Skip to main content

प्राइम टाईम आणि व्यक्तिस्वातंत्र्य

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 09/04/2015 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांना पाठबळ देण्यासाठी एक स्तुत्य असा निर्णय घेतला. राज्यातील मल्टीप्लेक्स चालकांना संध्याकाळी ६-९ अशा मोक्याच्या वेळी मल्टीप्लेक्स मधील एका स्क्रीनमध्ये मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक केले आहे. हे न पाळणाऱ्या चित्रपटगृहावर कारवाई करण्यात येईल. हा निर्णय जाहीर करताच त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. मराठी कलाकार आणि मराठी रसिक नक्कीच या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन करतील. परंतु हिंदी चित्रपटसृष्टीतील काहीजणांना हे पचलेले दिसत नाही. महेश भट, शोभा डे अशा कुठल्याही विषयावर बडबड करणाऱ्या स्वयंघोषित विचारवंतांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशा मंडळीत आता ऋषी कपूरसुद्धा सामील झालेले दिसतात. सरकारचे प्रत्येक निर्णय स्तुत्य नसतात. सरकारने घेतलेला गोहत्याबंदीचा निर्णय मला पटलेला नाही. त्या विषयावर बोलायला नको. तो एक स्वतंत्र विषय आहे. पण मुद्दा हा कि मला सरकारचे सगळेच निर्णय पटतात असे नाही. त्या त्या निर्णयामागची कारणे समजून घेतली पाहिजेत आणि मग मत बनवले आणि मांडले पाहिजेत. ह्या मंडळींनी हा आमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर, व्यवसायस्वातंत्र्यावर हल्ला आहे, यामुळे हिंदी चित्रपटांचे नुकसान होईल, हि हुकुमशाही आहे, जो चांगला चित्रपट आहे तो आपोआप टिकतो अशी मल्लीनाथी केली आहे. अर्थात या मंडळींना असे वाटणारच. मराठी चित्रपटांना डावलून त्यांच्या चित्रपटांना जी जागा मिळत होती, ती आता यामुळे जाईल आणि नुकसान होईल हीच यांची खंत असावी. शोभा डे या मुळच्या मराठी असणाऱ्या उच्चभ्रू महिलेने तर " आता मल्टीप्लेक्स मध्ये पॉपकोर्न बंद करून दही मिसळ आणि वडापाव मिळणार. मराठी चित्रपटांबरोबर तेच शोभेल " अशी सरकारवर टीका करण्याच्या नादात मराठी खाद्यपदार्थांची खिल्ली उडवली आहे. सध्याची वस्तुस्थिती काय आहे? तुम्ही मराठी चित्रपट पाहत असाल, तर आठवा कि मराठी चित्रपटांच्या वेळा कशा असतात? सकाळी ११ वाजता, दुपारी साडे तीन वाजता, पाच वाजता. दिवसातून तीन चारच खेळ आणि तेही अशा अडचणीच्या वेळी. अशा वेळी कोण चित्रपट पाहू शकतो? फक्त विद्यार्थी, गृहिणी, निवृत्त लोक. जे लोक दिवसभर कामावर जातात, आणि ज्यांना चित्रपट पाहण्याची इच्छा आहे, त्यांना काय पर्याय आहे? एकेका मल्टीप्लेक्स मध्ये ३-४ स्क्रीन असूनसुद्धा ते हिंदी चित्रपटांना प्राधान्य देतात. हिंदी चित्रपट जास्त गल्ला कमावतील हे रास्त गणित. आणि याला काही अंशी मराठी प्रेक्षक आणि कलाकारसुद्धा जबाबदार आहेत. किती तरी वर्षे मराठी चित्रपट एकसुरी, कंटाळवाणे आणि फाजील विनोदी होते. त्या तोचतोचपणाला कंटाळून मराठी प्रेक्षकांनी चित्रपटांकडे पाठ फिरवली. पण आपल्या डोळ्यांसमोर हि परिस्थिती बदलतेय. चांगले चित्रपट येतायत, त्यांना चांगला प्रतिसादसुद्धा मिळतोय. गेल्या २-३ वर्षात मी जे जे मराठी चित्रपट, चित्रपटगृहात जाऊन पाहिले, तेव्हा प्रत्येक वेळी चांगली गर्दी जमलेली होती. सध्या हिंदीत भारतात १०० करोड कमावणाऱ्या चित्रपटांचे कौतुक होते. भारतात एवढी राज्ये असताना १०० कोटींच्या गल्ल्याचे असे कौतुक होते. दुनियादारी, टीपी, लय भारी, या चित्रपटांनी फक्त महाराष्ट्र या एकाच राज्यातून ३०+ कोटींचा गल्ला जमवला. पण तरीही मराठी चित्रपट दाखवण्याबद्दल चित्रपटगृहाचे चालक अनास्था दाखवतात. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ५-६ (तेही जास्त सांगतोय) खेळ असणाऱ्या चित्रपटाची पहिल्याच सोमवारी २-३ खेळ अशी अवस्था होऊन जाते. आणि बऱ्याचदा पहिल्यादिवशी सुद्धा असेच विचित्र वेळी खेळ लावलेले असतात. आणि त्याला प्रेक्षक आले नाहीत कि धंदा होत नाही अशी ओरड करून खेळ कमी करून टाकतात. हे विचारवंत चांगला चित्रपट आपोआप चालतो, survival of the fittest अशी टीका करत आहेत. हिंदीत चांगला चित्रपट न चालल्याची कमी उदाहरणे आहेत का? प्रश्न फक्त चांगला चित्रपट लोकांपर्यंत पोचण्याचा नाही, त्याला तेवढी संधी देण्याचा आहे. जर संधीच दिली नाही आणि चांगला चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोचू शकला नाही, म्हणजे तो चित्रपट चांगलाच नव्हता असे आपण म्हणणार? राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये गेली काही वर्षे मराठी चित्रपट सातत्याने बाजी मारत आहेत. पण यातले अनेक चित्रपट कधी लागून गेले हेच माहित नसते. कितीतरी चित्रपट पुरस्कारानंतर पुन्हा प्रदर्शित होतात. आणि आता राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता सिद्ध केलेली असूनसुद्धा त्यांना पुरेसे आणि चांगल्या वेळचे खेळ मिळत नाहीत. चांगला चित्रपट बनविण्यासाठी कलाकारांनी आणखी काय करावे? आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहचावा, त्यांना तो सहज बघता यावा याची काळजी घेतली गेली नाही तर चित्रपटांची प्रगती कशी होणार? आणि हि स्थिती आजची नाही. मी दादा कोंडकेंचे आत्मचरित्र वाचले. दादा कोंडकेंना आपला "सोंगाड्या" हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृहाच्या मालकांकडे खेटे मारावे लागले होते, विनवण्या कराव्या लागल्या होत्या. तरीही कोणी तयार झाले नाही. शेवटी बाळासाहेब ठाकरे यांनी मध्ये पडून जेव्हा त्यांना धमकावले, तेव्हा कुठे तो चित्रपट प्रदर्शित झाला, आणि त्या चित्रपटाने आणि दादा कोंडकेंच्या पुढच्या अनेक चित्रपटांनी इतिहास घडवला. पण त्यांना संधीच न मिळती तर? एखाद्या चित्रपटाला संधी देऊन तो वाईट निघाला अथवा प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही, तर ती त्या चित्रपटातली कमतरता आहे. पण त्याला संधीच मिळत नसेल तर हि व्यवस्थेतली कमतरता आहे. मागे एकदा एका मल्टीप्लेक्सने ऐनवेळी एका मराठी चित्रपटाचा खेळ रद्द केला. तिथे तिकिटे काढून चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या मराठी रसिकांनी चालकांशी भांडण करून त्यांना खेळ दाखवण्यास भाग पाडले. दक्षिणेतल्या प्रत्येक राज्यात तिथल्या स्थानिक भाषेतल्या चित्रपटांची सद्दी असते. तिथे हिंदी चित्रपट स्थानिक चित्रपटांच्या तुलनेत कमी धंदा करतात. इथे कोणी आक्षेप घेत नाही. कारण तिथे त्या प्रेक्षकांचीच तशी मागणी असते. हिंदी चित्रपट कमी चालावेत हि माझी किंवा कोणाचीही इच्छा नाही. महाराष्ट्रात आणि भारतात सर्व प्रकारच्या, सर्व भाषेतल्या कला बहराव्यात. पण त्याच बरोबर मराठी चित्रपटसुद्धा बळकट व्हावेत. महाराष्ट्रात शासनाने या दिशेने हस्तक्षेप केलेला आहे. काही दिवसात प्रेक्षकांनी याला चांगला प्रतिसाद देऊन हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करावे. आणि चांगल्या संख्येत आणि चांगल्या वेळी मराठी चित्रपट दाखवणे चालकाला शासकीय बंधनाने नव्हे तर प्रेक्षकांच्या मागणीमुळे भाग पडावे.

