Skip to main content

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०१४-१५) - यावेळी तरी लाज राखणार का?

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 08/12/2014 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
_________________________________________________________________________________ मंगळवार २५ नोव्हेंबर २०१४ या दिवशी ऑस्ट्रेलियाचा तरूण व भरवशाचा फलंदाज फिल ह्यूज स्थानिक सामना खेळताना एक उसळता चेंडू हेल्मेटच्या खाली कानाच्या मागे लागून मैदानावरच कोसळला व दोनच दिवसांनी गुरूवार २७ नोव्हेंबर २०१४ या दिवशी कोमातच वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याचे दु:खद निधन झाले. :sad:

फिल ह्यूजला भावपूर्ण श्रद्धांजली! :sorry: _________________________________________________________________________________ भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात २४ नोव्हेंबर २०१४ ते १० जानेवारी २०१५ या दरम्यान कसोटी क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली आहे. कसोटी मालिका संपल्यावर १६ जानेवारी २०१५ ते ३० जानेवारी २०१५ या दरम्यान भारत-इंग्लंड्-ऑस्ट्रेलिया हे ऑस्ट्रेलियात एकदिवसीय तिरंगी मालिकेत खेळतील. फिल ह्यूजच्या दु:खद अपघाती निधनामुळे मालिकेच्या वेळापत्रकात थोडासा बदल करण्यात आला आहे. या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा आहे. (त्यानंतर १४ फेब्रुवारी २०१५ पासून ११ वी मर्यादित षटकांची एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मध्ये होणार आहे. भारताचा पहिलाच सामना १५ फेब्रुवारीला पाकड्यांबरोबर आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी नंतर स्वतंत्र धागा उघडता येईल.) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाविरूद्ध ४ कसोटी सामने सामने खेळेल. तत्पूर्वी भारत २ सराव सामने खेळेल. कसोटी मालिका संपल्यावर भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकेत एकमेकांबरोबर २-२ सामने खेळतील. ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारताचा कसोटी संघ असा आहे. धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहीत शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, नमन ओझा, रविचंद्रन अश्विन, कर्ण शर्मा, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरूण एरॉन - लोकेश राहुल, नमन ओझा व कर्ण शर्मा यांना भारतीय संघात प्रथमच संधी मिळाली आहे. - २०११ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात रहाणेला फक्त २ स्थानिक सामन्यात खेळविले होते. प्रत्यक्षात एकही कसोटी व एकदिवसीय सामन्यात त्याला खेळविले नव्हते. यावेळी तो दोन्ही प्रकारच्या सामन्यात नक्की खेळेल. - सध्या सुरू असलेल्या श्रीलंका विरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी करत असलेल्या फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला न घेतल्याचे आश्चर्य वाटत आहे. तो फलंदाजी देखील बर्‍यापैकी करतो. कर्ण शर्माऐवजी तो उपयुक्त ठरला असता. - भारताची वेगवान गोलंदाजी भक्कम वाटते (भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरूण एरॉन ). त्या तुलनेत फलंदाजी तितकीशी भक्कम वाटत नाही. भारतीय खेळपट्ट्यांवर भीमपराक्रम करणारे फलंदाज ऑस्ट्रेलियातील जलद खेळपट्ट्यांवर कसे टिकतात ते बघायचं. - भारताने धोनी, साहा व ओझा असे ३ यष्टीरक्षक घेतलेले आहेत. - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन तुफान फॉर्मात आहे. तो अत्यंत वेगवान व शरीरवेधी गोलंदाजी टाकतो. त्याच्या जोडीला पीटर सिड्ल, पॅटीन्सन, स्टार्क, बॉलिंजर, रायन हॅरीस इ. गोलंदाज असतीलच. जॉश हॅझलवूड हा नवा वेगवान गोलंदाज नुकत्याच संपलेल्या द. आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगलाच चमकला होता. तो देखील संघात असण्याची शक्यता आहे. या वेगवान मार्‍यासमोर ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर खेळणे अवघड आहे. - या दौर्‍यात पर्थच्या अत्यंत वेगवान खेळपट्टीवर कसोटी सामना आयोजित केलेला नाही. हे भारतासाठी सुचिन्ह आहे. पर्थवर भारत इतिहासात एकच सामना जिंकलेला आहे. - उजव्या मनगटाच्या दुखापतीमुळे धोनी अ‍ॅडलेडमधील पहिल्या कसोटीत कदाचित खेळणार नाही. त्याच्याऐवजी कोहली कर्णधार असेल. धोनीऐवजी बहुतेक वृद्धीमान साहा यष्टीरक्षक असेल. भुवनेश्वर कुमार देखील दुखापतीमुळे पहिले दोन कसोटी सामने खेळणार नाही. - भारत १९८६ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात सचिनशिवाय खेळणार आहे. सचिन यापूर्वी ऑस्ट्रेलियातील १९९२, १९९९, २००३, २००८ व २०११ या सर्व मालिकेत खेळला होता. - २०११-१२ च्या दौर्‍यातील बहुसंख्य खेळाडू आता भारतीय संघात नाहीत. सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, झहीर, हरभजन, विनयकुमार असे अनेक खेळाडू या संघात नाहीत. _________________________________________________________________________________ दौर्‍याचे सुधारीत वेळापत्रक सराव सामने २४ नोव्हेंबर - २५ नोव्हेंबर वि. क्रिकेट ऑस्ट्रेलिया इंटरनॅशनल इलेव्हन (स्थळ - अ‍ॅडलेड) ०४ डिसेंबर - ०५ डिसेंबर वि. क्रिकेट ऑस्ट्रेलिया इंटरनॅशनल इलेव्हन (स्थळ - अ‍ॅडलेड) कसोटी सामने (पहिले २ कसोटी सामने भा.प्र.वे. नुसार पहाटे ५:३० वाजता सुरू होतील व उर्वरीत २ कसोटी सामने पहाटे ५:०० वाजता सुरू होतील) पहिला कसोटी सामना : मंगळवार ९ डिसेंबर - शनिवार १३ डिसेंबर (स्थळ - अ‍ॅडलेड ओव्हल) दुसरा कसोटी सामना : बुधवार १७ डिसेंबर - रविवार २१ डिसेंबर (स्थळ - ब्रिस्बेन) तिसरा कसोटी सामना (खोकेदिन कसोटी सामना): शुक्रवार २६ डिसेंबर - मंगळवार ३० डिसेंबर (स्थळ - मेलबर्न) चौथा कसोटी सामना : मंगळवार ०६ जानेवारी - शनिवार १० जानेवारी (स्थळ - सिडने) ५० षटकांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (सर्व सामने भा.प्र.वे. नुसार सकाळी ८:५० वाजता सुरू होतील) (१) शुक्रवार १६ जानेवारी इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया (सिडने) (२) रविवार १८ जानेवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया (मेलबोर्न) (३) मंगळवार २० जानेवारी भारत वि. इंग्लंड (ब्रिस्बेन) (४) शुक्रवार २३ जानेवारी इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया (टास्मेनिया) (५) सोमवार २६ जानेवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया(सिडने) (६) शुक्रवार ३० जानेवारी भारत वि. इंग्लंड (पर्थ) (७) रविवार ०१ फेब्रुवारी - अंतिम सामना (पर्थ) _________________________________________________________________________________ भारताच्या ऑस्ट्रेलियातील २०११-१२ मधील मालिकेतील कटू आठवणी अजून ताज्या आहेत. या मालिकेत भारत सर्व ४ कसोटी सामने हरला होता. भारताचे बहुतेक सर्व स्टार खेळाडू (सेहवाग, गंभीर, लक्ष्मण, द्रविड, सचिन, कोहली, धोनी इ.) अपयशी ठरले होते. सचिनने पहिल्या दोन कसोटीत चांगली फलंदाजी केल्यावर उर्वरीत दोन कसोटीत तो अपयशी होता, तर कोहली पहिल्या दोन कसोटीत अपयशी व शेवटच्या दोन कसोटीच चांगला खेळला होता. उर्वरीत फलंदा़ज बहुतेक सर्व सामन्यात अपयशी होते. त्यामुळेच भारताचा सपाटून पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्क (१ द्विशतक व १ त्रिशतक), पाँटिंग (१ शतक व ४ अर्धशतके), मायकेल हसी, डेव्हीड वॉर्नर यांनी फलंदाजीत चंगळ केली होती. गोलंदाजीत पॅटिन्सनने भारतीय फलंदाजांची हवा केली होती. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत देखील भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळविता आला नव्हता. त्या मालिकेतील श्रीलंकेविरूद्ध शेवटचा सामना भारताच्या विशेषतः विराट कोहलीच्या तुफान फलंदाजीमुळे गाजला होता. अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला बोनस गुण आवश्यक होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून ५० षटकात तब्बल ३२० धावा केल्यावर बोनस गुणासाठी भारताला ते आव्हान ४० षटकात पार करणे आवश्यक होते. भारताने ते आव्हान फक्त ३६.