Skip to main content

यांना कसलेही कौतुक

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 24/06/2013 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
या पुणेकरांचे काही सांगता येत नाही. ते कशाचेही कौतुक करतील. भले ती गोष्ट ताजमहालाएवढी मोठी नसेना का. या कौतुकात शनिवारवाडा, लालमहाल असलाच पाहिजे असे नाही. किंबहुना खरा पुणेकर शनिवारवाडा आतून पाहातच नाही. शनिवारवाडा ही पुण्याबाहेरून आलेल्या पर्यटकांनी मुद्दाम भेट देवून पाहण्याची गोष्ट आहे अशी पुणेकरांची पक्की धारणा आहे. एखादा पुणेकर तुम्हाला विचारेल ' का हो कधी टिळक स्मारकला गेलायत का' यावर समोरचा विचार करू लागतो 'हो गेलोय अमुक तमुक नाटके पाहिली आहेत'. यावर मुरलेला पुणेकर म्हणेल 'ते सोडा हो पण टिळकच्या गेटपाशी आइस्क्रीम(सॉफ्टी) मिळते ते खाल्लय का कधी' आता टिळक स्मारकला नाटक पाहायला जायचे एवढा माफक विचार करणार्‍याची विकेट पडलेली असते. असे कुठल्यातरी अतिसूक्ष्म गोष्टीचे आख्यान लावून इतरांना कॉम्प्लेक्स देणे हा पुणेकरांचा साइड बिझिनेस आहे. बालगंधर्व हे नाव ऐकल्यावर आपल्याला नारायणराव राजहंस आठवतील. त्यांच्या नावाचे रंगमंदिर आठवेल. पण पुणेकर तुम्हाला विचारेल 'बालगंधर्वचा बटाटेवडा खाल्लाय कधी' यावर नवीन माणूस नाही म्हटला की पुणेकराच्या चेहेर्‍यावर आनंद तरळतो. मग पुणेकरांचा पुढचा प्रश्न ठरलेला ' काय सांगताय बालगंधर्वचा बटाटेवडा खाल्ला नाही ? किती वर्षे राहताय पुण्यात ? पुण्याचे नागरीकत्व मिळायला टिळकचं आइस्क्रीम, बालगंधर्वचा बटाटेवडा या गोष्टी आवश्यक असाव्यात. सिंहगड हादेखील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध नसून ते कांदाभजी खाण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे 'सिंहगडला गेलायत कधी मग झुणका भाकर खाल्ले की नाही' असाही प्रश्न कुणी पुणेकर तुमच्यावर भिरकवू शकतो. पुण्याच्या मध्यवर्ती भागातली एक मिसळ अशीच चर्चेत असते. आपण खानदानी पुणेकर आहोत हे दाखवण्यासाठी याचेही कौतुक करणे भाग आहे. ही मिसळ तुम्ही खाल्ली नसेल तर 'का हो मग तुम्ही पुण्यात राहून करता काय' असा प्रश्न तुम्हाला ऐकावा लागेल. असे अतिप्रचंड कौतुक ऐकून आम्हीही एकदा त्या दुकानात गेलो. रिकामा बाक पाहून बसलो. एक काका आले आणि थंडपणे म्हणाले 'सेल्फ सर्विस'. म्हणजेच बाकावर आणून कुणी देणार नाही. म्हणून पैसे भरून कुपन घेऊन ते देऊन आलो. मिसळ तयार नव्हती म्हणून पुन्हा वाट पाहत बाकावर येऊन बसलो. काही वेळाने मिसळ आली पण चमचेच