ठेवावी.

५. हिवाळ्यात उष्णता देणारे पदार्थ जसे तीळ, बाजरी, शेंगदाणे, सुकामेवा, मूग असे पदार्थ आहारात घ्यावे. मोसमी फळे खावी. ह्या दिवसांत अनेक भाज्या मिळतात त्यांचे सेवन करावे.

६. थोडे-थोडे अन्न थोड्या थोड्या अंतराने खावे म्हणजे अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

८. वजन कमी करण्यासाठी निरनिराळी फॅड डाएट्स स्त्रीया करत असतात. त्यांचा परिणाम कमी दुष्परिणाम जास्तं अशी स्थिती असते. पोषक आहार ठेवून वजन कसं घटवावं?

फॅड डाएट्स / इंस्टंट वेटलॉस अशी भरपूर डाएट ऑप्शन्स आंतरजालावर उपल्बध आहेत आणि ती वजन कमी करण्यास मदत करतात, अगदी सात दिवसात ४ किलो असे, पण असे जरी असले तरी ही डाएट्स शरीरातील चरबी कमी नाही करत तर वॉटरलॉस करतात. यांचे दुष्परिणाम स्नायुंचा र्‍हास होणे, त्वचा निस्तेज दिसते, चेहरा मलूल दिसतो. सात दिवसानंतर आपण आपल्या रोजच्या आहाराला सुरुवात करतो तेव्हा पुन्हा वजन वाढण्यास सुरुवात होते.

पोषक आहार गरजेचा आहे. एका वेळेस एक पदार्थ आहारातून कमी करावा. उदा:- जर आपण दोन पोळ्या खात असाल तर सुरुवातीला १/२ पोळी कमी करावी. आठवडा-दहा दिवसांनी १/२ पोळी कमी करावी. पण जर सर्व अन्न एकदम कमी केले तर अशक्तपणा जाणवेल. सुरुवातीला वजन चांगले कमी होईल पण नंतर तिथेच स्थिरावेल. वजन वाढण्याच्या भितीने हाय प्रोटीन फूड आहारातून बंद केले तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, प्रोटीनच्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी होते, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचा त्रास होतो, वाढ नीट होत नाही. एकाग्रता कमी होते, चिडचिड वाढते, हळवं होतं मन.

आहारात तेलाचा वापर कमी करणे - ३ टीस्पून तेल एका व्यक्तीला दिवसाला पुरेसे आहे. तसेच साखर ही कमी प्रमाणात घ्यावी - ३ टीस्पून साखर एका व्यक्तीला दिवसा पुरेशी आहे.

सर्व प्रकारच्या भाज्या, फळे आपल्या रोजच्या आहारात असावे. शरीराला ह्या सगळ्यापासून जो चोथा मिळतो त्याचे चरबी व वजन कमी करण्यास खूप फायदा होतो. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आटोक्यात राहतं.

९. डायबेटिक डाएट, ब्लडप्रेशरच्या लोकांना डाएट असेही प्रकार असतात ना? ते काय असते?

डायबेटिज अथवा ब्लडप्रेशर ह्यात थोडाफार खाण्यात बदल होतो. पण असे जरी असले तरी ते आपला आहार सर्वसामान्यांसारखा करु शकतात. सर्व कुटूंब एकत्र जेवू शकतात तेच अन्न डायबेटिज व ब्लडप्रेशर असलेली लोकं जेवू शकतात.

* डायबेटिजमध्ये जेवणात भाताचे प्रमाण कमी करणे किंवा वर्ज्य करणे. आंबा, सीताफळ, चिक्कू व फणस ही चार फळे वर्ज्य करणे.

* रक्तदाबामध्ये मिठाचा वापर बेताने करावा, अनाठायी मीठ पदार्थांमध्ये वापरु नये जसे की काही कापलेल्या फळांवर किंवा सॅलॅडवर भुरभुरणे.

दोन्ही कंडिशन्समध्ये मीठाचे व तेलाचे प्रमाण कमी करणे. भरपूर सॅलॅड्स, भाज्यांचे सेवन रोजच्या जेवणात करणे. नियमीत ४५ मिनिटे चालायला जाणे किंवा व्यायाम करणे.

