लेखनप्रकार
काही दिवसांपूर्वी 'यु ट्युब'वर सफरचंदाचा हंस बनविण्याचा व्हिडियो पाहिला आणि ठरवले की आपण देखील सफरचंदाचा हंस बनवायचा. हिला (बायको) व त्याला (मुलगा) ती विडीयो क्लिप दाखवली आणि डीक्लेर केले की आज मी सफरचंदाचा हंस बनवणार. त्यावर आमची झालेली चर्चा आणि त्याचा परिणाम खाली देत आहे. पण त्या आधी त्या व्हीडीयोची लिंक देत आहे.
मी – “अगं, सफरचंद कुठे ठेवलीत ?”
ही – “किती वर्षे झाली आपल्या लग्नाला ? घरातच राहता ना ? आणि सफरचंदं कुठे ठेवतात ? फ्रीजमध्येच ना का कपाटात ?”
मी – “अगं फ्रीजमध्ये दिसत नाहीत म्हणून विचारले. आणि ‘प्रश्नाला प्रतिप्रश्न म्हणजे उत्तर’ हेच तुला शाळेत शिकवले वाटते ?”
ही – “हे बघा, माझी शाळा काढू नका, त्यापेक्षा सफरचंदच शोधा, नीट डोळे उघडे ठेऊन. फ्रीज मध्येच आहेत.”
मी – “अगं, अशी ही भाज्यांच्या खाली का कोण ठेवतं सफरचंदं, चांगली समोर दिसतील अशी का नाही ठेवत तू ?”
ही – “हो, हो, का नाही ? आता ज्वेलर्स मांडतात तशी रचते समोर सफरचंदं आणि सोडते त्यावर प्रकाश. टीचभर मेला तो फ्रीज, मी म्हणून तो नीट रचते, दुसरी असती तर फ्रीजचे नुसते गोडाऊन केले असते मग कळले असते. किती दिवस म्हणते आहे की एखादा मोठा फ्रीज घेऊ तर त्यावर हूं नाही की चूं नाही. अॅपलचा नवीन फोन घेतलात त्याच्या ऐवजी जर नवीन फ्रीज घेतला असता तर ती मेली अॅपल्स तरी नीट ठेवता आली असती त्यात.”
मी – “बरं, बरं, कळलं ते. पुढच्या वेळी अॅपलचे नवीन मॉडेल आले तरी तो न घेता नवीन फ्रीजच घेऊ. आणि चाकू कोठे आहेत ?”
ही - “चा कू’ ? आणि ते कशाला हवेत तुम्हाला ? त्या व्हिडियो क्लिपमध्ये तर सुऱ्या दाखवल्या आहेत ?”
मी – “अगं, तेच ते. सुऱ्या काय आणि चाकू काय, शेवटी कापण्यासाठी वापरायचे ते हत्यारच ना ?”
ही – “शी ! काय भाषा मेली ती तोंडात. चाकू काय, हत्यारं काय ? मग आता खाटकाचा सुरा मागा, कोळीणीचा कोयता मागा, वाल्याकोळ्याची कुऱ्हाड मागा, शेवटी कापण्यासाठीच वापरतात नं ती ‘हत्यारं’ ? ऋषीबेटा, दे तुझा पप्पांना एखादी सुरी काढून, जरा बोथटच दे हो, नाहीतर सफरचंदाच्या ऐवजी बोटच कापतील आणि मग त्यांना औषधपाणी करताना आपणच सफर होऊ.”
मी – “काही नाही होत सफर. ह्या सफरचंदाचे सुंदर स्वॉन बनवून त्याच्या पाठीवर बसवून नेतो तुम्हाला सफरीला !”
तो – “पप्पा, ही घ्या सुरी. फार धार आहे तिला तेव्हा जरा सांभाळून कापा, आणि ह्या घ्या दोन ‘स्पेसर’ म्हणून वापरायच्या सुऱ्या. त्यांच्या खाली नॅपकिन अंथरा म्हणजे अॅपल कापताना सरकणार नाही. थांबा, मीच देतो सगळी तयारी करून.”
मी – “ऋषी, चल कर तो व्हिडीयो सुरु म्हणजे कोणतीही स्टेप चुकायला नको. आणि जरा तो ‘स्लो’च ठेव म्हणजे काही गडबडही व्हायला नको. सर्वात आधी सफरचंदाचे दोन तुकडे करायचे, हे केले सफाईदार दोन तुकडे, आता पुढे काय ?”
ही – “अहो, त्यात उभे तुकडे करायचे दाखवले आहे, तुम्ही त्याचे आडवे तुकडे केलेत की ? आता ते सफरचंद झाले बाद. घ्या आता दुसरे, आणि ठेवा हे तुमच्या डब्यासाठी.”
