✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हरवलेल्या गोष्टी .....शाईचे पेन !

ग
गोगट्यांचा समीर यांनी
Tue, 08/18/2015 - 18:48  ·  लेख
लेख
हल्ली बरेचदा असे जाणवते की काही गोष्टी नहीशा होऊ लागल्या आहेत , अर्थात बऱ्याच नव-नवीन गोष्टींची पण काही कमी नाही. पण या नाहीशा होऊ घातलेल्या गोष्टी अथवा विस्मृतीत जाणाऱ्या गोष्टी आठवल्या की मन थोड़सं हळवं होतं आणि आठवणीत रमतं . उदा. शाईचे पेन. स्मार्टफोन / Tab / Laptop च्या जमान्यात कागदावर लिहायला तसं कोणी जातं नाही ,वेळ आलीच तर बॉलपेन असते . पण त्या महिन्या महिन्याला बदलणाऱ्या , कंपनीच्या स्टेशनरितुन उचललेल्या किंवा रिफील न होणाऱ्या पेनात काही आपलेपणा वाटतं नाही ,जो लहानपणी जपलेल्या एखाद्या शाई पेनामध्ये होता. माझी सुरुवात पाटी आणि पेन्सिलीने झाली . बालवाडीत असताना शिसपेन्सिल वापरल्याचे सुद्धा आठवत नाही . तेव्हा एरवी लिहायला आणि भूक लागली तर खायला अशी पांढरी पेन्सिलच वापरली जायची . परीक्षा वगैरे सुद्धा ( जी नावालाच होती ) ती पाटीवरच असायची . पहिलीत गेल्यावर शिसपेन्सिल हातात आल्याचे आठवते . जसे लहानपणाचे दिवस फार काळ आठवणीत टिकत नाहीत त्याप्रमाणे लिहिलेले खोडायला बरी म्हणून शिसपेन्सिल वापरत असावेत (नाहीतर मुले सुद्धा ब्लॉग /आठवणी लिहायला लागायची ) . वरच्या वर्गातील मुले पेन वापरायची , तेव्हा त्यांचे प्रचंड अप्रूप वाटायचे व आपण कधी एकदा मोठे होणार आणि पेन वापरायला लागणार असा प्रश्न पडायचा . मोठे झाल्यावर जे अनेक फायदे असतात त्यातला पेन वापरता येणे हा एक मुख्य घटक होता . चौथीच्या स्कॉलरशिपला पेन वापरल्याचे आठवते बाकी संपूर्ण प्राथमिक शाळा पेन्सील , शार्पेनर , खोडरबरामधे गेली. नंतर यथावकाश पाचवीमध्ये पेन हाती आले आणि प्राथमिक संपून आता माध्यमिक मध्ये आलो याची खरी जाणीव झाली . पहिले पेन रेनॉल्डचे असावे. पेन दिसायला साधे होते. परंतु स्थित्यंतराचा भाग म्हणून अजूनही लक्षात आहे.आपण जे लिहिले आहे किंवा गणित सोडवले आहे ते पहिल्यांदाच पक्के असायला हवे हे पेन वापरायला लागल्यावर कळले . वर्गातील स्कॉलर मुले आपसूकच शाईचे पेन वापरायला लागली होती. रोजचा 'घरचा अभ्यास' घरीच करणे , तास चालू असताना न शिकवलेल्या भागाची उत्तरे देणे याबरोबरच शाईचे पेन खिशाला लावणे हा स्कॉलर मुलांच्या स्टेटसचा भाग होता. मला या शाईपेनाची निकड वाटण्याचे कारण मात्र वेगळे होते. माझे अक्षर तेव्हा काही फार चांगले नव्हते , त्यामुळे रोज पाच ओळी शुद्धलेखन काढून ते सुधारावे हा त्यांचा कटाक्ष. मला मात्र माझ्या अक्षरापेक्षा वापरत असेलेले पेन जास्त दोषी वाटत असे. (आपली चूक दुसऱ्यावर लादायची सवय जुनी आहे ) . 'आमच्या आईसाहेब जर का सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर झालो असतो' या धर्तीवर 'माझे पेन सुद्धा खरचं चांगले असते तर अक्षरही चांगले आले असते ' असे मी बाणेदारपणे सांगितल्याचे आठवते. पण माझ्या या अत्यंत प्रामाणिक आणि बाणेदार उत्तराचे कौतुक त्या दिवशी २० ओळी शुद्धलेखन काढायला सांगण्यात येउन मिळाले. सांगायचा मुद्धा हा की शाईच्या पेनाची गरज शुद्धलेखनातून आली आणि मी पहिले पेन , शाईची बाटली घेतली ( मी घेतलेली पहिली बाटली शाईची होती हे चाणाक्ष वाचकांच्या नजरेत आले असेलचं, तसे आम्ही सज्जनच , असो विषयांतर नको म्हणून कंसात टाकले) त्या पेनात शाई हाताने भरणे , त्यात अर्धी पेनात , पाव हातावर व पाव जमिनीवर असे सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पडले. मग ड्रोपरचा ऊगम झाला आणि बरीचशी शाई पेनात जाऊ लागली . प्रथम शाईचे पेन वापरताना त्रास होत असे. लिहिण्याचा वेग कमी होतोय असे वाटे पण हळूहळू सवय झाली , मग अक्षरही चांगले वाटू लागले. मराठीच्या पेपरला तर मी न चुकता शाईपेन वापरत असे. हीरोचे एक पेन मी सलग २ वर्ष वापरल्याचे आठवते. (बाकी ते पेन वापरले म्हणून स्कॉलर लोकांमध्ये काही गणती झाली नाही ! ) आता मागे बघताना वाटतं ते पाटी पेन्सिल , दुहेरी ओळींची वही , शिसपेन्सिल , एकेरी ओळी , मग बॉलपेन , शाईचे पेन या मोठं होयच्या खुणा होत्या. पहिली दुसरीमध्ये वेगवेगळे काय शिकलो ते आठवत नाही, पण हे वेगळेपणं, या अदृश्य पायऱ्या लक्षात आहेत . आज त्याची सहज आठवण आली . शाळेमधल्या गोष्टी काही मी जपून ठेवल्या नाहीत . पण काही आठवणी कायम जपेन अशी इच्छा आहे , म्हणून त्या लिहिण्याचा हा प्रपंच !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
13354 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

