गोष्ट ४० तासांची

शि बि आय जनातलं, मनातलं
माणसाच्या जन्मापासूनच त्याचा प्रवास सुरु झालेला असतो. कधी तो शारीरिक असतो, कधी तो बौद्धिक असतो तर कधी मानसिक असतो. पण राणीचा प्रवास मात्र तिच्यासाठी धम्माल आणि तिच्या आईसाठी झोप उडवणारा ठरला. राणी एक पंचविशीची बिनधास्त तरुणी. सेल्स आणि मार्केटिंग मध्ये असल्यामुळे थोडी रोकठोकच होती. तिच्या रोकठोकणामुळे पंचविशीच्या तरुणीच्या आईच्या मनात जी काळजी यायला हवी तीच तिच्या आई च्या मनात देखील यायला लागली होती, " हिचे सासरी कसे होणार?" त्यामुळे घरात साहजिकपणे कोणतेही शुभ कार्याचे आमंत्रण आले मग ते मुंज असो व लग्न कि त्याचे शेपूट राणीचे लग्न ह्या एकाच विषयाला जोडले जायचे. आईच्या मते तिच्यातला रफनेस कमी झाला तरच तिचे लग्न लवकर आणि चांगल्या ठिकाणी जमू शकेल. घरात हा अति कॉमन विषय झाल्यामुळे राणी त्याला फारच लाईटली घ्यायला लागली होती. त्यातच नवीन बॉसशी सतत खटके उडत होते अशा वेळी तिला मन:शांतीची गरज वाटू लागली आणि हा विषय तिने आईला सांगितला. आईला बंगलोरच्या "प्रशांति कुटीरम"ची माहिती होती तिने राणीला काही दिवस तिथे राहून योगाचा अभ्यास करायला सांगितले. झालं कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकाच गाठ पडली पुढील एक दोन दिवसताच परत राणीचे बॉसशी वाजले मग पुढचा फार विचार न करता राणीने राजीनामा दिला आणि प्रशांतीची शांती भंग करण्यासाठी राणी मुंबईहून निघाली. सगळे अचानकच ठरल्यामुळे त्यातून होळी ,रंगपंचमी आणि रविवार अशा जोडून सुट्ट्या आल्यामुळे कोणत्याही ट्रेनचे रिर्झवेशन मिळाले नाही. आयत्या वेळी तिकीट काढायचे असल्यामुळे विमानाच्या तिकिटाचे हि दर फारच चढे होते. आणि त्यातच हुशार राणी साहेबांनी कोर्सची चौकशी करून लगेच बँक मध्ये फी भरून जागा पण बुक करून टाकली आणि नंतर जायचे कसे हा विचार केला त्यामुळे आता जाणे भागच होते. मुळात स्वभाव धीट ( कि आगाऊ) असल्यामुळे बाईसाहेब वेटिंग स्टेटस असलेले तिकीट घेऊन उद्यान एक्सप्रेसमध्ये चढल्या. आई आणि बाबांना " मी मॅनेज करते" म्हणाली आणि निघाली. आई आणि बाबा दोघे हि जरा टेन्शन मध्येच होते. बाबा स्टेशनवर सोडायला आले. गाडी सुरु झाली. पुणे येईपर्यंत बसायला जागा होती त्यामुळे काही प्रश्न नव्हता पण पुण्याला गाडी पॅक झाली आणि गडबडीला सुरुवात झाली. पुणे आले तरी टीसी चा पत्ता नव्हता त्यामुळे मॅनेज कसे आणि कोणाला करावे हे कळेना. गाडीत आता बसायलाही जागा नव्हती त्यामुळे पुढचा प्रवास निदान टीसी सापडेपर्यंत उभ्याने करावा लागणार होता. त्यात एकाच चांगली गोष्ट घडली कि एका आज्जीने राणीला समान तरी बर्थखाली ठेऊ दिले. आणि तिची चौकशी करायला सुरुवात केली, सगळे ऐकल्यावर, "अशा कश्या ग तुम्ही आजकालच्या मुली? हा असा आगाऊपणा करण्याची हिम्मत आमची नव्हती बाई." असे ऐकून हि दाखवले पण करते काय आणि सांगते कुणाला? ट्रेन भरल्यामुळे कधी सीटच्या कोपऱ्यावर बसत तर कधी अप्पर बर्थ वर बसून असा प्रवास सुरु होता. आई बाबांचा फोन आल्यावर राणीने झालेल्या गोंधळाची थोडी कल्पना दिली. तेवढ्यात टीसीचे आगमन झाले अर्धा तास त्याच्यामागे सामान आणि लोकं तुडवत फिरल्यावर त्याने, "गुलबर्ग्याला बघू हो… आत्ता काम करू दे…. बघतायना गाडी फुल आहे कशी देणार मी सीट?" असे ऐकवले. हे ऐकण्यासाठी त्याच्या मागे मागे फिरताना तिचे डोळे जागा हि शोधत होतेच. टीसीच्या नादात ती समान ठेवलेली बोगी नंबर पण विसरली. आता येरे माझ्या मागल्या करत सगळ्या बोगी शोधण्याशिवाय काही उपाय नव्हता. पण दैव जोरावर होते आणि सामान सांभाळत बसलेल्या आजी सापडल्या. आईने