आरपार घुसलेलं असं काही......

सविता००१'s picture
सविता००१ in विशेष
8 Mar 2015 - 1:55 am
महिला दिन

दहावीची सुट्टी लागलेली शाळेला. नुसतं हुंदडणं चालू होत. खरं तर मी आणि माझी एक मैत्रीणच काय त्या राहिलो होतो पुण्यात. बाकी सगळ्या गुल. कुणी गावाला, कुणी कुठे तर कुणी कुठे.

मग आम्ही दोघींनी ठरवलं, संध्याकाळ झाली की जायचंच फिरायला. मग हे लांब लांब कुठेही जायचो. ४ वाजता निघायचं आणि ७ वाजता परत यायचं. मस्तच. दररोज नवीन रस्ते घ्यायचे. शिवाय पुण्यात घरसुद्धा अशा सुरेख ठिकाणी की एकीकडून हनुमान टेकडी, (एफ. सी. ची टेकडी ), एकीकडून वेताळ टेकडी, एकीकडून चतु:श्रुंगी आणि राहिलेल्या बाजूने गावात जायला हमरस्ता. त्यामुळे फिरायला जायचं तरी कुठे हा प्रश्न कधीच पडला नाही. उंडारत असायचो दररोज. बरं मैत्रीणपण अगदी जीवाभावाची. त्यामुळे काहीही नॉन्सेन्स कितीही वेळ बोलू शकायचो. घरचे थकून जायचे ऐकून पण आमच्या गप्पा तेवढ्याच हिरीरीने चालू.

तर अशाच एका भर मी महिन्यातल्या संध्याकाळी (खरं तर दुपारी ) निघालो दोघी. छापा काटा केला आज कुठे जायचं म्हणून आणि काट्याच ऐकून निघालो वेताळ टेकडीकडे. आता सगळा रस्ता आमच्या दोघींचाच. भर दुपारी येतंय कोण मरायला टेकाडावर? आमच्यासारखं वेडं दुसरं कुणीच नाही. गप्पा हाणता हाणता पहिली टेकडी पार केली. मग तिथून डायरेक्ट चतु:श्रुंगीच्या टेकडीवरपण जाता येतं. तसं जायचं ठरलं. गेलो पुढे. भर दुपार. सगळीकडे इतका प्रखर उजेड, सगळ्या झाडांचे फराटे झालेले. सावली नामक प्रकारच नाही. नुसतं लखलखणारं सोनेरी ऊन. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत डोळे दिपून जातील इतका प्रखर प्रकाश. माहीत आहे? अशा भक्क सोनेरी प्रकाशाचंसुद्धा एक आगळं सौंदर्य असतं. वर्णन काय करणार? आपल्याकडे तेवढी प्रतिभा नसतेच कधी. नुसतं पाहायचं आणि साठवायचं मनात. जिकडे बघू तिकडे नुसतं सोनं. चमचमणारे गवताचे गुलाबी तुरे, पिवळं पडलेलं गवत, काड्या झालेली झाडं, खाली प्रचंड तापलेला काळा पहाड आणि हाश्श हुश्श करत चाललेल्या आम्ही. मग अर्ध्या तासाने दमून आम्ही एका दगडावर मारली बैठक आणि गप्पाष्टक चालू. किती वेळ गेला कोण जाणे.

जेव्हा बाजूने जाणारे एक आजोबा म्हणाले - मुलींनो, पाऊस येणारे अस वाटतंय. घरी जा बघू. आम्ही नाक उडवून हो म्हणालो आणि थांबलो तिथेच. आम्हीच हुशार ना. जरा वेळ गेला आणि अक्षरशः निमिषार्धात आभाळ काळं कुट्ट! आम्ही मोहितच झालो. अरे—आकाशाकडे पाहिलंच नाही किती वेळ. तो सोनेरी प्रकाश, तो सूर्य गेला कुठे? आकाशामधलं ते काळ्या ढगांचं इकडून तिकडे जोरात जाणं पहिल्यांदाच पाहत होतो. तेवढ्यात वादळाला सुरुवात झाली. जोरात चक्राकार वावटळी उठू लागल्या. आम्ही अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन हे सार पाहत होतो. डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून डोळे किलकिले करून. एका मिनिटात इतके जोरजोरात पावसाचे मोठ्ठाले थेंब पडायला लागले की बस. पाऊस तर आवडीचा. मग घरी कशाला जायचं? नव्हे, असलं काही आठवलंच नाही. गार्‍या गार्‍या भिंगार्‍या वगैरे लहान मुलांचे खेळ सुद्धा आम्ही दोघींनीच खेळले. तिथेच वर! कुण्णी कुण्णी नव्हतं.