छान!

माझिया मना
Tue, 08/18/2015 - 19:21 नवीन
जुन्या आठवणींना उजाळा .. आठवणी जपता येतात.. माझी दगडी पाटी मी अजूनही ठेवली आहे..
  • Log in or register to post comments

सुंदर नॉस्टल्जीक लेख

मारवा
Tue, 08/18/2015 - 20:03 नवीन
मला हिरो चा शाई चा पेन आठवला डायरेक्ट नजरेसमोर तरळला. आणि आठवणींची लड च लागली कोइ लौटा दे मुझे मेरे बीते हुए दिन बिते हुए दिन वो हाए प्यारे पल थँक्स समीर
  • Log in or register to post comments

आवडलं

मास्टरमाईन्ड
Tue, 08/18/2015 - 20:25 नवीन
वरच्या वर्गातील मुले पेन वापरायची , तेव्हा त्यांचे प्रचंड अप्रूप वाटायचे व आपण कधी एकदा मोठे होणार आणि पेन वापरायला लागणार असा प्रश्न पडायचा
हीरोचे एक पेन मी सलग २ वर्ष वापरल्याचे आठवते. (बाकी ते पेन वापरले म्हणून स्कॉलर लोकांमध्ये काही गणती झाली नाही ! )
छान लेख. एकदम बरीच वर्षे मागे घेऊन गेला.
  • Log in or register to post comments

मग ड्रोपरचा ऊगम झाला आणि

द-बाहुबली
Tue, 08/18/2015 - 20:31 नवीन
मग ड्रोपरचा ऊगम झाला आणि बरीचशी शाई पेनात जाऊ लागली . प्रथम शाईचे पेन वापरताना त्रास होत असे.
:) हीरोचे पेन मात्र खरोखर एक स्टेट्स सिंबॉल होता. त्याचे ते नाजुक टोक अन सुंदर रचना हातात धरले की नुसता जोम यायचा लिखाण करायला. मिपावर हिरो पेनने लिहायची सोय असती तर एक काना मात्रा वेलांटी कधी चुकली नसती :) अजुन एक अल्ट्रा स्टेटस सिंबॉल होता तो म्हणजे नन्ग स्त्रिचे शाइपेन. या शाइपेनवर नग्नस्त्री पारदर्शक प्लॅस्टीकमधे कोरलेली असे आणी आपण पेनात जशी शाइ भरु तशी ती अशा पध्दतीने पेनाच्या आतिल बाजुत पसरत असे की त्या वरील नग्न स्त्रि(चित्राने)ने निळाशार स्विमसुट घातल्याचा भास व्हावा :) बाकी शाइ संपली की ही बाइ पुन्हा निर्वस्त्र भासे. बाके लेख आवडला. अगदी मनातल्या मनात त्या शाइचा वासही नकळत ताजा झाला.
  • Log in or register to post comments

मस्त लेख

एक एकटा एकटाच
Tue, 08/18/2015 - 23:56 नवीन
मस्त लेख एकदम nostalgic पुढिल लिखाणास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

अनुप ढेरे
Wed, 08/19/2015 - 10:57 नवीन
लेख आवडला. फाउंटन पेनाबद्दल हाही लेख वाचनीय आहे. http://www.misalpav.com/node/21096
  • Log in or register to post comments

हा धागा वाचताना मिपावरील

द-बाहुबली
Wed, 08/19/2015 - 12:10 नवीन
हा धागा वाचताना मिपावरील फाउंटनप्रेमीचा हाच प्रसंग सर्वप्रथम आठवत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

परीक्षेच्या शेवटच्या दिवशी..

