Skip to main content

किकलीच्या मध्ययुगीन परिसरात

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 01/09/2015 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
रेच दिवस चंदन वंदनच्या पायथ्याशी असलेल्या किकलीचे मध्ययुगीन मंदिर बघायला जायचे होते. तो योग अखेर आला आणि ८ ऑगस्टच्या शनिवारी मी, बुवा, गणेशा आणि किसनदेव असे पुण्याहून एकत्र निघालो. पुणे सातारा रस्त्यावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर आधी वाईचा सुरुर फाटा येतो. त्यानंतर लगेच ४/५ किलोमीटर अंतरावर हमरस्त्यावरच भुईंज गाव लागते. तिथून डावीकडे वळल्यावर पाचेक किमी अंतरावर किकली गाव. गावाच्या सुरुवातीलाच किसनवीर साखर कारखाना आहे. तर किकलीच्या गावच्या मागेच चंदन वंदन हे दोन्न बलदंड जोडकिल्ले उभे आहेत. ह्या चंदन वंदन शिवाय ह्या परिसरातील इतर किल्ले म्हणजे केंजळगड, वैराटगड, कल्याणगड, कमळगड, पाण्डवगड, अजिंक्यतारा, रोहिडा ही भोज शिलाहार ह्याची निर्मिती. ह्यांतील उंचीने कदाचित सर्वाधिक चंदन वंदनच असावेत. चंदन वंदनला जाण्यासाठी किकलीतूनच पुढे ३ किमी असलेल्या बेलमाची गावात जावे लागते. ह्या बेलमाच्या पण दोन. एक खालची बेलमाची तर दुसरी किंचित उंचीवर असलेली वरची बेलमाची. आमचा उद्देश मात्र चंदन वंदन सर करण्याचा नसून किकली गावातले मध्ययुगीन मंदिर पाहण्याचा तसेच तिथले मोठ्या संख्येने असलेले वीरगळ बघण्याचा होता. किकली गावाच्या अगदी सुरुवातीलाच उजवीकडे श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणार्‍या पायर्‍या व मंदिराच्या नावाची कमान दिसते. १५/२० पायर्‍या चढूनच आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात येतो. प्रवेशद्वारातून आत येताच मोठे पटांगण आहे व त्यापुढे मुख्य मंदिर आहे. चंदन- वंदन a मंदिर प्रवेशद्वार a प्रवेशद्वारातून दिसणारे मुख्य मंदिर a प्रवेशद्वारातून आत येताच मधे पटांगण आहे व दोहो बाजूंना ग्रामपंचायतीची शाळा आहे. उजव्या हाताला एक उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष आहेत. ह्या उद्ध्वस्त मंदिराशेजारीच झाडोर्‍यात गणेशवंदना कोरलेला एक भग्नावस्थेतला स्तंभ आडवा पडलेला आहे. उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष a गणेशवंदना कोरलेला भग्नावस्थेतला स्तंभ a मुख्य मंदिराच्या बाहेर २ भव्य दिपमाळा आहेत. मंदिराचा बाह्य भागा साधा आहे तर पूर्वीचे शिखर नष्ट झालेले आहे त्यामुळे मंदिराची मूळची शैली नेमकी कुठली ह्याचा अंदाज बांधता येत नाही पण महाराष्ट्रातील इतर ह्याच काळातील मंदिरांसारखी ह्याची शैली पण भूमिज असावी असा कयास बांधता येतो. आता प्रश्न येतो मंदिराचा कार्यकाळ नेमका कुठला? चंदन वंदन ही शिलाहारांची निर्मिती असल्याने साहजिकच ही शिलाहारांची निर्मिती वाटते पण तसे नसावे. शिलाहारांची इतर मंदिरे जसे कुकडेश्वर, अमृतेश्वर, नागेश्वर ह्यांपेक्षा ह्या मंदिराची शैली भिन्न आहे. तिचे साधर्म्य यादवकाळातील मंदिरांशी जास्त जाणवते. मला स्वतःला हे मंदिर आणि त्यांतील मूर्तींची शैली ही पिंपरी दुमाला, लोणी भापकर आणि पेडगाव येथील मंदिरांच्या शैलीशी जास्त मिळतीजुळती वाटली. सिंघण यादवाने १३ व्या शतकात खिद्रापूरनजीक भोजराजा शिलाहाराचा पाडाव करुन कोल्हापूर शिलाहारांची राजवट नष्ट केली तत्पुर्वीच सिंघणाच्या आक्रमणात हा भाग यादवांच्या राज्यात सामील झाला व यादव राजवटीतच ह्या मंदिराची उभारणी झाली असावी. ह्या मंदिराची रचना तशी अनोखी. आधी मुखमंडप. येथे नंदीमंडप हा स्वतंत्र नसून मुखमंडपातच नंदी सामावलेला आहे. त्यानंतर येतो तो सभामंडप आणि समोर मुख्य गर्भगृह आणि डाव्या-उजव्या बाजूला अजून दोन गर्भगृहे. ह्या प्रकारच्या तीन गर्भगृहांच्या रचनेला 'त्रिदल गाभारा' असे म्हणतात. मुखमंडप आणि सभामंडप हा नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे. मंदिरांच्या बाह्यभिंतींच्या भागात कसलेही कोरीव काम नाही. ते आहे फक्त मुखमंडपाच्या समोरील आणि डाव्या-उजव्या बाजूच्या भिंतींवर. त्यावर काही मैथुन शिल्पे, काही वादक व व्यालांची विविध शिल्पे कोरलेली आहेत. भैरवनाथ मंदिर, किकली a मुखमंडप a मुखमंडपाच्या समोरील बाजूस विविध प्रकारचे व्याल कोरलेले आहेत. सर्वसाधारणपणे व्याल म्हणजे सिंहाचे वरील दोन्ही पाय उंचावलेले असे स्वरूप. दा़क्षिणात्य मंदिरांवर व्याल मोठ्या संख्येने कोरलेले आढळतात. येथे मात्र व्यालशिल्पांना केवळ सिंहाचेच मुख नसून गज, अश्व, शुक, मेष, गर्दभ अशी विविध मुखे कोरलेली आहेत. मेषव्याल --------------शुकव्याल -------------- अश्वव्याल --------------वृषभव्याल a-a--a--a गर्दभव्याल --------------------- सिंहव्याल ------------------------ वराहव्याल---------व्याघ्रव्याल a--a--a--a मुखमंडपाच्या भिंतीवरील वादक a मुखमंडपावरील शिल्पे- गरुड, विष्णू, मैथुनशिल्प, ऋषी व त्याखालील व्यालपट्टीका a ह्या शिवाय येथे एक प्रसवेचेही (बाळाला जन्म देत असलेली स्त्री) शिल्प आहे. प्रसवा a चला तर आता मुखमंडपातून सभामंडपात जाऊयात. सभामंडपाचे प्रवेशद्वार