Skip to main content

राजकन्या, राक्षस आणि घोडा

लेखक सातबारा यांनी रविवार, 20/09/2015 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
राजकन्या दबा धरुन बसली होती. तिच्यापेक्षा तिप्पट मोठया राक्षसाला हरवायचे तर अनपेक्षीत हल्ला करणे आवश्यकच होते आणि अनपेक्षीततेचे शस्त्र कुशलतेने वापरण्यात राजकन्या वाकबगार होती. पट्टीच्या शिकार्‍यासारखी, श्वास रोखून, संधीची वाट पहाणारी राजकन्या आणि डुलत डुलत येणारा अनभिज्ञ राक्षस! आपल्या कावेबाजपणे युद्धाचा निकाल पहिल्यापासूनच आपल्याबाजूने करुन घेतलेला असला, तरी राजकन्या अजिबात गाफील रहाणार नव्हती. राक्षस टप्प्यात येताच एक गगनभेदी आरोळी ठोकून राजकन्येने झेप घेतली. अवचित हल्ल्याने गांगरलेल्या राक्षसाला संधी न देता तीने निष्ठुरपणे घाव घातले. राक्षस धडपडला, कोसळला! एक प्राणांतिक आरोळी ठोकून गतप्राण झाला! राजकन्येचा युद्धज्वर अजून उतरलेला नव्हता. राक्षसाच्या छातीवर नाचून तीने विजयी गर्जना केल्या. जरा शांत झाल्यावर राक्षस खरंच मेलाय याची खात्री करण्यासाठी एकदोन मुष्टीप्रहार केले. राक्षसाने जीभ आणखीनच बाहेर काढली व डोळे जास्तच पांढरे केले. राजकन्येची खात्री पटली. मेलेल्याला आणखी मारण्यात आता तीला स्वारस्य नव्हते. तीचा युद्धोन्माद ओसरला होता. हाती घेतलेले एक कार्य तडीस नेले होते. मारामारीचा तीला कंटाळा आला होता आणि आता दुसरी क्षितीजे तीला खुणवायला लागली होती. त्या क्षितीजांपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी साधन हवे होते. मरुन पडलेल्या राक्षसापाशी राजकन्या गेली व म्हणाली, "ए आब्बा, उथ. माजा घोला हो" राजकन्येला साथ देण्यासाठी म्हातारा राक्षस उठला आणि आनंदाने घोडा झाला.
लेखनविषय:

वाचने 8269
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

सर्व वाचक व प्रतिसादकांना धन्यवाद! @ मुवि: डॉक्टर व पेशंटची कथा मला माहीत नाही. कृपया तुम्हीही शेअर करा ना! खरंतर या कथेमागची कथापण लिहायची आहे. जरा सवडीने लिहीतो.

In reply to by सातबारा

एक बाबा आणि त्याची मुलगी, "डॉक्टर-पेशंट", असा खेळ खेळतात. आमच्या स्मृती पटलावर सध्या तरी इतकेच चित्र दिसत आहे. कथेचे नांव, लेखकाचे नांव आणि कथा नक्की कुठे वाचली, हे महत्वाचे तपशील मात्र, स्मृती पटलावरून गायब झाले आहेत. ही कथा आंतरजालावर आहे हे नक्की.कारण कथाकाराला नंतर बर्‍याच प्रतिक्रिया/प्रतिसाद पण मिळाले होते.

छान आणि सुरस कथा! पुढच्या भागात राजकन्येने घोड्याला कसे पळवले किन्वा राक्षसाला सुटण्याकरता राक्षशिणीची कशी मदत घ्यावी लागली हे ही येऊ द्या!

कित्ती कित्ती गोड गोष्ट आहे. आधी वाटलं काही तरी तत्वज्ञान विषयक किंवा सटायर आहे पण कसली सही कलाटणी दिलीत. फार च सुरेख :)

आपल्या कावेबाजपणे युद्धाचा निकाल पहिल्यापासूनच आपल्याबाजूने करुन घेतलेला असला..>>>>> हा हा हा..हे लै आवडले!!!

शेवट वाचेपर्यंत ही एखादी रुपककथा असावी असेच वाटत होते. शेवटचे धक्कातंत्र फारच गोड.