Skip to main content

ब्रिटिश राज आणि नुकसानभरपाई

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 24/07/2015 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजतागायत कोणी हा मुद्दा उचलून धरला होता का? इथे तर अशी परिस्थिति आहे की ब्रिटीशांनीच भारताचे कल्याण केले ,विकास घडवला , रेल्वे /पोस्ट /तार आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान आणून पुराणकथात रमणार्या भारतीय /हिंदू समाजाचा उद्धार (?) केला अशी मते बाळगणारे आणि व्यक्त करणारे लोकही आज भारतात सापडतात , त्यांना सणसणीत चपराक हाणत शशी थरूर यांनी ब्रिटीशांनी भारताला किती व कसे लुटले? भारतीय सैनिकांचा वापर करून पहिले व दुसरे महायुद्ध जिंकताना भारताच्या हाती मात्र धुपाटणेच कसे आले ?बंगाल मध्ये 1943 साली पाडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, जालियानवाला बागेत क्रौर्या ची परिसीमा गाठणारे अमानुष हत्याकांड याचा समग्र ऊहापोह थरूर यांनी केला . ब्रिटिश येण्यापूर्वी जगाच्या व्यापारातील भारताचा हिस्सा 24% होता ,परंतु 1947 साली तो हिस्सा फक्त 4% राहिला होता. देशी उद्योगधंद्याना पद्धतशीरपणे मारून टाकायचे, भारतीय कच्चा माल स्वस्त दरात विकत घेवून ब्रिटनमध्ये त्यावर प्रक्रिया करून पुन्हा चढया दराने भारतात आणि जगात विकायचा ,असा अव्यापारेषू व्यापार ब्रिटीशांनी केला . या आणि अशा अनेक "गुन्ह्यांसाठी" ब्रिटन जबाबदार असून त्याची जबाबदारी ब्रिटनला टाळता येणार नाही ! त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा आणि ब्रिटिश सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची ,अशी रास्त मागणीही केली . परखड मत व्यक्त करून खर्या इतिहासाची जाणीव ब्रिटीशांना ,जगाला आणि भारतीयांनादेखील करून दिल्याबद्दल शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही ) माझ्याकडून जाहीर आभार व अभिनंदन !

वाचने 25639
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by गॅरी ट्रुमन

हा फक्त दीड (अंकी १ १/२) ओळीचा प्रतिसाद क्लिंटन यांचा असूच शकत नाही एवढं बोलून मी माझे .... शब्द संपवतो. ;)

In reply to by गॅरी ट्रुमन

जालियनवाला बाग प्रकरणी इंग्रजांना माफ करा असे कोण म्हणत आहे? सांगाल का? कोणतीही गोष्ट माफ न करण्यासारखी आहे म्हणजेच तिच्यामुळे अ़क्षम्य अन्याय झालेला आहे हे सिद्ध होत नाही का ? अश्याच अक्षम्य गोष्टीचे परिमार्जन करण्याचे साधन म्हणून भरपाई या संकल्पनेचा जन्म झाला आहे. Reperation = the action of making amends for a wrong one has done, by providing payment or other assistance to those who have been wronged. =============== जालियनवाला बाग हे एक प्रकरण झाले. त्यापासून बंगालच्या दुष्काळात लाखो लोकांना भुकेने मरायला ठेवून भारतातले धान्य युरोपियनांसाठी राखीव साठा ठेवणे इथपर्यंत आणि त्यामधल्या आणि त्या सीमांच्या बाहेरच्या परिघातले अनेक अत्याचार ब्रिटिशांनी भारतिय उपखंडातल्या लोकांवर केले आहेत. बंगालच्या दुष्काळात लोक लाखांनी मरत आहेत असे स्वतःच्या अधिकार्‍यांचे अहवाल वाचून तत्कालिन ब्रिटिश पंतप्रधान चर्चिलचे जगप्रसिद्ध वचन होते : "गांधी अजून मेले नाहीत काय ?" (येथील गांधीचा आदरार्थी उल्लेख माझ्यातर्फे आहे.) ... वसाहतवादाच्या काळातले बहुतेक सगळे अन्याय हे नजरचुकीने झालेले नसून वंशवरिष्ठतेच्या गुर्मीतून आणि सामरिक वर्चस्वाच्या बळावर झालेले आहेत हे तर पूर्ववसाहतवादी राष्ट्रेही नाकारत नाहीत. अश्या अक्षम्य गुन्ह्यांकरिता मानवी हक्कांचे जागतिक पुरस्कर्ते म्हणवून घेणार्‍या (पूर्ववसाहतवादी) राष्ट्रांनी भरपाई नाकारण्यामागे सारासारविवेक नसून इतर अनेक कारणे आहेत. त्यातली काही महत्वाची अशी आहेत... १. संभाव्य अर्थिक भरपाईपासून बचाव; २. भूतकालात केलेल्या अश्लाघ्य कृत्यांची जागतिक स्तरावर उजळणी होऊन होणारी बदनामी; ३. सद्य सरकारने वरील दोन गोष्टी होऊ दिल्या म्हणून स्वतःच्या देशातल्या जनतेचा होणारा प्रक्षोभ; ४. वरचा इतिहास उघडपणे स्विकारल्यामुळे इतर जागतिक प्रकरणांमध्ये जागतिक स्तरावर कमी झालेली/होणारी पत; इत्यादी. बाकी सगळी उघडपणे सांगितली जाणारी कारणे केवळ कातडी बचावण्यासाठी केलेले धुर्त शाब्दिक खेळ आहेत ! याला इंग्लिशमधल्या "हॉगवॉश" या शब्दाइतका उत्तम दुसरा इंग्लिश आणि मराठी शब्द मला माहित नाही. वाईट इतकेच की या "हॉगवॉश" ला अनेक विचारी माणसेही बळी पडतात आणि इतिहास विसरतात की "अशी अनेक धुर्त वचने (किंवा डिसइन्फॉर्मेशन किंवा हॉगवॉश) वसाहती निर्माण करण्यासाठी आणि त्या वसाहतींचे अनेक शतके जुलुमाने शोषण करण्यात महत्वाचे शस्त्र म्ह्णून कामी आणली गेली होती".

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

३. सद्य सरकारने वरील दोन गोष्टी होऊ दिल्या म्हणून स्वतःच्या देशातल्या जनतेचा होणारा प्रक्षोभ आणि त्यामुळे निवडणुकीत कमी होणारी मते;

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही माझा एक महत्वाचा मुद्दा विसरत आहात. वैयक्तिक भरपाई द्यायला आणि मागणी करायलाही काहीच चूक नाही. पण तशी मागणी आपण राजकीय दृष्ट्या करू शकत नाही कारण त्यावेळी भारतीय म्हणून अशी ओळख आपल्या पूर्वजांची नव्हती. त्यावेळी जुलमी राजे होतेच. समजा अशा जुलमी राजाने कत्तली केल्या असतील आणि लोकांना लुटले असेल तर त्याची भरपाई कोणाकडून घेणार? जसा हा राजा जुलमी तसे इंग्रजही जुलमी. की पोस्ट फॅक्टो जजमेम्ट वापरून आपले पूर्वज जसे भारतीय तसा हा राजाही भारतीय? आज अंबानींसारखे अनेक भारतीय जनतेला लुबाडत आहेत. त्यांनी जमा केलेली माया नंतरच्या १० पिढ्यांनाही पुरेल. मग अचानक जागे होऊन दहा पिढ्यांनंतर अंबानींच्या वंशजांना धरून भरपाई मागणार? असो. याविषयावरील प्रतिसाद आता थांबवत आहे.