सुधांशुनूलकर
Wed, 08/19/2015 - 11:17 नवीन
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी शाईच्या पेनाचा वेगळाच उपयोग होत असे. वर्गातून बाहेर पडल्यापडल्या समोरच्यावर आपलं पेन तलवारीसारखं चालवून त्याच्या / तिच्या कपड्यांवर शाईची नक्षी काढायची जणू स्पर्धाच असायची.. छान लेख. पस्तीस-चाळीस वर्षं मागे घेऊन गेलात. घरी आम्ही दोघे शाईचं पेन अजूनही वापरतो.
  • Log in or register to post comments

मस्त धागा. जुन्या आठवणी

Dhananjay Borgaonkar
Wed, 08/19/2015 - 12:32 नवीन
मस्त धागा. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एक किस्सा शाळेत मला ४थी पासुन शाईचं पेन वापरायला परवानगी होती. माझ्या मित्राने तेव्हा मला हीरोचं पेन दाखवलं. म्हणाला याने अक्षर खुप छान येतं. मी ते वापरुन बघितलं. लगेच ठरवल आपण पण हेच पेन वापरायचं. घरी येउन बाबांक्डे मागणी केली. तेव्हा त्या पेनाची किंमत २०रु. होती. बाबांनी सहाजिकच नकार दिला.म्ह्णाले काळेंचं (दगडूशेठ गणपतीच्या शेजारी काळे हे दुकान होतं तेव्हा) पेन वापर. ५रु किंमत. मी हट्टाला पेटलो होतो. ३,४ दिवसांनी बघितल की आईने कपाटात ५०रु ठेवले आहेत. मी ते हळुच घेतले आणि हिरोचं पेन आणलं. दुसर्‍या दिवशी आई बाबांना म्हणाली अहो ते ५०रु तुम्ही घेतले का? बाबा नाही म्हणाले. मी घरचा अभ्यास करत बसलो होतो. मी पण लगेच नाही म्हणालो. आई म्हणाले आरे पण मी तुला विचारलच नाही तर तु का नाही म्हणतोस. मी काहीच बोललो नाही. आईचं तेव्हा ल़़क्ष गेलं म्हणाली हे कुठलं नवीन पेन आणलस? मी म्हणालो जोशाचं आहे त्याने मला वापरायला दिलय. बाबाना काय कळाल काय माहित त्यांनी दरडावुन विचारल, त्याच पेन त्याने तुला का दिलं. मी घाबरुन काहीच बोललो नाही. त्यांनी परत विचाराल, मी मग सांगितलं की मीच आणल आहे. ते म्हणाले पैसे कुठुन आणलेस. सांगितल कपाटातुन घेतले. हे ऐकल्यावर पिताश्री भडकले बडव बडव बडवला. आजी मधे पडली आणि माझा पुढचा मार वाचला. नंतर मात्र मग रात्री मी झोपल्यावर पायाला तेल लावत बसले. त्याप्रकारा नंतर मात्र माझी न सांगता पैशाला हात लावयची आजिबात हिंमत झाली नाही. या प्रकारा नंतर दर वर्षी शाळा चालु झाली कि नवीन हीरोच पेन मिळत असे. अजुनही मी शाईच पेन वापरतो. सध्या माझ्याकडे लॅमी आहे.
  • Log in or register to post comments

काळेंचं (दगडूशेठ गणपतीच्या

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 08/19/2015 - 15:24 नवीन
काळेंचं (दगडूशेठ गणपतीच्या शेजारी काळे हे दुकान होतं तेव्हा) पेन वापर. ५रु किंमत. आईशपथ नॉस्टॅल्जिया , आमचे वडील शिक्षक होते विषय तज्ञ म्हणुन पाठ्यपुस्तक मंडळ पुणे (बालभारती) ला जात तेव्हा एक काळे पेन मझ्यासाठी फिक्स असे, मोठ्या कार्बाइड निब चे ते पेन खुप उत्तम असे, हीरो चे पेन एकदा घेतले ते वापरून घासल्याशिवाय फ्रीफ्लोइंग होत नसे म्हणुन आवडले नाही कधीच काळे पेन मात्र शाई भरल्या भरल्या टपोरे अक्षर देई ! शाई शाळेत निळी वापरत असलो तरी काळी शाई जास्त आवडी पेन धरायचे कुठे एंगल इत्यादी बाबांनी शिकवलेले सगळे काही आठवले राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

