Skip to main content

सतीश आळेकरां च मिकी आणि मेमसाहेब नाटक- सुन्न करणारा अनुभव

लेखक मारवा यांनी शनिवार, 29/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर – खालील लेखाने नाटकाचा बराच भाग समजु शकतो त्यामुळे जर व्हर्जीन अनुभव घ्यायचा असेल तर खालील लेख वाचु नये. सतीश आळेकर मराठीतील एक असामान्य नाटककार ! जागतीक रंगभुमीच्या कुठल्याहि अभिजात कलाकृती ला टक्कर देईल अशी समर्थ नाटक देणारा विलक्षण प्रतिभाशाली नाटककार. मी त्यांच एकहि नाटकं प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, फ़क्त वाचलेलं आहे. तरी मला अस प्रामाणिक पणे वाटतं. त्यांच मिकी आणि मेमसाहेब हे नाटक जेव्हा पहिल्यांदा वाचल तेव्हा सुन्न च झालो. यातील मुख्य पात्र एक प्रोफ़ेसर आहे, हा मोलेक्युलर बाय़ोलॉजी डिपार्टमेंट चा हेड आहे. इंटेलेक्च्युअल आहे, मेमसाहेब ( याची याच्या मानाने तरुण पत्नी त्याच्याच हाताखाली लेक्चरर), गुळवणी नावाचा एक रीसर्च स्टुडंट याच्या घरी नेहमी येत असतो, त्याचा रीसर्च अनेक वर्ष रेंगाळलेला, प्रोफ़ेसरच्या घरी एक पिंजरा आहे त्यात एक पांढरा ऊंदिर मिकी ठेवलेला ज्यावर प्रोफ़ेसर कसलासा प्रयोग करतोय. गुळवणी व मिकी हे प्रोफ़ेसर चे दोनच हमराज म्हणता येतील असे. हा त्यांच्याशी (स्वगताला समोर कोणी नाममात्र असलं तरी बोलणारयाला चालत जस,) त्याच्या वेदना शेअर करत असतो. ( म्हणजे नुसताच एकतर्फ़ी बडबडतो), गुळवणी पीएचडी, लवकर मिळावी म्हणुन काकुळतीला आलेला, प्रोफ़ेसर बहुधा नंतर हा घरी त्या निमीत्ताने येणार नाही ( शेअरींग संपणार ) म्हणुन त्याला जाणुन बुजुन उशीर लावतोय. (गुळवणी तसा मुद्दाम निगलेक्टेड केलेला पात्र वाटतो मात्र तो हि काहि ट्विस्ट घेतो की काय असे वाचतांना वाटत होते) प्रोफ़ेसर ला मेमसाहब ने नेमुन दिलेली एक दिनचर्या आहे. जी तो अनेक वर्षांपासुन नियमीत फ़ॉलो करत आहे. यात अनेक कामांबरोबर च एक मोठा हौद ( जो मेमसाहेब ने मुद्दाम लीक केलेला आहे.) त्यात प्रोफ़ेसर रोज अनेक कळशी भरुन पाणी ओततो, एक क्रुर डेली रीच्युअल हळुहळु लक्षात येउ लागतं. (या वेळेस चर्चबेल मध्ये ग्रेस चा एक लेख आहे तांदुळ मोजणारया मुली ज्यात एक बाप त्या मुलींना रोजच्या रोज ढिगाने तांदळाचे दाणे मोजायला लावतो त्याची आठवण येते, माझ्या कॉलेजमध्ये एक रॅगिंग होती माचिस च्या काडिने ग्राउंड मोजण्याची ) सुरुवातीला नॉर्मल वाटणारी बाब एका मोठ्या दिर्घकाळापासुन चालु असलेल्या एका आखीवरेखीव डिझाइन केलेल्या टॉर्चर चा भाग असतो., अस लक्षात येऊ लागतं, या