✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आमच्या विवाहाची कहाणी - २

स
सुबोध खरे यांनी
Fri, 03/06/2015 - 20:08  ·  लेख
लेख
दहा जुलै ला घरी यायचे होते त्या अगोदर दोन आठवडे एक मध्यम वयीन सदगृहस्थ संध्याकाळी माझा पत्ता शोधत आमच्या मेस मध्ये आले. ते सांगली जवळच्या एका शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या शाळेतील एक शिक्षिका त्यांचे यजमान दारू च्या आहारी गेल्यामुळे विभक्त झाल्या होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी लग्नाची होती. रोहिणी या मासिकातील जाहिरात वाचून त्या बाईंच्या विनंती वरून ते आले होते. मुलगी उत्तम शैक्षणिक करीयरची आणि सांगलीहून डॉक्टर झालेली होती. आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे या कारणास्तव मुलीला नंतर नकार देतात आणि तिची परिस्थिती वाईट होते या कारणास्तव ते अगोदर त्याची चाचपणी करण्यासाठी आले होते. माझ्या दृष्टीने यात मुलीचा काहीच दोष नसल्याने पुढे जाण्यात मला कोणतीही अडचण नव्हती. मी त्यांना सांगितले तुम्ही माझ्या आईवडिलांशी बोला. बाकी इतर बोलणे चालणे झाले आणि ते गेले. हो गोष्ट माझ्या स्मृतीतून गेली होती. दहा जुलै ला घरी आलो. घरी वाढदिवस असल्याने छान वातावरण होते. आई वडील भाऊ आणि वहिनी. त्यातून वहिनीला सुद्धा मुलगी "पाहणे" याचा वरपक्षाकडूनचा अनुभव कसा असतो याचा अनुभव घ्यायचा होता. त्यातून माझा भाऊ एक वर्षाने मोठा आणि वाहिनी एक वर्षाने लहान यामुळे आमच्यात अतिशय छान सामंजस्य होते. दुसर्या दिवशी (शनिवारी) संध्याकाळी पहिली मुलगी सात वाजता येणार होती. आमच्या वडिलांनी आमच्या धाकट्या काका काकुनासुद्धा "कार्यक्रमा"ला बोलावले होते. जितकी जास्त माणसे असतील तितके वेगळे दृष्टीकोन मिळतात आणि काही न पाहिलेल्या गोष्टी लक्षात येतात असे त्यांचे म्हणणे होते. मला काहीच फरक पडत नव्हता. त्यातून हे काका आणि काकू आमच्याच घरी मी सहा वर्षाचा होईपर्यंत राहत होते त्यामुळे त्यांच्याशी आमचे छान जमत असे. संध्याकाळी उत्सवाचे वातावरण होते. त्यातून आमच्या वडिलांसारखे काकांना पण दोन मुलगेच होते त्यामुळे मुलगी आणि मुलीचा बाप यांच्या बद्दल जरा जास्तच सहानुभूती होती. मी आपला मित्रांबरोबर संध्याकाळी फिरून आलो. वडिलांनी साडे सहापर्यंत घरी या अशी तंबी दिलेली होती. घरी येउन पाच मिनिटात शर्ट बदलून तयार झालो. सात वाजता ती मुलगी तिचे आई आणि वडील आले. मुलगी छान साडी नेसून आली होती.