४ षटकात पूर्ण करून इतिहास घडविला होता. सेहवाग (२० चेंडूत ३०), सचिन (३० चेंडूत ३९), गंभीर (६१) आणि कोहली (१२० चेंडूत १४०) यांच्या तुफान फलंदाजीमुळे भारताने तो सामना बोनस गुणासह जिंकला. त्या सामन्यात मलिंगाचे पृथ्थकरण ७.२-०-९६-० इतके वाईट होते. त्या संघातील फारच थोडे खेळाडू आताच्या संघात आहेत. त्या दु:खद मालिकेनंतर गतवर्षी भारताने ऑस्ट्रेलियाला मायदेशात ४-० अशी जबरदस्त मात दिली होती. अश्विन (२९ बळी) व जडेजा (२२ बळी) यांनी ती मालिका गाजविली होती. आताचा भारतीय संघ तरूण आहे. कोहली, रहाणे, पुजारा इ. कडून खूप आशा आहेत. लोकेश राहुलला देखील संधी मिळावी. रोहीत शर्माने भारतातला फॉर्म तिथे टिकवून धरावा ही सदिच्छा. मुरली विजय, शिखर धवन आणि स्वतः धोनी ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर कसे खेळतात ते बघणे मनोरंजक ठरेल. कोहली ६ महिन्यांपूर्वी झालेल्या इंग्लंडमधील मालिकेत संपूर्ण अपयशी ठरला होता. हे अपयश धुवून टाकण्याची संधी त्याला आहे. भुवनेश्वर कुमार, शमी, उमेश यादव, वरूण एरॉन इ. वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर नक्की खूष होतील. उमेश यादवने मागील दौर्‍यात पर्थच्या खेळपट्टीवर ५ बळी मिळवून आपला दर्जा दाखवून दिला होता. या दौर्‍यानंतर लगेचच १४ फेब्रुवारीपासून विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. या दौर्‍यातील कामगिरीवरच विश्वचषक संघातील खेळाडू निवडले जातील. त्याचेही दडपण खेळाडूंवर असेल. फिल ह्यूजच्या धक्कादायक मृत्युमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूदेखील चांगल्या मन:स्थितीत नाहीत. जेव्हा फिल ह्यूज मैदानावर कोसळला तेव्हा शेन वॉटसन, ब्रॅड हॅडिन, शॉन मार्श हे प्रत्यक्ष मैदानात क्षेत्ररक्षण करीत होते व त्यांच्या डोळ्यादेखत त्यांनी फिल ह्यूजला कोसळताना बघितल्यामुळे त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलेला आहे. फिल ह्यूजचा जवळचा मित्र व मार्गदर्शक असलेल्या मायकेल क्लार्कला अश्रू अनावर झाले होते. अशा परिस्थितीत काहीशा दडपणाखालीच ऑस्ट्रेलियन्स पहिले १-२ कसोटी सामने खेळतील. परंतु कांगारू अत्यंत लढवय्ये आहेत व या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर येऊन आपली नैसर्गिक लढवय्यी वृत्ती दाखवतील हे निश्चित. ऑस्ट्रेलियन भूमीवर गेल्या ३०-४० वर्षातील भारताविरूद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकांचा इतिहास भारताच्या दृष्टीने फारसा चांगला नाही. - १९७७-७८ मधील दुय्यम ऑस्ट्रेलियन संघाविरूद्ध खेळलेली ५ सामन्यांची मालिका भारत २-३ असा हरला होता. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व ५ सामने निर्णायक ठरले व ऑस्ट्रेलियाने निवृत्तीनंतर ९ वर्षांनंतर परत बोलावून कर्णधारपद सोपविलेल्या बॉबी सिम्प्सनने दुय्यम संघ हाताशी घेऊन ही मालिका ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली. - १९८०-८१ मधील ३ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेतील ६ डावांपैकी पहिल्या ५ डावात ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजविले होते. या मालिकेत संदीप पाटीलची तुफान फटकेबाजी पहायला मिळाली. ३ र्‍या कसोटीतील शेवटच्या डावात खोटा बाद दिल्याने संतापून कर्णधार गावसकर मैदान व सामना सोडून निघाल्यामुळे खळबळ माजली होती. याच डावात कपिलने अंगात ताप असताना जबरदस्त गोलंदाजी करून ५ बळी मिळवून कांगारूंना केवळ ८३ धावात गुंडाळून सामना जिंकून दिला होता. - १९८५-८६ मधील ३ सामन्यांची मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत ३ र्‍या सामन्यात सामना जिंकून ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकण्याची भारताला उत्कृष्ट संधी होती. ५ व्या दिवशी विजयासाठी केवळ १२६ धावा करायच्या होत्या. भारताकडे श्रीकांत, शास्त्री, वेंगसरकर, अझरूद्दीन, मोहिंदर, गावसकर, कपिल, मोरे असे अनेक फलंदाज होते. त्या दिवशी शेवटच्या सत्रात पाऊस येईल असा देखील अंदाज होता. पावसाची शक्यत गृहीत धरून भारताने वेगात फलंदाजी करून १२६ धावा करून सामना जिंकायला पाहिजे होता. प्रत्यक्षात भारताच्या फलंदाजांनी अत्यंत संथ फलंदाजी केली. पाऊस अपेक्षेपेक्षा थोडा लवकर आल्यामुळे सामना थांबून अनिर्णित राहिला. पाऊस सुरू झाला तेव्हा भारताने २५ षटकात फक्त २ बाद ५८ धावा केल्या होत्या. खरं तर २५ षटकात १२६ धावा सहज झाल्या असत्या. अत्यंत ढिसाळ नियोजनामुळे भारताने सामना व मालिका जिंकण्याची दुर्मिळ संधी घालविली. भारताने आजतगायत ऑस्ट्रेलियात कधीही मालिका जिंकलेली नाही हे लक्षात घेता भारताने ही सुवर्णसंधी अक्षरशः वाया घालविली. - १९९१-९२ ची ५ सामन्यांची मालिका अत्यंत एकतर्फी झाली. भारताने ही मालिका ०-४ अशी गमाविली. ही मालिका वेंगसरकरच्या जीवनातील शेवटची मालिका ठरली. या मालिकेनंतर लगेचच होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत संघात निवड न झाल्यामुळे वेंगसरकर क्रिकेटमधून निवृत्त झाला. या मालिकेतील ३ रा सामना अनिर्णित राहिला. त्यात शास्त्रीने द्विशतक व ४ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली होती. - १९९९-२००० ची ३ सामन्यांची मालिका हे एक दु:खद स्वप्न आहे. सचिनच्या नेतृत्वाखाली भारताने ही मालिका ०-३ अशी गमाविली. या मालिकेसाठी भारताचा निवडलेला संघ हा भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट संघ होता. सचिन, द्रविड व लक्ष्मण वगळता उरलेले जवळपास सर्व खेळाडू अत्यंत सुमार होते. द्रविड व लक्ष्मण सुद्धा मालिकेत अपयशी होते. आगरकर या मालिकेत लागोपाठ ७ डावात शून्यावर बाद झाला होता. या मालिकेनंतर सचिनने कर्णधारपद कायमचे सोडले. - २००३-०४ ची ४ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसरा सामना भारताने जिंकून आघाडी घेतली होती. परंतु तिसरा सामना हरल्यामुळे व चौथा अनिर्णित राहिल्यामुळे मालिका बरोबरीत सुटली. या मालिकेनंतर स्टीव्ह वॉ निवृत्त झाला. दुसर्‍या कसोटीत द्रविडने २४८ व नाबाद ७० अशी जबरद्स्त कामगिरी केली होती. आगरकरने देखील दुसर्‍या डावात ६ बळी मिळवून ऑसीजना २०० धावांच्या आत रोखून विजयाचे दार उघडले होते. - २००७-०८ ची मालिका पंच स्टीव्ह बकनर यांच्या अत्यंत खराब कामगिरीमुळे व सायमंड्स व हरभजन यांच्यातील वादावादीने गाजली. भारताने ही मालिका १-२ अशी गमाविली. दुसर्‍या कसोटीत बकनर यांनी अनेक चुकीचे निर्णय दिले व ते सर्व निर्णय भारताविरूद्ध गेले. त्याच सामन्यात सामन्याची केवळ २ षटके राहिली असताना भारताचे ७ गडी बाद होते व केवळ २ षटके खेळून काढायची होती. परंतु मायकेल क्लार्कने शेवटून दुसरे षटक टाकताना त्या षटकात ३ बळी मिळवून ऑस्ट्रेलियाला विजय प्राप्त करून दिला होता. या मालिकेतील पर्थमधील तिसर्‍या सामन्यात इशांत शर्माने एक जबरदस्त स्पेल टाकून पॉंटिंगला अक्षरशः घाम फोडला होता. या मालिकेत कुंबळे अत्यंत सभ्य व प्रगल्भ कर्णधार या स्वरूपात दिसला होता. - २०११-१२ ची मालिका अत्यंत वाईट गेली. भारत या मालिकेतील सर्व ४ सामने हरला. सचिन, सेहवाग, द्रविड, लक्ष्मण असे दिग्गज फलंदाज असूनही भारत अत्यंत वाईट पद्धतीने हरला. या मालिकेनंतर त्याच वर्षात द्रविड व लक्ष्मण निवृत्त झाले. गंभीर, द्रविड, लक्ष्मण व सेहवागची कामगिरी पूर्णपणे ढासळली. सचिन पहिल्या दोन सामन्यात तर कोहली शेवटच्या दोन सामन्यात चांगला खेळला. परंतु संघ म्हणून भारताची पूर्ण वाट लागली. सचिनशिवाय खेळली जाणारी गेल्या २३ वर्षातील ही पहिलीच मालिका. सचिनची उणीव अजून भासते आहे. सचिन निवृत्त झाल्यावर देव्हारा अजून रिकामाच आहे. आता नवीन देव शोधायचा. या सर्व कटूगोड आठवणींच्या पार्श्वभूमीवर २०१४-१५ मधील या दौर्‍यात भारत विजयी व्हावा हीच अपेक्षा आणि सदिच्छा!

वाचने 27656
प्रतिक्रिया 138

प्रतिक्रिया

आज आणि उद्या टाइमपास करत बसणार... कधी-कधी असापण फुकटचा टाइमपास करावसा वाटतो...

दोन्ही संघांना समसमान दिवस गेला. भारताला एक गोलंदाज कमी पडतोय. रोहीत शर्माला वगळले ते चांगले केले, परंतु त्याच्याऐवजी अक्षर पटेल किंवा रैना आत आला असता तर एक जास्तीचा गोलंदाज मिळाला असता. एकंदरीत खेळपट्टीत फारसा दम दिसत नाही. गोलंदाजांना खेळपट्टीचा फारसा उपयोग झाला नाही व फलंदाजी सुद्धा संथ झाली. अश्विनला परदेश दौर्‍यावर न्यावे की नाही याचा विचार व्हायला पाहिजे. त्याने आतापर्यंत २१ कसोटीत १०९ बळी घेतले आहेत. २१ पैकी तो ६ कसोटी सामने परदेशात खेळला आहे व त्यात त्याने फक्त १४ बळी घेतले आहेत. भारतात खेळलेल्या १५ कसोटीत त्याला तब्बल ९५ बळी मिळाले आहेत. एकंदरीत तो परदेशात अजिबात प्रभावी ठरत नाही असं दिसतंय.

ऑस्ट्रेलिया ५ बाद २१६ वरून सर्वबाद ५३०. पुन्हा एकदा खालच्या फलंदाजांनी रडविले. हॅडीन ५५, हॅरिस ७४, मिचेल जॉन्सन २८ यांनी स्टीव्हन स्मिथच्या बरोबरीने चंगळ केली. स्मिथ भारताला चांगलाच नडलाय. आतापर्यंतच्या ५ डावात ३ शतके व १ अर्धशतक करून १८९.०० या सरासरीने त्याने तब्बल ५६७ धावा केल्या आहेत. रॉजर्सनेही लागोपाठ ३ डावात अर्धशतके करून चंगळ केली आहे. भारताची गोलंदाजी परदेशात फारच निष्प्रभ ठरलीये. फलंदाजीकेंद्रीत आयपीएल या तमाशाचे दुष्परीणाम २०११ मध्येच दिसायला सुरूवात झाली होती. २०१४ मध्ये गोलंदाजी अजून खालावली आहे. भारताने १ बाद १०८ अशी चांगली सुरूवात केली आहे. धवन पुन्हा एकदा स्थिरावल्यावर २८ वर बाद झाला. धवनने या वर्षाच्या सुरवातीला न्यूझीलँड मध्ये शतक आणि मागच्या सामन्यात ८१ हे दोन डाव सोडले तर बाकी कामगिरी यथातथाच आहे. एकतर त्याला ६ व्या क्रमांकावर खेळवावे किंवा डच्चू द्यावा. पुजाराही इंग्लंडच्या दौर्‍यापासून धडपडत आहे. असा फलंदाज ३ र्‍या क्रमांकासाठी अजिबात योग्य नाही. सामन्याचा निर्णय काय होणार (म्हणजे ऑस्ट्रेलिया जिंकणार का सामना अनिर्णित राहणार) ते उद्याच कळेल.

भारताचा आजचा दिवस चांगला चालला आहे. अजिंक्य रहाणे आणि विराट यांनी शतकी खेळी करुन अजूनही मैदानावर टीकून आहे, अतिशय सकारात्मक खेळ. अजिंक्य राहणे यांनी बाऊंसरला मस्त धुतला चांगले खेळताहेत. आजचा खेळ संपेपर्यंत पाचशेची मजल मारायला हरकत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजिंक्य राहणेचा एका बेजाबदार स्वीपच्या नादात पायचित झाला आणि त्यानंतर आलेल्या के. राहुलला सामन्यात आपली फलंदाजी दाखवायची चांगली संधी होती. एक झेल सुटला होता आणि स्वतःच्या दोन की तीनच धावा झालेल्या होत्या आणि लगेच हवेत मारायची काय गरज नव्हती झेलबाद होउन तोही परतला. आता कर्णधार धोनी ज्याने कधीच परदेशात शतक केलेलं नाही, आज मैदानावर उभे राहुन विराटला साथ देण्याची गरज आहे, शंभर धागा अजून हव्या आहेत. दोन दिवसाचा खेळ बाकी आहे, किमान शंभर धावांची आघाडी मिळावी सामना वाचवायचा असेल तर असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद प्रकाशित करत नै तर धोनीही परतला. कसोटी सामन्याचं कर्णधारपद काढून घेतलं पाहिजे याचं. लै कौतुक झालं याचं. -दिलीप बिरुटे

परदेशात कसोटीत संधीवर पाणी कसं ओतायचं हे भारतीय संघाला चांगलच माहीत आहे.. लोकेश राहुल डोक्यात भुसा भरल्यासारखा खेळला !!!

In reply to by बाळ सप्रे

आजच्या दिवसाच ८ षटकाचा खेळ बाकी शमी आणि विराट खेळतोय. विराटने स्ट्राइक आपल्याकडे जास्त ठेवणे गरजेचं धावा मिळवणे आणि विकेट सांभाळणे गरजेचे. -दिलीप बिरुटे

विराट कोहलीच सचिनचे सर्व धावांचे विक्रम मोडेल असं मला नेहमी वाटतं पण स्वभावाला मुरड घातली पाहिजे. ८२ धावांनी आपण मागे आहोत कशाला मसल दाखवतोय गोलंदाजाला अरे बाबा शांत राहून निमूट खेळ कर राजा. ४५०-७ दिलीप बिरुटे

विराट १६९ वर परतला बाहेर जाना-या चेंडुला ब्याट घातली आणि आपली अवसान घातकी भारतीय फलंदाजी संपली ४६२-८ दोन दिवस बाकी आहेत उद्या दिवसभर ते फलंदाजी करतील शेवटी आपल्याला फलंदाजी देतील असे वाटते अनिर्णित कड़े जाता येईल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तरी पण चालेल... आपले फलंदाज तो पण आनंद आपल्याला मिळू देतील की नाही, ही पण एक शंका आहे.

३ बाद ४०९ वरून ८ बाद ४६२. ऑस्ट्रेलियाच्या आणि आपल्या तळाच्या फलंदाजात जमीनअस्मानाचा फरक आहे. धवन आणि पुजाराला ३० चा आकडा पार करता येत नाहीय्ये. दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाचे फलंदाज जास्तीत जास्त २७-२८ धावाच करताहेत हे फारसं चांगलं दृश्य नाही. नवोदीत राहुल आज बहुतेक दडपणाखाली स्वस्तात गेला. ४ बाद ४०९ अशा भक्कम परिस्थितीत पाटा खेळपट्टीवर फलंदाजी करण्याची सुवर्णसंधी त्याने वाया घालविली. त्याला अजून १-२ कसोटी सामने तरी खेळविले पाहिजेत. धोनी नेहमीप्रमाणे स्वस्तात गेला. एकंदरीत सलामीला विजय (५ डावात १ शतक व ३ अर्धशतके) आणि नंतर मधल्या फळीत कोहली(५ डावात ३ शतके) आणि रहाणे (५ डावात १ शतक व २ अर्धशतके) सोडले तर इतरांची फलंदाजी म्हणजे आनंदच आहे. गोलंदाजांवर तर लिहिण्यासारखं सुद्धा काही नाही. धवन व पुजाराला वगळले तर रैना, नमन ओझा, रोहीत शर्मा व बुद्धीमान साहा हे पर्याय शिल्लक राहतात. त्यातल्या शेवटच्या दोघांना संधी देऊन झाली आहे. आता उरलेल्या दोघांना संधी देऊन पहावी.

या सामन्यात पहिल्या दिवशी ५, दुसर्‍या दिवशी ६ व आज तिसर्‍या दिवशी ७ खेळाडू बाद झाले. हाच क्रम सुरू राहिला तर उद्या एकूण ८ व परवा एकूण ९ खेळाडू बाद व्हायला हवेत. उद्या भारताचे उर्वरीत २ व नंतर ऑस्ट्रेलियाने आपले ५ खेळाडू बाद झाल्यावर डाव घोषित करावा व नंतर भारताचा १ खेळाडू बाद झाला तर दिवसात एकूण ८ खेळाडू बाद होतील. नंतर ५ व्या दिवशी भारताचे उर्वरीत ९ खेळाडू बाद करून ऑस्ट्रेलियाला सामना जिंकता येईल.

३५० पेक्षा कमी लक्ष्य ठेवून कांगारु डाव घोषित करतील असं वाटत नाही.. त्यामुळे विजयाची शक्यता नाहीच.. पावसाच्या कृपेने अनिर्णित राहू शकेल सामना.. नाहीतर पराभव आहेच..

सामना अनिर्णिततेकडे झुकलेला आहे. ऑस्ट्रेलिया उद्या अर्धा-पाऊण तास खेळून ३५० पेक्षा जास्त लक्ष्य ठेवून डाव घोषित करतील. भारताला घसरगुंडी होऊन पराभव होऊ नये यासाठी धडपडावे लागणार आहे. भारताला १ गोलंदाज कमी पडतोय. पुढच्या सामन्यात तरी ५ वा गोलंदाज खेळवावा. तसेही ३ च फलंदाज धावा करताहेत. इतर फलंदाज असून नसल्यासारखेच आहेत. त्यामुळे एखादा फलंदाज कमी झाला तरी विशेष फरक पडणार नाही.

अनपेक्षितरीत्या सामना अनिर्णित !! स्मिथने ४ षटके आधीच सामना संपवायला होकार दिला.. २००७-०८ ला सिडनीमधे क्लार्कने शेवटच्या षटकात ५ चेंडुत ३ बळी घेउन ऑस्टेलियाला विजय मिळवून दिला होता ..

नशिबानेच वाचलो. स्मिथने अजून ४ षटके खेळायला हवी होती. भारताचे तळाचे फलंदाज कधीही कोसळू शकतात हा इतिहास आहे. शेवटच्या ४ षटकात भारताचे तळाचे ४ फलंदा़ज बाद होणे अशक्य नव्हते. स्मिथने डाव घोषित करायलाही उशीर केला. अजून ४५-५० मिनिटे अगोदर डाव घोषित केला असता तर सामना जिंकण्याची जास्त संधी मिळाली असती. ०-४ हार होण्यापेक्षा आता ०-३/०-२/१-२ असा निकाल लागेल. मागच्या मालिकेपेक्षा थोडी प्रगती दिसतेय. तीनही कसोटी सामन्यातून एकच सत्य समोर येतंय ते म्हणजे भारताचे फक्त तीनच खेळाडू कामगिरी करताहेत (मुरली विजय, कोहली आणि रहाणे). उरलेले ८ जण नुसते जागा भरण्यापुरते संघात आहेत. गोलंदाजीत तर काहीच दम नाही. फलंदाजीत धवन, पुजारा धोनी, रोहीत शर्मा आणि लोकेश राहुल जवळपास सर्व डावात अपयशी ठरले. लोकेश राहुलने सोन्यासारखी संधी मातीत घालविली. दोन्ही डावात अत्यंत खराब फटका मारून त्याने विकेट फेकली. एकवेळ चांगल्या चेंडूवर बाद झाला असता तर त्याला सहानुभूती मिळाली असती. आता मात्र त्याचा राग येतोय. त्याला आता परत संधी मिळणं अवघड दिसतंय. धवन, अश्विन आणि रोहीत शर्मा हे फक्त आणि फक्त भारतीय खेळपट्ट्यांवरच कामगिरी करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मधील विश्वचषक स्पर्धेत त्यांना संघात घेण्याची घोडचूक करू नये. तंत्रशुद्ध समजला जाणारा पुजारा इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातही अपयशी ठरलाय. त्यालाही काही काळ बाहेर ठेवायला हवे. शेवटी ४ थ्या कसोटीसाठी लोकेश राहुल बाहेर जाणार हे नक्की. त्याच्या जागी रैना किंवा रोहीत शर्मा आत येईल. धवनला आणि पुजाराला पण काढायला हवं. पण धवनच्या जागी सलामीला कोण येणार? कदाचित रहाणे सलामीला येऊ शकतो. पण सध्या तो ५ व्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याची जागा बदलण्याचा धोका धोनी पत्करेल असे वाटत नाही. म्हणजे सलामीचा एक फलंदाज व तिसर्‍या क्रमांकाचा फलंदाज यांच्या बाबतीत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. भारताने एक फलंदाज कमी करून अष्टपैलू अक्षर पटेलला संधी देउन पहावी. तसेच रैनालाही आत आणावे. त्यामुळे दोन गोलंदाज वाढतील. एकंदरीत सगळा आनंदीआनंद आहे.

In reply to by श्रीगुरुजी

धवन सध्यातरि सन्घातच राहिल जोपर्यन्त त्याला पर्यायि सलमिचा डावखुरा फलन्दाज मिळत नाहि.

In reply to by श्रीगुरुजी

त्याची सरासरी ५०च्या जवळ आहे. शिवाय ३र्या क्रमांकावर खेळणारा दुसरा कोण चांगला फलंदाज आहे ?

In reply to by शेखर काळे

>>> त्याची सरासरी ५०च्या जवळ आहे. शिवाय ३र्या क्रमांकावर खेळणारा दुसरा कोण चांगला फलंदाज आहे ? पूर्वपुण्याईवर संघात स्थान अबाधित राखण्याचे दिवस गेले. पुजाराने २०१४ मधील १० कसोटीतील २० डावात केलेल्या धावा अशा आहेत. १, २३, १९, १७, ३८, ५५, २८, ४३, २४, २, ०, १७, ४, ११, ७३, २१, १८, ४३, २५, २१ एकूण धावा - ४८३, सरासरी - २४.१५, शतके - ०, अर्धशतके - २, सर्वाधिक - ७३ ५०+: २, ४०-४९: २, ३०-३९: १, २०-२९: ६, १०-१९: ५, ०-९: ४ तो २० डावांपैकी १५ वेळा २९ किंवा त्यापेक्षा कमी धावांवर बाद झालेला आहे. त्याची सरासरी फक्त २४.१५ आहे व २० डावात फक्त दोनच अर्धशतके आहेत. संपूर्ण वर्षभर अशी खराब कामगिरी असलेला खेळाडू संघात असू शकत नाही.

धोनी कसोटी क्रिकेट मधून निवृत्त - हर्षा भोगले फेसबुकवर!

http://www.espncricinfo.com/india/content/current/story/814975.html MS Dhoni has retired from Test cricket with immediate effect following the drawn Test against Australia at the MCG. Virat Kohli will take over as India captain for the final Test of the series, which India has already lost, in Sydney. धोनीने कसोटीतून निवृत्त व्हायला नको होते. त्याच्याइतका चांगला यष्टीरक्षक सध्यातरी भारताकडे नाही. त्याने फक्त कसोटी संघाचे कर्णधारपद सोडायला हवे होते कारण कसोटीमध्ये तो अत्यंत बचावात्मक व अनाकलनीय निर्णय घेणारा कर्णधार आहे. तो एकदिवसीय सामन्यात उत्कृष्ट नेतृत्व करतो, परंतु कसोटीमध्ये तो पूर्णपणे बचावात्मक पवित्रा घेतो.

In reply to by श्रीगुरुजी

नोप, टेस्टमध्ये बॅटिंगही काही चांगली नाही त्याची. चांगला निर्णय. पण वन्डे मध्ये त्याचा हात धरेल असा कोणी नाही.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघांना मायदेशात एखादा दणका देउन निवृत्त व्हायला हवं होतं.. पण असो यानिमित्ताने विराटला संघबांधणीला जास्त वेळ मिळेल .. सिडनीतच अ‍ॅडलेडप्रमाणे त्याचा खेळ बहरेल आणि विजयाने एकदिवशीय मालिकेत जोमाने उतरु अशी अपेक्षा !!

निदान ही कसोटी तरी ड्रॉ झाली.... अ‍ॅडलेडचेच खेळाडू परत एकदा चौथ्या कसोटीत खेळतील असा अंदाज आहे. ह्या वेळी बहूदा शिखर धवन चांगला खेळेल असे वाटते.

मनात एक (कु)शंका डोकावतीये. आयपीएल मधील श्रीनिवासन, मयप्पन व इतर काही जणांविरूद्ध सुरू असलेल्या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालय ५ जानेवारीला देणार आहे. मुद्गल समितीच्या अहवालात चेन्नई सुपर किंग्जच्या काही बड्या खेळाडूंची नावे असल्याची वदंता आहे. धोनी, रैना व इतर काही खेळांडूच्या नावावर कदाचित 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट्स्' मुळे ठपका येऊ शकतो. विशेषत: मयप्पन बेटिंग व फिक्सिंग करत होता हे माहीत असूनसुद्धा जाणूनबुजून गप्प बसल्याचा ठपका कदाचित धोनीवर येऊ शकतो. कदाचित आपल्य्वर ठपका आला तर कर्णधारपद व कदाचित संघातील स्थान सोडावे लागेल या शंकेने तर धोनीने अचानक हा निर्णय घेतला असावा का? तसं खरंच झालं तर कदाचित त्याला एकदिवसीय संघातील स्थान देखील गमवावे लागेल. हे बरेचसे स्पेक्युलेशन आहे. खरे खोटे काय ते ५ जानेवारीला समजेल. मला अजूनही वाटते की त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडून निव्वळ यष्टीरक्षक म्हणून संघात असायला हवे होते. बुद्धीमान साहा, पार्थिव पटेल, नमन ओझा, रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक इ. विद्यमान यष्टीरक्षकांपेक्षा त्याचे यष्टीरक्षण कितीतरी उच्च दर्जाचे आहे.

याचे यष्टिरक्षण धोनीपेक्षा नक्कीच चांगले आहे. पहिल्या कसोटित त्याच्या यष्टिरक्षणात काय उणीव जाणवली तुम्हाला ? धोनीच्या निवृत्तीमागे काही काळेबेरे असेल असे या क्षणाला तरी वाटत नाही. शिवाय कर्णधार म्हणून म्हणाल तर कोहली पहिल्या कसोटीत कितीतरी उजवा दिसला. माझं असं मत आहे की भारतीय गोलंदाज जरा कच्चे आहेत. त्यांना कोणीतरी चांगला मार्गदर्शक हवा. प्रयोग नकोत. त्यांच्या बरोबर सरावात काम करवून घेणारा हवा. कदाचित सध्याचा (मला माहिती माही कोण आहे ते) मार्गदर्शक तसे करतही असेल. पण सामन्यात असे दिसते की २ षटके नीट टाकली की लगेच नवीन काही करावेसे वाटते. तसे नको. पहिल्यांदाच भारताला १४० कि.मी. प्रति तासापेक्षा वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज मिळालेत - तेही एका संघात तीन (हो हो ... ऐकले मी .. शर्मा नाही म्हणता, पण तोही टाकू शकतो). पुढे त्यांची प्रगती व्हावी अशी अपेक्षा आहे. शिवाय तेंडूलकर, द्रवीड, सेहवाग नंतर कोण हाही प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आहे. तर .. मला असे वाटते की परिस्थिती पुढे चांगलीच असणार आहे ... - शेखर काळे

In reply to by शेखर काळे

>>> याचे यष्टिरक्षण धोनीपेक्षा नक्कीच चांगले आहे. -१ >>> पहिल्या कसोटित त्याच्या यष्टिरक्षणात काय उणीव जाणवली तुम्हाला ? धोनी यष्टीमागे त्याच्यापेक्षा कितीतरी चपळ आहे. >>> धोनीच्या निवृत्तीमागे काही काळेबेरे असेल असे या क्षणाला तरी वाटत नाही. शिवाय कर्णधार म्हणून म्हणाल तर कोहली पहिल्या कसोटीत कितीतरी उजवा दिसला. कर्णधार म्हणून कोहली कसा असेल हे अजून काही काळानंतर ठरेल. धोनी कसोटी सामन्यात नक्कीच निष्प्रभ व बचावात्मक कर्णधार होता. >>> शिवाय तेंडूलकर, द्रवीड, सेहवाग नंतर कोण हाही प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आहे. सलामीच्या फलंदाजाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. धवन हा नक्कीच सेहवाग किंवा गंभीरचा वारसदार नाही. तिसर्‍या क्रमांकावर द्रविडच्या जागी अजूनही चांगला फलंदाज सापडलेला नाही. पुजाराची कामगिरी परदेशात अत्यंत खराब आहे.

उद्या पहाटे ५:०० पासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध चौथा व शेवटचा कसोटी सामना सिडने येथे सुरू होतोय. दोन्ही संघात काही बदल अपेक्षित आहेत. ऑस्ट्रेलिया संघातून मिचेल जॉन्सन खेळणार नाही हे नक्की झालंय. त्याच्या जागी मिचेल स्टार्क किंवा पीटर सिडल आत येईल. धोनीने निवृत्ती घेतल्यामुळे वृद्धीमान साहा त्याची जागा घेईल. परंतु त्याचादेखील अंगठा दुखावल्यामुळे कदाचित तो संघात नसेल. तो संघात नसला तर धोनीला आपली निवृत्ती तात्पुरती बाजूला ठेवून पुन्हा एकदा यष्टीरक्षण करावे लागेल. सुरेश रैना आत येण्याची दाट शक्यता आहे. तो धवनच्या जागी आला तर लोकेश राहुलला अजून एक संधी मिळून तो सलामीला येईल. जर रैना लोकेश राहुलच्या जागी आला तर धवन संघात कायम राहील. कदाचित धवन व राहुल हे दोघेही वगळले जातील व त्यांच्या जागी रैना व रोहीत शर्मा आत येतील व सलामीला रहाणे येईल. परंतु ही शक्यता कमी वाटते. रहाणेचा ५ व्या क्रमांकावर जम बसलेला असल्यामुळे त्याची जागा बदलण्याचा धोका भारत पत्करेल असे वाटत नाही. त्यामुळे धवन किंवा राहुल यापैकी एकजण बाहेर असेल. भारताने धाडस करून ५ वा गोलंदाज अक्षर पटेलला खेळवायला हवे. रैना कामचलावू गोलंदाज आहे. त्याचा फारसा उपयोग होणार नाही. भुवनेश्वर कुमार अजून पुरेसा फिट नसल्याने तो संघात असेल का नाही हे नक्की नाही. तो आत आला तर बहुतेक उमेश यादव बाहेर बसेल. ख्रिस रॉजर्स (६ डावात ४ अर्धशतके, मागील ४ डावात अर्धशतक) आणि स्टीव्हन स्मिथ (६ डावात ३ शतके व १ अर्धशतक) यांना बाद करणे ही भारताच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी आहे. १४०+ किमी/तास वेगाने गोलंदाजी टाकणारे ३ गोलंदाज संघात असूनही हे दोघे भारताला खूप त्रास देत आहेत. कदाचित भुवनेश्वर कुमार भारतासाठी लकी ठरू शकेल.

कांगारु : ३००/२ ५००+ धावा झाल्या की सरळ कसोटी वाचवायला खेळायला लागणार. धवन आणि पुजाराला अपेक्षेप्रमाणे डच्चु देवुन लोकेश आणि रैनाला घेतले आहे. सुस्त रोहित शर्मा परत एकदा आत. भुवनेश्वर पण परत आला आहे पण अद्यापतरी त्याला बळी नाही :(

पुन्हा एकदा तेच रडगाणं. दिवसअखेर कांगारू २ बाद ३४८. अत्यंत निष्प्रभ व सुमार गोलंदाजी व त्याला साथ सुमार क्षेत्ररक्षणाची. लोकेश राहुलने संघाची धावसंख्या ४६ असताना एक अत्यंत सोपा झेल सोडला व त्यानंतर पहिला बळी मिळाला तो थेट २०० धावा झाल्यावर. दिवसाच्या शेवटच्या षटकातही अश्विनने एक झेल सोडला. उमेश यादवला झोडपून काढले गेले. भारत फक्त ४ गोलंदाज घेऊन फारसे बळी मिळवू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ५ गोलंदाज घ्यायला काय हरकत आहे? जे ४ गोलंदाज आहेत ते सर्व उजव्या हाताने गोलंदाजी करतात. एकही डावखुरा गोलंदाज संघात नाही. एकंदरीत या कसोटी सामन्यातही गोलंदाजांची वाताहत होताना दिसतेय.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी सध्याच्या एकाही गोलंदाजाला धाग्यातील नाही म्हणजे ती राखण्याचा प्रश्नच नाही !!!!

अवांतर : बिन्नीला विश्वचषकासाठी एकदिवसीय संघात घेतला. कालपर्यंत तर टीव्हीवर बर्‍याच वाहिन्यांवर एक्स्पर्टस पण संभाव्य पंधरा मध्ये बिन्नीला पकडत नव्ह्ते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वशिल्याचा तट्टू दुसरं काय? यंग ब्रिगेड म्हणून नाचायचं आणि हळूच त्या गर्दीत ३० वर्षाचं घोडं सोडून द्यायचं. मॅच खेळायला मिळो न मिळो, वर्ल्ड कप टीम मधे असल्याचे पर्क मिळतात ते महत्वाचं. :)

In reply to by थॉर माणूस

>>> वशिल्याचा तट्टू दुसरं काय? यंग ब्रिगेड म्हणून नाचायचं आणि हळूच त्या गर्दीत ३० वर्षाचं घोडं सोडून द्यायचं. स्टूअर्ट बिन्नीचे पप्पा निवड समितीत आहेत. त्याचा फायदा घेतलेला दिसतोय. शेवटी तळे राखणार तो पाणी चाखणारच! ४-५ वर्षांपूर्वी के. श्रीकांत निवडसमितीचा अध्यक्ष असताना अनिरूद्ध श्रीकांत या आपल्या पुत्राला पुढे आणण्याचा त्यांनी बराच प्रयत्न केला होता. पण आडातच नाही तर पोहर्‍यात कोठून येणार! >>> मॅच खेळायला मिळो न मिळो, वर्ल्ड कप टीम मधे असल्याचे पर्क मिळतात ते महत्वाचं. १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत सुनील वॉल्सन असाच संघात होता. ८ सामन्यांपैकी एकाही सामन्यात त्याला खेळविले नव्हते.

दुसर्‍या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या ७ बाद ५७२ विरूद्ध भारत १ बाद ७१. मुरली विजय पहिल्याच चेंडूवर शून्यावर गेल्यावर लोकेश राहुल आणि रोहीत शर्माने बर्‍यापैकी फलंदाजी करून अजून पडझड होऊन दिली नाही. भारताने निवडलेला १५ जणांची विश्वचषकाचा संघ फारसा चांगला नाही. स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, रोहीत शर्मा हे कसे काय संघात आले ते समजत नाही. स्टुअर्ट बिन्नी स्थानिक स्पर्धेत सुद्धा फारसा चमकलेला नाही. जखमी रविंद्र जडेजा सुद्धा संघात आहे. सेहवाग व युवराज स्थानिक रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहेत. सेहवागने लागोपाठ २ सामन्यात तर युवरानने लागोपाठ ३ सामन्यात शतक केले आहे. दोघांनाही ऑस्ट्रेलियात खेळण्याचा चांगला अनुभव आहे. रॉबिन उथप्पा देखील भरात आहे. तो असता तर अजून एक बॅकअप यष्टीरक्षक संघात आला असता. मुरली विजय ऑस्ट्रेलियात चांगली फलंदाजी करीत असताना तो संघात का नाही हे समजत नाही. संघातील सर्वांनीच १२५-१५० च्या स्ट्राईक रेटने धावा करण्याची गरज नसते. ७५-८० स्ट्राईक रेटने ७०-८० चेंडू खेळणारा एखादा नांगर संघात लागतो. मुरली विजयने ती कामगिरी पार पाडली असती. परदेशात वारंवार अपयशी ठरलेल्या धवन, रोहीत शर्मा इ. ना संघात घेऊन काय मिळविले ते समजत नाही. असो. ही मालिका संपल्यावर विश्वचषक स्पर्धेवर एक वेगळा सविस्तर धागा काढणार आहे. आतापर्यंत फक्त भारत व बांगलादेशाने आपले संघ निवडले आहेत. उरलेल्या देशांचे संघ नक्की झाले की एक वेगळा मोठा धागा काढायचा विचार आहे.

सामना बहुतेक अनिर्णित होण्याचीच शक्यता आहे. कोहलीने जबरदस्त फॉर्मचे प्रदर्शन करत मालिकेतले ४ थे शतक झळकावले. अजून तो नाबाद आहे. उद्या त्याला कारकीर्दीतले पहिले द्विशतक झळकावण्याची संधी आहे. अडखळत का होईना, पण नवोदीत लोकेश राहुलने देखील कारकीर्दीतले पहिले शतक पूर्ण केले. रहाणे पुन्हा एकदा पंचांची शिकार झाला. डीआरएस न वापरण्याच्या अतार्किक अट्टाहासाचा भारताला पुन्हा एकदा फटका बसला. आगामी विश्वचषक स्पर्धेत डीआरएस असल्याने पंचांचे चुकीचे निर्णय कमी होतील अशी आशा आहे. रैनाने जवळपास ३ वर्षानंतर मिळालेली संधी वाया घालविली. त्याला दुसर्‍या डावात फलंदाजी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. एकंदरीत खेळपट्टी अत्यंत निर्जीव आहे परंतु नेथन लायन चेंडू चांगलेच वळवत होता. भारताच्या अश्विनला त्याच्या निम्म्याने देखील चेंडू वळवता आलेले नाहीत.

जवळपास पहिल्या सामन्यातील परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ४ थ्या दिवसअखेर ऑसीजकडे ३६३ धावांची आघाडी होती व ५ व्या दिवसाची सुरूवात होताना त्याच धावसंख्येवर क्लार्कने डाव घोषित करून भारताला ९७ षटकांत ३६४ धावांचे आव्हान दिले होते. चहापानापर्यंत मुरली विजय व कोहलीमुळे भारत विजय मिळविण्याच्या स्थितीत होता. काही वेळानंतर भारताला शेवटच्या १८ षटकात फक्त ६४ धावा हव्या होत्या व ५ गडी बाद व्हायचे होते. नंतर साहा अचानक पुढे जाण्याचा बेजबाबदार प्रयत्नात बाद झाला व नंतर पडझड होऊन भारत शेवटी ४८ धावांनी हरला. उद्या एकूण ९१ षटके टाकली जातील व ऑसीजकडे ३४८ धावांची आघाडी आहे. मागील कसोटीत स्टीव्हन स्मिथने डाव घोषित करण्यास उशीर लावला होता व त्यामुळे सामना अनिर्णित झाला. पहिल्या कसोटीचा अनुभव लक्षात घेता या सामन्यात याच धावसंख्येवर स्मिथ डाव घोषित करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. उद्या अजून अर्धा तास खेळून २५-३० धावा वाढवून ऑस्ट्रेलिया डाव घोषित करेल असें वाटतंय. त्यामुळे भारताला अंदाजे ८०-८१ षटकात ३७५ धावांचे आव्हान मिळेल आणि ते पेलणे अर्थातच अवघड आहे. आज अश्विनचे चेंडू खूपच वळत होते. ते बघता उद्या लायन चेंडू त्याच्यापेक्षा जास्त वळवून भारताला अडचणीत आणेल असं वाटतंय. त्यामुळे भारताला सामना जिंकण्याऐवजी सामना वाचविण्याची धडपड करावी लागणार. जुलै-ऑगस्ट मधील इंग्लंड दौर्‍यात भारताचे लागोपाठ ३ डाव ४०-४५ षटकांत केवळ ३ तासात संपले होते. इतकी खराब कामगिरी होणार नाही अशी आशा आहे. भारताने उद्या सामना वाचविण्यापेक्षा सामना जिंकण्याकरता खेळावे. धडपडत सामना अनिर्णित ठेवण्यापेक्षा जीवापाड प्रयत्नात सामना हरला तरी हरकत नाही. दिवसभर टुकुटुकु खेळून ८० षटकांत ३ बाद १२५ अशी धावसंख्या बघण्यापेक्षा ८ बाद ३०० किंवा सर्वबाद ३२५ अशी धावसंख्या बघायला जास्त आवडेल. अर्थात स्मिथ डाव किती लांबवतो यावरच सर्व अवलंबून आहे.

या मालिकेत काही फलंदाजांनी प्रचंड चंगळ केलीये. ख्रिस रॉजर्स (लागोपाठ ६ अर्धशतके पण एकही शतक नाही), स्टिव्हन स्मिथ (४ शतके व २ अर्धशतके), डेव्हिड वॉर्नर (३ शतके) यांच्याबरोबरीने विराट कोहलीने देखील ४ शतके व १ अर्धशतक करून धावांची चंगळ केलीये.

संपली एकदाची मालिका. आज थोडक्यात पराभव टाळला. चारही सामन्यात भारताचा दुसरा डाव अचानक गडगडला आहे. याही सामन्यात २ बाद १७८ वरून पुढच्या १७.५ षटकात भारताने अचानक ५ गडी गमावले आणि विनाकारण स्वतःला खड्ड्यात पाडले. रैनाला दुसर्‍याही डावात भोपळा फोडता आला नाही. एकंदरीत रैना कसोटी सामन्यांचा खेळाडू नाही. त्याच्याऐवजी अक्षर पटेलला संधी हवी होती. मागील वर्षी गंभीरचे पुनरागमन अत्यंत अयशस्वी झाले होते. रैनाचेही पुनरागम अयशस्वी ठरले. २०११-१२ च्या मालिकेच्या तुलनेत ही मालिका बरी झाली. दोनच सामने हरलो. फलंदाजी बर्‍यापैकी झाली. गोलंदाजी २०११-१२ मध्ये जितकी भिकार होती तितकीच आता सुद्धा आहे. मुरली विजय (१ शतक व ४ अर्धशतके), कोहली (४ शतके व १ अर्धशतक) आणि रहाणे (१ शतक व ३ अर्धशतके) यांनी चांगली फलंदाजी केली. आजचा सामनाही रहाणेमुळे वाचला. बाकीच्यांनी खूपच निराशा केली. अश्विनने परदेशात बहुतेक पहिल्यांदाच बरी गोलंदाजी केली (३ सामन्यात १२ बळी). शमीनेही बर्‍यापैकी गोलंदाजी केली (३ सामन्यात १५ बळी). परंतु ऑस्ट्रेलियाचे १० गडी बाद करण्यात बहुतेक वेळा अपयश आले. भारताला भविष्यात ५ पूर्णवेळ गोलंदाजी खेळविण्याची गरज आहे. असो. आता १६ तारखेपासून तिरंगी एकदिवसीय सामने आहेत व नंतर १४ फेब्रुवारीपासून विश्वचषक सुरू होतोय. त्याचीच आता वाट पाहतोय.

उद्यापासून भारत-इंग्लंड्-ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामन्यांची तिरंगी मालिका सुरू होत आहे. १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या विश्वचषक स्पर्धेसाठी हे सामने सराव सामने म्हणून चांगलेच उपयुक्त ठरतील. हे सामने असे होतील. ५० षटकांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (सर्व सामने भा.प्र.वे. नुसार सकाळी ८:५० वाजता सुरू होतील) (१) शुक्रवार १६ जानेवारी इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया (सिडने) (२) रविवार १८ जानेवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया (मेलबोर्न) (३) मंगळवार २० जानेवारी भारत वि. इंग्लंड (ब्रिस्बेन) (४) शुक्रवार २३ जानेवारी इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया (टास्मेनिया) (५) सोमवार २६ जानेवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया(सिडने) (६) शुक्रवार ३० जानेवारी भारत वि. इंग्लंड (पर्थ) (७) रविवार ०१ फेब्रुवारी - अंतिम सामना (पर्थ)

भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध ८ बाद २६७. धोनी आणि रोहीत खेळत होते तोपर्यंत भारत नक्की २८५ पर्यंत जाईल असं वाटत होतं. पण धोनी गेल्यावर एकदम गळतीच लागली. २६७ धावा पुरेश्या नाहीत, पण खूप कमी पण नाहीत. बघूया काय होतंय ते. रैना आणि रोहीत वगळता इतर सर्वजण अपयशी ठरले. धवन पुन्हा एकदा स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला. त्याला विश्वचषक संघात घेणं ही चूक ठरणार बहुतेक.

अपेक्षेप्रमाणेच भारत पहिला सामना हरला. २६७ धावा जिंकण्यासाठी पुरेश्या नव्हत्या. गोलंदाजी पुन्हा एकदा उघडी पडली. तिकडे द. आफ्रिकेने वेस्ट इंडीज विरूद्ध धुमाकूळ घातलाय. ५० षटकांत २ बाद ४३९ अशी विक्रमी धावसंख्या उभारताना द. आफ्रिकेच्या पहिल्या तीनही फलंदाजांनी शतक केलंय (आमला, रॉसॉ आणि डी व्हिलिअर्स). डी व्हिलिअर्सने तर केवळ ३१ चेंडूत शतक करून सर्वात जलद शतकाचा नवा विक्रम केलाय.

लागोपाठ दुसर्‍या सामन्यात भारताची वाट लागली. फलंदाजी पूर्ण कोलमडलीये. गोलंदाजात तर कधीच अर्थ नव्हता. संघनिवड बरीचशी चुकलेली दिसतेय. धवन अजूनही संघात कसा हे गूढच आहे. मुरली विजयने कसोटीत चांगली कामगिरी करूनसुद्धा त्याला संघात घेतले नाही आणि धवन फ्लॉप असूनसुद्धा त्याची जागा पक्की आहे.

इंग्लंड विरुध्द अत्यंत लाजिरवाणा पराभव होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत आपल्या गटात पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि साउथ आफ्रिका आहेत. साखळी सामन्यातुन बाद फेरीत पोचणे तरी जमेल का या भारतीय संघाला असे वाटत आहे. अजुन दोन महिन्यात काही चमत्कार होईल / प्रमुख फलंदाज, गोलंदाजांना सुर गवसेल अशी अपेक्षा

या तिरंगी मालिकेतले सामने हरल्याचं फारसं वाईट वाटत नाही, कारण माझ्या दृष्टीने हे विश्वचषकापूर्वीचे सराव सामने आहेत. जितक्या लवकर चुका लक्षात येतील व चांगले/वाईट कामगिरी करणारे खेळाडू निवडता येतील, तितका जास्त फायदा प्रत्यक्ष विश्वचषक स्पर्धेत होईल. धवन आणि अक्षर पटेल ची संघात निवड होणं आता जरा अवघडच दिसतंय.

काल इंग्लंडविरूद्धचा शेवटचा एकदिवसीय सामना पण हरलो. ४ पैकी एकही सामना जिंकता आला नाही. कोहली व धोनी सर्व सामन्यात अपयशी ठरले. धवनने कालच्या सामन्यात बर्‍यापैकी ३८ धावा केल्या खर्‍या, पण शेवटी ऑफ च्या बाहेरच्या चेंडूला बॅट लावून नेहमीप्रमाणे बाद झाला. आधीच्या ३ सामन्यात तो अपयशी होताच. नवोदीत अक्षर पटेल अष्टपैलू समजला जातो. पण ३ डावात फक्त धाव केली. रैना फक्त पहिला सामना खेळला. रायडूही अपयशी ठरला. साडेतीन महिन्यानंतर सामना खेळणारा जडेजाही अपयशी ठरला. त्यातल्या त्यात रहाणेच थोडासा खेळला. एकंदरीत विश्वचषक स्पर्धेत भारताचं काही खरं दिसत नाही. धोनीची देहबोली अत्यंत नकारात्मक आहे. बळजबरीने मैदानात उतरल्यासारखा वाटतो. तो बहुतेक विश्वचषक स्पर्धेनंतर कायमचा निवृत्त होईल असं वाटतंय. विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची निवड बर्‍याच प्रमाणात चुकल्यासारखी वाटतेय. मुरली विजय, रॉबिन उथप्पा, युवराज, सेहवाग संघात हवे होते असं वाटतंय.

In reply to by श्रीगुरुजी

जास्त मनाला लावून घेवू नका. ऑस्ट्रेलियात १९८६ मध्ये आपण जिंकलो ते सदानंद विश्र्वनाथ मुळे.बाकी त्या नंतर पुढे सगळा आनंदी-आनंदच आहे. चला मस्त १४-१५ला मिपा संमेलन साजरे करू या. ह्या बिन-भरवशी संघाच्या मागे लागण्यापेक्षा, आपला हमखास यशस्वी ठरणारा मिपा कट्टा एंजॉय करू या.

In reply to by असंका

या दौर्‍यात रोहीत शर्माची कामगिरी संमिश्र होती. रहाणे, मुरली विजय, कोहली (फक्त कसोटी सामने) इ. प्रमाणे तो खूप चांगला खेळला नाही. तसेच धवन, पुजारा प्रमाणे खूप वाईटही खेळला नाही. पहिल्या २ कसोटीतल्या चारही डावात तो अपयशी होता. तिसर्‍या कसोटीत त्याला वगळण्यात आले व चौथ्या कसोटीत ५० आणि ४३ अशा बर्‍यापैकी धावा केल्या. ४ एकदिवसीय सामन्यांपैकी तो फक्त पहिल्या सामन्यात खेळला व त्यात त्याने जबरदस्त शतक झळकावले. उर्वरीत सामने तो दुखापतीमुळे बाहेर राहिला. तो परदेशात फारसा यशस्वी ठरलेला नाही. यापूर्वी इंग्लंडमध्येही तो फारसा चांगला खेळलेला नाही. सध्या तो दुखापतग्रस्त आहे. तो जरी मला फारसा आवडत नसला तरी तो चांगला खेळला तर मला आनंदच आहे.

व्हॉट्स अ‍ॅपवर आलेला मेसेज मोदींच्या मेक इन इंडियाचा घेतला भारतीय क्रिकेट टीमनी वसा, ऑस्ट्रेलियात रन्स करणार नाही अशी ठाम प्रतिज्ञा भारतीयं टीमनं केलेली आहे.

चला संपली ही मालिका. भारत ८ सामन्यांपैकी एकही सामना जिंकू शकला नाही. ५ हरले व उर्वरीत अनिर्णित राहिले. परदेशातील अपयशाची मालिका कायम आहे. आता १३ दिवसांनी विश्वचषक स्पर्धा सुरू होतेय. विश्वचषक स्पर्धेसाठी एक मोठा लेख पूर्ण होत आलाय. लवकरच तो टाकून स्पर्धेसाठी धागा सुरू करीन. तोपर्यंत निरोप घेतो.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे ईशांत शर्मा विश्वचषक स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी मोहीत शर्मा किंवा धवल कुलकर्णी आत येऊ शकतो. खरं तर मोहीत शर्मा व धवल कुलकर्णी हे दोघेही सर्वसाधारण गोलंदाज आहेत. त्यांचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर गेले वर्षभर जबरदस्त फॉर्मात आहे. गेल्या वर्षभरात ८ पैकी किमान ४ रणजी सामन्यात त्याने एका डावात ५ किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. यावर्षी अत्यंत अडचणीत सापडलेल्या मुंबई संघाला त्यानेच आपल्या जबरदस्त गोलंदाजीने व उपयुक्त फलंदाजीने २-३ सामने जिंकून देऊन बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. १३६+ किमी वेगाने तो आक्रमक गोलंदाजी टाकतो. अनेकवेळा संधी देऊन झालेल्या जुन्या गोलंदाजापेक्षा ठाकूरसारख्या नवीन गोलंदाजांना संधी द्यायला हवी.