नाटकातल क्रौर्य सोफ़ेस्टीकेटॆड आहे, वाचकाला आळेकर अत्यंत विलक्षण शैलीने कमालीच्या संवाद-स्वगता तील नुसत्या वापराने अतिशय परीणामकारकरीत्या केवळ अप्रत्यक्षपणे प्रोफ़ेसर च भोगणं वेदना दाखवुन देतात. त्याचा इफ़ेक्ट होऊन अक्षरश: घुसमटायला होत.. आश्चर्य म्हणजे रुढ नाटकात असलेली धक्कातंत्र, ते क्वचितच वापरतात. कुठलाहि उपदेश आदि करत नाहीत. नैतिक भुमिका घेत नाही, केवळ त्या पात्रांच्या मनाच्या तळात उमटत असलेल्या भाव भावनांचा, त्यांच्या सिच्युएशन चा, त्यांच्यात चालु असलेल्या क्रौर्य-सत्तासंघर्षाचा प्रखर प्रत्यय प्रेक्षकाला देतात. प्रोफ़ेसर हा मेमसाहेब चा गुलाम च आहे, एक बेल आहे जी वाजताच प्रोफ़ेसर प्रतिक्षिप्त क्रीया केल्यासारखा उठतो, कामाला लागतो, विवीध प्रकारची नेमुन दिलेली, सर्व काम करतो, त्याला लेखी ऑर्डर्स नियमीत येतात, प्रोफ़ेसर चा विरंगुळा असलेली बाग मेमसाहेब ने उजाड केलेली आहे, प्रोफ़ेसर च्या संवादातुन येणारे मोरपिसाचे उल्लेख दाम्पत्यामधील अबनॉर्मल लैंगिक संबधाचे सुचन करतात, क्लास मध्ये प्रोफ़ेसर लेक्चर घेउ लागला की मेमसाहेब व्यत्यय यावा यासाठी शिपायाला मध्येच खराटा घेउन क्लास सफ़ाई साठी पाठवते, मेमसाहेब चे पुरुष मित्र आल्यावर प्रोफ़ेसरने निमुटपणे बाहेर जायचं असत, सर्व ऑर्डर्स काटेकोर पाळायच्यात, त्याच फ़िजीकल आणि सेक्शुअल टॉर्चर हि रेग्युलर होतय हे आळेकर सर्व फ़ार तरलतेने दर्शवतात कुठेही भडक वा सरळसोट न हॊऊ देता, प्रोफ़ेसरचा एकुलता एक कंम्पॅनियन मिकी पुढे मेमसाहेब मारुन टाकतात, त्यानंतर च स्वगत जबरदस्त आहे, नाटकाच्या टायटल चा मिकी आणि मेमसाहेब मधल्या प्रतिकाचा उलगडा हळुहळु होऊ लागतो. प्रोफ़ेसर हा मिकी आहे मेमसाहेब च्या ताब्यातला, मिकी प्रोफ़ेसर च्या ताब्यातला एक चेन ऑफ़ सटल एक्सप्लॉयटेशन, अगदि मुलगामी स्वरुपातली पॉवर प्ले, सॅडिझम कमालीच्या ताकदिने आळेकरांच्या नाटकात अनफ़ोल्ड होत जाते. एका एका वाक्यात अशा कलाकृतींची वर्णन करण हा मोठा अन्याय होतो व फ़ार मर्यादित अर्थाचा शिक्का मारल्यासारखा होत. म्हणुन जमेल तस काही मुद्दे माझ्या कुवतीनुसार अशी मांडतो. अर्थातच हे माझ माझ्यापुरत मर्यादित आकलन या नाटकाविषयी आहे. १- एकदम बेसिक बोलयच तर हे नाटकं एक अत्यंत सुक्ष्मतम स्तरावरचा सॅडिझम ( मराठी प्रतिशब्द माहित नाही व वापरण्याची इच्छा हि नाही ) दाखवतो. जो एका सॅडिस्ट लेक्चरर स्त्री कडुन तिच्या नवरयावर जो एक इंटेलेक्च्युअल सायंटिस्ट प्रोफ़ेसर आहे केलेला दाखवलेला आहे. २- हे नाटक कुठेहि जरादेखील