१०. लहान मुलांच्या आहाराबाबत आईचा नेहमी गोंधळ उडतो, त्याबद्दल जाणून घ्यायचे आहे

०-६ महिने स्तनपान दिलेच पाहिजे. आईच्या दुधातून बाळाला सर्व अन्नघटकांचा पुरवठा केला जातो. आईचे दूध पचायला हलके असते. साधारण सहाव्या महिन्यात आपल्या बाळास सॉलिड फूडची ओळख करुन देणे. ही सगळ्यात महत्वाची पहिली पायरी आहे व ह्यात खूप गंमत आहे, नवीन फ्लेव्हर्स वा टेक्स्चर्स बाळाला ओळखीचे करून देणे आईसाठी एक आव्हानच असतं!

सर्वात आधी आपले बाळ किती अन्न खाऊ शकते, त्यापेक्षा जास्तं महत्वाचं असतं टु गेटिंग देम युज्ड टु दी आयडिया ऑफ इटिंग. बाळांना अजूनही जास्त पोषण हे ब्रेस्ट मिल्क किंवा मिल्क फॉर्ममधून मिळेल. लहान बाळांना तीनवेळा सॉलिड फूडचा आहार देण्याची आवश्यकता नाही.

सुरुवात करताना वन फूड अ‍ॅट अ टाईम करणे व कमी प्रमाणात ते बनवणे व ते बाळाच्या किती आवडीचे आहे हे जाणून घेणे. हे फार महत्वाचे आहे. हळू-हळू त्याच अन्नाचे प्रमाण वाढवणे. फळांचा, भाज्यांचा रस, सुप थोडे-थोडे सुरु करावे. तृणधान्यांची पेज, नाचणीची खीर, रव्याची खीर सुरु करावी व हळू-हळू इतर धान्ये वापरुन पेज, खीरी द्याव्यात. नवव्या महिन्यापासून मऊ भात, वरण, तूप, मूगाची मऊ खिचडी, वाफलेल्या फळभाज्या असे द्यावे. याप्रकारे हळूहळू बाळ सर्व काही खायला शिकते.

*****

या मुलाखतीच्या निमित्ताने तृप्तीने आपल्याला आहाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती देऊन आहाराबाबत सजग केले आहे. यापासून योग्य तो धडा घेऊन आपण आहारचे योग्य पालन करून नक्कीच स्वतःला आणि पुढच्या पिढीला सुदृढ बनवू शकू.

धन्यवाद तृप्ती!

प्रतिक्रिया

मितान's picture

16 Oct 2015 - 10:23 am | मितान

मुलाखत आवडली!
अनेक मुद्दे नवीन आहेत माझ्यासाठी.

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 10:57 am | प्रीत-मोहर

असच म्हणते. यातल्या जास्तीत जास्त गोष्टी फॉलो करायचा प्रयत्न करेन

वेल्लाभट's picture

16 Oct 2015 - 2:24 pm | वेल्लाभट

सुरेख आणि अतिशय माहितीपूर्ण.

खूप छान समजावून सांगितलं आहे.
अगदी नेमके प्रश्न विचारून तू ही मुलाखत आमच्यासाठी उपयुक्त बनवली आहेस, त्याबद्दल धन्यवाद.

अजया तै बर झाल ही मुलाखत आली या अन्कात , कितीतरी पाळुन ठॅवलेले गैरसमज दुर झालें
डाएटचा बागुल बुवा पळाला ;) प्रमाणात खावुन पिउन वजन कमी करता येते हे भारीये :)

सानिकास्वप्निल's picture

16 Oct 2015 - 10:22 pm | सानिकास्वप्निल

अगदी छान झालीये ही मुलाखत, सोप्या भाषेत तृप्तीने आपल्याला समाजावून सांगितले आहे.
रुची अंकात आहाराबद्दल एका आहारतज्ञाकडून जाणून घेताना बर्‍याच गोष्टींची माहिती मिळत आहे.
फुड पिरॅमिडबद्दल छान माहिती. यातले आता मीसुद्धा कटाक्षाने फॉलो करणार.
धन्यवाद तृप्ती

पद्मावति's picture

17 Oct 2015 - 9:32 am | पद्मावति

सुंदर मुलाखत. खूप उपयुक्त माहिती मिळाली.