वाचने 21626
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

In reply to by जेपी

अरे ये लोग टीवी को बी राईट्स बेचताय. मै क्या बोलता, सब लोग टोरेंट से डाऊन लोड करो ना, वो आमीरखान भी भीक मांगेगा और वो मल्टिप्लेक्स वाले बी.

'आठवडी' बाजारात कुणा विक्रेत्याला 'दिवसा येथे बसू नकोस तू, पाहिजे तर रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अक्खं मैदान वापरू शकतो, जा मज्जा कर' असे सांगीतले तर त्याला जेवढा आनंद होईल तितकाच आनंद ही सक्ती होईपर्यंत मराठी चित्रकर्त्यांना होत होता. ज्या मुद्द्यांवरून सरकारला हा निर्णय घेऊन दांडगाई दाखवायला लागली ते मुद्दे इथे चर्चेत आलेले नाही आहेत अजून. साधारण प्रेक्षकाच्या भुमिकेतून या निर्णयाकडे पाहिल्यास सरकारची हडेलहप्पी वैगेरे दिसते. पण निर्माते, वितरक आणि प्रदर्शक यांच्या भुमिकेतून पाहिल्यास पडद्यामागे खूप गोष्टी होतात त्या सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोचत नाहीत. चित्रपटात फक्त खानत्रयींपैकी कुणीही असू देत तो चित्रपट घ्यायला आणि लावायला वितरक आणि प्रदर्शकांच्या उड्या पडतात. भले त्या दरम्यान कितीही चालणारा मराठी चित्रपट असला तरी तो काढून हा लावायला हे लोक कमी करत नाहीत. त्यात त्यांना फक्त धंदाच दिसतो. मराठी निर्मात्यांना (आताच्या हमखास गर्दीखेचक चित्रपटवाल्यासुद्धा) ह्याचा बराच फटका बसला आहे. मराठी निर्माते स्वत:च्या खर्चाने चित्रगृह बांधून त्यात आपलेच चित्र दाखवू शकत नाहीत. वितरक-प्रदर्शक याच व्यवस्थेतून त्यांना जावे लागते. सुटका नाही. एका टिकीटामागे निर्मात्यास ३०-४० टक्के कमिशन मिळते. पण चित्रपट योग्य वेळेत म्हणजे प्रेक्षक उपलब्ध असतील त्यावेळेत नसेल तर त्याच्या संभाव्य धंद्याचे नुकसान होते. पुढचा चित्रपट काढायला पैसा आणि हिंमत उरत नाही. चित्रपट उद्योगाचा धंदा फार विचित्र आहे. बर्‍याच लोकांना वाटते की चांगला चित्रपट असेल तर लोक पाहायला जातात आणि तो हीट होतो. असे करणारे ५-१० टक्के असतील. असे असते तर हा उद्योग केव्हाच बंद पडला असता. खरे चित्र असे आहे की हा पण आठवडी बाजार आहे. बहुसंख्य लोकांना चित्रपट पाहावासा वाटतो. ते नियमितपणे चित्रगृहात जाऊन दर सप्ताहांत एकतरी चित्रपट पाहतच असतात. तो कसाही असला तरी त्यांच्या वेळेला तो तिथे असणे गरजेचे असते. कितीही टुकार चित्रपट असेल तरी या तीन दिवसाचा गल्ला ३०-४० टक्के तरी असतोच असतो. त्यात नामांकीत निर्माण-गृहांचे असतील तर ७०-८० टक्के निश्चित. कारण ते मोठया प्रमाणावर प्रेक्षक खेचुन आणेल अशी प्रसिद्धी करतात. नामांकित तारे-तारका असतील तर १०० टक्के निश्चित. यासाठी प्रत्येक चित्रपटाने किती धंदा केला याचे आकडे जालावर मिळतात ते तपासून बघता येइल. आजकाल ३६० डीग्री मार्केंटींग मुळे कोणताही चित्रपट त्याचा खर्च वसूल करतोच करतो. गेल्या दहा वर्षात चित्रपटांच्या अ, ब, क वैगेरे दर्जांची जी भेसळ झाली आहे त्यामागे हेच अर्थकारण आहे. नामांकीत तारा + टुकार कथा-दिग्दर्शन, जबराट कथा-दिग्दर्शन + सामान्य कलाकार, नामांकीत तारा + जबराट कथा-दिग्दर्शन अशा धाटणीचेच चित्रपट वेगवेगळ्या नामांकित निर्माणगृहांकडून सतत येत असतात. बाजारात जसा चिप्स-वेफर्सचा सुकाळ असतो तसा. कारण पब्लिकला कुठल्याही वेळी पटकन बघता येइल म्हणून असे चित्रपट तयार ठेवावे लागतात. १०० चित्रपटामागे एखादा चांगला येतो पण आधीच्या ९९ पैकी ७० ने तरी खर्च वसूल केलेला असतोच. मागणीनुसार पुरवठा हा नियम चित्रसृष्टीत चालत नाही. इथे फक्त पुरवठा करत राहायचे, कशाला मागणी येइल काही सांगता येत नाही. तरी सगळा माल खपतोच खपतो. त्याच बरोबर ह्या सिनेमांमधून वेगवेगळ्या उत्पादनांची, स्थळांची, संस्कृतीची, तारे-तारकांची, त्यांनी करार केलेल्या उत्पादनांची भरगच्च मार्केटींग होत असते. याचसाठी हे चित्रपट आणि अभिनेते सतत प्रेक्षकांसमोर राहणे उद्योगासाठी परम-आवश्यक आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या उपलब्ध वेळेमधे जो कोणी चित्रपट दाखवेल त्याचाच सर्वप्रकारे धंदा होतो हे शाश्वत सत्य आहे. तो मराठी आहे, हिंदी आहे, टुकार आहे, चांगला आहे याच्याशी काही कर्तव्य नाही. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आमिरने त्याचा चित्रपट सकाळी फक्त आठच्याच शोला लावून हीट करून दाखवावा. बडे निर्माते, वितरक आणि प्रदर्शक यांच्या अशा धंदेवाईकपणामुळे (जो साहजिक आहे असे अनेकांचे मत आहे) मराठी चित्रपटास चित्रगृह उपलब्ध होत नाही. बर्‍याचदा एखाद्या चित्रगृहा-मालकाकडे काही कारणाने (धंद्याच्या दृष्टीने) योग्य चित्रपट नसेल तेव्हा मराठी चित्रपटास तो होकार देतो. ऐनवेळेला त्याच्या हातात 'तो' चित्रपट पडला तर गुपचुप मराठी सिनेमाची वेळ सकाळी ८ वाजता होऊन जाते. दुसरा कुठला मोठा हिंदी चित्रपट नसल्याने 'मोक्याच्या-वेळेला' लागू शकलेला मराठी चित्रपट १२५ रुपये देऊन सगळ्यात आरामदायी आसनांवर बसून बघितला आहे. पुढच्या वेळेला त्याच चित्रगृहात बडा हिंदी चित्रपट लागला असता त्याच आसनांची किंमत होती ३५० रुपये. हा धंदा आहे त्यामुळे इथे असेच चालणार त्याला पर्याय नाही. पण... असेच राहणार असेल तर हिंदी चित्रउद्योगाचा कित्ता हुबेहुब गिरवायच्या मागे असलेल्या होतकरू आणि मोठ्या संख्येत असलेल्या मराठी चित्रकर्त्यांनी काय करायचे? त्यांना चित्रगृह प्रेक्षकांच्या सोयीच्या वेळात उपलब्ध होणे प्रचंड आवश्यक आहे. मुळात हा निर्णय बहु-पडदा-चित्रगृहांना लागू असूनही जणू काही पाचपैकी पाचही, तीनपैकी तीनही पडद्यांवर मराठीच चित्रपट दाखवण्याची हुकुमशाही असल्यासारखा बघितला जात आहे. मल्टी-प्लेक्स च्या मल्टी या शब्दाकडे लक्ष न देता वडापाव, हिंदी-कन्नड, सरकारची हुकुमशाही अशा संबंध नसलेल्या विषयांकडे लक्ष वेधल्या जात आहे. असे किती मराठी चित्रपट येतात दर आठवड्याला? तीनपैकी एक, पाचपैकी एक पडदा मराठीस देऊनही पुरेसा धंदा करायला मिळेलच की. पण तेही गणित एवढे सोपे नाही. एक इंग्रजी, एक तारांकीत महागडा हिंदी, एक बर्‍यापैकी इंटेलेक्चुअल हिंदी, एक-दोन कुमार-तरूणांसाठी उथळ हिंदी या पॅकेजमधे मराठीला जागाच उरत नाही. तरीही पाच हजार ते सात हजार ठिकाणी एकाच वेळी चित्रपट दा़खवण्याची क्षमता असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीने दिडशे-दोनशे प्रती कशा-बशा काढू शकणार्‍या मराठीला आमचा धंदा खातात म्हणून विरोध करणे म्हणजे जरा अतीच... एकदा हे नियमितपणे मराठी चित्रपट दाखवायला लागले की त्याचा 'डोमिनो परिणाम' होऊन जास्त प्रेक्षक, जास्त पैसा, जास्त चांगले चित्रपट, अजून जास्त प्रेक्षक, अजून जास्त पैसा, त्यातूनच जास्त आणि दर्जेदार चित्रपट असे चक्रवाढ प्रगती होईल. एकेदिवशी दक्षिण राज्यांतल्या चित्र-उद्योगासारखी मराठीही मोठी होईल. हेच हिंदीवाल्यांच्या पचनी पडत नाही आहे. ४-६ करोड संभाव्य प्रेक्षक-संख्या असलेलं हक्काचं राज्य हातातून कोण जाऊ देईल? मग राज्यघटनेने सर्वांना दिलेल्या समान-संधीच्या उपलब्धीचे काय? त्याहीपुढे जाऊन मी असे विचारू इच्छीतो की जास्त आणि दर्जेदार चित्रपट मिळण्याच्या संभाव्य संधीपासून प्रेक्षकांना दूर ठेवणारे हे कुठले फ्री मार्केट? असो. माझे मत मी मांडले. यावर केवळ धंद्याच्या दृष्टीने विचार केल्या जावा. मराठी अस्मिता, अभिव्यक्ती-स्वातंत्र्याची गळचेपी, अन्याय-सहन-करणार-नाही छाप विचार काहीही उपयोगाचे नाहीत. परतेकास्नी धंदा कराया चानस गावला पाय्जेल का नाय? कारण 'धंदा'च सगळ्यात मोठा असतो भाऊ. शोभा असो वा आमिर हेही त्यांच्या-त्यांच्या धंद्याच्याच पोटतिडकीतून बोलतायत.

In reply to by संदीप डांगे

इतके मुलभूत विश्लेषण जर आपण करू शकत असताल, तर एक वेगळा धागाच काढायचा नाहीत का? धन्यवाद या इनसाइटबद्दल..!!

In reply to by असंका

वेगळा धागा काढण्याचा विचार आला होता पण म्हटलं एकाच विषयावरची सगळी चर्चा एकाच धाग्यावर राहीली तर बरं असतं.

In reply to by आनंदी गोपाळ

तीनपैकी कुठल्या शोला आपली फिल्म लावायची याबद्दल निर्माते थेटर-मालकांना सूचना करू शकतात. प्राईम-टाईमची डेफिनिशन बदलण्यामागे मराठी निर्मातेच आहेत. टार्गेट-ऑडीयन्सनुसार आपली फिल्म केव्हा लावली तर जास्त प्रेक्षक येतील यावर त्या विशिष्ट चित्रपटासाठीचा प्राईम-टाईम ठरणार. यापुढे थेटरवाले मराठी सिनेमाची ससेहोलपट करू शकणार नाहीत हीच खूप समाधानकारक बाब आहे. संपूर्ण चर्चेचं फलित हेच की काही गोष्टी सामान्य प्रेक्षकांना माहीत नसतात. चर्चेतून त्या पुढे आल्या. मराठी राज्यात मराठीला प्राधान्य असावं या मागणीत काय गैर आहे?

सरकार चा अतिशय योग्य निर्णय त्या बद्दल त्याचं अभीनंदन , मराठी माणसाची फंद-फितुरी आणि कोते पणा संपेल तो खरच मराठी संस्कृतीसाठी खरा सुदिन

आपल्याच राज्यात आपल्यावर ही वेळ येणे म्हणजे आपले पूर्वज. वेळीच बाहेरच्यांना हाकालले असते तर? परदेशात भारतीयांवर का हल्ले होतात कळले काय?

ही बया स्वतः जन्माने मराठि असुन मराठि माणसाचा इतका का तिरस्कार करत असावि ? मला एका मित्राने हि खालिल लिंक दिली.... २००८ सालि सुध्दा हि बया असच काहि बरळली होति.. http://www.manogat.com/node/14710

In reply to by होबासराव

या म्हणतात "मी कधी सिनेमा पहावा याची जबरदस्ती मा. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर करू नये" यांना कोणितरी सांगा ना की ही जबरदस्ती तुमच्यावर नाही बाई. मल्टिप्लेक्सनी प्राइम टाईममधे मराठी चित्रपट दाखवावे अशी सरकारची जबरदस्ती आहे. वरील चर्चा पाहता आणि माझे वैयक्तिक मतही असेच आहे की हे योग्य आहे. तुम्ही बघूच नका ना मराठी चित्रपट. आणि ते वडा पाव. मिसळपाव वगैरे अगदीच अडाणपणा आहे.

आमच्या शहरात सध्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. काल आम्ही एक हजाराची नोट हा चित्रपट पाहिला. हॉल पूर्णपणे भरला असला तरी प्रेक्षकांमध्ये बोटावर मोजण्याइतके भारतीय लोक होते. चित्रपटानंतर निर्माता व दिग्दर्शक श्रीहरी साठे यांना प्रश्न विचारण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. चित्रपटाची कथा, पात्रे, प्रसंग, निर्मितीचे अनुभव यावर प्रश्न विचारून झाल्यावर एका अमेरिकन प्रेक्षकाने प्रश्न विचारला की भारतात प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता. त्यावर श्रीहरी यांनी उत्तर दिले की, "गेल्या वर्षी आम्ही १०० स्क्रीन्सवर १ आठवड्यासाठीच हा चित्रपट प्रदर्शित करू शकलो. बॉलीवूडच्या प्रभावामुळे यापेक्षा अधिक वेळ आम्हाला मिळू शकला नाही. एक आठवड्यातही प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला होता". श्रीहरी २००१ सालापासून अमेरिकेत राहतात. त्यांनी सांगितलेला अनुभव या चर्चेच्या विषयाशी संबंधीत असल्याने इथे टंकण्याचा हा प्रपंच.