Skip to main content

आयुष्य आणि करीअर...

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 02/07/2015 03:32 या दिवशी प्रकाशित केले.
career
चिनार यांच्या माझं करीयर मार्गदर्शन (!) या लेख व प्रतिसादांवरून सुचलेले व कायम साचलेले विचार आणि निरिक्षण (काही चुकत असेल तर अवश्य सांगा): एखाद्या विद्याशाखेचं पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर 'आता काय करू?' हा प्रश्न जर उभा राहत असेल तर आडातच समस्या आहे असं माझं मत आहे. दहावीचा निकाल लागेपर्यंत लोक्स निर्धास्त असतात. "पुढे काय करणार?" असं विचारल्यावर "किती मार्क्स मिळतात त्यावर ठरवू" असं उत्तर देतात. जणू आयुष्यात पहिल्यांदाच कुठलाही अभ्यास न करता थेट दहावीचीच परिक्षा दिली असते. शाळेतल्या पूर्वपरिक्षेच्या निकालावरून साधारण अंदाज तर येतो ना? फारतर ५% अगदीच १०% फरक असू शकतो. पण 'शाळेत ९८-९५ मिळवत होता हो पण बोर्डात बघा फक्त ४५ मिळाले' असं तर नसतं ना? निकाल लागताक्षणी आधी कागदपत्रे मिळवण्याची हातघाई. कागदपत्रांच्या आधी ते 'कोणते, कसे आणि कुठे मिळतील' याच्या चौकशीपासून सुरुवात होते. अरे दहावीची आख्खी सुटी पोरं टवाळक्या करत घालवत होती ना? त्यांना धाडायचं ना माहिती काढायला. जरा दुनियादारी पण कळेल तेही एकही पैसा न घालवता. कारण नंतर 'तुमचं काम १० मिनिटांत करून देतो' असं म्हणून कागदांसकट दोन-तीन हजार रुपये घेऊन गायब होणारे जी दुनियादारी शिकवतात ती भारी पडते. हा वेंधळेपणा ८०च्या दशकात होता आणि अजूनही आहेच बरंका. यानंतर येते विद्याशाखा निवडायची पाळी. तेथे खरी मदर ऑफ ऑल गोंधळ असते. बाब्याने आणि बाब्याच्या बाबाने जे काही ठरवलं असतं ते सत्यात उतरत नाही असं दिसायला लागतं. काही सुपुत्र जिथे मित्र तिकडे आम्ही शेपूट हलवणारे कुत्रं याच भुमिकेवर ठाम असतात. जरा बरे मार्क्स असतील तर शहरातल्या सर्वोत्तम आणि विज्ञानशाखेच्या कॉलेजमधेच जायचे असते. मग इकडे विचार, तिकडे विचार करत अक्षरशः दोन-पाच दिवसांत 'पुढची पन्नास वर्षे कोणत्या विद्याशाखेत आयुष्य घालवणार' याचा निर्णय घेतला जातो. त्यात काय गल्त हाय बाप्पा? लगीन करतांनी बापाने नाय का आयला ५ मिनिटांत पसन केल्ती? पुढच्या ५० वर्षाचा थो इचार करत बसला आसता तर आज हे दिवस दिसलं असतं का? असो. सामाजिक दबावाखातर, मित्रांच्या आग्रहाखातर, कुठल्यातरी स्नेहींच्या यशस्वी कारकिर्दीकडे पाहून (खरेतर त्याच्या बंगला-गाडीकडे पाहून) मला याच शाखेत अकरावीसाठी प्रवेश घ्यायचाय हे निश्चित होतं. ज्यांना यथातथा मार्क्स असतात ते काहीतरी भयंकर गुन्हा केल्यासारखे आपले मार्क्स, आपली विद्याशाखा आणि आपलं कॉलेजचं नाव लपवत फिरत असतात. काही नातेवाईक आपण स्वतः काय तीर मारलेत ते पार विसरून ते पार टोचून टोचून पोराला हैराण करतात. लग्नकार्यात, समारंभात, "जाऊबाइंच्या मुलाचं काही खरं नाही बघा, अहो काय शिकतोय, शिकतोय का नाही काहीच सांगत नाही. आमच्या मुलांनी मात्र नाव काढलं हो. एक इंजिनीअरींग करतोय, दुसरा डॉक्टर झालाय बरं का." वैगेरे वैगेरे. ही टोचून जखमी झालेली पोरं चिवट आणि जिद्दी असतील तर याच लोकांना डोळे बाहेर काढायला लागतील अशी प्रगती उत्तरआयुष्यात करतात. तो भाग वेगळा. पण दहावीनंतर बारावी होईस्तोवर फारच ताण सहन करावा लागतो. चला पुढे: दहावी पास. आता घुसा विज्ञान शाखेत, मग वाणिज्य आणि फारच काय नाय जमलं कुठे तर मजबूरी का नाम महात्मा गांधी म्हणून कलाशाखेत. काय करणार, गावात अशी तीनच कॉलेज असतात ना? याच्यापार बापाला माहितही नसतं आणि शक्तीही नसते माहित करून घ्यायची. कसंबसं, भरमसाठ शिकवण्या लावून, फिया भरून पोरं मार्कांच्या स्पर्धेत पळत असतात. अरे याला १० मार्क आहेत, हा घ्या, याला दोन मार्क्स आहेत हा ऑप्शनला टाका. परिक्षेचं तंत्र आत्मसात करताकरता आयुष्याचं तंत्र आत्मसात