Skip to main content

माशांची आमटी

लेखक शोनू
मंगळवार, 25/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माशांच्या आमटीचा अगदी साधा प्रकार साहित्य १-२ पापलेट, ( २-३ बांगडे, किंवा सुरमईचे १०-१२ तुकडे ) वाटीभर कोलंबी ऐच्छिक एक वाटी ओलं खोबरं ७-८ ब्याडगी मिरच्या १ टेस्पून धणे, अर्धा टी स्पून हळद मीठ, छोट्या सुपारीएवढी चिंच एक छोटा कांदा ,एक इंच आल्याचा तुकडा, दोन-तीन हिरव्या मिरच्या - तिन्ही अगदी बारीक चिरून . २ चमचे तेल ( खोबरेल चालत असेल तर ते, नाहीतर शेंगांचे किंवा कनोला . तिळाचे, ऑलिव्हचे वापरु नये ) माशांचे तुकडे करूनच आणावेत. घरी आणल्यावर थंड पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावेत. फिन्स, गिल्स किंवा खवले राहिले असतील तर ते साफ करून घ्यावेत. मग माशांच्या तुकड्यांना पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ शिंपडून सगळीकडून सारखे करून घ्यावे. असे करुन मासे फ्रीज मधे एखाद दिवस ठेवले तरी चालतं. फ्रीजमधे ठेवले असतील तर आमटी करायच्या २५-३० मिनिटं आधी बाहेर काढून ठेवावेत. कोलंबी असेल तर ती पण स्वच्छ धूवून त्याला हळद मीठ लावून ठेवावे व माशांच्या बरोबरच शिजत घालावी. अर्धा चमचा तेलावर धणे अन सुक्या मिरच्या भा़जून घ्याव्या. गॅस बंद करुन त्यात उरलेली पाव चमचा हळद घालावी गार झाल्यावर धणे खोबरं हळद सगळं बारीक वाटून घ्यावं. अगदी गंध वाटलं गेलं पाहिजे. शेवटी चिंच घालून मिनिटभर वाटावं. एका स्टीलच्या किंवा नॉन स्टिक पातेल्यात माशांचे तुकडे, मसाला, वाटणाचं यंत्र ( रगडा/पाटा) धुतलेलं पाणी घालून शिजत ठेवावे. मासे ताजे असले तर दोन उकळी येईपर्यंत शिजतात. मासे शिजायला लावले की एकीकडे लोखंडी पळीत उरलेलं तेल गरम करावं . तेल तापलं की त्यात आधी आलं, मग एका मिनिटाने मिरच्या अन शेवटी कांदा घालून भाजावं . कांदा मऊ झाला पाहिजे पण लाल होऊ नये. कांदा मऊ झाला की ही फोडणी माशाच्या आमटीत घालावी व लगेच माशांचा गॅस बंद करावा. ( झाकण सुद्धा लगेच ठेवावे) असं पातेलं लगेच गॅसवरून जेवणाच्या टेबलवर न्यावं- सोबत वाफाळता भात फक्त. बाकी काही नको....

वाचने 10195
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मस्त... साधी... सोप्पी....अस्सल.... माशाची आमटी. (मला १०-१२ तिरफळं घातलेली आवडतील). निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

सहमत. मला १०-१२ तिरफळं घातलेली आवडतील आवडतील? अहो, बांगडा असेल तर तिरफळं इज मस्ट! (मस्त्याहारी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

उद्या करावी म्हणतो. (तिकडे पांथस्थ्याने पण मस्त फोटो दिले आहेत) आता काय काय करायचे ते नीट ठरवावे लागणार. पण पाकृ. बद्दल धन्यवाद वेताळ

आम्ही शाकाहारी आहोत,प्युअर व्हेज पदार्थ द्यावेत ही विनंती !!!!

In reply to by बाकरवडी

तुमी गवत खाता आमी क बोल्तो कय? ज्याला आवरत त्यान झ्याव नाय त सोराव पक्का माशेहारी मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

आवडलं तर ठिक आहे नाहि तर द्या सोडुन. शी...शु कशाला करावे? (शुद्ध मांसाहारी मटणमोळा) पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

कृपया, पापलेट् अमेरिकेत कोणत्या नावाने मिळतं ते सांगाल का? (माफ करा पण मासे खाणं नुकतचं सुरु केलंय त्यामुळे अमेरिकन नाव माहित नाही . तिलापिया २-३ वेळा खाल्ले आहेत्.आवडले.)

In reply to by नारायणी

अमेरिकेत पापलेट तुम्हाला चिनी दुकानात दिसेल. आकारावरून ओळखता येईलच! नाव माहित असण्याची गरज नाही. बांगडाही ब्लू मॅकरेल नावाने मिळेल. नेहेमीच्या अमेरीकन दुकानात शोधू जाल, तर कदाचित मिळणार नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वा! साधी, सोपी, परंतु तेवढीच सुंदर पाकृ..! तात्या.

पांथस्थजी नमस्कार तुम्ही आमच्यासारख्या "खाण्यासाठी जगणार्‍यांना" माशांच्या एक सो एक पाककृती दाखवून "माशासारखे तडफडवायचेच "ठरविल्याचे दिसते आहे. पाककृती वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. आता निघालोच मार्केटकडे. आमटी मनसोक्त भुरकल्यावरच आत्मा तृप्त होईल. बाकी बांगडा असला तर "तिरफळं मस्ट "या सुनीलजींच्या मताशी १०० टक्के सहमत आहे.

जल्ला माशे आसतील त पाकृ ला कालवन म्हना रे आमटी म्हन्ल क टेसच नीगुन जात बग पाकृ सरस बोल पक्का माशेहारी मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

तोन्दाला पानी सुटले.! आजित पाटील

माशांचे नाव आणि प्रकार वाचूनच तोंडाला पाणी सुटले. =P~ पाण्यातील शेंगा म्हणजे आमचा जीव की प्राण. :? सुंदर मासोळीच्या निरंतर शोधात, :^o साखरांबा. माज्या जाल्यात होऊन आली, येतयं भेटाया तसाच भरतार माजा.