खानदेश सफर
लेखनविषय (Tags)
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !
अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं
अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !
अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड
अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे
ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन् दुःखाले होकार
देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !
अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार
असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !
निरक्षर असुनही जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा असलेली खानदेश कन्या. अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी एक साधी शेतकरी महिला.
तसेच ना धो महानोर शेती, माती, पाणी, पीक आणि निसर्गाशी नाते जपणारे कवी अशा मातीशी जोडलेली, निसर्गाशी जोडलेली, रोजचे जीवन काव्य रूपात आपल्या समोर उभे करणारे खानदेशचे हीरे.
या अशा माझ्या खानदेशची मला जमेल तशी सफर सगळ्यांना घडवने कधी पासून मनात होते. तर मंडळी जसे शक्य होईल तशी माझ्यापरीने सुरवात करते.
दख्खन पठाराच्या उत्तरेला विविध वैशिष्ट्यांनी नटलेला व गिरणा, तापी, वाघूर या नद्यांनी समृद्ध असलेला भूप्रदेश म्हणजे खानदेश. अगदी प्राचीन काळापासून तर आतापर्यंत खांडववन, सेऊणदेश, ऋषिक, दानदेश, स्कंददेश, कान्हदेश (खान्देश) अशा वेगवेगळ्या नावांनी हा भूप्रदेश ओळखला गेला आहे.
'कान्ह देश'पासून खान्देश शब्दाची उत्पत्ती झाली आहे. आता जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे खान्देश म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील अन्य भागांच्या तुलनेने या जिल्ह्यांची सांस्कृतिक, सामाजिक अशी स्वतंत्र ओळख आहे. या भागाची कृषी संस्कृती खाद्य संस्कृती वेगळी आहे. येथे प्राचीन परंपरा आहे.
अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी बरोबरच जळगाव जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेली पाटणादेवी, मुक्ताईनगर, चांगदेव, कोथळी, मनुदेवी, उनपदेव, रामेश्वर अशी अनेक तीर्थस्थळे, पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांची बर्याच लोकांना माहिती नाही.
गहू हे मुख्य अन्न असलेली उत्तरेकडचा भाग तसेच तांदूळ हाच मुख्य अन्न घटक असलेला दक्षिण भाग यांच्या मधोमध असलेल्या आपल्या महाराष्ट्रात चौरस खाद्यसंस्कृती आहे. आणि ही खाद्यसंस्कृती ही आपल्या रोजच्या जेवणात आपण आंगीकरली आहे.
सुपीक जमीन, अनुकूल हवामान यामुळे महाराष्ट्र अन्न धान्याच्या बाबतीत इतर राज्यांपेक्षा अधिक संपन्न आहे. सगळ्याप्रकारची फळं, धान्य, कडधान्य, तेलबिया यांचे उत्पादन घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या सार्या अनुकूलतेमुळे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविधांगाने नटलेली आहे.
पोळा आणि अक्षयतृतीय हे दिवाळी इतकेच महत्वाचे सण प्रत्येक खानदेशी माणसाच्या जिवाहळ्याचे. पोळा हा पोळा हा सर्वच खानदेशी शेतकरी बांधवांचा सण. तर अक्षयतृतीयेला जावयाचा मान. ह्या सर्वच सण उत्सवांसाठी आणि एरवी कोणीही पाहुणे आले तरी पुरणपोळी किंवा खापरावरची पोळी खीर, आंब्याचा रस, हरभर्याच्या डाळीची रस्सी म्हणजे मसालेदार आमटी, भात, नागलीचे पापड, कुरडय़ा कांद्याची भजी असा भरगच्च बेत ठरलेला असतो.
मातीचे खापर चुलीवर ठेवून पुरणाचे सारण भरून तळहातावर रूमाली रोटीसारखी केलेली पोळी म्हणजे पुरणपोळी किवा मांडे. अक्षयतृतीयेला जावयाला याच मांड्यांचा पाहुणचार असतो. आम्हा खान्देशी मंडळींना तिखटाचे वावडे नाहीच. अगदी भाकरी किंवा पोळीवरही आम्ही तेल, तिखट व मिठ घालून खातो.