+१

रातराणी
गुरुवार, 08/20/2015 - 00:42 नवीन
सहमत. हीरोच पेन घ्यायची खूप हौस असायची पण ते बाजूला पडायचं आणि साध ५ रु वाल शाई पेन जास्त वापरल जायचं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मागे काळेंच्या दुकानात पेन

महासंग्राम
Fri, 07/08/2016 - 10:11 नवीन
मागे काळेंच्या दुकानात पेन घ्यायसाठी गेलो होतो तेव्हा, ते म्हणाले " अहो आम्ही पेन ठेवणं बंद केलंय कीबोर्ड, मोबाईल च्या जमान्यात शाई पेन कोण वापरतं आता " जीव तुटत होता त्या माणसाचा सांगताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अगदी.. मी घ्यायला गेले

पिशी अबोली
Fri, 07/08/2016 - 16:51 नवीन
अगदी.. मी घ्यायला गेले तेव्हाही. त्यांनी बंद केलंय म्हटल्यावर अतिशय वाईट वाटलं. :( काळ्यांचं दुकान हॅरी पॉटरमधल्या ऑलिवँडरच्या वाँडच्या दुकानासारखं दिसतं.. अजूनही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

लोल! तो सगळा भागच डायागॉन

आदूबाळ
Fri, 07/08/2016 - 17:10 नवीन
लोल! तो सगळा भागच डायागॉन ऍलीसारखा आहे. समोर एक अध्यात्मिक/ तांत्रिक पुस्तकांचं दुकानपण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

=)) हा हा.

पिशी अबोली
Sat, 07/09/2016 - 10:05 नवीन
=)) हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अरेरे.. म्हणजे आता ते दुकान

पुंबा
Wed, 07/20/2016 - 17:59 नवीन
अरेरे.. म्हणजे आता ते दुकान बंद झालय? मी या रविवारी जाणार होतो तिथे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

लेख छान!

समीरसूर
गुरुवार, 08/20/2015 - 16:59 नवीन
सुंदर प्रतिसाद! बहुतेक सगळ्यांना हा प्रसाद लहानपणी मिळतोच. लेख देखील छान! माझ्या लहानपणी मला नुकत्याच आलेल्या रेनोल्ड्स पेन्सचं खूप वेड होतं. अर्थात मी पाचवी-सहावीत असतांना. प्राथमिक शाळेत असतांना पेन-पेंसिलीबाबत फारसं काही आठवत नाही. रेनोल्ड्सचे निळे, हिरवे, लाल पेन नुकतेच आले होते. मी खूप पेन गोळा केले होते. चार रुपयाला मिळायचा एक पेन. नंतर कुठे गायब झाले आठवत नाही. बाकी शाई पेन मी कधीच वापरला नाही. सुरुवातच बॉलपेनानं केली. एका-दोन वेळा शाई पेन ट्राय केला पण नाय जम्या...घरी स्पष्ट सांगून टाकलं, असली थेरं मला जमायची नाहीत. बॉल पेन वापरू देणार असाल तर परीक्षा देईन नाहीतर मला काही फार हौस नाही. मग बॉल पेनच वापरलं. अगदी दहावीच्या परीक्षेत आणि बारावीच्या देखील! :-) लेखाने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

माझा प्रतिसाद धनंजय रावांच्या प्रतिसादावर आहे.

समीरसूर
गुरुवार, 08/20/2015 - 17:00 नवीन
माझा प्रतिसाद धनंजय रावांच्या प्रतिसादावर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

स्मरणरंजन

स्मिता.
Wed, 08/19/2015 - 12:33 नवीन
विस्मृतीत गेलेल्या खूप जुन्या दिवसांची पुन्हा आठवण झाली आणि ते प्राथमिक शाळेचे दिवस (जेवढे आठवतात तेवढे) डोळ्यासमोर तरळले. सातवीपर्यंत मला कायम कॅम्लीनचा मोठ्ठाला पेन मिळाला. त्यातली शाई भरण्यापासून पेन गळण्यापर्यंतच्या सर्व सोपस्कारांना मी कंटाळले होते. वर्गातल्या काही मुलींकडे हिरोचा पेन असायचा, तो पाहून हेवा वाटे. सातवीच्या स्कॉलरशिप परिक्षेत नंबर आला म्हणून शेजारच्यांनी हिरोचा पेन भेट म्हणून दिला होता त्याचा काय आनंद झाला होता! नंतर मात्र १२वी पर्यंत हिरोचा पेन सोडला नाही. (मधे-मधे जेल पेनची क्रेझ आली होती) हे सगळं आताही इतकं व्यवस्थित आठवतंय म्हणजे त्या वयात पेन या गोष्टीला आयुष्यात किती महत्त्व होतं!
आता मागे बघताना वाटतं ते पाटी पेन्सिल , दुहेरी ओळींची वही , शिसपेन्सिल , एकेरी ओळी , मग बॉलपेन , शाईचे पेन या मोठं होयच्या खुणा होत्या. पहिली दुसरीमध्ये वेगवेगळे काय शिकलो ते आठवत नाही, पण हे वेगळेपणं, या अदृश्य पायऱ्या लक्षात आहेत.
खूप छान केलंत हा लेख लिहून. आजचा दिवस तरी शालेय आठवणी समोर येत राहतील.
  • Log in or register to post comments

