Skip to main content

हॉस्टेल लाईफ आणि नवरस

लेखक पिंपातला उंदीर यांनी मंगळवार, 27/01/2015 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
हॉस्टेल ला राहाण हा एक श्रीमंत करणारा अनुभव असतो . हॉस्टेल लाईफ बद्दल एकदम वाईट अनुभव असणारे लोक आणि एकदम भन्नाट अनुभव असणारे लोक असे दोन गट . अधल मधल काहीच नाही . सुदैवाने मी दुसर्या गटात मोडतो . खालचे अनुभव माझे असले तरी थोड्या फार फरकाने हॉस्टेल मध्ये राहिलेल्या प्रत्येकाचेच . हास्य रस - माझ इंग्रजी तेंव्हा यथातथाच होत . छोट्या शहरामधून आल्यामुळे mannerism चा पत्ता नव्हता . सकाळी शिक्षकांना आल्या आल्या good morning म्हणायचे असते हे नुकतेच कळले होते . एकदा रात्री रस्त्यावर फिरताना रेक्टर सर भेटले . त्याना बघितल्या बघितल्या मी 'Good Night Sir ' म्हणून मोकळा झालो . सरांनी दुसऱ्या दिवशी केबिन मध्ये बोलावून दंड ठोठावला . 'प्रश्न पैशांचा नाही . पण Good Night हे निरोप देताना म्हणायचे असते हे तुझ्या मठ्ठ डोक्यात शिरले पाहिजे . " सरांनी दंड का या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले . गरवारे कॉलेज हॉस्टेल नदी काठी आहे . अकोल्याच्या सुमित केडिया ने हि नदी गंगा नदी आहे असे सांगत आमच्याशी तासभर वाद घातला होता . नवीन पोरांचा 'इंट्रो ' घ्यायला रुबाबात आम्ही निघालो आणि त्या मोकार ज्युनियर पोरांनी आमचाच इंट्रो घेतला होता . आज ती पोर मित्र बनली आहेत पण अजूनही तो इंट्रो चा प्रसंग आठवला की हसू येत . बीभत्स रस - हॉस्टेल लाइफ़ मध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा रस . आमच्या हॉस्टेल ची मेस लावणे सगळ्यांना सक्तीचे होते . त्यामुळे झक मारून तिथच जाव लागायचं . मेस चा मालक भाऊ च एक लाडक मांजर होत . त्याला हाड हुड कुणी केलेलं पण भाऊ ला खपायच नाही . त्यामुळ ते मांजर कुठेही फिरायचं आणि पडायचं . एकदा त्याला मी आणि माझ्या मित्राने कोबी च्या गड्ड्यावर प्रतीर्विधी उरकताना बघितलं होत . त्याच दिवशी पानात कोबी ची भाजी आली . मी आणि मित्र सटकलो काहीतरी कारण सांगून . आणि बाकीच्यांचं जेवण झाल्यावर आम्ही हे गुपित फोडलं . त्यांची प्रतिक्रिया काय होती हे इथे सांगू शकत नाही . आमच्या रूम च्या अस्वच्छतेच्या तर दंतकथा पसरल्या होत्या . रूम ला महिनो ना महिने झाडू लागत नसे . रूम मध्ये एवढा कचरा होता की त्यात एक छोटी बादली हरवली होती . ती होस्टेल सोडताना सापडली . त्या कचरा आणि दुर्गंधी युक्त रूम मध्ये आम्ही तिघ जण लोळत पडलेलं असू . एकदा माझ्या रूम पार्टनर ने ३ आठवडे कपडे सर्फ मध्ये बुडवून ठेवले होते . आमच्या संवेदना मेल्या होत्या पण त्याच वेळेस मला भेटायला चुलत भाऊ आला होता . तो अजूनही सांगतो की त्यावेळेस जो वास सर्वत्र पसरला होता तो जगताला सगळ्यात किळसवाणा वास होता . आणि तो केमिकल अभियंता आहे . अदभुत रस - अदभुत म्हणजे आश्चर्य आणि उत्सुकता . घरात अनेक वर्ष एक सुरक्षित आयुष्य काढून हॉस्टेल ला आल्यावर पोहोता न येणाऱ्या माणसाला एखाद्या खोल विहिरीत ढकलून जस वाटत तस वाटत . हॉस्टेल हे जंगला सारख असत . survival spirit उच्च ठेवून राहावं लागत . एकदा आपल्या समानधर्मी मित्रांचा कळप जमला कि हे होतकरू नवोदित विद्यार्थी हे सुंदर जंगल explore करायला लागतो . तोंडात लोणच्याची फोड ठेवायला लागल्यावर तोंडात वेगवेगळ्या चवींचे हवेहवेसे स्फोट होतात तस हॉस्टेल मधला प्रत्येक नवा दिवस काहीतरी नवीन देऊन जातो . हॉस्टेल च्या जगात एकट्यानेच एन्ट्री केली तरी जाताना माणूस कधीच एकटा बाहेर जात नाही . सोबत असतात ते जीवाला जीव लावणारे अनेक मित्र . पाकिस्तान कसा नष्ट करता येईल , रूम मधल्या ढेकणा चा बंदोबस्त कसा करावा , भारत नेहमी विदेशी भूमी वर सामने का हरतो , पोरी कशा फिर्वाव्यात अशा अनेक विषयावर रात्र रात्र झालेल्या चर्चा , महाराष्ट्र आणि देशातल्या विविध भागातून आलेले मित्र , त्यातून झालेली वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख , आणि जगाचे झालेलं नवीन आकलन . हॉस्टेल मधून बाहेर पडणारा माणूस अंतर्बाह्य बदलून बाहेर पडतो . क्रौर्य रस - होस्टेल हि एक खूप क्रूर गोष्ट पण आहे . अर्धेंदू नावाचा एक अर्धवट डोक्याचा पोरगा होता . त्याला वागण्या बोलण्याचा फारसा पोच नव्हता . इतर पोर त्याला छळ छळ छळायची . एकदा एका मुली ने तुला कार्ड दिल आहे आणि तुला भेटायला बोलावलं आहे अस सांगून आपणच एक कार्ड त्याच्या हातात कोंबल . त्या येड्याला पण ते खर वाटलं . आणि त्या पोरी समोर जाऊन काही तरी बोलल . पोरीन त्याला थोबडावला . बिचारा अर्धेंदू होस्टेल सोडून गेला . हॉस्टेल ला काही पूर्वोत्तर राज्यातून आलेली काही मुल होती . दिसायला एकदम वेगळी आणि भाषेचा प्रश्न . ग्रामीण भागातून आलेली इरसाल पोर त्याची जाम मजा घ्यायची . पण ते कधी कधी खूप अति करत . आपण किती रेशियल लोक आहोत हे तेंव्हा मला कळल . नंतर ती पुर्वोतर राज्यातली पोर एकजात सगळी लष्करात गेली . पण देशाचा उर्वरित भाग आपल्याला 'आपल ' समजत नाही हे फिलिंग त्यांच्या डोक्यातून गेल असेल का कधी ? भय रस आणि रौद्र रस - आमच्या हॉस्टेल ला रोज सकाळी ६ ते ६. ३० पीटी सक्तीची होती . आम्ही एखादा बकरा पकडून त्याला रूम ला बाहेरून कडी लावून घे आणि जा असे सांगून स्वतः मध्ये लोळत पडत असू . नंतर नंतर आजूबाजूच्या रूम मधले पोर पण सकाळी तिथे येउन पडायला लागले . रेक्टर सरांना याची कुणकुण लागली . एका दिवशी आम्ही असच बाहेरून कडी एकाला लावायला सांगितली आणि लोळत पडलो होतो आणि सर धाडकन दरवाजा उघडून मध्ये आले . आणि जमेल तसे हात पाय चालवायला सुरु केले . तो प्रसाद ग्रहण करत आम्ही धडपडत बाहेर आलो . नंतर २ आठवडे आम्हाला कॉलेज च्या मोठ्या मैदाना ला १५ चकरा मारण्याची शिक्षा मिळाली . शृंगार रस - बीभत्स रस हा सर्वाधिक आढळणारा रस असेल तर शृंगार रस हा सर्वाधिक अभाव असणारा रस . अर्थात काही मोजक्या वीरांचा अपवाद वगळून . जो काही शृंगार रस असतो तो एकाच format मध्ये . ईथे जे हॉस्टेल मध्ये राहिलेले आहेत त्या लोकांना तो न सांगताच कळेल . वीर रस - हॉस्टेल तुम्हाला शूर बनवत . घरून आलेला खाऊ इतरांपासून लपवून एकट्याने खाणे , एखाद्या खोडकर अंग्काठीने मोठ्या पोराला अंगावर घेणे , बंदी असताना रात्र भर पत्त्याचा डाव रंगवणे , खिशात शेवटचे ५० रुपये असताना महिन्याचे १५ दिवस काढणे , हॉस्टेल चे गेट ९. ३० ला बंद होत असते तरी पण रात्री पिक्चर बघायला जायचं आणि एका अवघड खांबाचा आधार घेऊन चढून जाण एक ना दोन प्रकार . खूप भितींवर मात करायला हॉस्टेल शिकवत . शांत रस - हॉस्टेल सोडण्याचा दिवस . सगळीकडे एक विचित्र ओक्वर्ड शांतता . सगळीकडे सामानाची बांधाबांध चालू . बाहेर निरव शांतता पण डोक्यात कल्लोळ . हे हरामखोर मित्र पुन्हा कधी भेटतील ? बाहेरच जग हॉस्टेल सारखच मजेशीर आणि भन्नाट असेल का ? आता कुठ राहायचं ?दुसऱ्या मेस चा मालक आपल्या मेस मालक भाऊ सारख बाहेर जेवायला जाताना पैसे उधार देईल का ? बिपीन आणि प्रभाकर सारख फास्ट फुड दुकान दुसरीकडे असतील का ? हॉस्टेल च्या खिडकीत बसून पडणारा पाऊस आणि नदीच वाढत जाणार पाणी तासंतास बघायला कसली मजा येते आता ती गेलीच का ? आपले ऋणानुबंध फ़क़्त या हरामी मित्रांसोबत च नव्हते तर या भव्य इमारती शी पण होते हे शेवटच्या दिवशी कळत .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20882
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