अतिशय नक्षीदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल, सेवक, शैवप्रतिहारी वगैरे कोरलेले आहे. प्रतिहारींच्या खालच्या भागात हत्ती व शरभ आदी कोरलेले आहेत. द्वारपट्टिकेवरील गणपती नसून तपस्व्याची मूर्ती कोरलेली आहे. मला सर्वप्रथम ती मूर्ती महावीरांची वाटली. पण ते महावीर नसावेत कारण मंदिर पूर्णपणे शैव आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार a प्रतिहारींच्या हाती नेहमीच एक लांबुळकी पिशवी दिसते ह्याचा अर्थ असा की मंदिराच्या बांधकामासाठी ह्या पिशवीतून ते धन, जल आदी आणत आहेत. प्रवेशद्वारावरील भैरव द्वारपाल, प्रतिहारी a गज व शरभ a प्रवेशद्वाराच्या उंबर्‍यावरील नक्षीकाम a सभामंडप अतिशय नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे आणि स्तंभांवर मध्यभागी काही पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत तर स्तंभाच्या खलाच्या भागात सुरसुंदरी, भैरव आदि शिल्पे कोरलेली आहेत. आता सभामंडपांतील स्तंभांवरची काही निवडक शिल्पे पाहूयात. सभामंडपाची रचना a हे आहे तीन धडे व चारच पाय असणारे आभासी शिल्प. अशी शिल्पे पिंपरी दुमाला, भुलेश्वर, पेडगाव अशा मंदिरांतही आहेत. आभासी शिल्प a याजनंतर येते ते त्रिविक्रमाचे शिल्प. स्तंभाच्या दोन बाजूस दोन प्रसंग कोरलेले आहेत. एका बाजूस वामन अवतार तर त्याच्या शेजारील बाजूस त्रिविक्रम अवतार. छत्रीधारी वामन बळीराजाच्या दरबारात तीन पावले भूमीचे दान मागायला आलेला दिसतो आहे. ह्याच्या पुढच्या अर्ध्या भागात बळी राजा कमंडलूतून वामनाच्या हातावर पाणी सोडून दान देतो आहे तर शेजारी शुक्राचार्य वामनाचे कपट ओळखून त्याला बळीला अटकाव करत आहे. ह्याचाच शेजारी स्तंभाचे दुसरे बाजूस त्रिविक्रमाचे शिल्प आहे. दोन पावलांनी आकाश व जमीन वापून विष्णू प्रकट झाला आहे. तिसर्‍या पावलाने बळीचे मस्तक व्यापून त्याला पाताळात जागा दिलेली आहे तर बळीचे शेजारी गरुड आणि एक विष्णूगण दिसत आहे. वामनावतार a त्रिविक्रम a रामायणातीलही विविध प्रसंग येथील स्तंभांवर कोरलेले आहेत. रामहस्ते सुवर्णमृगाचे रूप धारण केलेल्या मायावी मारीच राक्षसाचा वध a राम हनुमानाची भेट a सुग्रीवाकडून रामाच्या शरकौशल्याची तालवृक्षांचा छेद करुन होणारी परिक्षा व शेजारी वाली सुग्रीव युद्ध a रामहस्ते वालीवध a हनुमानाकडून अशोकवनाचा विध्वंस व राक्षसींचे सीतेला रामाचे तुटलेले मायावी मस्तक दाखवून धमकावणे a हा बहुधा कुंभकर्णवध अथवा रावणवध a रामायणाशिवायही इतरही काही प्रसंग येथे कोरलेले आहेत. हे बहुधा महाभारतातील भीमाचे गजयुद्ध असावे a हा बहुधा शिव असावा कारण शेजारी नंदी आहे. पण सिंहामुळे प्रसंग कोणता आहे ते समजत नाही. a शिवतांडवाचे प्रसंगही स्तंभांवर कोरलेले आहेत. शिवतांडव १ a शिवतांडव २ a कलशपूजन करणारे हंस a खालील प्रसंग कुठला ते अजिबातच ध्यानात येत नाही. येथे एका फळावरुन गरुड आणि हनुमानाची ते फळ ओढून घेण्यासाठी जोराची चढाओढ चालू असलेली दिसते. डावीकडे स्वयं विष्णू तर उजवीकडे अश्वमुख असलेला विष्णूभक्त तुंबरु उभा आहे. पौराणिक शिल्प a स्तंभाच्या खालच्या बाजूसही काही सुरसुंदरी, हरिहर आदींच्या मूर्ती आहेत. हरिहर a नर्तकी a अभिसारिका आणि तिला त्रास देणारे मर्कट a दर्पणसुंदरी a सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम व त्यात खुबीने कोरलेले कमळ अतिशय देखणे आहे. आवर्जून बघावे असेच. छतावरील नक्षीकाम a ह्यानंतर तीन्ही गर्भगृहांच्या प्रवेशद्वारात द्वारपाल, प्रतिहारी यांची शिल्पे कोरलेली आढळतात. गर्भगृहांत शिवलिंगे व भैरवाची मूर्ती आढळते. गर्भगृहाचे प्रवेशद्वार a गर्भगृहे a गर्भगृहे a मंदिराचा अंतर्भाग a ह्यानंतर मंदिराच्या बाह्यभागात फेरफटका मारायला निघालो. एकूण साधीच रचना विशेष असे काहीच नाही. एका ठिकाणी अशाच त्रिदल गाभार्‍याने युक्त असलेल्या मंदिराचा नुसता पायाच आढळतो. इथे मंदिर बांधावयाचे काम राहून गेलेले असावे. मंदिराचा बाह्यभाग a इतक्यात पाऊस धूम धूम कोसळू लागला आम्ही पुन्हा मंदिराच्या आवारत आलो. कोसळता पाऊस a दिपमाळा a मंदिरातून बाहेर आलो. आता किकली गावाकडे निघालो. किकली हे वीरांच गाव. पूर्वी कधीतरी कदाचित शिलाहार यादव संघर्षात येथे मोठे धूमशान झालेलं असावं त्याची साक्ष इकडचे शेदीडशे वीरगळ देत आहेत. गावात जिकडे बघावं तिकडे वीरगळाच दिसतात. विहिरीच्या भिंतीला वीरगळ, दुकानाच्या भिंतीपाशी वीरगळ, गटारावर उभे वीरगळ, घरांच्या भिंतीत चिणले गेलेले वीरगळ, गावच्या चावडीवर वीरगळ, पारावर वीरगळ. जिकडे बघावे तिकडे वीरगळच वीरगळ. तेही विविध प्रकारचे. तीन पट असलेले, चार पट असलेले, घोडेस्वारांशी युद्ध, पदातींशी युद्ध, तलवारीने युद्ध, गदायुद्ध. अक्षरश: पारणे फिटते डोळ्यांचे. काही वीरगळ a a a a a a a a a a a a a a a a a खरोखरच वीरांचे गाव, वीरगळांचे गाव, लढावू गाव. पूर्वजांच्या बलिदानाची ही स्मारके अशी भग्नावस्थेत आणि कशीही पडलेली पाहूनच आम्ही पुढे निघालो. आता लक्ष्य होते ते शेरी लिंबच्या बारा मोटेच्या विहिरीचे. त्याविषयी पुन्हा कधीतरी.