करायचं राहून जातं. त्यात कुठे प्रेमप्रकरणाची झुळूक आली की समोरची पुस्तकं उडून जातात. परिक्षा तोंडावर आली की झोंबीसारखे अभ्यासाला लागून बारावीची खिंड पार करायच्या कामाला लागतात. झाली बारावी? ओके. आता परत जिथे दहावीच्या निकालाच्या वेळेस होतो तिथेच आलोय बरंका. फक्त एक अजून अ‍ॅड झालंय. विविध शाखांच्या प्रवेश परिक्षा (यानेकी सरकारचे हमखास व राजरोस पैसे खाण्याचे कुरण). ज्याचा अभ्यास बारावीसोबतच केल्या जातो. काहीतरी उचकपाचक करून या परिक्षा पास होऊन पोरं इंजिनिअरिंग, मेडीकल ला प्रवेश घेती होतात. सुपरटेक्निकलमधे (पक्षी: इंजि. मेडी.) पहिल्यांदा कळतं की आपण नक्की काय शिकायला आलोय इथं तेव्हा धाबं दणाणतं. अभ्यासक्रम अंगावर यायला लागतो आणि मग उपरतीची भावना तयार व्हायला लागते. अरे ये मै कहां आ गया? खरंच मला हेच करायचं आहे का? हा धक्का बसेपर्यंत बाब्याने शांतपणे कधी विचारच केलेला नसतो. एवढं होऊ दे, पुढंचं पुढे बघू असं करतच, दहावी-बारावी-पदवी, वन-स्टेप-अ‍ॅट-अ-टाईम म्हणत धावत असतो. केट्या बसत बसत कसंबसं पदवीचं शिक्षण पूर्ण होतं. मूल मोठं झालेलं असतं. दुनियादारी चांगलीच समजायला लागते. मग स्वत:चे निर्णय स्वतः घ्यायचे असतात. पण वेळ निघून चालली असते. पटकन नोकरी शोधायची असते. कारण बाप हे सुपरटेक्निकलचे खर्च पुरवता पुरवता पुरता टाचा घासायला लागला असतो. आतातरी गप्पकन पोरगा नोकरीला लागेल आणि भप्पकन घरात भगिरथाची गंगा लक्ष्मीच्या रुपात उसळ्या घेत अवतरेल याची स्वप्नं रंगायला लागलेली असतात. मागचा पुढचा विचार न करता पोरगं जे समोर येईल ती नोकरी पकडून घेतं. ठेचकाळत, थांबत, धावत, रक्त ओकत 'सेटल्ड' आयुष्याचं स्वप्नं पुरं करत असतो. इथं व्यक्तिगत आवडीनिवडीला कुणीच विचारत नसतं आता. नोकरी पाहिजे हाताला तरच लग्नाच्या बाजारात उभं राहता येतं ना भावाला? कसलं हिडन टॅलेंट अन् कसलं काय. लग्न होतं, वर्षा-दोन वर्षात लेकरू येतं. बाब्याचं आयुष्य एम-सील लावून एका पाइपातून सरळच वाहणारं पाणी होऊन जातं. थोडंफार सोडलं तर आपल्याकडे हे असंच चित्र आहे. एका लेखात सगळ्याच कारणमीमांसा शक्य नाहीत. त्यामुळे जेवढं जमलं तेवढं लिहिलं. या लोंढ्यांमधून काही तरूण आपला बाज ओळखून लगेच त्या मार्गाला लागतात आणि यशस्वी होतात. असे करणार्‍यांची टक्केवारी १-५ टक्क्याच्या आसपास असेल. बाकीचे जे धन देतंय त्याचंच ऋण मानून आयूष्य काढतात. पण काही मुलं पुर्वीच्या पीढीपेक्षा प्रचंड हुशारी व मेहनतीने काम करतायत. त्यांची निर्णय घेण्याची, समस्यांवर उपाय शोधण्याची प्रवृत्ती अद्भूत आहे. काहीतरी खास आहे जे आधीच्या पीढ्यांकडे नव्हतं. पण अशा मुलांची संख्याही तशी कमीच आहे हे तेवढंच खरं आहे. आणि प्रत्येक आई-बापाला आपलं मूल हे त्या 'खास' मध्येच आहे अशी पक्की खात्री असते हेही तितकेच खरे बरं का. मला कायम प्रश्न पडत आलाय तो हा की करीअर मार्गदर्शन नेमकं कोणत्या वयात व्हावं? त्याची शास्त्रीय पद्धत (मेथाडॉलॉजी) काय असावी किंवा आहे का? त्याचा उपयोग होतोय का? कळव्यात राहत असतांना आमचे घरमालक एका इंजीनीअरींग कॉलेजमधे नोकरीस होते. त्यांनी मुलीला जबरदस्ती झेपत नसतांना त्याच कॉलेजात सीवीलला टाकले. कारण काय तर मुलगी डोळ्यासमोर राहील. त्या मुलीला नृत्याची आवड आणि खरोखर उत्तम नृत्य करता येत होते. पण वडीलांच्या दबावामुळे आणि झेपत नसलेल्या अभ्यासाने ती मुलगी कायम खंगलेली असायची. आजारी आणि कृश असायची. कधी नृत्य वैगेरे करायची तेव्हाच काय तो हसरा चेहरा आणि उत्साही वाटायची. आम्ही त्यांचे वर्षभर मागे लागून त्या मुलीची अवस्था कशामुळे झाली हे पटवून दिले. तीला परफॉर्मींग आर्टचं शिक्षण घेऊ द्या म्हणून त्यांना बरेच मार्गदर्शन केलं. तेव्हा कुठे ते आपला हेकेखोरपणा सोडायला तयार झाले. पुढे काय झालं ते कळलं नाही कारण नंतर आम्ही तिथून