मी – “अगं हो, हो. जरा शांत बस ना थोडावेळ. एकतर हातात धारदार सुरी, त्यात हे गोल गरगरीत सफरचंद, सारखे निसटते, एक डोळा व्हिडीयो क्लिपकडे आणि दुसरा कापण्याकडे. त्यात तुझी अखंड-अविरत बडबड. शतावधानी माणसाचे अवधान देखील कमी पडेल. कापले अॅपल आडवे, मग काय झाले ? आकाश कोसळले की धरणी दुभंगली ? घेऊ दुसरे. त्यात काय ? चल ऋषी, आता व्हिडीयो तू बघ आणि सांग मला, आणि तू गं, जरा गप्प रहा देवासारखी. हं, हे बघ आता कापले ना नीट उभे ? आता पुढे काय करायचे ? हां, त्यातला एक भाग बाजूला ठेवायचा आणि सुरीच्या टोकाने त्यातील बिया, हंसाच्या डोळ्यासाठी बाजूला काढायच्या. ह्या बघा काढल्या बिया आणि ह्या ठेवल्या बाजूला. हं, ऋषी सांग पुढे. हा घेतला अर्धा भाग, आणि हे केले दोन तुकडे त्याचे पुन्हा, पुढे काय ?”
ही – “अहो, आता हे ही अॅपल ठेवा तुमच्या डब्यासाठी बाजूला. पुन्हा दोन तुकडे करायला कोणी सांगितले ? अहो आता त्याचे पंख बनवायचे होते, त्याचे दोन तुकडे केल्यावर तो उडणार कसा आणि आपण जाणार कसे सफरीला ? काही म्हणजे काही कळत नाही. ऋषी, घे ती सुरी काढून त्यांच्या हातातून, दातओठ खात माझ्याकडेच बघताहेत. आणि मला वाटते आता पुरे, त्या विडीयोची चांगली पारायणं करा पंधरा-वीस वेळा मग एखाद्या बटाट्यावर करा प्रयोग आणि मगच वळा अॅपलकडे. बटाटे बाद झाले तरी भाजीत घालता येतील, अॅपल खाऊन खाऊन खाणार किती माणूस ? आणि कित्ती महागलीत ती हल्ली. अहो, राहू द्या ते, ‘येऱ्या गबाळ्याचे काम नोहे ते, तेथे पाहिजे जातीचे’ आमच्या ‘हुजुरपागेत’ शिकवायचे आम्हाला.”
मी – “अगं, रोज करतो का ही कलाकुसर ? म्हंटलं, विडीयो क्लिप तर सोपी दिसतेय, दाखवू आपली क्रिएटीव्हिटी सगळ्यांना, तर तू ये मधे मधे बोंबलायला. पूर्वी राजे-महाराजे युद्धाला निघाले की त्यांच्या बायका स्व:ताच्या हाताने तलवारी बांधायच्या त्यांच्या कमरेला, केशराचे टिळे लावायच्या, आरती ओवाळायच्या आणि ते देखील युद्ध जिंकायच्या आधी. आणि तू दे बोथट सुरी नवर्याच्या हाती आणि बटाटे, अॅपलच्या जागी. कसले म्हणून कौतुक नाही नवर्याचे. कैकयी, युद्धात दशरथाच्या बाजूने लढायची म्हणे. नवर्याच्या रथाचे चाक मोडले तर स्वताच्या हाताने ते पेलले आणि युद्धात जय मिळवून दिला त्याला.. नाहीतर तू !”
ही – “अहो तोंड आवरा, नसती उदाहरणे देऊ नका. मी ही बांधते तलवार तुमच्या कमरेला, भाला पाठीला आणि देते धनुष्य-बाण खांद्यावर. पण उपयोग काय मी म्हणते ह्या सगळ्यांचा ? परवा मेलं नखा एव्हढं झुरळ निघालं तर माझ्या आधी स्व:ताच चढून बसलात ना पलंगावर ? साधे अॅपल कापता येत नाही आणि कैकईची उदाहरणे द्यायला निघालेत. तिच्यामुळेच तर पुढचे रामायण घडलं हे विसरलात वाटतं? ऋषी बेटा, घे तिसरं अॅपल फ्रीज मधून आणि दे त्यांच्या हातात, अजून पाच आहेत म्हणावं आत. करा सगळ्यांचा नाश आणि मग खा बसून फ्रुटसलाड. मी चालले माझ्या कामाला. समोर उभी राहून बघते आहे मगासपासनं तर म्हणे कौतुक नाही. कौतुक नसते तर एक तरी अॅपल लागू दिलं असतं ह्याच्या हाताला ? आणि धारदार सुरी नको म्हटलं ते काळजीपोटीच ना ? आधीच मेला धांदरट स्वभाव, उगाच हात-बित कापला म्हणजे ते मेलं बदक केव्हढ्याला पडेल ?”
तो – “अगं मम्मी, बदक नव्हे, स्वॉन, हंस"
ही – “हो, हो कळतं मला, स्वॉन काय, बदक काय आणि बगळा काय, पक्षीच ना मेले ते शेवटी ?”
मी – “पुरे पुरे, कळला तुझा उत्साह. ऋषी बेटा, काढ एक बऱ्यापैकी अॅपल आणि तो विडीयो बघून तूच सांग पुढची कृती. आणि लगेच लगेच सांग, शंभू गवळ्या सारखा नुसता बघत नको राहूस.”
ती – “खबरदार माझ्या मुलाला ‘शंभू गवळी’ म्हंटले तर. स्व:ताचेच नीट लक्ष नाही, आणि दोष दुसऱ्यांवर. ही तुमच्या घराण्याची परंपराच आहे म्हंटलं.”
मी – “तरी मी म्हणत होतो अजून आमच्या घराण्याचा उद्धार कसा झाला नाही तो. तब्बल पंधरा मिनिटे झाली आणि अजून घराणे कसे नाही आले बोलण्यात ?
ती - “मी कशाला करू तुमच्या घराण्याचा उद्धार ? मी म्हणते आहे काय त्या मेल्या घराण्यात उद्धार करण्यासारखे ?”
मी - “ लग्न करताना दिसलं नव्हतं का घराणं ? आता आली आहेस ना त्याच मेल्या घराण्यात ? मग तोंड आवर जरा आणि मला बनवू दे स्वॉन. ऋषी बेटा, हो अगदी बरोबर कापलेस अॅपल. आता त्याच्या बिया बाजूला काढ त्याच्या डोळ्यांसाठी. आता त्याच्या पंखांसाठी उरलेले अॅपल घे. बरोबर, असेच पंख करायचे दाखवले आहेत. नीट लक्ष देऊन काप, कारण त्याच्यावरच त्याचे सौंदर्य अवलंबून आहे. झाले करून पंख ? किती झाले ? सहा? हरकत नाही, विडीयोमध्ये आठ दाखवले आहेत, शेवटी त्याला खरेखुरे उडायचे थोडेच आहे ? ते आता बाजूला ठेव. आता त्या दुसऱ्या अर्ध्या भागातून हंसाचे तोंड कोरायचे आहे. इथे खरी क्रिएटीव्हिटी आहे, हळू हळू काप, फार घाई करू नकोस नाहीतर चौथे अॅपल घ्यावे लागेल. छान, हंसाची चोच छान बाकदार आली आहे. आता त्या बिया दोन्ही बाजूला डोळे म्हणून लाव. लावल्यास ? आता त्या बेसच्या मधोमध खाच कर आणि त्यात ते तोंड बसव. हो, अगदी असेच. बघ, झाला ना आपला हंस तयार. सांगितले नव्हते अगदी सोपा आहे तो. आता त्याचे चांगेल दोन-चार फोटो काढ म्हणजे मी लावतो आमच्या ‘मिपावर’ आणि दाखवतो ‘माझी’ क्रिएटीव्हिटी.”
ही बघा माझी क्रिएटीव्हिटी.
मिसळपाव
हाहा!मस्त जमलीये
उत्तम!
In reply to उत्तम! by शब्दानुज
पोपटच झाला !
भन्नाट लिहिलंय
In reply to भन्नाट लिहिलंय by श्रीरंग_जोशी
श्रीरंग जोशी तुमचे आभार.
In reply to श्रीरंग जोशी तुमचे आभार. by सौन्दर्य
त्यात काय एवढं?
In reply to त्यात काय एवढं? by श्रीरंग_जोशी
श्रीरंग जोशी, पुन्हा एकदा आभार.
In reply to श्रीरंग जोशी, पुन्हा एकदा आभार. by सौन्दर्य
ती: म्हंटल नव्हतं? नाही
In reply to ती: म्हंटल नव्हतं? नाही by स्पंदना
अर्रर !
सौन्दर्य,क्रिअटिवटीआणि ललित
In reply to सौन्दर्य,क्रिअटिवटीआणि ललित by कंजूस
प्रयत्न
Audio recording software >> कंजूसराव - क्लिप प्रत्यक्ष ऐकली. मंजूळ आहे किलबिलाट. हे काही कारणाने चालत नसल्यास मला सुचणारे काही पर्याय...
छान ! :)
काय भारी लिहलय. हंसपन मस्त
मस्तच
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
'हुजुरपागेतील चूल'
In reply to 'हुजुरपागेतील चूल' by सौन्दर्य
हुजुरपागा
In reply to हुजुरपागा by श्रीरंग_जोशी
पेशव्यांची घोड्यांची पागा
In reply to पेशव्यांची घोड्यांची पागा by प्रचेतस
अच्छा
In reply to अच्छा by श्रीरंग_जोशी
आमची शाळातर चक्क पागाच होती.
मस्त आहे.. स्वान झाला, आता
In reply to मस्त आहे.. स्वान झाला, आता by आनन्दा
स्वान करताना तोंडाला फेस आला !
हा हा हा
वा!!
तो राजहंस एक.....
In reply to तो राजहंस एक..... by स्पंदना
चांगली कल्पना !
बर्यापैकी बरा प्रयत्न!!
सर्व प्रतिसादांचे आभार
खुसखुशीत!
मस्त..