Skip to main content

भाज्यांचे लोणचे

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 11/02/2015 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत फेब्रुवारी महिना सुरु होताच वादळ आणि धुक्याचे राज्य संपते. सूर्याचे तेज जाणवू लागते. या मौसमात बाजारात भाज्याही भरपूर असतात. भाज्यांचे लोणचे घालण्यासाठी हा मौसम आदर्शाच. दरवर्षी सौ. या मौसमात भाज्याचे लोणचे एक- दोनदा तरी घालतेच. गेल्या रविवारी भाज्यांचे लोणचे घातले होते. त्याचीच कृती. साहित्य: भाज्या: फुलगोबी १किलो ,गाजर१/२किलो ,शलजम १/२किलो, अदरक १०० ग्रम, लहसून १०० ग्रम मसाले : सौंप (बडीशेप) ( २ चमचे) , मेथी दाणे (१ चमचा), हिंग १/४ चमचे, मोहरीची डाळ १ वाटी, तिखट १/२ वाटी, हळद १/४ वाटी, काळी मिरी ५-६ दाणे, तेल १ वाटी, सिरका १ वाटी, गुड १/2 वाटी. मीठ आवश्यकतेनुसार. कृती: प्रथम गोबी,गाजर आणि शलजम या तिन्ही भाज्यांचे एकसारखे तुकडे करून घ्या.एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. एक उकळी आल्यावर पाण्यात १ चमचा हळद टाकून त्यात चिरलेल्या भाज्या टाकाव्यात. तीन ते चार मिनिटांनी गॅस बंद करून सर्व भाज्या एका मलमलच्या कपड्यावर किंवा साडीवर पसरून वाळायला घाला. तीन चार तासात भाज्या वाळतील (अर्थात ओलसरपणा निघून जाईल). अदरक किसून घ्या आणि लहसून बारीक वाटून घ्या. साहित्य आता कढई गॅस वर ठेवा. 1 चमचा तेलात सौंप आणि मेथी दाने परतून घ्या. मग पुन्हा २ चमचे तेल टाकून अदरक आणि लहसून परतून घ्या. त्या नंतर वाचलेले तेल कढईत टाकून तेल गरम झाल्यावर काळी मिरी टाका (तेल गरम झाले कि नाही कळण्यासाठी). नंतर गॅस बंद करा. एका भांड्यात सिरका व गुड घालून उकळायला ठेवा. गुड विरघळल्या वर गॅसबंद करा. एका परातीत किंवा भांड्यात सर्व मसाला अर्थात - परतलेले अदरक, लहसून, सौंप (बडीशेप), मेथी दाणे व तिखट, हळद, मेथी दाणे, मीठ व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर गरम तेल मसाल्यावर टाका. मिश्रण थंड झाल्यावर त्यात गुड आणि सिरक्याचे मिश्रण मिसला. मसाला थंड झाल्यावर सर्व वाळलेल्या भाज्या मिसळा. भाज्यांचे लोणचे हे लोणचे १०-१२ दिवस आरामात टिकते.

वाचने 16258
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

सुंदर फोटो आले आहेत. स्वादिष्ट व आरोग्यपूर्ण पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद. हरयाणा टुरीझमच्या पानिपतयेथील NH1 वरील skylark tourism complex मध्ये हमखास विकत मिळायचे!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा रेड रॅडीश म्हणजे लाल मुळा वाटतोय. नवलकोल जरा वेगळा दिसतो माझ्या मते.  मुख्य फरक पानांमध्ये आहे म्हणुन कळालं. नवलकोलला त्याच्या कंदावरुन पाने फुटतात तर मुळ्याला फक्त वर शेंडी असते.

In reply to by सविता००१

आवडेल . पराठ्यासोबत असे लोणचे फार छान लागते. दिल्ली , सिमला , मनाली येथील लोणच्यांना वेगळा फ्लेवर वेगळ्या तेलामुळे येतो का ??

In reply to by कपिलमुनी

सरसों उर्फ़ मोहरी च्या तेलातले असते अस्सल उत्तर भारतीय लोणचे सो त्याचा असा एक विशेष वास येतो त्यांस