दिसायला चांगली होती. तिचे केस छान लांब होते आणि त्यांची तिने एक जाड वेणी घातलेली होती. ( मला आता एवढेच आठवते आहे) ती पण डॉक्टरच होती. (मी पाहिलेल्या चारही मुली डॉक्टरच होत्या आणि सांगून आलेल्या ७५ पैकी जवळ जवळ ४० डॉक्टर होत्या) नमस्कार चमत्कार झाले. आम्ही काय करतो तुम्ही काय करता याचे चर्वित चर्वण करून झाले. मी काय करतो पुढे काय करणार मुलीला पुढे काय वाव आहे या सर्वाबद्दल एक माफक चर्चा झाली. त्यानंतर वडील म्हणाले कि तुम्हाला एकमेकांबरोबर काही बोलायचे असेल तर आत जा. आता आम्ही दोघे भावाच्या बेडरूम मध्ये आत गेलो. एक गोष्ट चांगली असते कि येथे तुम्हाला मुलीकडे न लाजता सरळ पाहता येते. आणि तुम्ही पाहत नाही हे बघून मुलगी पण तुम्हाला चोरून वर पासून खालपर्यंत पूर्ण न्याहाळत असते. ते पाहून मला हसू आले. आम्ही एकंदर मी काय करतो? तू काय करतेस? भविष्यात काय करायचे आहे? छंद काय? याबद्दल चर्चा करीत होतो. मध्ये मध्ये वहिनी साबुदाण्याची खिचडी देण्यासाठी मग त्या ताटल्या परत नेण्यासाठी जा ये करत होती आणि माझ्या चेहऱ्याकडे मोठ्या आतुरतेने बघत होती कि याच्या चेहऱ्यावर काय दिसते, याला मुलगी पसंत पडते आहे का? दहा पंधरा मिनिटे बोलणे झाल्यावर खिचडी खाऊन आम्ही बाहेर आलो. बाहेरचे वातावरण बर्यापैकी मोकळे हसत खेळत असे होते. मग चहा झाला. काय निर्णय आहे ते लवकरच कळवतो असे वडील म्हणाले आणि ते सर्व आमचा निरोप घेऊन निघाले. हे सर्व झाल्यावर आता आम्ही सर्व जण तेथेच चर्चा करत बसलो. आमच्या काका आणि काकुना ती मुलगी फारच आवडली होती. मुलगी दिसायला चांगली होती. बोलताना ती सालस आणि सरळ आहे हेही जाणवले. आता उद्या काय होते ते पाहू असे वडील मला म्हणाले. त्यांनी काकांना सांगितले कि उद्या पण दोन मुली येत आहेत तेंव्हा तू पण थांब. पण काकांना सकाळी कुणाच्या तरी लग्नाला जायचे होते म्हणून ते म्हणाले मला जमणार नाही. यावर मी वडिलांना विचारले कि माझ्या मित्राच्या वडिलांना बोलावू का? हा माझा अत्यंत जवळचा मित्र ठाण्याला अस्थिरोग तज्ञ आहे त्याचे वडील स्वतः सुद्धा डॉक्टर आहेत आणि त्यांना लग्न जुळवणे या विषयात भयंकर रस होता. दुर्दैवाने त्यांच्या एकुलत्या एक मुलाने आपले लग्न डॉक्टरी करीत असतानाच जुळवले होते आणि ते लग्न झालेही होते. त्याच्या वडिलांचा त्याला विरोध नव्हताच पण वधू संशोधनाचे चहा पोहे मिळाले नाहीत याचे त्यांना फारच वैषम्य वाटत असे. त्यावेळेस मी त्यांना वचन दिले होते कि माझ्या दाखवण्याच्या कार्यक्रमाला मी तुम्हाला बोलावीन. हे मी वडिलांना सांगितले तर ते म्हणाले कि त्यांना जरूर बोलाव. दुसर्या दिवशी सकाळी मी त्या मित्राबरोबर मामलेदाराची मिसळ खायला गेलो तेंव्हा त्याला विचारले कि बाबा( त्याचे) मुलगी पाहायला येतील का? त्यावर तो म्हणाला ते जेवत असतील तर हात न धुता सुद्धा येतील.