थरूर जाणीव करून देत होते की अन्याय झाला आहे. म्हणून आजच्या ब्रिटिश लोकांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली नाही. अशा मागण्या आता मान्य करून नसत्या प्रश्नांची निर्मिती होईल. व मानवी संहार घडून नव्या सूडाचा मार्ग प्रशस्त होईल. असे मला वाटले. काही गोष्टींचा क्षमा करून निपटारा केला गेला तर तो उदारपणे मान्य करण्यात मानवी मूल्यांची बूज राखली जाईल.

In reply to by शशिकांत ओक

असे का बरे होईल ?! १. सुधारणेचा मार्ग "चूक झाली हे कबूल करणे आणि त्याबद्दल शरम वाटणे" या पहिल्या पायरीपासून होतो असे म्हणतात. २. जर चूकच कबूल नाही तर मग सुधारणा कश्यात करायची ? किंवा सुधारणा करायची काय गरज आहे ? ३. समोरच्याला क्षमा करण्यासाठी प्रथम त्याने चूक झाली आहे हे कबूल करायला पाहिजे, नाहीतर क्षमा कोणाला आणि कशाबद्दल करायची ? ४. जर केलेली कृती चूक आहे हे कबूल नाही तर तीच (चूक नसलेली = बरोबर असलेली) कृती परत परत करायला हरकत नसावी, नाही का ?! या जगातला वाईटपणा "येथे वाईट माणसे आहेत" यापेक्षा जास्त "इथली चांगली माणसे वाईटपणा पाहून गप्प बसणे पसंत करतात" यामुळे आहे.

थरूर आपल्या भाषणाच्या सुरवातीस असे म्हणतात की ब्रिटीशांचे भारतात आगमन होण्यापूर्वी भारताची अर्थ परिस्थिती जागतिक अर्थ परिस्थितीचा २३% भाग होईल इतकी चांगली होती. म्हणजे आपण असे मानू की १७५० साली जागतिक अर्थ परिस्थिती १००० कोटीची असेल तर त्यातील भारताचा वाटा २३० कोटी होता. थरूर पुढे असे ध्वनित करतात कि पुढील दोनशे वर्षात सत्तेवर असताना ब्रिटीशांनी पद्धतशीर प्रमाणे प्रयत्न करून भारताची अर्थ स्थिती केवळ ४% वर आणली. पण त्याच काळात इतर देशात आणि विशेषत:युरोप मध्ये औद्योगिक क्रांती झाल्याने त्याची उत्पादन क्षमता वाढली आणि त्यांची अर्थ स्थिती खूपच सुधारली-या गोष्टीचा विचार थरूर करत नाहीत असे वाटते. समजा की इतर देशात प्रगती झाल्याने जागतिक अर्थ स्थिती २०० वर्षांनी ५७५० कोटी इतकी झाली पण भारताची अर्थ स्थिती २३० कोटीच राहिली- तरी सुद्धा भारताची जागतिक व्यवस्थेतील टक्केवारी ४% च होइल. मला ब्रिटीशांनी भारताची आर्थिक प्रगती रोकांयचा प्रयत्न केला नाही असे म्हणायचे नाही. पण जगातील इतर घडामोडीचा परिणाम लक्षात न घेता अशा प्द्ध्तीतेने टक्केवारी मांडल्याने थरूर याना त्यांचा मुद्दा पटविण्यास मदत होत असली तरी त्यांचे विधान अतिरंजित होते आहे असे दिसते .