शाईचे पेन वापरण्याची कटकट फार

सुबोध खरे
Wed, 08/19/2015 - 12:34 नवीन
शाईचे पेन वापरण्याची कटकट फार होती. शाई गळणे, कपड्याला हाताला डाग पडणे इ मुळे मला स्वतःला कधीच आवडले नाही. बॉल पेनने हस्ताक्षर खराब होते या कारणास्तव आमच्या शाळेत ७ पर्यंत बॉलपेन वापरू देत नसत.माझे हस्ताक्षर सुवाच्य नव्हते तरीही वाच्य होते आणि प्राथमिक शाळेपासून कितीही पुस्ती गिरवली तरी ते काही सुधारले नाही.( पुस्ति गिरवून अक्षर सुधारते हा गैरसमज आहे). अक्षर वाचता न येण्यामुळे जास्त गुण मिळाले असे कधीही झाले नाही. परंतु आठवीनंतर बॉलपेन वापरायला सुरुवात केली ती आजतागायत.आजही मी लिहिलेले रुग्णांना वाचता येते केमिस्ट कडे जाण्याची गरज पडत नाही. रुग्णांनी भेट दिलेली क्रॉस किंवा पार्करची फाऊनटन पेने वडिलांना किंवा मित्रांना देऊन टाकली आणि बॉल पेने खिशाला लावली.
  • Log in or register to post comments

घरी हट्ट करुन त्या वेळेला १०

खटपट्या
Wed, 08/19/2015 - 13:00 नवीन
घरी हट्ट करुन त्या वेळेला १० रूपयाला मिळणारे पायलट पेन आठवले. खूप अप्रूप होतं त्या पेनाचे. पण आपला पारंपारीक फाउंटन पेनाची बरोबरी नाही करु शकले ते पायलट पेन. दहा रुपयांचे पायलट पेन हरवल्याबद्दल मार पण खाल्ला आहे. :)
  • Log in or register to post comments

मस्त लेख..माझा पण पहिला बॉल

रायनची आई
Wed, 08/19/2015 - 13:28 नवीन
मस्त लेख..माझा पण पहिला बॉल पेन रेनॉल्ड चाच होता..आणि शाई पेन हिरोचा. त्याला आमच्या वर्गातील बरीचशी मुले चायना पेन म्हणायची..नंतर नंतर आठवी नववीत आम्ही मैत्रिणी वाढदिवसाला एकमेकाना जेल पेन देत असू..क्रेझ म्हणून..
  • Log in or register to post comments

जेल पेन

सिरुसेरि
Wed, 08/19/2015 - 15:06 नवीन
जेल पेन मध्ये सुद्धा 'सेलो ग्रिपर' चांगले का 'अ‍ॅड जेल' चांगले यांवरून वाद होत .
  • Log in or register to post comments

कशानेही लिहा; मुळातच अक्षर

सूड
Wed, 08/19/2015 - 16:04 नवीन
कशानेही लिहा; मुळातच अक्षर चांगलं नसेल तर कोणताही पेन वापरुन काहीही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments

आपापला पेन घ्या

कपिलमुनी
Wed, 08/19/2015 - 16:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हेच चिकटवायला आले होते.

कोमल
गुरुवार, 08/20/2015 - 15:46 नवीन
हेच चिकटवायला आले होते. यांच बरोबर एक पांढरा हिरो पेन पण यायचा. तो ५-१० रुपयांनी महाग असायचा या पेन पेक्षा. आमच्या वर्गात तो पांढरा पेन असेल तर हवा व्हायची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

त्याच्यावर कलर्ड ईकने काढलेली

अभ्या..
गुरुवार, 08/20/2015 - 15:57 नवीन
त्याच्यावर कलर्ड ईकने काढलेली अमूर्त वाटणारी चिनी शैलीतली मस्त चित्रे असायची. घोडा, ड्रगन, बांबू, फुले. मेन बॉडीवर असणारे चित्र छोट्या आकारात टोपणावर असायचे. पेनाचे फिनिश सुरवातीला पर्ल असायचे नंतर तो पांढरा पडत जायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

तो पेन महाग असयचा कारण त्यात

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 08/20/2015 - 18:17 नवीन
तो पेन महाग असयचा कारण त्यात काहीतरी वेगळी टेक्नोलॉजी होती ख़ास! बेटा फर्स्ट डे पासुन फ्री फ्लोइंग चाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

येस्स...