वाचने 50750
प्रतिक्रिया 117

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

तसा पुण्याचा... पण मूळ गाव पाचवड (भुईंज). मामा लोकं वाईची आणि आत्या सातार्‍यात. म्हणून परिसरात बर्‍यापैकी हिंडणं होतं जे.पी.

वल्लिदा: या लेखात आपल्या उत्साही सहकार्‍यांचे आनी येता जाता केलेल्या खादाडीचे फोटो का नाहीत? णिषेध!!

In reply to by प्रचेतस

कमित कमी फोटो तरी टाक, दगडांचे एवढे फोटो टाकतोस असे थोडे माणसांचे पण टाक बरं का प्रचेतस ;)

मस्त हो प्रचेतस साहेब. एकच नंबर. एक जुनीच तक्रार परत करतोय. सगळेच फोटो पूर्ण साईज मध्ये देण्याएवजी थोडे थंबनेल्स देऊन किंवा अल्बम टाईप डिरेक्टरी देता नाई का येणार. धागा ओपन व्हायला खुप वेळ लागतो हो. अवांतरः माढा (जि.सोलापूर) येथील माढेश्वरी देवीच्या मंदिराला आपण भेट द्यावीत ही नम्र विनंती. येथेही असंख्य असेच वीरगळ जागोजाग विखुरलेले आहेत. मंदीर तर हुबेहुब असेच आहे. (नवीन ऑईल पेंट ची कर्तबगारी झाला अस्ल्यास कल्पना नाही.)

In reply to by अभ्या..

फ़ोटोंशिवाय धाग्याला काहीच महत्त्व नै रे. थंबनेल्स किंवा डिरेक्टरी देऊन वर्णन करणे योग्यप्रकारे साध्य होत नाही. तरीही ह्यातील फ़ोटो बरेच आकुंचित केलेले आहेत. बाकी सोलापुरात येईन तेव्हा तू तिकडील मंदिरे दाखवशीलच. तुमचा भाग म्हणजे यादव- काकतीय- होयसळ यांची सततची युद्धभूमी, त्यानंतर बहमनी राजवटीची प्रमुख ठाणी. साहजिकच प्राचीन अवशेष बऱ्याच प्रमाणावर असणार.

औरंगाबादचे दूर्लक्षीत वैभव औरंगाबाद म्हटले की फक्त वेरुळ अजिंठ्याचे नाव समोर येते. जागतिक दर्जाच्या या वारसास्थळांबरोबरच औरंगाबाद जिल्ह्यात आणी आजूबाजूच्या जिल्ह्यातही अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यांच्याकडे फारसे कोणी जात नाही कारण त्या पर्यटन स्थळांची ओळखच पर्यटन नकाशावर करुन देण्यात आलेली नाही. औरंगाबाद मध्ये आल्यावर पर्यटक फार फार तर बीबीका मकबरा विंâवा पानचक्कीला भेट देतो. पण वेरुळच्या आधी खोदण्यात आलेल्या औरंगाबाद लेणीकडे कोणी जात नाही. अजिंठ्याकडे जात असताना मुर्डेश्वर हे महादेवाचे निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. वेरुळला जाताना दौलताबादचा किल्ला, खुलताबादला सुफी संतांची अनेक ठिकाणे आहेत. येथेच औरंगजेबाची कबरही पहायला मिळते. बुलढाणा जिल्ह्यातील लोणारचे सरोवर निसर्गाचा चमत्कार आहे. तेथील मंदिरेही शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत. पर्यटनाच्या नकाशावर या ठिकाणांना ठळक स्थान नसल्याने पर्यटक वेरुळ, अंजिंठा पाहून परत जातो. ज्यांना हटके पर्यटन करायची इच्छा आहे त्यांनी या स्थळांना आवर्जून भेट द्यावी.