In reply to by रमेश आठवले

पण त्याच काळात इतर देशात आणि विशेषत:युरोप मध्ये औद्योगिक क्रांती झाल्याने त्याची उत्पादन क्षमता वाढली आणि त्यांची अर्थ स्थिती खूपच सुधारली- त्याच भाषणात तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आहे... इंग्रजांनी भारतातील कच्चा माल कवडीमोल भावाने आपल्या कंपनीच्या माध्यमात इंलंडमध्ये निर्यात केला आणि तयार माल अनेक पटींनी जास्त किंमतीने हक्काची बाजारपेठ म्हणून वापरून इथे विकला. त्यासाठी स्थानिक उद्योगधंदे अनेक जुलुमी कारवायांनी बंद पाडले. मलमलीच्या विणकरांची नखे, बोटे आणि मग हात तोडल्याचे वाचले असेलच, हे एक अत्याचारी उदाहरण आहे. इतर अनेक आहेत. थोडक्यात औद्योगीक क्रांतीतल्या मालाला जर जुलुमाने कब्ज्यात असलेली बाजारपेठ मिळाली नसती तर ती इतकी यशस्वी झाली नसती. शिवाय युरोपियन भारतात येण्याअगोदर जागतीक अर्थकारणात असलेला २३ टक्के सहभाग हेच सिद्ध करत नाही का की भारतियांनी स्वतःच्या बळावर जागतिक अर्थकारणात आपले स्थान निर्माण केले होते ? युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होत असताना भारतिय आहेत तिथेच बसून राहिले असते काय ? त्यांनीही प्रगती चालू ठेवली असतीच नाही का ? आताही नाही का प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाश्चिमात्य देशांचे अनेक अडथळे असूनही जागतीक अर्थकारणात भारत आपले स्थान मिळवून आहे ? इथे बनवली नसती तरी पाश्चिमात्यांकडून औद्योगिक उपकरणे विकत घेऊन पौर्वात्य देशांनी आपला विकास चालू ठेवला असता. वसाहतवादाच्या अगोदरच्या आणि सुरुवातीच्या काळात बंदूका, तोफा, इ माल पाश्च्यात्य इथे विकतच होते. त्याकाळात पाश्च्यात्य सत्तांनी बर्‍यावाईट क्लृप्त्या वापरून जमीन आणि व्यापारावर वर्चस्व मिळविले तेथेच जुलुमी असमतोल सुरु झाला. खुल्या व्यापारी व्यवस्थेची चर्चा करताना, ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी भारत आणि ब्रिटन भारत यांचा तौलनिक व्यापारी दर्जा काय होता हे पाहण्यासाठी, काही महत्वाची तथ्य उधृत करतो... १. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या राणीच्या खलित्याने झालेल्या पहिल्या व्यापारी भारत मोहिमेतील जहाजे इतर काही गोष्टींसह खास ब्रिटिश ब्रॉडशीट (कापड) भारतात घेऊन आली होती. त्या कापडाची जाडी आणि भरड वीण पाहून त्यातला एक यार्डही भारतात विकला गेला नाही. कारण त्यावेळेस भारतात त्याच्या अनेक पटींनी उत्तम कापड बनत होते. अर्थातच ती मोहीम पूर्णतः अयशस्वी झाली. २. भारतातून मसाल्यांचे पदार्थ आणि चीनमधून चहा यांच्या निर्यातीचा पूर्व-पश्चिम व्यापारात मोठा भाग होता. युरोपियन सत्तांनी सर्वप्रथम सागरी मार्गांवर प्रभुत्व मिळवून या दोन गोष्टींचे व्यापार आपल्या अंकित केले. यासाठी त्यांना अरबी दर्यावर्द्यांचेही शिरकान करावे लागले. या सागरी चकमकी चांचेगिरीपेक्षा काही वेगळ्या नव्हत्या. असो. सद्या इतकेच पुरे.

आपल्याला माझा मुद्दा समजलेला नाही. सध्या एवढेच पुरे .

In reply to by रमेश आठवले

आपल्याला माझा मुद्दा समजलेला नाही.
बरेच दिवसानी मिपावर कोणी तरी अत्मसत्य उगारलेले पाहुन आनंद जाहला =))

In reply to by रमेश आठवले

आपल्याला माझा मुद्दा समजलेला नाही.
एका व्यक्तीचा मुद्दा दुसऱ्यास समजून सहमती झाली आहे हेच दुर्मिळ आहे

In reply to by कपिलमुनी

एका व्यक्तीचा मुद्दा दुसऱ्यास समजून सहमती झाली आहे हेच दुर्मिळ आहे
>> हा मुद्दा मात्र १००% समजला . संपुर्ण सहती नोंदवत आहे :)