अशा गोष्टीत तुला शंका तरी कशी येते? चल लगेच घरी, त्यांना तयार व्हायला वेळ तरी दे. मग त्याच्या वडिलांना घेण्यासाठी त्याच्या घरी गेलो आणि त्यांना विचारले तर ते पूजा करीत होते. त्यांनी अगदी यथासांग वेळ घेऊन पूजा केली. माझा मित्र शेवटी अस्वस्थ होऊन म्हणाला अहो बाबा मुलगी यायची वेळ झाली त्यावर ते म्हणाले मुलगी पाहण्यचा पहिला कार्यक्रम आहे नीट पूजा करायलाच पाहिजे आणि ते (आणि माझा मित्र) माझ्या बरोबर उत्साहाने आमच्या घरी आले. दुसर्या मुलीला सकाळी दहाची वेळ दिलेली होती. आम्ही जेमतेम पावणे दहाला घरी पोहोचलो. अर्थात मला तयार व्हायला पाच मिनिटेच लागतात. व्यवस्थित नवा शर्ट घालून तयार झालो. ( शेवटी चांगली मुलगी हातची जायला नको असा विचार मुलांच्यात पण असतोच). दहा एक मिनिटात (दहा वाजता) मुलगी तिचे आई वडील आणि मोठा भाऊ आले. मी माझे आई वडील आणि वहिनी बाहेरच्या खोलीतच बसलो होतो. वरील प्रमाणेच नमस्कार चमत्कार झाले.हि मुलगी पण साडी नेसून आली होती, दिसायला चांगली होती. हिचेही केस लांब होते. यावेळेस मित्राचे वडील एखाद्या सराईत माणसासारखे फटाफट मुलीकडच्याना प्रश्न विचारत होते. त्यामध्ये बर्याच गोष्टी स्वच्छ झाल्या. मुलीचे वडील काय करतात? मोठ्या मुलाचे लग्न झाले आहे तो इंजिनियर आहे आणि रिलायंसच्या पाताळगंगा प्रकल्पात कामाला आहे इ इ. त्यामुळे मला फारसे काही बोलायची गरज पडली नाही. मी माझ्या वहिनीच्या शेजारी बसून आपसात हळूच काही काही बोलत होतो. तेवढ्यात माझा भाऊ बाहेरून आला. त्याची ओळख सर्वांशी करून दिली. तो पण इंजनेर होता त्यामुळे त्याच्यात आणि मुलीच्या भावात तुम्ही कुठून( इंजनेर) झालात काय करता? मी कुठून झालो? मी काय करतो ?इ इ. मग वडिलांनी आम्हाला विचारले कि तुम्हाला आपसात काय बोलायचे आहे ते आतमध्ये बोलून घ्या. कालच्या प्रमाणेच आम्ही आत गेलो आणि तिने मला दोन दिवसापूर्वी झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कालच्यासारखीच एकंदर मी काय करतो? तू काय करतेस? भविष्यात काय करायचे आहे? छंद काय? याबद्दल चर्चा करीत होतो. परत वहिनीने उपमा आणून दिला तो झाल्यावर ताटल्या घेऊन जायला आली. एकंदर रागरंग काय आहे ते ती पण उत्सुकतेने पाहत होती. मुलीने पण प्रश्न विचारले मी पण तुझे छंद काय? पुढे काय करायचे आहे इ. प्रश्न विचारले. काही वेळाने आता पुढे काय बोलायचे असा प्रश्न पडल्यावर मी तिला घेऊन बाहेर आलो. बाहेर तोवर त्यांची चर्चा संपली होती. मग सर्वांचा चहा झाला. परत एकदा आम्ही तुम्हाला चार दिवसात कळवतो असे आमच्या वडिलांनी सांगितले आणि त्या सर्वांनी निरोप घेतला. ते गेल्यावर माझ्या मित्राने त्याच्या बाबांना फैलावर घेतले. अहो तुम्ही मुलाचे बाप नसून किती प्रश्न विचारता? त्यावर ते म्हणाले हे बघ सर्व कसे अगोदर विचारलेले बरे. मागाहून कटकट नको. तुला त्यातील काही कळत नाही. हि जुगलबंदी आम्हाला माहित होती त्यामुळे आम्ही हसत होतो. हे सर्व होईस्तोवर ११. ३० झाले होते. आमचे वडील त्यांना (मित्राच्या वडिलांना) म्हणाले बाबा दुपारी चार वाजता अजून एक मुलगी येणार आहे तिच्यासाठी पण थांबा. ते जरा चुळबुळ करत होते तेंव्हा आमचे वडील म्हणाले. अहो संकोच कसला करता? इथेच जेवा आता थोडा वेळ आराम करा आणि चार वाजता मुलगी बघूनच जा. अर्थात ते जेवणाबद्दल संकोच करत होते मुलगी पाहण्यात त्यांना रस होताच त्यामुळे ते तयार झाले. .