क्रिकेट ते कबड्डी...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
शाळकरी वयापासून कबड्डी आणि खो-खो हे माझे आवडते खेळ. क्रिकेटची मात्र पराकोटीची नावड. इतकी पराकोटीची की घरात कोणी क्रिकेटची मॅच लावली की नसलेला अभ्यास काढून बसायचे आणि टीव्ही बंद करायला लावायचे.
तेंडुलकरमुळे क्रिकेट आवडू लागलेल्या वर्गात मी होते, आहे. त्याची खेळतानाची देहबोली, शांत स्थिर नजर आणि शब्दाला शब्द न देता कृतीतून प्रत्युत्तर देण्याची पद्धत. मग माझंच वागणं इतकं बदललं की असलेला अभ्यास बाजूला ठेवून, चक्क रात्री जागून मॅच बघू लागले. कधीतरी मी आणि धाकटा भाऊ रात्रीचे जागे राहून मॅच बघत बसलेले असायचो. ती संपता संपता आपली गाडी गडगडायची. भाऊ वैतागून निघून जायचा आणि मी मात्र चिवटपणे ती मॅच पूर्ण बघायचे. खूपदा चमत्कार व्हायचा, आपण जिंकायचो. मग भावाला हाक मारून बोलवायचं आणि दोघांनी मिळून पुन्हा हायलाईट्स बघायच्या.
भारताने टी-ट्वेंटीचा विश्वचषक जिंकला, तो मी पाहिलेला शेवटचा सामना. तेंडुलकरमुळे लागलेली या खेळाची आवड नंतर आटूनच गेली. मग रोजच्या धबडग्यात, संसाराला लागल्यानंतर अशा मॅचेस बघणं मागे पडत गेलं. मात्र दूरदर्शनवर कबड्डी, खो-खो चे सामने लागलेले दिसले की आवर्जून बघितले जायचे.
आता प्रो-कबड्डी सुरू झालंय. हे दुसरं वर्षं. मजा येतेय सामने बघायला. अगदी मोठी लेकही आमच्या बरोबरीने सामने बघते. जास्त गुण दिसतात, ती माझी टिम, अशी निवड करते आणि आनंदाने सामने बघते. तिला हा खेळ आवडतोय, हे बघून आम्हीही सुखावतोय.
हे लिहावंसं का वाटलं... तर काल घरी जाताना लहान मुलांना खेळताना बघून क्षणभर थांबलेच मी. जेमतेम पाच ते आठ वयोगटातली मुलं. इमारतीसमोरच्या मोकळ्या जागेत खेळणारी. मधोमध खडूने पांढरी रेघ आखलेली आणि कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी... मस्त वाटलं. बाजूला एक वयस्कर काका त्या मुलांना काही सूचना करत होते आणि ती मुलं सुद्धा, ए आम्ही यु मुंबा... एकपण मॅच नाय हरलो ... अरे ए... आम्ही दबंग... असं म्हणत मस्त खेळत होती. गल्लोगल्ली खेळलं जाणारं क्रिकेट ओसरत असतानाच हे नवं चित्र बघून खरंच छान वाटलं... आता पुढचे सामने बघताना ते छोटे कबड्डीपटू येत राहतील नजरेसमोर...
प्रतिक्रिया
खर आहे
सहमत
क्रिकेट नावडणारे असतात?
ताई आपण स्वतः खो खो खेळल्याचे
+१; खो खो
कबड्डीच्या सामन्यांमधलं पदलालित्य