नाही आणले. म्हणून विचारले 'चमचे इथेच मिळतील का त्यासाठी पुन्हा सेल्फ सर्विस ?' थंड चेहेर्‍याचे काका जोक समजल्यासारखे हसले. पुढे थंड चेहेर्‍याची आणि दरपत्रकाची धास्ती घेऊन दुकानाची पायरी चढलो नाही. नंतर घरीच मिसळीचा बेत केला तेव्हा लक्षात आले 'आमची बायको घरी करते तीच जगातली बेष्ट मिसळ' ती खाताना थंड चेहेर्‍याच्या काकांची फार आठवण आली. वाटले त्यांनाही मिसळ खायला बोलवावे. त्यांना तरी अशी मिसळ कधी मिळणार ? खाण्यापिण्याचे फक्त आपणच काय ते शौकीन अशा आविर्भावात पुणेकर बाता करतात. त्यामुळे पुण्यात राहून दुर्गाची कोल्डकॉफी न पिणे म्हणजे अपराधच. बरं त्याऐवजी चूकून दुसरी कोल्डकॉफी पिणे हा तर अधर्मच समजला जातो. असेच कौतुक काका हलवाईंच्या बासुंदीचे आणि जोशींच्या सुरळीच्या वड्यांचेसुद्धा ऐकायला मिळेल. काकांचे कौतुक करताना आपणच काकांचे खरे पुतणे अशा थाटात पुणेकर भांडतात. चितळ्यांच्या बाकरवडीचा मात्र यात सर्वात वरचा नंबर लागतो. बाकरवडी चितळ्यांच्या कोथरूडच्या किंवा डेक्कनच्या दुकानातून आणली असे सांगाल तर पुणेकर तुमच्याकडे 'किती रे हा अज्ञानी' अशा नजरेने पाहील आणि मग आपलं नेमकं काय चूकलं हे तुम्हाला कळणार नाही. बाकरवडी अशी दोन मिनिटात जाऊन आणण्याची गोष्टच नाही. चितळ्यांच्या बाजीराव रोडच्या दुकानात जाऊन २ तास रांगेत उभे राहून बाकरवडी आणली तर त्याचे खरे माहात्म्य. बरं तिथेही झटकन नंबर लागला तरी 'आज चितळ्यांच्या दुकानात काय गर्दी, चांगला दोन तास रांगेत उभा राहीलो आणि आणली बाकरवडी' हे ऐकवता आले पाहीजे. 'चितळ्यांची बाकरवडी अशक्य असते' या शब्दात कौतुक ऐकल्यावर नवीन पुणेकर चमकतो. म्हणजे काय ती खाणे अशक्य असते काय ? पण कौतुक करताना पुणेकर कोणते शब्द वापरेल ते सांगता येत नाही. त्या शब्दाचा सामान्य मराठीतला अर्थ एक आणि पुणेरी मराठीत दुसराच असण्याची शक्यता असते. बाकरवडी साता समुद्रापार पोचली ती तिच्या अंगभूत गुणापेक्षा लोकांनी तिच्यावर लिहिलेल्या निबंधामुळे. पुण्यातला माणूस पुण्याबाहेर मद्रास, कलकत्ता, बंगलोर, लंडन, न्यू जर्सी अशा कुठेही गेला तरी तिथल्या लोकांना 'इथे चितळ्यांची बाकरवडी कुठे मिळते' असे विचारल्याशिवाय राहात नाही. विचारण्याचा भावार्थ बाकरवडीशिवाय तुम्ही जगूच कसे काय शकता ? एकूण काय तर पुणेकर होण्यासाठी प्रत्यक्ष खाल्ले पाहीजेच ही सक्ती नाही पण शाब्दिक कौतुकाचा मारा करता आला पाहिजे. कौतुकाच्या मेल्स खरडता आल्या पाहिजेत. एरवी दुर्वांकुरचा दर खिशाला परवडला नाही तरी फिकीर नको.

