मिपा संपादकीय - आहे मनोहर तरी...
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
ऋषिकेशरावांनी अवघ्या एका दिवसाच्या मुदतीत हा अग्रलेख लिहून दिल्याबद्दल मिपा व्यवस्थापन कृतज्ञता व्यक्त करत आहे...
आहे मनोहर तरी...
बालपण म्हणजे सोनेरी दिवस. प्रत्येकाच्या मनात एक कोपरा त्या सुगंधी आठवणींनी भरलेला असतो. बालपणी केलेल्या मजा, चुका, आलेले अनुभव, खेळलेले खेळ, मित्र, परिसर सारेच रेशमी असते. अर्थात हल्लीची मुलेही त्याला अपवाद नसावीत. मात्र शहरी मुलांचा एक सामान्य दिवस खरंच आनंददायी असतो का? भविष्यातील संधीच्या नावाखाली त्यांचे सोनेरी दिवस अजूनही सोनेरी आहेत का? आधीच्या मुलांशी तुलना करता हल्ली मुलांकडे अनेक विषयांवर भरपूर माहिती असते याचे कारण त्यांना माहिती देणारी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या विचार करण्याची पद्धतीतही फरक पडला आहे. जसे आपल्या लहानपणी हस्तलिखिते असताना काहीही लिहिण्याआधी त्यावर पूर्ण विचार करून मग लिहिले जात असे. आज संगणकयुगात, चूक झाल्यास ती बदलणे सहज शक्य आहे. हा जसा लिखाणासाठी फायदा तसा कृतीआधी पूर्ण विचार करण्याच्या सवयीला खीळही. आधुनिक तंत्रज्ञान, माहितीचा वेग, अनेक विषयांचा भडिमार यामुळे हल्लीच्या मुलांच्या मानसिकतेचा विचार करताना संपूर्णपणे वेगळी चौकट विचारात घ्यावी लागेल. आज अग्रलेखाच्या निमित्ताने हल्लीच्या शहरातील शाळेत जाऊ शकणार्या मुलांच्या प्रश्नांकडे पाहणे रोचक ठरावे.
हल्लीच्या मुलांचे विश्व, त्यांच्या सवयी, त्यांच्या आवडी, त्यांच्या भावना, त्यांचे प्रश्न याचा विचार करण्याऐवजी आपल्या लहानपणीचे प्रश्न त्यांनाही आहेत असे समजून त्याचे उपाय शोधणे चालू आहे असे वाटते. लहान मुलाच्या शिक्षणाची सुरवात सर्वप्रथम होते ती घरात. दोन्ही पालक हे मुलांचे पहिले शिक्षक. बर्याचशा सवयी, संस्कार हे घरातूनच होतात. पण त्या लावता येत नाही. या वयात मुले अनुकरणप्रिय असल्याने त्या सवयी पालकांना स्वतःला लावून घ्याव्या लागतात. हल्लीची मुले या शिक्षणाबाबत आधीच्या पिढीपेक्षा जास्त नशीबवान आहेत असे म्हणावेसे वाटते. पूर्वीच्या पालकांमध्ये जी "गप्प बसा" संस्कृती होती ती हळूहळू कमी होते आहे. मात्र त्याच बरोबर पालकांशी कमी संवाद, लहान वयात टीव्ही वगैरे मुळे अवेळी चुकीच्या पद्धतीने समजलेल्या "काही गोष्टी"मुळे जन्माला येणारा अनैसर्गिक रुक्षपणा अश्या नव्या समस्या वाढल्या आहेत. हल्लीच्या शहरी मुलांच्या प्रश्नांमध्ये अत्यंत वेगाने बदल घडत आहेत आणि तितक्या वेगात त्यावर उत्तरे शोधणारी यंत्रणा मात्र आपण हरवून बसलो आहे. बदलत्या समाजव्यवस्थेनेही मुलांचा फायदा करून दिला तसा तोटाही. मुलाला मनातील शंका हक्काने-प्रेमाने मांडायला सतत घरात असणार्या आजी-आजोबांचे कमी होणे, भावंडे नसणे हे नव्या कुटुंब पद्धतीतील मोठे तोटे. हे सारे असले तरीही अजूनही भारतात पालकत्व हे आद्य कर्तव्य मानले असल्याने मुलावर संस्काराचे जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसतात हेही खरेच.
खेळाच्या मैदानाची कमतरता खरंतर अभाव हा तर या देशातील अतिशय चिंतेचा विषय असायला हवा. नुसते रुक्ष ओसाड माळरान म्हणजे खेळाचे मैदान हा समज पुसणे गरजेचे आहे. विविध खेळांच्या सामग्रीने, तज्ज्ञांनी युक्त अशी किती मैदाने तुमच्या पाहण्यात आहेत? क्रिकेट हा देव असणार्या देशातही खेळाच्या तासाला मुलांना संपूर्ण क्रिकेट-कीट उपलब्ध करून देणारी मैदाने-शाळा-कॉलेजे आहेत काय? जर क्रिकेटची ही तर्हा तर बाकीच्या खेळांबद्दल काय बोलावे. खेळणार्या वयात आपण लाकडी तुकड्याला ब्याट आणि सॉक्सच्या गोळ्याला बॉल म्हणून खेळलो असे अभिमानाने सांगणाऱ्या समाजात मुलाने व्यवस्थित पॅड लावून खेळावे असे ना बापाला वाटत ना सरकारला (किंबहुना प्रत्येक बापाला वाटत नाही म्हणूनच सरकारला वाटत नाही). खेळाचे महत्त्व विशद करणारे अनेक लेख येतात नि जातात. ऑलिंपिक, राष्ट्रकुल स्पर्धेनंतर काही नवी स्टेडियम्स उभी राहतात. आज देशातील लहानग्याला मोठाल्या स्टेडियम्सपेक्षा गावागावातल्या सुसज्ज क्रीडांगणांची अधिक आवश्यकता आहे.
सध्याच्या समाजाने मुलांच्या विश्वातून केवळ क्रीडा हिरावली नाही तर "कला" देखील मुलांना पारखी झाली आहे. इयत्ता ९वी पर्यंत एखाद्या कलेत कल आहे असे दिसूनही, "आता तुमची नाटकं/चित्रं/खेळ/छंद इ. बास झाली, आता दहावीचं वर्ष आहे आता यंदा अभ्यास एके अभ्यास" असं दरडावणारे सो कॉल्ड सुजाण पालक/शिक्षक आणि "पोरीचं कॉलेजात उंडारणं पुरे झालं, आता लग्न कराया हवं" म्हणणारा बाप हे एकाच माळेचे मणी वाटतात. मुलांमध्ये असणार्या कलेला शालेय शिक्षणापुढे नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो. "असेना का बारावी, तुला वाळूच्या स्कल्पचर्सची आवड आहे ना! जा तू खुशाल शिबिराला. " असा संवाद काही अपवाद सोडल्यास ऐकू येत नाही. "अरेच्या! तुझ्या शाळेची मॅच आणि स्कॉलरशिपची परीक्षा एकाच दिवशी आहे? बरं तुला काय आवडतं? क्रिकेट? मग झालं तर मॅच पहिली" हे तर स्वप्नरंजन वाटतं. एखाद्या गोड गळ्याच्या विद्यार्थ्याला फक्त "ईशस्तवन गाणारा" म्हणूनच शिक्का बसतो. चित्रकलेचे सर टिचर्सरूम मध्ये सगळ्यात दुर्लक्षित. कोणतेही पालक निकालाच्या दिवशी संगीत शिक्षकांना गाठून "याला "ब" शेरा का दिला? कोणती जागा चुकली? " म्हणून विचारताना आढळत नाहीत. आपण एकाच रंगाच्या, गंधाच्या एकाच साच्यातून निघालेली प्रॉडक्ट्स असे स्वरूप मुलांना दिलं आहे नाही?
बरं सारा समाज शालेय शिक्षणाच्या मागे आहे कारण शालेय शिक्षण उच्च दर्जाचे आहे असे म्हणावे तर तेही नाही. शालेय शिक्षण म्हणजे सरकारी जाहीरनामा झाला आहे. "विज्ञान" आणि "गणित" हेच जगात शिकण्यालायक विषय आहेत आणि बाकी विषय आहेत म्हणून शिकायचे-शिकवायचे अशीच मानसिकता शिक्षक-पालकांत दिसते. गणितात १००/१०० मिळवताना अर्थशास्त्र, नागरिकशास्त्राकडे दुर्लक्ष झालेले चालते. मात्र भूगोलात ४०/४० मिळवून गणितात ७० मिळाले तर तो मुलगा संपला. अनिल अवचट म्हणतात "आपल्या शाळांत आपल्याला सर्वाधिक काय मिळत असेल, तर तो न्यूनगंड". मुलांना काय येतं यापेक्षा काय येत नाही हेच अधोरेखित केलं जातं. सर्वांगीण प्रगती या गोंडस नावाखाली मुलांच्या इच्छांचा, मानसिकतेचा अजिबात विचार होत नाही. बेडूक कापताना मळमळणार्या मुलाला बावळट समजले जाते. प्रत्येक जण कोणत्यातरी क्षेत्रात उत्तम आहे हे मुलांना दाखवण्या ऐवजी प्रत्येकजण "सर्वगुणसंपन्न" कसा होईल याच्या मागे धावत सुटला आहे. असे करताना आहे ते कधी निसटून जाते कळतही नाही. या सगळ्याला शिक्षणपद्धती इतकेच जबाबदार सरकारी धोरण देखील आहे. "शिक्षक हा सरकार दरबारी एक मतमोजणी करणारा, दुपारी खिचडी बनवणारा, पेपर तपासणारा, हजेरीपट भरणारा, मुलांना रांगेत शू ला नेणारा, आई-बाप नोकरीला गेल्यावर पोरं सांभाळणारा व हे सगळं ३००० रुपयांत करणारा नोकर झाला आहे. " ज्या समाजात सफाई कर्मचारी १४००० किंवा कॉल सेंटरवाले पाच आकडी पगार कमावतात तिथे शिक्षकांना मिळणारा हा पगार अस्वस्थ करतो. अश्या आकर्षक पगारावर शिक्षण देणारे महर्षी किती तळमळीने मुलांना शिकवतील याची कल्पना तुम्ही करू शकताच.
शालेय शिक्षण, खेळ, कला आदींमध्ये मुलांवर अन्याय करणारा समाज मुलांमध्ये विविध विचारांचे संस्कार घडवण्यातही तोकडा पडत चालला आहे. हल्ली तयार होणारे साहित्य, चित्रपट, नाटके, मालिका यामध्ये लहानांसाठी म्हणून जो काही धुमाकूळ चालू असतो त्यातून मुलांनी काय आणि कसा बोध घ्यावा हा प्रश्न पडतो. बालकविता, जादूंच्या गोष्टी, राक्षसांच्या गोष्टी वगैरे कालबाह्य झाले आहे. फास्टर फेणे नंतर मुलांचा असा कोणी जन्माला येऊ नये याहून शोचनीय काय असावे? बरं मुलांना वाचनाची आवड नाही असे अजिबात नाही जर मुले "हॅरी पॉटर" वर उड्या मारत असतील व मराठीकडे पाठ फिरवत असतील तर त्यांच्या भावविश्वाला साजेसे लेखन होत नाही हेच कारण असावे.
या सगळ्यावर काहीच करता येणार नाही का? तर येईल! हंगेरी सारख्या छोट्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेकडून बरेच शिकण्या सारखे आहे. पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्र, समाज आणि सरकार यांची धोरणे लोकाभिमुख असण्यापेक्षा बालकाभिमुख असण्याची गरज आहे. शिक्षणपद्धतीवर नव्याने विचार करणे अनिवार्य आहे. दर सरकारबरोबर पद्धती हवी तशी बदलणे घातक आहे त्यासाठी "संपूर्ण" स्वायत्त संस्था असणे गरजेचे आहे. प्राथमिक शिक्षण देताना मार्कां ऐवजी शेरे देणेच योग्य वाटते. इयत्ता पाचवीपासून ऐच्छिक विषय, कला-क्रिडाभिमुख शाळा इत्यादी प्रकार राबवता येतील. पालकांनी मुलाची आवड ओळखून शिक्षणा बरोबर त्याचा असा "एक खेळ आणि एक वाद्य/छंद" मिळवून देणे गरजेचे आहे जे त्याच्या मानसिक आरोग्याला आयुष्यभर साथ देईल. प्रत्येकाने मुलाला भविष्यात कसा "फायदा" करून देता येईल यापेक्षा मुलाला जे करायचे आहे त्यात आपण कशी मदत करू शकू इतकाच विचार करावा. थोडक्यात काय तर स्वतःत असलेला न्यूनगंड मुलांवर थोपवू नका असं आजचे बाल्य ओरडून सांगते आहे. त्या मुलाचे भविष्य त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला जे चांगले वाटते तसे न घडवता त्यांना जे आनंद देते तसे घडू देणे आपल्याच हाती आहे.
मिसळपाव च्या ग्रामस्थांपुढे व तात्यांपुढे प्रस्तावः येत्या बालदिनाचा आठवडा (१० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर) मिसळपाववर "बालसाहित्याचा" आठवडा घोषित करता येईल का? या आठवड्यात मिसळपाववर केवळ लहान मुलांसाठी विविध विषयांवर लेखन करता येईल. तुम्ही नेहेमी जे लिहिता तेच लहानांसाठी लिहायचे जसे कथा, कविता, व्यक्तीचित्रे, अनुभव, प्रवासवर्णन, माहिती, प्रयोग, अगदी पाककृतीदेखील! फक्त अट एकच ते आपल्या छोट्या दोस्तांना कळलं आणि आवडलं पाहिजे.
पाहुणा संपादक : ऋषिकेश.
वर्गीकरण
छान
वा..अग्रलेख
किल्लास
लेख मस्त
सुंदर संपादकीय लेख.
In reply to सुंदर संपादकीय लेख. by रामदास
रामदासभाव
In reply to रामदासभाव by विसोबा खेचर
पोटावर पाय
लेख
संपादकीय
वा ऋषिकेश
मनोहर संपादकीय
छान लेख
In reply to छान लेख by विनायक प्रभू
आभार!
उत्तम लेख
In reply to उत्तम लेख by मुक्तसुनीत
त्यांचा हा
In reply to उत्तम लेख by मुक्तसुनीत
सर्वप्रथम
उत्तरार्ध काय ?
अग्रलेख..
मस्त----
ऋषिकेश उत्तम लेख!
ऋषिकेश,
In reply to ऋषिकेश, by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या
उत्तम अग्रलेख
अतिशय उत्तम लेख ऋषिकेश!!
In reply to अतिशय उत्तम लेख ऋषिकेश!! by मनिष
टाळ्या
सुंदर
धन्यवाद!
शिक्षणक्षेत्रातील वर्णाश्रम.