भेंडी पुराण

Primary tabs

विशाखा राऊत's picture
विशाखा राऊत in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:36 pm

आपल्याला नेहमी सांगितले जाते की भाज्या खाणे आरोग्याला गरजेचे असते. भेंडी ही भाजी अशी आहे कि ज्याला आवडते त्यांना खूपच नाहीतर मग नो नो नो. कोणीही करु दे चेष्टा भेंडीची पण भाजीत भाजी भेंडीची आणि भेंडी माझ्या प्रितीची!

.

* छायाचित्र आंतरजालावरुन साभार

मग चला तर आज भेंडी पुराण मध्ये काही नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळे प्रकार बघुयात.

१. भेंडीची भाजी :

भेंडी धुवून, स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. बारीक चिरून घ्यावी. तेल गरम करून त्यात आले लसुण ठेचून घालावा आणि परतून घ्यावे. मग त्यात चिरलेली भेंडी आणि कोकम घालून परतून घ्यावे. भेंडी शिजताना त्यावर झाकण ठेवू नये. कोकम घातल्याने भेंडीचा चिकटपणा कमी होतो. चिकटपणा कमी झाल्यावर त्यात तिखट, मीठ घालून नीट एकत्र करून घेणे. मग भाजी नीट शिजली की शेंगदाण्याचा कुट घालून परत एकदा परतून घेणे. मस्त गरम थोडीशी कुरकुरीत भेंडी भाजी तयार.

२. भरली भेंडी : (प्रकार १)

भेंडीला मधोमध एक चीर देणे. जर खुप लांब असेल तर दोन तुकडे करून मग चीर देणे. सारण करण्यासाठी बेसन, कोरडे किसलेले खोबरे भाजून घेणे. त्यात दाणे कुट, मीठ, साखर, तिखट, कोथिंबीर, लिंबाचा रस किंवा आमचुर पावडर, धणे जीरे पुड, थोडासा गरम मसाला हे नीट एकत्र करून घ्यावे. किंचित ओले करून करून घ्यावे. आता हे सारण भेंडीमध्ये भरावे. तेल गरम करून भेंडी शॅलो फ्राय करून घ्यावी. अगदीच सारण भरायचा कंटाळा आला तर आधी गरम तेलात भेंडी फ्राय करून मग हे सारण त्यात एकत्र करावे. चुरचुरीत चमचमीत भेंडी फ्राय तयार आहे.

३. भरली भेंडी : (प्रकार २)

भेंडीला मधोमध एक चीर देणे. जर खुप लांब असेल तर दोन तुकडे करून मग चीर देणे. सारण करण्यासाठी शेंगदाण्याचा कुट, आले लसुण पेस्ट, तिखट, मीठ, धणा जीरा पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, लिंबाचा रस किंवा आमचुर पावडर एकत्र करून भेंड्यांमध्ये भरून घ्यावे आणि तेल गरम करुन शॅलो फ्राय करून घ्यावे. चुरचुरीत चमचमीत भेंडी फ्राय तयार आहे.

४. भेंडी बटाटा फ्राय :

बटाटा आणि भेंडी बारीक चिरुन घेणे. तेल गरम करून आधी बटाटा कुरकुरीत परतून घ्याव्या. नंतर त्यात भेंडीचे तुकडे परतून घ्यावेत. भेंडी सोबत कोकम सुद्धा घालावे. भेंडी बटाटा मस्त कुरकुरीत झाला की मीठ, तिखट, साखर घालुन नीट एकत्र करून घ्यावे. गरमागरम भेंडी बटाटा फ्राय तयार आहे.

५. भेंडी दो प्याझा :

भेंडीचे मोठे तुकडे करवेत. तेल गरम करून त्यात भेंडी परतून घ्यावी. आता परतलेली भेंडी बाजूला काढून ठेवावी. त्यातच थोडे तेल गरम करून जीरे, हिंग, आले लसुण पेस्ट परतून घ्यावी. त्यात उभा चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यात टोमाटो परतून घ्यावा. तिखट, गरम मसाला घालून सगळे एकत्र करावे. आता त्यात थोडेसे दही घालून परतुन घ्यावे. परतलेली भेंडी, कसुरी मेथी, मीठ घालून नीट एकत्र करून मस्त एकत्र करावे. कोथिंबीर घालून गरमागरम भेंडी दो प्याझा खायला तयार.

