परीजन्माची कहाणी - https://misalpav.com/node/27398
परीकथेचे सव्वा वर्ष - https://misalpav.com/node/32062
परीकथा २ - सव्वा ते दिड वर्ष - https://misalpav.com/node/32553
३१ ऑगस्ट २०१५
सध्या आमच्याकडे रोज डंबशेराजचा खेळ चालतो.
जीभ बाहेर काढून ती बोटाने त्यावर टिकटिक करते, तेव्हा तिला जेली नाहीतर चॉकलेट खायचे असते.
हाताने हवेत गोल गोल रेघोट्या मारते, तेव्हा पाटीवर खडू गिरवायचा असतो.
जेव्हा तोच हात वायपरसारखा फिरवते, तेव्हा ते गिरवलेले साफ करायला डस्टर हवा असतो.
फोन हवा असल्यास हात कानाला लावते, तर झोपायचे असल्यास तसाच हात कानाला लावत मान झुकवते. (गधडी झोपत काही नाही ती गोष्ट वेगळी)
सकाळी आंघोळ करायचा मूड होतो, तेव्हा डोक्यावर तेल किंवा शॅंपू चोळल्यासारखे करते.
दूध असो वा पाणी, अभ्यासाचे पुस्तक असो वा खेळण्यातला घोडा.. प्रत्येकाच्या खाणाखुणा ठरलेल्या आहेत.
छोटा बॉल आणि मोठा बॉल यांच्याही खुणा वेगवेगळ्या आहेत.
ईतकेच नाही तर कुठले विडीओ सॉंग लावायचे, हे देखील त्या त्या गाण्यातील सिग्नेचर स्टेप्सवरून ठरवले जाते.
एकदा ‘लहान माझी बाहुली’ गाणे लावावे म्हणून चक्क बाहुली ऊचलून आणलेली..
नाही म्हणायला कधीतरी अचानक एखादा शब्द उच्चारते, पण तो ठरवून रीपीट काही करता येत नाही.
त्या दिवशी तिला फ्रिजमधून काहीतरी हवे होते, काय हवे होते याची आम्हाला कल्पना होती. पण आता ते ईशार्यांनी कसे सांगते या कुतुहलापोटी मुद्दामच विचारले, "बाबड्या काय हवेय?"
तर सरळ तोंडातून शब्दच उच्चारले.., "चीज!"
आम्ही पुन्हा पुन्हा विचारले, तर तिने पुन्हा पुन्हा ‘से चीज’ केले.
गेले कित्येक दिवस आम्ही, ‘आधी मम्मी की आधी पप्पा’ याची वाट बघतोय, पण गधडी खाऊची वस्तू बरोबर बोलू लागली. या बाबतीत ही मुलगी कन्फर्म आईवरच गेलीय :)
.
.
७ सप्टेंबर २०१५
सोफ्याच्या हातावर, खुर्चीच्या दांड्यावर..
बेडच्या काठावर, पिठाच्या डब्ब्यावर..
अन पुढच्या वर्षी खांद्यावर ..
आमच्या घरातून एक गोविंदा निघायचे फुल्ल चान्सेस आहेत :)
.
.
१० सप्टेंबर २०१५
तेच तेच घर आणि तीच तीच माणसं, आम्हाला बोर होतात.
आता आम्ही माणसं तर बदलू शकत नाही, आणि घरही दुसरे शोधू शकत नाही.
म्हणून आम्ही घरातल्या घरातच बदल करतो.
बेडरूममधले कपड्याचे कपाट, खेचत खेचत हॉलमध्ये आणतो.
हॉलमधील टीपॉय, सरकवत सरकवत किचनमध्ये सोडतो.
खेळण्यांचा तर जन्मच इथे तिथे भिरकवायला झाला असतो.
तेच हाल आम्ही खुर्च्यांचेही करतो.
कधी पाटावर धाड पडते, तर कधी झाडूवर.