तोल न ढळु देता आपली प्रतिकात्मकता जपतं, यात आळेकर कुठेहि सरळ सरळ विधान करण कटाक्षाने टाळतातं, अतिशय कलात्मक कुशलतेने हळुहळु प्रेक्षक त्या भयाण अनुभवाला प्रोफ़ेसर च्या ट्रॅजेडि ला सामोरा जातो. ३- मानवी मनाच्या अगदि नेणीवेच्या तळाशी असलेली हिंस्त्रता, जी एरवी वरकरणी अगदि सुशिक्षीत, सुसंस्कृत जीवन जगत असलेल्या व्यक्ती मध्ये कशी दडुन असते, तिचा अतिशय खोलवर असा वेध आळेकर या नाटकातुन घेतात. ४- आळेकर स्ट्रीट कार नेम्ड डिझायर मध्ये जसा नाटकाच्या क्लायमॅक्स ला सीक्रेट ओपन करुन टेनेसी विल्यम आपल्याला परत एकदा पुर्ण नाटक रीव्हाइज करुन त्या वेड्या बाईच्या अगोदर दाखवलेल्या एकेका वागण्याचा अर्थ लावायला भाग पाडतो व धक्का देतो तसे ते करत नाहीत. आळेकर याच्या अगदि उलट प्रोफ़ेसर ची ट्रॅजेडी हळुहळु इम्प्रोव्हाइज करत नेतात. मात्र हे करतांना कलात्मक सांकेतिकता अत्युच्य पातळीवर नेतात ५- प्रोफ़ेसर च्या स्वगतातुन, त्याला होत असलेल्या भासातुन, गुळवणी शी असंबद्ध बोलतांना आपल्याला त्याच्या मनाची अवस्था उलगडत जाते. एक तुलना वा फ़ाटा फ़ोडावासा वाटतो. मारीया व्हर्गास च्या ऑट ज्युलीया अंड स्क्रीप्टरायटर या सुंदर कादंबरीत हि अशीच आर्टीस्टीक ट्रीक थोड्या फ़रकाने वापरलेली आहे. त्यामध्ये नायक असलेल्या स्क्रीप्टरायटरची मनोवस्था सरळ न मांडता त्याने लिहीलेल्या एका एका एपिसोड मधुन त्या कथेत होत असलेल्या वर्णनांच्या बदलामधुन स्क्रीप्टरायटरची बदलती ढासळती मानसिकता वाचकाच्या लक्षात आणुन दिली जाते.. प्रोफ़ेसरच्या स्वगतातुन प्रोफ़ेसर अनाथालयात वाढलेला, मेमसाहेब त्याची पत्नी त्याच्यापेक्षा तरुण, त्यानेच बनवुन दिलेल्या थिसीस ने लेक्चरर झालेली. इ. बाबी कळतात. ६- प्रोफ़ेसर ची होणारी घुसमट कुचंबणा वेदना संताप व सर्वात महत्वाच म्हणजे वांझ विद्रोह, मेमसाहेब ला धडा शिकवण्याची वांझ फ़ॅटसी आदि आळेकर अत्यंत प्रभावी अशा स्वगत-संवादातुन परीणामकारकरीत्या दाखवतात.( उदा. एकदा व्हाइस चॅन्सेलर ला काल्पनिक कंम्प्लेंट प्रोफ़ेसर करतोय असा सीन येतो.) ७- वाचक (मी फ़क्त वाचलेल आहे म्हणुन) प्रोफ़ेसर च्या ट्रॅजेडिशी मेमसाहेब च्या गुढ. अनाकलनीय व्यक्तीमत्वाशी पुर्ण जोडला जातो. संपुर्ण नाटक हे मानसिक पातळीवर ची आंदोलने दाखवत ते क्वचितच फ़िजीकल होत क्लायमॅक्स चा भाग सोडुन. तरीही आळेकरांना जो अनुभव संक्रमित करायचा आहे त्यात ते पुर्ण यशस्वी होतात हे आळेकरांच मोठ यश आहे नाटक आळेकरांनी एम.