Skip to main content

३१ जूनच्या कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे झालेल्या कट्ट्याचा वृत्तांत

३१ जूनच्या कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे झालेल्या कट्ट्याचा वृत्तांत

Published on बुधवार, 01/07/2015 प्रकाशित मुखपृष्ठ
रात्री बरोब्बर साडे अकराला माझा मोबल्या वाजू लागला," अरे दमाम्या, तू कुठेयस रे? गचकलास तर नाही ना? ? पोचले बरं मी कुर्डू वाडीच्या स्मशानात. इथ काळं कुत्रं सुद्धा नाही. तरी आमचे हे म्हणत होते कुठं जातेस रात्रीची कट्ट्याला, त्या दमाम्यावर विश्वास ठेवून …. " माई श्वास घ्यायला क्षणभर थांबल्या त्या संधीचा फायदा उठवत मी बोललो, " माई ,शून्य मिनटात आलोच … "असे म्हणून बायकोवर (म्हणजे बाइक वर ) ढांग टाकली आणि सुसाट सुटलो . स्मशानात पोचतो तर माईसाहेब कुणा काकूशी गप्पात गुंग झाल्या होत्या. मिपाकरांची ही खासियत! यांच्या गप्पा अशा रंगतात की शंका देखील येणार नाही हे पहिल्यांदा भेटतायत म्हणून. जरासा खाकरून मी स्वत:ची ओळख करून द्यायला पुढे झालो. तेवढ्यात कनवटीतून काहीतरी काढून हातावर ठेवत माई म्हणाल्या.," दमामीना तू? ओळखलं हो मी! खोकला झालाय वाटतं? ही घे खडीसाखर, श्रीरंगाने पाठवलीय हो खास अमेरिकेतून. म्हणाला मला नाही जमणार तर निदान ही तरी कट्ट्याला हजर राहू दे. घे घे लाजू नको. " शेजारच्या काकूंना वंडरल्यांडला कुठेस पाहिलंय म्हणून मी विचारच करत होतो तर मला आलेल्या शंकेला खरं ठरवत त्या काकू म्हणाल्या, "हो मी तीच, जिची अनाहितांना अलर्जी आहे" . ( काकुंच्या त्वचेवरून वयाचा अंदाज बिलकुल येत नाही.) त्या दोघींशी हाय हलो म्हणेस्तोवर मागून फ़फ़( फटफटी )वरून दोघं उतरले. ते मिपाकरच असणार खात्री होती कारण फफ असो वा खफ रात्रभर चालवणारे मिपाकर सोडून दुसरे कोण? एकाच्या हातात ब्याट आणि दुसऱ्याच्या हातात कमंडलू पाहून ओळख पटली. ब्याटवाले गृहस्थ आपली ब्याट सारखी इकडून तिकडून फिरवत होते. आम्ही घाबरून लांब उभे राहिलो, न जाणो माईंचा चष्मा फुटला तर? गुर्जी पुन्हा पुन्हा त्यांना समजावत होते, "घाबरू नको! मी आहे न? मग दुसऱ्या कुठच्याही आत्म्याची इथे यायची हिम्मत नाही." शेवटी त्या गुर्जींच्या पुन्हा पुन्हा चाललेल्या सूचना कम मंत्रपठणाला वैतागून ब्याटवाल्यानी तोंडातील पानाची पिंक गिळली आणि उत्तरले, "ओ गुर्जी, गप बसा हो. आत्म्याला नाय घाबरत, डास पळवतोय. " गुर्जींचा चेहरा बघण्यालायक झाला . इतक्यात मागून मंजूळ चिवचिवाट ऐकू आला." अग्ग बाईsss चिमण आला वाट्ट." माई चीव्चीवल्या. चिमणच्या मागून लगोलग पैसाताई येताना दिसल्या अन त्यामागून इतर अनाहिता म्हणजेच अजयाताई, रेवाज्जी, यशोताई, विशाखाताई (तिचं बोट धरून आणि हाती पाटी घेतलेली इयत्ता दुसरीतील मुलगी पण होती त्यात) आदी भगिनीमंडळ प्रवेश करतं झालं. रस्ता, यष्टी वगैरे न चुकता, कसलाही गोंधळ न करता अनाहिता ठरल्या वेळी व्यवस्थित पोचल्या हा विचार डोक्यात आल्यानं साऱ्यांचेच ड्वले पाणावले. रेवाज्जीच्या बकोटीस एक पोतं होतं. (आधी वाटल त्यांनी सगळ्यांसाठी खाऊ आणलाय पण नंतर कळल की त्यात लसूण आहे, गप्पा कुटताना सोलण्यासाठी.) अनाहितांच्या आगमनानंतर स्मशानभूमी फुलून गेल्यासारखी वाटू लागली (आकारमानाने नाही तर आवाजाने. गैरसमज नको हो!) आता सर्वांनी मोठ्ठा गोल करून बसायचं ठरलं. मी माईसाहेबाना हात देऊन अलगद बसवलं. त्यांनी लगेच तोंड भरून आशीर्वाद दिला. "औक्षवंत हो रे दमाम्या, आई बापानी चांगले संस्कार केलेत बर तुझ्यावर, अशी गुणी मुलं