सकाळी जो घराचा नकाशा असतो, तो रात्र होईस्तोवर बदलला असतो.
मॉरल ऑफ द स्टोरी काय,
तर सिविल ईंजिनीअरच्या घरी ईंटरीअर डिजाईनर जन्माला आलीय. :)
.
.
११ सप्टेंबर २०१५
आजकाल संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर, परी हाताला धरून मला हॉलमध्ये नेते आणि पंख्याखाली बसवते.
नाही, हवा खायला नाही. तर ती तिची अभ्यासाची जागा आहे.
हातात खडू सोपवते आणि पाटी समोर धरते. रोज आम्हाला चित्ररुपात, आमचा फॅमिली ट्री काढायचा असतो.
आधी परी, मग मम्मी, मग पप्पा.. मागाहून मावश्या, आज्जी आजोबा.. एकापाठोपाठ एक सारे चेहरे, त्या दहा बाय अठराच्या पाटीवर जमा होतात. मग खेळता खेळता अभ्यास म्हणून मी एकेक अवयव उच्चारून रेखाटतो. आता परीचे डोळे, परीचे कान, परीचे नाक, कपाळावरची टिकली आणि सर्वात शेवटी केसांचे फर्राटे मारून चेहर्याला पुर्णाकार देतो. पण तिचे समाधान काही होत नाही. ‘पिक्चर’ अभी बाकी है मेरे दोस्त, म्हणत स्वताच्या गालाला हात लावते अन मला गाल रेखाटायला सांगते.
मग काय! कधी मिश्या काढल्या जातात, तर कधी दाढी काढली जाते. तर कधी चेहर्यावरच्या त्या मोकळ्या जागेत गोलमटोल टमाटर काढले जातात. पण देवाss या टू डायमेंशनल चित्रामध्ये गाल कसे काढतात हे मला आजवर समजले नाही.
सरतेशेवटी तिचाच गालगुच्चा घेऊन वेळ मारून नेतो. :)
.
.
१३ सप्टेंबर २०१५
देवावर माझा विश्वास तसा कधीच नव्हता..
आजही नाहीयेच!
पण भूतांवर मात्र हळूहळू बसू लागलाय..
रोज सकाळ संध्याकाळ ती आमच्या अंगात येतात :)
.
.
१५ सप्टेंबर २०१५
घोड्यावर बसून फिरायचे दिवस गेलेत..
आता घोड्यालाच उचलून फिरवायचे दिवस चालू झालेत.
कधी आम्ही त्याला पाणी पाजतो, तर कधी त्याच पाण्याने आंघोळ घालतो.
कधी प्रेमाने त्याचे तोंड चाटतो, तर कधी थाडथाड थोबाडात मारतो.
त्याची इच्छा असो वा नसो, त्याला काही ना काही अगम्य भाषेत सुनावत राहतो.
आधी तो आम्हाला या घरातून त्या घरात न्यायचा, आता आम्ही त्याची आयाळ पकडत इथून तिथे फरफटत नेतो.
असे वाटते, एका मुक्या प्राण्याने दुसर्या मुक्या प्राण्याशी कसे वागावे याचे कायदेकानून बनवायची वेळ आलीय :)
.
.
१७ सप्टेंबर २०१५
लहान मुले शक्यतो दाढीवाल्यांना घाबरतात. आमच्याकडे अर्थातच उलटे आहे. कारण दाढीवाला प्रेमळ बाबा घरातच आहे.
तरी परी लहान असताना जेव्हा पहिल्यांदा मी दाढी काढून तिला दर्शन दिले होते. तेव्हा माझे सटासट रूप पाहताच, रडून रडून नुसता धिंगाणा घातलेला. तिची ओळख पटावी की मीच तिचा बाबा आहे म्हणून नेहमीच्या वाकुल्या करून दाखवाव्या लागलेल्या. अर्ध्या तासाने मला नेहमीसारखे घरच्या कपड्यांमध्ये वावरताना बघून जवळ तर आलेली, पण उचलून घेताच कितीतरी वेळ संशयिताच्या नजरेने माझ्या चेहर्याकडे बघत होती.