वाचने 21455
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

असाच पांचटपणा एकदा एक कोल्हापूरकरांचा राँग नंबरचा फोन भर दुपारी पुणेकराला लागतो .. कोल्हापूरकर : अहो देशपांडे आहेत का ? पुणेकर ( चिडून) :देशपांडे गेले आहेत पावन खिंडीत.. कोल्हापूरकर : त्यांना सांगा , राजे गडावर पोचलेत ..आता घरी जावा !!

कालच याच छापाच्या 'प्रेमळ' वादात ऐकलेली वाक्ये, माणसाने पुणेरी असावे, कोल्हापुरी तर चप्पल पण असते ;) किंवा, माणसाने पुणेरी असावे, सोलापुरी तर चादर पण असते वगैरे वगैरे....

नर्मदेतल्या गोट्यालाही काही सूक्ष्म गोष्टी जाणवून गडगडत गेले आहेत .पण ते मुळा मुठातल्यांना अजिबात आवडलेले दिसत नाही .कुल्हापुरच्या पंचगंगेतूनही आबूराव -बाबूरावछाप गडगडाट झाला .अवधुत आणि सुरेशजींना तर कुल्हापुरच्या आठवणींनी सारख्या उचक्या लागत असतात .परवा मुलाखतकार सुधीर गाडगीळांचा सत्कार झाला त्यावेळी त्यानींही सांगितले 'पुणेकर सर्व गोष्टींचे कौतुक करतात म्हणून सर्वाँनाच आवडतात' ( प्रचंड टाळ्या ) .पुणेकरांनी अमृततुल्य ,मस्तानी ,मिसळ ,बाकरवडी याची परंपरा कायम ठेवावी त्याची कैलाश लस्सी,चौपाटी भेळ ,अथवा चाट करू नये .पर्वती ,शनिवारवाडा ,तुळशीबाग आणि लक्ष्मीरोड(दादर आणि मालाड मार्केटपेक्षा भाऽरी आहेत ) ,डेक्कन बद्दल त्यांना रास्त आदर आहे .१९७० नंतर स्थानिक वैविध्य कमी होत चालले आणि एकसारखे मॉल्स ,पंजाबी डिशेस येऊन भारतातल्या शहरांचा चेहरा हरवला आहे .

In reply to by कंजूस

गाडगीळछाप पुणेरी अभिमानाबद्दल न बोललेलंच बरं त्यांना पुण्याचा अभिमान नसून इतर जगाबद्दल अज्ञान आहे

पुण्याचे पुनेपण हाळुहळू लोपत चालले आहे. हिंजवडी ला हिंजेवाडी आणि पुण्याला पूना म्हणणार्‍या उत्तरभारतीयांचे प्रस्थ इथे वाढत आहे. पुण्यात काही वर्षानी कानपूर लखनौ प्रमाणे भिंतीभिंतींवर " पेट गैस और सैक्स की दवाईया उपलब्द " अशा झैराती दिसायला लागतील आणि सदाशिव पेठ रविवार पेठ या ऐवजी सदाशिव पुरा रविवार गंज असे ऐकायला मिळेल. असे वातावर्ण आहे

असे कुठल्यातरी अतिसूक्ष्म गोष्टीचे आख्यान लावून इतरांना कॉम्प्लेक्स देणे हा पुणेकरांचा साइड बिझिनेस आहे.
ह्या वाक्याशी एकदम सहमत.... १९८८ साली पुण्यात आल्यावर हा प्रकार प्रकर्षाने जाणवला.

श्री गोटा रावांना बौद्धीकदृष्ट्या आव्हान देणारी अजून एक बातमी दिसली. शोधून शोधून हा धागा वरती आणतोय ……………………एक दोन साडे माडे तीन ……………

एक प्रवासी ट्रेन मधून प्रवास करत असतांना, रात्री एका स्टेशनवर जाग आल्यावर बाहेरील एकास विचारतो की कोणते स्टेशन आले ? " शिंच्या डोळे फुट्लेत का ? वाचता येत नाहि का? " उत्तर आले. प्रवासी उद्दगारतो " हं! पुणे आले वाटतं "

नकारात्मक भाषेत असला म्हणून काय झाले? पुण्याची व पुणेकरांची महती आणि माहिती देणारा लेख खासच आहे. बाहेरून पुण्यात येणाऱ्या माणसाने पुण्यात पाय टाकता टाकता नक्कीच वाचावा या साठी स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन वर मोठ्या फ्लेक्सवर लिहून लटकावला पाहिजे! कळत नकळत ब्रांड वेल्यू वाढविण्यासाठी उपयुक्त असा हा लेख लिहून आपण आपले मार्केटिंग चे कसब समोर आणल्याबद्दल धन्यवाद. ता.क. भारताच्या branding साठी मोदींना आपल्यासारख्या तज्ञाची/विचारवंताची गरज आहे.हे गुणविशेष कसे वाढविता येतील याबाबत अधिक मेहनत घेतली तर नक्कीच फायदा होईल.