तेवढ्यात विजांचा खेळ चालू झाला. भीषण आवाज, कडकडाट चालू झाला. धावत सुटलो असतो तरी अर्ध्या तासात घरात पोचलो असतो. पण सुचलंच नाही. खूप सुरेख काहीतरी समोर दिसत होतं. पण आसरा नव्हताच कुठे. विजांची जाम भीती वाटायला लागली. आई आठवली. पौर्णिमाने रडायला सुरुवात केली. आता मला घाबरायचा चान्सच नव्हता. मी सांगतेय तिला. आत्ता जाईल पाऊस. आपल्याला आवडतो ना? मग रडते काय? हे म्हणताना मी पण रडवेली. पाहता पाहता पावसाचा जोर भयाण वाढला. एका क्षणी इतका झाला की मी आणि पौर्णिमा – आम्हाला दोघींना जाणवत होत आपले हात गुंफलेले आहेत पण आपण बघूही शकत नाही आहोत एकमेकींना. इतकं तर कधीच घाबरलो नव्हतो. पाऊस कसला? सटासट चाबकाचे फटकारे बसत होते. चेहऱ्यावर इतके तडातड थेंब पडत होते की चेहरा दुखायला लागला. आडवा तिडवा पाऊस आम्हाला झोडपून काढत होता. काही दिसत नव्हतं. आता आपल्या अंगावर वीज पडली तर?????? बापरे! या पौर्णीलासुद्धा कधीही काहीही आठवत. मी किंचाळले- काही होत नाही. इतक्या पावसात वीज नाही पडत. तू काहीही बोलू नकोस गं. ती बिचारी गप बसली.

दहा मिनिटांचा खेळ. पण पार धुव्वा उडवला त्यानं आमचा. थोडा ओसरला तो. समोर पाहिलं तर काय? सगळं स्वच्छ, धुतलेलं, सुंदर. सगळी झाड त्यांच्या फांद्या आकाशाकडे उंचावून पाहत होती. ये रे अजून, बरस असाच. दे जीवन दान असं जणू म्हणत होती. दूर क्षितिजावर इंद्रधनू फुललेलं. आहा ........ भान हरपणे म्हणजे काय ते तिथे कळलं. आणि आपण किती क्षुद्र आहोत या महाशक्तीपुढे हे पण तेव्हाच कळलं. एकाच दिवशी अशी दोन सुरेख रूप त्या दिवशी अनुभवली. फक्त नतमस्तक झालो. हा शब्द माहीत नसताना.

काही न बोलता घसरणार नाही याची काळजी घेत घराकडे जायला वळलो. आता परत कंठ फुटला आम्हाला. कित्ती पाऊस होता ना गं? कसं आपण दोघीच होतो तरी घाबरलो नाही पासून खूप घाबरलो, आता घरी गेल्यावर काय होणार? आजीला, आईला भिजून घरी आलेलं चालत नाही. आता? वगैरे गहन विचारांमध्ये आलो घरापर्यंत. येतानाच ठरवून आलो की माझ्या घरी कसं वातावरण आहे ते पाहू आणि मग पौर्णीला सोडू तिच्या घरी.