६. भेंडीचा रायता :

भेंडी बारीक चिरून तेलात कुरकुरीत तळुन घ्यावी. दह्यामध्ये मीठ, साखर, तिखट घालून एकत्र फ़ेटून घ्यावे. तेल गरम करून मोहरी, जीरे, हिंगाची फोडणी करावी आणि दह्यामध्ये एकत्र करावी. खायला घेताना दह्यामध्ये तळलेली भेंडी, चाट मसाला, कोथिंबीर घालून एकत्र करावे. ज्यांना मऊ मऊ भेंडी आवडते त्यांनी आधी रायता तयार करून ठेवावा. मला कुरकुरीत आवडते म्हणुन मी आयत्या वेळी दही आणि भेंडी एकत्र करते.

७. भेंडीचे कालवण :

हा प्रकार मला माझ्या वडीलांनी शिकवला. श्रावणात नामसप्ताह चालू असला की घरी मासे चिकन अजिबात बनत नाही अशा वेळी हे कालवण तारणहार असते. ओले खोबरे, थोडासा कांदा, लसुण, तिखट, थोडीशी कोथिंबीर ह्याचे वाटण करून घ्यावे. आता तेल गरम करून त्यात थोडासा कांदा परतून घ्यावा. जास्त कांदा वापरू नये त्याने कालवण बुळबुळीत होते. आता त्यात वाटण घालून परतून घ्यावे. त्यात भेंडी घालून एकत्र करावे. भातासोबत खाता येईल इतके पाणी घालून पातळसर करून घ्यावे. कोकम घालून उकळी आणावी. भेंडी शिजली की मीठ घालुन नीट एकत्र करून घ्यावे. ह्यात आधी परतून घेवून सगळ्या वाटपाला उकळी आली की शेवटी भेंडी घातली तरी चालेल. कोथिंबीर घालून गरमागरम भातासोबत कालवण म्हणजे स्वर्गसुख.

८. भेंडी फ्राय :

भेंडी उभी चिरून घ्यावी. तेल गरम करून त्यात भेंडी कुरकुरीत परतून घ्यावी. कोकम वापरले तर ते भेंडी परतत असताना घालवे. ह्यात तिखट, मीठ, गरम मसाला, धणे जीरे पुड, कोकम वापरले नसेल तर आमचूर घालून नीट परतून घ्यावे. भेंडी फ्राय तयार आहे.

अशाप्रकारे भेंडीचे वेगवेगळे प्रकार करत राहावेत आणि भेंडीवर अपार प्रेम आणि निष्ठा कायम ठेवावी.
इति श्री भेंडी पुराण समाप्ती.

प्रतिक्रिया

पैसा's picture

16 Oct 2015 - 12:29 pm | पैसा

मस्त! भेंडी कोणाला आवडत नाही म्हणे? या असे समोर!!

उमा @ मिपा's picture

16 Oct 2015 - 12:33 pm | उमा @ मिपा

भाजीत भाजी भेंडी माझ्याही प्रीतीची. वरण भात आणि कुरकुरीत चमचमीत भेंडी... हा आवडीचा मेन्यू. या सर्व रेसिपीज साठवून ठेवणार आणि नक्की करणार गं. छान लिहिलंयस.

भाजीत भाजी माझ्याही आवडीची.एक एक प्रकार करुन पाहिन आता.भरली भेंडी विशेषतः!

विशाखा राऊत's picture

16 Oct 2015 - 1:53 pm | विशाखा राऊत

ह्या भेंडीपुराणामध्ये मला मदत इशा१२३ ने केली आहे. धन्यवाद इशा१२३ :)

इशा१२३'s picture

17 Oct 2015 - 11:48 am | इशा१२३

आभार काय ग!मेहनत तुझीच आहे.
छान लिहिले आहेस पुराण.

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 2:25 pm | प्रीत-मोहर

मी तर भेंडी दिवसाचे तीनही वेळा आठवड्याचे सारे दिवस खाउ शकते. इ लोवे योऊ विश.
आमच्या घरी गावठी भेंडीची लागवड करतात. तर ते ताजे ताजे कोवळे भेंडे तिखट मीठ लावून खायला ही यम्मी लागतात

वेल्लाभट's picture

16 Oct 2015 - 5:55 pm | वेल्लाभट

सुरेखच
तुम्ही जी भेंडी दो प्याझा म्हटलीत तशीच काहीशी असलेली 'दम भेंडी' माझी आई करते. मस्त लागते.

अनन्न्या's picture

17 Oct 2015 - 11:02 am | अनन्न्या

माझ्या नवय्राला भेंडीची भाजी आवडत नाही, त्यामुळे कधीतरीच दुसरीभाजी करयला वेळ असेल तर आणते मी भेंडी. बरेच प्रकार दिलेस, आता करून पाहते एकेक.

चला..भेंडीची परतून आणी चिंचगूल याशिवाय भरपूर Variety समजली..आता एकेक करुन पाहीन..

इशा१२३'s picture

17 Oct 2015 - 12:00 pm | इशा१२३

सहज गप्पांमधे भेंडिच्या भाजीचे प्रकार चर्चा करतानाच हे सगळे धागा स्वरुपात अंकात येउदेत हि कल्पना अजयाची.विशने लगेच संकलन करुन धागा तयार केलाहि.

प्यारे१'s picture

18 Oct 2015 - 3:01 pm | प्यारे१

मिसिंग लेडी फिंगर्स इन ऑल सेन्सेस. ;)

सामान्य वाचक's picture

18 Oct 2015 - 10:49 pm | सामान्य वाचक

लहान मुला ना विशेष आवडते
नुसती भेंडी कच्ची खायला सुद्धा छान लागते

हाहा's picture

19 Oct 2015 - 2:10 pm | हाहा

मस्त कलेक्षन झालंय रेसिपीज चं

सानिकास्वप्निल's picture

19 Oct 2015 - 8:12 pm | सानिकास्वप्निल

भेंडी अतिशय आवडती भाजी, चिंच-गुळाची सोडल्यास भेंडी कुठल्याही प्रकारे खाऊ शकते.
विविध प्रकारे बनवता येईल आता, संकलन छान झाले आहे.
धन्यवाद :)

प्रश्नलंका's picture

19 Oct 2015 - 9:03 pm | प्रश्नलंका

मस्तं कलेक्शन विशाखा..छान लिहिलयंस. नक्की करुन बघण्यात येतील हे प्रकार. :)

नूतन सावंत's picture

20 Oct 2015 - 7:27 pm | नूतन सावंत

विशाका,खूप सुरेख संकलन.माझ्या नवऱ्याला भेंडीची भाजी नुसती तिखट,मीठ,हळद घालून परतून वाढली तरी चालते.त्याच्यासाठी मी नव नव्या पाककृती शोधतच असते.त्यात तुझ्यामुळे नवी भर पडलीय बरं का!धन्यवाद.

भुमी's picture

21 Oct 2015 - 1:03 pm | भुमी

भेंडी पुराण चवदार झालंय...

आहाहा.. भेंडी सगळ्यात आवडीची भाजी. मी आठवड्यातले ७ हि दिवस भेंडीची भाजी खाऊ शकते. वरण, भात आणि परतले भेंडीची भाजी अप्रतिम.
पण मला ती कांदा-टोमॅटो टाकुन किंवा पातळ भाजी नाहि आवडत.

वा! वा! ही भाजी रोज केली तरी आवडेल अशी आहे. तुला माहितियेत तितके प्रकार मला माहित नव्हते. परतलेली भेंडी, चिंच गुळाची भेंडी व भरली भेंडी एवढेच माहित होते. आता भेंडी मिळेल तेंव्हा यातील नवीन प्रकार करीन.

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2015 - 11:52 am | बोका-ए-आझम

ही मी कधीही, कुठेही, कितीही आणि कशीही खाऊ शकतो. लेख मस्तच.

भेंडी अजिबात आवडत नाही! खूप प्रयत्न केले! आता सारी भिस्त या लेखावर ;)

पद्मावति's picture

24 Oct 2015 - 8:41 pm | पद्मावति

भेंडिची भाजी माझीही खूप आवडीची. खूप छान पाककृती. मस्तं लेख. आवडला.

मधुरा देशपांडे's picture

25 Oct 2015 - 2:08 am | मधुरा देशपांडे

भेंडी पुराण मस्तच.

आरोही's picture

25 Oct 2015 - 12:27 pm | आरोही

फक्त fry भेंडी आवडते ..या रेसिपीने करून बघते आता वेगवेगळे प्रकार !

भेंडी अजिबात आवडत नाही. हीच एकमेव भाजी मला आवडत नाही. अगदी कारलेपण आवडते. पण भेंडी? नो नो नो. ;-)

लेख छान आहे!

स्वाती दिनेश's picture

25 Oct 2015 - 11:13 pm | स्वाती दिनेश

आवडते, तुझे भेंडी पुराणही आवडले.
स्वाती

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:24 pm | कविता१९७८

लेख छान आहे, पण भेंडी अज्जिब्बात आवडत नाही, कशीही बनवली तरीही