>> ता.क. भारताच्या branding साठी मोदींना आपल्यासारख्या तज्ञाची/विचारवंताची गरज आहे.हे गुणविशेष कसे वाढविता येतील याबाबत अधिक मेहनत घेतली तर नक्कीच फायदा होईल. ही गोष्ट तुम्ही चेष्टेनी लिहीली असली तरी खरी आहे... ही विचारणा झाली होती पण...

In reply to by नर्मदेतला गोटा

अहो मी काहीच चेष्टेने लिहीत नाही.(नाहीतर स्म्यायल्या टाकल्या असते की!) हे गुणविशेष कसे वाढविता येतील याबाबत अधिक मेहनत घेतली तर नक्कीच फायदा होईल. कल्याण होईल हो तुमचे!

In reply to by आयुर्हित

नर्मदेचा गोटा..... सुन्दर चित्रण केलेत.. पुण्याचे!!!.. चितळेंच्या बाकरवडीचे आणि ती घेतानाचे अगदी हुबेहूब वर्णन!!!!! :)
या कौतुकात शनिवारवाडा, लालमहाल असलाच पाहिजे असे नाही. किंबहुना खरा पुणेकर शनिवारवाडा आतून पाहातच नाही. शनिवारवाडा ही पुण्याबाहेरून आलेल्या पर्यटकांनी मुद्दाम भेट देवून पाहण्याची गोष्ट आहे अशी पुणेकरांची पक्की धारणा आहे.
खरा पुणेकर शनवारवाडा पाहतच नाही... हे पटले नाही. शनवारवाडा ही पर्यटकांना दाखवायची "वास्तु" असली, तरी साधारण १९९५ च्या अलीकडेपर्यन्त शनवारवाडा आतून बघणे.. हे सर्वांसाठी फुकट होते. आतमधल्या गवताची / हिरवळीची दर १५ दिवसांनी कापणी व्हायची...आम्ही बर्‍याचदा शनवारवाड्यावर खेळावयास जात असू... अर्थात तेव्हा "आताइतकी" गर्दी नक्कीच नसायची. आणि शनवारवाड्याचा वॉचमन-अन्कलही बर्‍यापैकी ओळखीचा असायचा... आतमधल्या सुन्दर बागेमध्ये काहीजण अभ्यासाला यायचे. कपल्स आत जास्त येत नसत.. किम्बहुना वॉचमन त्यांना जास्त एन्टर्टेन करीत नसे. त्यामुळे बर्‍यापैकी कपल्स हे संध्याकाळपासून सारसबागेच्या कोपर्याशी किंवा मग गंधर्व पूल- दोन्ही साईडचे फुटपाथ आणि मधला डिव्हायडर- निम्मा अडवून त्यांची हौस पुरी करत असत. (अजूनही करतात...) (नर्मदेचा गोटा- आपण सारसबागेचा आणि आमच्या तळ्यातल्या गणपतीचा साधा उल्लेखही केला नाहीत की!!!! :) खास पेशव्यांचा आवडता गणपती आहे तो!!! ) त्याचबरोबर आमच्या पुण्याची "मस्तानी" ज्याने खाल्ली नाही.... त्याने पुणे काय पाहिले!?! पुण्याच्या दगडूशेठ'ला लांबलांबचे लोक्स नवस बोलतात... आणि दर्शनासाठी येत राहतात.... आणि सगळ्यांत महत्वाची म्हणजे आमच्या पुण्यातली युनिक- "तुळशीबाग".... सुन्दर रामाचे मन्दीर.. आणि जगात कुठेही होणार नाही.. असं बार्गेनिग!!! आणि बायकांना, मुलींना लागणार्‍या सगळ्या वस्तू!!... :) पूर्वी म्हणजे आमच्या वडिलांच्या लहानपणी पुण्याला तित्कासा "सेलेब्रिटी फीवर" नव्हता... तेव्हा आचार्य अत्रे यांना लोक मुद्दाम आपल्या घरच्या फंक्शनला बोलवायचे.. लग्न-मुंज इ. कार्यक्रमांना आचार्य अत्रेंना खास निमन्त्रण असायचे. सुप्रसिद्ध गायिका- हिराबाई बडोदेकरांचे गाण्याचे कार्यक्रम गणपतीच्या दिवसांमध्ये- रात्री (प्लीज डोन्ट फील अ‍ॅज रा.गा. ;) ) भर रस्त्यात व्हायचे..... आणि लोक देखील त्यांना पाहायला आणि ऐकायला भरगच्च जमायचे... पुण्याच्या गणपती उत्सवाबद्दल तर नव्याने कुणाला सांगायलाच नको!!... नाटकप्रेमींसाठी टिळक'बरोबरच "भरत"ही तितकंच प्रिय!!.. किम्बहुना.. पुरुषोत्तम'साठी तर-- केवळ भरत आणि भरतच!!!. आणि अतिउच्च अभिरुची असणार्‍यांसाठी शनवारातलं- सुदर्शन कला मंच!!!! :) प्रथम येणार्‍यास प्रथम प्रवेश!!!! :) सुबोध भावे पुण्याचा.. प्रसाद ओक पुण्याचा...सिद्धार्थ चांदेकर पुण्याचा.. सोनाली कुलकर्णी'ज पुण्याच्या, पु.ल. "शेवटी" पुण्याचेच!... खूप गोष्टी आहेत.. पुण्यामध्ये.. जितक्या बोलाव्यात.. तितक्या कमीच्च!!! ...

