Skip to main content

माझे पहिले रक्तदान (?)

लेखक सौन्दर्य यांनी शुक्रवार, 13/03/2015 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा ओलांडून कॉलेजमध्ये पाय ठेवला आणि जणू पंखच फुटले. शाळेतील शिस्त, तो कंपल्सरी करावा लागणारा गृहपाठ, तो युनिफॉर्म,कश्श्या कश्श्याचं मुळी बंधनच उरले नाही. त्यात आसपास विहरत असलेली फुलपाखरे बघून, “धरतीपर अगर कही स्वर्ग है, तो वो यहीं है, यहीं है, यहीं है” म्हणावेसे वाटू लागले होते. त्यातच एक, पु.लं.च्या ‘म्हैस’मध्ये वर्णन केल्यासारखी एक ‘सुबक ठेंगणी’ मनात भरायला लागली होती. आम्ही तिचे नामकरण ‘साठे’ केले होते, म्हणजे ‘साजेशी ठेंगणी’चा शॉर्टफॉर्म. ती आमच्याच वर्गात होती त्यामुळे तिच्या निमित्ताने का होईना वर्गात बसायला लागलो होतो. ती हुशार होतीच आणि त्याच बरोबर कॉलेजमध्ये फार अॅक्टिव्ह होती. कॉलेजमधल्या वेगवेगळ्या क्लब्जची ती कुठे सेक्रेटरी होती तर कुठे अध्यक्ष होती. थोडक्यात संपूर्ण कॉलेजमध्ये ती चांगलीच फेमस होती. आणि एक दिवस ‘सोशल सर्विस लीग’च्या बॅनरखाली कॉलेजमध्ये ‘रक्तदान शिबीर’ असल्याची नोटीस लागली. नेहेमीप्रमाणे ‘साठे’ ह्या क्लबची सेक्रेटरी होतीच. ‘साठे’च्या नजरेत भरण्यासाठी, मित्रांनी ही नामी संधी असल्याचे माझ्या मनावर बिंबवले. मी देखील फारसे आढेवेढे न घेता, एखाद्या शूर शिपायाप्रमाणे माझे नाव रक्तदानासाठी नोंदवले. त्यावेळेचे माझे वजन बघता, रक्तदान करताना मला दुसर्या हातातून रक्त घ्यावे लागेल अशी देखील प्रतिक्रिया उमटली, त्यावर “आपण ‘साठे’लाच तुला रक्त द्यायला लावू” असा सल्ला माझ्या प्रेमळ मित्रांनी मला दिला. माझ्या डोळ्यासमोर देखील हिंदी सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे मी आणि ‘साठे’ बाजूबाजूच्या बेड्सवर झोपलोय, माझ्या एका हातातून रक्त घेतलं जातंय आणि दुसर्या हातातून, ‘साठे’च्या हातातलं रक्त माझ्या शरीरात प्रवेश करतंय, असं दृश्य दिसू लागले आणि उगाचच गुदगुल्या होऊ लागल्या. शेवटी रक्तदानाचा दिवस उजाडला. चांगले हिरोसारखे कपडे घालून कॉलेजला पोहोचलो. हळूहळू सर्व मित्र जमले. सेंट जॉर्ज हॉस्पिटलची एक अँब्युलन्स कॉलेजच्या आवारात उभी होती, पांढर्या शुभ्र पोशाखातील काही सिस्टर्स लगबगीने अँब्युलन्समधून सामान आत नेत होत्या. जिमखान्यात रक्तदानाची सोय केली होती. तिथेच फोल्डिंग बेड्स, पांढर्या शुभ्र चादरी घालून ओळीने रचल्या होत्या. हॉलच्या बरोबर मध्ये हिरव्या रंगाची सरकती पार्टिशनस उभी केली होती, त्याच्या पलीकडच्या बाजूला मुलींचे रक्तदान होणार होते. आम्ही, इतर रक्तदान न करणाऱ्या मुलांकडे तुच्छतेने बघत, छाती पुढे काढून, “कर चले हम फिदा जाने तन साथीयों”च्या अविर्भावात जिममध्ये पोहोचलो. जिमच्या दारातच ‘साठे’ उभी होती, तिने (पहिल्यांदाच) हसून आमचे स्वागत केले. आम्ही नावे तर आधीच नोंदवली होती, आता आमची वजने घेतली गेली, ब्लड प्रेशर चेक केले गेले, आणि एका फॉर्मवर सही घेतली गेली. छातीवर लावायला एक बॅज दिला आणि रक्तदान केल्यावर, श्रमपरिहार म्हणून कँटीनचे एक एक कुपन दिले. ह्या कुपनवर एक वडासांबार आणि चहा फुकट मिळणार होता. जिममधल्या बेड्सवर आधीचे रक्तदाते, रक्तदान करत होते म्हणून आम्हाला आणि इतर काही मुला-मुलींना जिमच्या समोरच्या वर्गात,बोलावणे येईपर्यंत बसायला सांगितले. थोडावेळ त्या रुममध्ये बसून आम्हाला कंटाळा आला म्हणून आम्ही सर्व मित्र तेथून बाहेर पडलो आणि कॉलेजच्या समोरील कट्ट्यावर बसून टिवल्या-बावल्या करीत बसून राहिलो. तिथे बसून बसून कंटाळा आला म्हणून पावले कँटीनकडे वळली. खिशात फुकट मिळालेले कुपन होतेच, लगेच वडासांबार-चहाच्या ऑर्डरी सुटल्या. गरम गरम वडासांबार, त्यावर दोन तीनदा मागून घेतलेल्या फुकट सांबार-चटण्या आणि वर गरमा गरम चहा रिचवल्यावर तरतरी आली. थोडा वेळ कँटीनमध्ये टाईमपास करून बाहेर आलो, तर बघतो तो काय ? हॉस्पिटलतर्फे आलेल्या त्या सिस्टर्स सामान आणून अँब्युलन्समध्ये रचत होत्या. फोल्डिंग बेड्स, हिरवी पार्टिशन्स देखील रचली जात होती. अरेच्चा, म्हणजे रक्तदान आटोपले होते वाटते ? आणि आपण तर अजून रक्तदान केले देखील नाही, म्हणजे खूपच वेळ आम्ही वाया घालवला होता तर ? आम्ही धावतच जिमखान्याच्या दिशेला निघालो, इतक्यात समोरून कॉलेजच्या ऑफिसमधला शिपाई कोणाला तरी शोधत येताना दिसला. त्याला तसे शोधताना बघून छात्तीत आणखीनच धडकी भरली. आमच्या छातीवरचे बॅज बघताच त्याने ओरडून विचारले, “खून दिया ?” त्याचे ते “खून दिया?” हे ओरडून विचारणे घाबरल्यामुळे कि काय कोण जाणे पण, “खून किया ?” सारखे ऐकू येऊ लागले. आम्ही “नाही” म्हणताच, “चलो, प्रोफेसरसाब बुलाते है” म्हणत, आमची वरात जिमखान्याकडे नेली. वाटेत भेटणारे इतर मुले मुली, आमच्या छातीवरचे बॅज, चेहर्यावरचे अपराधी भाव, आणि पुढे चाललेला शिपाई बघून, आमच्याकडे बघून हसू लागली, कमेंट्स करू लागली. आता निदान जिमखान्यात 'साठे' तरी हजर नसावी अशी मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करू लागलो, पण देव बहुतेक निद्रिस्त होता. जिमखान्यात पोहोचताच, ‘सोशल सर्विस लीगचे’ प्रोफेसर आमच्यावर खवळले. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या ब्लड बँकेत, अमुक एक बाटल्या रक्त गोळा केले जाईल अशी त्यांनी कमीटमेंट दिली होती. आवश्यक तेव्हढ्या मुलांचे रक्तदानासाठी रजिस्ट्रेशन झाल्यावर इतर मुलांना नाकारण्यात आले होते, त्यात आम्ही जवळ जवळ सहा-सात मुले हजर न झाल्यामुळे टार्गेट थोडक्यासाठी हुकले होते, त्यामुळे त्यांच्या रागाला पारावर उरला नव्हता. सगळ्या मुलांसमोर, इन्क्लुडिंग ‘साठे’, त्यांनी तोंडाला येईल ते बोलायला सुरवात केली. आम्ही मान खाली घालून मुकाट्याने त्यांचा उद्रेक ऐकून घेतला. आणि प्रतिउत्तर देणार तरी कोणत्या तोंडाने ? आधीच चूक झालेली त्यात तेव्हढ्या तोडीचं इंग्रजी आमच्यापैकी कोणालाच येत नव्हते त्यामुळे तोंड उघडण्यापेक्षा ‘झाकली मुठ’च जास्त बरी होती. एव्हढ्यात त्यांचे लक्ष आमच्या छातीवरच्या बॅजेसकडे गेले आणि एखाद्या मिलिटरीतल्या सैनिकाच्या चुकीवर, त्याच्या छातीवरची बिल्ले, पदके ओरबाडून काढण्यात यावीत, त्या आवेशात त्यांनी आमचे बॅजेस ओढून काढले. “व्हेर आर द कुपन्स ?” त्या परिस्थिती देखील त्यांना ती कुपन्स बरी आठवली ! “वुई एट वडासांबार” आमच्यापैकी एक. ते उत्तर ऐकून सगळीकडे हशां पसरला. “व्हाट ? यु शेमलेस क्रीचर्स. यु नेव्हर डोनेटेड सिंगल ड्रोप ऑफ ब्लड अँड टॉप ऑफ इट, वेन्ट अँड एन्जोयड फ्री फूड ?” “अँड टी सर” – बघ्यांपैकी कुणीतरी आणखी ठिणगी टाकली. पुन्हा हशां. “शट अप” सर कडाडले. “नाऊ गिव्ह मी युवर आय-कार्ड्स. इच वन ऑफ यु, विल डिपॉझिट रुपीज टेन इन द ऑफिस, देन ओन्ली यु विल गेट युवर कार्ड्स बॅक” बाजूला तो शिपाई होताच, त्याच्या हातात आय कार्ड्स काढून देताना तो देखील तुच्छतेने आमच्याकडे बघत पुटपुटला, “काय साली मानसां आसतात येकेक !". आय कार्ड्स देऊन आम्ही खालच्या मानेने आणखी शोभा व्हायच्या आत तेथून काढता पाय घेतला. त्याच्या प्रत्येक पुढच्या वर्षी आम्ही सगळ्यांनी, अगदी लाईन लावून रक्तदान केले तरी देखील पहिल्या वर्षीच्या, पहिल्या रक्तदानात जी लाज गेली ती पुढच्या अनेक बाटल्या रक्ताने देखील भरून आली नाही. त्यानंतर वर्गात, ‘साठे’कडे बघताना, रक्ताने कधीच उसळी घेतली नाही, हे वेगळी सांगणे न लगे.
लेखनविषय:

वाचने 4308
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

शेवटचा प्रोफेसराच्या समोरचा सीन तर खतरनाक........ मज्जा आली.

मस्त किस्सा शेवटचा प्रसंग (स्वानुभव असल्याने) जिवंत झाला

अनुभवकथन आवडले. या निमित्ताने माझेही अनुभव आठवले. प्रथम वर्षाला असताना माझ्याबाबतीतही सहाध्यायांकडून तू एक बाटली रक्त दान केल्यास दोन बाटल्या रक्त तुलाच चढवावे लागेल असले शेरे मिळत होते. सुदैवाने किमान वजनाच्या (बहुधा ५० किग्रॅ) पेक्षा वजन १/२ किलोने अधिक भरले अन शेवटच्या क्षणी होणारी नामुष्की टळली. बाकी महाविद्यालयीन शिक्षणाची सहाही वर्षे रक्तदान केल्यावर अधिक दुध असलेली कॉफी अन दुकानात न मिळणारे ग्लुकोज बिस्किट मिळत असत. तुमच्यासारखे अगोदरच कुपन मिळत नसे.

In reply to by श्रीरंग_जोशी

असेच माझेही वजन पहिल्या रक्तदानाच्यावेळी बरे भरल्याने पुण्यकर्म केले, कॉफी पिऊन घरी येताना वाटेत चक्कर आली. मग उन्हातून गाडी बाजूला आणून थांबले तर ते एका उपहारगृहाचे दार होते. मग काय आधी आत जाऊन पेटपूजा केली व घरी आले. नंतर कधी रक्तदान केले की नाही ते आठवत नाही.

आवडला.. हा हा,, :) :)

आमच्या कॉलेज चे संस्थापक "शंकर" नाव असलेले गृहस्थ होते त्यांचे सुटसुटीत नाव पोरांनी "शैंकी" केले होते!! त्यांच्या दर पुण्यतिथीला "चला रे शैंकी ला बर्थडे गिफ्ट देऊ" म्हणुन आम्ही जात असू! मजा आली वाचुन

अमराठी मित्रांना हिदींत वाचुन दाखवला लेख :-)