हॉस्टेल म्हणजे कशी भारी गोष्ट असते हे खुप लोकांकडुन ऐकलय.. लेखही मस्त जमलाय.. मला स्वतःला मात्र हॉस्टेलचा काही अनुभव नाही आणि कधी घ्यावसाही वाटला नाही.. आमच्या "प्रकॄतीचा" ओढा हा आईच्या हातचं गरम गरम खाण्याकडेच असल्याने घर सोडून जगण्याची इच्छा झालीच नाही!

आईच्या हातचं गरम गरम खाण्याकडेच इथे काही वाद होऊच शकत नाही . हॉस्टेल ला सगळेच हि चव मिस करतात

In reply to by पिंपातला उंदीर

अर्थातच!!! म्हणून तर घरून आलेली चटण्या लोणची गोडधोड़ आधी वॉर फुटिंग वर छाती चा कोट करून सांभाळण्यात अन नंतर त्याच हरामखोर रूममेट्स सोबत वाटुन खाण्यातच तर सर्वाइवल इंस्टिंक्ट अन कोऑपरेशन विकसित होते!! अर्थात घरी राहणार लोकांत ही ते डेवेलोप होतेच ! मी फ़क्त हॉस्टलाईट एनालॉजी सांगतोय त्याची

सहि है

मी पुण्यातील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या होस्टेल्मध्ये रहात होतो ..पुण्यातील सर्वात गरीब होस्टेल. ६०० रुपयात वर्षभर राहा अणि ९० रुपयात मासिक दोन्ही वेळचे जेवण ( १९८७) गरिब मुलांसाठीच होते ते होस्तेल. आज ही आहे. तिथे आठवड्याला चार तास काम करावे लागे आणि सकाळची योगासने करावी लागत. सगळेच नाडलेले आणि अडाणी .. गावाकडचे होते .. पण काय एकी असायची ! ज्ञानेश्वर पादुका चौकातील तुलसीचा चहा ही चैन आणि उम्मेदची कचोरी ही पार्टी ! फार सुंदर जग होते... पायात स्लीपर शिवाय वहाण नसयची ( परवडायचेही नाही ) आणि जिन्यावरून जाताना त्याचा आवाज करायचा नाही असा संकेत होता ... रेक्टर फार कडक होते ... आजही जीन्यावरून जाताना माझ्या पावलांचा आवाज होत नाही !

हॉस्टेलच्या आठवणी जाग्या झाल्या...छान लेख..!! १९९१ ते १९९५ अशी चार वर्ष सांगलीला कॉलेजच्या हॉस्टेलवर राहीलो. आयुष्यातली खुपच चांगली वर्षे होती ती...!! त्यामुळेच बरीचशी स्वतःची कामे स्वतः करायला लागलो. (म्हणजे कपडे धुणे, अंथरूण घालणे, पसारा आवरणे वगैरे). आमच्या हॉस्टेलपासून साधारणपणे १ किमी च्या अंतरावर एक "नीळ-चित्रपट" दाखवण्याचे ठिकाण होते. गंमत म्हणजे आमच्या रेक्टरची कधी कधी तेथे ही धाड पडायची आणि फक्त आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलवर राहणार्‍यांवर कारवाई व्हायची. (म्हणजे चित्रपट दाखवणारा आणि इतर प्रेक्षक हॉस्टेलच्या पोरांना हाकलून झाले की परत राहीलेला भाग सुरू करायचे). बर्‍याचवेळेला आमच्या कॉलेजमधल्या एक-दोन थोराड पोरांनी "बाहेरचा आहे हो मी" असे सांगून स्वतःला वाचवले होते. एक-दोन वेळेला त्यांनीच रेक्टरला बाकीच्या मुलांना हाकलण्यास मदत केली होती असे ऐकीवात होते. आमच्यात एकजण अशा "नीळ-चित्रपट" पहाण्यात इतका डेस्परेट असायचा की कधीही सांगितले की नवीन चित्रपट आलाय तर तो हातातले जे चालले असेल ते काम टाकून पहायला जायचा. त्याच्याविषयी आम्ही असे गंमतीत म्हणायचो की प्रत्यक्ष लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या वेळी सुद्धा कोणी त्याला नवीन नीळ-चित्रपटाविषयी माहिती दिली तर तो हातातले काम सोडून तिकडे पहिल्यांदा जाईल.

In reply to by योगी९००

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

In reply to by योगी९००

माळी ?!

हॉस्टेल च्या जगात एकट्यानेच एन्ट्री केली तरी जाताना माणूस कधीच एकटा बाहेर जात नाही . सोबत असतात ते जीवाला जीव लावणारे अनेक मित्र.
हॉस्टेल मधून बाहेर पडणारा माणूस अंतर्बाह्य बदलून बाहेर पडतो.
+१००० हॉस्टेलबद्दल किती आणि काय बोलणार? असंख्य किस्से आहेत एकेक कारण प्रत्येक दिवस नविन काहीनाकाही घेवून यायचा. माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण होते ते. गेले ते दिवस आता राहील्या फक्त आठवणी. :(