थॉर माणूस
Fri, 08/21/2015 - 10:14 नवीन
हाच म्हणताय ना? Image removed. दहावीत गेल्यावर मला वडीलांनी घेऊन दिलेला असला एक पेन. त्याआधी हिरोचाच हिरव्या रंगाचा आणि सोनेरी टोपणवाला पेन वापरायचो. हा नवा पेन मिळाल्यावर तो पेन माझ्या एका मित्राला देऊन टाकला... ह्या पेनने मात्र पुढे शिक्षण संपेपर्यंत सोबत केली. नंतर पेनचा वापर कमी झाला. आता कुठे पडलाय ते शोधावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

दॅटस् इट..

कोमल
Fri, 08/21/2015 - 11:13 नवीन
दॅटस् इट.. माझ्या मैत्रिणीचा ट्राय केलेला मी, पण इतकासा नाही आवडला. लैच गुळुगुळीत असायचा. काळा आणि सोनेरी हिरोच्या निब ला असा एक मस्त खरखरीत पणा होता त्यामुळे रपारप लिहुन काढायला मजा यायची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

शाईपेनाची तीच तर मजा होती,

थॉर माणूस
Fri, 08/21/2015 - 11:18 नवीन
शाईपेनाची तीच तर मजा होती, प्रत्येकाची वेगळी आवड. निबच्या प्रकारापासून शाई पर्यंत वैविध्य होतं. आम्ही मात्र त्या फ्लोचेच दिवाने होतो... कसला स्मूथ चालायचा बेट्या. कॉलेजमधे एकदा सही करायला आमच्या सरांनी घेतलेला. तेव्हा त्यांच्या चेहेर्‍यावरती उमटलेले भाव अजूनही आठवतात, प्राईसलेस. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

अजूनही शाई पेन मिळते

हेमन्त वाघे
गुरुवार, 08/20/2015 - 00:20 नवीन
आजही शाई पेन चे शौकीन आहेत . मी पण उगाच घेत असतो माझा मध्ये येका मोन्त ब्लांक वर जीव बसला होता . पण ६० - ७० हजाराच्या पेन चे मी आज ही स्वप्न बघित आहे .
  • Log in or register to post comments

मस्त लेख. काय साधा काळ होता

रातराणी
गुरुवार, 08/20/2015 - 00:44 नवीन
मस्त लेख. काय साधा काळ होता तो. आताची मुलं लिहायच्या आधी टाईप करायलाच शिकणार आहेत बहुतेक.
  • Log in or register to post comments

झकास

पुणेकर भामटा
गुरुवार, 08/20/2015 - 01:08 नवीन
लेख आवडला, लेखनशैली उत्तम, लिहत रहा. आम्ही लहानपणी एअर मेल चा शाईपेन वापरायचो. हिरो पेन चे स्वप्न फार उशीरा पुर्ण झालं होतं. पुणेकर.
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