दुर्मिळ झालीत हो आजकाल. लग्न झालय का तुझ? अशी चौकशी केली." मी लाजलो. *माझ्याही* लग्नाची चौकशी करणारं कुणी आहे हे जाणवल्यावर उर कित्ती भरून आला म्हणून सांगू! (ड्वले पण पाणावले.) लांबून सनई चौघडे वाजू लागले आणि गुर्जींच्या चेहऱ्यावर आत्मानंदाचं हास्य उमटलं . मागोमाग गुर्जींचा शिष्यगण हातात जिलब्यांची खोकी घेऊन अवतीर्ण झाला. एकाच्या शर्टावर बदला "पूर" लिहिलं होतं तर दुसऱ्याकडं पाहून "अरे धन्या" असे कुणीतरी खिंकाळलं. तिसऱ्याच्या हातात इनोची डब्बी होती आणि *जे* भेटतील त्यांना तो *पी* *पी* असे सांगत होता. सगळ्यांच्या गळाभेटी झाल्या. आणि सर्व मिपाकरांनी एकमेकांची चेष्टा मस्करी करत जिलब्यावर ताव मारला. त्यात अलवानी जिलबी , गोल्या जिलबी, पावले जिलबी असे नवीन प्रकारही होते. (पावले जिलबीची स्पेशालिटी म्हणजे एक उचलली की त्याला चिकटून १० - १२ जिलब्या वर येतात.) सर्व मिपाकर एकमेकांना आग्रह करकरून जिलबी खाऊ घालत होते. यल्लाप्पाजी आग्रह करून करून जिलबीवर चारोळ्या वाढत होते. तर वेल्लाभट "व्यायाम केलात का? नाही तर जरा जपून खा हं!" अशी मागोमाग प्रेमाची सूचना देत होते. तर अजयाताई " ब्रश करा हं नंतर " अशी धमकी वजा प्रेमाची आठवण करत होत्या. तर कोणी गोंधळलेला अकौंट माझ्याकडे तीर्थाची मागणी करत होता. (मी त्याला गुर्जींच्या हातातला कमंडलू दाखवून तिथं पिटाळलं. पुढं काय झालं ते गुर्जी अन कन्फ्युजड दोघंच जाणे) हे सर्वांचं असं एकमेकांवर उतू जात असलेलं प्रेम पाहून पाहून नीलकांतांचे पण ड्वले पाणावले. काही अनहिता " अजून कसा नाही आला बाई, टक्या ?" या काळजीत होत्या. इतक्यात एका बाजूने "निषेध निषेध" असा नारा ऐकू आला. "आपले शेतकरी बांधव उपाशी असताना जिलबी पार्टी झोडणारयांनो थोडीतरी लाज बाळगा!" हे ऐकताच सगळ्यांच्या हातातल्या जिलब्या (हातात) गळाल्या. सर्व अपराधी भावनेने एकमेकांकडं पाहू लागले. त्याबरोबर चिमणराव ताडकन काही बोलायला उठले, संदीप भौ, सुबोध भौ यांनी "लक्ष देऊ नका" वगैरे सांगत त्यांना शांत केले . अशा अंमळ तापलेल्या वातावरणात अनाहितापैकी कुणालातरी (सुरंगीताई तूच का ग?) नुकत्याच गाजलेल्या होट्ट फ़ेम्मस नाचाची आठवण झाली. "ते पथिक रावांचं आयटम साँग होणार होतं त्याचं काय झालं?" झालं! सर्व पथिक भौ ना शोधू लागले, पण त्यांच्या ऐवजी बबिता हितेश दरेकर नावाची कुणी नवीनच व्यक्ती सापडली. ती नक्की कोण, इथे कशी वगैरे कुजबुज चालू असताना लांबून टेम्पोचा आवाज ऐकू लागला. त्याबरोबर सर्व अनहिता उत्साहाने फाटकाकडे पाहू लागल्या पण टेम्पो तसाच पुढे निघून गेला. जमलेल्या मिपाकारातील एक डिटेक्टीव ब्योमकेश हळूच म्हणाले, " मघापासून हा टेम्पो फिरतोय. इथे येतो आणि परत जातो . कायतरी गोंधळ दिसतोय. " " चकवा म्हणतात त्याला " मंदार कात्रेदादानी त्यांच्या ज्ञानात भर टाकली . इकडे माई साहेब आणि काकू यांचा एक कंपू, चौकडीचा एक , गुर्जी आणि शिष्य गणांचा एक, अनाहितांचा एक. महान विचारवंत, गुरुजी (दुसरे), बबिता ई महान चर्चाकारांचा एक, मुवि गवि, एक एकटा अशा गझल प्रेमींचा एक, तर एक नवमिपाकारांचा असे, सर्व कंपू जमून त्यांच्यात फर्मासपैकी गप्पा रंगल्या होत्या. कुणी आदुबाळ सर्व कंपूत जाऊन दु दु दु दु करीत फिरत होतं. अनाहितांच्या कंपूत टक्या आणि पिव्शीच्या लग्नासंबंधी अनुक्रमे वधू अन वर संशोधनावर चर्चा चालू होती. " दारू ढोसणारी हवी म्हणजे …." "अय्या हो?" अशी वाक्यं मधून मधून कानी पडत होती . तर गुर्जींच्या कंपूत सगळे नाक दाबून (कशाला ते त्यांनाच