दिलेला डबा खाऊन झाला होता आता सीट मिळाली नाही तर काय हा विचार डोक्यात चालू असताना सोलापूर पासून पुढे प्रवास बसने करावा असे मनात आले. घड्याळात ३ वाजले होते गाडीने कुर्डूवाडी देखील मागे टाकले तासाभरात सोलापूर येणार होते त्यामुळे एका तासात काय तो निर्णय घ्यायचा होता. ट्रेनमध्ये वाढणारी गर्दी पाहून राणीचा निर्णय झाला की आपण सोलापूरला उतरायचे आणि पुढचा प्रवास बसने करायचा. आजीचा निरोप घेऊन राणी सोलापूरला उतरली आणि गर्दीतून सुटले म्हणून हुश्य केले पण तिला पुढे होणाऱ्या रामायणाची कल्पना नव्हती रिक्शाने बस स्टैंडवर आल्यावर सोलापूर- हुबळी - बंगलोर अशी जाणारी शेवटची बस ४ वाजताच गेली असे समजले. आता काय प्रश्न होताच? मग कनेक्टेड बसची चौकशी केल्यावर समजले सोलपुर ते गुलबर्गा बसने गेल्यावर गुलबर्गा ते बंगलोर अशी बस मिळु शकेल. ५ वाजता गुलबर्गा बस येणार होती तोपर्यन्त कंट्रोल रूम मध्ये विनंती करून गुलबर्गा ते बंगलोर अशी शेवटची बस कधी आहे ते विचारले तेव्हा ती ८ वाजता आहे समजले. राणीला आता थोड़े टेंशन आले होते, तरी धीर सोडायचा नाही असे स्वतःला बजावत ती बसची वाट पाहू लागली. ५ वाजता येणारी बस ५.३० वाजता आली.राणीसाठी बस आली हे ही कमी नव्हते.५.४५ वाजता बस निघाली टिकिट काढताना कंडक्टरकडे ४ -४ वेळा बस किती वाजता पोचणार ह्याची विचारणा केली. बस ७.४५ वाजता तिथे पोचते असे समजले. आता राणीचा जीव भांड्यात पडला. सकाळपासून धावपळ करून थकून गेल्यामुळे बस मध्ये डोळा लागला असताना अचानक मोठ्ठा आवाज झाला आणि बस बंद पडली. बरचसे लोक मोठ्याने काहीतरी कानडी मध्ये बोलत खाली उतरले राणीही उतरली. बसमध्ये काहीतरी बिघाड झाला होता त्यामुळे बस दुरुस्त होणे किंवा दुसरे वाहन मिळेपर्यंत काही उपाय नाही हे राणीला कळून चुकले. कोणत्या मुहूर्तावर घरातून निघालो आपण असे झाले होते. जवळ असलेल्या अवजारांनी बसची दुरुस्ती करत आणि जोडीला मोठ्याने कानडी गाणे गात ड्रायवर आणि कंडक्टर गळा काढत होते. आजुबाजूला रस्ता आणि शेत ह्यापलीकडे काही नव्हते. बरोबर असलेला मजूर वर्ग शांतपणे रस्त्यातच फतकल मारून बसला होता. त्याच्याबरोबरील स्त्रिया रात्रीच्या जेवणासाठी घेतलेल्या भाज्या साफ करायच्या कामाला लागल्या. बाकीची मंडळी उगच इकडे तिकडे करत होती. क्षणागणिक राणीची अस्वस्थता वाढत चाललेली होती. आपला निर्णय बरोबर होता कि चूक ह्याचा सतत तिच्या डोक्यात विचार चालू होता. बसमध्ये बसल्यावर तिने घरी फोन करून सगळे सविस्तर कळवलेच होते तरीही परत फोन करून बोलावेसे वाटत होते पण मोबाईलला रेंज नसल्यामुळे तिने तिचे डोक आणि त्यातले विचार ह्यांना म्युट मोडवर ठेवले. आता अंधारून यायला लागले होते. नशिबाने ३० ते ३५ मिनिटांच्या खटपटीनंतर बस सुरु झाली होती. राणीने परत कंडक्टरला गाठले आणि बस किती वाजेपर्यंत गुलबर्गा गाठेल ह्याचा अंदाज घेतला. कंडक्टरच्या म्हनण्यानुसार ७. ४५ला पोचणारी बस ८. १५ ला नक्की पोचेल. बस मधल्या उतारूंना वाटले हि एकटी मुलगी रात्री घरी कशी जाणार म्हणून घाबरून सतत विचार असावी असे समजून एका बाईने तर," मी आणि माझे पती तुला घरी पोचवू तू काळजी नको करू" असेही सांगितले. मग मात्र राणीने सत्य परिस्थिती कथन केली आणि आपल्याला ८ च्या आत का तिथे पोचायचे आहे हे पटवून दिले. मग मात्र त्या कानडी बाईची झोपच उडाली. " गोविंदा.. गोविंदा…" करत ती गप्प बसली. कंडक्टरने मात्र मदत करण्याचे आश्वासन दिले पण रस्ता फारच खराब असल्यामुळे त्यांचेही काही चालत नव्हते. मग मात्र राणीने "प्लान बी" चा विचार करायला सुरुवात केली.बसच्या कितीतरी पट अधिक वेगाने डोक्यातील विचारचक्र चालू झाले. आधी खड्डे शोधायचे आणि मग त्यात उडी मारायची ह्याची बहुतेक राणीला सवय होती म्हणूनच तिच्या सुपीक डोक्यातून टीनपाट असा "प्लान बी" रेडी झाला. पण तो मूर्त स्वरूप देण्याच्या लायकीचा नव्हता हे राणीला लवकरच समजले. राणीच्या प्लान बी नुसार तिथे पोचल्यावर परत कनेक्टेड बस शोधायची आणि पूर्ण रात्र प्रवास करायचा. त्यानुसार मनाची तयारी करत राणी गुलबर्गाची वाट पाहू लागली. शेवटी ८. ४० ला बस गुलबर्गा बसस्टैंडला पोचली. धावत पळत जाऊन चौकशी केल्यावर समजले कि गुलबर्गा ते बंगलोर बस अगदी वेळेत निघाली होती. प्लान बी प्रमाणे तिने इतर बस रूटची चौकशी केली. पण उद्या सकाळी ५ च्या बस शिवाय कोणताही मार्ग तिला बंगलोर च्या जवळ नेणार नव्हता. त्यामुळे लेडीज वेटिंग रूममध्ये बसून राहणे हा एकच पर्याय दिसत होता. मुंबईतील सवयीनुसार लेडीज वेटिंग रूमबद्दल विचारले असता असा प्रकारच इथे नाही असे समजले. सुन्न होऊन राणी तिथल्या बाकावर बसून राहिली मग रात्रीचे जेवण तिने जवळच्या हॉटेलमध्ये घेतले. बसस्टैंडला जाऊन एका बाकावर बसून राहिली बाजूला चहाचा स्टॉल असल्यामुळे जरा वर्दळ होती. पण १० नंतर तीही कमी-कमी होत गेली. आता मात्र कसे काय करायचे हा प्रश्नच होता. तेवढ्यात एक पोलीस इन्स्पेक्टर आणि लेडी कॉन्स्टेबल तिच्याच दिशेने येताना दिसले. ती सावरून बसली. त्यांनी तिथे बसण्याचे कारण विचारले. तिने सगळी कहाणी सांगितली आणि तुम्ही इथे कसे आलात हे विचारले. असा उलट प्रश्न विचारल्याबरोबर इन्स्पेक्टर वैतागला आणि कानडीत लेडी कॉन्स्टेबल बरच काही म्हणाला. तिला त्यातले एक अक्षरही समजले नाही पण डेपो इनचार्ज आणि गेस्ट हाउस हे शब्द समजले. मग डोक्यात प्रकाश पडला की डेपो इनचार्जनेच ह्यांना बोलून घेतले असणार. लेडी कॉन्स्टेबलने राणीला तिथे रात्र न काढता गेस्ट हाउसला जाण्याविषयी सूचना केली सुदैवाने तिला कानडी सोडून मराठी आणि इंग्रजी समजत होते. आजूबाजूचा माहौल बघता ती सूचना योग्यच होती. परत पोलीस इन्स्पेक्टर आणि लेडी कॉन्स्टेबलचे एकमेकांत बोलणे झाले.लेडी कॉन्स्टेबल तिला सोडायला गेस्ट हाउसला येणार होती. राणीने नको म्हंटले असता,"गपचूप चल माझ्याबरोबर इथे जवळ रेड लाईट एरिया पण आहे" ह्या एका वाक्यात तिने तिच्या बरोबर येण्याचे कारण डेपो इनचार्जने पोलिसांना बोलवण्याचे कारण राणीला कळून चुकले. मुकाट्याने राणी उठली आणि तिच्या मागोमाग जाऊ लागली गेस्ट हाउस तसे बरे होते बरोबर पोलीस असल्यामुळे जरा स्पेशल ट्रीटमेंट राणीला मिळत होती. खोलीची चावी घेऊन पोलिसांचे आभार मानून राणी बेडवर जाऊन पडली. दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता उठू सगळे आवरून राणी ४.४५ ला बसस्टैंडला हजर झाली. फायनली ५. १० ला बंगलोरला जाणारी बस आली आणि ५.२० ला निघाली. आता निदान आपण बरोबर बंगलोरला पोचणार म्हणून राणी निश्चिंत झाली. बस तिच्या वेगाने रात्री ८ वाजता बंगलोर बसस्टैंडला पोचली. पोचल्यावर पोटपूजेचा कार्यक्रम उरकला आणि प्रशांति कुटीरला जाण्यासाठी चौकशी केली. तिथे जाण्यासाठी दिवसातून २ वेळा बसची सोय आहे असे समजले. नशिबाने इथे देखील साथ दिली नव्हती. आता परत कालसारखा घोळ नको म्हणून राणीने डायरेक्ट रिक्षा करून जायचे ठरवले. त्याप्रमाणे रिक्षावाल्याशी हुज्जत घालून पैसे ठरवले आणि प्रवास सुरु केला. रिक्षावाल्यासामोरून आईला फोन केला आणि सगळी माहिती दिली. ३१ कि.