In reply to by pradnya deshpande

ज्यांना हटके पर्यटन करायची इच्छा आहे त्यांनी या स्थळांना आवर्जून भेट द्यावी.
तुम्ही काही धागे टाकून ह्या ठिकाणांची ओळख करून दिलीत तर फार बर होईल .. माहितीचा अभाव हे कारण आहे

नेहमीप्रमाणेच अत्यंत माहितीपूर्ण आणि अप्रतिम चित्रांनी भरलेला लेख. हा माणूस अशी नजरेआड लपलेली देवळे आणि शिल्पकला ज्या खुबीने शोधून काढतो आणि अभ्यास्पूर्ण शैलीत सादर करतो यावरून वल्ली हे नावच जास्त शोभून दिसते ! आता, प्रचेतस या नावाचा उगा हट्ट (बरेच लोक अजून या शब्दाचा अर्थ काय असाव याच विवंचनेत आहेत ;) ) सोडून जुने वल्ली हेच नाव घ्यावे असा (इतर अनेकांसारखाच) प्रस्ताव मांडत आहे :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दोन्ही मुद्द्यांसाठी +१ आणि या निमित्ताने डॉ. सुहास म्हात्रे यांनीसुद्धा परत इस्पिकचा एक्का हे नाव घ्यावे असा उपप्रस्ताव मांडतो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रस्ताव आणि उपप्रस्ताव दोन्हीला अनुमोदन.

महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा-वेरूळशिवाय पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत; पण त्यांची माहिती नसल्याने फक्त पारंपरिक अजिंठा-वेरूळच्या लेण्या, दौलताबादचा किल्ला आणि शहरातील पाणचक्की, बिबी का मकबरा पाहिल्यावर पर्यटक औरंगाबादहून परततात. अनेकदा त्याव्यतिरिक्तच्या लेण्यांचा आणि पर्यटनस्थळांचा उल्लेख आल्यावर बाहेरचे पर्यटक स्थानिक लोकांशी संपर्क साधून "ते अमुक अमुक कुठे आहे? आमचे पाहायचे राहून गेले', "कसे जाता येईल?', "अरे, तिथपर्यंत गेलो होतो, अगदी जवळच होते रे...' असे म्हणताना दिसतात. असे अनेकदा निराश व्हावे लागते. काय आहे पहाण्यासारखे? औरंगाबादला पर्यटन करण्यासाठी येताना पर्यटकांना अजिंठा-वेरूळ या दोन ठिकाणची बऱ्यापैकी माहिती असते. त्यामुळे तेवढ्याच गोष्टींसाठी हे पर्यटक औरंगाबादला येतात आणि दोन दिवसांचा दौरा करून परततात. फक्त माहीतगार पर्यटकच उपेक्षित आणि दुर्लक्षित पर्यटनस्थळांपर्यंत पोचून पर्यटनाचा आनंद मिळवून देऊ शकतात. ही स्थळे पर्यटनाच्या नकाशावर असूनही तिथली व्यवस्थित माहिती नसल्याने पर्यटक तिथे पोचत नाहीत. औरंगाबादचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले, तर अजिंठा-वेरूळच्या लेण्यांशिवाय दौलताबादचा किल्ला, शहरात पाणचक्की, बिबी का मकबरा ही माहीत असणारी पर्यटन स्थळे आहेत. त्याशिवाय पाहण्यासारखे आणि पर्यटनाचा आनंद देऊ शकतील, अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यामध्ये औरंगाबादच्या लेण्या, शूलिभंजन, म्हैसमाळ, गौताळा, पितळखोरा, घटोत्कच, बनोटी, मुर्डेश्वर, घाटनांद्रा येथील लेण्यांचा समावेश होते. कोणता महिना पर्यटनासाठी योग्य? उन्हातान्हात होरपळण्याऐवजी थंडीत म्हणजेच सप्टेंबर ते फेब्रुवारी हे सहा महिने पर्यटनासाठी जास्त चांगले असतात. वातावरण थंड असते, उन्हाचा तेवढा तडाखा जाणवत नसतो. त्यामुळे सुटीच्या दृष्टीने विचार केला, तर दिवाळीची सुटी किंवा नाताळच्या सुटीचा काळ औरंगाबादेत पर्यटनासाठी जास्त चांगला असतो. फक्त पर्यटनस्थळे पाहण्यासाठीच लोक येतात असे नाही. तर पर्यटनाच्या सोबतच "फूड सफारी' व्हावी, अशीही त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे या काळात शाकाहार आणि मांसाहार करणाऱ्यांसाठी अशी चांगली खवय्येगिरी करण्याची ठिकाणेही आहेत. त्यामुळे येण्यासाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांतले चार किंवा पाच दिवसांचे नियोजन करून औरंगाबादला पर्यटनासाठी यावे, असाच खास मराठवाडी आग्रह असतो. वेरूळ लेण्यांच्या परिसरातील स्पॉट औरंगाबादला चार किंवा पाच दिवस राहून पाहण्यासारखे काय आहे, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. पण एका दिवसात वेरूळ, दुसऱ्या दिवशी अजिंठा, तिसऱ्या दिवशी औरंगाबादेत शॉपिंग करता करता लोकल स्पॉट पाहून परतता येईल. मग चौथा दिवस आणि पाचवा दिवस कशासाठी, असा प्रश्‍न असेल, तर वेरूळ लेण्यांपुरते पर्यटन करण्याऐवजी वेरूळला जाताना दौलताबादच्या किल्ल्याला भेट देता येईल. तसेच पुढे गेल्यानंतर खुलताबाद गावात मोगल बादशहा औरंगजेबाची कबर पाहण्यासारखी आहे. औरंगजेब स्वतः बादशहा असतानाही टोप्या विणत असे. त्यांच्या कमाईतून जी रक्कम शिल्लक राहिली होती, त्या रकमेतून ही कबर बांधण्यात आली आहे. बादशाह औरंगजेबाची मूळ कबर त्यामुळे अत्यंत साधी आहे. त्यावर छत नाही. बाग बनी बेगम खुलताबादचा परिसर हा सूफी संप्रदायाचे वास्तव्य असणारा परिसर आहे. याच परिसरात "हजरत जर जरी जर बक्‍श रहेमतुल्लाह' यांचा दर्गा आहे. या दर्ग्याच्या उरुसासाठी जगभरातून सूफी संप्रदायातील लोक श्रद्धेने येतात. या दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक दरवाजा आहे. त्या दरवाजात प्रसिद्ध अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या "पाकिजा' या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटातील काही दृश्‍ये खुलताबाद शहरात प्रवेश करताना लागणाऱ्या "बाग बनी बेगम'मध्ये चित्रित करण्यात आली होती. मुगल पद्धतीची ही बाग रस्त्याच्या बाजूला असूनही पर्यटकांच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. या दर्ग्याच्या परिसरात अभिषेक बच्चन आणि करिना कपूर यांच्या "रेफ्युजी' चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. वेरूळच्या लेण्या स्वतःचे वाहन असल्यास खुलताबादहून वेरूळला अगदी 15 मिनिटांत पोचता येते. पण स्वतःचे वाहन नसेल आणि गिर्यारोहणाचा आनंद घेत वेरूळच्या लेण्या पाहायच्या असतील, तर तोही मार्ग उपलब्ध आहे. दर्गा पाहिल्यानंतर तेथूनच खुलताबादच्या शासकीय विश्रामगृहाकडे जाण्याचा मार्ग विचारला तर पायी अंतरावर ते आहे. त्या विश्रामगृहातून वेरूळ लेण्यांकडे जाण्यासाठी घाटरस्ता आहे. वळणावळणाच्या या रस्त्यावरून जाणारी वाहनेही पाहण्यासारखी असतात. तेथून पाऊलवाटेने कैलास लेणे वरून पाहू शकतो. कैलास लेण्याला "आधी कळस मग पाया बांधला' असे म्हटले जाते. त्यामुळे तो कळस पाहण्यासाठी हा मार्ग योग्य आहे. तेथून टॉप व्ह्यूने आपल्याला ते मंदिर कसे बांधले असेल, याचा अंदाज येऊ शकतो. हाही माहीत नसणारा मार्ग आहे. या मार्गावरून वेरूळचे दोन्ही प्रसिद्ध पाण्याचे धबधबेही पाहायला मिळतात. पण त्यासाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांतच यायला पाहिजे. वेरूळमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या लेण्या आहेत. शूलिभंजन आणि म्हैसमाळ वेरूळ लेणी पाहिल्यानंतर जो थकवा येतो तो घालविण्यासाठीची थंड हवेची दोन ठिकाणे याच खुलताबादच्या परिसरात आहेत. खुलताबादच्या दर्ग्याच्या समोरचा रस्ता म्हैसमाळला जातो. तिथे बालाजी मंदिर आणि टेकडीवरून खाली उतरल्यावर काही अधुरी शिल्पे असणारी गोरक्षनाथाची लेणी आहेत, तर औरंगाबाद वेरूळ मार्गावर खुलताबाद गावात न जाता, जो बायपास आहे त्या मार्गावरून शूलिभंजनला जाण्यासाठी मार्ग आहे. तिथे दत्ताचे मंदिर आहे. सूर्यकुंड आहे. हा परिसरही पर्यटकांच्या दृष्टीने उपेक्षित आहे. वेरूळच्या पुढेही पाहण्यासारखी स्थळे औरंगाबाद-कन्नड मार्गावर वेरूळची लेणी आहेत. त्याच्यापुढे कन्नडपर्यंत गेल्यानंतर तेथून गौताळा अभयारण्य आणि पितळखोरा लेण्यांकडे जाता येते. पण त्यासाठी स्वतंत्र एक दिवस आपल्याकडे हवा. कन्नड गावातून पुढे चाळीसगावाकडे जाणारा मार्ग आहे. या मार्गावरून उजवीकडे वळल्यावर गौताळा अभयारण्यात जाता येते. तिथेही काही आधी-अधुरी लेणी आहेत. गौतम ऋषींचे वास्तव्य या परिसरात होते. त्यामुळे त्याला गौताळा असे नाव देण्यात आले आहे. या अभयारण्यात नील गाय, माकडे, तरस, बिबटे आहेत, पण त्यांना बघण्यासाठी या जंगलात राहावे लागते. त्यासाठी औरंगाबाद येथील वन खात्याच्या वन्य जीव विभागाची परवानगी घ्यावी लागते. रात्री जंगलातील वन्य जीव पाहण्यासाठी पाणवठ्यांच्या ठिकाणी मचाणीही तयार आहेत. पितळखोरा ही लेणी वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्यांच्या पूर्वीची आहेत. पितळखोऱ्याला जाताना वाटेत काली मठ आहे. तेथील मंदिरही पाहण्यासारखे आहे. तेथून काही अंतर पायी गेल्यानंतर पाटणादेवीकडे जाता येते. तेथील एकवीरा देवीचे मंदिर पाहण्यासारखे आहे. पण या सगळ्या परिसरात फिरण्यासाठी स्वतःचे वाहन असणे गरजेचे आहे. या परिसरात पावसाळ्यातही चांगले पर्यटन करता येते. म्हणजे वेरूळ आणि हा सगळा परिसर पाहण्यासाठी दोन दिवस लागतात. त्यामुळेच औरंगाबादचा परिसर पाहण्यासाठी चार किंवा पाच दिवस लागतातच. अजिंठा लेणी आणि परिसर अजिंठा लेण्यांकडे जाण्यासाठी औरंगाबाद-जळगाव मार्गाने जावे लागते. स्वतःचे वाहन असेल तर वाटेत सारोळ्याच्या जंगलाला भेट देता येते. निसर्गरम्य वातावरण आणि शहराच्या लगतच असणारे दाट जंगल तेथे आहे. तेथून सिल्लोड गाव ओलांडल्यानंतर लागते ती "पारोची कबर'. ही कबर म्हणजे कविवर्य ना. धों. महानोर यांनी लिहिलेल्या "अजिंठा' चित्रपटाची नायिका पारो... तिची ही कबर आहे. ज्या व्ह्यू पॉइंटवरून पारोने रॉबर्टला अजिंठ्याची लेणी दाखविली, तो व्ह्यू पॉइंटही पाहण्यासारखा आहे. तेथून थेट लेण्यांपर्यंत पायी चालत जाता येते. हा परिसर पायी पाहण्यासारखाच आहे. अजिंठ्याच्या प्रत्येक लेणीमध्ये एक कथा आहे. ती कथा समजल्याशिवाय या लेण्यांच्या पर्यटनाचा आनंद घेताच येत नाही. पाच दिवसांचे नियोजन पहिला दिवस ः औरंगाबादमधून वेरूळकडे, सकाळीच दौलताबाद किल्ला. त्यानंतर खुलताबाद करून वेरूळच्या लेण्यांसाठी राखीव. लेण्या पाहिल्यानंतर संध्याकाळ एक तर म्हैसमाळ किंवा शूलिभंजनला घालविता येईल. मुक्कामासाठी वेरूळला एमटीडीसीचे रिसॉर्ट किंवा काही खासगी लॉजही उपलब्ध. दुसरा दिवस ः कन्नडकडे प्रयाण. तेथून गौताळा अभयारण्य करून दुपारी पितळखोरा करून पाटणादेवी पाहून रात्री मुक्कामी औरंगाबादला. तिसरा दिवस ः अजिंठा लेण्यांकडे प्रयाण. जाताना सकाळीच व्ह्यू पॉइंट आणि पारोची कबर पाहून लेण्यांसाठी संपूर्ण दिवस देता येतो. रात्री अजिंठा गावात किंवा मुक्कामी औरंगाबादला येणे शक्‍य. चौथा दिवस ः पैठण आणि परिसरातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठीचा आनंद घेता येतो. पाचवा दिवस ः स्थानिक पर्यटन स्थळे आणि शॉपिंग करून परत आपल्या गावी जाता येते.

