..अनामिक..
"तुला अस्मानी पाहीजे की सुलतानी ?"
"हा काय वेडेपणा अनामिक?"
"बोलतर..."
"हे बघ,गेलेली नोकरी आणि रेश्माकडून मिळणारा घटस्फोट यांमुळे मी सध्या 'दोंन्ही' अनुभवतोय !"
"मग..."
"अरे संपलय माझं सगळं"
"थांब साकेत.गडबड करू नकोस.अद्याप माझा प्रश्न पूर्ण झालेला नाही.अजून एक तिसरी मिती आहे संकटांची.सर्वात मोठी..."
"ती कोणती ?"
"स्वनामी"
"अच्छा त्सुनामी !"
"मी स्व नामी म्हंटलं.अस्मानी-सुलतानीच्याही नंतर येणारं संकट.ते हवंय का तुला ?"
अनामिकच्या बोलण्याने गोंधळलो पण चार्जही झालो.युरेका युरेका करतच त्याला म्हणालो,
"कळलं मला मित्रा.आत्मसंकट हेच सर्वात मोठं संकट.बाकीच्या अडचणी ह्यातर दुय्यम,निर्लेपी अडगळी.असंच ना ?"
"एकदम सही..."
"इस बात पर एक जाम बनता है दोस्त...." असं म्हणत मी अनामिकचा उपडा ग्लास सरळ केला आणि त्यात दारू आेतू लागलो.
"नाही साकेत.नको.मी कधीच अल्कोहोल घेत नाही."
"प्लिज दोस्त...माझ्यासाठी थोडी घे...."
"साकेत तूही पिऊ नकोस.तिसरया संकटाला तू जागं करू पाहतोयस..."
अनामिकच्या स्पष्टीकरणाने माझ्या मेंदूला दारूतल्या 'अल्कोहोलची' विषारी चव पहिल्यांदा कळली.
रात्रीच्या हँगओव्हरने सकाळी उशिरा उठलो.पिलो नसतो तरीही उशिराच उठलो असतो- नोकरी,छोकरी दोन्हीही हातात नव्हत्या.गार पाणी कसबसं डोक्यावरून ओतून बाहेर पडलो.
धावतपळत जाऊन फास्ट लोकल पकडली.लयीत हलणारया भिडूंच्या घोळक्यात सामिल झालो.मीही सूर पकडला.एका वेगळ्याच भावसमाधीत गेलो.भूतकाळातील आठवणींनी गती पकडली...चार वर्षापूर्वी मुंबईत आलेला मी.ठाण्यात एका नामवंत सॉफ्टवेअर कंपनीतला जॉब.पगार ठीकठाक.अचानक रेश्माचं माझ्या आयुष्यात येणं. रेश्मा.किती सहज,सुंदर,सोपी वाटली आपल्याला ती.माझं सगळंच आलबेल होतं.मग..मग..कुठं चुकलं तिचं,आमचं,माझं ? कदाचित हाच क्रम उलटही असावा.
माझे विचार संपायच्या आतच कुणाचातरी हात माझ्या खांद्यावर पडला.मी झटकन मागे वळून पाहिलं.
होय.अनामिकच.त्याला पाहताच विचारांची रूळावरून घसरू पाहणारी गाडी पुन्हा पटरीवर आली.
मी स्मितहास्य करत बोललो,
"वेळेवर आलास..."
यावर अनामिक भुवया उंचावून म्हणाला,
"साहेब,मी आधीपासूनच आहे डब्यात.तेंव्हा तूच......."
"ओह ! सॉरी सॉरी."मी डोळे झाकत जीभ चावली.
"काय मग.इतका कसला विचार करत होतास उभ्या उभ्या ?" त्याचा साशंक प्रश्न.
"....तोच नेहमीचा !"
"आय सी...नोकरी आणि छोकरीचा."
मी परत चेहरा मलूल केला.खरंतर आपोआप झाला.
विषय बदलत अनामिकने पुन्हा विचारलं,
"हे काय ? आज चक्क फास्ट लोकल कशी काय पकडलीस ?"
"तुला भेटायचं होतं म्हणून..." हसत हसत मिश्कीलपणे मी बोललो.
"क्या बात ! पण हे झालं खोटंनाटं,पैकीच्या पैकी मार्क देणारं उत्तर.खरं सांग पाहू..."
"समोरच गाडी दिसली.मग थांबतोय कशाला "
"मजा आहे ना.पाठीमागून बरयाच गाड्या असतानादेखील आपण समोरची गाडीच बहुतांशी पकडायला बघतो..."
"आपली पुढे नियोजित कामे असतात मित्रा !"
"आज होती तुझी ? पुढे कामे ? नियोजित ?"
"ना...ही " माझी सपशेल शरणागती.
"हे बघ साकेत ;नोकरी,छोकरी आणि गाडी एक गेली की दुसरी येत असते.पळणारीच्या मागे जास्त पळू नकोस..."