आज पुन्हा एकदा दोनअडीज महिन्यांची वाढलेली दाढी साफ केली. पण आज मात्र मला बघताच आनंदाने बागडू लागली. कदाचित तिला समजले असावे. दाढी असो वा नसो, त्यामागचा माणूस तसा चांगला आहे :)
.
.
१९ सप्टेंबर २०१५
आज आमचा ढाई फुटीया देढ वर्षांचा झाला :)
आजपासून "नया दौर" सुरू
घोड सवारी बंद, आणि सायकलिंग चालू :)
Birth Day Gift - सायकल
courtesy - परीच्या मावश्या
.
.
२५ सप्टेंबर २०१५
सध्या आमच्याकडे "अफगाण जलेबी" गाणे फुल्ल हिट आहे
आणि जिला त्यावर नाचायला आवडते तिला ती उपमा सूटही होते.
एकाचवेळी जिलेबीचा गोडवा आणि तालिबानी आतंकवाद, हे तीच जमवू शकते. :)
.
.
२६ सप्टेंबर २०१५
लोकांनाही काय एकेक उपमा सुचतील काही नेम नसतो ..
काल परी बरोबर नरेपार्कच्या गणपतीदर्शनाला गेलो होतो. तिथेच जत्राही भरली होती. तूफान गर्दी होती. पण त्या गर्दीतही मिळेल त्या जागेत ती बागडत होती. साहजिकच तिच्या पाठी पाठी मी देखील होतोच. असेच ती धावत धावत एका बायकांच्या ग्रूपसमोर आली. त्यातल्या एका बाईची नजर पडताच ती ईतरांना म्हणाली, "ए बघा ही कसली बाहुलीसारखी आहे". दुसरीही तिचीच री ओढत म्हणाली, "हो ग्ग, अगदी बाहुलीच दिसतेय". तिसरी सुद्धा पटकन बोलून गेली, "अय्या हो खरंच ग.. पांढर्या मैद्याची पिशवीच जणू" ... खरंच, लोकांना काय उपमा सुचतील काही नेम नसतो. हे कौतुक आहे की टोमणा, त्यावर पलटून स्माईल द्यावी की रागानेच बघावे, मला क्षणभर समजेनासे झालेले :)
.
.
२८ सप्टेंबर २०१५
परवा रात्री उशीरा बाहेरून हादडून घरी आलो. परीलाही कधी नव्हे ते थोडेसे चॉकलेट खाऊ घातले होते. कुठून तिला सुचले देवास ठाऊक, पण ब्रश करायचा आहे म्हणत माझ्याकडे हट्ट करू लागली. मी म्हटले, ठीक आहे. तसेही रात्रीचे चॉकलेट खाणे झाले आहे, तर ब्रश करणे फायद्याचेच ठरेल. पण हा हट्ट पुरवताच तिची पुढची फर्माईश, मी सुद्धा तिच्यासोबत ब्रश करावा. काय करणार, नाईलाजाने घेतला ब्रश हातात. तसेही हे आमच्या सुट्टीचे रूटीनच आहे. दोघे सकाळी अकरा बारा वाजता एकत्र उठणार आणि आआ आआ करत सोबत ब्रश करणार. पण म्हणून रात्रीचा ब्रश !! याआधी स्वत:साठी म्हणून रात्रीचा ब्रश कधी केला होता ते आठवत नाही, पण लहानपणी सकाळचाही ब्रश करायचा आळस म्हणून खोटे खोटेच ब्रश ओला करत, आईला झाला माझा ब्रश करून म्हणत फसवल्याचे आठवतेय. त्यामुळे अश्यावेळी कधी कधी बरंच वाटते, की पोरगी सर्वच ‘गुण’ बापाचे घेत नाहीये. :)
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
यापूर्वीच्या भागांप्रमाणे हासुद्धा भाग मस्त.