दुसरीकडे राहायला गेलो. मी अशा दोन डॉक्टरांना भेटलोय ज्यांना मेडीकलला जायचेच नव्हते. एक गायनॅकोलॉजिस्ट जीचा आर्कीटेक्टसाठी जेजे मधे नंबर नाही लागला, पण मेडीकलमधे लागला म्हणून तेवढ्यासाठी आर्कीटेक्ट व्हायचं स्वप्न सोडून डॉक्टर झाली. दुसरी आयुर्वेद डॉक्टर तिला चित्रकलेची आवड होती, जेजेत शिकायचं होतं पण कोणा जवळच्या हितचिंतक महाभागाने तीला सल्ला दिला की हे फार वाईट क्षेत्र आहे, पुढे काही स्कोप नाही. म्हणून ती बापडी नाइलाजाने डॉक्टर झाली. अशांना भेटलो की बरेच प्रश्न उभे राहतात मनात. केवळ भरमसाठ पैसा कमावण्यासाठी काहीही करावं? जे मनाविरूद्ध आहे तेही? त्याची अनैसर्गिक सवय करून घ्यावी? खरंच आयुष्य जे मिळालंय ते एक शिक्षा म्हणून भोगतो का आपण? 'बस एवढं झालं की नंतर सुखच आहे' असं प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजवत राहायचं? ते 'नंतर' कायम 'आता' मधे नाही का बदलता येणार? पहिल्यापासून आपल्या आवडीनिवडींना शास्त्रशुद्ध पद्धतीने ओळखून त्याच्याशी संबंधीत क्षेत्रात व्यवसाय नोकरी मिळवणे शक्य आहे. गरज आहे एका दूरदृष्टीची, मेहनत घेण्याची, समाजाच्या विचित्र नजरा आणि प्रश्न झुगारून द्यायची. कुठल्याही क्षेत्रात पारंगत व्हायला, व्यावसायिक कौशल्य प्राप्त करायला आणि त्यातून अर्थाजनाचा कायम स्त्रोत मिळवण्याच्या पात्रतेचे व्हायला फक्त सात वर्ष कसून मेहनत, अभ्यास लागतो. चार वर्षे शिक्षण आणि तीन वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव. हे सात वर्षे जो कुणी आयुष्याच्या कुठल्याही वळणावर आपल्या आवडीनिवडीला अनुसरून देईल त्याला मनशांती, पैसा आणि शाश्वत आनंद मिळेल असं वाटतं. जगात प्रत्येकासाठी काम आहेच. कारण निसर्गात ज्याची गरज असते तेच उत्पन्न होत असतं. फक्त जे उत्पन्न झालंय त्याला जिथे गरज आहे तिथवर पोचायला प्रचंड कष्ट लागतात. पण शिखरावर गर्दी कमी असते. या सर्वांचा विचार आजच्या पालकांना करायलाच लागेल. कारण लोकसंख्या भरमसाठ आहे. शासन बेरोजगारांचा शिक्का नको म्हणून कॉलेजांच्या जिलेब्या पाडत आहे. त्यातून इतके पदवीधर बाहेर पडतायत की त्यांच्यात प्रचंड स्पर्धा नोकरी मिळवण्यासाठी वाढते आहे. एकीकडे कुशल मनुष्यबळ तीव्र टंचाई आणि दुसरीकडे उच्चशिक्षित, अकुशल व भ्रमित मनुष्यबळाचे लोंढे. आपलं मूल या लोंढ्यात असणार नाही याची काळजी घ्यायलाच लागेल. शेवटी एक उदाहरण देतो. माझा एक शाळा-वर्गमित्र जो सिविल इंजिनीअर आहे (आणि ते त्याचं खरंच वेड आहे) तेव्हा रीलायन्सच्या तेलसंशोधन विभागात होता. त्याने त्याच्या ऑफीसमधल्या एकाला आमच्या सोबत तीसरा रूमपार्टनर म्हणून आणले होते. हे साहेब आसाममधले नॉर्थ-इस्ट एथनिसिटीवाले. हा त्याचा पहिलाच जॉब. पगार ८० हजार (२००७) मी म्हटलं 'बाबारे, असं तू काय शिकलायस की तुला एवढा पगार आहे?' तो म्हणाला, 'भूगर्भ-शास्त्रात एमएस्सी केलंय. आणि मला अजून मोठ्या तेल कंपन्यांकडून दीड-दोन लाखाच्या ऑफर्स येत आहेत. मला फक्त निर्णय घ्यायचाय कुठली कंपनी निवडू.' मी माझ्या वर्गमित्राला म्हणालो, "बघ निल्या, आपण इथं महाराष्ट्रासारख्या अतिप्रगत भारतीय राज्यामधे राहून असं काही शिक्षण घेता येतं आणि त्याला एवढी मागणी आहे हे आपल्यापर्यंत पोचत नाही, तर खरंच आपण पुढारलेले आहोत का?" निल्याकडे तेव्हा सिवीलची डीग्री आणि चार वर्षाचा अनुभव आणि ३० हजार रुपये पगार होता. माझ्याकडे दोन डीग्र्या आणि सहा हजार पगार होता. तो आसामी आमच्या पेक्षा २ वर्षांनी लहान होता. आणि मी नुकतीच आवडत्या क्षेत्रात करीअरला सुरुवात केली होती.
त्या क्षणी 'योग्यवेळी केलेल्या करीअरप्लानींग आणि गायडन्सचा आयुष्यात मोलाचा वाटा आहे' हे जे कोरल्या गेलं ते कायमचंच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18598
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