अनामिकच्या बोलण्याने माझा आत्मविश्वास भलताच वाढला.वाटत होतं तो असाच बोलत रहावा.
"...कदाचित तुला 'तीच' हवी असेल तर उद्यापर्यंत तिची वाट बघ.जागचा हलू नकोस.दुसरीत बिलकूल चढू नकोस.ती येईल तुला न्यायला."
"अनामिक..."
मला नेमकं हेच ऐकायचं नव्हतं आणि होतंही ! अनामिक मला देवदूतासारखा वाटला.त्याचे विचार शरीरात खोलवर ग्लूकोजसारखे विरघळले.या धुंदीत मी काहीतरी बोलणार इतक्यात धाडधाड धाडधाड करत लोकांचा घोळका डब्यात शिरला.माझी आणि अनामिकची फाळणी झाली.दोघे वेगवेगळ्या कोपरयात फेकलो गेलो.
महिन्यापूर्वीच हा अनामिक मला पहिल्यांदा भेटला. तेंव्हापासून आमचं जमलं. मी त्याला माझा मित्र मानलं पण त्याने माझ्याशी कोणतंच नातं जोडलं नव्हतं.तो काय करतो,कुठे राहतो हे त्याने मला कधीच सांगितलं नव्हतं.इथपर्यंत त्याने त्याचं नावही सांगितलं नव्हतं.म्हणूनतर माझ्यासाठी तो एक 'अनामिक' होता.रक्तातला नसूनही तो माझा जखमी डिएनए दुरूस्त करू पाहत होता.आजही असाच टवटवीत करून गेला...
एकदम मी भानावर आलो.आजूबाजुला कोणीच नव्हतं.अनामिकसुद्धा गायब होता.गाडी शेवटच्या स्टॉपला येऊन थांबली होती.
दिवसभर असाच फिरत राहिलो.'नको आणि हवे' असलेले विचार चालूच होते.
घरकाम,स्वयंपाक,बिझीपणा या गोष्टींवरून माझ्यात आणि रेश्मामध्ये मतभेद झाले होते.त्याचं रूपांतर भांडणात झालं.कित्येक रात्री पाठीला पाठ लावून झोपण्यात गेल्या. साहजिकच सोडचिठ्ठीपर्यंत मजल गेलीच !
या शैतानी आठवणीअंती एक भलतीच जाणीव माझ्या मनात अनामिकपणे होऊ पाहतेय...
- दोघातला तो प्रॉब्लेम कुठं 'स्वनामी' होता ? माझ्यासाठी आणि रेश्मासाठीसुद्धा ? ते तर सारे निव्वळ अस्मानी,सुलतानी.....
थँक्स दोस्ता.तुझ्यामुळं एक वेगळंच रसायन शरीरात तयार झालंय.त्याचा पुरेपूर वापर करीन.
एका नव्या सकाळी हसत जागा झालो.घटस्फोटाची कागदं टराटरा फाडली.बेवारस पडलेला माझाच बायोडाटा उचलला.मस्तपैकी टाय घातला आणि जुन्या नात्यांना नव्याने जोडण्यासाठी बाहेर पडलो.एका 'अनामिक' आेढीने गाडीची,नोकरीची आणि छोकरीची वाट पाहत स्टेशनवर उभा राहिलो.
रोजची गाडी थांबली.आत चढून मी माझ्याच नादात शीळ घालत खांबाला रेलून उभा राहिलो.समोर लक्ष गेलं.एक तिशीतला तरूण रडवेला चेहरा करून उभा होता.मी त्याला विचारलं,
"एनीथिंग प्रॉब्लेम ?"
माझ्याकडे आशेने पाहत उदासपणे तो उत्तरला,
"हो..."
"काय झालंय नेमकं ?"
"कालच बॉसने मेमो दिलाय"
"इतकंच ना. बी रिलक्स.मी करेन तुम्हाला मदत"
माझ्या बोलण्याने तो तरूण खुलला.प्रचंड खुषीत येऊन म्हणाला,
"थँक्यू सो मच्.बाय द वे आपलं नाव काय ?"
"अनामिक." हसत हसत मी उत्तर दिलं.
.........................................
वाचने
5832
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच आवडली
आवडली
"पार्टनर" सारखी फीलिंग आली
खरच देवा
In reply to "पार्टनर" सारखी फीलिंग आली by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to खरच देवा by बाबा पाटील
मस्तच...
खूप छान ! रिफ्रेशिंग !!
सर्वांचे आभार.
कथा आवडली.
कथा आवडली.
छान!
हम्म असा अनामिक जीवनात असावा
.
छान लिहिले आहे
कथा आवडली विशेषतः त्यातला
मस्तच..
छान
मैत्रीच्या साखळीची दिलखुलास
आवडली कथा. पु.ले.शु.
स्वतः
छान लिहिलंय!
पार्टनरची आठवण आल्यावाचून