विचारा) ल्लुलुलुलुल्लुलुलुलुल्लुलुलुलुल्लुलुलुलुल्लुलुलुलु म्हणायची संथा घेत होते. तर चौकडी कुणाची टांग कशी खेचायची यावर चर्चा करत होती. तर पैसाताई दर दोन मिंटानी माझ्याकडं बघून " मी वळकल तुला दमामि " असं लुक देत होती. त्या सर्व आवाजाना चिरत "नाडीये, नाडीये" म्हणत कुणी फिरता विक्रेता कर्मधर्म संयोगानं तिथं पोचला. संदीप भौनी विचारलं कुठून आला कुठं चालला , तर त्यानं आकाशाकडं आणि नाडीकडं बोट दाखवलं. "नाड्या बरीक स्वस्त आहेत हो" अशी कुणा कंजुषानं पुडी सोडली आणि सर्व अनाहितानी त्याला (नाडीवाल्याला ) वेढा घातला. या सारया गमतीजमतीत वेळ कसा गेला काही कळलंच नाही. जेपीना बँकेत सक्काळी सहा वाजता हजर राहायचं होतं म्हणून ते चुळबुळ करू लागले तेव्हा पिचकुनी सुद्धा घड्याळाकडे पाहायला सुरुवात केली. स्वप्सनी घड्याळाकडे पाहत अहो एक तारीख उगवली असे विधान केलं. आणि कट्टा संपत आल्याचं सर्वांनाच जाणवलं. मग माईसाहेबांनी कट्टा संपत आल्याची ओफ़िशिअल घोषणा केली. ते ऐकताच आता पुन्हा कधी भेट व्हायची या विचारांनी अनहितांचे नाक (अनेकवचनात नाकं ) भरून आले .( ड्वले पण पाणावले. ) एक फोटो सेशन होऊन जाऊ द्या म्हणत सगळ्यांचं फोटो सेशन झालं ,(चक्क माई उत्साहाने फोटु काढत होत्या. त्यांच्या ह्यांनी त्यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त नवीन क्यामेरा गिफ्ट दिला होता म्हणे.) आणि कृष्ण धवल फोटो जयंतरावांच्या स्पर्धेला टाकायचा असं ठरलं. पण ती स्पर्धा केव्हाच संपली आता "प्रतीक्षा" विषय आहे हे चित्रगुप्तानं सर्वांच्या ध्यानी आणून दिलं. मग "टक्याची प्रतीक्षा " टायटल देऊन तो फोटो टाकायचं ठरलं. निघता निघता माई साहेबानी श्रीरंगानं आठवणी पाठवलेल्या खडीसाखरेचे दोन दोन दाणे आठवणीनं सर्वाना दिले. मी प्रत्येकाला एक एक म्यागीचा पुडा दिला. इतक्यात कुणाच्या तरी जुन्या स्मृती जाग्या झाल्या आणि अभ्याची चटणी कुठंय असं काहीसं अस्पष्ट ऐकू आलं. पण एवढ्यात सर्वजण निघालेच . बाहेर येतो तो मघाचा टेम्पो फाटकाजवळ येउन थांबलेला. कात्रेसाहेबानी घाबरत घाबरत आत डोकावून बघितलं तर चालकाच्या जागी वडाप आणि बाजूला हातात भला मोठा रसगुल्ल्याचा डब्बा घेऊन लाडोबा बसलेला! त्याला बघताच सगळ्या अनाहितांना "टक्कू टकुल्या, टक्कुमक्कूशोनू" असं म्हणत वात्सल्य, भगिनी प्रेम ई ई उचंबळून आलं. पण कट्टा संपला हे कळताच वडाप कपाळाला हात लावत म्हणाले," काय सांगू , मघापासून इथे फेऱ्या मारतोय. सगळे रसगुल्ले संपल्याशिवाय हा खाली उतरायलाच तयार नाही. म्हणाला तिथे गुर्जी आणि बदलापूरकर मला पोटभर रसगुल्ला खाऊ देणार नाहीत." "अरे पण किती ती पेट्रोलची नासाडी रे वडाप , बरं दिसत का ते? " असे माई साहेबांनी म्हणताच वडाप लग्गेच उत्तरले," माई तुम्हाला सोडू का घरी?" त्याबरोबर पुन्हा माईनी खुश होऊन तोंड भरून आशीर्वाद दिला. "औक्षवंत हो रे, आई बापानी चांगले संस्कार केलेत बर तुझ्यावर, अशी गुणी मुलं दुर्मिळ झालीत हो आजकाल. लग्न झालय का तुझ?" पण वडाप काही (माझ्यासारखे) लाजले नाही कारण एव्हाना सगळ्या अनहिता टेम्पोत चढायच्या प्रयत्नात असल्यामुळे ते लै टेन्शन मध्ये होते. त्यांनी हळूच जाऊन टेम्पोची कमाल वजन मर्यादा पाहून घेतली . सर्व अनहिता आणि माई आणि इतर काही हौशे गौशे मिपाकर मग त्या टेम्पोत स्वार झाले आणि टेम्पो भुर्र निघून गेला. आणि बाकी राहिलेल्यांनी सुद्धा एकमेकांना टाटा बायबाय केले. तर अशा प्रकारे ३२ जूनच्या कट्ट्याची साठा उताराची कहाणी सफल संपूर्ण!
लेखनप्रकार