आलो बुवा घराच्या अंगणात. पाहिलं तर माझी आई, पौर्णीची आई अंगणात. आता या ओरडणार या तयारीत होतो आम्ही... पाहिलं त्या दोघींकडे तर काय, दुसरा तेवढाच जोरदार पाऊस त्या दोघींच्या डोळ्यांत, तेवढाच सुंदर........
जोरात पळत जाऊन आधी आईच्या कुशीत शिरले. आणि अग आम्ही येणारच होतो तेवढ्यात खूप जोरात पाऊस सुरू झाला वगैरे सांगणार तेवढ्यात आईने तिची लाडाची टप्पल मारली, येडू, गप्प बैस आता. त्रास आहात तुम्ही मुली म्हणजे.. असं म्हणाली. आम्ही दोघींनी पाहिलं तर काय? दुसरा पाऊस सरसरत दोघींच्या गालावर उतरलेला.
अजून कळत नाही कुठला पाऊस जास्त आवडलेला?
-सविता००१

प्रतिक्रिया

मनिमौ's picture

8 Mar 2015 - 1:42 pm | मनिमौ

अगदी आला आला वारा संगे पावसाच्या धारा हे गाणं आठवल

अंतरा आनंद's picture

8 Mar 2015 - 2:53 pm | अंतरा आनंद

क्या बात है. वाचून हेच ताबडतोब आलं मनात. सुंदर शैली त्यामुळे साधा अनुभव सुद्धा वेगळाच वाटतोय.

मधुरा देशपांडे's picture

8 Mar 2015 - 3:48 pm | मधुरा देशपांडे

सुरेख लिहिलंय. सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.

भिंगरी's picture

8 Mar 2015 - 4:28 pm | भिंगरी

अगदी बालपणीची मैत्रीण गवसल्यासरखं वाटलं.

अगदी सहज सोप्या भाषेत किती आशयपुर्ण लिहिलेस ग ,मस्त !
सगळ्यानी अनुभवाव अस निसर्गाच देण न मायेचा पाउस :)

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 3:45 am | स्पंदना

पाऊस पहिला, जणू सानुला
बरसून गेला
बरसून गेला....

सवे!! रडवलंस सकाळी सकाळी!!
अशी आई तुला मिळाली यातच सगळ आलं बघ रे वेड्या पाखरां!!

घन अाज बरसे मनावर हो!अशी अवस्था ही!पाऊस किती जणांना किती वेगवेगळे गहिरे अनुभव देऊन जातो ना!

सस्नेह's picture

9 Mar 2015 - 4:02 pm | सस्नेह

अन हळवं करणारं लेखन !
सव्या मस्त जमलय !

प्राची अश्विनी's picture

11 Mar 2015 - 11:04 am | प्राची अश्विनी

+११

प्रश्नलंका's picture

9 Mar 2015 - 4:06 pm | प्रश्नलंका

अहाहा!! किती सुंदर लिहिलय ग सवे. मनापासून आवड्ले.
ख्ररच पाऊस सगळ्यांना खूप वेगळे अनुभव देतो. :)

सगळे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले.

वा वा वा.. मस्त एकदम. वेटाळ टेकडी, हनुमान टेकडी. माझ्या घरापसुन एकदम जवळ. आम्ही पण रोज जायचो तिथे फिरायला. बर्‍याच आठवणी ताज्या झाल्या. धन्स गं. :)

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2015 - 10:12 pm | प्रीत-मोहर

सव्याभाय किती मस्त लिहिलेस ग. साध सरळ आणि मनाला भिडलेल.

खूप सुंदर लिहिलयेस. तुझा तो कोसळणारा पाऊस आमच्याही मनात अलगद उतरला.

स्वाती दिनेश's picture

10 Mar 2015 - 3:02 pm | स्वाती दिनेश

कित्ती छान लिहिलं आहे सविता..
हनुमान टेकडी,वेताळ टेकडी,फर्ग्युसन कॉलेज, लॉ कॉलेज रोड.. सगळं सगळं डोळ्यासमोर आलं.. कित्ती वर्षात गेलेच नाहीये तिकडे. एके काळी सुटीतला रोजचा उद्योग असायचा..
इशाला सांगितले तेच तुला, लिहिती रहा..
स्वाती

आरोही's picture

10 Mar 2015 - 4:10 pm | आरोही

सुरेख ,तरल ,मस्त लेख !!

सुरेख लिहिलंयस. असे अनुभव शब्दात मांडता येणं कौशल्याचंच !!!

हे वाचताना असंच अनुभवलेलं काहीबाही आठवत राहिलं.

इशा१२३'s picture

11 Mar 2015 - 2:17 pm | इशा१२३

+१
हेच म्हणणार होते.अस काहि अनुभवलेले प्रसंग इतके छान मांडता येण अवघड.खूप आवडले.

वेताळ टेकडी ऐवजी रंकाळा आणि मैत्रिणी ऐवजी मोठ्ठी बहिण येवढा बदल केला आणि मला माझीच गोष्ट वाटायला लागली ही :) आणि मग अर्ध्या रस्त्यापर्यंत चप्पल पण न घालता धावत आलेली आई आणि मग घरी पोचल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात खाल्लेली ऊन ऊन खिचडी आणि मौ मौ पांघरुणात घुसून गुडूप झोप … अहाहा … मस्त गं सविता, ऐन उन्हाळ्यात भिजवलंस बघ.

प्रियाजी's picture

13 Mar 2015 - 5:46 pm | प्रियाजी

खूप सुंदर अनुभव. लहानपणची आठवण झाली अन माझ्या डोळ्यांतही पाउस दाटून आला.

सानिकास्वप्निल's picture

13 Mar 2015 - 10:28 pm | सानिकास्वप्निल

पावसाच्या धारा येती झरझरा...
किती सुरेख लिहिले आहेस गं वाचताना आपणचं हे अनुभवले असे वाटले.

पद्मश्री चित्रे's picture

14 Mar 2015 - 11:40 am | पद्मश्री चित्रे

छोटीशी आठवण किती गोड सांगितली आहेस...मानलं!

उमा @ मिपा's picture

15 Mar 2015 - 3:24 am | उमा @ मिपा

अहाहा... किती सुरेख वर्णन!
अशा या आठवणींचा ठेवा तुझ्याकडे आहे हे केवढं मोठं भाग्य. आणि तो ठेवा इतक्या चपखल, सुंदर शब्दात तू आमच्यापर्यंत पोहोचवते आहेस त्याबद्दल तुझ्यासाठी खास सायसाखर राखून ठेवतेय गो.
हे वाचून झाल्यावर आधी जाऊन लेकीच्या गालावरून हात फिरवून आले.

मीता's picture

15 Mar 2015 - 11:25 pm | मीता

अगदी आत उतरलं ..किती तरल लिहिलंय .

मोदक's picture

16 Mar 2015 - 1:25 pm | मोदक

सुरेख लिखाण..

एकदा कोरीगडावर अचानक भेटलेला पाऊस..

.

सविता००१'s picture

16 Mar 2015 - 2:29 pm | सविता००१

मस्तच रे मोदक. धन्यू इतका छान फोटो इथे टाकल्याबद्दल. :)

इनिगोय's picture

16 Mar 2015 - 1:47 pm | इनिगोय

अफलातून वर्णन. आणि शेवटचं वाक्य तर खरोखर आरपारच घुसलं..
मस्तच गं सवे!

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 2:01 pm | कविता१९७८

छान लेखन

पैसा's picture

21 Mar 2015 - 8:07 pm | पैसा

मस्त मस्त! या भयाण उन्हाळ्यात पावसासारखं सुखद लिखाण!

नगरीनिरंजन's picture

22 Mar 2015 - 10:30 am | नगरीनिरंजन

सुरेख!

आनन्दिता's picture

22 Mar 2015 - 12:09 pm | आनन्दिता

काय सुंदर अनुभव आहे!! आता या लेखाची चव पुढचे काही तास मनात राहणार,, आणि वेळ मस्त जाणार..:)

सविता००१'s picture

25 Mar 2015 - 4:08 pm | सविता००१

सगळ्यांचेच. :)

श्रीरंग_जोशी's picture

21 Apr 2015 - 1:01 am | श्रीरंग_जोशी

सुंदर लिहिलंय. सगळं चित्र डोळ्यांपुढे उभं राहिलं.