In reply to by कपिलमुनी

करते ते महाराष्ट्रियन पध्दतीने. ते खालील प्रमाणे: साहित्यः फ्लॉवर, लाल गाजरे (केशरी नाहीतच अज्जिबात) प्रत्येकी अर्धा किलो, मटार पाव किलो, आलं आणि ओली हळद- किसून प्रत्येकी १ वाटी, मेथीदाणे १ टीस्पून,लाल मोहरी अर्धी वाटी, लाल तिखट - अर्धी वाटी, ६-७ लिंबांचा रस, फोडणीसाठी नेहमीचं गोडेतेल, हिंग, हळद, मीठ कृती: फ्लॉवरचे छोटे छोटे तुरे काढून घ्यायचे, गाजराचे पण अगदी छोटे तुकडे करायचे. मटार दाणे, फ्लॉवरचे तुरे आणि गाजराचे तुकडे हे मीठ घातलेल्या गरम पाण्यात पाच मिनिटे ठेवायचे. मग निथळून घेउन एका पंचावर पसरायचे. ३-४ तासात ते छान कोरडे होतात. मग थोड्या तेलात मेथीचे दाणे तळून घ्यायचे.ते मोहरीबरोबर मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यायचे. आता एका मोठ्या बोल मध्ये या भाज्या, किसलेलं आलं, किसलेली ओली हळद,वाटलेली मेथी-मोहरीची पूड, लिंबू रस, तिखट, मीठ सगळं एकत्र मिसळून घ्यायच. एकीकडे तेलाची फोडणी करायची. पण जरा जास्त तेल आणि हिंग घालून. फोडणी एकदम चरचरीत व्हायला हवी. तिच्यात गॅस बंद करून थोडं तिखट घालायचं. मग लोणच्याचा रंग अतिशय सुरेख येतो. एक काचेची स्वच्छ बरणी घेउन त्यात हे सगळं घालावं. वरून फोडणी थंड करून घालावी. लोणच्यावर तेलाचा थोडा थर दिसायला हवा. म्हणजे ते टिकते. (भाजीचे लोणचे तसेही एक महिन्यावर टिकत नाही.) (जर खूप दिवस राहिले तर तेलाचा एक जुनाट असा वास येतो या लोणच्याला. तो फार वैताग वास असतो. तर मी हे लोणचं करताना लोणच्यावर येइल इतकी फोडणी न घालता एका लहान बरणीत थोडं लोणचं काढून घेते आणि तेवढ्यालाच मस्त खमंग फोडणी घालते. प्रत्येक वेळी नवीन लोणचं. :) ) आता राहिला फोटो. तर तो हपिसात कुठून आणू??????

In reply to by सविता००१

धन्यवाद ! किलोचे प्रमाण ग्रॅम मध्ये कन्वर्ट करून करण्यात येईल !

In reply to by सविता००१

मस्त! कधी गं वेळ काढतेस हे उद्योग करायला? भारी मेहनतीचं काम!

In reply to by उमा @ मिपा

रविवार-अर्थात. :)

In reply to by सविता००१

छान आहे पाककृती. माझी मावशी हे लोणचे अतिशय सुंदर करते. तिने एकदा दिलेली पाककृती माझ्याकडून हरविली. पण आता पुन्हा ती पाककृती मागवून बनवितो हे सुंदर लोणचे आणि पाककृती टाकतो इथे. लोणच्यावर तेलाचा थर लावण्याचे कारण भाज्यांचा (किंवा कैरीच्या, लिंबाच्या, मिरच्यांच्या फोडींचा, जे लोणचे असेल त्याचा) बाहेरील हवेशी संबंध तोडणे हा असतो. असे केल्याने लोणचे टिकते. त्याला बुरशी वगैरे येत नाही. म्हणून मोठ्या बरणीतील लोणचे लहान बरणीत काढल्यावर मोठ्या बरणीतील फोडी त्यातील तेलाखाली दाबून ठेवाव्यात. तेल कमी झाले असेल तर नवे तेल, धूर येईपर्यंत तापवून, गार करून वरून ओतावे आणि फोडी कायम तेलाच्या थराखाली राहतील असे पाहावे. कांही केले तरी भाज्यांचे लोणचे इतर लोणच्यांसारखे टिकावू नसते. १५-२० दिवसात संपेल एव्हढेच बनवावे.

लोणचे मस्तच ! एक आपली शंका : तुमची साहित्य सामग्री अडीच किलोपेक्षा जास्त झाली अन लोणचे १०-१२ दिवस टिकते म्हणता तर भाजीसारखे खावे लागणार ना?

In reply to by खेडूत

कुठला ही पदार्थ एकटे खाण्यात मजा नाही. माझे सर्व आप्त नातेवाईक दिल्लीतच राहतात आणि लेक जावई सुद्धा दिल्लीतच राहतो. शेजारी पण असतातच. शिवाय घरच्या गच्ची वर ऊन भरपूर येतो. गेल्या रविवारी आलू चिप्स केल्या ५ किलोच्या. बटाटा चिप्स

2500 ग्रॅम्स / 12 म्हणजे अप्प्रोक्सिमटेली 200 ग्रॅम /दिवस म्हणजे 4 जणांची फॅमिली म्हणली तरी रोजचे माणशी 50 ग्रॅम्स म्हणजे 25 ग्रॅम्स सकाळी व् 25 संध्याकाळी खायला लागेल!!! जमतंय की (गणिती गृहितका प्रमाणे) (अवखळ गणिती) बाप्या :D :D