याद्या 13936
प्रतिक्रिया 123

In reply to by दमामि

दो दिल एक जान? की एक झाड दोन पक्षी?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यावेळी फुरसुंगी का धनकवडी असा घोळ न घातल्याने त्यांना सिंहगड रोडला पोहचवल्याने मोद(क) झाला.

१०० निमित्त द मामी यांचा सत्कार पावशेर जिलब्या आणि टक्कोमक्कूशोनू यांचा सत्कार टेम्पूतील रसगुल्ले देऊन करण्यात येत आहे.

दुसय्रा दिवशी शीटला लाल मुंग्या आल्या.तिकडे नदीकाठावर टेंपू धुतला. तुमच्या टक्कुशेटनी पाक सांडून ठिवलेला.

In reply to by अत्रुप्त आत्मा

दमामींनी "आपुलाच (छळ) वाद आपणाशी" हा थोर ग्रंथ लिहावा ही विनंती. हाणुन्मोदक नाखु आणि तमाम जेपी प्रेमी कार्यकर्ते

शेटनी दिवसाचं भाडं दिलं अन पंधरा किमीरच टेंपु फिरिवला म्हनुन पाक सांडल्याचं झास्ती मनावर न्हाइ घितलं. मनावर बरेक उत्तम बरेक असं आपलं आरटिओ म्हनतं.

त्यांच्या ह्यांनी त्यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त नवीन क्यामेरा गिफ्ट दिला होता म्हणे माईंच्या ८०व्या वाढदिवशी कॅमेराच काय गुहाचित्रे काढायचाही शोध मानवजातीस लागला नव्हता. तस्मात. तपशिलातली चूक दूरूस्त करणेत यावी. कदाचित आपल्या स्त्री-सुलभ स्वभावाला अनुसरून माई वय लपवण्याचा प्रयत्न करत असाव्यात. ८०,००० वर्षांच्या असून अगंबाई मी अजून ८०चीच म्हणत असाव्यात. (भोचक सल्ला: माईंना खरं वय विचारायला जाऊ नये, कॅमेरा डोक्यात आपटतील)