In reply to by pradnya deshpande

अप्रतिम माहिती. संपादक मंडळ : हा प्रतिसाद वेगळा धागा म्हणुन काढता आला तर बेष्ट काम होईल.

फोटो अप्रतिम आलेत बर का! ह्यात माझी थोडी भर घालतो..वर तुम्ही ज्या बैल व सिंहाच्या शिल्पाला शिवाचे म्हणले आहे ते सुर्यवंशी राजा दिलीपचे आहे.राजा दिलीपला मुल होत नव्हते,त्यावर उपाय म्हणुन त्याने राजगुरु वशिष्ठांच्या आश्रमात असलेल्या कामधेनु व तिची मुलगी नंदिनीची २० दिवस सेवा केली.त्यांना एके दिवशी राजा चरायला घेउन गेला असताना तिथे शिवानी पाठवलेला एक सिंह आला व त्याने गायींवर हल्ला केला.खुप लढुनही तो सिंह हार जात नाही अस बघितल्यावर राजानी 'नंदिनी ऐवजी मला खा' अस म्हणुन त्याच्या समोर गुड्घे टेकले. राजाचा हा त्याग बघुन कामधेनु ने त्याला पुत्र प्राप्तीचा वर दिला.वराच्या फलानी राजाला एक पुत्र झाला ज्याचे नाव राजानी 'रघु' ठेवले.ह्याच्याच वंशात पुढे अज्,दशरथ्,श्रीराम आदी राजे झाले. ही कथा रघुवंशातिल फार प्रसिद्ध कथा आहे.बाकि सर्व शिल्प अप्रतिम!

In reply to by पामर

ओह्हो. ही कथा अजिबातच माहीत नव्हती. वाल्मिकिरामायणात ती नाहीच. माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद.

मी आगोबा बरोबर - ज्यांचं मूळ नाव वल्ली हेच्च आहे.. :-/ आणि प्र चेतस हे ज्याच्या व्यक्तित्वाची झळाळी हरण करणारं (अश्या माणसाकरता भाषा ऐति हासिक'च वापरली पायजे. ;) ) नाव आहे ..अश्या एका छळू हत्ती (या ट्रीपवर्णनात चिडवणारच्च मी :-/ तिथे एक हत्तीपण होता ना! :-/https://lh3.googleusercontent.com/-Wl5TCUH_CkY/Veg_9pbu-TI/AAAAAAAAIe4/C8ktkCnD-zY/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520012.jpg ल्लुल्लुल्लु :-/ ज्जा! ) बरोबर गेल्या दोन वर्षात पाहिलेली जेव्हढी मंदिरं लेण्या इत्यादी आहेत.त्यातली ही पण सफर यादगार ठरली. किकलीचं मंदिर उत्कृष्ठ आहेच. पण माझं आकर्षण होतं..ते तिथले वीरगळ आणि ती विहिर. विहिर,खोल तळी,सौंध,रात्रीच्या वेळी दिसणारे नदीचे संथ गूढ गंभीर डोह..(तुळापूर-भीमा..भामा..संगम..पौर्णिमेची रात्र,फुलमून चे त्यात पडणारे प्रतिबिंब..कडक थंडी..आणि संप्पूर्ण नि:शब्द वातावरण.. आहाहाहा!) हे सगळं मला विशेष आवडणारं.. तेच या नियोजित भटकंतीत असल्यानी मी भरपूर उत्साहीत होतोच. किकली हे नाव आगोबाकडून ऐकलं,आणि मला ते एखाद्या ग्रामीण हिंन्दि शिनुमातलं असणारं गाव,असं नावावरुन वाटायला लागलं..अर्थात तिथे गेल्यावर ते तसच सार्थही ठरलच. प्रथम ते मंदिर मग ते एक गाव वीरगळांचे. मंदिर मला एंट्रीपासूनच का कोण जाणे बहाद्दूरगडावरच्या देवळांचा तिथे फिल यायला लागला. आत गेल्यावर ते जमिनीतून शिल्प उभं राहिल्याची प्रचीती. एखादा चिलखतधारी हत्त्यारबंद सैनिक लांबून दृष्टीस पडावा,आणि आपण खिळावं..असच या सार्‍या जुन्या मंदिरांच प्रथम दर्शन असतं. मग आपण हळूहळू कुतुहलानी मंदिराजवळ जातो.. या मंदिरावर बाहेरून फारशी कोरीवकामगिरी आणि शिल्पकला आढळत नाही,पण आत मात्र भरपूर खजाना दडलेला आहे. वस्तुतः ह्या जागेत हा एक छोटासा मंदिर समुह आहे.. हे त्या मंदिरा बाजुच्या एका पडक्या आणि दोन तीन पूर्ण गेलेल्या केवळ जोत्याची रचना पहायला शिल्लक असलेल्या आकृत्यांवरुन कळत. https://lh3.googleusercontent.com/-1AAzCJlSIKg/VehA-AzRuvI/AAAAAAAAIfE/Gd9zKyPk8D8/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520048.jpg मग आमची नित्याप्रमाणे आधी एकंदर काय काय आणि किती इथे आहे? अशी एक रेकि घडली.आणि मग आंम्हाला आगोबानी मंदिराच्या वेंट्रीपासून ते आतल्या शिल्प आणि छतापर्यंत अगदी सटीप माहितीसह मंदिर घुमवलं ;) ते सगळं कसं ते मी नीट सांगू शकत नाही,तो (आध्यात्मासारखाच ;) ) आगोबाबरोबर अनुभवण्याचा विषय आहे. ही तिथली मला लैच आवडलेली एक मूर्ती https://lh3.googleusercontent.com/-kB_O34v83yc/VehBpF1e30I/AAAAAAAAIfU/Zda43M-oYhs/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520046.jpg आणि हे एक जिवंत शिल्पं.. ;) कॅमेरागणेश,(आता ;) ) प्रकाशककिसनदेव्,आणि.... असो! ;) https://lh3.googleusercontent.com/-DSOkCq5C55Y/VehE07p4tOI/AAAAAAAAIf8/y3O19Foc-nc/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520040.jpg मधे एक ज्जोर्रात पावसाची सर पडून गेली आणि मग आंम्ही भुरभुरणार्‍या पावसात वीरगळ शोधबोध मोहिमेवर बाहेर पडलो https://lh3.googleusercontent.com/-XHqe-rYlFak/VehDz6eJBjI/AAAAAAAAIfo/ptfntTLlQjA/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520050.jpg मला तर त्या गावात वीरगळ बघत फिरताना कुंभारवाड्यात दिवाळीत फिरायचो..मातीची चित्र घ्यायला..तो फिल आला.. ह्या-रंगातले त्या-ढंगातले पहा वीरगळ या गावातले माहिती याची असो कि नसो स्तंभीत होऊन व्हा रे त्यातले अशीच अवस्था होते.. काहि काहि नेहमीचे तर काहि चांगले ( फक्त ;) ) माझ्या उंचीचे ..जिकडे तिकडे वीरगळच वीरगळ.. (इथेले वीरगळाचे फोटू आणि एक माहिती क्लिप रात्री - लावण्यात येइल..अत्ता टैम नै..अप्लोडींग आणि लाविंगला :-/ ) अर्थात हे वीरगळ पाहुन निघताना..तिथेही एक जिवंत झँटम्याटीक शिल्प मला गावलच ;) https://lh3.googleusercontent.com/-dkQtZjwnEoE/VehFpy3K2tI/AAAAAAAAIgI/ogSHMjSoAgo/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520060.jpg आणि हे पोपटही त्यांच्या घर'ट्यांसह लक्षवेधी https://lh3.googleusercontent.com/-npTRuK3WBu0/VehHIPhJFfI/AAAAAAAAIgo/arQ63m9sN5w/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520058.jpg आणि मग हे वीरगळ पाहुन आम्ही निघालो.. ते त्या मराठा स्थापत्य रचनेमधल्या एका अद्भुताकडे.......... .........................................................

विहिरिकडे

........................................................ https://lh3.googleusercontent.com/-MTua6zsaI90/VehJZ0S1K7I/AAAAAAAAIg8/WJo-xgu-olQ/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520065.jpg

श्रीयुत प्रचेतस (पूर्वाश्रमीचे वल्ली) यांचे धागे मी नेहमीच वाचत असतो. या माणसाने पुरातत्व विभागाच्या खात्यात असायला हवे. कोण जाणो, कदाचित असतीलही. :)

तुलनेने कमी ज्ञात अशा एका ठिकाणाचे अत्यन्त सुंदर वर्णन आणि तितकेच सुंदर फोटो. लेख दोनदा वाचला. आणखी एकदा वाचावा लागेल समग्र आकलना साठी. धन्यवाद

माझ्या लहानपणी आमच्या गावात असे विरगळ काही देवळांच्या आजूबाजूला पाहील्याचे आठवतात. आता गायब झालेत.

प्रचेतस राव एक छोटीशी शंका आहे. बहुतांशी वीरगळाच्या प्रथम भागात शिवाची पक्षी पिंंडीची पूजा करताना तो वीर दाखवलाय. फक्त शैवपंथीयात ही परंपरा होती का? दुसर्‍या कुणा देवतेचे पूजन करतानाचे वीरगळ नाहीत का?

In reply to by अभ्या..

मी तरी शिवपिंड सोडून दुसऱ्या कुठल्या देवतांचे पूजन करताना वीर बघितलेले नाहीत. काही ठिकाणी शिवपिंड न दाखवता फ़क्त कलश आहे. कलशाभिषेक. तर एका ठिकाणी वरच्या पट्टिकेत शिवपिंडीच्या पूजेऐवजी शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी कावडीतून पाणी आणणारा वीर पाहिला आहे. शिव हे संहाराचे प्रतिक तर विष्णू हा पालनकर्ता. पूर्वापार चालत आलेल्या समजुतींनुसार मनुष्य मृत्युनंतर कैलासवासी होतो. वैकुंठवासी नाही. ह्याला अगदी कट्टर वैष्णव लोक अपवाद आहेत. वारकरी पंथात मनुष्य मेल्यावर वैकुंठवासी होतो असे मानले जाते. तुकोबांचेच उदाहरण घे ना. वीरगळांवरचे शिवपिंडीचे पूजन हे वीर मेल्यानंतरचे स्वर्गस्थ अथवा कैलासवासाला गेल्याचे मानण्यात येते म्हणून येथे शिवपिंडीचे पूजन. अजून एक कारण म्हणजे इथल्या राजवटी शिलाहार, राष्ट्रकूट मुख्यत: शैव होत्या. तर चालुक्य, यादव शैव वैष्णव अशा दोन्ही देवता मानत होते. किंबहुना शैव वैष्णव असा भेदाभेद फारसा नव्हता. मात्र जनमानसात शिव दैवताचा प्रभाव हाच विष्णूपेक्षा अधिक झिरपलेला होता आणि आजही तो तसाच आहे. साहजिकच शिवपिंडीचे पूजन मोठ्या प्रमाणावर व्ह्यायचे. कट्टर वैष्णवांनी शिवपिंडीला पर्याय म्हणून तसाच शाळीग्राम आणल्याचे तुला माहितच असेल.

In reply to by बोका-ए-आझम

नाही. मूळ कन्नड शब्द 'वीरकल्लू' ह्या शब्दाचे हे अपभ्रष्ट स्वरुप आहे. कल्लू म्हणजे शिळा अथवा दगड.

In reply to by प्रचेतस

कन्नडमध्ये आदरार्थी संबोधायचे असेल तर गळ्/गळु लावतात.(असे वाटते) प्रचेतसगळु, संपादकगळु असे. मी कन्नड पोस्टरवर अशा बर्‍याच कानडी महोदयांना गळु लावलय. ;)

लेख बर्‍याच प्रयत्नांनंतर आत्ता लोड झाला ब्राउजरमध्ये. झटकन आधी वाचनखूण साठवून ठेवली. लेख अप्रतिमच, कोल्हटकरांचे प्रतिसादही माहितीपूर्ण. बारा मोटांच्या विहिरीवरच्या आगामी लेखाच्या प्रतीक्षेत.

लय भारी ल्हेलय राव किकलीच्या देवळाव. देवळाचा जिरनोद्धार आत्ता आत्ताच झालाय. सरकारी मान्स आलती, एका एका दगडाव नंबर टाकुन कोड दिऊन परत बसावताना जितला दगड तितच बसावलाय. दस-याला लय भारी आसतय किकलीत आजुन. जांबची चिलाई देवी न किकलीचा भैरुबा भैन भाव, त्यांची भेट आसतीय ओढ्यावर. किल्लाय कानाय त्यची १ कथा हाय. किल्ल्याव जवा आक्रमण झालत ना तवा सगळा किल्ला रिकामा केला पन १ म्हातारी लय तयार हुती, ति किल्ल्यावच राहीली. म्हातारी दररोज ५० पतरावळ्या खरकाटं लाऊन किल्लावरन खाली टाकायची, आस करुन तिन लय दिवस किल्ला लढावला. आजुन १ सांगत्यात कि किल्ल्यापसन ती पार क्रिष्णा नदीपरेंत भुयार हुत पयल्यांदा, लिंब गोव्याकड जाताना यक बुवासायबाचं देवाळ लागत बारक तितल्या आंब्याखाली लय म्होट्ट खळं पडल तेजात आत बांधकामाचं भुयार हुतं. मान्स म्हनत हुती तिच भुयार आसल पन खरं खोट न बघताच भुयार मुजवुन टाकलं राव मन्सांनी़

In reply to by भीमराव

एएसआय ने टाकलेले नंबर तिथल्या कित्येक दगडांवर दिसून येतात. पुढे शेरी लिंबला जाताना जांबवरूनच गेलेलो. वाटेत गोव्याच्या अलीकडे एका लहानशा घुमटीपाशी एक भग्न वीरगळ आहे. ती किल्ल्यावरच्या पत्रावळींची गोष्ट रामसेजच्या लढ्यासंदर्भात वाचली होती. मावळ्यांनी असा आभास निर्माण केला होता.

श्री वल्ली यान्चा माहितीपुर्ण लेख आवडला. या मन्दिराचा नेमका निर्मीती कालखन्ड कोनता असावा ? श्री कोल्हटकर यान्चे प्रतिसाद छान आहेत. आमच्या सोलापुर हत्तरसन्ग कुडल येथे असेच सुन्दर मध्ययुगीन शिव मन्दिर आहे. बादवे - कोल्हापुर की सातारा जवळ ४/५ मजली महाल विहिरी बद्द्ल कोणास माहिती असल्यास जरुर सादर करावी.

वल्ली दा , सगळा तुझ्या " प्रचेतस " नावाने कन्फुज होतात इन टु ब्र्याकेट वल्ल्या लिव ब्घु ;) धागा लै भारी १ न. :) आमच्यासार्ख्याना अशा ठीकाणी जाउन शष्प कळनार नाही बर झाल तु आहेस मिपावर, असाच फिरत रहा नी आम्हाला असेच ऐतिहासिक ठॅव्याची ओळख करुन देत जा पु. प्रा. प्र. :)

काय अभ्यास आहे रे तुझा. सॉरी पुर्ण लेख नाहि वाचला (वाचून तरी काय कप्पाळ कळणार म्हणा!). तुझ्या चिकाटी आणि जिद्दीला सलाम. फोटो आवडले (कळले नसले तरी)

बाय द वे, भैरव ओळखायचा कसा ? आमच्याकडे ''बहीरोबा''म्हणून ओळखला जाणारा हाच असावा. घरात साप निघू नये म्हणून बहीरोबाची वाळू घरात ठेवायची पद्धत मी ऐकली आहे, त्यावरुन हा भैरवनाथ शोधावा वाटला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बटबटीत डोळे, ओठांतून बाहेर पडणारे दात, गळ्यात नरमुंडमाला, त्रिशुळावर किंवा हातात नरमुंड लटकावलेले, सर्परूपी दागिने, हाती कपाल, वाहन कुत्रा ही भैरवाची प्रमुख वैशिष्ट्ये. भैरवमूर्ती बरेचदा नग्नावस्थेतही दाखवलेल्या असतात.

बऱ्याच दिवसानंतर हा लेख पाहताना नकाशा उघडला तर एक रणदुल्लाबाद नावाचे एक गाव या किल्ल्याच्या उत्तरेस दिसले. नावावरून याचा संबंध शहाजीराजे यांचे हितचिंतक आणि आदिलशाहीतील तालेवार सरदार रणदुल्लाखान याच्याशी असेल असे वाटते. कुणाला याबद्दल काही माहिती आहे का?

त्या परिसरात रणदुल्लाबाद, इब्राहिमपूर, अरबवाडी अशा नावांची गावे आहेत, ती अफझल खानाच्या प्रतापगड स्वारी घ्या काळातली. कारण या परीसरात अफजल खानाचा सैन्य तळ होता. वल्ली बुवा- परत एकदा या किकली गाव पहायला. गावातील पोरांनी इतरत्र पडलेले वीरगळ नीट ओळीने मांडून इतिहास जपला जाईल असे केले आहेत.