परीला भेटायलाच हवं एकदा..
हा हा हा
नूस्त हां हां हां हां हां हां हां हां हां हां हां हां हां हां हां हां हां हां हां हां हां.
लहान मूल घरात असन खरच मज्जा आहे.
हो खरंय .. मज्जा तर असतेच,
In reply to हा हा हा by बाबा योगिराज
हो खरंय .. मज्जा तर असतेच, तसेच ईतरही आपली सारी दुखे टेंशन विसरायला होतात, ज्यातली कित्येक आपण उगाचच घेत असतो.
सुंदर
सुंदर लिहिता तुम्ही!
कदाचित इथे प्रत्येकाला आपापली परी आठवल्याशिवाय राहणार नाही! जशी मला माझ दिसतीये बागडताना!
छान नोंदी करून ठेवता तुम्ही!
परी मोठी झाल्यावर तिला काय धमाल येईल वाचायला! तिच्यासाठी अनमोल ठेवाच करून ठेवता आहात.
इथले काही प्रतिसादही कदाचित तुमच्या आनंदाला द्विगुणित करतील.
योग जुळाल्यास नक्की भेटून तुमच्या परीबरोबर दंगा घालायला आवडेल. किंवा तिच्यासाठी एक मैत्रीण आहेच माझ्याकडे. खर मोठी आहे ती 'सहा' महिन्यांनी!
तुमच्या परीला गोड गोड पापा! :)
तसे असेल तर वेलकमच, कारण
In reply to सुंदर by चांदणे संदीप
तसे असेल तर वेलकमच, कारण तिच्या वयाचे कोणी कुठे दिसले तर ती तुटूनच पडते :)
छान नोंदी करून ठेवता तुम्ही!
In reply to सुंदर by चांदणे संदीप
छान नोंदी करून ठेवता तुम्ही!परी मोठी झाल्यावर तिला काय धमाल येईल वाचायला! तिच्यासाठी अनमोल ठेवाच करून ठेवता आहात.
इथले काही प्रतिसादही कदाचित तुमच्या आनंदाला द्विगुणित करतील.
+१००
गोड परी!
गोड परी!
एक फुकाचा सल्ला देते पण घ्याच.तिला दोन्ही वेळा दात घासण्याची सवय लावण्यासाठी तुम्ही खरोखरच रोज रात्री दात घासणे अत्यावश्यक आहे.मुलं आपोआप शिकतात मग.तिला आता बरेच दात आले असतील.दोन वेळा घासणे फार गरजेचे आहे.सध्या माझ्याकडे तीन वर्षाच्या मुलाची रुट कॅनाल ट्रीटमेंट सुरु आहे.त्याच्या आईवडीलांना आता पस्तावा होतोय. लहान मुलांचे हाल होतात अगदी.पण आई वडिलांना सवय असेल तर मुलं खळखळ न करता या गोष्टी शिकतात.म्हणून ही विनंती. परी सदा हसतच राहू दे!
सल्ला नोटेड :)
In reply to गोड परी! by अजया
सल्ला नोटेड :)
खूप मस्त... आमच्या ऋचा चे
खूप मस्त... आमच्या ऋचा चे दिवस आठवले..
आता ती ६ वर्षाची आहे..... दंगा तसाच असतो... आजकाल रोजच अक्कल कमी पडते...
हा पण भाग मस्त !
हा पण भाग मस्त !
परीला भेटायची संधी मिस केली
आयला राव मी पण होतो नरेपार्कात २६ तारखेला, परीला भेटायची संधी मिस केली
येस, २६ तारखेलाच, पण रात्री
In reply to परीला भेटायची संधी मिस केली by जगप्रवासी
येस, २६ तारखेलाच, पण रात्री बारानंतर म्हणजे टेक्निकली विसर्जनाचा दिवस उजाडलेला.. गर्दी तूफान नसती तर पहाटेपर्यंत नाहीतर किमान परी झोपेपर्यंत तरी थांबलो असतो. चांगली रमलेली तिथे
आमची पूर्ण रात्र नरेपार्कात च गेली
In reply to येस, २६ तारखेलाच, पण रात्री by तुमचा अभिषेक
आमची पूर्ण रात्र नरेपार्कात च गेली
:)
:)
एकाचढ एक हट्ट आणि तितक्याच वेगवेगळ्या आयडिया असतात पर्यांच्या :)
"मी झोपल्यानंतर पाऊस आला तर?" असा प्रश्न तुम्हाला-मला पडणार नाही, माझ्या लहान परीला (शुभा) पडला आणि रेनकोट घालून झोपायचं असं तिने ठरवलं आणि खरंच हट्ट करून तसं केलं सुद्धा :) पार घामानं डबडबल्या नंतर आणि ती झोपी गेल्यानंतरंच काढू दिला रेनकोट :) फोटो आहे, पण आत्ता नाही, नाहितर इथे टाकला असता. खरंच कोणतीही गोष्ट घ्या, सगळ्याच गोष्टी तितक्याच मस्त वाटतात :)
हा हा भारी डोकं चाललं ..
In reply to :) by नाव आडनाव
हा हा भारी डोकं चाललं .. स्वप्न दिसावीत म्हणून चष्मा घालून झोपतो असले विनोद ऐकलेले.. पण पोरं खरंच असली विनोद घडवतात.
शुभा, नावही छान आहे परीचे :)
अभिषेक
तू ब्लॉग लिही ना परीचा..परीबद्दल, परीसाठी.
तिच्या सगळ्या आठवणी, फोटोज अस मस्त कोलाज करून तयार कर ना.
ती मोठी झाली की तिच्यासाठी तिच्या पप्पांकडून मिळालेली आयुष्यभरासाठीची अत्यंत मौल्यवान भेट असेल ती.
आयडीया चांगली आहे. माझ्या
In reply to अभिषेक by सविता००१
आयडीया चांगली आहे. माझ्या ब्लॉगवर तसे हे लिखाण आहेच. पण या पोस्ट आणि तिचे फोटो, जमल्यास विडिओ, विथ कॅप्शन आणि त्यामागची आठवण असे एका सेपरेट जागीच स्टोअर करणे.. कुठेही पब्लिश वगैरे न करता थेट तिच्या अठराव्या वाढदिवसाला तिच्या ताब्यात देणे.. बघतो :)
खूपच गोड आहे परी आणि तुम्ही
खूपच गोड आहे परी आणि तुम्ही ते चपखल मांडताय यातुन. खरंच या सगळ्या आठवणी परी जेव्हा वाचेल तेव्हा किती छान वाटेल तिला.
छान लिहीता तुम्ही.
छान लिहीता तुम्ही.
आमची परी मागच्याच आठवड्यात वर्षाची झाली. कमी आधिक फरकाने हेच सगळे उद्योग चाल्ले असतात.
सध्या चालायला शिकल्याने फुटबॉलचे वेड लागले आहे. घर एक ग्राऊंड झाले आहे.
सगळ्या गोष्टी निट ठेवल्यावर १० मिनीटात अस्ताव्यस्त होतात.
मोबाईल तर आम्हाला हातात घेण्याची परवानगी नाही, लगेच काढुन घेण्यात येतो व कंटाळा आल्यास फेकुन देण्यात येतो.
तोंडात जी वस्तु दिसेल ती घालण्यात येते.
सांगण्यासारखं बरंच काही. पण तुम्ही मात्र छान शब्दबद्ध केले आहे.
पुभाप्र :)