आई ग्ग्ग्ग्ग!! होस्टेल म्ह्टलं आत्ता ही अंगावर रोमांच येतात. काय दिवस होते ते. माझ्या आयुष्याची बरीचशी वर्षे होस्टेल मध्ये गेली. पण सगळ्यात जास्त आठवतात ते इंजिनिअरिंगच्या होस्टेलचे दिवस. आमच्या होस्टेलला त्यावेळी मध्ययुगातले नियम होते. आमच्या होस्टेलवर लक्ष ठेवण्यासाठी ' आप्पा' नावचा एक ७५-७६ वर्षाचा अति कजाग म्हातारा ठेवला होता. इतका खडुस माणुस माझ्या पाहण्यात तरी अजुनही आला नाहीये. ( मिपावर काही नग आहेत पण मी त्यांना प्रत्यक्षात पाहीलं नाहीय =)) ) वय इतकं असलं तरी आप्पांची स्मरणशक्ती, दृष्टी, श्रवणशक्ती अतितीव्र होती. नुकत्याच जॉइन झालेल्या एक मॅडम रेक्टर म्हणुन काम करत, पण आम्ही त्यांना अज्जिबात दाद देत नसु. त्या सुद्धा आम्हाला घाबरुन असत. टेपरेकॉर्डर वापरायला बंदी असायची. होस्टेलचा गिझर खुप कमीवेळा चालु असायचा. पहिली दोन वर्षे तर आमच्या रुम्स मध्ये इलेक्ट्रिक पावर आउट्लेट्स च नव्हते. बल्ब च्या पोर्टला अ‍ॅडाप्टर जोडुन त्याला एक्सटेंशन बोर्ड कनेक्ट करुन त्यावर आम्ही जवळपास सगळी यंत्र चालवत असु. :) अप्पा कधीही धाड टाकुन ते जप्त करत असे, आम्ही तर आमच्या रुममध्ये बर्यापैकी मोठी साउंडसिस्टीम च आणुन ठेवली होती. अन हे यंत्र दिवसातले ५-६ तास अविरत चालु असे. साधारण ३० सेकंदात सगळ्यात वायरींसकट हि सिस्टीम खोक्यात टाकायची आणि हातात येईल ते पुस्तक शांतपणे वाचत बसायची आम्ही इतकी तालिम केली होती की चार वर्षात आमच्या मनोरंजनाच हे साधन कधीही आप्पांच्या तावडीत सापडलं नाही. कोणाचा वाढदिवस असला की रात्री सेलिब्रेशन झाल्यावर आम्ही एका रुमध्ये २५-३० पोरी पाय तुटेपर्यंत नाचत असु. बर्याचदा आप्पांची धाड पडायची. तेव्हा शुन्य मिनिटात मागच्या दाराने पळून जाऊन वाट्टेल त्या रुम मध्ये घुसुन आम्ही झोपायचं नाटक करायचो. एकदा मात्र खुपच मोठा आवाज असल्याने आप्पा भयंकर चिडले होते. त्यांनी सगळ्या रुम्सची दारं वाजवुन सगळ्यांना बाहेर जमा व्हायला सांगितलं. नाचुन नाचुन घामानं थबथबलेल्या आम्ही, "आम्ही तर बुवा झोपलो होतो" अशा साळसुद थापा मारत होतो. अप्पा बर्याच धमक्या देउन गेल्यावर जो हास्यकल्लोळ माजला होता त्याला तोड नाही. होस्टेचं गेट ७:३० वाजता बंद व्हायचं. कधी मुव्ही वगैरे बघायला गेलो, बाहेर फिरायला गेलो तर उशीर व्हायचा. तेव्हा आम्ही कंपाउंडवरुन उड्या मारुन आत यायचो. एकदा रात्री आठ वाजता वगैरे निवांत बाहेर हिंडत असताना एका सरांना पाहुन गल्लीबोळातुन धावत होस्टेल गाठलेलं आठवतं. आमची मेस होस्टेलपासुन थोड्या अंतरावर होती. संध्याकाळी मेसच्या अंगणात चहाची टाकी ठेवली जायची. फॅकल्टीज च्या क्वार्टस मधले टिचर्स पण तिथे चहाला यायचे. त्या शिक्षकांमध्ये नुकतेच एम टेक पासआउट करुन फॅकल्टी म्हणुन जॉईन झालेले, खुप खुप स्मार्ट, देखणे असे ' बबलु' सर पण असायचे. ते चहाला येईपर्यंत आम्हीही चहासाठी थांबुन रहायचो. ते आले रे आले की की वारुळातुन मुंग्या बाहेर याव्यात तशा आम्ही कप घेऊन मेसकडे धाव घेत असु. ते दिसतील अशा जागा पकडुन आम्ही ते नर्व्हस होतील इथपर्यंत खुसफुस करुन हसायचो. त्यांच्या सोबत असणार्या इतरांच्या पण ते नंतर नंतर लक्षात आलं. आम्ही आलो की ते "बबलु" सरांना कोपरखळ्या मारत. बबलु सर आम्हाला शिकवायला नव्हते त्यामुळे तसं काही घाबरायचं कारण नव्हतं आणी ते बिचारे इतके लाजाळु होते की आम्ही चहाला आलो की ते कावरेबावरे व्हायचे. जाम धम्माल यायची. होळी वगैरे खेळायला कोण परमिशन देतय, पण आम्ही न चुकता दणक्यात रंग खेळायचो. थर्ड ईयरला असताना होळीनंतर दोन दिवसांनी व्हाईवा होती. आणि आम्ही आधी भयंकर रंग खेळलो होतो. त्यात कोणितरी एक विचित्र रंग आणला होता. अन तो रंग निघायचं नावच घेत नव्हता. तेव्हा आम्ही अक्षरशः तसली तोंडं घेउन कॉलेजला गेलो होतो. कडकडीत इस्त्रीत आलेली मुलं आणि चेहर्यावर रंगाचे डाग घेउन आलेल्या मुली पाहुन सरांचे डोळे रागाने गरगर फिरले होते. पण झकास व्हाईवा देण्यात आम्ही पाचहीजणी ( मॅकॅनिकल ;) मुळे इतक्याच खुप झाल्या ) पटाईत होतो म्हणुन वाचलो. दसर्याला आम्ही कुठुन कुठुन धान्यांच्या लोंब्या जमवुन पानाफुलांच्या आणी लोंब्यांच्या तोरणांनी होस्टेलचा व्हरांडा देखणा सजवत असु. एकदा नुकतंच गॅदरिंग पार पड्ल्यामुळे सोबत साड्या होत्या... बरेच प्रयत्न करुन कुठुनसा बांबु मिळवुन गुढीपाडव्याची गुढी देखील उभारलेली. कुणाच्याही डोक्यात कुठलीही टुम येणार न बाकीच्या जणी ती पार पाडायला सदैव तयार :) सबमिशन साठी जागवलेल्या रात्री, एक्झामधे मारलेल्या नाईट्स. बापरे !! केवळ अविस्मरणीय!! माझ्या एका साउथइंडीयन रुममेट्ला श्वासनलिकेच सिरियस इन्फेक्शन झालं होतं. त्या रात्री तिला आयसीयु मधे टाकावं लागलं होतं. तिच्या घरुन कोणी यायचं म्हटलं तरी ३-४ दिवस लागणार होते. त्या चार दिवसात आम्ही परिक्षा सुरु असताना सुद्धा हॉस्पिटल मधे रात्री जागुन काढल्या होत्या. तिच्या औषधांसाठी अवघ्या अर्ध्या तासात विस हजार रुपये जमवले होते. या सगळ्यात कॉलेजने सौजन्य म्हणूण सुद्धा काही तसदी न घेतल्याबद्दल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन बरोबर प्रचंड वाद घातला होता. ४ दिवसांनी तिची आईवडील आले. तेव्हा आमचे आभार मानताना त्या काकु ढसाढसा रडल्या होत्या. आता मागे वळुन पाहिलं तर होस्टेल म्हटलं की मेस चं भिकार जेवण, अंघोळीला मिळणारं थंडगार पाणी, कट्टर शत्रुत्व, भांडण, हेवेदावे असलं काही आठवत नाही. अभ्यास तर मुळीच नाही !! आठ्वतात ते फक्त तोंड सुके पर्यंत मारलेल्या गप्पा, पोटाच्या स्नायुंना पीळ पडे पर्यंत आलेलं हसु, सेलिब्रेट केलेले साधे साधे क्षण, जोडलेली घट्ट मैत्री, वाटलेली सुखं, उडवुन लावलेली दुखः, एक स्ट्राँग पर्सनॅलिटी बनायचा प्रवास. !!! टाकेल तिथं उगवायचा जो गुण या दिवसांनी दिला त्यातुन कधीच उतराई होता येणार नाही :)

In reply to by आनन्दिता

मस्त लेख व प्रतिसाद! आनन्दिता, तुझा प्रतिसाद तर फारच आवडला. मी होस्टेलला कधी राहीले नाही परंतू माझी इंजिनिअरींगची बेस्ट फ्रेंड होस्टेलला राहायची. तिच्यामुळे कळायच्या गमती जमती. :)

In reply to by आनन्दिता

भारी प्रतिसाद आनन्दिता - फार आवडला, विशेषत: शेवटचे दोन परिच्छेद आणि समारोपाचं वाक्यं - जियो!

In reply to by आनन्दिता

ते आले रे आले की की वारुळातुन मुंग्या बाहेर याव्यात तशा आम्ही कप घेऊन मेसकडे धाव घेत असु. ते दिसतील अशा जागा पकडुन आम्ही ते नर्व्हस होतील इथपर्यंत खुसफुस करुन हसायचो. त्यांच्या सोबत असणार्या इतरांच्या पण ते नंतर नंतर लक्षात आलं. आम्ही आलो की ते "बबलु" सरांना कोपरखळ्या मारत.
मला का ही मुलगी इतके दिवस सज्जन वगैरे वाटत होती!!! भेटावं लागेल आता तुला जरा...!! ज ह ब ह र द स्त लिहीलयस!!!

In reply to by आनन्दिता

@इतका खडुस माणुस माझ्या पाहण्यात तरी अजुनही आला नाहीये. >> =))))) @होळी वगैरे खेळायला कोण परमिशन देतय, पण आम्ही न चुकता दणक्यात रंग खेळायचो.>> मंजे मी दुष्ट दुष्ट म्हणतो ते आगदी बरोब्बर लागू आहे! =)) @टाकेल तिथं उगवायचा जो गुण या दिवसांनी दिला त्यातुन कधीच उतराई होता येणार नाही>> ह्ये एंडिंग लँडिंग मात्र...लै लै भारी! :)

भन्नाट *lol* *LOL*

ह्यातला शब्द नि शब्द जगलोय :) पण हा उंदीर जरा जास्तच लडबडतोय ह्या धाग्यववर .. धागा एकदा काढला की मिपाकर त्याची अटोमॅटिक रिळ काढतात बरका पिंपा

In reply to by माझीही शॅम्पेन

एक तर अनोळखी लोकांनी मला अरे तुरे केलेलं आवडत नाही . नंबर २- मी माझा पैसा खर्च करून मी काढलेल्या धाग्यावर प्रतिसाद देत आहे . त्यामुळे फालतू सल्ले देऊ नका . नंबर ३- मी मिपा वर २ वर्षापासून आहे आणि इथ बरच लिखाण केल आहे त्यामुळे मिपा काय आहे आणि मिपाकर कसे आहे हे मला सांगू नये . अपमान करून घेतल्याबद्दल धन्यवाद .

In reply to by पिंपातला उंदीर

मान अपमानहे मानण्यावर आहे प्रत्येक व्यक्ती सापेक्ष आहे, टोपण नावा-वरुन इतक झोंबणार असेल तर काही खर नाही भाऔ ! एवढ रागावयच कारण कळल नाही. असो तुमच चालुद्या (विषारी नसलेली शॅम्पेन)

मस्त प्रतिसाद आनन्दिता.अगदी आमचे हाॅस्टेलचे दिवस जागे केलेस.फक्त आम्हाला कसलंच बंधन नव्हतं वेळेचं आणि एका बबलु सारखे दशकुमार होते.त्यांचे चरित्रवाचन व्हायचे ^_~