मुर्दाड
गोव्याला असताना १९९९ - २००० जीवंती रुग्णालयात( वास्को येथील) तिथला एम टी(mechanized transport) अधिकारी म्हणून डॉक्टरी शिवाय अतिरिक्त काम माझ्या गळ्यात आले होते. यात रुग्णवाहिका त्यांचे चालक, त्यांचे तेलपाणी डागडुजी इ. सर्व कारभार पाहावा लागतो. सर्वात कटकटीचे काम म्हणजे रुग्णवाहिकेचे चालक(हे सिव्हिलियन असतात). माणूस एकदा चालक म्हणून सरकारी नोकरीत लागला कि त्याला आयुष्यभर बढती नाही. सरकारी नोकरी असल्याने कामावरून काढता येत नाही. त्यामुळे हे लोक बर्याच वेळेस माजोरी असतात. त्यातून लष्करी अधिकारी हे कायम बदली होत असल्याने फार तर एखादे वर्ष तेथे असतात.एखाद्या सरकारी नोकराला कामावरून कमी करायचे तर भक्कम पुरावे गोळा करावे लागतात फायली भराव्या लागतात त्यानंतर तेथे युनियनबाजी वशिले इ इ सर्व येते. हे सर्व करेपर्यंत तुम्ही तेथून बदलीवर जाता त्यामुळे हे लोक तुम्हाला मुळीच भिक घालत नाहीत. हे आपले काय वाकडे करणार हा एक माज असतो.
अशाच परिस्थितीत मी तिथला एम टी अधिकारी म्हणून काम पाहायला सुरुवात केली. तेथे तीन रुग्ण वाहिका होत्या आणी आठ चालक होते. दिवस आणी रात्र पाळी धरून. यात एक डिसुझा म्हणून चालक होता. अत्यंत बेजबाबदार आणी दारूच्या नादी लागलेला. कामावर कधीही वेळेवर येत नसे. मग तो आल्याशिवाय अगोदरच्या चालकाला घरी सोडणे कठीण जात असे. याच्यामुळे इतर चालकांना तास दीड तास उशीर होणे नित्याचे झाले होते. आणि प्रत्येक वेळेस त्यांना ओव्हर टाईम देणे पण शक्य होत नसे. म्हणजे शेवटी अधिकारीच वाईट. कारण सरकारचे पैसे असून देत नाहीत. (मुळात किती ओव्हर टाईमचे पैसे देत येतात यावर सरकारचे नियंत्रण असते). तो केंव्हाही दांडी मारणे कामावर असताना दारू पिऊन पडून राहणे अशा गोष्टी सर्रास करीत असे.कुठे तातडीची रुग्णवाहिका पाठवायची तर हा तेथे वेळेत पोहोचेल याची शाश्वती नसे. त्यामुळे त्याला लांब पाठवले जात नसे आणि हि गोष्ट इतर चालकांना खटकत असे. सुदैवाने बाकी चालक चांगले होते पण त्यांचा हि नाईलाज होता.
आम्ही आमच्या नौदलाच्या अत्यवस्थ रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पाठवत असू. एकदा याने सहा किमी वर असलेल्या जासिंतो बेटाशेजारी रुग्ण वाहिका उभी केली आणी गायब झाला.रुग्णवाहिकेत एक अपस्माराचा(फिट्स) झटका आलेला रुग्ण(सैनिकाचे मुल) मेंदूविकार तज्ञाला दाखवण्यासाठी मेडिकल कॉलेज ला जात होता. अर्धा तास वाट पाहून रुग्णाच्या बापाने (नौ सैनिकाने) मला फोन केला. मला एक दुसरी रुग्णवाहिका तिचा चालक आणी अजून एक चालक (डिसुझाची रुग्णवाहिका परत आणण्यासाठी) असे तेथे पाठवावे लागले. हा रुग्ण दुसर्या रुग्णवाहिकेतून पुढे गेला आणी आमची रुग्णवाहिका परत आली. तीन तासांनी डिसुझा दारू च्या नशेत रुग्णालयात आरडा ओरडा करीत आला. तो तेथे आलेल्या जवळच्या बार मध्ये दारू प्यायला रुग्ण वाहिका मध्येच थांबवून गायब झाला होता. परत आला तो रुग्णवाहिका गायब म्हणून याचा पारा चढला होता कारण त्याला बसने परत यावे लागले. मी थंड डोक्याने त्याला घरी पाठवले आणी त्याची रजा मांडली.
दुसर्या दिवशीहि त्याला काहीही बोललो नाही.पण त्याअगोदर मी बाकीच्या सातही चालकांना समजावून सांगितले कि डिसुझामुळे मला मनात नसतानाही तुम्हाला अतिरिक्त कामावर बोलवावे लागते. तीन दिवसांनी याने परत दांडी मारली तेंव्हा एका कामेरकर म्हणून चालकाला मला परत कामावर बोलवावे लागले तो आपली ड्युटी करून घरी गेला होता दुसर्या दिवशी त्याच्या पुतणीचे लग्न होते तरीही त्याला रात्र पाळी वर बोलवावे लागले. त्याला मी गोड शब्दात समजावले कि डिसुझा मुळे तुम्हाला हे असे बोलवावे लागते. डिसुझाच्या प्रत्येक कारभाराबद्दल मी त्या चालकांना सांगत असे कि त्याच्या मुळे तुम्हाला त्रास होतो आहे.
असे काही दिवस झाले त्यानंतर पुढे कधीही ओव्हर टाईम ला कुणालाही बोलावले तर त्यांना त्याचे पैसे देत असे डिसुझाला मात्र रजा ( COMPENSATORY OFF) देत असे. आणी त्याने न सांगता रजा घेतली तर मात्र त्याचे पैसे कापत असे. एकंदर तुम्ही ओव्हर टाईम किती देऊ शकता यावर बंधन असते तरीही माझ्या अखत्यारीत असलेल्या पैश्यापैकी मी जास्तीत जास्त ओव्हरटाइमचे पैसे इतर चालकांना देऊ केले.त्यांना सरकारी नियमावली दाखवून दिली कि यापेक्षा जास्त पैसे देत येणे कोणालाही शक्य नाही.
डिसुझाचा माजोरीपणा चालूच होता. असे दोन महीने गेले. पगार सर्व जणांना एकत्रच वाटला जात असे. त्या दोन महिन्यात डिसुझाला जाणवले कि त्याला पगार तीन ते चार हजाराच्या मध्ये मिळतो( गैरहजेरीची पगार कपात). त्यांचा पगार तेंव्हा साधारण ५ हजारचं आसपास होता. आणी बाकी चालकांना सात ते आठ हजार( ओव्हर टाईम मिळून). हे मात्र त्याला कुठेतरी टोचायला लागले. त्याने इतर चालकांना फूस लावायचा प्रयत्न केला.युनियन बाजी करण्याचाहि प्रयत्न केला परंतु इतर चालकांनी त्याला मुळीच पाठींबा दिला नाही. कारण त्यांना हि आता डिसुझामुळे त्रास होतो हे पटले होते शिवाय ओव्हर टाईमचे पैसे हि दिसत होते.
तिसर्या महिन्यात परत कमी पगार घेतल्यावर डिसुझा माझ्याकडे आला. सर माझ्याशी काय दुष्मनी आहे तुमची? मी म्हणालो तुझ्याशी दुष्मनी असायचे काय कारण? नाही सर तुम्ही मला पगार कमी देता आणी इतरांना जास्त. मी त्याला सांगितले कि तुझ्या जितक्या दांड्या होतात तितके पैसे कापले जातात. कारण मी ज्याला ओव्हर टाईम देतो तेथे मला डिसुझा गैरहजर हे लिहावे लागते. मग तुझा पगार कापला जातो. त्याला मी काय करणार. तो परत म्हणाला पण मी जेंव्हा अतिरिक्त(EXTRA) काम करतो त्यावेळेस तुम्ही मला रजा देता आणी बाकीच्याना मात्र पैसे देता. मी त्याला म्हणालो तू दारू पिऊन गाडी चालवतोस. त्यापेक्षा तुला सुटी दिलेली बरी. कुणाला गाडी ठोकलीस तर फुकटची लफडी कोण करणार? त्याल काही बोलता येईना. तो परत गेला
यावर त्याने आपल्या धर्माचा आधार घ्यायचा प्रयत्न केला. वास्कोतल्या चर्चमधील कोणा अधिकार्याचा मला फोन आला कि तो ख्रिश्चन आहे म्हणून तूम्ही त्याचा पगार कापता. मी त्या सदगृहस्था ना सर्व कहाणी सुनावली नि हेही विचारले कि डिसुझाने तुमच्या नातेवाईकाला असे भर रस्त्यात सोडून दिले तर तुम्ही काय केले असते. शिवाय हेही सांगितले कि माझ्याकडे एक पीटर म्हणून चालक आहे त्याला तुम्ही विचारुंन पहा कि ख्रिश्चन म्हणून त्याला काय त्रास झाला आहे? लष्करात जात धर्म असला विचार मला आत्तापर्यंत शिवलेला नव्हता. तुम्ही मला असे विचारून माझा अपमान करीत आहात. त्यावर त्यांनी माझी माफी मागितली आणी फोन बंद केला. पुढे एक वर्ष भर (मी पुण्याला बदलीवर जाई पर्यंत) मला डिसुझाकडून फारसा त्रास झाला नाही. त्याचे दारू पिणे कमी झाले असावे. निदान दांड्या मारणे बरेच कमी झाले होते. पण शेवटपर्यंत मी डिसूझाला काही ओव्हर टाईम चे पैसे दिले नाहीत. रजाच दिली. (कदाचित धर्माचा आधार घ्यायचा प्रयत्न केल्याचा राग माझ्या मनातून गेला नव्हता). एवढेच झाले कि आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही या त्याच्या माजोरीपणा ला थोडा तरी आळा बसला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
_/\_ खूप सुंदररीत्या हाताळलीत
हेच म्हणतो
उत्तम
गुड वन.
डॉक्टर साहेब , मनापासून
खरच काही काही लोक फारच
खूप छान लेख.
एकदम छान
साहेब
रोचक अनुभव ! परिस्थिती
अरे तर का रे
अनुभव आवडला..
उत्तम मार्ग काढलात.
अनुभव आवडला...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeelया वरुन एक प्रसंग आठवला.
खरे साहेब, थंड डोक्याने घेऊन
तुमच अनॅलिटिकल स्किल जबरी आहे
रोचक!!
व्यवस्थित हाताळली केस …
डॉक्टरसाहेबांची खरंच कमाल आहे
ननि साहेब काय लाजवता काय ?
श्री जयंत कुळकर्णी ,