एस्सी च शिक्षण घेत असतांना १९७३ मध्ये लिहीलय म्हणजे साधारण वय २४ - २५ असतांना अंदाजे, इतक्या कमी वयात इतकी असामान्य प्रतिभा ! ओ माय गॉड ! त्यानंतर इतक्या वर्षातहि फ़ारच कमी नाटक लिहीलेली आहेत. त्यांची मला अतिशय आवडलेली दुसरी असामान्य नाटके म्हणजे महानिर्वाण आणि बेगम बर्वे ती देखील ग्रेट च आहेत असामान्यच. एक आश्चर्य वाटत ४१ वर्षापुर्वी मराठीत अस नाटक आल होत. एक इच्छा अपुर्ण आहे मराठी रंगभुमीच्या तीस रात्री मध्ये मकरंद साठे नी आळेकरांच्या नाटकावर सुंदर लिहीलेल आहे ते काय आहे वाचण्याची पण त्या पुस्तकाची पृष्ठसंख्या आणि किंमत दोन्ही मुळे ते अजुन घेण होत नाही. कोणी वाचलेल असल्यास जरुर शेअर कराव आणि बेगमबर्वे नाटकावर मकरंद साठेंच एक स्वतंत्र पुस्तक आहे का ? ते नेमक कुठल त्याची माहीती द्यावी हि विनंती, या निमीत्ताने सतीश आळेकरांच्या नाटकांवर चर्चा व्हावी असे वाटते. शेवटी एक नमुना म्हणुन खालील संवाद द्यायचा मोह आवरत नाही. नाटकात एका प्रसंगात मेमसाहब कडुन प्रोफ़ेसरला भोंडला घालण्याची ऑर्डर येते, मेमसाहेब च्या मैत्रीणी जमा होतात, प्रोफ़ेसर भोंडल्याची गाणी पाठ करतो, सर्व तयारी करतो, मध्ये हत्तीच चित्र ठेवण्याएवजी मिकी चा पिंजरा ( कापडाने झाकुन ठेवतो) बायका येतात हा सर्वच भाग अत्यंत विलक्षण जमवलेला आहे, यात आलेल्या बायकांना खिरापत ओळखता येत नाही मग प्रोफ़ेसर ती सांगतो, ( इथपर्यंत अनेक वर्षांपासुन फ़ुटका हौद कळशी कळशी ने भरण्याच टॉर्चर भोगणारया प्रोफ़ेसर ची पार्श्वभुमी एव्हाना उघड झालेली असते) प्रोफ़ेसर बोलु लागतो.... “आजच्या भोंडल्याची खिरापत आहे निर्मळ जल, शुद्ध पाणी, वाळा विरहित, फ़िजमधल नाही, तसचं कच्च, (बायका: अय्या,वंडरफ़ुल म्हणत पाणी पितात ) पाण्याच महात्म्य फ़ार महान आहे. अन्न, वस्त्र निवारा ह्यांचे बेसीस पाणी हेच आहे, पाणी हे परब्रह्म आहे, पाण्याने अर्ध्य देतात, त्याने आंघोळ करतात, चुळसुद्धा भरतात, पाण्यानेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी अस जे म्हटल आहे ते काय उगीच ? शिवाय पाणी हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, म्हणुन तर हा प्रपंच, शिवाय पाणी ओंजळीत राहत नाही त्याला हौदच लागतो. तो भरावा लागतो. कळशी लागते. हेलपाटे लागतात, पॅन्ट ओली करावी लागते किंवा अर्धी चड्डी घालावी लागते. पाण्यात बुडुन हात स्वच्छ राहतात पण अकाली सुरकुततात. तेव्हा भोंडल्याच्या या मंगलप्रसंगी पाणी हि खिरापत प्रसंगाला अनुरुप अशीच आहे. त्यामुळे भोंडलेश्वराला देखील समाधान वाटेल. निदान पक्षी ते वाटावे व प्रकोप होऊ नये हि सदिच्छा अस्तु, “