एका अकरावीत शिकणा-या मुलाची आई म्हणून लेख मुद्दाम प्रतिक्रिया जास्त येईपर्यंत वाचायचा ठेवला होता!अर्थातच सर्व जाणत्या मिपाकरांनी निराश केलं नाहीच.खूप छान चर्चा सुरु आहे. याचबरोबर माझ्याही करिअरचा विचार करत होते.मुलगा इंजिनिअर तर मुलगी डाॅक्टर अशा विचारातून अगदी सहज मार्कांवर शासकिय काॅलेजला जाऊन डेन्टिस्ट्री शिकले.तेव्हा मेडिकलची अॅडमिशन प्रायव्हेट काॅलेजला मिळत होती.ती नको असल्याने हा पर्याय स्विकारला होता.आता इतक्या वर्षांनी माझ्या गायनॅक आदि क्षेत्रातल्या मैत्रीणींची धावपळ,व्यावसायिक असुरक्षितता बघते तेव्हा वाटतं बरा आहे की आपला चाॅईस.मला माझ्या सर्व छंदांसाठी वेळ मिळतो,आवश्यक तेवढा पैसा मिळतो,कोणाच्या उपयोगी पडता येतं.मुख्य म्हणजे मला हवं तसं जगता येतं.हे सर्व श्रेय माझ्या व्यवसायाचंच.मी कमी वेळ काम करते.कदाचित जास्त वेळ ठेवुन जास्त कमवेन पण आत्ताचे माझे निवांत आयुष्य मला सोडावे लागेल.त्याची माझी तयारी नाही!कुठेतरी एक रेघ ओढुन घ्यावीच लागते.सारखं पैशासाठी पळत सुटणं माझ्या स्वभावात नाही.मग कशाला त्यामागे जा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness!! हे मी आता जगते आहे!!