मी. चे अंतर पार कारण्यासाठी फार तर २ तास लागतील अशी कल्पना होती. अखेर आपण सुखरूप पोचणार म्हणून राणी मस्त शहराबाहेरचा रस्ता एन्जॉय करत होती. पण कसलं काय नि कसलं काय रिक्षावाला फोनवर बोलण्याच्या नादात रस्ता चुकला. एका क्षणी रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली आणि एका दुकानात रस्ता विचारायला गेला तेव्हा राणी आणि रिक्षावाला दोघांना समजले कि आपण शहर बाहेर येउन बरोबर विरुद्ध दिशेला जात होतो. राणीने हिंदी, इंग्रजी आणि मराठीची भेळ करून रिक्षावाल्याला यथेच्छ भोसडले. पण हे सगळे समजेपर्यंत ते २० किमी लांब आले होते म्हणजे आता २०किमी + पुढील साधारण २५किमी असा प्रवास होणार होता. सतत योग्य रस्ता विचारत रिक्षा जात होती. रिक्षा आता गावाबाहेर आली होती दोन्ही बाजूला गर्द झाडे, थंड बोचरी हवा आणि त्या झाडांवर पडलेला चंद्राचा पिठूरसर प्रकाश होता वातावरण जास्तच गंभीर करत होता. मघाचे दोन अनुभव गाठीशी असल्यामुळे राणी जरा जास्तच सावध होती. बराच वेळ रिक्षा एकाच मार्गावरून जात होती कुठेही रस्ता वळत नव्हता की आजूबाजूचा परिसराचा देखावा बदलत नव्हता त्यामुळे आता काय करावे हा प्रश्न मनात यायला लागला होता. रिक्षावाल्याला बोलले तर आपण थोड्या घाबरलो आहोत हे त्याला लगेच समजेल ह्या भीतीमुळे राणी गप्प होती पण लवकरात लवकर काही तरी करणे भाग होते. असे मनात चालू असतानाच दूरवर दिवे दिसायला लागले तिने रिक्षावाल्याला रस्ता विचारण्याविषयी सुचवले. तो देखील पटकन तयार झाला. तिथे १०-१२ छोट्या झोपड्या आणि पान-बिडीचे दुकान एवढेच होते. तिथे गेल्यावर समजले आपण एका छोट्या जंगलातून येत होतो आणि जंगलत काम करणाऱ्या मजुरांच्या त्या झोपड्या आहेत. रिक्षावाला उतरून झोपड्यात डोकावायला गेला. दोन झोपड्यांमधून ५-६ पुरुष बाहेर आले आणि सगळी मिळून कानडी मध्ये बोलायला लागले. रिक्षावाला रिक्षाकडे बोट दाखवत काहीतरी सांगत होता आणि ते सगळे रिक्षाकडे बघत काहीतरी बोलत होते एवढेच राणीला दिसत होते. रिक्षा आणि ती सगळी मंडळी ह्यात जवळ जवळ २० फुटाचे अंतर होते. तिने प्रशांती एवढे ऐकले आणि तिची खात्री पटली कि रिक्षावाला प्रशांती बद्दलच विचारत आहे असा विचार करून ती अंग सैल सोडून बसली तेवढ्यात सगळी मंडळी तिच्याच दिशेने तरातरा येताना दिसली. ते दिसताच पुढच्या क्षणाला मेंदूने सर्व शरीराला सावधतेची सूचना दिली आणि संरक्षणासाठी इथून पळण्यास रिक्षाच्या कोणत्या बाजूला उतरावे, मोठी बॅग तिथेच सोडून नुसती पर्स घेऊन पळावे असे अनेक निर्णय देखील घेऊन टाकले. राणीचे पूर्ण लक्ष त्या येणाऱ्या मजुरांकडेच होते तेवढ्यात बाकीच्या झोपड्यामधून काही बायका डोकावल्या आणि मेंदूने दिलेल्या सूचना होल्डवर ठेवल्या गेल्या. तोपर्यंत ती माणसं जवळ आली आणि रिक्षावाला आणि राणीला योग्य तो रस्ता सांगू लागली. मोबाईलच्या प्रकाशात तिने खाणाखुणा लिहून घेतल्या आणि पुढचा प्रवास सुरु झाला. त्या जंगलातून बाहेर पडल्यावर काही मिनिटातच "प्रशांति कुटीरम" चे बोर्ड दिसू लागले आणि तिचा जीव भांड्यात पडला. पुढच्या १५ मिनिटात बाईसाहेब सुखरूप प्रशांति कुटीरममध्ये पोचल्यावर जवळच्या बूथ मधून घरी फोन केला आणि सुखरूप पोचल्याचे सांगितले. रिक्षावाल्याचे आभार मानून ठरवल्यापेक्षा थोडे जास्तीचे पैसे देऊन राणी ऑफिसमध्ये आली तेव्हा राणीच्या आईने प्रशांति कुटीरम मध्येफोन करून सगळ्यांची झोप कशी उडवली हे समजले. मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे राणीला कुठेही संपर्क करता आला नव्हता, त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला थोडा त्रास झाला असे सांगून तिने दिलगिरी व्यक्त केली. प्रशांति मध्ये पोचण्याआधीच राणी तिथे फेमस झाली होती.
वर्गीकरण
लेखनप्रकार

14 टिप्पण्या 4,236 दृश्ये

Comments

श्रीरंग_जोशी नवीन

In reply to by अन्या दातार

कथामालिका असल्यास पुभाप्र. सुरुवात छान झाली आहे. बाकी विना आरक्षण लांबचा रेल्वे प्रवास करण्याचे तसेच जनरल बोगीने रात्रभर प्रवास करण्याचेही काही अनुभव आहेत. अक्षरशः रात्रभर ट्रेनच्या दारात बसून प्रवास केला आहे.

अमृत नवीन

In reply to by श्रीरंग_जोशी

दिल्ली ते नागपूर स्वछतागृहाच्या दाराशी बसून केलेला प्रवास आठवला. बाकी कथामालिका नसावी असा कयास आहे.

श्रीरंग_जोशी नवीन

In reply to by अमृत

बघुया लेखक काय सांगतात ते (एक लेख की कथामालिका). एकदा माझे वेटिंग १०१ वरून १ पर्यंत पोचले. पण एकदा गाडी आरक्षण केलेल्या स्टेशनावरून सुटली की १ वेटिंग अन ४० वेटिंग दोघेही एकाच पातळीवर येतात (यायचे). तेव्हा पुढचे ८ - १० तास तरी टिटिई कडून मला जागा मिळाली नाही. मध्यरात्रीनंतर केव्हातरी मीच एक रिकामे बर्थ शोधून काढले होते.

शि बि आय नवीन

ही घटना सत्य असून ४० तासांच्या प्रवासाची होती, त्यामुळे इथेच ती संपली. त्या अत्रंग मुलीला योग अभ्यास शिकवताना त्या शिक्षकांचे काय झाले असेल ते देवच जाणे.

चौथा कोनाडा नवीन

लेखन आवडले. खतरी अन गंभीरही >>> आधी खड्डे शोधायचे आणि मग त्यात उडी मारायची ह्याची बहुतेक राणीला सवय होती म्हणूनच ... आता याला काय म्ह्णणार ? थोडक्यात वाचली नाहीतर आणखी डेंजर सिच्युएशन मध्ये अडकली असती ! भारी लिहिलंय ! खरा आहे का हा किस्सा ?