वाचने 12078
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

मला शक्यतो, हलकी-फुलकी नाटकेच जास्त आवडतात. त्यामुळे हेच काय पण अशी वेगळी नाटके बघायचे धाडस होत नाही... असो, परत एकदा, नाटकाची ओळख उत्तमरीत्या करुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद...

फार चान लेख. त्यांच्या डिपार्टमेंटच्या एका कार्यक्रमाला मी गेलो असतानी एका मुलिने फार ताकदीने काम केले होते. मी जेव्हा त्यांना हे स्वतः भेटून सांगितले तेव्हा त्यांना झालेला आनंद अजुनही माझ्या लक्षात आहे. फार प्रतिभावान गृहस्थ.....आणि साधा.

छान *

In reply to by आतिवास

नीलकंठ प्रकाशन, पुणे, यांनी हे प्रसिद्ध केलं आहे असं इथे वाचलं. संपर्क इथे करू शकाल असं सुलेखा डॉट कॉम वर वाचलं: Address Tilak Road, Sadashiv Peth, Sadashiv Peth, Pune - 411030 Land Mark: Near State Bank of India ATM Contact Person: Prakash Ranade 020 - 24330605

नाटकाची करून दिलेली ओळख आवडली. लगेच बघावेसे वाटते असे मात्र म्हणता येणार नाही. मनाची तयारी करून बघितल्यास चालेलसे दिसते.

अवांतरः 'सॅडिझम' ला मराठी प्रतिशब्द असणं कठीण आहे कारण या प्रवृत्तीचं नामकरण मार्कि दि सॅड (Marquis de Sade) या फ्रेंच तत्ववेत्त्याच्या लिखाणातून (आणि त्याच्या 'दि सॅड' या नावावरून) आलंय.

In reply to by बहुगुणी

सॅडिझम शब्दाचा उगमच मार्क्विस द सॅड च्या नावावरुन झालाय. याची दुसरी बाजु मॅसोचिझम तो बहुधा व्हिनस इन फर या कादंबरीशी संबधित आहे. सॅडिस्ट आणि मॅसोचिस्ट हे शब्द यावरुन च. मराठीत वसंत आबाजी डहाके यांनी सॅडे वर एक दिर्घ कविता लिहीलेली आहे. साल्वादोर दाली वर सॅडे चा मोठा प्रभाव त्याची एक मोठी चित्रांची सीरीज सॅडे च्या साहित्यावर विचारसरणी वर आधारीत आहे. जी.ए. कुलकर्णी यांच्या पत्रसंग्रहात त्यांना असलेल सॅडे च्या साहित्याच आकर्षण दिसुन येत ( त्यांच्याकडे कम्प्लीट वर्क उपलब्ध होत तो त्यांचा एक अपार उत्सुकतेचा विषय होता) ते माधव आचवल हा विषय डिस्कस करतांना आचवलांच्या कॉमेंट्स रोचक आहेत. सीमॉन ब्रुव्हा चा एक असामान्य लेख आहे शुड वुइ बर्न सॅडे या नावाचा (चुकभुल देणे घेणे) सॅलो १२० डेज ऑफ सोडोम हा एक असामान्य इटालियन चित्रपट सॅडे च्या थीम्स वर आधारीत आहे. पण सॅडे हा अतिशय एक्स्ट्रीम आहे मला प्रांजलपणे वाटत कि त्याच्या वाटेला जाण्यापुर्वी काळजी घ्यावी. वय अनुभव वाचन व चिंतन एका पर्टीक्युलर लेव्हल ला गेल्यावर त्यानंतर जर वाचनात आल तर ठीक आहे मात्र चुकीच्या वेळी व वयात व अनुभवाच्या कमतरतेत असे साहित्य वाचणं घातक ठरु शकते असे माझे व्यक्तीगत मत आहे.

In reply to by मारवा

//वय अनुभव वाचन व चिंतन एका पर्टीक्युलर लेव्हल ला गेल्यावर त्यानंतर जर वाचनात आल तर ठीक आहे मात्र चुकीच्या वेळी व वयात व अनुभवाच्या कमतरतेत असे साहित्य वाचणं घातक ठरु शकते असे माझे व्यक्तीगत मत आह//// सहमत आहे.......

सर्व प्रतिसादकांचे मनापासुन धन्यवाद. मी पुस्तके बुकगंगा वरुन घेतली या साइटचा अनुभव चांगला आहे. आळेकरांची सर्वच पुस्तके नाटकांची येथे उपलब्ध आहेत. खास करुन आणखी दोन महानिर्वाण आणि बेगम बर्वे मी माझ्याकडुन सजेस्ट करतो एकदा अवश्य वाचुन बघा. http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5213085514709311073

In reply to by बोका-ए-आझम

महानिर्वाण ब्लॅक कॉमेडि च आहे. सर्वात महत्वाच म्हणजे पहिल्या अंकातील सुरुवातीचा भाग इतका इमोशनल इतका तरल आणि तो जर रुढ रस्त्याने आळेकरांनी पुढे नेला असता तर किती ट्रॅजीक ट्रॅडिशनली वाटला असता मात्र तो तसा न होउ देण्याचा मोह आवरुन ... त्याला तसे पुढे न जाउ देता ( हे नाटक मराठीतले सर्वश्रेष्ठ लोकप्रिय पारंपारीक ग्रॅड ट्रॅजेडि झाले असते अगदि सहज ) त्या नाटकाला आळेकर विलक्षण कौशल्याने कलात्मकतेने पुर्णपणे ब्लॅकीश कॉमेडीने डार्क करुन टाकतात. त्या मृत्यु च्या पुर्ण अनुभवालाच त्याच्या संपुर्ण निरर्थकतेला ते( जो थोडाफार अगदि थोडासाही अर्थाचा पापुद्रा लाभु शकला असता/ शकतो ) तो हि देण्याच नाकारतात... मला हे नाटक या कारणासाठी प्रचंड आवडलं याच्या अगोदर जाने भी दो यारो या चित्रपटाने व मिलन कुंदेरा च्या अनबेअरेबल लाइटनेस ऑफ बिइंग ने इनफॅक्ट कुंदेराच्या प्रत्येक च कादंबरीने या अनुभवाची झलक दिली होती पण फुल स्ट्रोक आळेकरांच्या महानिर्वाण ने दिला एक गंमतीदार विचार येतो याच नाटकातला ब्लॅक ह्युमर काढुन सुरुवातीच्या ट्रॅजेडिला कंटिन्यु करुन कानेटकरांनी नाटक लिहील असत तर जर तर च्या गोष्टी पण मजा येते व आश्चर्य वाटत ते आळेकरांच्या मोह टाळण्याच्या क्षमतेच

छोट्या छोट्या गोष्टीत दुसृयाचा आनंद हिरावु न घेणारी माणसं कायम पहात आल्याने, नाटक वाचुन पुन्हा वेदना सोसायची अजिबात तयारी नाही. तसही नुकतच जी एं च पारवा वाचलयं. मनात एक मळमळ साचल्यासारखी झालीय.

विषयावरील अर्थपूर्ण लिखाण आवडले. सत्तरीच्या दशकाच्या सुरूवातीच्या अलिकडे- पलिकडे मराठी रंगभूमीवर अनेक प्रगल्भ, विचार करावयास लावणारी, तसेच रंगभूमीच्या नव्या वाटा धुंडाळणारी नाटके आली-- 'शांतता, कोर्ट सुरू आहे', 'घाशीराम कोतवाल','सखाराम बाईंडर'(तिन्ही तेंडुलकरांची), 'महानिर्वाण',' बेगम बर्वे' व 'मिकी आणि मेमसाब' (आळेकर), 'सुलतान,होळी आणि तीन एकांकिका' (एलकुंचवार) ही त्यातीला आता मला आठवताहेत, ती काही ठळक नावे. तुम्ही 'मिकी' मधे वर्णन केलेला,मानवी क्रौर्याचा विषय तर तेंडुलकरांच्या लिखाणाचा मध्यबिंदूच होता, व तो त्यांनी अत्यंत समर्थपणे हाताळला होता. 'रायगड', 'अश्रूंची फुले' इत्यादी mushy पणांत गुंगलेल्या आम्हाला पहिला धक्का दिला तो 'शांतता' ने! मध्यमवर्गीय, सभ्य, 'आपण बरे की आपले काम बरे' अशा पापभीरू माणसांनी सहज जाता जाता बेणारेबाईवर जे वाग्बाण लुटुपुटीच्या कोर्टच्या निमीत्ताने सोडले, त्याने ती संपूर्ण घायाळ झाली. त्यांच्या सामूहिक सॅडिझमचे हे दर्शन आम्हा 'रसिक' वगैरे मराठी वाचक- प्रेक्षकांना भांबावून सोडणारे होते.

शांतता! तर घुसमटवून टाकतंच पण ' गिधाडे ' ही जबरदस्त आहे.'घाशीराम कोतवाल'चा तर प्रश्नच नाही पण तेंडुलकरांचे हिंसा आणि क्रौर्य यांचं यथार्थ चित्रण करणारं पण काहीसं दुर्लक्षित नाटक म्हणजे 'बेबी'. मी काॅलेजमध्ये असताना संदीप कुलकर्णी, अदिती देशपांडे आणि अजित भगत अभिनीत आणि कै. चेतन दातार दिग्दर्शित प्रयोग पाहिला होता. भयावह! अजूनही आठवणीने अंगावर काटा येतो. एक रक्ताचा ओघळही न वाहवता तेंडुलकर जी माणसातली हिंसा बाहेर काढतात तो सगळा प्रकारच ग्रेट आहे!

घाशीराम शांतता गिधाडे जबरदस्त च आहे. पण बेबी बघितल नाही माहितही नव्हतं त्याच्याविषये थोद डिटेल सांगा तुम्हाला त्यात काय वेगळेपण जाणवल? जाणुन घ्यायला आवडेल आणि चेतन दातार हे अकाली वारले तेच का ? घटोत्कच की शुर्पणखा वर काही नाटक होत का त्यांच ? की कुठल्यातरी महाभारताच्या पात्रावरच तेच हे ना ?

In reply to by मारवा

हो. तेच चेतन दातार. अकालीच गेले. अत्यंत ताकदीचा दिग्दर्शक. रुपारेल महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतल्या एकांकिका त्याने बसवल्या होत्या. माझा आणि त्याचा परिचय होता असं म्हणता येईल. मैत्री नाही. I was and am too much in awe of his talent to be friends with him. बेबी हे नाटक बेबी, तिचा भाऊ राघव आणि तिच्यावर वाईट नजर असणारा पण राघवमुळे तिला भ्रष्ट करण्याची हिंमत नसलेला शिवाप्पा हा गावगुंड या तिघांची कथा आहे. काही कारणाने राघव परागंदा होतो, कदाचित तुरुंगातही जातो आणि जेव्हा परत येतो तेव्हा परिस्थिती पूर्ण बदललेली असते. शिवाप्पाने तोपर्यंत बेबीला भ्रष्ट करुन ' ठेवलेलं ' असतं आणि त्यामुळे त्याचं आणि राघवचं एकमेकांशी वागणं पूर्णपणे वेगळ्या डायमेन्शनवर जातं. शिवाप्पा आणि राघव हे दोघंही आपलं Power Equation बेबीवरुन कसं डिफाइन करतात - ते म्हणजे हे नाटक. मूळ नटसंच लालन सारंग (बेबी), अरविंद देशपांडे (राघव) आणि निळू फुले (शिवाप्पा) हा होता. दिग्दर्शन मला वाटतं कमलाकर सारंगांचं होतं. या नटसंचाने आणि नव्या संचानेही बेबी तीच ठेवून राघव-शिवाप्पाची अदलाबदल केली. मी पाहिलेल्या प्रयोगात अजित भगतनी शिवाप्पा केला होता, संदीप कुलकर्णींनी राघव आणि अदिती देशपांडे बेबी.

In reply to by बोका-ए-आझम

बेबी नाटकाच्या ओळखीसाठी धन्यवाद. चेतन दातार वा त्यांच्यासारखे नाटकाने झपाटलेले लोक, थोड त्यांच्या विषयी अजुन येउ द्या तुमचा व्यक्तीगत संबध आला होता तर थोड जवळुन बघितल्याचा अनुभव कळेल ते कसा विचार करत कस काम करत या लोकांच मोटीव्हेशन काय असत म्हणजे व्हॉट मुव्ह्ज देम सो पॅशनेटली तस इतर क्षेत्रांसारख फारस काहि मिळत नसतानाही,

In reply to by मारवा

चेतनने एकांकिका आणि दीर्घांक यांच्यातून सुरुवात केली. तो लाला लाजपतराय काॅलेजचा विद्यार्थी.काॅलेजमध्ये असतानाच तो पंडित सत्यदेव दुब्यांच्या संपर्कात आला आणि मग त्याने पंडितजींप्रमाणेच नाटक हा ध्यास घेतला. त्याने सुरूवात जरी प्रायोगिक रंगभूमीवर केली असली - तेव्हा दादरच्या छबिलदास शाळेची जागा उपलब्ध होती - तरी व्यावसायिक रंगभूमीने पण त्याची दखल घेतली कारण त्याचं नाटक - झुलवा. उत्तम बंडू तुपे यांची कादंबरी त्याने नाट्यरुपांतरित केली. सुकन्या कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांनी त्यात काम केलं होतं. हे दोघंही झुलवामधूनच पुढे आले. मी त्याला एकदा दिग्दर्शनाबद्दल विचारलं होतं तेव्हा तो म्हणाल्याचं आठवतं की आमच्याकडे बाहेरच्या दिग्दर्शकाला द्यायला पैसे नव्हते म्हणून मी दिग्दर्शक झालो. पॅशन हा एक मुद्दा झाला पण मला वाटतं नाटक या माध्यमाएवढी ऊर्जा दुसरं कुठलंच माध्यम देत नाही आणि मागतही नाही. ती ऊर्जा ज्याने अनुभवली तो नाटक करेलच. रुपारेल काॅलेजच्या एकांकिकांचं दिग्दर्शन तो करायचा. नंतर कामामुळे त्याला वेळ मिळायचा नाही. पण नंतरचे दिग्दर्शक त्याचेच शिष्य असल्यामुळे ते त्याला एकतरी तालीम दाखवायचे. १९९२-९३ मध्ये तेंडुलकर महोत्सव झाला होता तेव्हा त्याने बेबी, चंद्रकांत कुलकर्णींनी गिधाडे आणि विजय केंकरेंनी अशी पाखरे येती दिग्दर्शित केलं होतं. ही तिन्ही नाटकं पहायचा योग आला आणि प्रत्यक्ष तेंडुलकरांनी चेतनचं कौतुक केलं. दिग्दर्शक म्हणून त्याचा एक फार महत्वाचा मुद्दा असायचा आणि तो म्हणजे व्यक्तिरेखेचा आवाज. हा माणूस कशा प्रकारे, कुठल्या पट्टीत, कसा हा संवाद बोलेल याची तो कसून तयारी करुन घ्यायचा. शिस्तीच्या बाबतीत तर कडक होताच पण तितकाच तो कलाकाराला रिलॅक्स पण करायचा. अशा ब-याच गोष्टी आहेत. त्याचा मृत्यू हा मात्र धक्का होता. एकतर तो पूर्ण निर्व्यसनी होता. नाटक हेच व्यसन.मला वाटतं अति काम आणि त्याचा ताण यांनी त्याचा घात केला. त्याने एकच गोष्ट सांगितलेली, जी मी अजून पाळतो - का हा प्रश्न विचारत राहा.

या संपूर्ण नाटकात (म्हणजे तुम्ही जी ओळख करुन दिली त्यात तरी) एक बेसीक मुद्दा हरवल्यासारखा वाटतोय, तो म्ह्णजे या विद्वान प्रोफेसरने गिनीपीग होणं का स्विकारलं असावं... तो आणि मॅडम मूळचेच सॅडीस्ट (दु:खानंदी) असावेत काय? कि प्रोफेसर स्वतःला शिक्षा द्यायची म्हणुन स्वतः या पाशात अडकला? मॅडमचा हा स्वभाव मुळचाच असावा कि ति सूड घेतेय? प्रोफेसर इतका विद्वान आहे काय कि तो प्राण्यांवर आणि माणसांवर एकसाथ प्रयोग करु शकतो आणि त्यातच गुरफटुन जातो? यापैकी एकाहि कारणाने संपूर्ण नाटकाचा पोत बदलतो. जर हे कारण दाखवलच नसेल तर मात्र ति एक वेगळीच कलाकृती दिसते... वाळवंटात दडी मारुन निजणार्‍या सापासारखी.

अर्धवटराव जी ओळख मर्यादितच आहे. क्लायमॅक्स हि वगळलेलाच आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुर्ण नाटक वाचल्यानेच मिळु शकतील.

तस काहि घटना महत्वाची वा त्यावरुन मग कारणमीमांसा असा भाग त्यात नाही. तरी नाटककाराला जे काय पोचवायच आहे प्रेक्षकांपर्यंत ते पुर्ण नाटक मुळात वाचल वा बघितल तर अधिक उत्तम कळेल म्हणजे हा एकच मार्ग असु शकतो असे मला वाटते. ओळख ओळखीपुरतीच मर्यादित आहे.

वाचायला हवं/ किंवा बघायला.