तसाच अजून एक पदार्थ – दाळ बट्टी/ बाटी. ज्या प्रमाणे भरीत पार्टी होते तशीच खानदेशात बट्टी चे जेवण ही कोणी टाळत नाहीत. मस्त शेतात एक मोठा खड्डा करून त्यात गोवार्यांवर भाजलेल्या खरपुस बट्ट्या एका कापडाने पुसून गवराण तुपात बुडवून मग डाळीबरोबर खाणे म्हणजे स्वर्गसुखच. यालाच काहीजन रोडगा असे म्हणतात.
ठसकेबाज शब्दसंपदा असलेली आणि ऐकायला गोड अशी अहिराणी भाषा, कष्टमय जीवनशैली आणि तितकीच अस्सल गावरान व झणझणीत शेवभाजी व वांग्याचं भरीत, ही खानदेशची खाद्यसंस्कृती. हिरव्या वांग्याच भरीत हे सुद्धा आमचे जीव की प्राण.
रोजच्या जेवणात मसालेदार, तिखट व चमचमीत पदार्थांचा समावेश असतो. "वांग्याचं भरीत आणि शेवभाजी म्हणजे खानदेश' असं समीकरणच आहे .नोव्हेंबर ते जानेवारी या काळात जळगाव जिल्ह्यातील बामणोद, भालोद, ममुराबाद, असोदा, भादली येथे या वांग्यांचे उत्पादन घेतले जाते. या परिसरांतील माती व वातावरण भरताच्या या विशिष्ट वांग्यासाठी पूरक आहे. तूर व कपाशीच्या काड्यांवर खरपूस भाजलेली वांगी, कांद्याची हिरवीकंच पात, लसूण, लवंगी मिरच्यांचा हिरवा ठेचा आणि तेलाचा सुयोग्य वापर करून तयार केलेलं चटकदार भरीत केळीच्या हिरव्या पानावर पाहताच भूक नसणाऱ्यालाही सपाटून भूक लागते.
मला अजुनही आठवते लहान असताना हट्टाने सुकलेल्या काड्या कोलोनीत कुठे मिळतात का हे शोधायला जात असे नाही मिळाल्या की कामाला असलेल्या आजीची रवानगी काड्या शोधायला पाठवत असे. वडिलांची बदली काही वर्ष सवखेडा नांदेड या गावी झाली होती तेव्हा बँक बंद होण्याआधी काही वेळ तिथले स्नेही काड्यांवर भाजलेले वांगे पाठवत असत कारण कितीही झाले तरी कड्यांची चव गॅसवर येत नसे.
जिभेला आलेला तिखटपणा कमी करण्यासाठी देशी साजूक तुपात तयार केलेला रव्याचा दराबा आणि गुळापासून बनवलेली गोडीशेव हा रास्त उतारा.. या दिवसात शेवभाजी व भरताच्या या खानदेशी मेनूचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकर-पुणेकर जळगावच्या नातेवाइकांकडं हक्कानं येतात; तर मुंबई-पुण्याकडे असलेल्या आप्तांकडं जळगावकरांच्या वाऱ्या वाढतात. या प्रत्येक वारीत जर त्यांच्याबरोबरच्या सामानाची तपासणी केली तर त्यात भरताची वांगी, कांद्याची हिरवीकंच ताजी पात, शेवभाजीसाठी लागणारी जाड तिखट शेव आणि या दोन्हींना लज्जत आणणारा खास मसाला नक्की सापडेल.
होळीला खांदेशात बहुताश घरातून फुणके, कैरीचे पन्हे आणि लाडवे असतात.
फुणके- म्हणजे मिश्र डाळींचे मुटके.
लाडवे- हे गव्हाच्या पीठाचे छोटे छोटे शेंगोळ्या वळून खडखडीत वाळवून गुळाच्या पाकात शिजवलेला पदार्थ.(याचा फोटो होळीच्या वेळा देईन).
त्याच प्रमाणे हिवाळ्यात हिरव्या मिरच्यांची दाणे कूट घालून पातळ भाजी केली जाते.
हिवाळ्यातील अजुन एक आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे कळण्याची भाकरी. ज्वारी किवा बाजारी+ अकखे उडीद समप्रमाणात घेवुन केलेली भाकरी त्याबरोबर मिरचीचा झणझणीत ठेचा.
तसेच काळ्या उडीद डाळीची पातळ भाजी हे सर्व हिवाळा स्पेशल खानदेशी पदार्थ आहेत.
पातोड्याची भाजी
मसला मोदक भाजी
क्रमश:

प्रतिक्रिया
वा! मस्त!
मी, आरोही.
मोदक भाजी
क्या बात!.. खुप छान!
खान्देश
Pagination