माझ्या मित्राला सांगितले कि तुझ्या बायकोलाही इथेच जेवायला बोलाव. यथावकाश आमचे जेवण झाले दुपारी थोडी वामकुक्षी झाली म्हणजे आडवे झालो पण गप्पा मारण्यात झोप काही झाली नाही आणि चार वाजता परत आम्ही त्याच खेळास तयार झालो. मध्ये मध्ये आम्ही कालच्या आणि आजच्या मुलीबद्दल चर्चा करत असताना आई म्हणाली मित्राच्या बाबांनी कालची मुलगी पाहिलेली नाही तेंव्हा त्यांच्या समोर कालच्या मुलीची चर्चा नको म्हणून त्या चर्चेला पूर्ण विराम दिला. दुपारी चार वाजता परत तोच खेळ. मुलगी आणि तिचे आईवडील आले. नमस्कार चमत्कार झाले. मुलीचे वडील सरकारी खात्यात कारकून होते. मुलीचे वडील आपल्या मुलीचे करियर कसे उत्तम आहे दहावी बारावीला कसे उत्तम गुण मिळवले मेरिटवर तिने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश कसा मिळवला याचे वर्णन केले. कारकुनाच्या मुलीच्या मानाने त्या मुलीचे यश उत्तमच होते. मुलीच्या वडिलांना मुलीचा सार्थ अभिमान होता. परंतु तसेच यश मी किंवा माझ्या भावाने सुद्धा मिळवलेले होते म्हणून ते थोडेसे अनाठायी वाटले एवढेच. मुलगी चार चौघी सारखीच होती लहान चणीची बारीक बांध्याची अशी होती. केस ही बरे होते. या मुलीला पाहताच हि मुलगी पसंत होणार नाही असे जाणवले. त्यामुळे मी फारसे बोलत नव्हते. अशावेळेस मित्राच्या वडिलांनी संभाषणाची चावी आपल्या हातात घेतली हे फार बरे झाले. त्यातून ती मुलगी मित्राच्या बायकोच्याच मेडिकल कोलेजची निघाली आणि तिने मित्राच्या बायकोबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. म्हणजे पुढची दहा मिनिटे त्या दोघी आपल्या कॉलेजच्या गप्पा मारत होत्या. दहा मिनिटांनी वडिलांनी मला विचारले तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही आत जा. मी तशी काही गरज नाही असे सांगितले. पाच मिनिटांनी त्यांनी परत एकदा विचारले. आपण मी काही गरज नाही म्हणून आपला बाळबोध पणा दाखवला. परत मी काय करतो? मुलीला पुढे काय वाव? हि रेकॉर्ड वाजवण्यात मला आता फारसा रस नव्हता. इकडचे तिकडचे बरेच बोलणे झाले. कांदे पोहे, चहा वगैरे झाले. हि मंडळी साडेपाच वाजता गेली. मित्राच्या कुटुंबाबरोबर गप्पा चालू झाल्या मी त्यःच्या बाबांना म्हटले कि बघा तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला चहा पोहे खायला घातले कि नाही. ते म्हणाले चहा पोहे मिळाले पण ते मुलीच्या घरचे नाही. मी हसत म्हटले तुमच्या मुलाने दिले नाहीत त्याला काय करणार? मला जेवढे जमले तेवढे मी केले. सर्व जण हसले यानंतर त्यांनी निरोप घेतला. आता घरात आम्ही पाच जणच उरलो होतो.अजून तीन मुली पाहून झाल्या होत्या आणि आता निर्णय घ्यायचा होता. क्रमशः