संदीप डांगे
गुरुवार, 08/20/2015 - 02:27 नवीन
मस्त लेख. झेडपीत तीसरीत असतांना पाटी-लेखणी जाऊन, पेन-वही लागू झाली. आमची ऐपत तेव्हा साठ पैशाची वही आणि २५ पैशाची कांडी (रीफील -फक्त). तीसरी-चवथी ही कांडीच वापरायची. बाजारात रेनाल्ड्स पाचवी-सहावीत असतांना आले होते. तरी सातवीत जाइस्तोवर काय मिळाले नाही. असेच कामचलाऊ १ रुपयावाले पेन. रेनाल्ड्स पाच रुपयाला होते तेव्हा. त्याच्या पुढील पारदर्शक भागामधे मुलं आपलं नाव लिहिलेले कागद टाकायचे. आठवीपर्यंत हीरोची क्रेज आली होती. हीरोवर मुलं रेडीयम-वीनायल कटींगने नावं कोरून घ्यायची. मला दहावी पर्यंत हिरोची वाट पाहावी लागली. तसंही रेनाल्डनी खूप छान अगदी बारिक अक्षरं लिहिता यायची. शाळेत सगळ्यात छोटी व स्वच्छ सुंदर अक्षरे काढण्यात मीच अव्वल होतो. एका ओळीत च्यालेंज घेऊन ४० ते ५० शब्द लिहायचो आणि ते सर्व वाचता यायचे (अर्थातच भींग घेऊन कधीकधी). आज एका ओळीत आठ बसली तरी नोबेल द्या मला. नववीमधे का कुणास ठावूक पण अचानक खूप सारे हरवलेले पेन्स सापडायला लागले. एका वेळेला तर किमान ४० ते ४५ वेगवेगळी पेनं होती दप्तरात. त्यात चार तरी हीरोची पेनं होती. जशी यायची तशीच ती सगळी निघून जायची. कुणाला देऊन टाकायचो. एखादा आपलं पेन शोधत यायचा. मला आजही मौज आणि आश्चर्य वाटते हे कसं काय घडायचं? सापडलेल्या पेन्सवर कधीच मालकी-ममत्व नाही वाटले. विकत घेतलेल्या रेनाल्डवर सारा जीव. दहावीत सेलो ग्रीपरची भयंकर क्रेज. दहावीची परिक्षा सेलो ग्रीपरसोबतच दिली. दोनच पेन पण तोफखाना असल्यासारखे. शाइच्या पेनाशी नाहीच पटलं कधी. कुंडली म्याच नाही झाली. पहिल्या ग्रॅजुएशन्ला कुठली पेनं वापरली आठवत नाही. दुसर्‍या ग्रॅजुएशनला पेनांची गरज नव्हती ;-). तिथे कटनीबचे सतरा प्रकार आणि दौतीचं भांडं, असा कॅलिग्राफीचा उत्सव... नीबशिवाय काहीही शाई शोषून घेणारं आणि प्रसवणारं अक्षरं काढायला वापरायचं... आता एका क्लायंटने गिफ्ट दिलेलं सिफरचं चार हजाराचं बॉलपेन वापरतो. दिवाळीसाठी त्या क्लायंटचं कार्पोरेट गिफ्टींगचं काम केलं होते. त्यात वीस ही पेनं होती. मला सरप्राइज म्हणून त्याने मलाही गिफ्ट दिलं. माझं नाव त्या यादीत होतं हे नव्हतं माहीत मला. ते म्हणाले, 'तुम्ही उत्तम काम करत आहात, एक वेंडरपेक्षा जास्त. आमच्या कंपनीत तुमचा सहभाग आम्हाला मोलाचा वाटतो.' ही एक चांगली आठवण म्हणून बोजड आणि अजिबात आरामदायक नसलेलं पेन अजून जपून आहे. नेहमी तेच जवळ असतं. नेहमीच चांगले काम करत राहण्याची प्रेरणा देणारं. असो. लेख व प्रतिसादांनी भावूक केलंय म्हणून पेनप्रपंच.
  • Log in or register to post comments

जुन्या आठवणी

अनिवासि
गुरुवार, 08/20/2015 - 18:01 नवीन
सर्वाप्रमाणे मी पण भुतकाळात गेलो. मी पेन प्रथम केव्हा वापरले हे आता लक्षात नाही आणि कोणते हे तर अजीबात आठवत नाही. काळ्याचे फरासखान्याजवळ्चे दुकान मात्र आठवते.( मला वाटते की दगडुशेठ गणपती तेथे नन्तर स्थलान्तरीत झाला असावा.) नतरच्या आयुष्यात मात्र खुप निरनीराळी पेन वापरायाला मिळाली. त्यात शेफर आणि पार्कर चान्गली लक्षात आहेत. आत्ता धागा उघडल्यावर आठवण झाली -- टेबलाचा ड्रावर उघडला.-- काही काळापुर्वी भेट मिळालेल्या body Blanc चा नवा कोरा सेट सापडला. वापरण्याचा कधी प्रसगच आला नाही. नातु माध्यमिक शाळेत जाणार म्हणुन त्याला विचारले तर त्यालाही तो नको ! वर ड्रौपर ची आठवण आली आहे. पेनच्या body ला असलेला पम्प आठवतो का? काही काळानन्तर आतले रबर खराब व्हायचे - काळे हजर! परवा माळा साफ करताना तसले एक जुने पेन सापडले! खगोल शास्त्रद्न्य काळ्या विवराचा शोध घेत आहेत. मला वाटते की त्याना तेथे हरवलेली पेने आणि चशमे सापडतील.
  • Log in or register to post comments

एक राहिलं...

संदीप डांगे
गुरुवार, 08/20/2015 - 18:56 नवीन
एक राहिलं...
  • Log in or register to post comments

अरे वा.. बर्‍याच दिवसांनी

आनन्दा
गुरुवार, 08/20/2015 - 20:01 नवीन
अरे वा.. बर्‍याच दिवसांनी आलात मिपावर. बाकी मला पेन म्हणले की तो पेन फायटर गेमच आठवतो.. मी ८वी ९वी ला असताना एक खूप जड पेन आले होते.. शाईपेने आणि तसली जड पेनं त्या पेन फायटरला जाम भारी पडायची राव.
  • Log in or register to post comments

माझा लहानपणीचा साथी एअरमेल पेन !!