आमच्याकडे डोंबिवलीमध्ये पण 'मुनमुन' ची मिसळ फ़ेमस आहे……………। अस काही लोक म्हणतात. ९९% डोम्बिवालीकरांना मुनमुन सेन आंघोळ कुठे करते ते माहित असेल पण या मिसळच्या दुकानाचा पत्ता सांगता येणार नाही.

ह्याच पुण्याबद्दल पुलं नी दोन ओळी लिहून ठेवल्या आहेत " मी रहातो पुण्यात , म्हणजे विद्वत्तेच्या ' ठाण्यात ' ! " आता ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे , हे मला वाटतं , पुणेकर सोडून सर्वांना माहित असेल ! !

In reply to by जयन्त बा शिम्पि

कृपामाईला जाउन आलात काय ? प्रत्येक भागात वेगळे असते . असो मुंबैकरांना डबक्याबाहेरचा काहीही माहित नसता

तो मनोजकुमार जर पुण्याचा असता तर! पुणं बॉलिवुड मधे पण फेमस झालं असतं. 'मेरे पुणेकी मिसळ, उगले उसळ' असली गाणी घरोघरी पोचली असती.

In reply to by तिमा

तिमा =))

१०० वा प्रतिसाद. ही संधी मज पामरास दिल्याबद्दल लेखकाचे कोरांटकीच्या फुलांचा पुस्प्गुच्, एक सदाशिवपेठी दुकानाची शॉपिंग कुपन्स तसचं शालजोडी देउन सत्कार करण्यात येत आहे. लेखकाचा पुण्यास असलेला विरोध लक्षात घेता पिंपरी चिंचवड व पुण्याच्या मध्यावर असणार्‍या सुप्रसिद्ध हॅरिस ब्रिजवर सत्कार समारंभ आयोजित करणेत येईल. फोटु चे ५० रुपये वेगळे पडतील तसचं दुपारी एक ते चार मधल्या फोटो काढायला २०० रुपये जास्तं पडतील. धन्यवाद.

In reply to by तिमा

=))