काही दिवसापूर्वी घर शिफ्ट केलं. नवीन घरातलं स्वैपाकघर आधीच्या घरापेक्षा लहान आहे. सामान लावताना एक महत्वपूर्ण साक्षात्कार झाला, की माझ्या घरातील एकूण पसाऱ्याचा सुमारे चार दशांश व्हॉल्यूम विविध आकाराच्या, प्रकारच्या आणि उपयोगाच्या भांड्यांनी व्यापला आहे. बाबौ ! इतक्या वर्षांच्या प्रपंचात मी भांडाभांडी फारशी केली नसली तरी भांडी भरपूर जमवलीत हे प्रखर सत्य त्या घराबाहेर पडलेल्या भांड्यांनी मला जाणवून दिले.
नवीन घरात गेल्यावर सामान लावणे हा एक हॉरिबल प्रकार असतो. हे सामान आपण (आपल्या समजुतीप्रमाणे ) रग्गड मेहनत घेऊन कल्पकतेने जागेवर बसवले तरी त्यानंतर साधारण महिनाभर तरी ते एखाद्या व्रात्य खट्याळ कार्ट्यासारखे आपल्याशी ‘हाईड अँड सीक’ हा खेळ खेळत राहते. मी सामान लावायला मदत करण्यासाठी दोन घट्टमुट्ट बहिणींना आवतन दिले होते. शिवाय बॉक्स खोलून सामान बाहेर काढण्यासाठी एक भक्कम गडी बोलावलेला. त्याला घेऊन तीन बेड, दोन सोफे, टीव्ही कॉम्प्युटर टेबल आणि दोन टीपॉय इतकं सामान लावून झाल्यावर नवरोजींनी हुश्श म्हणून चहासाठी बाह्य दिशेस पलायन केलेले. मग बारीक बारीक सामान लावायला मी व दोघी बहिणींनी पदर खोचला.
गड्याने पहिलेछूट सगळे पर्दानशीन बॉक्सेस धडाधड बेपर्दा करून टाकले आणि त्यांची अंडीपिल्ली बाहेर काढली. त्यामुळे ती सगळ्या घरभर रांगून येता जाता पायात कडमडू लागली.
‘अरे, अरे, एकेक बॉक्स खोलायचे ना !’ मी कळवळले.
‘एकेक कुठं घेऊन बसता, म्याडम, सगळं समोर दिसल्यावर पटापटा लावाय बरं पडतय की !’
मग आम्ही तिघींनी स्वैपाकघराकडे कूच केले आणि तिथे फरशीवर लोळत पडलेल्या गनिमावर म्हंजे भांड्यांच्या ढिगावर तुटून पडलो. गनीम भारी. नवीन घरात छताला लागून लॉफ्ट केलेले नव्हते. त्यामुळे भारी भारी गनिमांना छतावर बसवण्याची काही सोय नव्हती.
आम्ही भांड्यांच्या बोकांडी बसतो तोच गड्याने काचसामानवाला बॉक्स दरादरा ओढत स्वैपाकघरात आणला. त्या प्रवासात दोन नाजुक ग्लास आणि लोणच्याची बरणी धारातीर्थी पडली. लोणचे आधीच संपले होते हे बरं झालं. शकुताई आणि सरूताई उंच काचेच्या कपाटात काचसामान क्रोकरी इ. बसवू लागल्या. मी त्यांना सूचना देता देता किचनओट्याखालच्या ट्रॉलीच्या दहा खोबण्यांमध्ये आठ ताटे, बारा प्लेटी, दोन पराती, दीड डझन लहान-मोठ्या झाकण्या, पाच तवे आणि दोन उठवळ, नव्हे, उथळ पॅन्स या गनिमांना कोंबण्याची खटपट करत होते. इतक्यात पुढच्या आघाडीने तोफा डागल्या..
‘अगं, ग्लासं लावली पण पाण्याचा कावळा बसत नाहीये कपाटात. आणि ही मायक्रोवेव्हची काचेची भांडी क्रोकरी सेटच्या डोक्यावर ठेवू का ?’
‘ओटीजीची भांडी कुठं ठेवायची ?’
‘हा डिनरसेट बाहेर येतोय कपाटाच्या, प्लेटी मोठ्या आहेत ना म्हणून !’
‘कॉफी मग्ज दहाच बसताहेत, उरलेले दोन कुठे ठेवू ?’
‘बाउल-सेट एक बसला. दुसरा काय करायचा ?’
ताटांचा नाद सोडून मी क्रोकरीकडे मोर्चा वळवला. बराच काथ्याकुट केल्यावर निष्पन्न झाले की सगळी क्रोकरी त्या एका लहानशा (?) कपाटात मावत नाही. तेव्हा उरलेल्या क्रोकरीला लहान बॉक्समधे घालून कपाटाच्या वर बसवले.
काचसामानाची अशी विल्हेवाट लावून झाल्यावर आम्ही ट्रॉल्यांकडे मोर्चा वळवला.
आता काम बिकट होते. पहिल्या घरापेक्षा इथला किचनकट्टा लहान असल्यामुळे ट्रॉल्यांपण कमी होत्या. तिखट-मीठ मसाल्याच्या बरण्या, जिरे, मोहरी, हळद आणि तत्सम नाना प्रकाराच्या बरण्या एका ट्रॉलीच्या दोनपैकी एका कप्प्यात ठेवून त्याच पदार्थांच्या साठवणीच्या मोठ्या बरण्या तिथेच खाली ठेवल्या. तेव्हा आणखी सुमारे डझनभर बरण्या बाहेरच राहिल्या असल्याचे ध्यानात आले. त्यांना आणि ट्रॉलीच्या खोबणीत न मावलेल्या दोन पॅन्स आणि तीन तव्यांना तात्पुरते तसेच सोडून आम्ही वाट्या, प्लेटी अन बाउल्सच्या खनपटीस बसलो. पाच नमुन्याच्या लहान-मोठ्या दीड डझन वाट्या , एक डझन पोह्याच्या प्लेटी, तीन नमुन्याचे पाण्याचे ग्लास आणि दोन तांब्ये यांची वरच्या ट्रॉलीत स्थापना केल्यावर खालच्या कप्प्यात दुधाची आणि चहा-कॉफीची वीस-एक लहानमोठी पातेली, वडाप रिक्षात कोंबलेल्या शाळेच्या पोरांप्रमाणे दाटीवाटीने बसली. त्याखालच्या कप्प्यात भाजी-आमटीची दहा-पंधरा लहान पातेली बसली, पण दोन लिटर आणि त्यापेक्षा मोठ्या चार पातेल्यांनी त्यात बसायला साफ नकार दिला. त्यांची रवानगी ‘तात्पुरत्या’वाल्या गटात झाली. आणि त्यांची जागा दोन डिचकी, एक गुंड, एक बरणी आणि तेलाची किटली यांनी आनंदाने घेतली.
मग शेजारच्या ट्रॉलीवर हल्ला चढवला. प्रथम कढया सर्वात खालच्या कप्प्यात लावायचे ठरले. त्यासाठी त्यांची मोजदाद केली तर तब्बल अकरा कढयांची मी धनीण आहे, असे माझ्या लक्षात आले. त्यापैकी एकातएक बसणाऱ्या तीन कॉपर बॉटम वाल्या मला आईने दिल्या होत्या. तीन काळ्या इनॅमलच्या, एका कंत्राटदाराने वास्तुशांतीला दिल्या होत्या. एक नॉनस्टिक मावशीने दिलेली आणि दोन निर्लेप मी विकत घेतल्या होत्या. आणि एक पांढरी हिंडालिअमची भाजीची आणि एक लोखंडी तळणाची या प्राचीन काळापासून माझ्या स्वैपाकघरात नांदत होत्या.
गेल्या दहा वर्षात मी , वर्षाला फार तर एखादेच भांडे खरेदी केलेलं मला आठवत असताना ही इतकी भांडी आली कुठून याचा मला प्रचंड अचंबा जाहला ! ही एवढी पातेली, तवे अन कढया कुठून आले याचा मागोवा घेतल्यावर निष्पन्न झाले की इंडक्शन शेगडी झटपट काम देते म्हणून घेतल्यानंतर तिची स्पेशल भांडी म्हणजे सपाट बुडाचा तवा, पॅन, पातेली, कुकर हे सगळे लटांबर तिच्या मागून आले होते. तसेच निर्लेपचा लेप निघाल्यामुळे कर्मच्युत झालेले दोन तवे उगाच भटकत फिरत होते. जुने पोळपाट भंगले म्हणून नवीन घेतले, पण जुने शिसवी अन आज्जीने दिलेले म्हणून टाकवेना. ते चिकटपणे घरात राहिलेले. चाकू-सु-यांची धार ऐन वेळी दगा देते म्हणून त्यांना चार-पाच पर्याय ठेवलेले. अॅल्युमिनिअमची फोडणीची, कढणाची पातेली कामवालीने बरेचदा नीट घासलेली नसतात म्हणून त्यांनाही दोन ते पाच पर्याय.
..सगळ्या कढया एकमेकींच्या गळ्यात गळा घालून खालच्या कप्प्यात सुखेनैव नांदू लागल्याचे पाहून मी हुश्श केले. तेवढ्यात बहिणीने इंडक्शनच्या छोट्या कुकरला त्यांच्यात ढकलायचा प्रयत्न केला. त्यासरशी सगळ्या कढया एकदम जोरजोरात एकमेकींशी आणि त्या कुकरशी भांडू लागल्या. मग मी मध्ये पडून त्या कुकरची रवानगी मोठ्या कुकरशेजारी कट्ट्यावर केल्यावर पुन्हा शांतता प्रस्थापित झाली. मग कढयांच्या वरच्या कप्प्यात दोन्ही कुकरमधे घालायची लहानमोठी भांडी आणि दह्या-तुपाचे साताठ गडवे, ताकाचे दोन गंज, दोनतीन चंबली इ. विराजमान झाले. त्यावर एक लहान कप्पा होता त्यात दोन डझन लहान चमचे, पाचुंदाभर कालथे, पळ्या, डाव, झारे आणि उलथणी, पाच सहा चाकू अन सुरे, पापड भाजायचे दोन चिमटे आणि एक जाळी, एग बीटर आणि वाट्यांवरच्या अर्धा डझन लहान झाकण्या यांनी ठाण मांडले. त्यातच फोडणीचा डबा दाटीवाटीने विसावला.
आम्ही समाधानाने दोन सुपे, तीन रोवळ्या, दोन पोळपाट दोन लाटणी, एक दगडी आणि एक लोखंडी खलबत्ता, फळांच्या दोन टोपल्या आणि त्यावर ठेवायची जाळी यांना कुठे ठेवायचे याचे खलबत करू लागलो. यापैकी दोन सुपे आणि एक पोळपाट-लाटणे सोडून इतर सर्व सिंकखालच्या सिंगल ट्रॉलीमधे मावते असा शोध लागला. लगेच त्यांची तिथे रवानगी झाली. मग पिठाचे दोन डबे आणि साठवणीच्या डाळी, रवा, पोहे, साबुदाणे, शेंगदाणे, मीठ, गूळ, शेवया, कुरडया इ.च्या डब्यांची रवानगी, भिंतीला खेटून, फ्रीज आणि बाल्कनीचे दार यांच्यामध्ये दाटीवाटीने अंग चोरून उभ्या असलेल्या एकमेव रॅकमधे करण्यात आली. त्याच रॅकने आपल्या आठ कप्प्यांमध्ये दोन खाऊचे डबे, दोन बिस्किटांचे डबे, प्लास्टिकचे लहान-मोठे मोजदाद करता न येणारे कंटेनर, साबणाचे बॉक्स, पोळीचे दोन डबे, लोणच्यांच्या दोन काचेच्या, चटणीची एक चिनीमातीची अन चिंचेची एक बरणी, झालच तर सॉसच्या दोन बाटल्या हे सर्व सामान उदारपणे सामावून घेतले. इतकेच नव्हे, तर दोन सुपे, जादाचे पोळपाट-लाटणे, दोनतीन बुट्ट्या आणि गव्हाची अन पिठाची चाळणी यांना आपल्या डोक्यावर नम्रपणे धारण केले.
तरीही अजून, मायक्रोवेव्हची प्लास्टिकची भांडी, केकची भांडी, इडली- स्टँड, अप्प्याचा खळगेवाला तवा, चकली-यंत्र, पुरणाची जाळी, टोस्टर, बीटर, कॅसरोल, एक किटली, एक चार कप्प्याचा टिफिन इ. भांडी उघडीच पडली होती. त्यांना आणि मघाशी एका बाजूला बसवलेल्या लोखंडी तवे इ. मंडळींना अखेर एका रिकाम्या पिंपात समाधी देऊन आम्ही सोफ्यावर जाऊन पसरलो, त्यानंतर सुमारे एक तास डोक्यातला भांड्यांचा आवाज काही थांबला नव्हता.
अखेर पोटातल्या गुरगुरीने भांड्यांच्या आवाजावर मात केली आणि आम्ही तिघी पोटपूजेच्या तयारीला लागलो. आता पोळ्या लाटायचा उत्साह आणि शक्ती कुणालाच उरलेली नसल्याने आमटी भातावर भागवायचे ठरले. त्याप्रमाणे ‘हाईड अँड सीक’ करत कुकरची भांडी, डाळी, तांदूळ इ. जमवाजमव झाली. सगळ्यांना कुकरात घातले आणि सरूताई किंचाळली, ‘अगं बबे, कुकरची शिट्टी कुठं ठेवली आहेस ?’
अरे देवा ! सामान भरताना मी कुकरची शिट्टी हरवू नये म्हणून काळजीपूर्वक एका प्लास्टिकच्या डबीत घालून ठेवलेली मला आठवली. पण ती डबी कुठे ठेवली, हे जाम आठवेना !!
रॅकमधल्या असंख्य प्लास्टिक डब्यांकडे आम्ही तिघींनी हताशपणे पाहिले आणि हात कपाळाकडे नेले ! आता शिट्टी शोधण्याची शक्ती एकीतही राहिली नसल्याने हॉटेलचा रस्ता धरण्याचा ठराव बहुमताने पास झाला. गाडी काढून सगळे हॉटेलात जाऊन सुखेनैव क्षुधाशांती करू लागलो. पण माझ्या घशाखाली घास उतरेना...
अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता, तशी ती इवलीशी शिट्टी मला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसू लागली होती !
उद्या खेळायच्या ‘हाईड अँड सीक’ खेळाने माझ्या पोटात आजच गोळा आणला होता !!!
वाचने
13908
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा! आमेन! :-)
In reply to खुस्खुशित ! by कवितानागेश
मस्त लिहिलीय मजा आली वाचुन
एकदम खुसखुशीत लेखन..कशी कळत
माझा तर ठाम विश्वास आहे की
ही कथा आठवली
In reply to माझा तर ठाम विश्वास आहे की by स्वप्नांची राणी
लिंक बद्दल
In reply to ही कथा आठवली by श्रीरंग_जोशी
आठ दिवसांनी मिळाली.
In reply to माझा तर ठाम विश्वास आहे की by स्वप्नांची राणी
असली भांडाभांडी होय . मला
मस्त!! अजूनपर्यंत कोकणातच
मी तर लहानपणापासूनच घरात
In reply to मस्त!! अजूनपर्यंत कोकणातच by सूड
अप्रतिम!
दर्जेदार खडखडीत लेखण.
हम्म..
भारी लिहिल आहे. :)
झकास आणि प्रचंड खुशखुशीत लेखन
घरोघरी मातीच्या चुली,