वर्षभरातील सर्वोत्तम धागा आणि एकापेक्षा एक वाचनीय प्रतीसाद. आनंदीत पालक नाखु

विषयाची मांडणी आणि त्यावरील प्रतिसादात झालेली चर्चा दोन्ही आवडले. व्यवसायाचा भाग म्हणून करियर गायडन्स च्या काही केसेस घेते. दहावीचा बारावीचा निकाल लागेपर्यन्त काहीच विचार केला नाही असेच लोक आयते पर्याय समजण्यासाठी येतात. यासाठी हिस्ट्री घेताना साधारणपणे कौटुंबिक पार्श्वभूमी, पालकांची मानसिकता, मुलाच्या आवडीनिवडी या कळतात. यानंतर काही शास्त्रीय / प्रमाणित कसोट्या वापरते. याचे मुख्य कारण - पालकांचा बहुतांश वेळेला असलेल्या ठराविक विद्याशाखेचा आग्रह, आपल्या मुलाबद्दलचे चांगले वाईट चुकीचे ग्रह आणि अपेक्षा यांना जागा दाखवणे हाच असतो. बुद्ध्यांक चाचणी, व्यक्तिमत्व प्रश्नावली, अभिक्षमता चाचणी, वैयक्तिक रुची स्पष्ट करणारी चाचणी ( आय क्यू,पर्सनॅलिटी इन्वेंटरी, अ‍ॅप्टिट्यूड आणि इंटरेस्ट इन्वेंटरी ) अधिक शालेय गुण, या सर्वांची हिस्ट्री घेताना कळालेल्या गोष्टींची सांगड घालून ३-४ वेगवेगळे पर्यात सुचवले जातात. माझ्या मते अनोळखी मुलांना आयुष्यातला एवढा महत्त्वाचा निर्णय घेताना मदत करण्यासाठीचा हा कमीत कमी धोका असणारा मार्ग आहे. ज्या मुलांना लहानपणापासून पाहिलंय, कुटुंब ओळखीचं आहे अशांना या चाचण्या एखादेवेळी नाही वापरल्या तरी चालतात. अजून एक - एखाद्या क्षेत्रात इंटरेस्ट असेल पण अ‍ॅप्टिट्यूड नसेल अशा क्षेत्रात काम करणे आनंददायी असू शकते. पण अ‍ॅप्टिट्यूड खूप चांगला आहे पण त्या क्षेत्रात शून्य इंटरेस्ट आहे अशा क्षेत्रात पोत्यांनी पैसा कमावला तरी आनंद समाधान असेलच असे नाही.

In reply to by मितान

एखाद्या क्षेत्रात इंटरेस्ट असेल पण अ‍ॅप्टिट्यूड नसेल अशा क्षेत्रात काम करणे आनंददायी असू शकते. पण अ‍ॅप्टिट्यूड खूप चांगला आहे पण त्या क्षेत्रात शून्य इंटरेस्ट आहे अशा क्षेत्रात पोत्यांनी पैसा कमावला तरी आनंद समाधान असेलच असे नाही. >> म्हणजे प्रकरण गुंतागुंतीचं असू शकतं खरंतर...

In reply to by मितान

एक शंका : मानवी मेंदू ची क्षमता योग्य मार्गाने एका मर्यादेपर्यंत ताणावी तितकी खेचली/ताणली जाऊ शकते हे दहावी मध्ये 54 60 % मिळवलेल्या अथवा अगदी नापास झालेल्या लोकामधून पुढं येऊन डिग्री PG किंवा आय ए एस झालेल्या लोकांच्या उदाहरणांवरून आपण पाहतो. अशा परिस्थितीत केवळ एखाद्या चाचणीवरून आपण एखादा मार्ग स्वीकारणं (ज्यामध्ये आपल्याच उत्तरांवरून रिपोर्ट बनवून आपल्या हाती मारला जातो. सरसकटीकरण नाही.) कितपत योग्य आहे. पोत्यानं पैसे आधी मिळवून किंवा समांतर पणं एखादी गोष्ट करायला काय बंदी आहे??? उदाहरणार्थ: पूर्वी क्रिकेटर विद्यापीठांनंतर व्यावसायिक खेळायचे. एका सचिननंतर 8-10-100 किंवा आइपी एल नंतर 1000 लोकांना संधी मिळाली पण त्याबरोबरीनं किती अयशस्वी लोक असतील? कितीही नाही म्हटलं तरी आर्थिक गणित आयुष्यात जमणं आवश्यक असतंच. अशा परिस्थितीत वर महतल्याप्रमानं दोन्हीचा बॅलन्स साधलं तर वाईट काय आहे? आधी पोत्यानं पैसा मिळवून किंवा पैसे मिळवत आपल्या आवडी जोपासणं करता येऊ शकेल ना?

In reply to by प्यारे१

आपल्याच उत्तरांवरून रिपोर्ट बनवून आपल्या हाती मारला जातो. कितपत योग्य आहे. आपल्याकडे साधारण असे रिपोर्ट बनवण्याचा दृष्टीकोन असा आहे की एखादा निर्णय घेतला ना मग तो सगळ्या कसोट्यांवर तपासून पाहावा. म्हणजे कसोट्यांमधून जो निर्णय येईल तो मान्य न करता आपण ठरवलेला निर्णय कसोट्यांतून आला पाहिजे असा काहीसा प्रयत्न असतो. त्यामुळे चाचणी देतांना ती बायस्ड असण्याचा संभव असतो. परत काही चाचण्या तर इतक्या विचित्र असतात की बास! उदा. प्रश्नः "तुम्हाला सांघिक पद्धतीने काम करायला आवडते का? एखाद्या अडचणीच्या प्रसंगात तुम्ही स्वतःहून मार्ग काढता का? तुम्हाला इतरांना मदत करायला आवडते का?" असले प्रश्न विचारणारी जी काही चाचणी असेल ती सपशेल नापास होते हे वेगळे सांगायलाच नको. कारण ती विशिष्ट बायस किंवा व्यवसाय-आधारित प्रश्नावली असते फक्त. म्हणजे ब्लड-गॄप टेस्ट करण्यासारखे. त्यातून फारसे काही हाती लागत नाही. साधारण लग्नात कुंडली जुळत नसेल तर ज्योतीषाला "काहीतरी बघा ना गुरुजी, काय पुजा-शांती असेल तर करून टाकू" असे म्हणत कुंडली जुळत नसतांना तिरपागडी प्रमेयं लावून स्वतःला काय पाहिजे तेच करणारे असतात. तसंच काहीसं. करीअर ठरवतांना बरेच लोक ज्योतिषाचाही सल्ला घेतांना दिसतात. त्यात मुलाला अमुक एक कॉलेजलाच अ‍ॅडमिशन मिळेल का, अमुक एका कंपनीत प्लेसमेंट मिळेल का असंही ज्योतिषाला विचारणारे आहेत. अशा चाचण्यांबद्दल अजून मोकळा दृष्टीकोन समाजात दिसत नाही. माझ्यामते अशा चाचण्यांचे वेगवेगळ्या वयात वेगवेगळे टप्पे असावेत आणि त्यांचे स्वरूप कृती-आधारित व निरिक्षणात्मक असावे, मुलाखत किंवा प्रश्नोत्तरात्मक नसावे. बाकी ६० टक्क्याच्या आसपास गुण मिळवणारे शालेय परिक्षापद्धतीत तेवढे तंत्रकुशल नसावे. तेच आयएएस किंवा तत्सम परिक्षांमधे शालेय परिक्षांपेक्षा फार जास्त मेहनत घेऊन यशस्वी होतात. किंवा शालेय परिक्षेचे तंत्र या परिक्षांपेक्षा वेगळे असावे. शिवाय आकलन, प्रकटन आणि उद्देश यातही दोन परिक्षांमधे फरक आहे. माझ्यामते तरी शालेय अभ्यासक्रम हा सर्वप्रकारच्या बुद्धीच्या लोकांसाठी नाहीये. ती एक पुर्वग्रहदुषित चाळणी आहे. त्याला फार महत्त्व देऊ नये.