डायटिशियन म्हटली की लोकांना ती वजन कमी व वजन वाढवणे इतकेच काम करते असे वाटते...

खरंय, मलाही थोडंफार हेच वाटायचं. पण ही मुलाखत वाचून कळतं की डायटिशियन तुमच्या जीवनपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणते मग वजन कमी होणे हा त्याचा साइड एफेक्ट आहे.
सुंदर लेख आणि खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद

उपयुक्त माहिती. पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर 'नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे' असेच आमच्याबाबतीत होण्याची शक्यता जास्त आहे! :-)

मधुरा देशपांडे's picture

17 Oct 2015 - 7:01 pm | मधुरा देशपांडे

अत्यं उपयुक्त धागा. बरेच काही लक्षात ठेवायला हवे. धन्यवाद ताई तुला आणि तृप्ती यांनाही.

पैसा's picture

17 Oct 2015 - 7:57 pm | पैसा

तृप्तिला आमच्या सगळयां कडून खूप धन्यवाद सांग!

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 10:17 pm | नूतन सावंत

अजया,खूप छान मुलाखत घेतली आहेस.योग्य प्रश्न मुलाखत देणाऱ्याला विचारणेे ही एक कला आहे जी तुला पुरेपूर साधली आहे.तुप्तीलाही धन्यवाद.

अरे वा! सर्वसामान्यपणे आपल्या मनात येणार्‍या शंकांना समाधानकारक अशी उत्तरे तृप्तीताईंनी दिली आहेत.
फार्मास्युटिकल्स, Nutraceutical, हेल्थ-क्लब्स, डायबिटिस एड्युकेटर्स.
इतक्या विविध क्षेत्रात डाएटिशिअनची कामे असतात हे माहित नव्हते.
सध्या माझा सगळ्यात आवडता विषय म्हणाजे टीनएजरचा आहार यावरही त्यांचे मत वाचून आनंद झाला.
सर्वसमावेशक मुलाखत आवडली अजया!

मनिमौ's picture

18 Oct 2015 - 7:06 pm | मनिमौ

ही वाचुन अनेक गैरसमज दुर झाले.

पिलीयन रायडर's picture

19 Oct 2015 - 11:00 am | पिलीयन रायडर

मुलाखत आवडली. खुपच नवीन माहिती मिळाली.
हे लेख जर मुख्य बोर्डावर आणता आले तर अजुन जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचु शकते.

पिशी अबोली's picture

20 Oct 2015 - 1:34 pm | पिशी अबोली

नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे नुसतं नियमितपणे घरी चालू आहे तरी खूप सकारात्मक फरक पडतोय. या गोष्टी खरंच खूप फॉलो करण्यासारख्या आहेतच.
छान मुलाखत इथे दिल्याबद्दल धन्यवाद..

विभावरी's picture

20 Oct 2015 - 5:20 pm | विभावरी

खूप छान माहिती समजली .आहार तजांचे काम मोलाचे आहे आजकालच्या धावपळीच्या युगात .

इशा१२३'s picture

21 Oct 2015 - 4:41 pm | इशा१२३

छान! उपयुक्त माहिती.भरपुर नविन गोष्टि समजल्या.

ताई मुलाखत आवडली. उपयुअक्त माहिती. :)

छान झालीये मुलाखत ..अतिशय उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत ..

मंजूताई's picture

22 Oct 2015 - 3:15 pm | मंजूताई

मुलाखत, आवडली. उपयुक्त माहिती.

उपयुक्त माहिती.धन्यवाद.

यातली बरीच माहिती नविन आहे नक्कीच उपयोग होईल.

स्नेहल महेश's picture

26 Oct 2015 - 3:50 pm | स्नेहल महेश

सुरेख आणि अतिशय माहितीपूर्ण.

स्वाती दिनेश's picture

26 Oct 2015 - 5:18 pm | स्वाती दिनेश

उपयुक्त माहिती.
स्वाती

विशाखा राऊत's picture

28 Oct 2015 - 3:53 am | विशाखा राऊत

खुप मुद्देसुत माहिती

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:29 pm | कविता१९७८

छान माहीती.