Book traversal links for आमच्या विवाहाची कहाणी - २

  • ‹ आमच्या विवाहाची कहाणी
  • Up
  • आमच्या विवाहाची कहाणी - ३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
24467 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

बुवांचे श्लोक

कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 16:28 नवीन
थोड्या काळात बुवांचे श्लोक मालिका सुरू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

छान लेख

PIYUSHPUNE
Mon, 03/09/2015 - 11:27 नवीन
उत्तम लिखाण, तुम्ही लिहीत राहा.
  • Log in or register to post comments

डॉक

दिपक.कुवेत
Mon, 03/09/2015 - 23:56 नवीन
दोन्हि भाग वाचले. आवडले. आता उत्कंठा वाढू लागली आहे.
  • Log in or register to post comments

मी

प्रसाद गोडबोले
Tue, 03/10/2015 - 15:11 नवीन
मी ५६ माझा ११ आमच्या १९ मला १९ आम्ही १८ ( काही प्रतिसादकांचे मॅ मॅ पण चुकुन मोजले गेले आहेत , पण शेवटी माझाच लेक असल्याने ते मी ही मीच आहेत तुम्ही नाही ... ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ) =============== एकुण ११६ अंदाजे ... अपेक्षेपेक्षा फार कमी आहेत ...पण हरकत नाही :D फक्त एक बदल सुचवु इच्छितो - 'लेखाची सुरुवात "मी बोटीवर होतो तेव्हा..." अशी असायला फाहिजे , त्या शिवाय मजा नाही ' =)) ====================
  • Log in or register to post comments

+१

बॅटमॅन
Wed, 03/11/2015 - 12:57 नवीन
चारमिनारी वास्तव्याच्या रौप्यमहोत्सवाची आठवण येते राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मिठाई आणि मिठाईवाला

सिरुसेरि
Wed, 03/11/2015 - 09:39 नवीन
आपल्या जीवनातील महत्वाचे अनुभव , प्रसंग शेअर केल्याबद्दल धन्यवाद .
  • Log in or register to post comments

मिसळ पाव.कॉम हे रिकाम टेकड्या

अप्पा जोगळेकर
Wed, 03/11/2015 - 15:47 नवीन
मिसळ पाव.कॉम हे रिकाम टेकड्या कार्कुनांचे व्यासपीठ बनले आहे.
  • Log in or register to post comments

तुम्हाला कार्कुनी वृत्तीच्या

सूड
Wed, 03/11/2015 - 15:51 नवीन
तुम्हाला कार्कुनी वृत्तीच्या लोकांचे म्हणायचे असावे असे समजतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

कार्कुनी वृत्तीच्या

हाडक्या
Wed, 03/11/2015 - 19:58 नवीन
कार्कुनी वृत्तीच्या
अहं अहं .. कार्कुनी मणोवृत्तीच्या ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अप्पासाहेबांच्या प्रतिसादातले

बॅटमॅन
गुरुवार, 03/12/2015 - 00:23 नवीन
अप्पासाहेबांच्या प्रतिसादातले एखादे अर्धे अक्षर सायलेंट असावे असा डौट येतोय हो सूड्राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आवडलं. पुढचा भाग कधी ?

विजय नरवडे
गुरुवार, 03/12/2015 - 10:49 नवीन
आवडलं. पुढचा भाग कधी ?
  • Log in or register to post comments

पठडीतलं असलं तरी प्रेमविवाह

नगरीनिरंजन
गुरुवार, 03/12/2015 - 20:38 नवीन
पठडीतलं असलं तरी प्रेमविवाह केलेल्यांसाठी रंजक आहे.
  • Log in or register to post comments

प्रोफेशन

सिरुसेरि
Fri, 03/13/2015 - 12:10 नवीन
कारकून प्रोफेशनमधल्या व्यक्तींचा उल्लेख पुर्वीच्या काळी 'कारकुंडा' असा केला जात असे . हा उल्लेखही त्रासदायक असे .
  • Log in or register to post comments

असाच एक जातिवाचक उल्लेखही आहे

बॅटमॅन
Fri, 03/13/2015 - 16:25 नवीन
असाच एक जातिवाचक उल्लेखही आहे तो या निमित्ताने आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

तो एकमेव जातीवाचक उल्लेख नाही

नगरीनिरंजन
Fri, 03/13/2015 - 16:30 नवीन
तो एकमेव जातीवाचक उल्लेख नाही अन्यही आहेत, तेही आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आमच्या विवाहाची कहाणी - २

दिलीप सावंत
गुरुवार, 02/23/2017 - 10:43 नवीन
खूपच छान हो!! विवाहातला व्यर्थ खर्च कसा टाळता येईल तो अशा प्रकारे आपल्या समाजामध्ये दारिद्य्ररेषेच्या खालील जीवन जगणार्‍या कुटुंबांना या रेषेच्या वर आणण्याचा मोठा प्रयत्न नेहमीच केला जात असतो आणि सरकारच्या प्रयत्नातून तसेच स्वतःच्या धडपडीतून अनेक कुटुंबे ही दारिद्य्ररेषा पार करून तिच्यावर येण्यात यशही मिळवतात. हे काही उपाय आहेत कि जे सहज पाने शक्य होऊ शकते १) कोर्टाच्या साक्षीने लग्न करणे २)खूप साधे पणे लग्न करणे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा