✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रानफुलांच्या वाटेवर

ज
जागु यांनी
Tue, 08/25/2015 - 15:58  ·  लेख
लेख
वर्षा ऋतू जीवनधारांचे सिंचन करत येतो आणि मातीच्या गर्भात असणार्‍या प्रत्येक बीज, कंदांना नवजीवनाचे अंकूर देतो. पावसाचे आगमन हळू हळू डोंगर, रानवाटा हिरव्यागार करत जातात. जून जुलै मध्ये रानावनातील कोवळी हिरवळ बाळसं घेत असते. साधारण ऑगस्ट पासून ह्या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुले गवत, झुडपे, वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलांच्या बहराचे. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेले कासचे पठारही आता फुलू लागेल. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुले ह्या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचे पठारच नाही तर सगळ्याच राना-वनात, डोंगर-दर्‍यांत, अगदी शहरातील रस्त्यांच्या कडेलाही जिथे मातीचा संपर्क आहे तिथे आता विविध रंगी रानफुले फुलू लागतील. रानात, ओसाड जागी आता कुर्डूचे गुलाबी तुरे मुकुटाप्रमाणे दिमाखात मिरवताना दिसतील, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगातली फुले तर पिवळ्या रंगाचा गालिचाच तयार करून ठेवतील, बहुरंगी तेरडा पावसाळलेल मन प्रसन्न करेल, केनची पांढरी तुतेरी सारखी फुले आपल्या शुभ्र धवल रंगांनी नेत्रसुख देतील, कुठे कुठे रानहळ्दीचे तुरे तर कुठे कळलावीची लाल-पिवळी हळद-कुंकवासारखी फुले, मध्येच कुठेतरी पांढर्‍या, निळ्या गोकर्णाचे वेल बहरलेले दिसतात तर कुठे रानतीळाच्या फुलांना बहर आलेला दिसतो तर हिरव्या रंगातील लव्यांचे तुरे डुलताना दिसतात. ही तर सगळी सहज पाहता येणारी फुले पण इतरही असंख्य सूक्ष्म सुंदर फुले निरखून पाहता दर्शन देतात. फुलांसोबत गवताचा एक मंद सुगंधही दरवळत असतो. श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचे कमान आणि ही रानफुले हा एक सुखद देखावा असतो. ह्या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यात, नाल्यांमध्ये, तलावांमध्येही फुललेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसेच इतरही काही पाणवनस्पती फुललेल्या दिसतात. ह्या रानफुलांच्या वृक्ष-वेलींचे आपल्या मराठमोळ्या सणांमध्येही महत्त्व असते. नागपंचमीत कळलावी व इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे ह्यांच्या पासून पिठवरी, गौरी बसविल्या जातात. नवरात्रा मध्ये गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुले, रानभेंड्यांची व इतर काही फुलांच्या माळी चढविल्या जातात. चला तर आता ह्या रानफुलांचे दिवस आले आहेत. ह्या रानफुलांच्या रानवाटेवर फेरफटका मारून आपले मन ह्या फुलांच्या दर्शनाने प्रसन्न करा. दूर गावी शक्य नसले तरी नजीकच्या ओसाड जागांवर आजू-बाजूला, एखाद्या कोपर्‍यात कुठे ना कुठे ह्या रानफुलांना न्याहाळून ह्यांनाही आपल्याकडे कोणी पाहते ह्याचे समाधान द्या. फक्त त्याची नासधूस होऊ नये ह्याची काळजी घ्या. काही रानफुलांचे फोटो माझ्या ह्या ब्लॉग वर पाहता येतील .www.ranfulanchyaranvatevar@blogspot.com दिनांक २१ ऑगस्टच्या महाराष्ट्र टाइम्स मधील मुंबई पुरवणी मध्ये प्रकाशीत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
1997 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

वा! कृपया इथेही काही फोटो

एस
Tue, 08/25/2015 - 17:59 नवीन
वा! कृपया इथेही काही फोटो देता आले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments

नमस्कार ताई. फोटो असायला हवेत

मांत्रिक
Tue, 08/25/2015 - 22:14 नवीन
नमस्कार ताई. फोटो असायला हवेत असे वाटते. दुसरे म्हणजे थोडी तपशीलवार माहिती खूप आवडली असती. असो. छान लेख.
  • Log in or register to post comments

मांत्रिक सगळे फोटो मिसळपाव वर

जागु
Wed, 08/26/2015 - 11:39 नवीन
मांत्रिक सगळे फोटो मिसळपाव वर असावेत. रानफुलांच्या रान वाटेवर हे काही भागात धागे आहेत. मी शोधून इथे टाकते. धन्यवाद स्वॅप्स.
  • Log in or register to post comments

चांगला लेख. बाकी

gogglya
Wed, 08/26/2015 - 12:19 नवीन
फक्त त्याची नासधूस होऊ नये ह्याची काळजी घ्या.
ह्याला प्रचंड अनुमोदन. कास पठाराची अती प्रसिद्धी झाल्यानंतर जे काही वाचतोय त्यावरुन तरी अशी ठिकाणे मानव प्राण्यांपासुन अलिप्त रहावीत असे प्रकर्षाने वाटणारा...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा