Skip to main content

प्रसंग - नळ दुरुस्ती

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 01/12/2014 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन ठिकाणी राहायला आलो होतो, नेहमीची आवरा-आवरी, केर काढणे, वस्तू जागेवर लावणे, दुध , वर्तमानपत्र वाल्याची चौकशी करणे अशी कामे करत होतो. हात-पाय धुवायला गेलो तर नळ गच्च बसला होता, आता पंचाईत झाली. बाजूला फरशीपासून कमी उंचीवर छोटा नळ होता; तात्पुरते काम भागले, पण मुख्य नळ दुरुस्त करणे गरजेचे होते. अंधार पडायला लागला होता, बाहेर पडलो सुरक्षा रक्षकाकडून नळ दुरुस्त करणाऱ्या प्लंबरचा मोबाईल क्रमांक घेतला ; त्याचे नाव नंदू. कल्पना नव्हती मला… असा विलक्षण संवाद झाला… वेळ संध्याकाळी ७ ची . मी- फोन केला पूर्ण वेळ रिंग वाजली पलीकडून फोन उचलला नाही, अशा वेळी आपण जरा जास्तच उतावीळ आणि अस्वस्थ होतो, क्षणाचा विलंब न करता परत फोन केला ...पलीकडून फोन उचलला. नंदू- ह SS ह ख SSख घशात आवाज काढत … मंद्या किती वेळ वाट बघतोय … कुठायस …असा प्रश्न झाला , मी गोंधळलो …अहो मी मंद्या नाही . सचिन बोलतोय, तुमचा नंबर त्या सिक्युरिटी वाल्या विकास कडून घेतला … आता पलीकडे एकदम शांतता झाली. नंदू म्हणाला साला मिष्टेक झाली काय साहेब? मला; तो विचारतोय कि सांगतोय हेच कळेना. असो. मी म्हणालो अहो माझ्या घरातला एक नळ दुरुस्त करायचा आहे , मी नवीन राहायला आलो आहे नंदन गार्डन मध्ये तुम्ही कराल का? नंदू म्हणाला, अहो नळ दुरुस्त करायचा तर एकांदा पलंबर गाठा ना राव, मला कशाला फोन केला? या वक्ताला !!!. मी चपापलो. म्हणालो आपल्याला सिक्युरिटी ने गंडवला का काय !!!. ओके ओके. मला त्या विकास ने नंबर दिला हो. नंदू म्हणाला आओ ! विकास उद्या माझा नंबर डॉक्टरचा म्हणून देईल. तुम्ही काय तब्येत दाखवायला याल का मला , काय पण राव विंटेलीजंट माणूस, न बघता फोन करता … मी- सॉरी तुम्हाला त्रास दिला. फोन कट. म्हणलो आता जाऊन त्या सिक्युरिटी वर कट काढू. मी बाहेर जेवलो, एक दोन वस्तू घेऊन परत चाललो , तेवढ्यात मला नंदूच्या फोन वरून फोन आला, मनात म्हणले आता काय त्रास आहे यार याचा. फोन उचलला. पुन्हा घशातली खर खर ऐकू आली. साह्येब मगाशी मिष्टेक झाली काय!!. साला परत तेच… विचारतोय का सांगतोय हेच कळेना. मी म्हणालो अहो सॉरी तुम्हाला चुकून फोन केल. तो म्हणाला तुम्ही नाही सॉरी … म्या सॉरी. मी नंदू पलंबर बोलतोय. मी म्हणालो अहो मग मगाशी नाही का म्हणाला? ते काय मगाशी माझ्या भावाने, मंद्याने फोन उचलला. एकंदरीत आवाज ऐकून पलीकडे तार छेडली गेली आहे, हे मी ओळखले, एव्हाना ८ वाजून गेले होते. नंदू बोलला भावाने फोन घेतला हो, बोला काय काम आहे. मी म्हणलो अहो आवाज तर हाच होता, नंदू बोलला जुळे… आम्ही दोघे जुळे आहोत, म्हणून तसे वाटले असेल तुम्हाला. मगाशी, मी फोन केला तेंव्हा मंद्या आला नसावा, आणि खेळ सुरु झाला नसावा आणि आत्ता घसा ओला झालाय्मुळे हि सगळी लिंक लागली आहे, हे माझ्या लक्षात एव्हाना आलेच होते. हम्म म्हणालो… चला ठीक आहे. , नंदू - बोला साहेब काय काम आहे. मी म्हणलो नळ बसवायचा आहे. नंदू - ओके बसवला आणि काय काम आहे. मी म्हणलो अहो बघायला लागेल ना आधी, नंदू - ओके बघितला; पुढे ? मी -अहो कसला नळ आहे ठरवायला नको का?, नंदू -ओके ठरवला , आणि काय काम? मी - अहो नंदू शेठ … (त्याच्या या तत्पर उत्तरांना कंटाळून मी त्याचा शेठ केला होता). अहो मला सांगा पैसे किती ? तो बोलला ६५ , असली आड-नीड किंमत ऐकून मी वेडा झालो. अहो पण नवा नळ लावायचा असेल तर, तो म्हणे १६५. आणि पाईप खराब असेल तर , तो म्हणे २६५. मी म्हणलो अरे हे दर वेळी ६५ काय आहे? तो म्हणाला साहेब आमची चपटी संत्रा ६५ ला येते , उरलेले कामाचे पैसे. मी म्हणलो अरे !! दारू का पिता?, फळाचा ज्यूस वगैरे प्या. नंदू बोलला, मग संत्र काय आहे?, फळच आहे ना .. काय मजाक करता काय गरीबाची !!! साहेब. मी काय समजायचे ते समजलो, उद्या या मग बोलू असे म्हणून फोन ठेवला. - सार्थबोध www.saarthbod.com

वाचने 22759
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

तुमचा अनुभव खूप बोलका आहे यात वादच नाही. फुकट सल्ला ( आणि सेवा) घेणे आणि शक्यतर काम न करता अधिक पैसे मिळवणे हा भारतीयांचा स्थायी भाव आहे. सबसिडी / डिस्काउण्ट याची भारतीय मनाला प्रचंड भुरळ पडते. तेव्हा अश्या गोष्टी घडणे हा आपल्या समाजाचा स्थायी भावच आहे , त्यात समाजाचे सर्व स्तर आले. पण अनेक वर्षे कार्पोरेट मध्ये काढल्यावर मा़झ्या लक्शात आले आहे , पैसा नाही .. गुडविल असेल तर व्यवसाय वाढतो...गुडवील पोटी घालवलेले १०० रुपये, हजारो परत आणून देतात. विशेषतः सेवा क्षेत्रात हे अधिक खरे आहे ! अर्थात अपवाद असतीलच ! अन्य प्रतिसाद : गावाकडे घराचे बान्धकाम करताना काम चुकारपणा करणारा सुतार आणि आत्ता इथे कंपनीचे नेटवर्क आणि साधने वापरुन माझे विनोदन करुन घेणारा मी .. यात तत्वतः फरक कसा करायचा ? आमच्या हकाच्या रजा घेणारे आम्ही , घरातल्या कामवालीने दाण्डी मारली की आदळ आपट करतो की नाही ? तेव्हा माझा मुद्दा इतकाच आहे की ते लोक काम बरोबर करत नाहीत, ते माज करतात .. हे खरेच आहे पण ते सार्वत्रिक सत्य आहे ... आमच्या समाजाचे भयानक वास्तव ! उडदामाजी काळे गोरे | काय निवडावे निवडणारे |

तत्वतः गल्लत मुळात आपण धंदा आणी नोकरीत गल्लत करीत आहात. नोकरीत एखाद्या बलुतेदाराने( त्यानेच का कोणीही) वाटेल तेंव्हा या आणी वाटेल तेंव्हा जा असे केले तर नोकरीत डच्चुच मिळेल. स्वतःचा व्यवसाय करीत असताना आपण माज दाखवत राहिलात तर तो व्यवसाय फळणार फुलणार नाही हीही वस्तुस्थिती आहे. राहिली गोष्ट "आपण काम करतो ते कष्टाचे कुठे आहे?" यात (बलुतेदारीसाठी) प्लम्बर किंवा सुतार होण्यासाठी एखादे वर्षाचे जुजबी शिक्षण पुरते ( आठवी पास नंतर किंवा तेही नसेल तर चालेल) हि वस्तुस्थिती इतर सर्व व्यवसायांसाठी नाही. डॉक्टर वकीलच कशाला एम सी ए साठी सुद्धा बारावी नंतर ५ वर्षे घासावे लागतेच. मग हे शिक्षण घेतल्यावर आपण बसून खातो असा आपला अध्यारुथ अर्थ बरोबर नाही. बसून खाणे हे फक्त आपल्या कडे वडिलोपार्जित संपत्ती असेल तर ( त्यासाठी सुद्धा आपल्या वाद वडील पूर्वज कोणीतरी कष्ट केलेले असतात ज्याची फळे आपण खात असतो.) आमचे एक सर एम डी च्या वेळेस म्हणत असत कि ३ वर्षे( एम डी ची) मेहनत करा आणी ३० वर्षे आराम करा किंवा तीन वर्षे मजा करा आणी तीस वर्षे मेहनत करा. आणखी काय लिहावे?

माझ्या मते 'हजेरी'वर काम देण्यात भयानक वैताग असतो. काम 'अंगावर' द्यावं. आपसुक नखरे, वेळ आणि एनर्जी वाचतात. एवढं एवढं काम करायचं आहे, पैसे बोला, रेट बोला. स्क्वे फू, स्क्वे मी पासून ते एक 'लम्पसम' अमाऊंट सांगून काम उरकायचं. पैसा थोडा जास्त लागू शकतो पण वाचलेल्या वेळात आपण आपली कामं 'खाऊन, पिऊन, 'अमुक' करुन, हात पुसून, पुढच्या कामाला' लागू शकतो.

In reply to by कपिलमुनी

ह्ये बाकी येकदम खरं बोल्ला बगा सायेब. पन कसंय ना, लोकांना आस्ती घाई. चटाकदिशी काय तं करुन पायजे आस्तंय. मग आमच्या सार्खे हातावं प्वाट आसलेली लोकं काय कर्तो ना की किर्डीट चालनार्‍या दुकानदाराकडं जाऊन माल आन्तो. १०० च्या जागी ८०चंच आनायचं आनि तुमाला १०० सांगायचं. जुन्या कामामदी पन आस्तंच की कायतर शिल्लक. त्ये पन घुसडायचं गा. आनि आंगावर काम घ्येतलं तरी आपल्याला बरुबर अंदाज आस्ला कामाचा तरच हुतंय काम येळंत. पंटर लोकांना बरुबर तेवडं काम करुनच घरी जायचं असं म्हनलं तरच हुतंय. नाय्तं आमाला चुना.

ईलेक्ट्रीकल सामान ए पी एम सी पशी घ्या. पुण्यातला २५ रु चा स्विच १८ ला मिळेल. घरात्ल्या सर्व स्विच बोर्ड आणि प्लग स्विच ची खरेदी. ५०००/- पर्यंत होईल.

मी घरच्या घरी करत असलेली कामे १. नळ बदलणे, बेसिनचे सिंकपण घरीच बसवले आहे , तोडफोड लागत नाही अशा पाईप्स बदलणे २. ड्रिलींग करणे ३. लाईट्च्या फिटींगची सर्व कामे ( बटणे , फॅनचे रेग्युलेटर बदलणे) ४. छोटी सुतारकामे , ५. कार/ बाईकचे ओईल बदलणे , एयर फिल्टर साफ करणे , क्लच , ब्रेक सर्विसिंग, बॅटरीचे पाणी बदलणे ( छोटासा सर्विसिंग) ६. गॅस शेगडीचे सर्विसिंग ( हे एक नवीनच सुरु झालय) ते पण घरीच करतो ! ७ जुन्या पद्धतीच्या खिडक्यांना बाहेरून 'लांबी' लावणे. सहसा काचेच्या आणि लाकडी वस्तूंबद्दल बाहेरून मदत घेतो, घराला रंग सुद्धा स्वतःच लावायची इच्छा होती पण घरूनच विरोध झाला :) बादवे फारीनमध्ये खुप सारी कामे घरीच करतात असे ऐकून आहे .

In reply to by कपिलमुनी

घराला रंग सुद्धा स्वतःच लावायची इच्छा होती पण घरूनच विरोध झाला. माझ्या घरीपण. अजून वाटतंय किमान एक खोली प्रयोगाखातर करायला पाहीजेल होती.

In reply to by कपिलमुनी

मी माझ्या वॉलपेपर घरी स्वतः बसवले आहेत. इकडे लेबर वापरला तर खूप खर्च येतो. अश्या प्रत्येक कामासाठी इकडे मार्केट मध्ये handbook मिलते. स्टेप बाय स्टेप सुचनामुळे आरामात सगळी कामे करता येतात व स्वतः काही केल्याचा आनंद वेगळाच असतो.

जमेल तितकी घरची कामे मी करतो...अगदी गिझर बसवणे इं. बाकी प्लंबर ने येतो असे सांगितले की तो येणार नाही याची १००% खात्री असते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे

माझे काही मित्र ह्याच बांधकाम व्यवसायात असल्याने म्हणा... सुतार्,प्लंबर आणि इलेक्टिशियन यांचा त्रास होत नाही. डोंबोलीत काही काम असेल तर नक्की सांगा. उत्तम माणूस नक्की देवू शकतो.