In reply to by रमेश आठवले

"युरोपात औद्योगिक क्रांती होत असण्याच्या प्रक्रियेकडे भारतिय उपखंडातले लोक हातावर हात ठेवून गप्प बसून बघत राहिले असते, त्यामुळे आपोआप युरोप आशिया खंडापेक्षा जास्त श्रीमंत झाला असता." हाच एक महत्वाचा मुद्दा तुमच्या प्रतिसादातून ध्वनित होत आहे आणि मी ते कसे बरोबर नाही हे तात्कालीक सत्यांच्या आधारे सांगितले आहे. आता... तुमचा व माझा दोन्ही प्रतिसाद परत वाचल्यास उलगडा होईल असे वाटते.

भारत सोडा पण चीन सारख्या आणि पारतंत्र लादले नसलेल्या पूर्वेतील इतर देशातही त्या दोनशे वर्षात युरोप मध्ये झाली तशी औद्योगिक क्रांती झाली नसल्याने, त्यांची जागतिक आर्थिक व्यवस्थेतली टक्केवारी त्या काळात खाली घसरली आणि तुलनेने युरोपातील देशांची वाढली. भारतात ही घसरण ब्रिटीशांच्या कारवायांमुळे अधिक झाली असेल, पण ती २३% वरून ४% वर यायला केवळ ब्रिटन एकटे जबाबदार आहे असे नाही. तर इतर काही युरोपातील देशात त्याच काळात प्रवेगाने वाढलेल्या उत्पादनामुळे जागतिक अर्थ व्यवस्थेत मधील त्यां देशांचा वाटा वाढत गेला हे ही आहे. .

In reply to by रमेश आठवले

कृपया, १. चीनचा संपूर्ण इतिहास नाही तरी कमीत कमी ब्रिटनची चीनबरोबरची अफू युद्धे आणि ब्रिटिश लोकांनी चीनमधून चहाच्या रोपांची चोरी करून चहाच्या व्यापारावर कसा कब्जा केला हे वाचा... शांघाईतली कन्सेशन्स आणि हाँग काँग ब्रिटिशांच्या ताब्यात कसे आले ते वाचा... केवळ एकट्या चहाच्या व्यापाराचा सामरीक ताकदीने आणि चोरीने (दोन्हीही जुलुमानेच) ताबा घेतल्याने जागतिक व्यापारातील चीनचे स्थान किती खाली गेले आणि ब्रिटनचे (विशेषतः ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे, जी व्यापारी फायद्याच्या बळाबर अनेकदा ब्रिटिश सरकारवर हावी झाली होती) स्थान किती वर गेले हे समजेल. २. फ्रेंचांनी इंडोचायनात काय केले ते वाचा... ३. डचांनी इंडोनेशियात काय केले ते वाचा... मग इतर कोणला इथे काही लिहीण्याची गरज भासणार नाही. केवळ वरवरच्या व्यक्तीगत अंदाजांवर नाही तर विश्वासू तथ्यांवर सिद्ध झालेल्या इतिहासावर चर्चा करायची असेल असेल तर पुढे चालू ठेऊ... अन्यथा राम राम !

भरपाई तर मग आपल्याला मुघल व त्यापूर्वीचे सर्व सम्राट यांच्याकडूनही घ्यायला हवी. सर्व राज्यकर्ते हे आपली पोतडी भरणारच मग तुम्ही त्याला लुट,व्यापार,भ्रष्टाचार इत्यादी काहीही नावे द्या. मुघालान्पुर्वी भारत(?) हा अतिशय पुण्यवान व निस्वार्थी राज्यकर्त्यांनी भरलेला असा देश होता असा जर कुणाचा समज असेल तर मला वाटते तो चुकीचा आहे. आर्थिक लुट,शोषण ह्या गोष्टी कोणत्याही प्रकारच्या सामाजिक व्यवस्थेत आधीपासून होत्या आणि पुढेही सुरूच राहतील .