राजकुमार१२३४५६
गुरुवार, 08/20/2015 - 20:42 नवीन
Image removed. तीन महिन्यापूर्वीच पुण्यातून दोन पेन खरीदी केले. एक पेन ९० रुपयाला मिळाला. आपणास पण हवे असेल तर या दुकानात मिळेल. Netco Agencies Contact Person:-Mr. Solanki. Off. Add: 213, Sholapur Bazar, Pune-411001. Shop Add: 667 Raviwar Path, Ramsukh Market Pune-411002 Tel:-(020)26360499 / 24470570
  • Log in or register to post comments

फारच भारी आहे हे पेन. माझं

पुंबा
गुरुवार, 07/07/2016 - 19:18 नवीन
फारच भारी आहे हे पेन. माझं आवडतं. दिसायला देखील धट्टाकट्टा. रूबाबदार. पेनांमधला सिंह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजकुमार१२३४५६

शाईचा पेन हा माझ्या अतिशय

जयन्त बा शिम्पि
Mon, 09/21/2015 - 00:40 नवीन
शाईचा पेन हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मी सुरवातीपासून शाईचा पेन वापरण्यापुर्वी , बोरु वापरला आहे. बोरु म्हणजे पोकळ बांबूचे एक , साधारणतः आजच्या बॉलपेनच्या व्यासाइतके, नळकांडे असायचे. त्याचे एक टोक , तिरक्या दिशेने पेनच्या निबेसारखा कट मारलेला असायचा. शाईच्या बाटलीत बोरु बुडवायचा आणि छानशी अक्षरे गिरवायची. अक्षरे काढणे व अक्षरे गिरविणे यात खुपच मोठा फरक आहे. इयत्ता १ ली ते तीसर्‍या यत्तेपर्यंत कित्ता गिरविल्यामुळे आज रेखीव व सुंदर अक्षराचे श्रेय , त्या वेळच्या शिक्षकांनाच द्यावे लागते. त्यनंतर शाईच्या पेनचे वापरणे सुरु झाले, ती आजतागायत कायम आहे. वालिटी कंपनीचे पेन मला फार आवडते.पुढे पुढे शाईच्या पेनचा वापर कमी होईल आणि उत्पादन सुद्धा ! ! मग माझी फार मोठी अडचण होवू शकते म्हणुन मी अब्दुल रहेमान स्ट्रीट वर एक खास दुकानातुन वालिटी कंपनीचे तीन पेन्स खरेदी करुन घेतले. प्रत्येकी ८० रुपयास एक मिळाला. ही सहा वर्षापुर्वीची घटना आहे. आत्ता एक महिन्यापुर्वी , त्याच दुकानातुन मित्रासाठी असेच पेन घेण्यासाठी गेलो त्यावेळी त्याच प्रकारचे पेन पण, रुपये २५०/- ला एक असे मिळाले( कंपनीचे नाव एअरमेल ). त्या तीन पेन्स पैकी दोन पेन मी अगदी सुरक्षित म्हणुन तिजोरीत ठेवलेली आहेत. लोक तिजोरीत दागदागिने ठेवतात, अस्मादिक शाइचे पेन्स ठेवतात ! ! शेवटी शाईचे पेन ते शाईचेच पेन , त्याची सर इतर कोणत्याही पेनला येवुच शकत नाही. .
  • Log in or register to post comments

आवडले. शाईचे पेन शाळेपर्यंतच

सोनुली
Fri, 07/08/2016 - 09:19 नवीन
आवडले. शाईचे पेन शाळेपर्यंतच वापरले. नंतर जेल पेन्स वापरात आले. सुटसुटीत पेन
  • Log in or register to post comments

फौंटनपेनाचं निब नेलकटर न

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 07/08/2016 - 15:49 नवीन
फौंटनपेनाचं निब नेलकटर न कापून त्याचे म्हणे आम्ही कॅलीग्राफी करीत असू!! (एस भाऊ मारतंय आता धरून)
  • Log in or register to post comments

आताच शाईचं पेन परत वापरायला

पिशी अबोली
Fri, 07/08/2016 - 16:53 नवीन
आताच शाईचं पेन परत वापरायला सुरूवात केलीये. शाईच्या पेनाने लिहावंसं वाटतं..आणि दिवसभर कीबोर्ड बडवल्यावर काही लिहिण्यातला आनंद अवर्णनीय आहे.
  • Log in or register to post comments

२०१५ च्या लेखाला , दहा

जयन्त बा शिम्पि
Fri, 07/08/2016 - 17:48 नवीन
२०१५ च्या लेखाला , दहा महिन्यानंतर प्रतिक्रिया ! ! सुरवातीला वाटले , पुन्हा कुणीतरी " शाईच्या पेनाचा " पंखा ( पक्षी-FAN ) मिसळपाव खायला आला असेल , पण जुनाच लेख आहे .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा