मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पातोळे

अनन्न्या · · पाककृती
साहित्यः २ वाट्या काकडीचा कीस, २ वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, हळद चिमुटभर, मीठ, वेलची पावडर, रवाळ तांदूळ पीठ २ वाट्या, हळदीची पाने ७/८ patole कृती:हळदीची पाने स्वच्छ धुवावीत. पुसून घ्यावीत. तवसं म्हणजेच जून काकडी किसून घ्यावी. नारळ खवून घ्यावा. जेवढा कीस असेल तेवढा गूळ घ्यावा. तांदुळाचे रवाळ पीठ घ्यावे. रवाळ पीठ नसल्यास त्यात चार चमचे रवा मिसळावा. कीस आणि गूळ कढईत एकत्र करून गॅसवर ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ. हळद घालावी. गूळ विरघळला की त्यात मावेल तेवढे तांदळाचे पीठ मिसळावे. वाफ काढावी. मिश्रण असे दिसेल. वेलची पावडर घेतलीय पण खरं तर याला हळदीचाच छान स्वाद येतो. patole मिश्रण गार करण्यास ठेवावे. हळदीची पाने अर्ध्यावर दुमडून घ्यावीत. त्याच्या पाठच्या बाजूला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर एका बाजूला तयार मिश्रण थापावे. पुढीलप्रमाणे patole एका पातेल्यात पाणी घ्यावे. त्यात एक पसरट डबा ठेवावा. त्यातही पाणी घ्यावे. त्यावर चाळण ठेवावी. चाळणीत एखादी वाटी ठेवावी. वाटी भोवती तयार पाने उभी करावीत. patole त्यावर झाकण ठेवावे. पंधरा मिनिटे वाफ काढावी. पातोळे तयार आहेत. साजूक तूपाबरोबर खावे. patole

वाचने 13218 वाचनखूण प्रतिक्रिया 26

एस 27/09/2015 - 13:08
अरे वा! पातोळ्यांच्या पाककृतीचे दोन धागे लागोपाठ आले! झकास. पातोळ्यांना हळदीच्या पानांचा छान स्वाद येतो.

हे मोदकांसारखं सारण आणि आवरण वेगवेगळे न घेता दोन्ही एकत्र कालवून कालवून मोदकाचेच चुलत भावंड वाटते आहे. हळदीच्या पानामुळेही सुंदर स्वाद येत असणार. साखर-गूळ वर्ज आहे, नाहीतर नक्कीच करून पाहिले असते.

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा 27/09/2015 - 15:01
आणि असेच तांदुळच्या रव्याचे उकडून केलेले प्रकार म्हणजे तांदुळाच्या रव्यात फणसाचा/आंब्याचा रस घालून उकडलेली सांदणे किंवा नुसते तांदुळाच्या रव्यात खोबरे-गूळ घालून उक्डलेली खांडवी. या दोन्हीच्या ताटात थापून मोठ्या वड्या कापून खायच्या.

In reply to by सस्नेह

पैसा 28/09/2015 - 13:20
तांदुळाचं पीठ गूळ आणि किंचित मीठ घालून पातळसर भिजवायचं. भाकरीच्या पिठापेक्षा सैल पण भज्याच्या पिठापेक्षा घट्ट. ते पीठ केळीच्या पानात सारवायचं (लिंपायचं). वरून पानाची घडी घालून/दुसरे पान ठेवून झाकायचं. मग पानाची घडी तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजायची. तेल बिल काही नको. खरपूस भाजले की उतरवून पाने सोडवून गरम गरम पानगी लोणी/तुपाबरोबर गट्टम करायची. मला हळदीची पाने संपवायची होती म्हणून हळदीच्या पानात केल्या. केळीच्या पानात पण करतात.